वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ६/१ पृ. २४-२७
  • यहोवाच्या ठायी आनंद व हर्ष करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या ठायी आनंद व हर्ष करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कायम आनंदी राहण्याचा आर्जव
  • आनंदी अनुभव आणि मुलाखती
  • स्वेच्छेने लोक गिलियडला येतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • यशस्वी विद्यार्थी, यशस्वी मिशनरी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • सेवा करण्याची प्रेरणा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • गिलियड प्रशाला मिशनरी प्रशिक्षणाची ६० वर्षे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ६/१ पृ. २४-२७

यहोवाच्या ठायी आनंद व हर्ष करा

कोणताही उपयुक्‍त प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर आनंद हा होतोच. न्यूयॉर्कमधील पॅटरसन येथील वॉचटावर शैक्षणिक केंद्रात मार्च १३, १९९९ रोजी वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या १०६ व्या वर्गाचे विद्यार्थी असलेल्या ४८ जणांकरता हा प्रसंग निश्‍चितच आनंदाचा होता.

नियमन मंडळाचे सदस्य असलेले, गिलियड प्रशालेच्या सातव्या वर्गातून पदवीधर झालेले आणि पदवीदान समारंभाचे अध्यक्ष असलेले थिओडोर जॅरस यांनी आपल्या प्रस्तावनेत स्तोत्र ३२:११ (पं.र.भा.) येथील शब्दांवर जोर दिला: “यहोवाच्या ठायी आनंद व हर्ष करा.” या प्रसंगी आपण सर्वांनी का आनंद केला पाहिजे याविषयी ते म्हणाले: “गिलियड विद्यार्थ्यांसोबत सरळ मनाच्या लोकांद्वारे यहोवा त्याचे काम पूर्ण करत आहे आणि त्यामुळे असे प्रसंग आनंदाचे असतात.” या गिलियड प्रशालेकरता उपस्थित होण्यासाठी आणि मिशनरी सेवेकरता पात्र होण्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली असली, तरी हे सर्वकाही यशस्वीपणे पार पाडणारा केवळ यहोवाच होता. (नीतिसूत्रे २१:५; २७:१) ‘यहोवाच्या ठायी आनंद करण्याचे’ हेच कारण आहे यावर बंधू जॅरस यांनी जोर दिला.

पॅटरसनच्या या प्रेक्षागृहात १२ देशांतून आलेल्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक सदस्य आणि पाहुणे देखील या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आले होते. या कार्यक्रमाची उपस्थिती ५,१९८ इतकी होती—ब्रुकलिन तसेच पॅटरसन व वॉल्किल, न्यूयॉर्क येथील बेथेल कुटुंबालाही ऑडिओ आणि व्हिडिओच्या साह्‍याने या कार्यक्रमाचा आनंद लुटता आला. हे उपस्थित लोक पुढील कार्यक्रमाची वाट पाहत असताना त्यांच्यामधील आनंदी वातावरण स्पष्टपणे जाणवत होते.

कायम आनंदी राहण्याचा आर्जव

बंधू जॅरस यांनी आपल्या प्रस्तावनेच्या शब्दांनंतर भाषणाकरता पहिल्या वक्‍त्‌याला आमंत्रित केले. एकूण पाच वक्‍ते असून त्यांनी केवळ गिलियड विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर उपस्थित असलेल्या सर्वांना उत्तेजन प्राप्त होईल अशी शास्त्रवचनीय भाषणे तयार केली होती.

पहिले भाषण विल्यम मॅलन्फन्ट यांनी दिले. ते गिलियड प्रशालेच्या ३४ व्या वर्गातील पदवीधर असून सध्या नियमन मंडळाच्या शैक्षणिक कमिटीचे सहायक या नात्याने सेवा करतात. उपदेशक १:२ या वचनावर आधारित त्यांच्या भाषणाचा विषय होता, “‘सर्व काही’ व्यर्थ नाही!” या विषयाशी निगडित त्यांनी असा प्रश्‍न विचारला: “सर्व काही म्हणजे प्रत्येक गोष्ट व्यर्थ आहे, असे शलमोनाला म्हणायचे होते का?” त्याचे उत्तर: “नाही. तो या गोष्टीकडे लक्ष वेधत होता, की ईश्‍वरी इच्छेकडे दुर्लक्ष करणारी कामे, ईश्‍वरी इच्छेपासून वेगळे असणारे प्रयत्न—या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत.” त्याउलट, यहोवा या खऱ्‍या देवाची सेवा करणे व्यर्थ नाही; तसेच देवाचे वचन, बायबलचा अभ्यास करणे आणि इतरांना ते शिकवणे हेही व्यर्थ नाही. देव त्याच्या सेवकांच्या या प्रयत्नांना विसरत नाही. (इब्री लोकांस ६:१०) खरे तर, देवाच्या पसंतीस उतरलेल्या लोकांवर संकट कोसळले तरी ते ‘यहोवाच्या जिवंतांच्या समुहात बांधिलेले राहितील.’ (१ शमुवेल २५:२९) किती दिलासा देणारा विचार! हे मुद्दे लक्षात ठेवल्यामुळे यहोवाच्या सर्व उपासकांना आनंद टिकवता येऊ शकतो.

नियमन मंडळाचे सदस्य असलेले जॉन बार यांनी “तुमच्या मिशनरी नियुक्‍तीमध्ये आनंद शोधा,” या भाषणाद्वारे पदवीधर वर्गाला उत्तेजन दिले. त्यांनी हे दाखवून दिले, की मिशनरी सेवा अशी आहे जी यहोवाला नेहमी अतिशय प्रिय वाटते. “या जगावर यहोवाने प्रेम दाखवले त्यात ही मिशनरी सेवा अंतर्भूत होती. देवाने त्याचा एकुलता एक पुत्र या पृथ्वीवर पाठवला. येशू एक महान मिशनरी, प्रमुख मिशनरी होता.” पृथ्वीवरील काम यशस्वीरीत्या पार पाडण्याकरता येशूला बदल करावे लागले हे पदवीधरांना ठाऊक होते तरी येशूच्या मिशनरी सेवेमुळे मिळणारे लाभ अद्यापही अशा सर्वांकरता उपलब्ध आहेत ज्यांना त्यांचा फायदा घ्यायचा आहे. बंधू बार यांनी सांगितल्याप्रमाणे याचे कारण म्हणजे, देवाचे काम करण्यात येशूने आनंद मानला आणि त्याने मानवजातीवर प्रेम देखील केले. (नीतिसूत्रे ८:३०, ३१) बंधू बार यांनी पदवीधारकांना असे आर्जवले, की त्यांनी आपल्या नियुक्‍तीशी जडून राहावे—केवळ टिकून राहण्यासाठी नव्हे, तर त्यातून आनंद मिळतो म्हणून. त्यांनी या वर्गाला असे आर्जविले: “यहोवावर भरवसा ठेवा; तो तुम्हाला त्यागणार नाही.”—स्तोत्र ५५:२२.

नियमन मंडळाचे आणखी एक सदस्य असलेले, लॉईड बॅरी यांनी “सर्वकाळ यहोवाच्या नामात चालणे” या विषयावर भाषण दिले. गिलियड प्रशालेच्या ११ व्या वर्गातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी जपानमध्ये २५ पेक्षा अधिक वर्षे मिशनरी म्हणून काम केले; त्यांनी आधीच्या मिशनऱ्‍यांचे काही अनुभव कथन केले आणि त्यांना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागले याविषयी त्यांनी श्रोत्यांना सांगितले. पदवी प्राप्त करणाऱ्‍या या वर्गाकरता त्यांच्याकडे काही व्यावहारिक सल्ला होता का? “सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची आध्यात्मिकता टिकवून ठेवा. तसेच नवीन भाषा आणि संस्कृती शिका. तुमची विनोदबुद्धी कायम ठेवा. तुमच्या कामाशी जडून राहा; धैर्य सोडू नका किंवा हार मानू नका.” बंधू बॅरी यांनी पदवीप्राप्त करणाऱ्‍या विद्यार्थ्यांना सांगितले, की त्यांना त्यांच्या प्रदेशातल्या नियुक्‍तींमध्ये स्वतःच्या देव-दैवतांच्या नामात चालणारे अनेक लोक भेटतील आणि त्यांनी या विद्यार्थ्यांना मीखाच्या शब्दांचे स्मरण करून दिले: “सर्व राष्ट्रे आपापल्या दैवतांच्या नावाने चालत आहेत; पण आम्ही परमेश्‍वर [“यहोवा,” NW] आमचा देव याच्या नावाने सदासर्वकाळ चालू.” (मीखा ४:५) देवाच्या नामात सतत चालत राहण्याकरता आणि त्याची विश्‍वासूपणे सेवा करण्याकरता आधीच्या काळातील मिशनऱ्‍यांचे उदाहरण निश्‍चितच खूप प्रेरणादायक आहे.

त्यानंतर गिलियडमधील शिक्षक, लॉरेन्स बॉवेन यांनी आपले भाषण सादर केले. त्यांच्या भाषणाच्या विषयातच असा प्रश्‍न विचारण्यात आला होता, “तुम्ही काय असल्याचे शाबीत करून दाखवणार?” त्यांनी हे दाखवून दिले, की देवाच्या सेवेतील यश यहोवावर विश्‍वास आणि भरवसा ठेवण्यावर अवलंबून असते. राजा आसा यहोवावर पूर्ण विसंबून राहिल्यामुळे त्याला त्याच्या विरुद्ध असलेल्या दहा लाखाच्या शत्रुसैन्यावर महान विजय मिळवता आला. तरीसुद्धा संदेष्टा अजऱ्‍या याच्याद्वारे त्याला स्मरण करून देण्यात आले की त्याने नेहमी देवावर विसंबून राहायचे होते: “तुम्ही परमेश्‍वराच्या बरोबर राहाल तोवर तो तुमच्याबरोबर राहील.” (२ इतिहास १४:९-१२; १५:१, २) यहोवा, या देवाच्या नावातून हा अर्थ स्पष्ट होतो, की त्याचे उद्देश साध्य करण्याकरता तो सर्वकाही—प्रबंधक, संरक्षक किंवा शासनकर्ताही होतो—त्यामुळे यहोवावर भरवसा ठेवल्यास आणि त्याच्या उद्देशानुसार कार्य केल्यास मिशनरी त्यांच्या कार्यनियुक्‍तीमध्ये यशस्वी होऊ शकतात. (निर्गम ३:१४) बंधू बॉवेन यांनी अखेरीस असे म्हटले, “हे कधीही विसरू नका, की जोपर्यंत तुम्ही यहोवाचा उद्देश आपला मानता तोपर्यंत तो तुमची कार्यनियुक्‍ती पार पाडण्याकरता आवश्‍यक ती सर्व मदत तुम्हाला करील.”

भूतपूर्व मिशनरी आणि सध्या प्रशाला प्रबंधक म्हणून काम पाहाणारे वॉलस लिव्हरन्स हे कार्यक्रमाच्या या भागाचे शेवटचे वक्‍ते होते. “देवाचे वचन तुमच्यात जागृत ठेवा आणि सक्रिय असू द्या” हा त्यांच्या भाषणाचा विषय होता. सतत पूर्ण होत असलेला देवाचा विश्‍वसनीय संदेश किंवा त्याचे निश्‍चित अभिवचन याकडे या भाषणाने लक्ष वेधले. (इब्री लोकांस ४:१२) देवाच्या वचनाचा अशा लोकांवर प्रभाव पडतो जे त्याच्या वचनाचा आपल्यावर प्रभाव होऊ देतात. (१ थेस्सलनीकाकर २:१३) देवाचे वचन आपल्यामध्ये जागृत आणि सक्रिय कसे ठेवले जाऊ शकते? अभ्यासू वृत्तीने बायबलचा अभ्यास करण्याद्वारे. बंधू लिव्हरन्स यांनी गिलियड प्रशालेत शिकलेल्या बायबल अभ्यासाच्या पद्धतींची आठवण पदवीधरांना करून दिली की, त्यामध्ये देवाचे वचन वाचणे, त्याच्या अर्थाचे स्पष्टीकरण देणे आणि त्याचा अवलंब करणे गोवलेले होते. नियमन मंडळाचे सदस्य असलेले आणि सुमारे ५० वर्षांपूर्वी गिलियड प्रशाला स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष असलेले अल्बर्ट श्रोडर यांचे शब्द त्यांनी उद्धृत केले: “संदर्भाचा उपयोग करण्याद्वारे एखाद्या व्यक्‍तीला देवाने आपल्या वचनात पुरवलेली पूर्ण, अचूक आध्यात्मिक प्रेरणा प्राप्त होऊ शकते.” अशाप्रकारच्या बायबल अभ्यासामुळे देवाचे वचन जागृत आणि कार्यरत राहते.

आनंदी अनुभव आणि मुलाखती

भाषणांनंतर, विद्यार्थ्यांचे काही आनंदी अनुभव श्रोत्यांना ऐकायला मिळाले. भूतपूर्व मिशनरी आणि सध्याचे गिलियड प्रशिक्षक मार्क न्यूमर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या एका गटाने श्रोत्यांना हे सांगितले आणि दाखवूनही दिले, की त्यांनी विविध परिस्थितींमध्ये कशाप्रकारे साक्ष देण्याचा प्रयत्न केला. लोकांची परिस्थिती आणि त्यांचे हावभाव यांचे परीक्षण करण्याद्वारे आणि त्यांच्यात व्यक्‍तिगत आस्था घेण्याद्वारे काही विद्यार्थ्यांना लोकांसोबत बायबल अभ्यास सुरू करण्यास आणि चालवण्यास शक्य झाले होते. अशाप्रकारे विद्यार्थी ‘त्यांच्याकडे आणि त्यांच्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेवत होते’ आणि इतरांचे तारण व्हावे म्हणून ते मनापासून त्यांची मदत करत होते.—१ तीमथ्य ४:१६.

शाखा समितीच्या सदस्यांकरता असलेल्या वॉचटावर शैक्षणिक केंद्रात प्रशिक्षण घेण्याकरता आलेल्या अनेक अनुभवी बांधवांनी पुष्कळ व्यावहारिक सूचना दिल्या आणि मिशनरी सेवेत मिळणाऱ्‍या आनंदाविषयी सांगितले. सॅम्युएल हर्ड आणि रॉबर्ट जॉनसन या मुख्यालय मंडळाच्या बांधवांनी बोलिव्हिया, झिंबाब्वे, निकाराग्वा, मध्य आफ्रिकी प्रजासत्ताक, डॉमिनिकन प्रजासत्ताक, पापुआ न्यू गिनी आणि कॅमेरून येथून आलेल्या संस्थेच्या शाखा दफ्तराच्या प्रतिनिधींच्या मनोवेधक मुलाखती घेतल्या.

अनुभव आणि मुलाखतींच्या कार्यक्रमानंतर गिलियड प्रशालेच्या ४१ व्या वर्गातून पदवी प्राप्त केलेले आणि सध्या नियमन मंडळाचे सदस्य असलेले गेरट लॉश यांनी “तुम्ही ‘प्रिय व्यक्‍ती’ आहात का?” या विचारप्रवर्तक विषयावर अखेरचे भाषण दिले. बंधू लॉश यांनी पहिल्यांदा विद्यार्थ्यांना हे दाखवून दिले की देवाच्या परिपूर्ण पुत्राला, येशूला लोकांनी प्रिय मानले नाही उलपटपक्षी, ‘लोकांनी त्याला तुच्छ मानले, त्याला टाकले.’ (यशया ५३:३) म्हणून यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काही नाही, की आज जगाच्या अनेक भागांत मिशनऱ्‍यांना इतर लोक पसंत करत नाहीत. पण बाबेलमध्ये कित्येक वर्षे सेवा करत असताना दानीएलाला निर्माणकर्त्याने तीन वेळा देवदूताद्वारे “परमप्रिय” असे म्हटले. (दानीएल ९:२३; १०:११, १९) दानीएल परमप्रिय कशामुळे झाला? बाबेलच्या संस्कृतीशी जुळवून घेताना त्याने कधीही बायबल तत्त्वांशी हातमिळवणी केली नाही; त्याच्या प्रत्येक कामात तो प्रामाणिक होता, स्वतःच्या स्थानाचा त्याने व्यक्‍तिगत लाभासाठी कधीही उपयोग केला नाही; तो देवाच्या वचनाचा आवेशी विद्यार्थी होता. (दानीएल १:८, ९; ६:४; ९:२) तो नियमितपणे यहोवाला प्रार्थनाही करत असे आणि त्याला मिळालेल्या यशाचे श्रेय देवाला देण्यात त्याने कसलीही हयगय केली नाही. (दानीएल २:२०) दानीएलाच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याद्वारे देवाचे सेवक स्वतःला प्रिय असल्याचे शाबीत करू शकतात, अर्थात जगासमोर नाही, पण यहोवा देवासमोर.

आध्यात्मिकरित्या उभारणी करणाऱ्‍या या कार्यक्रमाच्या समाप्तीला, अध्यक्षांनी जगभरातून आलेले काही टेलिग्राम आणि संदेश वाचून दाखवले. त्यानंतर २४ जोडप्यांना त्यांची पदवी बहाल करण्यात आली आणि ज्या देशांत त्यांना पाठवण्यात आले त्या देशांच्या नावांची देखील घोषणा करण्यात आली. अखेरीस या वर्गाच्या प्रतिनिधीने नियमन मंडळाला आणि बेथेल कुटुंबाला उद्देशून, मागील पाच महिन्यांत त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणाकरता आणि मदतीकरता कृतज्ञता व्यक्‍त करणारे पत्र वाचून दाखवले.

या कार्यक्रमाच्या अखेरीस निरोप घेणारे लोक ‘आनंद आणि धन्यवाद’ व्यक्‍त करत होते.—नहेम्या १२:२७.

[२७ पानांवरील चौकट]

वर्गाची आकडेवारी

विद्यार्थ्यांनी प्रतिनिधीत्व केलेले एकूण देश: १०

नेमलेले देश: १९

एकूण विद्यार्थी: ४८

विवाहित जोडप्यांची संख्या: २४

सरासरी वय: ३३

सत्यात सरासरी वर्षे: १६

पूर्ण वेळेच्या सेवेत सरासरी वर्षे: १३

[२५ पानांवरील चित्र]

वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या पदवीधारकांचा १०६ वा वर्ग

खालील यादीत, पुढून मागे याप्रकारे ओळींची संख्या देण्यात आली आहे आणि प्रत्येक ओळीत नावे डावीकडून उजवीकडे या क्रमाने देण्यात आलेली आहेत

(१) डीकन, डी.; पुऑपोलो, एम.; लगुना, एम.; डव्होल्ट, एस.; डोमिंगझ, इ.; बरके, जे. (२) गॉटर, एस.; व्हॉसकस, डब्ल्यू.; सीब्रुक, ए.; मॉस्का, ए.; हेली, एल.; ब्रुअर्ड, एल. (३) ब्रॅन्डन, टी.; ओलिव्हारिज एन.; कोलमन, डी.; स्कॉट, व्ही.; पिटरसन, एल.; मॅकलिऑड, के. (४) मॅकलिऑड, जे.; थॉम्पसन, जे.; ल्यूबरीस, एफ.; स्पेटा, बी.; लेटमॉकी, एम.; लगुना, जे. (५) गॉटर, यू.; डोमिंगझ, आर.; हेली, एफ.; स्मिथ, एम.; बायर, डी.; मॉस्का, ए. (६) स्कॉट, के.; सीब्रुक, व्ही.; स्पेटा, आर.; कोलमन आर.; ब्रुअर्ड, एल.; डव्होल्ट, डब्ल्यू. (७) स्मिथ, डी.; लेटमॉकी, टी.; पिटरसन, पी.; थॉम्पसन, जी.; व्हॉसकस, आर.; बायर, ए. (८) ल्यूबरीस, एम.; डीकन, सी.; ब्रॅन्डन, डी.; पुऑपोलो, डी.; ओलिव्हारिज, ओ.; बरके, एस.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा