कुटुंबाची काळजी घेण्याची जबाबदारी उचलणे
“बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.” (इफिसकर ६:४) या ईश्वरप्रेरित शब्दांद्वारे, प्रेषित पौलाने स्पष्टपणे कुटुंबाची काळजी योग्य व्यक्तीवरच—पित्यावर सोपवली.
बहुतेक कुटुंबात आपल्या मुलांचे संगोपन करणारा पिता हा एकटाच नसतो. त्याची पत्नी, अर्थात मुलांची आई आपल्या पतीबरोबर राजीखुषीने जिम्मा उचलते. म्हणूनच, राजा शलमोन म्हणाला: “माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको.”—नीतिसूत्रे १:८.
भौतिक आणि आध्यात्मिक काळजी
आपल्या मुलांवर प्रेम करणारे पालक मुद्दामहून त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाहीत. आणि ख्रिश्चनांनी असे केले तर त्यांचे हे कृत्य त्यांनी आपला विश्वास धिक्कारण्याच्या बरोबरीचे ठरेल; हे आपल्याला पौलाने तीमथ्याला जे म्हटले त्यावरून म्हणता येते; तो त्याला म्हणाला: “जर कोणी स्वकीयांची व विशेषेकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे; तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट आहे.” (१ तीमथ्य ५:८) मुलांना “प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात” वाढवण्यासाठी केवळ भौतिक मार्गानेच त्यांचे संगोपन करणे इतकेच पुरेसे नाही याची ख्रिश्चनांना जाण आहे.
इस्राएल राष्ट्राने वाग्दत्त देशात पदार्पण करण्याच्या काही काळ आधी, सर्व राष्ट्राने मवाबाच्या पठारावर तळ ठोकला असताना मोशेने त्यांना दिलेल्या उपदेशाचा विचार करा. तेथे त्याने देवाच्या नियमांचा पुनरुच्चार केला आणि त्यांना अशी सूचना दिली: “तुम्ही माझी ही वचने आपल्या ध्यानीमनी साठवून ठेवा.” (अनुवाद ११:१८) पूर्वी त्याने त्यांना, यहोवावर पूर्ण मनाने, जीवाने, शक्तीने प्रेम करण्याची आठवण केली होती, व पुढे तो असे म्हणाला होता: “ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव.” (अनुवाद ६:५, ६) देवाच्या नियमशास्त्रातील शब्द इस्राएली पालकांच्या अंतःकरणात जाऊ देणे महत्त्वाचे होते. आध्यात्मिक गुणग्राहकतेने भरलेल्या अंतःकरणांनी इस्राएली पालक मोशेच्या या पुढील शब्दांचे प्रभावशालीरीत्या पालन करू शकले: “[देवाच्या नियमशास्त्रातील शब्द] तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्यांविषयी बोलत जा.”—अनुवाद ६:७; ११:१९; पडताळा मत्तय १२:३४, ३५.
एक गोष्ट पाहा, पित्यांना हे शब्द आपल्या मुलांमध्ये ‘बिंबवायचे’ होते व ते ‘बोलायचे’ होते. मिरीयम-वेबस्टर्स कॉलेजिएट डिक्शनरी “बिंबवणे” याची व्याख्या, “वारंवार पुनरावृत्तीद्वारे किंवा समज देण्याद्वारे शिकवणे व ठसवणे” अशी करते. पालक जेव्हा आपल्या मुलांबरोबर देवाच्या नियमशास्त्राविषयी दररोज—सकाळ, दुपार, संध्याकाळ—बोलत राहिले तेव्हा मुलांना बरेच काही कळले. आपल्या पालकांना देवाच्या नियमशास्त्राविषयी किती प्रेम आहे हे तरुणांनी पाहिले तेव्हा याचा प्रभाव त्यांच्यावर असा झाला, की यहोवाच्या समीप जाण्याची त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण झाली. (अनुवाद ६:२४, २५) आस्थेची गोष्ट म्हणजे, मोशेने खासकरून पित्यांना आपल्या मुलांस “घरी बसलेले असता,” शिकवण्याची सूचना दिली. हे शिक्षण कुटुंबाची काळजी घेण्याचाच एक भाग होते. आणि आज?
“घरी बसलेले असता”
चार मुलांची एक ख्रिस्ती आई, जॅनेट म्हणते, “ते इतकं सोपं नाही.”a तिचा पती, पॉल म्हणतो, “तुमच्यात चिकाटी असली पाहिजे.” इतर अनेक साक्षीदार पालकांप्रमाणेच, पॉल आणि जॅनेट आठवड्यांतून एकदा तरी आपल्या मुलांबरोबर बायबलचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. पॉल कबूल करतो, “आम्ही दर सोमवारी एका ठरलेल्या वेळी आमची कौटुंबिक बायबल चर्चा करण्याचा प्रयत्न करतो, पण असं नेहमीच होत नाही.” मंडळीत तो एक नियुक्त वडील असल्यामुळे त्याला काही वेळा तातडीच्या बाबी हाताळण्यासाठी बोलावण्यात येते. त्याची दोन मोठी मुलं पूर्ण-वेळेचे सेवक या नात्याने कार्य करतात. सेवेमध्ये लोकांशी संपर्क साधण्याकरता संध्याकाळची वेळ फारच उपयुक्त असल्याचे त्यांना दिसून आले आहे. यास्तव, कुटुंब या नात्याने त्यांनी त्यांच्या कौटुंबिक अभ्यासासाठी वेळेत बदल केले. पॉल म्हणतो, “कधीकधी, रात्रीचं जेवण आटोपल्याबरोबर आम्ही अभ्यासाला बसतो.”
पालक सुज्ञपणे आपल्या कौटुंबिक अभ्यासाच्या वेळेमध्ये लवचीकपणा दाखवत असले तरी, नियमितपणा टिकवण्याचा ते प्रयत्न करीत असतात. “आमच्या अभ्यासाच्या वेळेत काही बदल असल्यास डॅडी फ्रिजच्या दारावर नवीन वेळ लावतात, म्हणजे आम्हाला सर्वांना ती माहीत होते,” असे मुलगी क्लार म्हणते.
नियमित कौटुंबिक बायबल अभ्यासाला एकत्र जमल्याने, कुटुंबातील तरुणांना, पालकांना आपल्या चिंता व समस्या सांगण्याची उत्तम संधी मिळते. कुटुंब ज्या पुस्तकाचा उपयोग करीत आहे त्याच्यात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तरुणांनी वाचून दाखवणे असा जर नियम असेल तर त्या अभ्यासातून काहीच फलप्राप्ती होणार नाही. दोन मुलगे असलेला मार्टिन म्हणतो: “आमचा कौटुंबिक अभ्यास एक चर्चापीठ आहे. तुम्ही आठवड्यातून एकदा एखाद्या शास्त्रवचनीय विषयावर चर्चा करायला जमता तेव्हा, तुमच्या कुटुंबाची आध्यात्मिक स्थिती कशी आहे हे तुम्हाला दिसून येते. चर्चेत पुष्कळ काही बाहेर येतं. शाळेत काय चाललयं, एवढेच नव्हे तर, तुमच्या मुलांनी कोणती मनोवृत्ती विकसित केली आहे तेही तुम्हाला कळून येतं.” त्याची पत्नी सांड्रा या गोष्टींशी सहमत आहे व कुटुंबाच्या अभ्यासातून पुष्कळ काही प्राप्त होते असे तिलाही वाटते. ती म्हणते, “माझे पती अभ्यास घेत असतात तेव्हा, माझी मुलं त्यांच्या प्रश्नांची उत्तरं कशी देतात हे ऐकण्याद्वारे मला पुष्कळ काही समजतं.” मग, सांड्रा आपल्या मुलग्यांची मदत करण्याकरता आपली विवेचने त्यानुसार मांडते. तिला हा अभ्यास खूप आवडतो कारण तिचा त्यात सक्रिय भाग असतो. होय, कौटुंबिक अभ्यास, पालकांना, आपल्या मुलांची विचारसरणी समजण्यासाठी वाव देतात.—नीतिसूत्रे १६:२३; २०:५.
जुळवून घेणारे व चिकाटी दाखवणारे व्हा
तुमच्या कौटुंबिक अभ्यासाची वेळ येते तेव्हा, तुमच्या प्रत्ययास एक गोष्ट आली असेल, की एक मूल राजीखुषीने तयार असते तर दुसऱ्या मुलाने एकाग्र होऊन लाभ मिळवावा म्हणून त्याला लाडीगोडीने घ्यावे लागते. एक ख्रिस्ती माता म्हणते: “कौटुंबिक जीवनच असे असते! पालक या नात्याने तुम्ही काय केले पाहिजे हे तुम्हाला माहीत असते. म्हणून, तुम्ही चिकाटीने कौटुंबिक अभ्यास घेता तेव्हा यहोवा तुम्हाला साहाय्य करतो आणि त्याचं फळ देतो.”
मुलामधील लक्ष देण्याच्या कुवतीत त्याच्या वयोमानानुसार बराच फरक असू शकतो. समंजस पालक ह्या गोष्टीचा विचार करतील. एका जोडप्याला पाच मुले आहेत; सर्वात मोठा २० वर्षांचा तर धाकटा ६ वर्षांचा. पिता, मायकल म्हणतो: “धाकट्याला उत्तर देण्याची पहिली संधी द्या. मग, मोठ्या मुलाला सविस्तर बोलू द्या, त्यांनी तयार केलेले मुद्दे सादर करू द्या.” अशाप्रकारे आपल्या मुलांबरोबर समंजसपणे वागल्यामुळे पालक त्यांना एकमेकांचा विचार करण्याचे महत्त्व शिकवू शकतात. मार्टिन म्हणतो: “आमच्या एका मुलाला मुद्दा समजू शकतो पण कदाचित दुसऱ्याला तो समजण्यास आमची मदत लागू शकते. अभ्यास सत्र, ख्रिस्ती सहनशीलता व आत्म्याची इतर फळे प्रदर्शित करण्याकरता तालीमीचे ठिकाण बनते, असे मला दिसून आले आहे.”—गलतीकर ५:२२, २३; फिलिप्पैकर २:४.
आपल्या मुलांच्या भिन्न क्षमता आणि वयोमान यांनुसार जुळवून घेण्यास तयार असा. आता किशोरवयात असलेल्या सायमन आणि मार्क यांना दिसून आले, की ते लहान असताना त्यांना त्यांच्या पालकांबरोबर सर्व काळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकाचा अभ्यास करायला खूप आवडत असे. ते आठवून सांगतात: “आमचे बाबा आम्हाला एखाद्या नाटकाप्रमाणेच विविध भागांचे ॲक्टींग करायला लावायचे.” आपण आपल्या मुलांबरोबर चांगल्या शोमरोन्याच्या दाखल्याचे ॲक्टींग करण्याकरता जमिनीवर हात आणि गुडघे टेकवत असू हे पित्याला अजूनही आठवते. (लूक १०: ३०-३५) “सगळं अगदी खरंखरं वाटायचं, खूप मजा यायची.”
बऱ्याच मुलांना कौटुंबिक अभ्यासाचा नेहमीचा कार्यक्रम आवडत नाही. मग योजना केलेला अभ्यास पालकांनी थांबवावा का? नाही, मुळीच नाही. नीतिसूत्रे २२:१५ कबूल करते की: “बालकाच्या [किंवा बालिकेच्या] हृदयांत मूर्खता जखडलेली असते.” एका एकट्या मातेने कौटुंबिक अभ्यास चालू केल्यावर पुष्कळदा असे झाले की त्यांच्या अभ्यासात व्यत्यय येऊ लागला तेव्हा तिला वाटले, की ती योग्यप्रकारे अभ्यासाचे संचालन करू शकत नाही. पण, तिने चिकाटी सोडली नाही. आता तिच्या मुलांच्या मनात तिच्याबद्दल गाढ आदर आहे व एक नियमित कौटुंबिक अभ्यास चिकाटीने घेण्याद्वारे तिने दाखवलेल्या प्रेमाची आणि काळजीची ते कदर करतात.
‘पितृहीन’ मुलामुलींना मदत करणे
ख्रिस्ती वडिलांनी “देवाच्या कळपाचे पालन” करावयाचे आहे. (१ पेत्र ५:२, ३) मंडळीतील कुटुंबांना वेळोवेळी भेटी दिल्याने, ख्रिस्ती जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या पालकांची त्यांना प्रशंसा करता येते. एकट्या पालकांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी कोणावर आहे? मुलांना शिकवण्याची जबाबदारी पालकांवर आहे हे कदापि विसरता कामा नये.
ख्रिस्ती सुजाणता, वडिलांना ते जर अनुपस्थित पालकाची भूमिका घेण्याची सुरवात करणार असतील तर त्यांच्या ख्रिस्ती तत्त्वांना धोक्यात आणू शकणाऱ्या परिस्थिती टाळण्यास मदत करील. एकटी पालक असलेल्या एखाद्या ख्रिस्ती भगिणीला दोन बांधव भेट देऊ शकत असले तरीही, कौटुंबिक अभ्यासाच्या व्यवस्थेला पाठिंबा देण्याकरता ते जे काही योजतील त्याबाबत त्यांना नेहमी सर्व बाजूंचा विचार करावा लागेल. कधीकधी, मुलांना (आणि निश्चितच एकट्या पालकालाही) कौटुंबिक अभ्यास करण्याचे आमंत्रण उभारणीकारक व व्यावहारिक ठरू शकते. परंतु, यहोवा आपला महान स्वर्गीय पिता आहे हे कधीही विसरू नका. माता आपल्या मुलांबरोबर अभ्यास घेताना एकटी असली तरी यहोवा तिला मार्गदर्शन पुरवायला व साहाय्य करायला नक्कीच हजर असतो.
परंतु मग एखादे मूल आध्यात्मिक गोष्टीत रस घेत आहे पण त्याचे पालक त्यांच्या आध्यात्मिक जबाबदाऱ्या एक तर घेत नसतील किंवा त्यांना त्याचे इतके गांभीर्य नसेल तर काय? यहोवाच्या विश्वासू सेवकांनी केव्हाही खचू नये. स्तोत्रकर्त्याने गायिले: “लाचार तुझ्यावर [यहोवा देवावर] हवाला टाकितो; पोरक्यांचा साहाय्यकर्ता तू आहेस.” (स्तोत्र १०:१४) याबरोबर, मंडळीतील प्रेमळ वडील, आपल्या मुलांची काळजी घेणाऱ्या पालकांना होता होईल तितके उत्तेजन देतील. ते त्यांना कौटुंबिक चर्चा सुचवू शकतील व एकत्र मिळून अभ्यास कसा करता येईल यावर व्यावहारिक सूचना देण्याकरता कौटुंबिक चर्चेला उपस्थितही राहू शकतील. शास्त्रवचनीयरीत्या ज्यांच्यावर ती जबाबदारी पडते त्या पालकांकडून ती जबाबदारी ते निश्चितच काढून घेणार नाहीत.
ज्या मुलांचे पालक सत्य स्वीकारत नाहीत अशांना अधिक साहाय्याची आवश्यकता आहे. त्यांच्या पालकांना मान्य असल्यास तुमच्या कौटुंबिक अभ्यासात त्यांनाही सामील केल्याने त्यांचा फायदा होऊ शकतो. प्रौढ व स्वतःचे कुटुंब असलेल्या रॉबर्टला, तो केवळ तीन वर्षांचा होता तेव्हा आपल्या पालकांबरोबर ख्रिस्ती सभांना उपस्थित राहिल्याच्या गोड आठवणी आहेत. त्याच्या पालकांनी ख्रिस्ती मंडळीशी सहवास राखण्याचे सोडून दिल्यावरही त्याला त्या सभांची आठवण यायची. तो दहा वर्षांचा झाल्यावर एका साक्षीदार मुलाला भेटला जो त्याला सभांना नेऊ लागला. त्या साक्षीदार मुलाच्या पालकांनी आध्यात्मिक अनाथ म्हणून रॉबर्टची चांगली काळजी घेतली आणि नंतर त्याच्याबरोबर अभ्यासही केला. या प्रेमळ काळजीमुळे त्याने पटापट प्रगती केली आणि आता स्वतः मंडळीत एक वडील या नात्याने कार्य करीत आहे.
पालक आपल्या मुलांच्या प्रगतीला विरोध करतात तेव्हाही मुले एकटी नसतात. यहोवा तेव्हाही एक विश्वासू स्वर्गीय पिता असतो. “पितृहीनांचा पिता, . . . असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी आहे,” असे स्तोत्र ६८:५ म्हणते. आध्यात्मिक पितृहीन मुलामुलींना माहीत आहे की ते त्याला प्रार्थना करू शकतात व तो त्यांना पाठिंबा देईल. (स्तोत्र ५५:२२; १४६:९) यहोवाची मातेसमान संघटना, आपल्या प्रकाशनांद्वारे व संपूर्ण जगभरात ८५,००० पेक्षा अधिक ख्रिस्ती मंडळ्यांत होणाऱ्या सभांद्वारे दिले जाणारे आल्हाददायक आध्यात्मिक अन्न तयार करण्याची जबाबदारी मेहनतीने पार पाडते. अशाप्रकारे, आपला पिता यहोवा आणि त्याची मातेसमान संघटना यांद्वारे येणाऱ्या आध्यात्मिक साहाय्याने “पितृहीन” देखील काही प्रमाणात बायबल अभ्यासाचा आनंद लुटतील.
आपल्या मुलांबरोबर नियमित कौटुंबिक बायबल अभ्यास घेणारे पालक स्तुतीस पात्र आहेत. आपल्या लहानग्यांना यहोवाच्या मार्गांचे प्रशिक्षण चिकाटीने देणाऱ्या एकट्या पालकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, त्यांच्या परिश्रमाबद्दल त्यांचीही प्रशंसा केली पाहिजे. (नीतिसूत्रे २२:६) आध्यात्मिकरीत्या पितृहीन असलेल्या मुलांबद्दल काळजी दाखवणाऱ्या सर्वांना हे माहीत आहे, की त्यांच्या कार्याने आपला स्वर्गीय पिता यहोवा संतुष्ट होतो. कुटुंबाच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी भारी आहे. परंतु, ‘कंटाळा करू नये; कारण तुम्ही खचला नाहीत तर यथाकाळी तुमच्या पदरी पीक पडेल.’—गलतीकर ६:९.
[तळटीप]
a काही नावे बदलण्यात आली आहेत.
[२३ पानांवरील चित्र]
कौटुंबिक अभ्यास, तरुणांना आपल्या पालकांना त्यांच्या चिंता सांगण्याची उत्तम संधी देतो
[२० पानांवरील चित्राचे श्रेय]
Harper’s