वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 १०/१५ पृ. ८-११
  • प्रीतीचा सर्वोत्कृष्ट मार्ग शिकणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रीतीचा सर्वोत्कृष्ट मार्ग शिकणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देवावर प्रेम करण्यास शिकले पाहिजे
  • सहमानवांवर प्रेम करण्यास शिकणे
  • तुमचे प्रेम वाढवणे
  • सतत प्रयत्न करणे आवश्‍यक
  • आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती करण्याचा अर्थ काय?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • तुमच्यावर प्रीती करणाऱ्‍या देवावर प्रेम करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • तू आपला देव यहोवा याच्यावर प्रेम कर
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • तुम्ही “शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीती” करता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 १०/१५ पृ. ८-११

प्रीतीचा सर्वोत्कृष्ट मार्ग शिकणे

कॉसोवो, लेबनन, आयर्लंड. ही नावे अलीकडच्या वर्षांमध्ये बातम्यांत सारखी झळकली आहेत. ही नावे आपण ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर लगेच रक्‍तपात, बॉम्ब हल्ले, हत्या यांचे चित्र उभे राहते. अर्थातच, धार्मिक, वांशिक, जातीय किंवा इतर भेदभावांमुळे होणारे हिंसक झगडे ही काही नवीन गोष्ट नाही. खरे तर, इतिहासाची पाने यांनीच तर रंगलेली आहेत व यांमुळे मानवजात खूप दैन झाली आहे.

संपूर्ण इतिहासात युद्धे लढण्यात आली आहेत यावरून पुष्कळ जण असा निष्कर्ष काढतात, की युद्धे अनिवार्य आहेत व मानवांनी एकमेकांचा द्वेष करणे हे स्वाभाविक आहे. परंतु, हे विचार देवाचे वचन बायबलमधील शिकवणीच्या अगदी विपरीत आहेत. शास्त्रवचने अगदी स्पष्टपणे म्हणतात: “जो प्रीति करीत नाही तो देवाला ओळखीत नाही; कारण देव प्रीति आहे.” (१ योहान ४:८) मानवांनी एकमेकांवर प्रेम करावे ही निर्माणकर्त्याची इच्छा आहे हे यावरून स्पष्ट होते.

मानवाला देवाच्या स्वरूपात निर्माण करण्यात आले होते हेही बायबल सांगते. (उत्पत्ति १:२६, २७) याचा अर्थ मानवजातीला, देवाचे गुण दाखवण्याची क्षमता बहाल केली आहे; देवाच्या गुणांमध्ये सर्वात प्रमुख गुण आहे प्रेम. असे आहे तर मग, मानवजात संपूर्ण इतिहासभरात एकमेकांना प्रेम दाखवण्यात इतकी उणी का पडली आहे? पुन्हा एकदा बायबल याबद्दल समज देते. पहिल्या मानवी दांपत्याने, आदाम व हव्वेने देवाविरुद्ध बंड करून पाप केले हे त्याचे कारण आहे. यामुळे त्यांच्या सर्व संततीला पाप आणि अपरिपूर्णतेचा वारसा प्राप्त झाला. रोमकर ३:२३ म्हणते: “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.” प्रेम करण्याची देवाने आपल्याला दिलेली कुवत, वारशाने मिळालेल्या पाप व अपरिपूर्णतेमुळे खूपच कमी झाली आहे. मग याचा असा अर्थ होतो का, की मानव एकमेकांवर कधीच प्रेम करू शकत नाहीत? आपल्या सहमानवांबरोबर शांतीमय, प्रेमळ नातेसंबंध प्रस्थापित करण्याची काही आशा आहे का?

देवावर प्रेम करण्यास शिकले पाहिजे

यहोवा देवाला माहीत आहे, की मानव अपरिपूर्ण असला तरी तो प्रेम दाखवू शकतो. म्हणूनच तर, जे त्याला संतुष्ट करू पाहतात त्या सर्वांनी होता होईल तितके प्रेम दाखवावे अशी तो त्यांच्याकडून अपेक्षा करतो. देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याला, इस्राएल राष्ट्राला दिलेल्या नियमशास्त्रातील सर्वात मोठी आज्ञा कोणती असे विचारले असता त्याने या अपेक्षेबद्दल सांगितले होते. तो म्हणाला: “तू आपला देव [यहोवा] परमेश्‍वर ह्‍याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे.” मग तो पुढे म्हणाला: “हिच्यासारखी दुसरी ही आहे की, ‘तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर.’ ह्‍या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदष्ट्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत.”—मत्तय २२:३७-४०.

परंतु अनेक लोकांना वाटते, की ज्याला आपण पाहू शकत नाही त्याच्यावर प्रेम करणे कठीण आहे आणि यहोवा देव आत्मा असल्यामुळे आपण मानव त्याला पाहू शकत नाही. (योहान ४:२४) तरीपण, देव आपल्यासाठी जे करतो त्याचा आपल्यावर दररोज प्रभाव पडतो कारण आपल्या उपयोगासाठी त्याने निर्माण केलेल्या अनेक चांगल्या गोष्टींवर आपण अवलंबून आहोत. प्रेषित पौलाने याच गोष्टीकडे लक्ष वेधत असे म्हटले: “[देवाने] स्वतःस साक्षीविरहित राहू दिले नाही, म्हणजे त्याने उपकार केले, आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतु तुम्हाला दिले, आणि अन्‍नाने व हर्षाने तुम्हाला मन भरून तृप्त केले.”—प्रेषितांची कृत्ये १४:१७.

निर्माणकर्त्याकडून येणाऱ्‍या तरतूदींचा आपल्या सर्वांना या नाही तर त्या मार्गाने लाभ होत असला तरी, असे फार कमी लोक आहेत जे आपली कृतज्ञता व्यक्‍त करतात किंवा आभार व्यक्‍त करण्यास प्रवृत्त होतात. यास्तव, देवाने आपल्यासाठी केलेल्या सर्व चांगल्या गोष्टींचे आपण सिंहावलोकन केले पाहिजे व तो करत असलेल्या सर्व गोष्टींमध्ये दिसणाऱ्‍या त्याच्या अद्‌भुत गुणांवर मनन केले पाहिजे. असे केल्याने आपण आपल्या महान उत्पन्‍नकर्त्याची भय-प्रेरक बुद्धी आणि शक्‍ती समजू शकतो. (यशया ४५:१८) याहूनही अधिक म्हणजे, त्याने आपल्याला फक्‍त जीवनच दिले नाही तर जीवनाच्या सर्व सुखांचा उपभोग घेणे शक्य केले आहे; यावरून, तो किती प्रेमळ देव आहे हे आपल्याला दिसले पाहिजे.

उदाहरणार्थ, पृथ्वीवर देवाने निर्माण केलेल्या असंख्य जातीच्या सुंदर फुलांचा विचार करा. सृष्टीसौंदर्यातील या गोष्टींकडे पाहण्याची व त्यांचा मनसोक्‍त आनंद लुटण्याची क्षमता त्याने आपल्याला बहाल केली आहे हे किती अद्‌भुत आहे! तसेच, आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी त्याने सर्व प्रकारचे पौष्टिक अन्‍न दिले आहे. पण या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी त्याने आपल्याला चाखण्याची इन्द्रियशक्‍ती देखील दिली आहे हा त्याचा केवढा विचारीपणा! तर देव आपल्यावर खरोखरच प्रेम करतो व त्याला आपली काळजी आहे याचे हे स्पष्ट पुरावे नाहीत का?—स्तोत्र १४५:१६, १७; यशया ४२:५, ८.

‘सृष्टीच्या पुस्तकातून’ स्वतःला प्रकट करण्याव्यतिरिक्‍त निर्माणकर्ता त्याचे वचन बायबल यांतून आपल्याला तो कोणत्या प्रकारचा देव आहे हे दाखवतो. कारण बायबलमध्ये गतकाळांतील यहोवा देवाविषयीच्या अनेक प्रेमळ गोष्टी आणि नजीकच्या भवितव्यात मानवजातीवर तो ज्या असंख्य आशीर्वादांचा वर्षाव करणार आहे त्यांबद्दल लिहून ठेवण्यात आले आहे. (उत्पत्ति २२:१७, १८; निर्गम ३:१७; स्तोत्र ७२:६-१६; प्रकटीकरण २१:४, ५) या सर्वांपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, बायबल आपल्याला देवाच्या प्रीतीची सर्वात महान अभिव्यक्‍ती, अर्थात आपल्या एकुलत्या एका पुत्राला, पाप आणि मृत्यूच्या दास्यत्वातून आपल्याला मुक्‍त करायला मुक्‍तीदाता म्हणून पाठवणे, याविषयी सांगते. (रोमकर ५:८) आपल्या प्रेमळ निर्माणकर्त्याविषयी आपण जितके शिकू तितके अधिक त्याच्यावर पूर्ण मनाने प्रेम करण्यास प्रवृत्त होऊ.

सहमानवांवर प्रेम करण्यास शिकणे

येशूने दाखवल्याप्रमाणे, पूर्ण अंतःकरणाने, जीवाने व मनाने देवावर प्रेम करण्यासोबतच आपण स्वतःप्रमाणे आपल्या शेजाऱ्‍यांवरही प्रेम केले पाहिजे. खरे तर देवाबद्दलची प्रीती आपल्याला सहमानवांवर प्रेम करण्यास भाग पाडते. प्रेषित योहानाने स्पष्टीकरण दिले: “देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीति केली तर आपणहि एकमेकांवर प्रीति केली पाहिजे.” पुढे त्याने या मुद्द्‌यावर जोर देत म्हटले: “मी देवावर प्रीति करितो, असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे; कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीति करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीति करिता येणे शक्य नाही. जो देवावर प्रीति करितो त्याने आपल्या बंधूवरहि प्रीति करावी, ही त्याची आपल्याला आज्ञा आहे.”—१ योहान ४:११, २०, २१.

आज आपण अशा जगात राहात आहोत जेथे बहुतेक लोक मी-पणा दाखवतात; बायबलने भाकीत केल्याप्रमाणे ते “स्वार्थी” आहेत. (२ तीमथ्य ३:२) यास्तव, प्रीतीचा सर्वोत्कृष्ट मार्ग जर आपल्याला शिकायचा आहे तर, लोकांच्या स्वार्थी मार्गांचे अनुसरण करण्याऐवजी आपण निश्‍चय करून आपल्या प्रेमळ निर्माणकर्त्याचे अनुसरण करण्याचा शर्थीने प्रयत्न केला पाहिजे. (रोमकर १२:२; इफिसकर ५:१) देव “कृतघ्न व दुर्जन ह्‍यांच्यावरहि उपकार करणारा आहे” व “वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडितो.” आपल्या स्वर्गीय पित्याने आपल्यापुढे इतके उत्तम उदाहरण मांडले आहे तर आपण सर्वांनी दयाळू व मदतकारी असण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे केल्याने आपण “आपल्या स्वर्गांतील पित्याचे पुत्र” शाबीत होऊ शकतो.—लूक ६:३५; मत्तय ५:४५.

कधीकधी अशा प्रेमळ कार्यांमुळे आपण खऱ्‍या देवाचे उपासक होण्यास लोकांना मदत करू शकतो. काही वर्षांपूर्वी यहोवाची साक्षीदार असलेल्या एका गृहिणीने आपल्या शेजारच्या स्त्रीला बायबलमधील संदेश सांगायचा प्रयत्न केला; पण त्या स्त्रीने तिचा खूप विरोध केला. परंतु ती निराश झाली नाही. उलट, ती तिच्याबरोबर दयाळूपणे वागत राहिली व तिला मदत करत राहिली. एकदा, ही स्त्री घर बदलत होती तेव्हा तिने तिला मदत केली. दुसऱ्‍या वेळी, या स्त्रीचे नातेवाईक येणार होते तर तिच्याबरोबर विमानतळावर जाण्यासाठी तिने दुसऱ्‍या कोणाची व्यवस्था केली. काही दिवसांनंतर या स्त्रीने बायबल अभ्यास स्वीकारला व कालांतराने नवऱ्‍याकडून पुष्कळ विरोध असतानाही ती एक आवेशी ख्रिस्ती बनली. होय, त्या प्रेमळ कृत्यांनी, अनंतकालीन आशीर्वांदासाठी एक पाया घातला.

खरे पाहिले तर, आपल्यामध्ये फार उत्कृष्ट गुण आहेत म्हणून देव आपल्यावर प्रेम करतो हे चूक आहे. उलट, आपण कितीतरी चुका करतो, आपल्यात कितीतरी उणीवा आहेत तरीसुद्धा तो आपल्यावर प्रेम करतो. असे आहे तर मग सहमानव चुका करत असले तरी आपण त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे. इतरांच्या चुका शोधत बसण्यापेक्षा त्यांच्यातील उत्तम गुण ओळखून त्यांची प्रशंसा केल्यास, त्यांच्यावर प्रेम करायला आपल्याला सोपे जाईल. त्यामुळे आपल्याला त्यांच्याबद्दल फक्‍त तत्त्वबद्ध प्रेम वाटणार नाही तर जवळच्या मित्रांमध्ये असतो तसा जिव्हाळा आणि माया वाटेल.

तुमचे प्रेम वाढवणे

प्रेम आणि मैत्री वाढवण्याची गरज आहे; आणि यासाठी लागणाऱ्‍या गुणांमध्ये प्रांजळपणा व प्रामाणिकपणा हे गुण आहेत. काही लोक, ज्यांच्याबरोबर मैत्री करू पाहतात त्यांच्यावर स्वतःची चांगली छाप पाडण्यासाठी आपल्या चुका लपवण्याचा प्रयत्न करतात. पण याचा बहुतेकदा उलट परिणाम होतो; इतरांना सत्य परिस्थिती कळते तेव्हा ते आपली ही अप्रामाणिकता पाहून आपल्यापासून दूर जातात. यास्तव, लोकांपासून आपले गुण लपवण्याची काही गरज नाही; आपण मात करू इच्छितो अशा उणीवा आपल्यामध्ये असल्या तरी. यामुळे आपण त्यांच्याबरोबर मैत्री स्थापित करू शकतो.

उदाहरणार्थ, दूरच्या पौर्वात्य देशातील एका मंडळीत एक भगिणी आहेत ज्या इतक्या शिकलेल्या नाहीत. पण लोकांपासून त्या ही गोष्ट लपवून ठेवायचा प्रयत्न करत नाहीत. विदेश्‍यांचा काळ १९१४ मध्ये समाप्त झाला हे बायबल भविष्यवाण्या व इतिहास यांनुसार कसे सिद्ध करायचे ते आपल्याला काही जमत नाही हे सांगायला आपल्याला कसलीही लाज वाटत नाही, हे लोकांसमोर त्या मान्य करतात.a पण सेवेतील त्यांचा आवेश, बंधुभगिनींबद्दलचे प्रेम आणि उदारता उदाहरणीय आहे; त्यांना प्रेमाने मंडळीचा रत्न असे म्हटले जाते.

काही संस्कृतींमध्ये, उघडपणे प्रेम व्यक्‍त करणे नापसंत केले जाते; इतरांबरोबर व्यवहार करताना सभ्यपणे वागले पाहिजे असे लोकांना शिकवले जाते. सभ्य व विचारी असणे चांगले असले तरी, या सभ्यतेमुळे आपण इतरांबद्दलच्या आपल्या भावना दाबून टाकू नयेत किंवा लपवून ठेवू नयेत. आपल्या निवडलेल्या लोकांबद्दल अर्थात प्राचीन इस्राएलबद्दल आपले प्रेम व्यक्‍त करायला यहोवाला लाज वाटली नाही; तो त्यांना म्हणाला: “मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुजवर प्रेम करीत आलो.” (यिर्मया ३१:३) प्रेषित पौलानेही थेस्सलोनीकामधील सहविश्‍वासूंना म्हटले: “आम्हास तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुम्हाकरिता आपला जीवहि देण्यास राजी होतो.” (१ थेस्सलनीकाकर २:८) यास्तव, आपल्या सहमानवांबद्दल आपण खरे प्रेम विकसित करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण आपल्या इच्छा दाबून टाकण्याऐवजी त्या व्यक्‍त कराव्यात या बायबल शिकवणीच्या सुसंगतेत कार्य करत असतो.

सतत प्रयत्न करणे आवश्‍यक

इतरांबद्दल प्रेम वाटणे व दाखवणे ही सतत चालणारी क्रिया आहे. असे करण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्न हवेत कारण आपल्याला आपल्या अपरिपूर्णतांवर मात करण्यासाठी व या प्रेमहीन जगातील तीव्र प्रभावाचा प्रतिकार करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागते. परंतु या प्रयत्नांच्या बदल्यात मिळणाऱ्‍या समृद्ध प्रतिफळांमुळे हे प्रयत्न वाया जात नाहीत.—मत्तय २४:१२.

या अपरिपूर्ण जगातही आपण सहमानवांबरोबर प्रेमळ नातेसंबंध ठेवू शकतो; यामुळे आपल्याला आणि इतरांना आनंद, शांती आणि समाधान मिळेल. याद्वारे आपण देवाच्या नवीन जगात अनंतकाळ जगण्याची अद्‌भुत आशा प्राप्त करण्यास पात्र आहोत हे शाबीत करू शकतो. आणि सर्वांहून अधिक म्हणजे, प्रीतीचा सर्वोत्कृष्ट मार्ग शिकण्याद्वारे आपण आपला प्रेमळ निर्माणकर्ता याची आता आणि चिरकालापर्यंत स्वीकृती व आशीर्वाद प्राप्त करू शकू!

[तळटीपा]

a तपशीलवार माहितीसाठी शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी, खंड १, (इंग्रजी) पृष्ठे १३२-५ पाहावे.

[१० पानांवरील चित्रं]

दयाळूपणाच्या कार्यांद्वारे ख्रिस्ती प्रेम दाखवता येते

[Picture Credit Line on page 8]

UN PHOTO 186226/M. Grafman

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा