देवाची सेवा करण्याच्या शब्दाला जागलो
फ्रान्झ गुडलिकीझ यांच्याद्वारे कथित
आमच्या तुकडीतल्या शंभर सैनिकांपैकी आता फक्त चार जिवंत होते. मृत्यूच्या टांगत्या तलवारीखाली आम्ही होतो; मी अक्षरशः गुडघे टेकून प्रार्थना केली आणि देवाला शब्द दिला, की ‘या युद्धातून जिवंत बचावलो, तर मी आजीवन तुझी सेवा करीन.’
आज, १९४५ सालच्या एप्रिल महिन्यात घडलेल्या त्या घटनेला ५४ वर्षं होऊन गेली आहेत; तेव्हा मी जर्मन सैन्यात होतो. दुसरं महायुद्ध संपुष्टात आलं, त्याच्या काही काळाआधीच सोव्हिएत सैन्य जोरदार हल्ला चढवण्याच्या तयारीने बर्लिनच्या दिशेने निघाले होते. आमच्या सैनिकांना बर्लिनपासून ६५ किलोमीटर अंतरावर, ओडा नदीकिनारी वसलेल्या सीलाऊ गावाजवळ तैनात करण्यात आलं होतं. रात्रंदिवस आमच्यावर तोफांचा जोरदार मारा होत होता आणि आमचे सैनिक मोठ्या संख्येने मृत्यूमुखी पडत होते.
त्यावेळी, जीवनात पहिल्यांदा मी अगदी हतबल होऊन रडत रडत देवाला प्रार्थना केली. माझी श्रद्धाळू आई सहसा बायबलमधलं एक वचन आम्हाला सांगत असे, त्या वचनाची मला तेव्हा आठवण झाली: “संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझे गौरव करिशील.” (स्तोत्र ५०:१५) युद्धभूमीवर त्या खंदकांत लपून बसलेलो असताना, अक्षरशः मृत्यूच्या जबड्यात असताना, मी देवाला वर उल्लेखलेलं वचन दिलं. हे वचन मला कशाप्रकारे पाळता आलं? आणि जर्मन सैन्यात मी कसा काय भरती झालो?
बालपण लिथ्युएनियात
पहिलं महायुद्ध सुरू असताना, १९१८ साली, लिथ्युएनियाने आपल्या स्वातंत्र्याची घोषणा केली आणि लोकशाहीवर आधारित असलेलं सरकार स्थापन केलं. माझा जन्म १९२५ साली, बाल्टिक समुद्राजवळ असणाऱ्या मेमल (क्लायपाडा) जिल्ह्यात झाला. माझ्या जन्माच्या आदल्या वर्षीच या जिल्ह्याचा लिथ्युएनियात समावेश करण्यात आला होता.
माझ्या पाच बहिणींचं आणि माझं बालपण फार आनंदात गेलं. वडील जणू आमच्या जिवाभावाच्या मित्रासारखे होते; ते सतत आम्हा मुलांसोबतच असायचे. आमचे आईवडील इव्हॅन्जेलिकल चर्चचे सदस्य होते पण त्यांनी चर्चला जाण्याचं सोडून दिले होतं, कारण तिथल्या पाळकाचा ढोंगीपणा पाहून आईला राग यायचा. पण देवावर तिचं प्रेम होतं आणि त्याचं वचन म्हणजे बायबल तिला प्रिय होतं; मोठ्या उत्सुकतेने ती ते वाचायची.
लिथ्युएनियात ज्या भागात आम्ही राहात होतो त्यावर १९३९ साली जर्मनीने कब्जा केला. पुढे, १९४३ साली मला जर्मन सैन्यात भरती होण्याचा आदेश देण्यात आला. युद्धात लढताना मी जबर जखमी झालो पण बरा झाल्यावर मी पुन्हा पूर्व आघाडीवर परतलो. दरम्यान, युद्धाची स्थिती बदलली होती आणि आता जर्मन सैन्य सोव्हिएत सैन्यापासून माघार घेत होतं. आणि याच दरम्यान, सुरवातीला सांगितल्यानुसार, मी मृत्यूच्या जबड्यातून कसाबसा बाहेर पडलो.
शब्द पाळला
युद्धादरम्यान, माझे आईवडील लाइपझिकच्या आग्नेयी दिशेला असलेल्या ओअशेट्स, जर्मनी येथे राहायला गेले. युद्ध संपल्यानंतर त्यांना शोधणं मला अतिशय कठीण गेलं. पण शेवटी आमची भेट झाली तेव्हा आमच्या आनंदाला पारावार उरला नाही! काही दिवसांनी, १९४७ सालच्या एप्रिल महिन्यात मी आईसोबत यहोवाच्या साक्षीदारांपैकी असलेल्या मॅक्स श्यूबर यांचे जाहीर व्याख्यान ऐकायला गेलो. आईला खात्री पटली की हाच खरा धर्म आहे, आणि आणखी काही सभांना उपस्थित राहिल्यानंतर मलाही याची खात्री पटली.
याच्याच काही काळानंतर, आई एका शिडीवरून खाली पडली; तिला बराच मार लागला आणि त्यामुळे काही महिन्यांनंतर तिचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू होण्याआधी इस्पितळात असताना ती मला प्रेमाने प्रोत्साहन देत म्हणाली: “मी बऱ्याचदा प्रार्थना करायचे की माझ्या मुलांपैकी एकाला तरी देवाचा मार्ग सापडावा. मला वाटतं माझ्या प्रार्थना देवाने ऐकल्या, आता मी निश्चिंत होऊन मरू शकते.” आईचं पुनरुत्थान होईल आणि तिची प्रार्थना पूर्ण झाली आहे हे तिला कळेल त्या दिवसाची मी अतिशय आतुरतेने वाट पाहतोय.—योहान ५:२८.
बंधू श्यूबर यांचं भाषण ऐकल्यावर चार महिन्यांतच, ८ ऑगस्ट, १९४७ रोजी यहोवा देवाला केलेल्या माझ्या समर्पणाचं द्योतक म्हणून लाइपझिक इथं झालेल्या एक संमेलनात माझा बाप्तिस्मा झाला. देवाला दिलेला शब्द पाळण्याच्या दिशेने पावले उचलण्यास शेवटी मी सुरवात केली होती. लवकरच मी एक पायनियर, म्हणजे यहोवाच्या साक्षीदारांतील पूर्ण वेळेचा सेवक बनलो. नंतर, जर्मन प्रजासत्ताक राज्य, अर्थात पूर्व जर्मनी यात रूपांतरीत झालेल्या त्या भागात तेव्हा ४०० पायनियर होते.
सुरवातीला आलेल्या विश्वासाच्या परीक्षा
आमच्या शेजारी राहणाऱ्या एकाने मला मार्क्सवादात गोवण्याचा प्रयत्न केला; जर्मनीच्या समाजवादी एकता दलात (सएद) सामील होण्याकरता, त्याने मला सरकारतर्फे मोफत विद्यापीठ शिक्षणाचं आमिषही दाखवलं. मी त्याला साफ नकार दिला, येशूनेही एकदा सैतानाच्या अशा प्रस्तावाला नकार दिला होता.—मत्तय ४:८-१०.
एकदा, १९४९ साली एप्रिल महिन्यात माझ्या कामाच्या ठिकाणी दोन पोलिस आले आणि मला त्यांच्यासोबत येण्यास सांगितलं. मला सोव्हिएत तपास सेवेच्या स्थानिक कार्यालयात नेण्यात आलं आणि तिथं माझ्यावर पश्चिम जर्मनीच्या भांडवलवाद्यांचा हस्तक असण्याचा आरोप लावण्यात आला. ते मला म्हणाले की एका अटीवर मी आपला निर्दोषपणा सिद्ध करू शकतो; ती म्हणजे, मी माझं घरोघरचं कार्य सुरू ठेवावं आणि जे कोणी सोव्हिएत युनियन किंवा सएदच्या विरोधात बोलतात किंवा जे कोणी यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना येतात अशांची नावं त्यांना येऊन कळवावी. मी त्यांना सहकार्य द्यायला नकार दिला तेव्हा मला कोठडीत डांबण्यात आलं. नंतर मला एका लष्करी न्यायालयापुढे नेण्यात आलं. शिक्षा: सायबेरियात १५ वर्षे सक्तमजूरी!
मी अगदी शांत राहिलो; हे पाहून ते अधिकारी प्रभावित झाले. मग त्यांनी मला सांगितलं की मला झालेली शिक्षा बदलणार नाही, एवढेच की त्यांच्यासोबत सहकार्य करण्याकरता मी तयार होत नाही तोवर मला आठवड्यातून एकदा त्यांच्या कार्यालयात हजेरी लावावी लागेल. यासंबंधी आणखी अनुभवी बांधवांचा सल्ला घेण्यासाठी मी मॅग्डेबर्गला गेलो; त्यावेळी वॉच टावर संस्थेचे शाखा दफ्तर मॅग्डेबर्ग येथे होते. पोलिस माझ्यावर नजर ठेवून असल्यामुळे प्रवासात बऱ्याच अडचणी आल्या. मॅग्डेबर्गच्या कायदा विभागात कार्य करणारे अर्न्स्ट वाउअ मला म्हणाले: “लढत राहिलास तर तू जिंकशील, तडजोड केलीस तर हारशील. छळ शिबिरांत आम्ही हे एक शिकलो.”a देवाला केलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी या सल्ल्याचा मला फार उपयोग झाला.
बंदी आणि पुन्हा अटक
जुलै, १९५० मध्ये प्रवासी पर्यवेक्षक म्हणून सेवा करण्यासाठी माझी शिफारस करण्यात आली. पण ३० ऑगस्ट रोजी पोलिसांनी मॅग्डेबर्गच्या कार्यालयावर धाड घातली आणि प्रचार कार्यावर बंदी आली. त्यामुळे मला दुसरे कार्य नेमण्यात आले. पॉल हर्शबर्गरला आणि मला जवळजवळ ५० मंडळ्यांसोबत कार्य करायचे होते. प्रत्येक मंडळीत दोन तीन दिवस राहून बांधवांना बंदीतही सेवाकार्य सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी आम्हाला साहाय्य करायचे होते. पुढच्या काही महिन्यांत मी चक्क सहा वेळा पोलिसांच्या तावडीतून निसटलो!
एका मंडळीत शिरलेल्या एका माणसाने आमच्याशी विश्वासघात केला आणि श्टेझी या सरकारी सुरक्षा सेवेला आमच्याविषयी माहिती दिली. त्यामुळे, १९५१ च्या जुलै महिन्यात रस्त्यावरून जात असताना पाच बंदुकधारी माणसांनी येऊन मला आणि पॉलला ताब्यात घेतलं. त्या घटनेचा मी विचार करतो तेव्हा मला जाणीव होते, की आम्ही यहोवाच्या संघटनेवर जितके विसंबून राहायला हवे होते तितके राहिलो नव्हतो. अनुभवी बांधवांनी आम्हाला आधीच बजावले होते की आम्ही कधीही सोबत बाहेर पडता कामा नये. फाजील आत्मविश्वासामुळे आम्हाला आमचे स्वातंत्र्य गमवावे लागले! शिवाय, अटक झालीच तर अधिकाऱ्यांना काय सांगायचे हेही आम्ही ठरवून निघालो नव्हतो.
कोठडीत एकटा असताना, मी रडत रडत यहोवाला याचना केली की माझ्या बांधवांविषयी माहिती न फोडण्यासाठी आणि कोणत्याही परिस्थितीत आपला विश्वास न सोडण्यासाठी त्याने मला शक्ती द्यावी. थोड्या वेळाने मला झोप लागली; पण अचानक मला माझा मित्र पॉल याच्या आवाजाने जाग आली. माझ्याच कोठडीच्या वरच्या खोलीत श्टेझी त्याची उलट तपासणी घेत होते. त्या रात्री वातावरण उष्ण आणि दमट असल्यामुळं बाल्कनीचं दार उघडंच होतं आणि त्यामुळे मला मंद आवाजात सर्वकाही ऐकू येत होतं. नंतर जेव्हा मला उलट तपासणीकरता बोलावण्यात आलं, तेव्हा मी पॉलने दिलेलीच उत्तरे दिली; अधिकाऱ्यांना याचं आश्चर्य वाटलं. “संकटसमयी माझा धावा कर. मी तुला मुक्त करीन,” हे आईचं आवडतं बायबल वचन माझ्या मनात घोळत राहिलं आणि त्यामुळे माझं मनोबल खूप वाढलं.—स्तोत्र ५०:१५.
आम्हा दोघांची चौकशी झाल्यावर पॉलला आणि मला न्यायालयात सुनावणी होण्याआधी श्टेझी तुरुंगात ठेवण्यात आले; आधी हेल मध्ये आणि त्यानंतर मॅग्डेबर्ग इथं. मॅग्डेबर्गला असताना, मला कधीकधी शाखा दफ्तराच्या इमारती दिसायच्या; अर्थात तेव्हा दफ्तर कुलूपबंद होतं. पण इथं तुरुंगात असण्याऐवजी आपण शाखा दफ्तरात काम करत असतो तर किती बरं झालं असतं, असा विचार माझ्या मनात आल्याशिवाय राहायचा नाही! फेब्रुवारी १९५२ मध्ये आम्हाला शिक्षा ठोठावण्यात आली: “१० वर्षे तुरुंगवास आणि २० वर्षे कोणतेच नागरी हक्क नाहीत!”
तुरुंगात विश्वासू राहणे
तुरुंगात, ज्या यहोवाच्या साक्षीदारांना दहा किंवा त्यापेक्षा जास्त काळाची शिक्षा झाली असेल त्यांना आपल्या कारावासात काही काळ एक खास ओळखचिन्ह घालावं लागत. विजारीच्या एका पायावर आणि सदऱ्याच्या एका बाहीवर एक लाल पट्टी लावली जायची. शिवाय, आम्ही अतिशय भयंकर गुन्हेगार आहोत हे शिपायांना समजावं म्हणून आमच्या कोठडीच्या दारावर एक लहानसा गोलाकार लाल पुट्ठा लावला जायचा.
त्या अधिकाऱ्यांच्या नजरेत आम्ही भयंकर गुन्हेगारच होतो. आम्हाला बायबल देखील जवळ बाळगण्याची परवानगी नव्हती; याचे कारण, एका शिपायाच्या शब्दांत: “हातात बायबल असलेला यहोवाचा साक्षीदार म्हणजे बंदूक हाती घेतलेला गुन्हेगार.” बायबलचे निदान काही उतारे तरी वाचायला मिळावेत म्हणून आम्ही लियो टॉल्स्टॉय या रशियन लेखकाची पुस्तकं वाचायचो कारण त्यांच्या पुस्तकांत बऱ्याचदा बायबलमधले उतारे असायचे. ही बायबलची वचनं आम्ही पाठ करून ठेवायचो.
१९५१ साली, मला अटक होण्याआधी एल्झा रीमा या तरुणीशी माझी मागणी झाली होती. ती जमेल तितक्यांदा तुरुंगात यायची आणि महिन्यातून एकदा माझ्यासाठी खाण्याच्या वस्तूंचे पुडके पाठवायची. त्यातच ती आध्यात्मिक खाद्यही पाठवायची. एकदा तिने सॉसेजेसमध्ये टेहळणी बुरूज चे लेख भरले होते. शिपाई सहसा सॉसेजेस उघडून तपासायचे, पण नेमक्या त्या वेळी कामाची वेळ संपत आली होती तेव्हाच हे पुडके आले आणि त्यामुळे ते तपासले गेले नाही.
एकदा कार्ल हाइन्ट्स क्लेबर आणि मला एका लहानशा कोठडीत, साक्षीदार नसलेल्या आणखी तीन कैद्यांसोबत ठेवलं होतं. आम्हाला टेहळणी बुरूज वाचायचं होतं, पण त्या दुसऱ्या कैद्यांच्या लक्षात आलं तर? म्हणून आम्ही ते टेहळणी बुरूज लेख दुसऱ्याच एका पुस्तकात लपवून वाचलं आणि तुरुंगातल्या इतर साक्षीदारांनाही हे अतिमोलाचं आध्यात्मिक अन्न पोचतं केलं.
तुरुंगात असताना आम्ही योग्य संधी मिळताच इतरांना देवाच्या राज्याबद्दल सांगायचो. माझ्यासोबतच तुरुंगात असणाऱ्या एकाने सत्य स्वीकारले तेव्हा मला अत्यंत आनंद झाला.—मत्तय २४:१४.
पूर्ण वेळेच्या सेवेत, पुनश्च
तब्बल सहा वर्षं गजाआड राहिल्यानंतर, १ एप्रिल, १९५७ रोजी माझी सुटका झाली. दोन आठवड्यांतच मी एल्झाशी लग्न केले. श्टेझी यांना मला सुटका झाल्याचं कळलं तेव्हा ते पुन्हा मला तुरुंगात डांबण्याचं निमित्त शोधू लागले. असं होऊ नये म्हणून एल्झा व मी सीमा पार करून पश्चिम बर्लिनमध्ये राहायला गेलो.
पश्चिम बर्लिनमध्ये आल्यानंतर संस्थेनं आम्हाला आमच्या भविष्यातील योजनांविषयी विचारलं. आम्ही सांगितलं की आम्हा दोघांपैकी एकजण पायनियर सेवा करील आणि एकजण नोकरी.
त्यांनी आम्हाला विचारलं, “तुम्हा दोघांना पायनियर होता आलं तर?”
“ते शक्य झाल्यास, आम्ही लगेच [पायनियर सेवा] सुरू करू,” आम्ही उत्तर दिलं.
खर्च भागवण्यासाठी आम्हाला दर महिन्यात एक लहानशी रक्कम दिली जायची आणि १९५८ पासून आम्ही खास पायनियर म्हणून सेवा करू लागलो. आम्ही ज्यांच्यासोबत बायबल अभ्यास करायचो, ते लोक आपल्या जीवनात बदल करून यहोवाचे सेवक बनायचे तेव्हा आम्हाला किती आनंद व्हायचा! पुढची दहा वर्षे खास पायनियर म्हणून सेवा करताना आम्ही पतिपत्नी खांद्याला खांदा लावून कार्य करण्याचे शिकलो. एल्झा सदैव माझ्या शेजारीच असायची, अगदी मोटार दुरुस्त करतानाही. वाचन, अभ्यास आणि प्रार्थनाही आम्ही सोबतच करायचो.
१९६९ साली आम्हाला प्रवासी कार्य नेमण्यात आलं. दर आठवडी नव्या मंडळीत जाऊन तिथल्या सदस्यांना आम्ही साहाय्य करायचो. प्रवासी कार्यात बराच अनुभव असलेल्या योझेफ बार्ट यांनी मला हा सल्ला दिला: “तुला तुझ्या नेमणुकीत यशस्वी व्हायचं असेल, तर बांधवांशी बांधवासारखा वाग.” मी या सल्ल्याप्रमाणेच वागण्याचा प्रयत्न करायचो. यामुळे बांधवांशी आमचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे, आपुलकीचे होते; आणि यामुळे त्यांची एखादी चूक सुधारण्याची वेळ आली तर आम्हाला सोपं जायचं.
१९७२ साली, एल्झाला कर्करोग झाल्याचं कळलं आणि तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर, तिला संधिवातही झाला. अतिशय त्रास होत असतानाही, मंडळ्यांची सेवा करण्यासाठी ती दर आठवडी माझ्यासोबत यायची आणि भगिनींसोबत तिला शक्य होईल तितके सेवाकार्य करायची.
बदलत्या गरजा
माझ्या सासुसासऱ्यांची सतत कोणीतरी काळजी घेण्याची गरज उद्भवल्यामुळे १९८४ साली आम्ही प्रवासी कार्य सोडून त्यांच्याकडे गेलो; चार वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला तोपर्यंत आम्ही त्यांची काळजी घेतली. (१ तीमथ्य ५:८) मग, १९८९ साली एल्झा खूपच आजारी पडली. सुदैवाने ती त्यातून सावरली, पण तेव्हापासून घरातली सर्व कामं मला करावी लागतात. सतत वेदना सहन करणाऱ्याची काळजी कशी घ्यायची, त्याच्याशी कसे वागायचे हे मी अजूनही शिकतोय. पण या सर्व ताणतणावातही आध्यात्मिक गोष्टींबद्दलचं आमचं प्रेम आम्ही जिवंत ठेवलं आहे.
देवाच्या दयेने आम्ही अजूनही पायनियर आहोत. पण आम्हाला जाणीव झाली आहे, की आपण कोणत्या पदावर आहोत किंवा आपण किती कार्य करतो हे महत्त्वाचं नाही; महत्त्वाचं काय, तर आपण यहोवाला विश्वासू आहोत किंवा नाही. आम्हाला यहोवा देवाची सेवा केवळ काही वर्षांपर्यंतच नाही पण सर्वकाळ करायची इच्छा आहे. आमच्या अनुभवानं आम्हाला भविष्याकरता बरंच काही शिकवलं आहे. आणि यहोवाने आम्हाला सर्वात कठीण परिस्थितीतही त्याची स्तुती करण्याची शक्ती दिली आहे.—फिलिप्पैकर ४:१३.
[तळटीपा]
a अर्न्स्ट वाउअ यांची जीवनकथा टेहळणी बुरूज च्या ऑगस्ट १, १९९१ अंकात, पृष्ठ २५-२९ वर प्रकाशित झाली होती.
[२३ पानांवरील चित्र]
मॅग्डेबर्गमध्ये याच तुरुंगात मी होतो
[Credit Line]
Gedenkstätte Moritzplatz Magdeburg für die Opfer politischer Gewalt; Foto: Fredi Fröschki, Magdeburg
[२३ पानांवरील चित्र]
१९५७ साली आमच्या विवाहप्रसंगी
[२३ पानांवरील चित्र]
एल्झा आणि मी आज