कुटुंबांनो, देवाच्या मंडळीचा भाग या नात्याने यहोवाची सेवा करा
“जनसभात मी परमेश्वराचा धन्यवाद करीन.”—स्तोत्र २६:१२.
१. आपापल्या घरांत अभ्यास आणि प्रार्थना करण्यासोबतच खऱ्या उपासनेत आणखी कोणता भाग महत्त्वाचा आहे?
यहोवाच्या उपासनेत, आपापल्या घरांत प्रार्थना करणे आणि बायबलचा अभ्यास करणेच नव्हे, तर देवाच्या मंडळीचा भाग या नात्याने कार्य करणे देखील गोवलेले आहे. देवाच्या नियमानुसार चालावे म्हणून यहोवाचे नियम जाणून घेण्याकरता प्राचीन इस्राएल लोकांना अशी आज्ञा देण्यात आली होती की, “त्यांनी सर्व लोकांना म्हणजे पुरुष, स्त्रिया, बालके” यांना जमा करावे. (अनुवाद ३१:१२; यहोशवा ८:३५) यहोवाच्या नावाची स्तुती करण्याकरता वृद्ध तसेच ‘कुमार आणि कुमारी’ असलेल्यांना उत्तेजन देण्यात आले होते. (स्तोत्र १४८:१२, १३) अशाचप्रकारची व्यवस्था ख्रिस्ती मंडळीमध्ये देखील आहे. जगभरातील राज्य सभागृहांत जेव्हा प्रश्नोत्तरांचे भाग हाताळले जातात तेव्हा पुरुष, स्त्रिया आणि मुले मोठ्या आनंदाने सहभाग घेतात.—इब्री लोकांस १०:२३-२५.
२. (अ) सभांचा लहान मुलांनी फायदा घेण्याकरता त्यांची मदत करण्यासाठी तयारी हा महत्त्वाचा मुद्दा का आहे? (ब) कोणाचे उदाहरण महत्त्वाचे आहे?
२ मंडळीच्या उभारणीकारक नित्यक्रमामध्ये लहान मुलांना सहभागी होण्याकरता त्यांची मदत करणे अर्थातच इतके सोपे नाही. आपल्या पालकांसोबत सभांना जाणाऱ्या मुलांना सभा आवडत नसल्यास, कोणती समस्या असू शकेल? अर्थात, बहुतेक मुलांना जास्त वेळ लक्ष एकाग्र करता येत नाही आणि त्यामुळे त्यांना लगेच कंटाळा येतो. तयारी केल्याने ही समस्या सुटण्यास मदत होऊ शकते. तयारी न केल्यामुळे मुले सभांमधील गोष्टी पूर्णपणे समजू शकणार नाहीत. (नीतिसूत्रे १५:२३) तयारीविना त्यांना समाधानकारक आध्यात्मिक प्रगती करणे कठीण होईल. (१ तीमथ्य ४:१२, १५) मग काय केले जाऊ शकते? पहिली गोष्ट म्हणजे, पालकांनी आत्मपरीक्षण करावे, की आपण स्वतः सभांची तयारी करतो किंवा नाही. पालकांच्या उदाहरणाचा फार प्रभाव पडतो. (लूक ६:४०) कौटुंबिक अभ्यासाची काळजीपूर्वक योजना हा देखील महत्त्वाचा घटक असू शकतो.
हृदयाची उभारणी करणे
३. कौटुंबिक अभ्यासादरम्यान हृदयाची उभारणी करण्याकरता खास प्रयत्न करण्याची गरज का आहे आणि त्याकरता कशाची आवश्यकता आहे?
३ कौटुंबिक अभ्यासाच्या वेळी केवळ डोक्यात ज्ञान भरण्याचेच नव्हे, तर हृदयाला उभारणी देण्याचे काम देखील केले पाहिजे. असे करण्याकरता कौटुंबिक सदस्यांच्या समस्यांची जाणीव ठेवणे आणि प्रत्येकाविषयी कळकळ बाळगणे या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. यहोवा ‘हृदयाची पारख’ करतो.—१ इतिहास २९:१७.
४. (अ) “बुद्धिहीन” असणे म्हणजे काय? (ब) “हृदय संपादन” करण्यात काय गोवलेले आहे?
४ यहोवा आपल्या मुलांच्या हृदयांचे परीक्षण करतो तेव्हा त्याला काय दिसून येते? या मुलांपैकी अनेक जण म्हणतात, की ते यहोवावर प्रेम करतात आणि हे प्रशंसनीय आहे. पण, लहान असलेल्या किंवा यहोवाविषयी अलीकडेच शिकत असलेल्या व्यक्तीला यहोवाच्या मार्गांविषयी मर्यादित अनुभव असतो. अशा व्यक्तीला इतका अनुभव नसल्यामुळे बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे ती व्यक्ती “बुद्धिहीन” असते. कदाचित तिचे सर्वच हेतू वाईट नसतील, पण देवाला आनंदी करण्याच्या स्थितीत एखाद्याचे हृदय आणण्याकरता वेळ लागतो. कारण त्याकरता व्यक्तीचे विचार, तिच्या इच्छा, तिच्या आवडीनिवडी, तिच्या भावना, आणि जीवनातील तिचे उद्देश या सर्व गोष्टी अपरिपूर्ण मानवांना शक्य होतील तितक्या देवाच्या विचारांच्या एकवाक्यतेत याव्या लागतात. जेव्हा एखादा मनुष्य अशा प्रकारे त्याच्या आंतरिक व्यक्तीला देवाच्या मार्गानुसार घडवतो, तेव्हा तो “हृदय संपादन” करत असतो.—नीतिसूत्रे ९:४; १९:८, NW.
५, ६. आपल्या मुलांनी “हृदय संपादन” करावे म्हणून पालक त्यांना कशाप्रकारे मदत करू शकतात?
५ पालक त्यांच्या मुलांना “हृदय संपादन” करण्याकरता मदत करू शकतात का? कोणताही मनुष्य दुसऱ्यामध्ये एक चांगले हृदय घालू शकत नाही, हे खरे आहे. आपल्या सर्वांना स्वतंत्र इच्छेची देणगी मिळाली आहे आणि आपण कोणत्या गोष्टीवर विचार करतो यावर पुष्कळ काही अवलंबून आहे. पण पालक समंजसपणे त्यांच्या मुलाच्या मनात काय आहे आणि कोठे मदतीची आवश्यकता आहे हे जाणून घेण्याकरता मुलास बोलके करू शकतात. त्याला असे प्रश्न विचारा, ‘याविषयी तुला काय वाटतं?’ आणि ‘तुला खरोखर काय करावसं वाटेल?’ त्यानंतर शांतपणे त्यांचे ऐकून घ्या. अवाजवीपणे वागू नका. (नीतिसूत्रे २०:५) हृदयाचा ठाव घेण्याकरता सलोख्याचे, समंजसपणाचे आणि प्रेमाचे वातावरण महत्त्वाचे आहे.
६ हितकारक प्रवृत्ती वाढवण्याकरता आत्म्याच्या फळांची—त्याच्या प्रत्येक पैलूची वारंवार चर्चा करा आणि ती फळे विकसित करण्याकरता सबंध कुटुंब मिळून कार्य करा. (गलतीकर ५:२२, २३) यहोवावरील आणि येशू ख्रिस्तावरील आपले प्रेम वाढवा, आपण त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे असे केवळ म्हणू नका, तर आपण त्यांच्यावर प्रेम का केले पाहिजे आणि आपण ते प्रेम कसे दाखवू शकतो याची चर्चा करा. (२ करिंथकर ५:१४, १५) योग्य तेच केल्यामुळे मिळणाऱ्या लाभांची चर्चा करून असे करण्याची इच्छा मजबूत करा. वाईट विचार, भाषा आणि वर्तणूक यांमुळे परिणीत होणाऱ्या वाईट परिणामांची चर्चा करण्याद्वारे त्या गोष्टी सोडण्याची इच्छा प्रबळ करा. (आमोस ५:१५; ३ योहान ११) विचार, भाषा आणि वर्तणूक—मग या गोष्टी चांगल्या असोत अथवा वाईट असतो—त्यांचा यहोवासोबतच्या नातेसंबंधावर कसा परिणाम होऊ शकतो हे दाखवा.
७. समस्यांना तोंड देण्याकरता आणि यहोवापासून दुरावले जाणार नाहीत असे निर्णय घेण्याकरता मुलांची मदत करण्यासाठी काय करता येण्यासारखे आहे?
७ मुलाला एखादी समस्या असल्यास किंवा त्याला एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असल्यास आपण त्याला असे विचारू शकतो: ‘याविषयी यहोवाचा दृष्टिकोन काय आहे असं तुला वाटतं? यहोवाविषयी माहिती असलेल्या कोणत्या गोष्टीमुळे तू असं म्हणतोस? याविषयी तू प्रार्थना केली आहेस का?’ शक्य तितक्या लवकर तुमच्या मुलाला अशाप्रकारचे जीवन जगण्याकरता मदत करा, की ज्या जीवनामध्ये नेहमीच देवाची इच्छा ओळखण्याचा आणि त्याप्रमाणे चालण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो. ही मुले जसजशी यहोवासोबतच्या निकट नातेसंबंधात येतात तसतसे त्याच्या मार्गानुसार चालण्यात त्यांना आनंद मिळत जाईल. (स्तोत्र ११९:३४, ३५) त्यामुळे, खऱ्या देवाच्या मंडळीसोबत सहवास राखण्याच्या विशेषाधिकाराविषयी त्यांची कदर वाढेल.
मंडळीच्या सभांची तयारी
८. (अ) लक्ष देण्याची गरज आहे अशा सर्व गोष्टी कौटुंबिक अभ्यासात विचारात घेण्याकरता आपल्याला कशामुळे मदत होईल? (ब) हा अभ्यास किती महत्त्वाचा आहे?
८ अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांवर कौटुंबिक अभ्यासाच्या वेळी विचार करण्याची आवश्यकता असते. या सर्व गोष्टी तुम्ही कशा विचारात घेऊ शकता? एकाच वेळी या सर्व गोष्टींवर विचार करणे अशक्य आहे. पण महत्त्वपूर्ण विषयांची सूची तयार केल्यामुळे तुम्हाला मदत होईल. (नीतिसूत्रे २१:५) वेळोवेळी या विषयांची उजळणी करा आणि कोणत्या खास गोष्टीवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे ते पाहा. कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याच्या प्रगतीमध्ये मनःपूर्वक आस्था घ्या. कौटुंबिक अभ्यासाची ही व्यवस्था ख्रिस्ती शिक्षणाचा महत्त्वाचा भाग आहे, ज्यामुळे आपण सध्याच्या जीवनाकरता सिद्ध होतो आणि येणाऱ्या सार्वकालिक जीवनाकरता तयार होत असतो.—१ तीमथ्य ४:८.
९. कौटुंबिक अभ्यासाच्या दरम्यान, सभेची तयारी करण्याच्या संदर्भात कोणती उद्दिष्टे लक्षात ठेवून आपण काम करू शकतो?
९ तुम्ही कौटुंबिक अभ्यासामध्ये मंडळीच्या सभांची तयारी करता का? एकत्र मिळून अभ्यास करताना तुम्हाला विशिष्ट उद्दिष्टे साध्य करण्याकरता प्रगतिशील प्रयत्न करता येतील. यांपैकी काहींना कदाचित बरेच आठवडे, महिने किंवा वर्षे सुद्धा लागतील. या उद्दिष्टांचा विचार करा: (१) कुटुंबातील प्रत्येकाला मंडळीच्या सभांमध्ये उत्तरे देण्यास तयार करणे; (२) प्रत्येकाने स्वतःच्या शब्दांत उत्तरे देण्याचा प्रयत्न करणे; (३) उत्तरांमध्ये शास्त्रवचनांचा उपयोग करणे; आणि (४) वैयक्तिकपणे लागू करण्याच्या दृष्टिकोनातून साहित्याचे परीक्षण करणे. या सर्व गोष्टींमुळे एखाद्या व्यक्तीला सत्य आपलेसे करण्यात मदत होऊ शकते.—स्तोत्र २५:४, ५.
१०. (अ) आपल्या मंडळीच्या प्रत्येक सभेकडे आपण कशाप्रकारे लक्ष देऊ शकतो? (ब) असे करणे महत्त्वाचे का आहे?
१० प्रत्येक आठवडी होणाऱ्या टेहळणी बुरूज नियतकालिकावर तुमचा कौटुंबिक अभ्यास होत असला, तरी मंडळीचा पुस्तक अभ्यास, ईश्वरशासित सेवा प्रशाला आणि सेवा सभा यांची वैयक्तिक किंवा कुटुंब मिळून तयारी करण्याच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करू नका. यहोवाच्या मार्गानुसार चालण्याकरता असलेल्या कार्यक्रमात या सभा देखील महत्त्वाच्या आहेत. संपूर्ण कुटुंब मिळून या सर्व सभांची नियमितपणे तयारी करणे तुम्हाला कदाचित शक्य होईल. एकत्र मिळून अभ्यास केल्याने, अभ्यास करण्याच्या तुमच्या कौशल्यात सुधारणा होईल. त्यामुळे सभांचा चांगल्याप्रकारे फायदा होईल. याशिवाय, या सभांची नियमितपणे तयारी केल्याने मिळणाऱ्या लाभाविषयी आणि त्यासाठी निश्चित वेळ राखून ठेवण्याच्या महत्त्वाविषयी चर्चा करा.—इफिसकर ५:१५-१७.
११, १२. मंडळीतील गायनाच्या तयारीचा आपल्याला कसा लाभ होईल आणि ही तयारी कशी केली जाऊ शकते?
११ “ईश्वरी जीवनाचा मार्ग” या अधिवेशनांत आपल्याला सभांमध्ये होणाऱ्या आणखी एका गोष्टीविषयी—गायनाविषयी—तयारी करण्याचे उत्तेजन देण्यात आले होते. हा सल्ला तुम्ही उपयोगात आणला आहे का? असे करण्याद्वारे बायबलमधील सत्य आपल्या मनावर आणि हृदयावर कोरण्यास मदत होते आणि त्याचवेळी मंडळीच्या सभांमध्ये आपल्याला जास्त आनंद मिळू शकतो.
१२ तयारी करताना, मंडळीच्या सभांकरता असलेल्या गीतांचे बोल वाचल्यामुळे आणि त्यांच्या अर्थाची चर्चा केल्यामुळे मनापासून गाण्याकरता मदत होऊ शकते. प्राचीन इस्राएलमध्ये, देवाच्या उपासनेत वाद्यांचा हमखास उपयोग केला जात असे. (१ इतिहास २५:१; स्तोत्र २८:७) तुमच्या कुटुंबात कोणाला एखादे वाद्य वाजवता येते का? तर मग, प्रत्येक आठवड्याला एखाद्या गीताचा सराव त्या वाद्यावर करून ते गीत संपूर्ण कुटुंबाने का गाऊ नये? ध्वनिमुद्रित केलेल्या गीतांचा देखील उपयोग करता येण्यासारखा आहे. काही प्रदेशांत आपले बांधव संगीताची साथ नसतानाही सुंदर गातात. रस्त्यांवरून जाताना किंवा शेतकाम करत असताना हे बांधव आठवड्याकरता असणारी गीते आनंदाने गात असतात.—इफिसकर ५:१९.
क्षेत्र सेवेकरता कौटुंबिक तयारी
१३, १४. क्षेत्र सेवेकरता आपल्या मनाची तयारी करण्याकरता कौटुंबिक चर्चा का महत्त्वाच्या आहेत?
१३ यहोवाविषयी आणि त्याच्या उद्देशाविषयी इतरांना साक्ष देणे हा आपल्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. (यशया ४३:१०-१२; मत्तय २४:१४) आपण लहान असू अथवा मोठे असू आपणा सर्वांना या कार्यात आनंद मिळतो आणि तयारी केल्यास या कार्यात आपल्याला आणखी फलप्राप्ती होऊ शकते. आपल्याला कुटुंबात ही तयारी कशी करता येईल?
१४ आपल्या उपासनेच्या सर्व बाबतींत जशी मनापासून तयारी करणे महत्त्वाचे आहे तसेच याबाबतीतही. आपण काय करणार आहोत या गोष्टीचीच चर्चा करू नये, तर आपण असे का करणार आहोत या गोष्टीची देखील चर्चा केली पाहिजे. यहोशाफाट राजाच्या दिवसांत लोकांना ईश्वरी नियमांविषयी मार्गदर्शन देण्यात आले, पण बायबल आपल्याला असे सांगते, की त्या लोकांनी या मार्गदर्शनाकडे ‘आपले चित्त लावले नव्हते.’ यामुळे ते लोभाला सहजपणे बळी पडून खऱ्या उपासनेपासून दूर जाण्याची शक्यता होती. (२ इतिहास २०:३३; २१:११) क्षेत्र सेवेत घालवलेल्या तासांचा अहवाल देणे किंवा साहित्याचे वाटप करणे हेच आपले उद्दिष्ट असू नये. तर यहोवावर असलेले आपले प्रेम प्रकट करण्यासाठी आणि जीवनाचा मार्ग निवडून घेण्याची ज्यांना अद्याप संधी मिळालेली नाही अशा लोकांप्रती आपले प्रेम प्रकट करण्यासाठी आपण सेवाकार्य केले पाहिजे. (इब्री लोकांस १३:१५) या कार्यामध्ये आपण “देवाचे सहकारी” आहोत. (१ करिंथकर ३:९) किती महान हा विशेषाधिकार! आपण सेवाकार्यात जातो तेव्हा पवित्र देवदूतांच्या सोबतीने कार्य करत असतो. (प्रकटीकरण १४:६, ७) या गोष्टींची कदर वाढवण्याची सर्वोत्तम संधी कौटुंबिक चर्चांमध्येच असते; एकतर साप्ताहिक अभ्यासाच्या वेळी किंवा शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे यातील वचनाची चर्चा करताना.
१५. कुटुंब मिळून आपण क्षेत्र सेवेची तयारी केव्हा करू शकतो?
१५ साप्ताहिक सेवेची तयारी करण्याकरता तुमच्या घरातील सदस्यांना मदत करण्यास तुम्ही अधूनमधून कौटुंबिक अभ्यासातील काही वेळेचा उपयोग करता का? असे करणे फार लाभदायक आहे. (२ तीमथ्य २:१५) असे केल्यामुळे घरातील सर्वांचे सेवाकार्य अर्थपूर्ण आणि फलदायक ठरेल. काही प्रसंगी, तुम्ही संपूर्ण कौटुंबिक अभ्यासात अशा प्रकारची तयारी करू शकता. बहुतेक वेळा, तुम्ही तुमच्या कौटुंबिक अभ्यासाच्या अखेरीस किंवा आठवड्या दरम्यान केव्हाही थोडा वेळ क्षेत्र सेवेच्या संदर्भात चर्चा करू शकता.
१६. या परिच्छेदामध्ये दिलेल्या प्रत्येक मुद्दा का महत्त्वाचा आहे यावर चर्चा करा.
१६ क्षेत्र सेवेच्या संदर्भात चर्चा करताना, खालील काही गोष्टींचा समावेश करता येईल: (१) सादरतेची चांगल्या प्रकारे तयारी करा; संधी मिळाल्यास बायबलमधील एखादे शास्त्रवचन वाचून दाखवण्याचा देखील सराव करा. (२) शक्य असल्यास, घरातील प्रत्येकाकडे स्वतःची क्षेत्र सेवेची बॅग, बायबल, वही, पेन किंवा पेन्सिल, पत्रिका, इतर साहित्य आणि तेही चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करा. क्षेत्र सेवेची बॅग महागडीच असली पाहिजे असे नाही, एवढेच की ती चांगल्या स्थितीत असावी. (३) अनौपचारिक साक्ष कोठे आणि कशी द्यावी याची चर्चा करा. या सूचना दिल्यानंतर प्रत्येक वेळी एकत्र मिळून क्षेत्र सेवेत जाऊन या सूचनांचा सराव करा. मदत होईल अशा सूचना द्या, पण अनेक मुद्द्यांवर उपदेश करत बसू नका.
१७, १८. (अ) कुटुंब या नात्याने कोणत्या प्रकारची तयारी केल्याने आपली क्षेत्र सेवा अधिक फलदायक होऊ शकते? (ब) या तयारीच्या कोणत्या मुद्द्यावर प्रत्येक आठवड्यात चर्चा केली जाऊ शकते?
१७ येशू ख्रिस्ताने त्याच्या अनुयायांना दिलेले महत्त्वाचे काम म्हणजे शिष्य बनविणे. (मत्तय २८:१९, २०) शिष्य बनविण्यामध्ये केवळ प्रचार करण्यापेक्षा अधिक काही गोवलेले आहे. त्याकरता शिकवण्याची आवश्यकता आहे. या क्षेत्रात प्रभावी होण्याकरता तुमच्या कौटुंबिक अभ्यासामुळे कशी मदत होईल?
१८ कुटुंब मिळून या गोष्टीची चर्चा करा, की कोणत्या लोकांची पुनर्भेट घेतल्याने चांगले परिणाम मिळतील. या लोकांपैकी काहींनी साहित्य घेतले असेल; काहींनी केवळ ऐकले असेल. घरोघरच्या कार्यात त्यांची भेट झाली असेल किंवा बाजारात वा शाळेत त्यांना अनौपचारिक साक्ष देण्यात आली असेल. देवाच्या वचनातील मार्गदर्शनानुसार कार्य करा. (स्तोत्र २५:९; यहेज्केल ९:४) कुटुंबातील प्रत्येकाला त्या आठवड्यात कोणाला भेट द्यायची आहे ते ठरवा. तुम्ही कोणत्या विषयावर बोलणार? कौटुंबिक चर्चेमुळे प्रत्येक सदस्याला तयारी करण्याकरता मदत होऊ शकते. आस्था दाखवलेल्या लोकांना विशिष्ट शास्त्रवचने दाखवण्याकरता तसेच देव आपल्याकडून काय अपेक्षितो? किंवा सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकातून योग्य ते मुद्दे दाखवण्याकरता त्यांची नोंद करून घ्या. पुनर्भेटीच्या एकाच भेटीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करू नका. पुनर्भेटीच्या अखेरीस घरमालकाला एखादा प्रश्न विचारा आणि दुसऱ्यांदा भेट देताना त्या प्रश्नाचे उत्तर द्या. घरातील प्रत्येक जण कोणती पुनर्भेट करणार, केव्हा करणार आणि काय साध्य करणार याची चर्चा साप्ताहिक कौटुंबिक अभ्यासात नियमाने का करू नये? असे केल्यामुळे संपूर्ण कुटुंबाची क्षेत्र सेवा अधिक फलदायी होऊ शकते.
त्यांना यहोवाचा मार्ग शिकवत राहा
१९. कुटुंबातील सदस्यांना यहोवाच्या मार्गानुसार सतत चालत राहायचे असल्यास, त्यांनी कशाचा अनुभव घेतला पाहिजे आणि याकरता कोणती गोष्ट हातभार लावते?
१९ या दुष्ट जगात कुटुंबाचा प्रमुख असणे आव्हान आहे. सैतान आणि त्याचे दूत यहोवाच्या सेवकांच्या आध्यात्मिकतेवर घाला घालण्याच्या प्रयत्नात आहेत. (१ पेत्र ५:८) याशिवाय, आज तुम्हा पालकांवर, विशेषतः तुम्हा एक-पालकांवर खूप दबाव आहेत. तुम्हाला कराव्याशा वाटणाऱ्या सर्व गोष्टी करण्यासाठी वेळ मिळणे कठीण आहे. तुम्ही एका वेळी एक सूचना लागू केली तरी त्या प्रयत्नांचे सार्थक होईल आणि हळूहळू तुमच्या कौटुंबिक अभ्यासाच्या कार्यक्रमात सुधारणा होईल. तुमच्या जवळचे लोक यहोवाच्या मार्गात एकनिष्ठेने वाटचाल करत असल्याचे पाहणे आनंदाचे आहे. यहोवाच्या मार्गात यशस्वीरीत्या चालण्यासाठी कौटुंबिक सदस्यांना मंडळीच्या सभांमध्ये उपस्थित राहण्यात आणि क्षेत्र सेवेत भाग घेण्यात आनंद प्राप्त करण्याची गरज आहे. त्याकरता तयारीची आवश्यकता आहे—अशी तयारी जी आपल्या मनाला उभारी देते आणि प्रत्येकाला अर्थपूर्ण भाग घेण्यास सिद्ध करते.
२०. तिसरे योहान ४ येथे वर्णन करण्यात आलेल्या आनंदाचा अनुभव घेण्याकरता अनेक पालकांना कोणत्या गोष्टीने मदत होऊ शकते?
२० प्रेषित योहानाने ज्यांना आध्यात्मिकरीत्या मदत केली होती त्यांच्याविषयी त्याने असे लिहिले: “माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसऱ्या कशानेहि होत नाही.” (३ योहान ४) स्पष्ट हेतू मनी बाळगून संचालित करण्यात येणारे कौटुंबिक अभ्यास आणि कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याच्या गरजांनुरूप प्रेमाने मदत करणारे कुटुंब प्रमुख, संपूर्ण कुटुंबाला असा आनंद मिळण्यास हातभार लावतात. आपल्या मुलांना ईश्वरी जीवनाच्या मार्गाविषयी कदर बाळगण्यास शिकवणारे पालक त्यांना जीवनाच्या सर्वोत्तम मार्गाचा आनंद घेण्याकरता मदत करतात.—स्तोत्र १९:७-११.
तुम्हाला सांगता येईल का?
◻ आपल्या मुलांनी सभांची तयारी करणे इतके महत्त्वाचे का आहे?
◻ “हृदय संपादन” करण्याकरता पालक त्यांच्या मुलांना कशी मदत करू शकतात?
◻ सर्व सभांची तयारी करण्याकरता कौटुंबिक अभ्यासामुळे कशी मदत होऊ शकते?
◻ कुटुंब मिळून क्षेत्र सेवेची तयारी केल्याने अधिक प्रभावी होण्यास आपल्याला कशी मदत होऊ शकते?
[२० पानांवरील चित्र]
कौटुंबिक अभ्यासात मंडळीच्या सभांची तयारी केली जाऊ शकते
[२१ पानांवरील चित्र]
सभांमध्ये गाण्याकरता तयारी करणे लाभदायक आहे