वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ४/१५ पृ. ४-९
  • सार्वकालिक जीवन शक्य आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सार्वकालिक जीवन शक्य आहे का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सार्वकालिक जीवनाकरता निर्माण करण्यात आले
  • सार्वकालिक जीवनाची इच्छा
  • आपण कोणावर भरवसा ठेवावा?
  • हा खरोखरच देवाचा उद्देश आहे का?
  • देवाचा उद्देश कायम
  • आपण सर्वकाळ जगू शकतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • अनंतकालचे जीवन जगणे नुसते स्वप्न नव्हे
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • तुम्ही सर्वकाळ पृथ्वीवर राहू शकता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१८
  • सार्वकालिक जीवनाचा एकमेव मार्ग
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ४/१५ पृ. ४-९

सार्वकालिक जीवन शक्य आहे का?

“गुरुजी, मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे?”—मत्तय १९:१६.

१. मनुष्याच्या आयुर्मर्यादेविषयी काय म्हणता येईल?

सामान्य युग पूर्व ४८० मधील पर्शियन राजा झरक्सीस पहिला, ज्यास बायबलमध्ये अहश्‍वेरोश असे म्हणण्यात आले आहे, हा राजा त्याच्या सैनिकांना लढाईकरता पाठवण्यापूर्वी त्यांचे परीक्षण करत होता. (एस्तेर १:१, २) ग्रीक इतिहासकार हेरोडेटस यांच्या मतानुसार, आपल्या लोकांचे परीक्षण करत असताना या राजाच्या डोळ्यांत अश्रू आले. का? झरक्सीस राजाने म्हटले, “मनुष्याचा जीवनकाल किती लहान आहे याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला वाईट वाटतं. या सैन्यांपैकी एकही मनुष्य शंभर वर्षांनंतर जिवंत नसेल.” तुम्हाला देखील ही गोष्ट जाणवली असेल, की जीवन किती अल्प आहे आणि कोणत्याही मनुष्याला वृद्ध होण्याची, मरण्याची इच्छा नसते. आपल्या सर्वांना तरुण आणि सुदृढ राहून सर्वदा जगता आले तर!—ईयोब १४:१, २.

२. अनेकांना कोणती आशा वाटते आणि का?

२ विशेष म्हणजे, सप्टेंबर २८, १९९७ च्या द न्यूयॉर्क टाईम्स मॅगझिनमध्ये “त्यांना जगायचं आहे” हा लेख आला होता. त्यामध्ये एका संशोधकाचा वृतान्त देण्यात आला होता, त्याने म्हटले: “मला खरोखरच वाटतं, की आपली पिढी सार्वकालिक जीवन अनुभवणारी पहिली पिढी होऊ शकते”! कदाचित तुम्हालाही वाटेल, की सार्वकालिक जीवन शक्य आहे. आपण पृथ्वीवर सार्वकालिक जीवन उपभोगू शकतो, या बायबलमधील अभिवचनामुळे कदाचित तुम्हाला असे वाटत असेल. (स्तोत्र ३७:२९; प्रकटीकरण २१:३, ४) पण, बायबलमध्ये देण्यात आलेल्या अभिवचनांशिवाय आणखी इतर कारणांमुळे काही लोकांना वाटते, की सार्वकालिक जीवन शक्य आहे. त्यांपैकी काही कारणांचा विचार केल्याने आपल्याला ही गोष्ट समजण्यास मदत मिळेल, की सार्वकालिक जीवन खरोखरच शक्य आहे.

सार्वकालिक जीवनाकरता निर्माण करण्यात आले

३, ४. (अ) मनुष्याला सार्वकालिक जीवन जगता येणे शक्य आहे असे काही लोकांना का वाटते? (ब) दावीदाने त्याच्या शरीराच्या रचनेविषयी काय म्हटले?

३ अनेक लोकांना असे वाटते, की मनुष्याला सार्वकालिक जीवन जगणे याकरता शक्य आहे कारण त्याला तसे अद्‌भुतरित्या बनविण्यात आले आहे. उदाहरणार्थ, आईच्या गर्भात आपली रचना खरोखरच अद्‌भुतरित्या होते. वृद्धत्वाविषयी एका प्रमुख विशेषज्ञाने लिहिले: “गर्भात पडण्यापासून ते त्याच्या जन्मापर्यंत आणि त्यानंतर लैंगिक विकासापासून प्रौढावस्थेपर्यंत कितीतरी अद्‌भुत चमत्कार केल्यानंतर, निसर्गाने हे चमत्कार सर्वकाळ टिकवून ठेवण्याची तुलनात्मकरित्या सोपी प्रक्रिया घडवून आणायची नाही असे ठरवले.” होय, आपल्या शरीराच्या अद्‌भुत संरचनेकडे पाहिल्यानंतर हा प्रश्‍न येतो, की आपण का मरतो?

४ हजारो वर्षांपूर्वी बायबलचा लेखक, दावीद याने देखील मनुष्यातील अद्‌भुत चमत्काराविषयी विचार केला. आजच्या वैज्ञानिकांना गर्भात होणाऱ्‍या क्रिया पाहता येतात; पण दावीदाला तसे करता येत नव्हते तरीसुद्धा त्याने गर्भातील अद्‌भुत चमत्काराविषयी विचार केला. आपल्या शरीराची कशी घडण झाली याविषयी दावीदाने खूप विचार केल्यावर असे लिहिले: “माझ्या आईच्या उदरी माझी घडण झाली आहे.” तो म्हणतो की तेव्हाच ‘माझे अंतर्याम [“मूत्रपिंड,” NW] निर्माण करण्यात आले.’ त्याने त्याच्या ‘आकृतीविषयी [अस्थींविषयी]’ म्हटले की ‘गुप्त स्थळी त्यांना निर्माण करण्यात आले होते.’ त्यानंतर दावीदाने त्याच्या ‘पिंडाविषयी’ सांगितले की, आईच्या उदरात पिंडरूपात असताना, ‘त्याच्या सर्व अवयवांची नोंद करून ठेवण्यात आली आहे.’—स्तोत्र १३९:१३-१६.

५. गर्भात आपली रचना होत असताना कोणते चमत्कार होतात?

५ अर्थात, दावीद गर्भरूपात असताना त्याच्या शरीराच्या रचनेबद्दल अक्षरशः हाताने लिहून काढलेली कोणतीही रूपरेषा नव्हती. पण ज्याप्रकारे दावीदाने त्याचे “मूत्रपिंड”, ‘आकृती [अस्थी],’ आणि शरीराच्या बाकी अवयवांचा विचार केला तेव्हा त्याला कळाले की, शरीराच्या या अवयवांची खूपच विचारपूर्वक रचना करण्यात आली आहे. ही रचना इतकी योजनाबद्ध होती, की ‘ते सर्व अवयव वहीत नमूद करून ठेवण्यात आले होते.’ त्याच्या आईच्या गर्भातील फलित कोशिकेत एक जणू अशी वही होती ज्यामध्ये या गोष्टीची पूर्ण माहिती पुरवली होती, की कशाप्रकारे एका बाळाची रचना करण्यात यावी आणि निर्माण होणाऱ्‍या प्रत्येक नव्या कोशिकेला ती माहिती पुरवण्यात आली होती. त्यामुळे सायन्स वर्ल्ड हे मासिक आलंकारिक भाषेत म्हणते, की ‘तयार होणाऱ्‍या गर्भातील प्रत्येक कोशिकेत नीलप्रतींचा संपूर्ण संच असतो.’

६. ‘अद्‌भुतरित्या आपल्याला बनविण्यात आले’ असे दावीदाने लिहिले याचे काही पुरावे आहेत का?

६ आपले शरीर किती अद्‌भुतरित्या कार्य करते याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? जीवशास्त्रवेत्ता जेरड डायमंड यांनी म्हटले: “आपल्या आंतड्याच्या आतल्या भिंतीवर असलेल्या पेशी दर दोन तीन दिवसांनी बदलतात, मूत्राशयाच्या आतल्या भिंतीवरील पेशी दर दोन महिन्याला आणि आपल्या लाल रक्‍तपेशी प्रत्येक चार महिन्याला बदलत राहतात.” त्यांनी शेवटी म्हटले: “निसर्ग दररोज आपल्याला उकलतो आणि पुन्हा जोडतो.” त्याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आपण कितीही वर्षे जगलो—८, ८० किंवा ८०० वर्षेसुद्धा—तरी आपण तरुणच राहू शकतो. एका वैज्ञानिकाने असा अंदाज लावला: “एका वर्षाने आपल्यात असणाऱ्‍या ९८ टक्के अणूंची जागा असे अणू घेतील जे आपण हवा, अन्‍न आणि पेय यांद्वारे शरीरात घेतो.” दावीदाने देवाची स्तुती करण्यासाठी लिहिलेले शब्द अगदी खरे आहेत: “[देवाची] कृत्ये अद्‌भुत आहेत.”—स्तोत्र १३९:१४.

७. आपल्या शरीराची रचना लक्षात घेता काही लोक कोणत्या अनुमानास आले आहेत?

७ आपल्या शरीराच्या रचनेचा विचार करता, वृद्धत्वाचा अभ्यास करणाऱ्‍या एका विशेषज्ञाने म्हटले: “म्हातारपण का येते हे न उलगडणारे एक कोडेच आहे.” खरे तर असे दिसून येते, की आपल्याला सार्वकालिक जीवन जगता आले पाहिजे. आणि म्हणूनच, तंत्रज्ञानाच्या साह्‍याने सार्वकालिक जीवनाचे ध्येय प्राप्त करण्याचा बरेचजण प्रयत्न करतात. काही काळापूर्वी, डॉ. एल्विन सिल्वरस्टाईन यांनी त्यांच्या कॉनक्वेस्ट ऑफ डेथ या पुस्तकात असे ठामपणे लिहिले: “सार्वकालिक जीवन जगण्याचे गमक आम्ही जरूर जाणून घेऊ. मनुष्य कसा म्हातारा होतो . . . याचा आम्ही छडा लावू.” याचा परिणाम काय होईल? त्यांनी हे भाकित केले: “एक असा दिवस येईल जेव्हा कोणीही ‘वृद्ध’ राहणार नाही कारण मृत्यूवर विजय कसा मिळवावा हे एकदा आपल्याला कळल्यानंतर सदासर्वकाळ तरुण राहणे शक्य होईल.” आजच्या वैज्ञानिकांनी मनुष्याच्या रचनेविषयी जी माहिती मिळवली आहे ती लक्षात घेता सार्वकालिक जीवन अगदीच अशक्य वाटते का? सार्वकालिक जीवन शक्य आहे हे मानण्याकरता आणखी एक सबळ कारण आहे.

सार्वकालिक जीवनाची इच्छा

८, ९. संपूर्ण इतिहासातील लोकांची कोणती स्वाभाविक इच्छा राहिली आहे?

८ सार्वकालिक जीवनाची इच्छा ही मनुष्याला असलेली स्वाभाविक इच्छा आहे याकडे कधी तुम्ही लक्ष दिले आहे का? एका जर्मन मासिकात एका डॉक्टराने लिहिले: “सार्वकालिक जीवनाची आशा मनुष्याइतकीच जुनी आहे.” याविषयी प्राचीन काळातील युरोपमधील काही लोकांच्या विश्‍वासांविषयी सांगताना द न्यू एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका म्हणतो: “लायक असणारे लोक सोन्याचे छत असलेल्या अलिशान राजमहालात सदासर्वदा जगतील.” सार्वकालिक जीवनाकरता केलेले प्रयत्नही थक्क करून सोडणारे आहेत!

९ दि एन्सायक्लोपीडिया अमेरिकाना म्हणते, की सुमारे २,००० वर्षांपूर्वी चीनमध्ये, “ताओ पुरोहितांचे ऐकून, सम्राट आणि [सामान्य] लोक आपला कामधंदा सोडून अमरत्व देणाऱ्‍या अमृताच्या शोधात निघाले—हे अमृत प्राशन करणारी व्यक्‍ती सदासर्वदा तरुण राहील असा समज होता.” खरोखरच, संपूर्ण इतिहासातील लोक हे मानत आले आहेत, की वेगवेगळ्या प्रकारची मिश्रणे किंवा विशिष्ट प्रकारचे पाणी पिल्यास मनुष्याला चिरतारुण्य लाभू शकते.

१०. जीवनकाल वाढवण्याकरता आधुनिक काळात कोणते प्रयत्न केले जात आहेत?

१० सार्वकालिक जीवन जगण्याची मानवाची स्वाभाविक इच्छा पूर्ण करण्याकरता आधुनिक काळातही काही कमी प्रयत्न झालेले नाहीत. रोगामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्‍तीचे शव गोठून ठेवणे हा अशाचप्रकारचा एक प्रयत्न आहे. मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या रोगावर भवितव्यात औषध तयार झाल्यानंतर मरण पावलेल्या व्यक्‍तीला पुन्हा जिवंत करता येईल, ही आशा मनी बाळगून मृत शरीरे गोठवून ठेवण्यात आली. क्रायोनिक्स म्हटले जाणाऱ्‍या या प्रक्रियेचे समर्थन करणाऱ्‍या एका व्यक्‍तीने लिहिले: “आमचा आशावाद खरा ठरला आणि शरीराला पोहंचलेली हानी—वार्धक्यामुळे येणाऱ्‍या उणिवा दूर करण्याचे किंवा बरे करण्याचे तंत्र समजल्यानंतर—जे आता ‘मरतात’ त्यांना भवितव्यात कोणत्याही कालमर्यादेशिवाय जीवन जगता येईल.”

११. सर्वकाळ जगावे असे लोकांना का वाटते?

११ तुम्ही कदाचित असे विचाराल, की सार्वकालिक जीवन आपल्या मनात इतके का भिनले आहे? कारण देवाने “मनुष्याच्या मनात अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्‍न केली आहे.” (उपदेशक ३:११) हा अतिशय गांभिर्याने विचार करण्यालायक विषय आहे! जरा विचार करा: अनंतकाळ—सार्वकालिक जीवन जगण्याची आपल्यात असणारी स्वाभाविक इच्छा देवाला पूर्ण करायचीच नव्हती, तर मग त्याने आपल्या मनात ही इच्छा घातलीच का? सार्वकालिक जीवनाच्या इच्छेसह आपल्याला निर्माण करून ती इच्छा कधीच पूर्ण न होऊ देणेही देवाची एक प्रेमळ कृती ठरेल का?—स्तोत्र १४५:१६.

आपण कोणावर भरवसा ठेवावा?

१२. काही लोकांचा कोणता विश्‍वास आहे, पण तो विश्‍वास सबळ आहे असे तुम्हाला वाटते का?

१२ सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याकरता आपण कोठे किंवा कोणावर भरवसा ठेवावा? या २० व्या किंवा २१ व्या शतकातील मनुष्याच्या तंत्रज्ञानावर? द न्यूयॉर्क मॅगझिनमधील “त्यांना जगायचं आहे” या लेखाने “तंत्रज्ञान-देवता” आणि “तंत्रज्ञानाच्या क्षमतेविषयी उत्साह” असा उल्लेख केला. एका संशोधकाने तर असेही मत व्यक्‍त केले की “लवकरच, मनुष्यात जननिक बदल घडवून आणण्याच्या तंत्रांचा शोध लागेल ज्यामुळे वृद्धत्वाच्या प्रक्रियेला बांध घालण्याद्वारे किंवा तारुण्य पुनःप्राप्त करून देण्याद्वारे [आपल्याला] मरणापासून बचावणे शक्य होईल याची आपल्याला पूर्ण खात्री आहे.” वृद्ध होण्याचे थांबवण्याचे आणि मृत्यूवर जय प्राप्त करण्याचे मनुष्याचे प्रयत्न पूर्णपणे फोल ठरले आहेत.

१३. आपल्याला सार्वकालिक जीवनाकरता बनविण्यात आले आहे, हे मेंदूच्या संरचनेवरून कसे स्पष्ट होते?

१३ सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याचा कोणताही मार्ग नाही, असा याचा अर्थ होतो का? याचा असा अर्थ निश्‍चितच नाही! मार्ग उपलब्ध आहे! आपल्या अद्‌भुत मेंदूची संरचना आणि शिकण्याची जवळजवळ अमर्याद क्षमता यामुळे खरे तर आपल्याला याची खात्री होण्यास हवी, की सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याकरता एक मार्ग आहे. रेणवीय जीवशास्त्रवेत्ते जेम्स वॉटसन यांनी आपल्या मेंदूला “संपूर्ण विश्‍वातील आजवर गवसलेली सर्वात जटील गोष्ट” म्हटले आहे. मज्जातंतुशास्त्रज्ञ रिचर्ड रेस्टक यांनी म्हटले: “मेंदूची संरचना इतकी जटील आहे, की संपूर्ण अंतरिक्षात त्याच्याशी थोडेफार साम्य असणारी एकही संरचना नाही.” सार्वकालिक जीवनाचा उद्देश नव्हता, तर मग जवळजवळ अमर्याद माहिती साठवून ठेवण्याची क्षमता असलेला मेंदू आणि अनंतकाळ कार्य करण्याकरता संरचना केलेले शरीर आपल्याला का देण्यात आले असेल?

१४. (अ) बायबलचे लेखक मानवी जीवनाच्या बाबतीत कोणत्या निष्कर्षाप्रत येतात? (ब) आपण मनुष्याऐवजी देवावर भरवसा का ठेवावा?

१४ तर मग कोणता एकच तार्किक, वास्तविक निष्कर्ष उरतो? आपल्याला सार्वकालिक जीवन जगता यावे म्हणून एका सर्वशक्‍तिमान, बुद्धिमान निर्माणकर्त्याने आपल्याला बनवले हाच नाही का? (ईयोब १०:८; स्तोत्रसंहिता ३६:९; १००:३; मलाखी २:१०; प्रेषितांची कृत्ये १७:२४, २५) त्यामुळे, “अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही,” या बायबलमधील स्तोत्रकर्त्याच्या प्रेरित आज्ञेचे अनुकरण करणेच शहाणपणाचे होणार नाही का? मनुष्यावर का भरवसा ठेवू नये? याचे कारण देताना स्तोत्रकर्त्याने म्हटले: “त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो; त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो.” खरोखरच, सार्वकालिक जीवनाची आशा असतानाही, मृत्यूच्यासमोर मात्र मनुष्य अगदी हतबल होतो. स्तोत्रकर्त्याने अखेरीस असे म्हटले: “ज्याची आशा आपला देव परमेश्‍वर [“यहोवा,” NW] ह्‍यावर आहे, तो धन्य.”—स्तोत्र १४६:३-५.

हा खरोखरच देवाचा उद्देश आहे का?

१५. आपण सर्वकाळ जगावे हा देवाचा उद्देश आहे हे कोणत्या गोष्टीवरून दिसते?

१५ आपण सार्वकालिक जीवनाचा आनंद घ्यावा हा खरोखरच यहोवाचा उद्देश आहे का? होय, हाच देवाचा उद्देश आहे. देवाच्या वचनात अनेक वेळा सार्वकालिक जीवनाचे अभिवचन देण्यात आले आहे. बायबल आपल्याला अभिवचन देते की, ‘देवाचे कृपादान सार्वकालिक जीवन आहे.’ योहान या देवाच्या सेवकाने लिहिले: “हे जे अभिवचन त्याने स्वतः आपल्याला दिले आहे तेच सार्वकालिक जीवन होय.” त्यामुळेच एका तरुणाने येशूला विचारले: “गुरुजी, मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे?” (रोमकर ६:२३; १ योहान २:२५; मत्तय १९:१६) प्रेषित पौलाने तर असे लिहिले: “युगायुगाचे [सार्वकालिक] जीवन सत्यप्रतिज्ञ देवाने युगाच्या काळापूर्वीच देऊ केले.”—तीत १:२.

१६. देवाने कोणत्या अर्थाने “युगाच्या काळापूर्वी” सार्वकालिक जीवनाचे अभिवचन दिले आहे?

१६ देवाने “युगाच्या काळापूर्वी” सार्वकालिक जीवनाचे अभिवचन दिले याचा काय अर्थ होतो? काही लोकांच्या मते पौलाच्या बोलण्याचा असा अर्थ होतो, की मानवाने सर्वकाळ जगावे हा देवाचा उद्देश आदाम आणि हव्वा यांना बनविण्याआधीचाच होता. पण, यहोवाने मानवांची उत्पत्ती केल्यानंतर जेव्हा आपला उद्देश प्रकट केला तेव्हाच्या संदर्भात जरी पौल सांगत असला, तरी हे स्पष्ट आहे, की मनुष्याला सार्वकालिक जीवन देणे देवाच्या उद्देशातच आहे.

१७. आदाम आणि हव्वा यांना बागेतून का बाहेर काढण्यात आले आणि प्रवेशद्वाराजवळ करुबीम का ठेवण्यात आले?

१७ बायबल म्हणते, की एदेन बागेत ‘देवाने जीवनाचे झाड जमिनीतून उगवले.’ आदामाने ‘जीवनाच्या झाडाला हात लावून त्याचे फळ काढून खाण्याद्वारे जिवंत—सर्वकाळ जिवंत राहता येऊ नये म्हणून त्याला बागेतून बाहेर काढण्यात आले होते!’ आदाम आणि हव्वा यांची एदेन बागेतून हकालपट्टी केल्यानंतर यहोवाने “जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्‍या मार्गाची राखण करण्यासाठी . . . करुबीम व गरगर फिरणारी ज्वालारुप तरवार ठेविली.”—उत्पत्ति २:९; ३:२२-२४.

१८. (अ) आदाम आणि हव्वा यांनी जीवनाच्या झाडाचे फळ खाल्ले असते तर काय झाले असते? (ब) त्या झाडाचे फळ खाल्ल्याने काय सूचित होते?

१८ आदाम आणि हव्वा यांना त्या जीवनाच्या झाडाचे फळ खाण्यास परवानगी दिली असती तर त्याचा काय अर्थ झाला असता? परादीसमध्ये अनंतकाळ जगण्याचा विशेषाधिकार! एका बायबल विद्वानाने असे अनुमान काढले: “जीवनाच्या झाडामध्ये काहीतरी गुण असला असेल ज्याद्वारे मानवी शरीराची संरचना वयोमानामुळे येणारी दुर्बलता किंवा मृत्यूकडे नेणारा शारीरिक ऱ्‍हास यांपासून मुक्‍त राहिली असती.” त्यांनी असाही दावा केला की, “वाढत्या वयोमानाचा शरीरावर अपायकारक परिणाम होऊ नये म्हणून परादीसमध्ये एक प्रकारचे वनौषधी होते.” पण, जीवनाच्या झाडामध्ये जीवन-प्रदायक गुण होते किंवा नाही, याविषयी बायबलमध्ये काहीही सांगण्यात आलेले नाही. तर, त्या झाडाचे फळ खाण्याची देव ज्यास परवानगी देईल त्या व्यक्‍तीला सार्वकालिक जीवन मिळण्याच्या खात्रीचे सूचक म्हणजे ते झाड होते.—प्रकटीकरण २:७.

देवाचा उद्देश कायम

१९. आदाम का मेला आणि त्याची संतती, अर्थात आपण देखील का मरतो?

१९ आदामाने पाप केले तेव्हा त्याने स्वतः तर सार्वकालिक जीवनाचा हक्क गमावलाच, शिवाय अद्याप जन्मास न आलेली त्याची संततीही सार्वकालिक जीवनास मुकली. (उत्पत्ति २:१७) अवज्ञा करण्याद्वारे आदामाने पाप केले तेव्हा तो दोषपूर्ण, अपरिपूर्ण झाला. तेव्हापासून, आदामाच्या शरीरात बदल झाला, ते मृत्यूला वश झाले. बायबल म्हणते, “पापाचे वेतन मरण आहे.” (रोमकर ६:२३) याशिवाय, आदामाची अपरिपूर्ण संतती सुद्धा सार्वकालिक जीवनापासून दूरावली जाऊन मृत्यूला वश झाली. बायबल सांगते: “एका माणसाच्या [आदामाच्या] द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.”—रोमकर ५:१२.

२०. मानवांना या पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याकरता बनविण्यात आले होते हे कशावरून सूचित होते?

२० आदामाने पाप केले नसते तर काय झाले असते? त्याने देवाची अवज्ञा केली नसती आणि जीवनाच्या झाडाचे फळ खाण्याची त्याला मुभा मिळाली असती तर काय झाले असते? देवाने त्याला सार्वकालिक जीवन कोठे दिले असते? स्वर्गात? नाही! आदामाला स्वर्गात घेण्याविषयी देवाने काहीही सांगितले नव्हते. त्याला या पृथ्वीवर काम करायचे होते. बायबल म्हणते: “परमेश्‍वर देवाने दिसण्यास सुंदर व अन्‍नासाठी उपयोगी अशी सर्व जातींची झाडे . . . जमिनीतून उगवविली,” आणि ते पुढे म्हणते: “परमेश्‍वर देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास ठेविले.” (उत्पत्ति २:९, १५) आदामाला जोडीदार म्हणून हव्वेची निर्मिती केल्यानंतर त्या दोघांना या पृथ्वीवर आणखी काही कामे सोपवण्यात आली. देवाने त्यांना म्हटले: “फलद्रुप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा.”—उत्पत्ति १:२८.

२१. आरंभीच्या मानवांकडे कोणते वैभवी भवितव्य होते?

२१ देवाने दिलेल्या सूचना आदाम आणि हव्वा यांनी ऐकल्या असत्या तर त्यांना या पृथ्वीवर किती वैभवी भवितव्य अनुभवता आले असते याचा विचार करा! या पृथ्वीवरील परादीसमध्ये त्यांच्या पूर्णपणे सुदृढ असलेल्या मुलांना त्यांना वाढवता आला असते. त्यांची लाडकी मुले जसजशी मोठी झाली असती तसतशी फलद्रूप होण्याच्या आणि त्या परादीसची निगा राखण्याच्या आनंदी कामात त्यांनीही योगदान केले असते. सर्व प्राणी त्यांच्या अधीन असले असते, मानवाने पूर्ण समाधान अनुभवले असते. एदेन बागेच्या सीमा वाढत जाऊन संपूर्ण पृथ्वीच परादीस झाल्यानंतर होणाऱ्‍या आनंदाची कल्पना करा! वृद्ध होण्याच्या आणि मृत्यूच्या चिंतेविना या सुंदर पृथ्वीच्या घरकुलात परिपूर्ण मुलांसोबत राहण्याचा आनंद उपभोगायला तुम्हाला आवडेल का? या प्रश्‍नाचे तुम्ही मनापासून उत्तर द्या.

२२. पृथ्वीकरता असणारा उद्देश देवाने बदलला नाही याची आपण खात्री का बाळगू शकतो?

२२ तर मग, आदाम आणि हव्वा यांनी अवज्ञा केल्यानंतर त्यांना एदेन बागेतून बाहेर काढल्यानंतर, पृथ्वीवरील परादीसमध्ये मानवांना सार्वकालिक जीवन देण्याचा देवाचा उद्देश बदलला का? मुळीच नाही! देवाने त्याचा उद्देश बदलला असता तर त्याच्या ठायी त्याचा मूळचा उद्देश पूर्ण करण्याचे सामर्थ्य नाही, असे त्याने कबूल केले हे सिद्ध झाले असते. देव ज्या गोष्टीचे अभिवचन देतो ती गोष्ट तो पूर्ण करतोच याची आपण खात्री बाळगू शकतो कारण तो स्वतः असे म्हणतो: “त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल; ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.”—यशया ५५:११.

२३. (अ) धार्मिक वृत्तीच्या लोकांना या पृथ्वीवर सार्वकालिक जीवन देण्याचा देवाचा उद्देश अद्यापही कायम आहे हे कशावरून दिसून येते? (ब) पुढील लेखात कोणत्या गोष्टीची चर्चा करण्यात येईल?

२३ पृथ्वीकरता असणारा देवाचा उद्देश बदलला नाही हे बायबलमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे, देव अभिवचन देतो: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” येशू ख्रिस्तानेही डोंगरावरील त्याच्या प्रवचनात सांगितले की लीन लोक या पृथ्वीचे वतन भोगतील. (स्तोत्र ३७:२९; मत्तय ५:५, पं.र.भा.) पण, सार्वकालिक जीवन आपण कसे प्राप्त करू शकतो आणि त्या जीवनाचा आनंद घेण्याकरता आपण काय करण्यास हवे? याची चर्चा पुढील लेखात करण्यात येईल.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ सार्वकालिक जीवन अशक्य आहे असे अनेकांना का वाटते?

◻ आपल्याला सार्वकालिक जीवनाकरता बनवले आहे याची आपल्याला कशावरून खात्री पटते?

◻ मानवजातीकरता आणि पृथ्वीकरता देवाचा आरंभीचा कोणता उद्देश होता?

◻ देव त्याचा आरंभीचा उद्देश पूर्ण करील याविषयी आपण खात्री का बाळगू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा