वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ६/१ पृ. १४-१९
  • “मनुष्यांतील दाने” यांची कदर बाळगणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “मनुष्यांतील दाने” यांची कदर बाळगणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ‘आम्ही तुमचे सहकारी आहोत’
  • आनंदाने सेवा करण्याकरता सर्वांना मदत करणे
  • ‘आज्ञेत राहा व अधीन असा’
  • ‘त्यांना अत्यंत मान द्या’
  • यहोवाच्या मेंढरांच्या काळजीकरता “मनुष्यांतील दाने”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • ‘तुम्हामध्ये जे श्रम करतात त्यांचा सन्मान करा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • नेतृत्व करणाऱ्‍यांच्या आज्ञेत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • “अशांना प्रिय समजा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ६/१ पृ. १४-१९

“मनुष्यांतील दाने” यांची कदर बाळगणे

“तुम्हामध्ये जे श्रम करितात . . . त्यांचा तुम्ही सन्मान करावा; आणि त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने अत्यंत मान द्यावा.”—१ थेस्सलनीकाकर ५:१२, १३.

१. प्रेषितांची कृत्ये २०:३५ नुसार देण्यामध्ये कोणते सामर्थ्य आहे? स्पष्ट करा.

“घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.” (प्रेषितांची कृत्ये २०:३५) येशूच्या या शब्दांची सत्यता तुम्हाला पटली तो मागचा प्रसंग तुम्हाला आठवतो का? तुमच्या आवडत्या व्यक्‍तीला दिलेले ते कदाचित एखादे बक्षीस असेल. तुम्ही ते बक्षीस खूप विचार करून निवडले कारण तुमच्या प्रिय व्यक्‍तीने ते जपून ठेवावे असेच तुम्हाला वाटले होते. बक्षीस मिळाल्यानंतर तुमच्या प्रिय व्यक्‍तीच्या चेहऱ्‍यावरील भाव पाहून तुम्हाला किती आनंद झाला होता! चांगल्या हेतूने आपण देतो तेव्हा त्यातून प्रेम व्यक्‍त करत असतो आणि प्रेम व्यक्‍त करण्यात आपल्याला वेगळाच आनंद मिळतो.

२, ३. (अ) यहोवासारखा दुसरा कोणी आनंदी नाही असे का म्हणता येईल आणि “मनुष्यांतील दाने” यांच्या तरतुदीमुळे त्याचे हृदय आनंदी कसे होऊ शकते? (ब) देवापासून मिळालेल्या देणगीचे काय करू नये असे आपल्याला वाटेल?

२ “प्रत्येक उत्तम देणगी” देणाऱ्‍या यहोवापेक्षा आणखी कोण आनंदी असू शकेल? (याकोब १:१७; १ तीमथ्य १:११) तो प्रत्येक दान प्रेमाने प्रेरित होऊन देतो. (१ योहान ४:८) हीच गोष्ट, देवाने ख्रिस्ताद्वारे मंडळीला दिलेल्या—“मनुष्यांतील दाने”—यांच्या बाबतीत खरी आहे. (इफिसकर ४:८, NW) कळपाची काळजी घेण्याकरता करण्यात आलेली वडिलांची व्यवस्था देवाला त्याच्या लोकांवर गाढ प्रेम आहे याचे प्रकटन आहे. या लोकांची विचारपूर्वक निवड करण्यात येते—त्यांना काही शास्त्रवचनीय योग्यता पूर्ण कराव्या लागतात. (१ तीमथ्य ३:१-७; तीत १:५-९) त्यांना हे माहीत आहे, की त्यांनी ‘कळपाला दयेने’ वागवले पाहिजे कारण त्यामुळे मेंढरे अशाप्रकारच्या काळजी वाहणाऱ्‍या मेंढपाळांचे कृतज्ञ होतील. (प्रेषितांची कृत्ये २०:२९; स्तोत्र १००:३) जेव्हा यहोवा हे पाहतो, की त्याच्या मेंढरांचे हृदय अशाप्रकारच्या कृतज्ञतेच्या भावनेने भरलेले आहे तेव्हा त्याचे मन देखील निश्‍चितच आनंदी होते!—नीतिसूत्रे २७:११.

३ देवाने दिलेल्या दानाचे मोल कमी करावे, असे आपल्याला निश्‍चितच वाटणार नाही; तसेच त्याच्या दानांबद्दल कदर व्यक्‍त करू नये असेही आपण इच्छिणार नाही. यामुळे असे प्रश्‍न मनात येतात: वडिलांनी मंडळीतील त्यांच्या भूमिकेकडे कोणत्या दृष्टीने पाहण्यास हवे? आणि “मनुष्यांतील दाने” यांची आपण कदर बाळगतो हे बाकीचा कळप कसे दाखवू शकतो?

‘आम्ही तुमचे सहकारी आहोत’

४, ५. (अ) पौलाने मंडळीची तुलना कशाशी केली आणि हा दृष्टान्त योग्य का आहे? (ब) आपण एकमेकांना कोणत्या दृष्टीने पाहावे आणि वागवावे याविषयी पौलाचा दृष्टान्त काय दाखवून देतो?

४ यहोवाने, “मनुष्यांतील दाने” असलेल्यांना मंडळीमध्ये काही प्रमाणात अधिकार दिला आहे. अर्थात, वडिलांना त्या अधिकाराचा गैरवापर करावासा वाटणार नाही, पण अपरिपूर्ण असल्यामुळे तसे करणे सहज शक्य आहे याची त्यांना कल्पना आहे. तर मग, बाकीच्या कळपाच्या संबंधात त्यांनी स्वतःला कसे समजले पाहिजे? प्रेषित पौलाच्या दृष्टान्ताचा विचार करा. “मनुष्यांतील दाने” का देण्यात आली याची चर्चा केल्यानंतर पौलाने लिहिले: “तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्याप्रत सर्व प्रकारे वाढावे. त्याच्यापासून पुरवठा करणाऱ्‍या प्रत्येक सांध्याच्या योगे, सबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव होत असते, आणि प्रत्येक अंग आपआपल्या परिमाणाने कार्य करीत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धि करून घेते.” (इफिसकर ४:१५, १६) म्हणून पौल वडील आणि इतर सदस्य यांच्यासमवेत मंडळीची तुलना मानवी शरीराशी करतो. हा दृष्टान्त उचित का आहे?

५ मानवी शरीर हे अनेक अंगांनी बनलेले असले, तरी त्याला एक मस्तक असते. पण शरीरातील कोणतेही अंग—स्नायू, नस, शीर—बेकार नसते. प्रत्येक शरीराचा भाग अनमोल असून संपूर्ण शरीराच्या आरोग्याला आणि सौंदर्याला योगदान देत असतो. त्याचप्रमाणे, मंडळी अनेक सदस्यांची मिळून बनलेली असते, पण प्रत्येक सदस्य—अबाल किंवा वृद्ध, सुदृढ अथवा दुर्बल—मंडळीच्या एकंदर आध्यात्मिक आरोग्यास किंवा सौंदर्यास हातभार लावू शकतो. (१ करिंथकर १२:१४-२६) आपण निरर्थक आहोत, असे कोणालाही वाटता कामा नये. तर दुसऱ्‍या बाजूला पाहता, आपण कोणीतरी मोठे आहोत असे कोणाला वाटू नये कारण आपण सर्व—मेंढपाळ आणि मेंढरे सुद्धा—शरीराचे भाग आहोत आणि आपल्या सर्वांचे एकच मस्तक आहे, ख्रिस्त. पौल अशाप्रकारे आपल्यांमध्ये प्रेम, काळजी आणि आदर असला पाहिजे हे दाखवून देतो. हे जाणल्यामुळे वडिलांना मंडळीतील त्यांच्या भूमिकेविषयी नम्रतेचा, संतुलितपणाचा दृष्टिकोन बाळगण्यास मदत होते.

६. प्रेषित या नात्याने अधिकार असतानाही पौलाने नम्रतेचा आत्मा कसा दाखवला?

६ ही “मनुष्यांतील दाने” त्यांच्या सहउपासकांच्या जीवनावर किंवा विश्‍वासावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत नाहीत. पौलाकडे, प्रेषित या नात्याने अधिकार होता तरी देखील त्याने नम्रपणे करिंथकरांना असे म्हटले: “आम्ही तुमच्या विश्‍वासावर सत्ता गाजवितो असे नाही, तर तुमच्या आनंदात साहाय्यकारी आहो; तुमची स्थिती आहे ती विश्‍वासाने आहे.” (२ करिंथकर १:२४) पौलाला त्याच्या बांधवांच्या विश्‍वासावर आणि जीवनक्रमावर नियंत्रण ठेवण्याची इच्छा नव्हती. खरोखरच, तसे करण्याची गरज नसल्याचे त्याला वाटले, कारण त्याने असा विश्‍वास प्रकट केला, की ते यहोवाच्या संघटनेतील विश्‍वासू स्त्री-पुरुष होते ज्यांची योग्य ते करण्याची इच्छा होती. त्यामुळे स्वतःविषयी आणि त्याचा प्रवासी सोबती तीमथ्य याविषयी बोलताना खरे तर पौल असे म्हणत होता: ‘हर्षाने तुमच्यासोबत देवाची सेवा करणे हे आमचे कर्तव्य आहे.’ (२ करिंथकर १:१) किती ही नम्रता!

७. नम्र वडील, मंडळीतील त्यांच्या भूमिकेविषयी काय जाणून आहेत आणि त्यांच्या सहकाऱ्‍यांविषयी त्यांना कोणता विश्‍वास आहे?

७ “मनुष्यांतील दाने” असलेल्यांचे आज तेच काम आहे. ते ‘आपल्या आनंदाकरता सहकारी आहेत.’ इतरांना देवाची किती प्रमाणात सेवा करणे शक्य आहे हे ठरविणे आपले काम नाही, याची नम्र वडिलांना जाण आहे. त्यांना हे माहीत आहे, की ते इतरांना त्यांचे सेवाकार्य वाढविण्याकरता आणि सुधारण्याकरता उत्तेजन देऊ शकतात, पण देवाची सेवा करण्याची इच्छा मनापासून येण्यास हवी. (पडताळा २ करिंथकर ९:७.) त्यांना याची खात्री आहे, की त्यांचे सहकारी आनंदी असल्यास देवाच्या सेवाकार्यात ते त्यांच्या परीने भाग घेतील. “हर्षाने परमेश्‍वराची सेवा” करण्याकरता आपल्या बांधवांची मदत करणे ही वडिलांची मनःपूर्वक इच्छा आहे.—स्तोत्र १००:२.

आनंदाने सेवा करण्याकरता सर्वांना मदत करणे

८. हर्षाने यहोवाची सेवा करण्यात वडील कोणत्या काही मार्गांनी बांधवांची मदत करू शकतात?

८ वडीलहो, तुमच्या बांधवांनी आनंदाने सेवा करावी म्हणून तुम्ही त्यांची कशाप्रकारे मदत करू शकता? उदाहरणाद्वारे तुम्ही त्यांना उत्तेजन देऊ शकता. (१ पेत्र ५:३) सेवाकार्यातील तुमचा आवेश आणि आनंद दिसून यावा आणि तुमचे उदाहरण पाहून इतरांना अनुकरण करण्यास उत्तेजन मिळावे. इतरांनी मनापासून केलेल्या सेवाकार्याविषयी त्यांची वाहवा करा. (इफिसकर ४:२९) प्रेमळ आणि खरी स्तुती केल्यामुळे इतरांना आपण उपयोगी आहोत आणि आपली आवश्‍यकता आहे असे वाटते. त्यामुळे मेंढरांना देवाच्या सेवेत जास्तीत-जास्त करावेसे वाटते. अयोग्यपणे तुलना करण्याचे टाळा. (गलतीकर ६:४) अशाप्रकारची तुलना केल्यामुळे इतरांमध्ये सुधारणा होण्यास चालना मिळण्याऐवजी ते निराश होतील. याशिवाय, यहोवाचे प्रत्येक मेंढरू वेगळे आहे—त्याची परिस्थिती आणि क्षमता भिन्‍न असते. पौलाप्रमाणे, तुम्ही तुमच्या बांधवांवर विश्‍वास दाखवा. प्रीती “सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते” त्यामुळे आपल्या बांधवांचे देवावर प्रेम आहे आणि त्याला आनंदी करण्याची त्यांची इच्छा आहे असा त्यांच्याविषयी विश्‍वास बाळगणे केव्हाही चांगले. (१ करिंथकर १३:७) जेव्हा तुम्ही ‘इतरांना आदर दाखवता’ तेव्हा तुम्ही त्यांच्यातील सर्वोत्तम गुणांना वाव देत असता. (रोमकर १२:१०) या गोष्टीची खात्री बाळगा, की जेव्हा मेंढरांना उत्तेजन देण्यात येते आणि त्यांना ताजेतवाने करण्यात येते तेव्हा ते देवाच्या सेवेत जास्तीत-जास्त करतील आणि देवाच्या सेवेत त्यांना आनंदही प्राप्त होईल.—मत्तय ११:२८-३०.

९. सहकारी वडिलांबद्दल कोणता दृष्टिकोन बाळगल्याने प्रत्येक वडिलांना आनंदाने सेवा करण्याकरता मदत होईल?

९ स्वतःला ‘सहकारी’ असे नम्रपणे मानल्यामुळे तुम्हाला आनंदाने सेवा करण्याकरता आणि तुमच्या सहवडिलांमधील या अनोख्या दानांची कदर करण्याकरता मदत होईल. प्रत्येक वडिलांमध्ये काही विशिष्ट असे गुण आणि क्षमता असतात ज्यांचा उपयोग ते मंडळीच्या कल्याणाकरता करू शकतात. (१ पेत्र ४:१०) एखाद्या वडिलांना शिकवण्याचे दान प्राप्त झालेले असेल. दुसरा एखादा वडील चांगल्या प्रकारे संयोजन करणारा असेल. तर एखाद्या वडिलांच्या प्रेमळ आणि दयाशील स्वभावामुळे लोकांना त्यांच्याशी बोलताना मुळीच संकोच वाटत नसेल. वास्तविकता ही आहे, की कोणत्याही वडिलांकडे प्रत्येक देणगी समप्रमाणात नसते. एखादी देणगी—उदाहरणार्थ शिकवण्याची देणगी—प्राप्त झाल्यामुळे एक वडील इतर वडिलांपेक्षा श्रेष्ठ ठरतात का? मुळीच नाही! (१ करिंथकर ४:७) दुसऱ्‍या बाजूला पाहता, दुसऱ्‍याकडे असलेल्या देणगीचा हेवा करण्याची किंवा दुसऱ्‍या वडिलांच्या क्षमतेमुळे त्यांची वाहवा होते तेव्हा आपण कमी आहोत असे वाटून घेण्याची काही गरज नाही. हे लक्षात असू द्या, की यहोवाला तुमच्या स्वतःमध्ये काही देणग्या दिसतात. या देणग्यांचा विकास करण्यास आणि तुमच्या बांधवांच्या लाभासाठी त्यांचा उपयोग करण्यास यहोवा तुम्हाला मदत करू शकतो.—फिलिप्पैकर ४:१३.

‘आज्ञेत राहा व अधीन असा’

१०. “मनुष्यांतील दाने” यांच्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्‍त करणे उचित का आहे?

१० जेव्हा आपल्याला एखादे बक्षीस मिळते तेव्हा त्याची कृतज्ञता बाळगणे योग्यच असते. कलस्सैकर ३:१५ म्हणते: “तुम्ही कृतज्ञ असा.” तर मग, यहोवाने आपल्याला दिलेली “मनुष्यांतील दाने” या मोलवान देणग्यांविषयी काय? अर्थात, आपण प्रथमतः उदारपणे देणगी देणाऱ्‍या यहोवाचे आभारी आहोत. पण “मनुष्यांतील दाने” असलेल्यांविषयी काय? आपण त्यांची कदर करतो, हे आपण कसे दाखवू शकतो?

११. (अ)“मनुष्यांतील दाने” यांविषयी आपण आपली कृतज्ञता कशी व्यक्‍त करू शकतो? (ब) “आज्ञेत राहा” आणि “अधीन असा” या अभिव्यक्‍तींवरून काय स्पष्ट होते?

११ “मनुष्यांतील दाने” यांची आपण कदर करतो, हे आपण त्यांचा बायबलवर आधारित असलेला सल्ला आणि निर्णय तत्परतेने स्वीकार करण्याद्वारे दाखवू शकतो. बायबल आपल्याला सल्ला देते: “आपल्या अधिकाऱ्‍यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणास हिशेब द्यावयाचा आहे हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करितात; ते त्यांना आनंदाने करता यावे, कण्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.” (इब्री लोकांस १३:१७) आपण केवळ त्यांच्या “आज्ञेत” राहता कामा नये, तर आपण त्यांच्या “अधीन” देखील असले पाहिजे हे लक्षात घ्या. “अधीन असा” याकरता असलेल्या ग्रीक शब्दाचा अक्षरशः अर्थ “तुम्ही नमते घ्या,” असा होतो. “आज्ञेत राहा” आणि “अधीन असा” या अभिव्यक्‍तींवर विवेचन मांडताना बायबल विद्वान आर. सी. एच. लेन्स्की असे म्हणतात: “एखाद्याला काही करायला सांगितले जाते आणि तो त्याच्याशी सहमत असतो किंवा त्या गोष्टीतील योग्यता आणि लाभ यांची त्याला खात्री पटवली जाते तेव्हा तो आज्ञेत राहतो; पण जेव्हा एखाद्याचे एकदम विरोधात्मक मत असते तेव्हा तो . . . नमते घेतो.” जेव्हा पुढाकार घेणाऱ्‍यांचे मार्गदर्शन आपल्याला समजते आणि त्याच्याशी आपण सहमत होतो तेव्हा आज्ञाधारकता ही तत्परतेने येऊ शकते. पण, एखाद्या विशिष्ट निर्णयामागील कारण आपल्याला समजत नसल्यास काय?

१२. एखादा विशिष्ट निर्णय आपल्याला पूर्णपणे समजला नसला तरी आपण अधीनता दाखवणारे किंवा नमते घेणारे का असले पाहिजे?

१२ अशावेळी आपल्याला अधीन राहण्याची किंवा दुसऱ्‍यांचे मान्य करण्याची गरज असेल. का? या गोष्टीची आपण खात्री बाळगण्यास हवी, की आध्यात्मिकरित्या पात्र असलेल्या या लोकांना आपले कल्याण व्हावे असे मनापासून वाटते. वडिलांच्या स्वाधीन करण्यात आलेल्या मेंढरांचा त्यांना यहोवाला जाब द्यावा लागेल हे त्यांना चांगले माहीत आहे. (याकोब ३:१) शिवाय, हेही लक्षात ठेवलेले बरे, की संपूर्ण माहितीनिशी घेण्यात येणाऱ्‍या निर्णयाला कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या याची आपल्याला पूर्ण कल्पना असेलच असे नाही.—नीतिसूत्रे १८:१३.

१३. वडील न्यायिक निर्णय घेतात तेव्हा त्यांच्या अधीन राहण्याकरता आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे मदत होऊ शकते?

१३ जेव्हा न्यायिक निर्णय घेतला जातो तेव्हा अधीन राहण्याविषयी काय? हे मान्य आहे, की हे सोपे नाही, विशेषतः आपल्या जवळच्या व्यक्‍तीला—एखाद्या नातेवाईकाला किंवा मित्राला बहिष्कृत करण्याचा निर्णय असेल तर आपल्याला ते मुळीच आवडणार नाही. याठिकाणी पुन्हा एकदा “मनुष्यांतील दाने” असलेल्या लोकांचा न्याय मान्य करणे उत्तम आहे. त्यांना आपल्यापेक्षा जास्त वास्तविकता ठाऊक असतात, आपल्यापेक्षा त्यांना जास्त माहिती असते. अशाप्रकारचे निर्णय घेण्याकरता या बांधवांना अनेकदा मानसिक त्रास सहन करावा लागतो; ‘यहोवासाठी न्याय’ करणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. (२ इतिहास १९:६) देव “क्षमाशील” आहे हे जाणून असल्यामुळे दया दाखवण्याकरता ते हरएक प्रयत्न करतात. (स्तोत्र ८६:५) पण त्यांनी मंडळी शुद्ध देखील राखली पाहिजे आणि बायबल त्यांना असे मार्गदर्शन करते, की त्यांनी अपश्‍चात्तापी पातक्याला बहिष्कृत करावे. (१ करिंथकर ५:११-१३) अनेक बाबतीत पाप केलेली व्यक्‍ती घेण्यात आलेल्या निर्णयास स्वतः होऊन स्वीकारते. अशावेळी तिला ताळ्यावर आणण्यासाठी केवळ शिक्षा देण्याची गरज असेल. जेव्हा आपण त्याचे जवळचे, प्रिय जन त्याच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयाला अधीनता दाखवतो तेव्हा दिल्या जाणाऱ्‍या शिक्षेचा त्याला लाभ व्हावा म्हणून आपण उलट त्याची मदतच करत असतो.—इब्री लोकांस १२:११.

‘त्यांना अत्यंत मान द्या’

१४, १५. (अ) पहिले थेस्सलनीकाकर ५:१२, १३ यानुसार वडील मान देण्यास पात्र का आहेत? (ब) वडील ‘आपल्यामध्ये श्रम करतात’ असे का म्हटले जाऊ शकते?

१४ “मनुष्यांतील दाने” असलेल्यांच्या बाबतीत विचारीपणा दर्शवून आपण त्यांच्याविषयी आपल्याला वाटणारी कदर दाखवू शकतो. थेस्सलनीकाकरांच्या मंडळीला लिहिताना पौलाने त्या मंडळीच्या सदस्यांना असा बोध केला: “तुम्हामध्ये जे श्रम करितात, प्रभूमध्ये तुम्हावर असतात व तुम्हास बोध करितात त्यांचा तुम्ही सन्मान करावा; आणि त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने अत्यंत मान द्यावा [“विचारीपणा दाखवावा,” NW].” (१ थेस्सलनीकाकर ५:१२, १३) “श्रम”—या शब्दावरून, एकनिष्ठ वडील निःस्वार्थपणे आपल्याकरता स्वतःला वाहून घेतात हे स्पष्ट होत नाही का? हे प्रिय बांधव किती जड ओझे वाहतात याचा जरा विचार करा.

१५ त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी असते; त्यांना त्यांच्या कुटुंबांचे पालनपोषण करण्याकरता प्रापंचिक नोकरी करावी लागते. (१ तीमथ्य ५:८) वडिलांना मुले असल्यास, त्या लहान मुलांना त्यांच्या पित्यांचा वेळ आणि सहवास हवा असतो. अशा वडिलांना आपल्या मुलांच्या शाळेच्या अभ्यासात त्यांना मदत करण्याची आणि त्यांच्यासोबत काही वेळ चांगल्याप्रकारची करमणूक करण्याची आवश्‍यकता असेल. (उपदेशक ३:१, ४) सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे वडील त्यांच्या कुटुंबाच्या आध्यात्मिक गरजेची काळजी घेतात, नियमितपणे कौटुंबिक अभ्यास घेतात, क्षेत्र सेवेत त्यांच्यासोबत प्रचारकार्य करतात आणि ख्रिस्ती सभांना त्यांना घेऊन जातात. (अनुवाद ६:४-७; इफिसकर ६:४) आपल्याला या गोष्टीचे विस्मरण होऊ नये, की आपल्या सर्वांना असणाऱ्‍या या जबाबदाऱ्‍यांशिवाय वडिलांकडे आणखी जबाबदाऱ्‍या असतात: सभांच्या भागांची तयारी करणे, मेंढपाळकत्वाच्या भेटी देणे, मंडळीच्या आध्यात्मिक कल्याणाची काळजी घेणे आणि आवश्‍यकता असते तेव्हा न्यायिक बाबी हाताळणे. काही वडील, विभागीय संमेलने, प्रांतीय अधिवेशने, राज्य सभागृहांचे बांधकाम आणि इस्पितळ सहकार्य समिती यासंबंधाने जादा जबाबदाऱ्‍या पार पाडतात. खरोखरच हे बांधव आपल्यासाठी “श्रम” घेतात!

१६. वडिलांना आपण मान देऊ शकतो असे काही मार्ग सांगा.

१६ आपण त्यांच्या बाबतीत विचारीपणा कसा दाखवू शकतो? बायबलमधील एक नीतिसूत्र असे म्हणते: “समयोचित बोल किती उत्तम!” (नीतिसूत्रे १५:२३; २५:११) म्हणून प्रामाणिक कृतज्ञतेचे आणि उत्तेजनाचे शब्द हे दाखवून देऊ शकतात, की आपण त्यांच्या श्रमाला क्षुल्लक समजत नाही. आणि आपण त्यांच्याकडून करत असलेल्या अपेक्षाही माफक असल्या पाहिजेत. एका बाजूला पाहता, मदतीकरता त्यांना भेटण्यात आपल्याला कोणत्याही प्रकारचा संकोच वाटता कामा नये. एखाद्या वेळी ‘आपल्या हृदयाला यातना’ होत असतील आणि “निपुण शिक्षक” असलेल्यांकडून आपल्याला आध्यात्मिक उत्तेजनाची, मार्गदर्शनाची किंवा सल्ल्याची आवश्‍यकता भासेल. (स्तोत्र ५५:४; १ तीमथ्य ३:२) त्याचवेळी आपल्याला हे लक्षात ठेवण्याची गरज आहे, की वडील आपल्याला ठराविकच वेळ देऊ शकतात कारण ते स्वतःच्या कुटुंबाच्या किंवा मंडळीतील इतर लोकांच्या गरजांकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. अशाप्रकारे कठीण काम करणाऱ्‍या या बांधवांप्रती “समसुखदुःखी” राहण्याद्वारे आपण त्यांच्याकडून अवाजवी अपेक्षा बाळगणार नाही. (१ पेत्र ३:८) उलटपक्षी, ते आपल्याला जो काही माफक वेळ आणि लक्ष पुरवतात त्याविषयी आपण कृतज्ञ असू या.—फिलिप्पैकर ४:५.

१७, १८. मंडळीतील वडिलांच्या पत्नी कोणता त्याग करतात आणि आपण या विश्‍वासू बहिणींना क्षुल्लक समजत नाही हे आपण कसे दाखवू शकतो?

१७ वडिलांच्या पत्नींविषयी काय? त्यांच्या बाबतीतही आपण विचारीपणा दाखवू नये का? नाहीतरी, त्या सुद्धा त्यांच्या पतींसोबत मंडळीच्या कामात हातभार लावतात. त्याकरता त्यांना बहुधा त्याग करावा लागतो. काहीवेळा, वडील त्यांच्या कुटुंबासमवेत घालवण्याचा त्यांचा संध्याकाळचा वेळ कदाचित मंडळीच्या बाबी हाताळण्याकरता घालवत असतील. अनेक मंडळ्यांमध्ये विश्‍वासू ख्रिस्ती स्त्रिया अशाप्रकारचा त्याग करण्यास तयार असतात जेणेकरून त्यांच्या पतींना यहोवाच्या मेंढरांची काळजी घेणे शक्य व्हावे.—पडताळा २ करिंथकर १२:१५.

१८ या विश्‍वासू बहिणींना आपण क्षुल्लक समजत नाही, हे आपण कसे दाखवू शकतो? अर्थात त्यांच्या पतींकडून अवाजवी अपेक्षा न ठेवण्याद्वारे. कृतज्ञतेच्या साध्या शब्दांतील सामर्थ्य देखील आपण विसरू नये. नीतिसूत्रे १६:२४ म्हणते: “ममतेची वचने मधाच्या पोळ्यासारखी मनाला गोड व हाडांस आरोग्य देणारी आहेत.” एक अनुभव पाहा. ख्रिस्ती सभा संपल्यानंतर एका वैवाहिक दांपत्याने एका वडिलांची भेट घेतली आणि आपल्या किशोरवयीन मुलाविषयी त्यांच्यासोबत बोलण्याची इच्छा व्यक्‍त केली. जेव्हा वडील त्या दांपत्यासोबत बोलत होते तेव्हा त्यांची पत्नी शांतपणे थांबून राहिली. त्यानंतर त्या किशोरवयीन मुलाची आई त्या वडिलांच्या पत्नीकडे गेली आणि तिला असे म्हणाली: “तुमच्या पतींनी माझ्या कुटुंबाला मदत करण्याकरता जो वेळ दिला त्याबद्दल मी तुमचे आभार मानते.” या कृतज्ञतेच्या साध्या, गोड शब्दांनी त्या वडिलांच्या पत्नींच्या हृदयाला स्पर्श केला.

१९. (अ) वडील, गट या नात्याने विश्‍वासूपणे कोणते काम पार पाडतात? (ब) आपण सर्वांनी काय करण्याचा निर्धार करण्यास हवा?

१९ मेंढरांकडे लक्ष देण्याकरता वडिलांची केलेली तरतूद यहोवाकडील एक “उत्तम देणगी” आहे. (याकोब १:१७) हे खरे आहे, की हे लोक परिपूर्ण नाहीत; आपल्या सर्वांप्रमाणे त्यांच्या हातूनही चुका होतात. (१ राजे ८:४६) तरीसुद्धा, गट या नात्याने जगभरातल्या मंडळ्यांतील वडील, यहोवाने त्यांच्यासाठी राखून ठेवलेले उद्देश अर्थात, कळपामध्ये सुधारणा करणे, उभारणी करणे, त्याला एकत्र ठेवणे आणि त्याचे संरक्षण करणे ही कामे विश्‍वासूपणे पूर्ण करत आहेत. प्रत्येक वडिलांनी यहोवाच्या मेंढरांची प्रेमळपणे काळजी घेत राहावी, अशाप्रकारे त्यांनी स्वतःला देणगी किंवा त्यांच्या बांधवांकरता आशीर्वाद असे स्वतःला शाबीत करावे. आणि आपण सर्वांनी असा निर्धार करावा की, “मनुष्यांतील दाने” असलेल्यांची आज्ञा पाळण्याद्वारे आणि त्यांच्या अधीन राहण्याद्वारे आणि त्यांच्या कठीण श्रमाबद्दल त्यांना मान देण्याद्वारे आपण त्यांचे कृतज्ञ असल्याचे दाखवून द्यावे. यहोवाने प्रेमळपणे अशा लोकांची तरतूद केल्यामुळे आपण त्याचे किती आभारी असले पाहिजे; हे लोक देवाच्या मेंढरांना असे म्हणतात: ‘हर्षाने देवाची सेवा करण्यात तुमची मदत करणे आमचे कर्तव्य आहे’!

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ मंडळीची तुलना शरीरासोबत करणे उचित का होऊ शकते?

◻ यहोवाची आनंदाने सेवा करण्याकरता वडील त्यांच्या बांधवांना कशाप्रकारे मदत करू शकतात?

◻ पुढाकार घेणाऱ्‍यांची आपण केवळ आज्ञाच मानू नये तर त्यांच्या अधीनही असावे ते का?

◻ वडिलांना आपण कोणत्या मार्गांनी मान देऊ शकतो?

[१६ पानांवरील चित्र]

वडील, इतरांनी केलेल्या मनःपूर्वक कामाची वाहवा करतात

[१७ पानांवरील चित्र]

वडील सेवाकार्यातील त्यांच्या आवेशी उदाहरणाद्वारे त्यांच्या कौटुंबिक सदस्यांना आणि इतरांना आनंदाने सेवा करण्याकरता मदत करू शकतात

[१८ पानांवरील चित्र]

फार श्रम करणाऱ्‍या आपल्या वडिलांची आपण कदर करतो!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा