वॉचटावर एज्युकेशनल सेंटरचा समर्पण समारोह—यहोवाच्या गौरवासाठी एक सोहळा
अगदी इतिहासपूर्व काळापासून, आनंदी सोहळे खऱ्या उपासनेचे एक अविभाज्य अंग राहिले आहे. प्राचीन इस्राएल राष्ट्रात कैक दिवस चालणाऱ्या सोहळ्यांना यहोवाच्या उपासकांची अलोट गर्दी जमायची. उदाहरणार्थ, शलमोनाच्या मंदिराचा उद्घाटन समारंभ सात दिवसांपर्यंत चालला आणि लगोलग आठवड्याभराचा मांडवांचा सण सुरू झाला. यहोवाने आपल्यासाठी केलेल्या महत्कृत्यांवर मनन करण्याची संधी या सोहळ्यांमुळे इस्राएलांना मिळाली. परिणामस्वरूप, ‘यहोवाने त्यांच्यावर जो प्रसाद केला त्यामुळे आनंदी आणि हर्षभरीत होऊन’ ते सर्व आपापल्या घरी परतले.—१ राजे ८:६६.
अलीकडेच, मे १७-२२, १९९९ या दरम्यान पॅटरसन, न्यूयॉर्क, यु.एस.ए. येथील वॉचटावर एज्युकेशन सेंटरमध्ये पार पडलेला सोहळा पाहून अनेकांना प्राचीन काळातल्या त्या उत्सवांची आठवण झाली. सबंध जगात बायबलच्या ज्ञानाचा प्रसार करण्याच्या हेतूने उभारण्यात आलेल्या या एकूण २८ इमारतींच्या कॉम्प्लेक्सचे समर्पण करण्याच्या निमित्ताने, हा आठवड्याभराचा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या संस्मरणीय सप्ताहादरम्यान ब्रुकलीन, वॉल्किल आणि पॅटरसन या मुख्यालयांत काम करणाऱ्या सर्व ५,४०० सदस्यांना पॅटरसनमधील या नवीन इमारतींतील सर्व विभागांत चालणाऱ्या कार्याची कल्पना यावी म्हणून या विभागांना भेट देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शिवाय, जवळजवळ ८,१०० पाहुणे देखील या समारोहास उपस्थित होते; सेंटरच्या बांधकामात योगदान दिलेले ५०० हून अधिक भूतपूर्व सदस्य, वॉच टावर संस्थेच्या २३ शाखांचे प्रतिनिधी आणि जवळपासच्या मंडळ्यांतून आलेल्या बऱ्याच लोकांचा या पाहुण्यांमध्ये समावेश होता.
बोधपर प्रदर्शने
भेट देणाऱ्या लोकांना शैक्षणिक केंद्राविषयी अधिक जाणून घेता यावे म्हणून खास प्रदर्शने, शैक्षणिक व्हिडिओ सादरीकरणे आणि गाईडच्या मदतीशिवाय स्वतःहून घेता येतील अशा टूअर्स आयोजित करण्यात आल्या होत्या. मुख्य लॉबीमध्ये पाहुण्यांचे लक्ष त्वरित वेधून घेणारे एक मॉडेल होते; येशू पृथ्वीवर असताना यरूशलेमेत असलेल्या मंदिराचे हे प्रमाणबद्ध मॉडेल होते. याशिवाय, आणखीन बरीच प्रदर्शने होती. या प्रदर्शनांनी गिलियड प्रशालेच्या सुरवातीच्या इतिहासावर, ऐतिहासिक अधिवेशनांवर, मंडळीच्या सभांवर, आधुनिक काळातील गृह बायबल अभ्यासांच्या प्रगतीवर (यांपैकी लाखो सध्या दर आठवडी चालवले जातात) आणि येशूने नेमून दिलेले कार्य कोणत्याही अडथळ्याविना अगदी सुरळीत चालावे म्हणून लीगल डिपार्टमेंट (कायदा विभाग) कोणते काम करते यांवर प्रकाश टाकला.—मत्तय २८:१९, २०.
समर्पण सोहळ्यादरम्यान भेट देणाऱ्या लोकांसाठी, मुख्य लॉबीला लागून असलेल्या प्रेक्षागृहात (यात १,७०० लोक अगदी आरामात बसू शकतात) ३३ मिनिटांची एक व्हिडिओ फिल्म दाखवण्याची व्यवस्था करण्यात आली होती; सदर फिल्मचे शीर्षक, “पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्याने!” असे होते. आणि यात, वॉचटावर शैक्षणिक केंद्र कसे आकारास आले हे दाखवण्यात आले. बऱ्याच लोकांच्या मुलाखती देखील यात दाखवण्यात आल्या; मुलाखत देणाऱ्या लोकांनी अशा काही घटना सांगितल्या ज्यातून स्पष्ट झाले, की यहोवाचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद यांमुळेच १५ वर्षांचा हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाला. शैक्षणिक केंद्राच्या बांधकामात हजारो लोकांनी हातभार लावला. १९९४ मध्ये एके प्रसंगी चक्क ५२६ लोक बांधकाम स्थळावर काम करत होते; यात ३५० पूर्ण-वेळेचे स्वयंसेवक, ११३ तात्पुरते कर्मचारी आणि रोज येऊन-जाऊन करणारे ६३ लोक होते. तर आणखीन बऱ्याच जणांनी आर्थिक अनुदान देऊन या कार्याला हातभार लावला. पण हे सारे जण यहोवालाच सर्व श्रेय देतात कारण त्याच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाशिवाय हे कार्य शक्य झालेच नसते याची त्या सर्वांना जाणीव आहे.—जखऱ्या ४:६.
सेंटरला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या लक्षात आले असेल, की या एज्युकेशनल सेंटरमध्ये केल्या जाणाऱ्या कार्याचा मूळ उद्देश जगभरात देवाच्या ज्ञानाचा प्रसार करणे हाच आहे. स्कूल बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर असणाऱ्या गिलियड प्रशालेच्या प्रवेशद्वाराजवळच या प्रशालेची समृद्ध आध्यात्मिक परंपरा आणि इतिहास यांविषयी माहिती देणारे प्रदर्शन होते. सन १९४३ मध्ये साऊथ लॅन्सिंग, न्यू यॉर्क येथील सदर प्रशालेच्या मूळ स्थानी गिलियड प्रशालेचा पहिला वर्ग भरवण्यात आला होता आणि तेव्हापासून आजपर्यंत या प्रशालेने ७,००० हून अधिक विद्यार्थ्यांना मिशनरी सेवेसाठी प्रशिक्षित केले आहे. स्कूल बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरील प्रदर्शनांत, शाखा समिती सदस्यांसाठी आणि प्रवासी पर्यवेक्षकांसाठी आयोजित केलेल्या प्रशालांची (दोन्ही वर्ग येथेच भरतात) दृश्ये लावली होती. नोव्हेंबर १९९५ पासून सुरू झालेल्या शाखा प्रशालेतून (ब्रांच स्कूल) १०६ देशांतील ३६० शाखा समिती सदस्यांना प्रशिक्षण मिळाले आहे.
सबंध परिसराला भेट देत असताना निव्वळ चित्रांपेक्षा बरेच काही पाहण्यासारखे आहे हे लक्षात आले. वेगवेगळे डिपार्टमेंट्स, ऑफिसेस आणि इतर कार्यस्थळांमध्ये प्रवेश करून चाललेले काम अगदी जवळून, प्रत्यक्ष पाहता येत होते. या संबंध टूअरचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ऑडिओ/व्हिडिओ सर्व्हिसेस बिल्डिंग. या ठिकाणी, बायबल शिक्षणाचा पुरस्कार करण्यासाठी किती उत्कृष्ट साधनांचा उपयोग केला जातो! आवाज कसे रेकॉर्ड केले जातात, व्हिडिओपट कसे तयार केले जातात हे लोकांना येथील बोधपर प्रदर्शनांच्या आणि संक्षिप्त व्हिडिओ माहितीपटांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. तसेच, स्टेज तयार करण्यासाठी, निरनिराळे पोषाख तयार करण्यासाठी किती बारकाईने अभ्यास केला जातो हे थोडक्यात त्यांना समजले. बारीकसारीक तपशिलांसंबंधी तडजोड न करता कमीतकमी खर्चात स्टेज सेट कसे तयार केले जातात हेही पाहण्याची संधी भेट देणाऱ्यांना मिळाली. स्टेजवर दाखवल्या जाणाऱ्या देखाव्यात आपण स्वतः उपस्थित आहोत हे भासवण्यासाठी संगीताचा कसा उपयोग केला जातो हे देखील त्यांनी पाहिले. सन १९९० पासून, बायबलच्या निरनिराळ्या विषयांवर संस्थेने ४१ भाषांमध्ये दहा व्हिडिओपट तयार केले आहेत, शिवाय अमेरिकन साइन लँग्वेजमधूनही (मूकबधिरांची भाषा) व्हिडियोपट तयार करण्यात आले आहेत.
फोटो लॅब, आर्ट डिपार्टमेंट, कॉम्प्युटरचे प्रशिक्षण आणि कॉम्प्युटरविषयक समस्या हाताळणारे इन्फर्मेशन सर्व्हिसेस, ११,२४२ मंडळ्यांचे आणि ५७२ प्रवासी पर्यवेक्षकांचे कार्य पाहणारे सर्व्हिस डिपार्टमेंट आणि दर वर्षी, निरनिराळ्या विषयांवरील सुमारे १४,००० प्रश्नांची उत्तरे देणारे राइटिंग करसपॉन्डेंस या निरनिराळ्या विभागांनाही बऱ्याच जणांनी भेट दिली. लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी अतिशय सखोल संशोधन केले जाते, तसेच ज्यांच्या पत्रांवरून दिसून येते की ते जीवनात अतिशय गंभीर समस्यांना तोंड देत आहेत अशा लोकांच्या कठीण परिस्थितीची जाणीव ठेवून ही उत्तरे दिली जातात; या विभागाला भेट देणारे हे सर्व जाणून विलक्षण प्रभावित झाले.
लोक आवर्जून भेट देत होते असा आणखीन एक विभाग म्हणजे ट्रान्सलेशन सर्व्हिसेस. ज्या अनेकानेक भाषांत बायबलचे साहित्य उपलब्ध आहे त्यात गेल्या पाच वर्षांच्या काळात आणखीन १०२ भाषांची भर पडली आहे हे जाणून ते अवाक राहिले. जगभरात ८० टक्के यहोवाचे साक्षीदार संस्थेची प्रकाशने वाचतात ती इंग्रजीतून नव्हे तर इतर अनेक भाषांतून. त्यांना आपापल्या भाषेतून साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आजमितीला १०० देशांमध्ये १,७०० हून अधिक स्वयंसेवक अनुवादाचे काम करत आहेत. सदर विभागात अमेरिका, युरोप, आशिया आणि आफ्रिकेच्या निरनिराळ्या भाषांमधील टेहळणी बुरूज मासिके प्रदर्शित केली होती. याशिवाय, आज ३१ भाषांमधून उपलब्ध असलेले नवे जग भाषांतर देखील प्रदर्शित केले होते. सध्या संस्थेची प्रकाशने ३३२ भाषांमध्ये आणि देव आपल्याकडून काय अपेक्षितो? हे माहितीपत्रक यांपैकी २१९ भाषांमध्ये उपलब्ध आहे हे त्यांना समजले.
लीगल डिपार्टमेन्टला भेट देणाऱ्या लोकांना, जगभरात ज्या विविध क्षेत्रांत कायदेशीर कारवाई आवश्यक असते त्याबद्दलची माहिती देण्यात आली. एक व्हिडिओ दाखवण्यात आला ज्यात रक्त संक्रमणासंबंधित एक साक्षीदार वकील लढत असलेला खरोखरचा न्यायालयीन खटला दाखवला होता. जाहीर प्रचार कार्य कोणत्याही अडथळ्याविना सुरळीत चालावे म्हणून काय केले जात आहे याची देखील माहिती देण्यात आली. (फिलिप्पैकर १:७) भेट द्यायला आलेल्या लोकांचे लक्ष, याच वर्षाच्या मार्च महिन्यात एका संघ जिल्हा न्यायालयाने जाहीर केलेल्या निर्णयाकडे आकर्षित करण्यात आले; यात, ओरेडेल, न्यू जर्सी, यु.एस.ए. च्या नगरप्रमुखाला घरोघर जाऊन उघडपणे सेवा करण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांना पर्मिट बाळगण्यास आणि बॅजेस लावण्यास बंधनकारक करणारे कायदे बदलण्याचा आदेश दिला होता.
भेट देणाऱ्या लोकांना आणखीन बरेच काही पाहायला मिळाले. उदाहरणार्थ, बांधकामाचे विविध पैलू दाखवणारी प्रीकास्ट शॉपमधील प्रदर्शने तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी पुन्हा शुद्ध करण्याच्या सुविधा, पावर हाऊस, पाण्यातील खनिजे काढून पाणी हलके करण्याची सुविधा आणि इतर अनेकानेक मेनटनेन्सचे विभाग देखील त्यांना जवळून पाहायला मिळाले. प्रत्येक विभागाला भेट देण्याचा हा अनुभव निश्चितच अविस्मरणीय होता.
समर्पणाचा कार्यक्रम ईश्वरी शिक्षणावर भर
समर्पणाचा मुख्य कार्यक्रम बुधवार, मे १९ रोजी, दुपारी ४.०० वाजता सुरू झाला. जमलेल्या ६,९२९ उत्साही लोकांमध्ये मुख्यालयातील कर्मचारी सदस्य, संस्थेचे पाहुणे आणि कॅनडा शाखेत जमलेले ३७२ लोक होते. (हा कार्यक्रम कॅनडा शाखेला इलेक्ट्रॉनिक सवलतींच्या मदतीने प्रक्षेपित करण्यात आला होता.)
वॉच टावर संस्थेचे अध्यक्ष मिल्टन जी. हेन्शेल यांचे उत्तेजनात्मक, स्वागतपर शब्द ऐकून श्रोते आनंदित झाले. त्यानंतर नियमन मंडळाचे एक सदस्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष थिओडर जॅरझ यांनी श्रोत्यांना व्हिल्यम मॅलेनफन्टचा परिचय करून दिला. “बांधकाम प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये” सादर करताना व्हिल्यम मॅलेनफन्ट यांनी वॉचटावर शैक्षणिक केंद्राचे विकसन, संरचना आणि बांधकाम यांत मोलाचा वाटा उचललेल्या तीन बांधवांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतींवरून श्रोत्यांना समजले, की बांधकाम सुरू असताना ८,७०० हून अधिक जणांनी स्वखर्चाने येऊन कमीजास्त काळापर्यंत प्रकल्पावर काम केले होते. ईश्वरी शिक्षणामुळे परिणीत झालेल्या एकोप्याचा आणि औदार्याचा किती उत्तम साक्षात्कार!
त्यानंतर, “विश्व पातळीवर ईश्वरी शिक्षण” या विषयावर एक परिसंवाद सादर करण्यात आला. नियमन मंडळाच्या चार सदस्यांनी हा परिसंवाद हाताळला. ईश्वरी शिक्षण देवाच्या वचनावर अर्थात बायबलवर आधारित असून ते ‘प्रत्येक प्रकारच्या सत्कार्यांचे फळ देण्याचे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानात वृद्धी करण्याचे’ उत्तेजन ख्रिश्चनांना देते यावर जॉन ई. बार यांनी भर दिला. (कलस्सैकर १:१०) त्यानंतर, ख्रिस्ती मंडळीचा मस्तक, येशू ख्रिस्त यापासून जागतिक बंधुवर्गातील प्रत्येक सदस्यापर्यंत ईश्वरी शिक्षणाचे संघटन ईश्वरशासितरित्या कसे केले जाते याची चर्चा डॅनिएल सिडलिक यांनी केली. (१ करिंथकर १२:१२-२७) परिसंवादाचे शेवटचे दोन भाग, गेरिट लॉश आणि कॅरी बार्बर यांनी हाताळले; देवाने दाखवलेल्या मार्गावर इतरांनाही वाटचाल करता यावी म्हणून सर्व प्रकारच्या लोकांशी संपर्क साधून त्यांना शिक्षण देण्यासाठी ईश्वरी शिक्षण कशाप्रकारे सेवकांना प्रशिक्षित करते या विषयावर ते बोलले.—यशया २:१-४; २ करिंथकर ३:५.
या शैक्षणिक केंद्रात चालवल्या जाणाऱ्या विविध प्रशालांचा श्रोत्यांना परिचय करून देण्यासाठी प्रशिक्षकांच्या आणि या कार्यात गोवलेल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या गेल्या, त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. ईश्वरी शिक्षणाचा कार्यक्रम विश्व पातळीवर राबवण्यासाठी प्रत्येक प्रशाला कोणती भूमिका पार पाडते ते दाखवण्यात आले. गिलियड प्रशालेचा रोख बायबलमधील प्रत्येक पुस्तकाच्या अभ्यासावर, यहोवाच्या लोकांच्या आधुनिक इतिहासावर आणि मिशनरी सेवेकरता विद्यार्थ्यांची तयार करून घेण्यावर असतो हे दाखवण्यात आले. तर, शाखा समितीच्या सदस्यांना ज्या व्यापक जबाबदाऱ्या हाताळाव्या लागतात त्या लक्षात घेऊन शाखा प्रशालेचा (ब्रांच स्कूल) सविस्तर अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. प्रवासी पर्यवेक्षकांसाठी असलेली प्रशाला, प्रवासी कार्य करणाऱ्या बांधवांना खास प्रशिक्षण देण्यासाठीच नव्हे तर मंडळ्यांना विशेष लाभदायक ठरेल ती आध्यात्मिक मदत देण्यासाठी देखील प्रशिक्षित केले जाते.
कार्यक्रमाच्या समारोपाला, नियमन मंडळाचे सदस्य लॉयड बॅरी यांनी, “आपल्या महान सृष्टिकर्त्यासोबत बांधणे” या विषयावर समर्पणाचे भाषण दिले. या भाषणातून त्यांनी दाखवून दिले, की यहोवाला त्याच्या प्रत्येक निर्मिती कार्यामुळे उल्लास होतो आणि आपणही त्या आनंदात सामील व्हावे अशी त्याची इच्छा आहे. (यशया ६५:१८) ‘सर्व काही बांधणारा देवच असल्यामुळे’ या सर्व बांधकामाचे श्रेय यहोवा देवालाच जाते. (इब्री लोकांस ३:४) हे विचार मांडल्यानंतर त्यांनी प्रार्थना करून वॉचटावर एज्युकेशनल सेंटर आपला महान सृष्टिकर्ता यहोवा यास समर्पित केले.a
आठवड्याभराच्या या सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या सर्व लोकांसाठी ही एक अविस्मरणीय घटना असेल यात शंका नाही. वॉचटावर एज्युकेशलन सेंटरला भेट देण्याची संधी तुम्हाला कधी मिळाली तर ती मुळीच हुकवू नका. आम्ही आश्वासन देतो, की येथे येऊन सर्व विभागांना भेट दिल्यावर तुम्हाला आपल्या सृष्टिकर्त्याला अधिक जाणून घेण्याचे तसेच त्याच्या नीतिमान दर्जांनुरूप जीवन व्यतीत करण्याचे जरूर प्रोत्साहन मिळेल.
[तळटीपा]
a जुलै २, १९९९ रोजी बंधू बॅरी यांचे पृथ्वीवरील जीवन संपुष्टात आले; ते अखेरपर्यंत विश्वासू राहिले. ऑक्टोबर १, १९९९ च्या टेहळणी बुरूज मासिकातील पृष्ठ १६ पाहा.
[१० पानांवरील चित्रं]
खचून भरलेले प्रेक्षागृह आणि डायनिंग रूममध्येही श्रोत्यांची गर्दी
[१० पानांवरील चित्रं]
निरनिराळ्या विभागांना भेट देणे अतिशय आनंददायक होते