प्रदीर्घ जीवनासाठी आपली खटपट
“स्त्रीपासून जन्मलेला मानवप्राणी अल्पायु व क्लेशभरित असतो. तो फुलासारखा फुलतो व खुडला जातो; तो छायेप्रमाणे सत्वर निघून जातो, राहत नाही.”—ईयोब १४:१, २.
जीवनाच्या अल्पतेवरील हा विचार सुमारे ३,५०० वर्षांपूर्वी लिहिण्यात आलेला असला तरी आज फक्त मूठभर लोकच तो मान्य करणार नाहीत. अल्पकाळचे तारुण्य आणि नंतर म्हातारपण व मृत्यू अशा जीवनात लोकांना कधीच समाधान मिळालेले नाही. यामुळे संपूर्ण इतिहासभरात मानवाने त्याचे आयुष्यमान वाढवण्यासाठी अनेकाविध पद्धतींचे प्रयोग करून पाहिले आहेत.
ईयोबाच्या काळात इजिप्शियन लोक आपले तारुण्य पुन्हा प्राप्त करण्यासाठी प्राण्यांचे अंडकोष खात असत; हा त्यांचा प्रयत्न निरर्थक ठरला. आयुष्यमान वाढवू शकणारे एक अमृत तयार करण्याचा मध्ययुगीन काळातील रसायनशास्त्राचा प्रमुख उद्देश होता. अनेक रसायनशास्त्रज्ज्ञांचा विश्वास होता, की कृत्रिमरीत्या बनवलेल्या सोन्यामुळे अमर जीवन प्राप्त होऊ शकते व सोन्याच्या थाळीत जेवल्याने आयुष्यमान वाढू शकते. प्राचीन चिनी ताऊ लोकांना वाटायचे, की मनन करण्याद्वारे, श्वासन व्यायामांद्वारे व योग्य आहाराद्वारे शरीराचे रसायनशास्त्र बदलता येते व अमरत्व प्राप्त करता येते.
स्पॅनिश शोधक हुआन पॉन्स दे लेऑनने तारुण्याच्या झऱ्याचा अथक शोध केला होता. हर्मिपूस रेडिवीवूस नावाच्या आपल्या पुस्तकात १८ व्या शतकातील एका डॉक्टरने, वसंत ऋतूत तरुण कुमारिकांना एका लहानशा खोलीत ठेवायचे आणि बाटल्यांमध्ये त्यांचा श्वास भरायचा व नंतर त्या श्वासाचा आयुष्यमान वाढवण्याचे औषध म्हणून वापर करायचा, असे सुचवले. परंतु, यांतील एकही पद्धत यशस्वी ठरली नाही.
आज, मोशेने ईयोबाचे बोलणे लिहून ३,५०० वर्ष उलटली आहेत; मानव चंद्रावर पोहंचला, मोटारगाड्या आणि संगणकांचा त्याने शोध लावला आणि परमाणू व कोशिकांचे संशोधन केले. इतकी सर्व तांत्रिक प्रगती करूनही आपण “अल्पायु व क्लेशभरित” आहोत. हे खरे आहे, की विकसित देशांत गेल्या शतकामध्ये मानवाचे आयुष्यमान नाट्यमयरीत्या वाढले आहे. पण हे, सुधारित आरोग्य निगा, अधिक गुणकारी स्वच्छता उपाययोजना व चांगले पोषण यांमुळे शक्य झाले आहे. उदाहरणार्थ, १८ व्या शतकाच्या मध्यापासून १९९० च्या दशकाच्या सुरवातीपर्यंत, स्वीडनमध्ये पुरुषांचे सरासरी आयुष्यमान ४० पासून ७५ वर्षांपर्यंत वाढले व स्त्रियांचे सरासरी आयुष्यमान ४४ वर्षांपासून ८० वर्षांपर्यंत वाढले. पण याचा असा अर्थ होतो का, की दीर्घ जीवन जगण्याची मानवाची इच्छा तृप्त झाली आहे?
नाही, कारण काही राष्ट्रांमध्ये पुष्कळ लोक वृद्ध होऊनच मरण पावत असले तरी, अनेक वर्षांपूर्वी मोशेने लिहिले शब्द अजूनही लागू होतात: “आमचे आयुष्य सत्तर वर्षे—आणि शक्ति असल्यास फार तर ऐंशी वर्षे असले, तरी . . . , ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो.” (स्तोत्र ९०:१०) येणाऱ्या भवितव्यात आपण काही बदल पाहणार आहोत का? मनुष्य कधी दीर्घ जीवन जगू शकेल का? पुढील लेख अशा प्रश्नांची चर्चा करील.