वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 १०/१५ पृ. ४-७
  • प्रदीर्घ जीवनाची खटपट कशी यशस्वी ठरू शकते?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रदीर्घ जीवनाची खटपट कशी यशस्वी ठरू शकते?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • होर्मोन उपचार व जननशास्त्र—काही आशा?
  • नॅनोटेक्नोलॉजी आणि क्रायॉनिक्सकडे उत्तर आहे का?
  • आपण कोणावर भरवसा ठेवावा?
  • वृद्धापकाळ आणि मृत्यूचे मूळ कारण
  • खरी आशा
  • परादीस पृथ्वीवर सार्वकालिक जीवन
  • आयुष्य वाढण्याचा शोध
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१९
  • यहोवाने आपल्याला का निर्माण केले?
    समाधानी जीवन कसे मिळवता येईल?
  • सार्वकालिक जीवन शक्य आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • सर्वकाळ जगण्याची आशा तुम्ही करू शकता?
    सावध राहा!—१९९९
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 १०/१५ पृ. ४-७

प्रदीर्घ जीवनाची खटपट कशी यशस्वी ठरू शकते?

नवीन सहस्रकात आयुष्यमान वाढवण्यासाठी मानव शर्थीने करत असलेल्या प्रयत्नांना नवी दिशा मिळेल अशी आशा काहीजण उराशी बाळगून आहेत. या लोकांपैकी एक डॉ. रॉनल्ड क्लाट्‌झ आहेत. अमेरिकन अकॅडमी ऑफ ॲन्टी-एजींग मेडिसीनचे ते अध्यक्ष आहेत; मानवाचे आयुष्यमान वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या डॉक्टरांची व वैज्ञानिकांची ही संस्था आहे. डॉ. क्लाट्‌झ आणि त्यांचे सहकर्मी दीर्घकाळापर्यंत जगण्याची योजना करत आहेत. डॉ. क्लाट्‌झ म्हणतात: “मी कमीतकमी १३० वर्षांपर्यंत जगण्याची अपेक्षा करतोय. वृद्धापकाळ अटळ नाही, असा आमचा विश्‍वास आहे. सध्याचे तंत्रज्ञान इतके प्रगत आहे, की शरीराचा ऱ्‍हास आणि आजारपण म्हणजेच आपण ज्याला नैसर्गिक वृद्धापकाळ म्हणतो तो कमी करण्याची, थांबवण्याची आणि कदाचित उलटवण्याची शक्‍ती तंत्रज्ञानात आहे.” डॉ. क्लाट्‌झ स्वतः आपले आयुष्यमान वाढवण्यासाठी दररोज सुमारे ६० गोळ्या घेतात.

होर्मोन उपचार व जननशास्त्र—काही आशा?

होर्मोन उपचार क्षेत्रातून लोकांना आशेचा किरण दिसत आहे. असे म्हणतात की, डिएचईए नावाच्या होर्मोन्सवर केलेल्या प्रयोगामुळे प्रयोगशाळेतील प्राण्यांमध्ये म्हातारपणाची क्रिया मंदावण्यात आली आहे.

किनेटीन या वनस्पती होर्मोनविषयी ऑफटोनब्लाडेट नावाच्या स्वीडिश दैनिकात डेन्मार्क येथील आरहस विद्यापीठात प्राध्यापक असलेल्या डॉ. सुरेश रतन यांचे मनोगत उद्धृत करण्यात आले आहे: “आमच्या प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत दिसून आले आहे, की माणूस जसजसा वृद्ध होत जातो तसतसे त्याच्या कोशिकांमध्ये होणारे बदल, किनेटीनमध्ये वाढवलेल्या मानवी त्वचा कोशिकांमध्ये होत नाहीत. त्या कोशिका आयुष्यभर तरुण राहतात.” ज्या कीटकांमध्ये हे होर्मोन घातले जाते ते नेहमीपेक्षा ३० ते ४५ टक्के जास्त काळ जगतात असे म्हटले जाते.

असेही म्हटले जाते, की मेलाटोनीन उपचारांनी उंदरांचे आयुष्यमान २५ पेक्षा अधिक टक्क्यांनी वाढवले आहे. आणि अशी उंदरे तरुण, निरोगी व जास्त तरतरीत दिसत होती.

मानवाच्या वाढीला जबाबदार असलेल्या होर्मोन्सचे (hGH) समर्थक असा दावा करतात, की या होर्मोन्समुळे त्वचा उजळते, स्नायू दणकट होतात, कामप्रेरणा वाढते, व्यक्‍ती आनंदी असते, बुद्धी तल्लख होते व चयापचयाची क्रिया तरुणाच्या शरीराप्रमाणे कार्य करते.

पुष्कळ लोकांना जननशास्त्राकडूनही आशा आहे. वैज्ञानिकांचा दावा आहे, की जनुकांमध्ये बदल करण्याद्वारे ते एका सूत्रकृमिच्या आयुष्यमानावर नियंत्रण करू शकतात. खरे तर त्यांनी काही जंतूंना त्यांच्या नेहमीच्या आयुष्यमानापेक्षा सहा पटीने जास्त काळ जिवंत ठेवण्यात यश मिळवले आहे. यामुळे मानवांतील अशीच जनुके शोधून त्यांत बदल करण्याची वैज्ञानिकांची आशा वाढली आहे. टाईम मासिकात, मॉन्ट्रियल मधील मॅक्गील विद्यापिठाचे डॉ. सिगफ्रिड हेकिमी यांनी असे म्हटल्याचे उद्धृत करण्यात आले होते, की: “आपल्याला मानवाचे आयुष्यमान ठरवणारी सर्व जनुके सापडली तर कदाचित आपण त्यांची गती जरा मंद करू शकतो, व आयुष्यमान वाढवू शकतो.”

कोशिकांचे जेव्हा जेव्हा पुनरुत्पादन होते तेव्हा तेव्हा गुणसूत्रांचा अंत्यबिंदू कमी होतो, हे जैवशास्त्रज्ञांना आधीपासून माहीत होते. अंत्यबिंदूची लांबी २० टक्क्यांनी कमी होते तेव्हा कोशिकांमधील पुनरुत्पादनाची शक्‍ती नाहीशी होते व कोशिका मरून जाते. टेलोमेरेज नावाचे एक विशिष्ट एंजाइम अंत्यबिंदूची लांबी पुन्हा वाढवू शकते व यामुळे कोशिकांचे विभाजन होऊ लागते. बहुतेक कोशिकांमधील हे एंजाइम दबलेल्या व निष्क्रिय स्थितीत असते, पण सक्रिय टेलोमेरेज विशिष्ट कोशिकांमध्ये यशस्वीरीत्या घालण्यात आले आहे आणि त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त वाढ आणि विभाजन होऊ शकले आहे.

संशोधकांच्या मते यामुळे, वयाशी संबंधित असलेल्या आजारांशी झगडण्याची विलक्षण शक्यता निर्माण होते. शरीरातील स्कंधकोशिकांच्या (ऊतकांचे पुनरुत्पादन करणाऱ्‍या कोशिका) जागी, सक्रिय टेलोमेरेजने “अमर केलेल्या” स्कंधकोशिका घातल्या तर कसे होईल? डॉ. विल्यम ए. हेजलटीन म्हणतात: “पुढील ५० वर्षांत हळूहळू प्रचारात येणारी ही मानवी अमरत्वाची स्पष्ट दिसणारी कल्पना आहे.”—द न्यूयॉर्क टाईम्स.

नॅनोटेक्नोलॉजी आणि क्रायॉनिक्सकडे उत्तर आहे का?

नॅनोमीटरएवढी (एक मीटरचा सहस्र दशलक्षावा भाग) एखाद्या गोष्टीची रचना करणे म्हणजे नॅनोटेक्नोलॉजी; यावरही लोकांना फार आशा आहे. या क्षेत्रांत दूरदृष्टी असलेल्यांचा दावा आहे, की भविष्यात कोशिकांपेक्षाही लहान, रेणूंच्या आकाराच्या संगणकीय मशीन्सच्या साहाय्याने वृद्ध होत चाललेल्या कोशिका, ऊतके आणि इंद्रिये दुरुस्त व पुनः सशक्‍त केली जाऊ शकतात. एका वार्धक्य-विरोधी परिषदेत एका संशोधकाने सुचवले, की मानवाला शारीरिकरीत्या अमर करण्यासाठी २१ व्या शतकातील डॉक्टर नॅनोटेक्नोलॉजीचा कदाचित उपयोग करतील.

एक ना एक दिवशी विज्ञान, मृत कोशिकांना पुनरुज्जीवित करू शकेल व त्यामुळे मेलेली माणसे पुन्हा जिवंत केली जातील या आशेने मानवी शरीरांना गोठवण्याची पद्धत म्हणजे क्रायॉनिक्स. त्यासाठी संपूर्ण शरीर किंवा फक्‍त मेंदू देखील गोठवून ठेवता येतो. एका मनुष्याने तर एक चादर गोठवून ठेवली होती. चादर? होय, ती चादर त्याच्या एका बेपत्ता मित्राची होती व त्या चादरीवर त्या मित्राच्या त्वचेच्या काही कोशिका व काही केस होते. हा मनुष्य या कोशिकांना व केसांना गोठवून ठेवू इच्छित होता; मोजक्या किंवा फक्‍त एकाच कोशिकेद्वारे विज्ञान लोकांना पुन्हा जिवंत करायच्या स्थितीपर्यंत यदाकदाचित पोहंचलेच तर तो आपल्या मित्राला पुन्हा जिवंत होण्याची संधी देऊ इच्छित होता.

आपण कोणावर भरवसा ठेवावा?

मानवामध्ये मरण्याची नव्हे तर जगण्याची स्वाभाविक इच्छा आहे. यास्तव, या क्षेत्रांतील वैज्ञानिक प्रगतीचा फार उदोउदो केला जातो व लोकांच्या मोठ्या अपेक्षाही असतात. पण आतापर्यंत तरी असा कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही की डिएचईए, किनेटीन, मेलोटोनीन, एचजीएच (hGH) किंवा इतर कोणताही पदार्थ मानवातील वृद्ध होण्याची क्रिया मंदावू शकतो. कोशिकांमधील टेलोमेरेजमध्ये बदल घडवल्यामुळे कॅन्सर कोशिका मात्र निर्माण होतील, अशी संशयवाद्यांना भीती वाटते. नॅनोटेक्नोलॉजी आणि क्रायॉनिक्सची गोष्ट घेतली तर ती अद्याप विज्ञान कादंबरीतल्या कल्पनेसारखी आहे.

विज्ञानाने काहींचे आयुष्यमान वाढवण्यास व निरोगी राहण्यास हातभार लावला आहे व कदाचित भविष्यातही हातभार लावेल, पण ते कोणालाही चिरकालिक जीवन देऊ शकणार नाही. का नाही? कारण, वृद्धापकाळ व मृत्यूचे मूळ कारण सोडवणे मानवी विज्ञानाच्या हातात नाही.

वृद्धापकाळ आणि मृत्यूचे मूळ कारण

वृद्धापकाळ व मृत्यू हे आपल्या जनुकांमध्येच सामावलेले आहे, यावर अनेक वैज्ञानिकांचे एकमत आहे. मग प्रश्‍न येतो की: ते आपल्या जननिक सांकेतिक वर्णात केव्हा, कसे व का शिरले?

बायबल याचे साधेसोपे उत्तर देते; ते जननशास्त्र किंवा डिएनएच्या भाषेत दिलेले नाही. रोमकर ५:१२ म्हणते: “एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.”

पहिला मनुष्य आदाम याच्यासमोर अनंत काळ जगण्याची आशा होती. चिरकाल जीवन जगण्याच्या व तिचा उपभोग घेण्याच्या आवश्‍यक त्या सर्व क्षमतेसह त्याची रचना करण्यात आली होती. परंतु, चिरकालिक जीवन सशर्त होते. अनंतकाळापर्यंत आपले जीवन टिकवून ठेवण्याकरता आदामाला आपला निर्माणकर्ता आणि जीवनाचा स्रोत याच्या इच्छेप्रमाणे व त्याच्या आज्ञेत राहायचे होते.—उत्पत्ति १:३१; २:१५-१७.

आदामाने निर्माणकर्त्याची आज्ञा मोडण्याची निवड केली. यावरून, आदामाने असा दावा केला, की देवापासून स्वतंत्र राहून मानवाचे चांगले चालते. अशाप्रकारे त्याने पाप केले. तेव्हापासून जणू त्याच्या जननिक सांकेतिक वर्णात बदल झाला. सार्वकालिक जीवनाचा वारसा आपल्या मुलांच्या हवाली करण्याऐवजी आदामाने पाप आणि मृत्यूचा वारसा देऊ केला.—उत्पत्ति ३:६, १९; रोमकर ६:२३.

खरी आशा

परंतु ही परिस्थिती कायम अशीच राहणार नव्हती. रोमकर ८:२० म्हणते: “सृष्टि व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली ती आपखुशीने नव्हे, तर [आशेच्या आधारावर] ती स्वाधीन करणाऱ्‍यामुळे.” मानवाचा निर्माणकर्ता यहोवा देव याने मानवांना मृत्यूच्या स्वाधीन केले कारण त्यांनी त्याच्याविरुद्ध पाप केले; परंतु असे करताना त्याने त्यांना आशा बाळगण्यासाठी एक आधारही दिला.

येशू ख्रिस्त पृथ्वीवर आला तेव्हा या आधाराची स्पष्ट ओळख मिळाली. योहान ३:१६ म्हणते: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” पण, येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवल्याने मृत्यूपासून आपला बचाव कसा काय होऊ शकतो?

पाप जर मृत्यूचे कारण आहे तर मृत्यूला पूर्णपणे नाहीसे करण्याआधी पाप काढून टाकणे आवश्‍यक आहे. ख्रिस्त या नात्याने येशूने सेवेला सुरवात केली होती तेव्हा बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाने म्हटले: “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!” (योहान १:२९) येशू ख्रिस्त पूर्णपणे निष्पाप होता. म्हणूनच तर तो पापाची शिक्षा असलेल्या मरणाच्या स्वाधीन नव्हता. तरीसुद्धा, त्याने इतरांकडून मरण पत्करले. का पत्करले? कारण, असे केल्याने त्याने आपल्या पापांची किंमत दिली.—मत्तय २०:२८; १ पेत्र ३:१८.

या किंमतीद्वारे, येशूवर विश्‍वास ठेवणाऱ्‍या सर्वांपुढे न मरता जिवंत राहण्याची संधी खुली झाली. विज्ञान आपले आयुष्यमान एका मर्यादित काळापुरते वाढवू शकेल, परंतु येशूवर विश्‍वास ठेवणे हा सार्वकालिक जीवन मिळवण्याचा खरा मार्ग होय. येशूने असे जीवन स्वर्गात प्राप्त केले आणि त्याचे विश्‍वासू प्रेषित व आणखी इतरजण देखील प्राप्त करतील. तरीपण, येशूवर विश्‍वास ठेवणाऱ्‍या बहुतेकांना यहोवा देव पृथ्वीवर परादीस आणेल तेव्हा सार्वकालिक जीवन मिळेल.—यशया २५:८; १ करिंथकर १५:४८, ४९; २ करिंथकर ५:१.

परादीस पृथ्वीवर सार्वकालिक जीवन

एका मनुष्याने विचारले: “आपण कधीच मरणार नाही असे ऐकल्यावर किती लोकांना जगायला आवडेल?” अनंत जीवन कंटाळवाणे असेल का? बायबल आपल्याला हमी देते, की ते कंटाळवाणे नसेल. “आपआपल्या समयी होणारी हरएक वस्तु त्याने सुंदर बनविली आहे; त्याने मनुष्याच्या मनांत अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्‍न केली आहे; तरी देवाचा आदिपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही.” (उपदेशक ३:११) यहोवा देवाची सृष्टी इतकी विपुल व क्लिष्ट आहे की आपण जिवंत आहोत तोपर्यंत अगदी अनंतकाळपर्यंतही आपल्याला तिचे कुतूहल वाटत राहील, तिच्याकडून प्रेरणा व आनंद मिळत राहील.

सायबेरियन जे नावाच्या पक्ष्याचा अभ्यास केलेल्या एका व्यक्‍तीने म्हटले की “हा पक्षी असाधारण, मंत्रमुग्ध करणारा आहे” व या पक्ष्याचे निरक्षण करणे हा त्याच्या जीवनातील सर्वात आवडता अनुभव होता. या पक्ष्याचा तो जितका अभ्यास करत गेला तितके त्याचे कुतूहल वाढत गेले. तो म्हणाला, की त्याने १८ वर्षे अभ्यास केला होता तरी त्याचा अभ्यास काही संपलेला नाही. जर एक जातीचा पक्षी इतका कुतूहलजनक व बुद्धिमान मनुष्याला १८ वर्षांच्या खोल अभ्यासादरम्यान आनंदी ठेवू शकतो तर पृथ्वीवरील संपूर्ण सृष्टीचा अभ्यास करण्यात किती आनंद व समाधान मिळण्याची शक्यता आहे याची कल्पना करा.

वेळेचे बंधन नसलेल्या व्यक्‍तीपुढे विज्ञानाची सर्व मनोरंजक क्षेत्रे खुली होतील, असे चित्र डोळ्यांसमोर उभे करा. कल्पना करा, तुम्हाला सर्व लक्षवेधक ठिकाणांचा शोध लावता येईल व मनोरंजक लोकांना भेटता येईल. कल्पना करण्याची, निर्माण करण्याची व घडवण्याची तुमच्याकडे असंख्य संधी असेल याचा विचार करा. आपली सर्जनशीलता विकसित करून ती अंमलात आणण्याच्या आपल्याकडे अमर्याद संधी असतील. ह्‍या विपुल सृष्टीकडे आपण पाहतो तेव्हा, फक्‍त चिरकाळातच आपण जीवनांत शक्य असलेल्या सर्व गोष्टी पूर्ण करू शकतो हे स्पष्ट होते.

बायबल दाखवते, की पुनरुत्थानाद्वारे मृत जनांनाही अनंतकाळ जगण्याची संधी बहाल केली जाईल. (योहान ५:२८, २९) इतिहासातील अनेक रहस्यमय गोष्टींचा त्या वेळी उलगडा होईल ज्या वेळी त्या गोष्टी अनुभवलेले लोक आपल्याला तपशीलवार माहिती सांगू शकतील व आपल्या प्रश्‍नांची उत्तरे देऊ शकतील. पुनरुत्थित लोक, इतिहासातील वेगवेगळ्या काळाबद्दल केवढी माहिती देतील त्याचा विचार करा.—प्रेषितांची कृत्ये २४:१५.

त्या काळाचा विचार करताना पुनरुत्थित ईयोबाला, ईयोब १४:१ मधील वाक्य का बदलावेसे वाटेल, हे तुम्हाला समजेल. तो कदाचित असे म्हणेल: ‘स्त्रीपासून जन्मलेला मानवप्राणी आता अनंतकाळ जगतो व समाधानी आहे.’

यहोवावर भरवसा करणाऱ्‍या व येशूवर विश्‍वास ठेवणाऱ्‍या लोकांना, अमर्याद दीर्घायुष्य प्राप्त करणे हे केवळ एक स्वप्न वाटणार नाही. ते लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. वार्धक्य आणि मृत्यू नाहीसे होतील. हे स्तोत्र ६८:२० नुसार आहे जेथे म्हटले आहे: “मृत्यूपासून सोडविणारा प्रभु परमेश्‍वर [यहोवा] आहे.”—प्रकटीकरण २१:३, ४.

[४, ५ पानांवरील चित्रं]

विज्ञानाच्या प्रगतीमुळे आयुष्यमान वाढण्याच्या शक्यतेबद्दल लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत

[७ पानांवरील चित्र]

फक्‍त चिरकाळातच आपण जीवनांतील सर्व शक्यता पूर्ण करू शकतो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा