वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ८/१५ पृ. ८-९
  • आयुष्याचा पुरेपूर लाभ घ्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आयुष्याचा पुरेपूर लाभ घ्या
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जीवनाचा आनंद लुटा
  • ‘आपल्या निर्माणकर्त्याला स्मरा’
  • म्हातारपणात आनंद करणे
  • “मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • तुमचे जीवन—त्याचा काय उद्देश आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • तुमच्या महान निर्माणकर्त्याला स्मरा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपदेशक पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ८/१५ पृ. ८-९

आयुष्याचा पुरेपूर लाभ घ्या

वडिलांना कॅन्सर झाला होता; ते मरणाला येऊन टेकले होते. त्यांचा मुलगा वर्कशॉपमध्ये आपल्या वडिलांच्या कारागिरीचे साहित्य गोळा करून नीट ठेवत होता. साहित्य उचलताना आपल्या वडिलांनी यांच्याद्वारे किती उत्तमोत्तम वस्तू बनवल्या होत्या हा विचार त्याच्या मनात आला. वर्कशॉप जरी घराला लागून होते, तरी आपले वडील पुन्हा तेथे कधीच जाऊ शकणार नाहीत आणि ज्या साहित्यांचा वापर करण्यात ते इतके कुशल होते ती साहित्ये पुन्हा कधीच हातात धरणार नाहीत हे त्याला ठाऊक होते. ते पूर्वीचे दिवस आता इतिहासजमा झाले होते.

त्या मुलाला उपदेशक ९:१० हे शास्त्रवचन आठवले: “जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर; कारण ज्या अधोलोकाकडे तू जावयाचा आहेस तेथे काही उद्योग, युक्‍ति-प्रयुक्‍ति, बुद्धि व ज्ञान यांचे नाव नाही.” त्याला ते शास्त्रवचन चांगलेच माहीत होते. मृत्यू ही अक्रियाशील अवस्था असते हे बायबलमधील सत्य इतरांना शिकवताना त्याने हे शास्त्रवचन कित्येकदा वापरले होते. पण, शलमोनाच्या त्या शब्दांचा संपूर्ण अर्थ त्याला आता उमगला—आपल्याला शक्य आहे तोपर्यंत जीवनाचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या आयुष्याचा आनंद लुटावा कारण आपल्याला यातले काहीच करता येणार नाही असा समय एक ना एक दिवशी येईल.

जीवनाचा आनंद लुटा

उपदेशकाच्या सबंध पुस्तकात, सुज्ञ राजा शलमोन आपल्या वाचकांना जीवनाचा आनंद लुटा असे आर्जवतो. उदाहरणार्थ, ३ ऱ्‍या अध्यायात असे म्हटले आहे: “मनुष्यांनी आमरण सुखाने राहावे व हित साधावे यापरते इष्ट त्यांस काही नाही हे मला कळून आले आहे. तरी प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे हीहि देवाची देणगी आहे.”—उपदेशक ३:१२, १३.

हा विचार पुन्हा एकदा सांगण्यास शलमोनाला देवाने प्रेरित केले: “मला जे बरे व मनोरम दिसून आले ते हे: मनुष्याने खावे; प्यावे व ह्‍या भूतलावर जे श्रम तो करितो त्या सर्वात देवाने त्यास दिलेल्या आयुष्यभर सुख भोगावे कारण एवढेच त्याच्या वाट्यास आहे.”—उपदेशक ५:१८.

त्याचप्रमाणे तरुणांना तो असे आर्जवतो: “हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर; तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला उल्लास देवो; तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल.” (उपदेशक ११:९अ) तारुण्याच्या शक्‍तीचा आणि जोमाचा पुरेपूर आनंद लुटणे ही केवढी आल्हाददायक गोष्ट आहे!—नीतिसूत्रे २०:२९.

‘आपल्या निर्माणकर्त्याला स्मरा’

अर्थात, आपल्या हृदयाला आणि नजरेला भावेल ती प्रत्येक गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करणे सुज्ञपणाचे आहे असे शलमोनाच्या म्हणण्याचा अर्थ नाही. (पडताळा १ योहान २:१६.) त्याच्या पुढील शब्दांवरून हे स्पष्ट होते: “पण ह्‍या सर्वांबद्दल [म्हणजेच, तुमच्या इच्छा पूर्ण करणाऱ्‍या या सर्व गोष्टींबद्दल] देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे.” (उपदेशक ११:९ब) आपले वय कितीही असले, तरी आपल्या आयुष्याचे आपण काय करतो हे देव पाहतो आणि त्यानुसार तो आपला न्याय करील हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यात आयुष्य घालवावे आणि अगदी म्हातारपणी देव देव करावे हा विचार किती मूर्खपणाचा आहे! आपल्या आयुष्याचा काही भरवसा नाही; ते कधीही संपू शकते. जरी असे झाले नाही तरी, म्हातारपणी देवाची सेवा करणे इतके सोपे नसते. हीच वस्तुस्थिती ओळखून शलमोन लिहितो: “आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर; पाहा, अनिष्ट दिवस येत आहेत, आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की त्यांत मला काही सुख नाही असे तू म्हणशील.”—उपदेशक १२:१.

मग, म्हातारपणातली दुखणीखुपणी सुरू होतात. लाक्षणिक शब्दांत, शलमोन पुढे म्हातारपणच्या परिणामांचे वर्णन करतो. हात-पाय थरथरू लागतात, पायांमध्ये बळ उरत नाही, दात पडतात. केस पांढरे होऊन गळू लागतात. झोप इतकी हलकी असते की, साध्या पक्ष्याच्या किलबिलाटाने सुद्धा जाग येते. दृष्टी, श्रवण, स्पर्श, गंध आणि चव—ही ज्ञानेंद्रिये देखील हळूहळू मंदावतात. दुर्बल शरीरामुळे कोठे पडण्याची किंवा भर रस्त्यावर दुसरे काही ‘धोके’ असण्याची भीती वाटू लागते. आणि मग, कालांतराने मृत्यू ओढवतो.—उपदेशक १२:२-७.

आपल्या तारुण्यात ‘निर्माणकर्त्याचे स्मरण’ ज्यांनी केलेले नाही अशांचे म्हातारपण विशेषतः दुःखाचे असते. स्वतःचे आयुष्य वाया घालवल्यामुळे, अशा व्यक्‍तीला म्हातारपणात काहीच ‘सुख उरत नाही.’ शिवाय, अधर्माने जगलेल्या आयुष्यामुळे तर म्हातारपणातल्या समस्या आणि दुखण्यांमध्ये अधिकच भर पडू शकते. (नीतिसूत्रे ५:३-११) अशा लोकांना आपल्या मरणाशिवाय इतर कोणतेही भवितव्य दिसत नाही ही दुःखाची गोष्ट आहे.

म्हातारपणात आनंद करणे

याचा अर्थ वृद्ध लोकांना जीवनाचा आनंद लुटताच येत नाही असे काही नाही. बायबलमध्ये, “दीर्घ आयुष्य, वयोवृद्धि” यांचा संबंध देवाच्या आशीर्वादाशी जोडण्यात आला आहे. (नीतिसूत्रे ३:१, २) यहोवाने आपला मित्र अब्राहाम याला असे सांगितले: “तू तर . . . चांगला म्हातारा झाल्यावर तुला मूठमाती देतील.” (उत्पत्ति १५:१५) म्हातारपणची दुखणीखुपणी असतानाही, अब्राहामाला आपल्या वृद्धपणी शांती लाभली आणि यहोवाला समर्पित केलेल्या जीवनाकडे पाहून त्याला समाधान लाभले. तो विश्‍वासाने, “पाये असलेल्या . . . नगराची” अर्थात देवाच्या राज्याची वाटही पाहत होता. (इब्री लोकांस ११:१०) अशाप्रकारे, तो “पुऱ्‍या वयाचा चांगला म्हातारा होऊन” मरण पावला.—उत्पत्ति २५:८.

यास्तव, शलमोनाने असे उत्तेजन दिले: “मनुष्य कितीहि वर्षे जगला तरी ती त्याने आनंदाने घालवावी.” (उपदेशक ११:८) आपण तरुण असलो किंवा वृद्ध, खऱ्‍या आनंदाचा संबंध देवासोबतच्या आपल्या नात्याशी आहे.

वर्कशॉपमधल्या तरुणाने आपल्या वडिलांचे सर्वात शेवटले साहित्य ठेवताना या सर्व गोष्टींचा विचार केला. निर्माणकर्त्यासोबत काही संबंध नसल्यामुळे आपल्या आयुष्याचे चीज करायचा प्रयत्न करूनही ज्यांना आनंद लाभला नव्हता अशा ओळखीच्या लोकांची त्याला आठवण झाली. आपल्या आयुष्यात आनंद कर असे उत्तेजन दिल्यानंतर, शलमोनाने या विषयाचा किती सुरेख सारांश दिला: “आता सर्व काही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.”—उपदेशक १२:१३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा