कुटुंब मिळून देवाच्या वचनाचा अभ्यास नियमितपणे करा
“मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.”—मत्तय ४:४.
१. कुटुंब प्रमुखांनी त्यांच्या मुलांना देवाचे मार्ग शिकवण्याच्या जबाबदारीविषयी बायबल काय म्हणते?
यहोवा देवाने, कुटुंब प्रमुखांना मुलांप्रती असणाऱ्या त्यांच्या जबाबदारीची वारंवार आठवण करून दिली आहे. अशाप्रकारच्या मार्गदर्शनामुळे मुले सध्याच्या जीवनाकरता सिद्ध होतीलच पण त्यांच्या पुढील जीवनाकरताही त्यांना यामुळे मदत होईल. अब्राहामाच्या घराण्याने “परमेश्वराचा मार्ग आचरावा” म्हणून त्यास शिक्षण देण्याच्या जबाबदारीविषयी देवदूताने अब्राहामाला माहिती दिली. (उत्पत्ति १८:१९) इजिप्तमधून देवाने इस्राएल लोकांची कशी सुटका केली आणि होरेबमधील सियोन पर्वतावर त्याने कशाप्रकारे नियमशास्त्र दिले, यांविषयी इस्राएली पालकांनी आपल्या मुलांना सांगावयाचे होते. (निर्गम १३:८, ९; अनुवाद ४:९, १०; ११:१८-२१) ख्रिस्ती कुटुंब प्रमुखांना असा बोध केला जातो, की त्यांनी आपल्या मुलांना ‘प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवावे.’ (इफिसकर ६:४) कुटुंबातील एकच पालक यहोवाची सेवा करत असला तरी, त्याने मुलांना देवाचे मार्ग शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.—२ तीमथ्य १:५; ३:१४, १५.
२. घरात कोणी मूल नसल्यास कौटुंबिक अभ्यासाची आवश्यकता आहे का? स्पष्ट करा.
२ याचा असा अर्थ होत नाही, की घरामध्ये मुले असली तरच कुटुंबामध्ये देवाच्या वचनाचा अभ्यास घेतला जावा. मुले नसतानाही पती आणि पत्नी कौटुंबिक अभ्यास घेतात तेव्हा आध्यात्मिक गोष्टींविषयी वाटणारी कदर त्यातून दिसून येते.—इफिसकर ५:२५, २६.
३. कौटुंबिक अभ्यासातील नियमितपणा का महत्त्वाचा आहे?
३ जास्तीत जास्त लाभ मिळवायचा असल्यास नियमितपणे बोध करण्याची गरज आहे; आणि ही गोष्ट इस्राएल लोक रानात असताना यहोवाने त्यांना शिकवलेल्या धड्याच्या एकवाक्यतेत आहे: “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.” (अनुवाद ८:३) प्रत्येक कुटुंबाच्या परिस्थितींनुसार, बायबल अभ्यास दर आठवड्याला घेतला जाऊ शकतो, तर काही कुटुंबात दररोज पण संक्षिप्त बायबल अभ्यास घेतला जाऊ शकतो. यांपैकी कोणते निवडायचे हे तुमच्यावर आहे, पण जमेल तर घेऊ असे धोरण अभ्यासाच्या बाबतीत ठेवू नका. त्याकरता “वेळ विकत घ्या.” आणि ही वेळ विकत घेण्यासाठी तुम्ही जे काही त्याग कराल त्याचे पुढे सार्थकच होईल. यावर तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे जीवन अवलंबून आहे.—इफिसकर ५:१५-१७ NW; फिलिप्पैकर ३:१६.
लक्षात ठेवण्याचे उद्देश
४, ५. (अ) पालकांनी त्यांच्या मुलांना शिकवताना एक महत्त्वपूर्ण उद्देश मनी बाळगावा याविषयी यहोवाने मोशेद्वारे त्यांना काय शिकवले? (ब) आज यामध्ये कशाचा समावेश होतो?
४ जेव्हा तुम्ही कौटुंबिक अभ्यास चालवता, तेव्हा तुमच्या मनात स्पष्ट असे उद्देश असल्यास या अभ्यासाद्वारे तुम्हाला पुष्कळ काही साध्य करता येईल. खाली दिलेल्या काही गोष्टी तुम्हाला करता येण्यासारख्या आहेत.
५ प्रत्येक अभ्यासाच्या वेळी, यहोवा देवावरील प्रेम विकसित करण्याचा प्रयत्न करा. वाग्दत्त देशात प्रवेश करण्याआधी इस्राएल लोक मवाबच्या मैदानात जमा झाले होते तेव्हा मोशेने इस्राएल लोकांचे अशा गोष्टीकडे लक्ष वेधले ज्या गोष्टीला येशू ख्रिस्ताने नंतर “मोठी आज्ञा” असे संबोधले. ती कोणती गोष्ट होती? “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीति कर.” (मत्तय २२:३६, ३७; अनुवाद ६:५) या गोष्टी स्वतःच्या हृदयावर बिंबवण्याचे आणि मुलांना शिकवण्याचे मोशेने इस्राएल लोकांना आर्जवले. मोशेच्या आर्जवानुसार चालण्याकरता यहोवावर प्रेम का करावे, अशाप्रकारच्या प्रेमाला अटकाव निर्माण करील अशी प्रवृत्ती आणि वागणूक कशी टाळावी, आपल्या स्वतःच्या जीवनात यहोवावरील प्रेम कसे प्रदर्शित करावे, या सर्व गोष्टींची इस्राएल लोकांना वारंवार चर्चा करण्याची आवश्यकता होती. आपल्या मुलांना अशाचप्रकारच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे का? होय! “अंतःकरणाची सुंता” करण्याकरता मुलांची मदत करण्याची म्हणजे देवावरील त्यांच्या प्रेमाला अटकाव करणाऱ्या कोणत्याही गोष्टीला काढून टाकण्याकरता त्यांची मदत करण्याची आवश्यकता आहे. (अनुवाद १०:१२, १६; यिर्मया ४:४) जगातील वस्तूंविषयी मोह आणि जगीक कामांत गुंग होण्याची शक्यता, असे अडथळे कदाचित येऊ शकतील. (१ योहान २:१५, १६) यहोवावरील प्रेम सक्रिय, उघड असण्यास हवे ज्यामुळे स्वर्गीय पित्याला आनंदित करण्याकरता आपल्याला प्रेरणा मिळेल. (१ योहान ५:३) कौटुंबिक अभ्यासापासून तुम्हाला दीर्घकालीन लाभ हवे असल्यास, प्रत्येक कौटुंबिक अभ्यास अशा पद्धतीने घेण्यास हवा ज्यामुळे यहोवा आणि आपल्यातील हे प्रेम अधिकाधिक गाढ होईल.
६. (अ) अचूक ज्ञान देण्याकरता कशाची आवश्यकता आहे? (ब) अचूक ज्ञानाच्या महत्त्वाविषयी शास्त्रवचने कशाप्रकारे ठामपणे सांगतात?
६ देवाच्या अपेक्षांविषयींचे अचूक ज्ञान द्या. यामध्ये काय गोवलेले आहे? मासिकातून किंवा पुस्तकातून जसेच्या तसे उत्तर वाचून दाखवले म्हणजे झाले असे नाही. मुख्य शब्द आणि प्रमुख विचार चांगल्याप्रकारे समजले आहेत किंवा नाहीत हे पाहण्याकरता चर्चा करणे आवश्यक आहे. नवीन व्यक्तिमत्त्व धारण करण्याकरता, जीवनातील समस्यांना तोंड देताना महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याकरता आणि देवाला खरोखरच आनंद होईल अशा गोष्टी करण्याकरता अचूक ज्ञान अत्यावश्यक आहे.—फिलिप्पैकर १:९-११; कलस्सैकर १:९, १०; ३:१०.
७. (अ) अभ्यासाच्या साहित्याचा व्यावहारिक अवलंब करण्याकरता कोणते प्रश्न विचारल्याने कुटुंबाला मदत होईल? (ब) अशाप्रकारच्या उद्देशाच्या महत्त्वाविषयी शास्त्रवचने ठामपणे कशाप्रकारे सांगतात?
७ शिकलेल्या गोष्टी रोजच्या जीवनात आचरण्याकरता मदत करा. हा उद्देश लक्षात ठेवून प्रत्येक कौटुंबिक अभ्यासाच्या वेळी असे विचारा: ‘या माहितीचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो? आपण सध्या जे करत आहोत त्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे का? आणि हे फेरबदल का केले पाहिजेत?’ (नीतिसूत्रे २:१०-१५; ९:१०; यशया ४८:१७, १८) शिकलेल्या गोष्टी व्यावहारिकरित्या लागू करण्यावर पुरेसे लक्ष देणे, हा कुटुंबांतील सदस्यांच्या आध्यात्मिक वाढीकरता महत्त्वाचा घटक ठरू शकतो.
शिकवण्याच्या साधनांचा विचारपूर्वक उपयोग करा
८. बायबल अभ्यासाकरता दासवर्गाने कोणती साधने पुरवली आहेत?
८ अभ्यासाकरता उपयोगी पडतील अशी अनेक साधने ‘विश्वासू आणि बुद्धिमान दासाने’ पुरवली आहेत. बायबलसोबत उपयोग करण्याकरता टेहळणी बुरूज हे नियतकालिक १३१ भाषांमध्ये उपलब्ध आहे. बायबल अभ्यासाकरता पुस्तके १५३, माहितीपत्रके २८४, ऑडिओ कॅसेट ६१, व्हिडिओ कॅसेट ४१, तर बायबलवरील संशोधनाकरता ९ भाषांमध्ये कॉम्प्युटर प्रोग्राम उपलब्ध आहे!—मत्तय २४:४५-४७.
९. कौटुंबिक टेहळणी बुरूज अभ्यास घेताना परिच्छेदामध्ये केवळ उल्लेख असलेल्या शास्त्रवचनांमध्ये असलेला सल्ला आपण कशाप्रकारे लागू करू शकतो?
९ अनेक घरांमधून कौटुंबिक अभ्यासात टेहळणी बुरूज नियतकालिकाची तयारी केली जाते. असे करणे किती फायदेकारक! विश्वभरातील यहोवाच्या लोकांची उभारणी होईल असे प्रमुख आध्यात्मिक अन्न टेहळणी बुरूज नियतकालिकामध्ये असते. त्यामुळे तुम्ही कुटुंब या नात्याने टेहळणी बुरूज नियतकालिकाचा अभ्यास करता तेव्हा परिच्छेद वाचणे आणि छापील प्रश्नाचे उत्तर देणे इतकेच पुरेसे नाही. दिलेली माहिती समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. ज्या शास्त्रवचनांचा परिच्छेदात फक्त उल्लेख केलेला आहे ती शास्त्रवचने उघडून वाचण्याकरता वेळ द्या. परिच्छेदामध्ये ज्या विषयावर माहिती देण्यात आली आहे त्याच्याशी या वचनांचा काय संबंध आहे, हे कौटुंबिक सदस्यांकडून जाणून घ्या. त्यांच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करा.—नीतिसूत्रे ४:७, २३; प्रेषितांची कृत्ये १७:११.
१०. मुलांनी अभ्यासात सहभाग घेण्याकरता आणि त्यांच्याकरता अभ्यास मनोरंजक बनविण्याकरता काय करता येण्यासारखे आहे?
१० घरात मुले असल्यास, यांत्रिकपणे अभ्यास करण्याऐवजी तुमचा कौटुंबिक अभ्यास उभारणीकारक, मनोरंजक आणि आनंददायक बनविण्याकरता तुम्हाला काय करता येईल? कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने अभ्यासात भाग घ्यावा म्हणून प्रयत्न करा त्यामुळे चर्चा करत असलेल्या माहितीवर लक्ष केंद्रित राहते. शक्य असल्यास, प्रत्येक मुलाजवळ त्याचे स्वतःचे बायबल आणि अभ्यासत असलेले मासिक असावे. येशूने मुलांविषयी आपले प्रेम व्यक्त केले त्याप्रमाणे पालकही अभ्यासाच्या वेळी लहान मुलाला जवळ घेऊन बसू शकतात, त्याला आपल्या कुशीत घेऊ शकतात. (पडताळा मार्क १०:१३-१६.) अभ्यासात असलेल्या माहितीवर एखादे चित्र असल्यास, कुटुंब प्रमुख त्या चित्राविषयी काही सांगण्याची संधी घरातील लहानग्याला देईल. विशिष्ट शास्त्रवचन वाचण्याकरता लहान मुलाला आधीच सांगता येण्यासारखे आहे. मोठ्या मुलाला अभ्यासत असलेली माहिती कशी लागू करता येईल यावर स्पष्टीकरण देण्यासाठी आधीच सांगितले जाऊ शकते.
११. शिकवण्याची कोणती इतर साधने पुरवण्यात आली आहेत आणि जेथे कोठे ही साधने उपलब्ध आहेत, तेथे कौटुंबिक अभ्यासाच्या संदर्भाने त्यांचा लाभ कशाप्रकारे घेता येईल?
११ तुम्ही टेहळणी बुरूज नियतकालिकाचा चर्चेकरता उपयोग करत असला, तरी या गोष्टीचे विस्मरण होऊ देऊ नका, की बायबल अभ्यासासाठी इतरही साधने अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहेत. एखाद्या विशिष्ट बायबल अभिव्यक्तीची पृष्ठभूमी किंवा तिच्याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) या पुस्तकातून मिळू शकेल. टेहळणी बुरूज प्रकाशन सूची किंवा संस्थेद्वारे पुरवण्यात आलेला कॉम्प्युटर संशोधन प्रोग्राम यांद्वारे इतर प्रश्नांची उत्तरे मिळवता येतील. ही साधने तुमच्या भाषेत उपलब्ध असल्यास त्यांचा उपयोग करण्याचे शिकल्यामुळे तुमच्या कौटुंबिक अभ्यासाला बरीच मदत होऊ शकते. लहान मुलांमध्ये रूची वाढवण्याच्या उद्देशाने संस्थेने प्रकाशित केलेला एखादा व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा बायबलवर आधारित एखाद्या नाटकाची कॅसेट ऐकण्यासाठी तुम्ही काही वेळ बाजूला काढू शकता आणि मग पाहिलेल्या, ऐकलेल्या गोष्टींवर नंतर चर्चा करू शकता. अभ्यासाकरता असलेल्या या साधनांचा चांगल्याप्रकारे उपयोग केल्यास तुमचा कौटुंबिक अभ्यास रूचिपूर्ण होईल आणि यामुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबाला लाभच होईल.
कौटुंबिक गरजांनुसार अभ्यासात फेरबदल करा
१२. कौटुंबिक गरजांवर लक्ष केंद्रित करण्याकरता कौटुंबिक अभ्यासामुळे कशाप्रकारे मदत होऊ शकते?
१२ तुमच्या कुटुंबात सहसा टेहळणी बुरूज नियतकालिकाचा अभ्यास घेतला जात असेल. पण सध्या तुमचे कुटुंब ज्या समस्यांना तोंड देत आहे त्या समस्या देखील विचारात घ्या. आई बाहेर नोकरी करत नसल्यास, मुले शाळेतून घरी आल्यानंतर ती दररोज त्यांच्यासोबत वेळ घालवू शकते. काही समस्या त्यावेळी सोडवल्या जाऊ शकतात; पण काही समस्यांवर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता भासेल. कुटुंबाच्या अगदी निकडीच्या गरजा असतील तेव्हा त्यांकडे दुर्लक्ष करू नका. (नीतिसूत्रे २७:१२) यांमध्ये केवळ शाळेतील नव्हे, तर इतरही समस्या असतील. अशा वेळेस कौटुंबिक अभ्यासाकरता योग्य ते साहित्य निवडा आणि कोणत्या विषयावर चर्चा करण्यात येईल हे कुटुंबातील सदस्यांना आधीच सांगून ठेवा.
१३. गरिबीला तोंड कसे द्यावे याविषयी कौटुंबिक चर्चा केल्याने लाभ का होईल?
१३ उदाहरणार्थ, जगातील पुष्कळशा भागांतील लोक गरिबीच्या विळख्यात सापडले आहेत; त्यामुळे अशा ठिकाणी गरिबीला तोंड कसे द्यावे याची चर्चा करणे आवश्यक असेल. जीवनातील वास्तविक परिस्थितींना आणि बायबलमधील तत्त्वांना धरून असलेला कौटुंबिक अभ्यास तुमच्या कुटुंबाकरता लाभदायक ठरेल का?—नीतिसूत्रे २१:५; उपदेशक ९:११; इब्री लोकांस १३:५, ६, १८.
१४. हिंसा, युद्ध आणि ख्रिस्ती तटस्थता यांविषयी असलेल्या यहोवाच्या दृष्टिकोनाबद्दल कौटुंबिक चर्चा कोणत्या परिस्थितींत समयोचित ठरू शकेल?
१४ कौटुंबिक अभ्यासात चर्चा करण्यासारखा आणखी एक विषय म्हणजे हिंसा. आपल्या सर्वांच्या मनात आणि हृदयात या संदर्भात असलेला यहोवाचा दृष्टिकोन पक्का बसला पाहिजे. (उत्पत्ति ६:१३; स्तोत्र ११:५) या विषयावर चर्चा करताना, आणखी बऱ्याच विषयांचा समावेश करता येईल; उदाहरणार्थ, शाळेत दांडगाई करणाऱ्या मुलांशी कसे वागावे, ज्युडो-कराटे सारखे प्रशिक्षण घ्यावे का, आणि चांगल्या प्रकारचे मनोरंजन कसे निवडावे. आज चहुकडे हिंसाचारी कृत्ये सर्वसामान्य झाली आहेत; मुलकी युद्धे, राजकीय आणि जातीय संघर्ष किंवा टोळी युद्धे यांसारख्या समस्यांनी जवळजवळ प्रत्येक देश त्रस्त आहे. तर मग, अशा युद्धप्रिय गटांचा प्रभाव सभोवार असताना ख्रिस्ती वर्तन राखण्याविषयी कदाचित तुमच्या कुटुंबातही चर्चा करण्याची गरज असेल.—यशया २:२-४; योहान १७:१६.
१५. लैंगिक संबंध आणि विवाह यांविषयीचे मार्गदर्शन मुलांना कशाप्रकारे दिले पाहिजे?
१५ मुले मोठी होतात तेव्हा त्यांच्या वयोमानानुसार त्यांना लैंगिक संबंध आणि विवाह या विषयांवर मार्गदर्शन देण्याची आवश्यकता असते. काही संस्कृतींमध्ये पालक त्यांच्या मुलांसोबत लैंगिक विषयावर कधीच चर्चा करत नाहीत. या विषयांबाबतीत अजाण असलेल्या मुलांवर बाहेरील मुलांच्या विकृत दृष्टिकोनाचा प्रभाव पडून पुढे गंभीर परिणाम संभवू शकतात. त्याऐवजी, बायबलमध्ये या विषयावर सुस्पष्ट पण तरीसुद्धा अभद्र वाटणार नाही अशा पद्धतीने सल्ला देणाऱ्या यहोवाचे आपण या बाबतीत अनुकरण करू नये का? ईश्वरीय सल्ल्यामुळे आपल्या मुलांना आत्मसन्मान टिकून ठेवण्याकरता आणि विरुद्ध लिंगी व्यक्तीला आदराने वागवण्याकरता मदत होईल. (नीतिसूत्रे ५:१८-२०; कलस्सैकर ३:५; १ थेस्सलनीकाकर ४:३-८) तुम्ही या विषयावर यापूर्वी चर्चा केली असली, तरी पुन्हा चर्चा करण्याकरता मनात संकोच बाळगू नका. बदलत्या परिस्थितीनुसार हा विषय पुन्हा विचारात घेणे आवश्यकच आहे.
१६. (अ) वेगवेगळ्या घरांमध्ये कौटुंबिक अभ्यास केव्हा घेतला जातो? (ब) कौटुंबिक अभ्यास नियमित घेण्याकरता आलेल्या अडथळ्यांना तुम्ही कसे तोंड दिले आहे?
१६ कौटुंबिक अभ्यास केव्हा घेतला जाऊ शकतो? संपूर्ण जगातील बेथेल कुटुंबांप्रमाणे अनेक घरांमध्ये कौटुंबिक अभ्यास सोमवारी संध्याकाळी घेतला जातो. इतर काही घरांमध्ये दुसऱ्या एखाद्या दिवशी हा अभ्यास होतो. अर्जेन्टिनामध्ये ११ जणांच्या एका कुटुंबात ९ मुले असून त्यांच्या कौटुंबिक अभ्यासाकरता हे सर्वजण दररोज सकाळी पाच वाजता नियमितपणे उठायचे. कारण प्रत्येकाच्या कामाची, शाळेची वेळ वेगळी असल्यामुळे दुसरी कोणतीच वेळ त्यांना सोईस्कर नव्हती. असे करणे सोपे नसले तरी, यामुळे कौटुंबिक अभ्यासाचे महत्त्व त्या मुलांच्या मनावर बिंबवले गेले. फिलिपाईन्समधील मंडळीचे एक वडील आपल्या पत्नीसोबत आणि वाढत्या वयाच्या त्यांच्या तीन मुलांसोबत नियमितपणे बायबल अभ्यास घेत. प्रत्येक आठवड्यादरम्यान या कुटुंबातील आई-वडील त्यांच्या प्रत्येक मुलासोबत व्यक्तिगत अभ्यास घ्यायचे जेणेकरून प्रत्येक मुलाने सत्य आपलेसे करावे. अमेरिकेतील एका बहिणीचा पती सत्यात नाही. ही बहीण तिच्या मुलांना दररोज सकाळी शाळेच्या बसपर्यंत सोडवायला जाते. बसची वाट पाहत असताना, ही बहीण आणि तिची मुले दहा मिनिटे उचित शास्त्रवचनीय साहित्य वाचतात तसेच त्यावर चर्चा करतात आणि त्यानंतर ही मुले शाळेच्या बसमध्ये चढण्यापूर्वी त्यांची आई छोटीशी प्रार्थना करते. काँगो लोकशाही प्रजासत्ताक येथील एका स्त्रीच्या सत्यात नसलेल्या पतीने कुटुंबाला सोडून दिले आहे आणि तिचे फारसे शिक्षण न झाल्यामुळे तिला कौटुंबिक अभ्यास घेण्याकरता फार प्रयत्न करावा लागतो. पण तिचा मोठा मुलगा तिला मदत करतो; प्रत्येक आठवडी तो घरी येऊन तिच्यासोबत आणि आपल्या धाकट्या भावंडांसोबत कौटुंबिक अभ्यास घेतो. आणि त्यांची आई अभ्यासाची चांगली तयारी करण्याद्वारे मुलांसमोर उत्तम उदाहरण मांडते. नियमित कौटुंबिक अभ्यासाला अडथळा आणणारी अशी एखादी परिस्थिती तुमच्या कुटुंबातही आहे का? असल्यास हार मानू नका. नियमित बायबल अभ्यास घेण्याचे तुमचे प्रयत्न यहोवाने आशीर्वादित करावेत म्हणून त्याकडे प्रांजळपणे प्रार्थना करा.—मार्क ११:२३, २४.
चिकाटीची प्रतिफळे
१७. (अ) कौटुंबिक अभ्यास नियमितपणे घेण्याकरता काय आवश्यक आहे? (ब) कुटुंबामध्ये नियमितपणे यहोवाच्या मार्गांचे महत्त्व कोणत्या अनुभवावरून स्पष्ट होते?
१७ पूर्वयोजनेची आवश्यकता आहे. चिकाटीची जरूरी आहे. पण नियमित कौटुंबिक अभ्यासामुळे मिळणारी प्रतिफळे फारच मोलाची आहेत. (नीतिसूत्रे २२:६; ३ योहान ४) जर्मनीमधील फ्रँझ आणि हिल्डा यांनी त्यांच्या ११ मुलांना वाढवले. त्यांची मुलगी मॅगदेलिना हिने काही वर्षांनंतर असे लिहिले: “आज मला एका गोष्टीचे महत्त्व पटते, ती म्हणजे आमच्या घरी एकही दिवस असा गेला नाही, की ज्या दिवशी आम्हाला काही आध्यात्मिक मार्गदर्शन मिळाले नाही.” ॲडॉल्फ हिटलरच्या राज्यात राष्ट्रीयवादाला खूप जोर चढला तेव्हा मॅगदेलिनाच्या वडिलांनी येणाऱ्या संभाव्य परीक्षांना तोंड देण्याकरता कुटुंबाला तयार करण्यासाठी बायबलचा उपयोग केला. कालांतराने घरातील लहान मुलांना पकडून त्यांना सुधारगृहात घालण्यात आले; कुटुंबातील बाकीच्या लोकांना अटक करून त्यांना तुरुंगात आणि छळ छावण्यामध्ये डांबण्यात आले. काहींना जिवानिशी देखील मारण्यात आले. पण त्या सर्वांचा विश्वास अढळ राहिला—केवळ त्या कठीण परीक्षांमध्येच नव्हे, तर त्यानंतरच्या बाकीच्या वर्षांतही.
१८. एक पालक असलेल्यांनी केलेल्या प्रयत्नांना कशाप्रकारे प्रतिफळ मिळाले आहे?
१८ एक पालक असलेल्या तसेच ज्यांचे विवाहसोबती सत्यात नाहीत अशा कित्येक पालकांनी त्यांच्या मुलांना बायबलचे नियमितपणे मार्गदर्शन पुरवले आहे. भारतातील एका विधवा स्त्रीला तिच्या मुलांच्या मनावर यहोवाविषयीचे प्रेम बिंबवण्याकरता फार कष्ट घ्यावे लागले. तिच्या मुलाने यहोवाच्या लोकांसोबतचा सहवास राखण्याचे सोडले तेव्हा तिला खूप वाईट वाटले होते. मुलाला मोठे करण्यात आपल्याकडून काही चूक झाल्यास यहोवाने आपल्याला क्षमा करावी, अशी तिने विनवणी केली. पण या मुलाला मिळालेले प्रशिक्षण तो विसरला नव्हता. सुमारे दहा वर्षांनी तो सत्यात परतला, त्याने चांगली प्रगती केली आणि मंडळीत वडील झाला. आता तो आणि त्याची पत्नी पूर्ण वेळेचे पायनियर म्हणून सेवा करत आहेत. आपल्या कुटुंबात नियमित बायबल मार्गदर्शन देण्याविषयी यहोवाकडून आणि त्याच्या संघटनेकडून मिळणारा सल्ला मनापासून पाळणाऱ्या पालकांना किती उत्तम प्रतिफळ लाभले आहे! तुम्हीही हा सल्ला आपल्या कुटुंबात लागू करत आहात का?
तुम्हाला सांगता येईल का?
◻ नियमित कौटुंबिक अभ्यास महत्त्वाचा का आहे?
◻ प्रत्येक कौटुंबिक अभ्यासावेळी आपले कोणते उद्देश असले पाहिजेत?
◻ शिकवण्याकरता आपल्याला कोणती साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत?
◻ कुटुंबाच्या गरजांनुरूप अभ्यास कसा घेतला जाऊ शकतो?
[१५ पानांवरील चित्र]
निश्चित उद्देश तुमच्या कौटुंबिक अभ्यासाची गुणवत्ता वाढवील