राज्य घोषकांचा वृत्तान्त
फ्रान्समध्ये साक्षीदार जनतेसमोर जातात
यहोवाच्या साक्षीदारांनी शुक्रवार, जानेवारी २९, १९९९ रोजी भल्या पहाटेपासून सप्ताहाच्या शेवटपर्यंत फ्रान्समधील रस्त्यांवर आणि मग घरोघरी जाऊन फ्रान्सचे लोकहो, तुम्हाला फसवले जात आहे! असे शीर्षक असलेल्या पत्रिकेच्या १.२ कोटी प्रतींचे उत्साहाने वाटप केले. या मोहिमेचे कारण?
पॅरिसमध्ये त्या शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत या मोहिमेचे कारण सांगण्यात आले. साक्षीदार असलेल्या प्रवक्त्याने सांगितले: “आम्ही कोण आहोत याची जाणीव या वेळी आम्ही लोकांना करून देणार आहोत आणि आमची जी बदनामी केली जात आहे ती आम्ही थांबवणार आहोत. आम्ही टीका सहन करू, पण आमचं नाव खराब करणारे खोटे आरोप आम्ही सहन करू शकत नाही.”
फ्रान्समध्ये यहोवाच्या साक्षीदारांची गणती तिसरा मोठा ख्रिस्ती धर्म अशी होत असली तरी, अनेक साक्षीदार मुलांचा शाळेत अपमान केला जातो व त्यांना त्रास दिला जातो. त्यांच्या धर्मामुळे प्रौढ साक्षीदारांना कामावरून कमी करण्यात आले आहे व त्यांना धमक्या देण्यात येत आहेत. विश्वास बसणार नाही अशी गोष्ट म्हणजे, त्यांना मिळालेल्या धार्मिक देणगीवर ६० टक्के कर आकारण्यात आला. या मोहिमेने अशाप्रकारच्या दुजाभावाला कसे हाताळले?
पत्रिकेतील मजकूर असा होता: “फ्रान्समध्ये राहणारे २,५०,००० यहोवाचे साक्षीदार आणि त्यांचे सहकर्मी, फ्रान्समध्ये १९०० पासून अस्तित्वात असलेल्या त्यांच्या ख्रिस्ती धर्माला ज्या अपमानकारक मार्गाने वागवले जात आहे त्याचा, तसेच १९९५ पासून घातक पंथांबरोबर गणले जात आहे त्याचा निषेध करतात. . . . त्यांना सतत सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाचा ते निषेध करतात.” फ्रान्समधील साक्षीदारांवर लावण्यात आलेले खोटे आरोप आणि लोकांमध्ये त्यांना बदनाम करणारे फसवे मार्ग उजेडात आणण्यात आले. पत्रिका शेवटी म्हणते: “आज, २० लाखांपेक्षा अधिक यहोवाचे साक्षीदार आणि त्यांचे सहकर्मी युरोपमध्ये राहतात. शुभवर्तमान मूल्यांना धरून ते ज्या राज्याचे नागरीक आहेत त्या राज्याच्या नियमांचा आदर करतात. फ्रान्सचे लोकहो, ही वस्तुस्थिती आहे. ती जशीच्या तशी लोकांना सांगणं हे आमचं कर्तव्य आहे!”
त्वरित, सकारात्मक प्रतिसाद
पहिल्या दिवशी लाखो पत्रिकांचे वाटप करण्यात आले. एकट्या पॅरिसमध्ये दुपारपर्यंत ७,००० पेक्षा अधिक साक्षीदारांनी १३ लाखांपेक्षा अधिक पत्रिका लोकांना दिल्या. इतक्या साक्षीदारांना रस्त्यांवर पत्रिका वाटताना लोक पहिल्यांदाच पाहत होते. लोकांपर्यंत माहिती पोहंचवण्याचे काम प्रसार माध्यमाने तसेच राष्ट्रीय व स्थानीय बातमीपत्रांनी आणि टीव्हीनेही उचितपणे केले. ला प्रोग्रे डा लिओ नावाच्या वर्तमानपत्राने म्हटले: “या पुढाकाराने, . . . एका शब्दाचा किती अनर्थ होऊ शकतो ते उजेडात आणले आहे. गेल्या दहा वर्षांत ‘पंथ’ या शब्दाने विकृत, उग्र आणि हानीकारक स्वरूप धारण केले आहे. . . . यहोवाचे साक्षीदार मात्र समाजात गडबड माजवणारे अनिष्टकारी नाहीत.”
यहोवाच्या साक्षीदारांना ओळखणारे लोक त्यांच्या शांत स्वभावाची व स्थापित सामाजिक व्यवस्थेबद्दल असलेल्या गाढ आदराची प्रशंसा करतात. रस्त्यांवर भेटलेल्या अनेकांनी प्रशंसा व्यक्त केली व मोहिमेत भाग घेतलेल्या हजारो साक्षीदारांना योग्य पाठिंबा दिला. टेलिफोन, फॅक्स व पत्रे यांच्याद्वारे लोकांनी लागलीच पत्रिकेबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली. यासर्वांपेक्षा, प्रामाणिक लोकांना साक्षीदारांविरुद्धच्या कल्पित व निर्बुद्ध शेऱ्यांपेक्षा सत्य परिस्थिती ऐकण्याची संधी देण्यात आली आणि ज्या लोकांच्या भावनांना ठेच पोहंचवण्यात आली होती ते, मनापासून आवडणारे आपले विश्वास प्रदर्शित करू शकले.