बायबलचा उलगडा—कोणाच्या प्रभावाने?
“उलगडा” म्हणजे “एखाद्याचा विश्वास, मत किंवा परिस्थिती यांनुसार समजून घेणे” अशी या शब्दाची एक व्याख्या आहे. (वेबस्टर्स नाईंथ न्यू कॉलिजिएट डिक्शनरी) तेव्हा एखादी व्यक्ती बहुधा, कोणत्याही गोष्टीचा उलघडा तिची पार्श्वभूमी, तिचे शिक्षण व तिचे संगोपन यांनुसार करते.
परंतु, बायबलच्या उलघड्याविषयी काय? आपला “विश्वास, मत किंवा परिस्थिती” यांनुसार बायबलच्या भागाचा अर्थ सांगण्याची आपल्याला मोकळीक आहे का? आपण असे करत नाही तर देव आपल्याला मार्गदर्शन देतो असा दावा सहसा अनेक बायबल विद्वान व भाषांतरकार करतात.
उदाहरणार्थ, जॉन लिनगार्ड यांच्या चार शुभवर्तमानांची नवी आवृत्ती (इंग्रजी) या १८३६ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकात योहान १:१ या वचनावर असलेल्या तळटीपेत “एक कॅथलिक” या टोपणनावाखाली जे म्हटले आहे त्याचा विचार करा. तेथे म्हटले आहे: “धार्मिक किंवा राजकीय श्रद्धा बाळगणाऱ्या सर्व लोकांना वाटते, की त्यांच्या विशिष्ट मतांचा पुरावा त्यांना पवित्र पुस्तकांमध्ये मिळतो: कारण खरे पाहता, शास्त्रवचने त्यांना काही सांगत नसून ते आपल्या मनानुसार शास्त्रवचनांचा अर्थ लावतात.”
हा मुद्दा शाबीत करण्याजोगा असला तरी, या लेखकाचा हेतू काय होता? त्याचे भाष्य, त्या वचनाचा त्याने जो अर्थ सांगितला त्याला पुष्टी देणारा होता; त्याने अशाप्रकारे त्या वचनाचे भाषांतर केले: “प्रारंभी ‘शब्द’ होता; आणि ‘शब्द’ देवासह होता आणि ‘शब्द’ देव होता.” हे अगदी त्रैक्यसंबंधित भाषांतर आहे.
कोणत्या गोष्टीमुळे हा लेखक, त्रैक्याच्या सिद्धान्ताला पुष्टी दिल्यासारखे योहान १:१ चे भाषांतर करण्यास प्रवृत्त झाला? ‘शास्त्रवचनांत तशी माहिती’ दिली होती का? हे शक्य नाही, कारण बायबलमध्ये कोठेही त्रैक्याची शिकवण आढळत नाही. या मुद्द्याविषयी द न्यू एन्सायक्लोपिडिआ ब्रिटानिका काय म्हणतो ते पाहा: “नव्या करारात कोठेही त्रैक्य हा शब्द किंवा तसा स्पष्ट सिद्धान्त आढळत नाही.” तसेच, याले विद्यापीठाचे प्राध्यापक ई. वॉशबर्न हॉपकिन्स म्हणतात: “येशू आणि पौलाला त्रैक्याची ही शिकवण माहीतही नव्हती; . . . ते त्याविषयी काहीच म्हणत नाहीत.”
योहान १:१ किंवा बायबलमधील कोणत्याही दुसऱ्या वचनाचा अर्थ त्रैक्य आहे असे जे म्हणतात त्यांच्याबद्दल आपण काय म्हणू शकतो? श्री. लिनगार्ड यांच्या स्वतःच्याच प्रमाणानुसार, “शास्त्रवचने त्यांना तसे सांगत नाहीत तर ते स्वतःच्या मनानुसार शास्त्रवचनांचा अर्थ लावतात.”
याविषयावर आपल्याला मार्गदर्शन देण्याकरता देवाचे वचन आहे, ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. प्रेषित पेत्राने म्हटले: “प्रथम हे ध्यानात ठेवा की, शास्त्रांतील कोणत्याहि संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही. कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही; तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.”—२ पेत्र १:२०, २१.