बआल उपासना—इस्राएल लोकांची मने जिंकण्याकरता एक लढाई
जवळजवळ एक हजार वर्षे, इस्राएल लोकांची मने जिंकण्याकरता एक लढाई सुरू होती. या लढाईत एकीकडे अंधविश्वासावर आधारित असलेली भीती आणि लैंगिक विधी तर दुसऱ्या बाजूला विश्वास आणि निष्ठा होती. बआलाची उपासना आणि यहोवाची उपासना यांच्यातली ही जीवन-मरणाची लढाई होती.
इस्राएल राष्ट्र त्या खऱ्या देवाला विश्वासूपणे जडून राहील का, ज्याने त्यांना इजिप्तमधून मुक्त केले होते? (निर्गम २०:२, ३) की ते कनानी लोकांच्या आवडत्या बआल देवाकडे वळणार होते, ज्याने जमिनीला सुपीक करण्याची हमी दिली होती?
हजारो वर्षांपूर्वी झालेल्या या आध्यात्मिक लढाईशी आपलाही संबंध आहे. तो कसा? प्रेषित पौलाने लिहिले: ‘त्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण या युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी लिहून ठेवल्या आहेत.’ (१ करिंथकर १०:११) ही ऐतिहासिक लढाई कोणत्या अर्थाने आपल्याकरता उदाहरणादाखल आहे, हे आणखी स्पष्टपणे समजून घेण्यासाठी आपल्याला बआल कोण होता आणि बआलाच्या उपासनेत काय गोवलेले होते हे आधी समजावून घेणे आवश्यक आहे.
बआल कोण होता?
सा.यु.पू. १४७३ च्या आसपास इस्राएल लोक कनानमध्ये आले तेव्हा त्यांचा बआलाशी संबंध आला. त्यांना दिसून आले, की कनानी लोकही इजिप्तच्या लोकांप्रमाणेच अनेक दैवतांची उपासना करायचे; एवढेच, की या दैवतांची नावे आणि काही गुणलक्षणे वेगळी होती. पण बायबल कनानी लोकांचा प्रमुख देव म्हणून बआलाचाच उल्लेख करते आणि पुराणवस्तुशास्त्रज्ञाने शोधून काढलेल्या गोष्टींवरूनही त्याच्या श्रेष्ठत्वाचे प्रमाण मिळते. (शास्ते २:११) बआल, परम दैवत नसले तरी, बहुतेक कनानी लोक त्यालाच जास्त मानायचे. त्यांचा असा विश्वास होता, की बआल देवाचे पावसावर, वाऱ्यावर आणि ढगांवर प्रभुत्व आहे, आणि तोच केवळ लोकांना—तसेच त्यांच्या गुराढोरांना आणि पिकांना—नापीकपणापासून किंवा मृत्यूपासूनही सोडवू शकतो. त्यांचा असा समज होता, की मॉट, या संकटे आणणाऱ्या खुनशी कनानी देवापासून केवळ बआल त्यांचे संरक्षण करू शकत होता.
बआल उपासनेत पदोपदी लैंगिक विधींचा समावेश होता. बआलाशी संबंधित असलेल्या धार्मिक वस्तूही, जसे की पवित्र स्तंभ आणि पवित्र खांब यांनाही लैंगिक गर्भितार्थ होता. पवित्र स्तंभ—लिंगाचे प्रतीक असलेले खडक किंवा खास आकार दिलेले दगड—बआल दैवताचे, अर्थात, पुरुषाच्या जननेंद्रियाचे सूचक होते. दुसऱ्या बाजूला पाहता, पवित्र खांब लाकडी वस्तू किंवा झाडे होती. हे खांब अशेराचे अर्थात बआलाच्या पत्नीचे आणि स्त्रीच्या जननेंद्रियाचे सूचक होते.—१ राजे १८:१९.
मंदिरातील वेश्यावृत्ती आणि मुलांचे अर्पण हे बआल उपासनेचे इतर मूलभूत पैलू होते. (१ राजे १४:२३, २४; २ इतिहास २८:२, ३) बायबल आणि पुरातत्त्वविद्या (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते: “कनानी लोकांच्या मंदिरांत पुरुष आणि स्त्री वेश्या (“पवित्र” पुरुष आणि स्त्रिया) असायच्या आणि सर्व प्रकारचे अतिरेकी लैंगिक आचरण तेथे चालायचे. [कनानी] लोकांचा असा समज होता, की या लैंगिक विधींमुळे पीकपाणी आणि गुराढोरांची भरभराट होईल.” असे धार्मिकरित्या समर्थन करण्यात आले असले तरी अशाप्रकारची अनैतिकता निश्चितपणे बआलाच्या उपासकांच्या शारीरिक इच्छांना हवीहवीशी वाटणारी होती. तर मग, बआलाने इस्राएल लोकांची मने कशी जिंकली?
इतके आकर्षण कशाचे?
कदाचित अनेक इस्राएल लोकांना असे वाटत होते, की त्यांनी असा धर्म आचरावा ज्यामध्ये त्यांच्याकडून इतकी अपेक्षा केलेली नसेल. बआलाच्या उपासना करताना त्यांना शब्बाथ आणि इतर नैतिक मर्यादा अर्थात नियमशास्त्र पाळण्याची गरज राहिली नव्हती. (लेवीय १८:२-३०; अनुवाद ५:१-३) कनानी लोकांची झालेली भरभराट पाहून काही लोकांना कदाचित याची खात्री पटली असावी, की त्यांनी बआल दैवताला संतुष्ट केलेच पाहिजे.
कनानी लोकांच्या मंदिरांना उच्च स्थाने म्हणत; ही उच्च स्थाने डोंगरांच्या शिखरांवरील गर्द झाडींमध्ये वसलेली होती. आणि या आकर्षक पार्श्वभूमीत कनानी लोक सुफलतेचे विधीसंस्कार पार पाडत. कालांतराने, कनानी लोकांच्या पवित्र ठिकाणी जाऊन समाधान होत नसल्यामुळे इस्राएली लोकांनी स्वतःसाठी पवित्र स्थाने बांधली. “त्यांनी प्रत्येक उंच टेकडीवर, प्रत्येक हिरव्या झाडाखाली उच्च स्थाने, स्तंभ आणि अशेरा मूर्ति स्थापिल्या.”—१ राजे १४:२३; होशेय ४:१३.
पण बआल उपासनेचे सर्वात प्रमुख आकर्षण म्हणजे दैहिक वासनातृप्ती हे होते. (गलतीकर ५:१९-२१) या उपासनेत गोवलेले कामोत्तेजक विधी हे काही फक्त भरपूर पीक आणि गुराढोरांची बरकत यांच्यासाठीच नव्हते. या विधींतून लैंगिकतेचा गौरव केला जायचा. कामोत्तेजनाला सूचित करण्यासाठी लैंगिक हावभाव अतिशय ठळकपणे दाखवणारे असंख्य पुतळे उत्खननातून सापडले आहेत त्यांवरून याचा पुरावा मिळतो. या विधींसोबतच चालणाऱ्या मेजवान्या, नाच, संगीत इत्यादीमुळे असल्या अनैतिक वर्तणुकीसाठी अगदी पोषक वातावरण निर्माण होत असे.
शरद ऋतूत त्याकाळी अगदी सर्रास आढळणारे एक दृश्य आपण डोळ्यांपुढे उभे करू शकतो. अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे. यथेच्छ खाऊन-पिऊन मदमस्त झालेले बआलाचे उपासक नाचत आहेत. सुफलतेसाठी केल्या जाणाऱ्या या नृत्याचा उद्देश असा की बआल देवाने उन्हाळ्यातील आपल्या निद्रावस्थेतून जागे व्हावे जेणेकरून जमिनीवर त्याच्या वरदानाच्या रूपात पर्जन्य होईल. लिंगसूचक स्तंभांभोवती आणि पवित्र खांबांभोवती गोल गोल फिरून बआलाचे उपासक नाचत आहेत. त्यांच्या मुद्रा, विशेषतः मंदिरातील वेश्यांचे हावभाव अतिशय उत्तान आणि कामोत्तेजक आहेत. त्यातल्या त्यात, गाणेबजावणे आणि जमावाचे प्रोत्साहन यामुळे त्यांना अधिकच चेव येतो. आणि सहसा, या नृत्योत्सवाच्या अगदी कळसास पोचल्यावर ते अनैतिक संभोग करण्यासाठी बआलाच्या मंदिरातल्या खोल्यांमध्ये जातात.—गणना २५:१, २; पडताळा निर्गम ३२:६, १७-१९; आमोस २:८.
ते विश्वासाने नव्हे, तर डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालले
अशाप्रकारच्या कामुक उपासनेमुळे बरेचजण बआलाकडे आकर्षित झाले हे खरे असले तरीसुद्धा, इस्राएली लोकांना बआल उपासनेकडे खेचणारे आणखी एक कारण म्हणजे त्यांना वाटणारी भीती. इस्राएलांनी यहोवावर विश्वास ठेवण्याचे सोडल्यामुळे, मृतांची भीती, भवितव्याची भीती आणि आत्मिक शक्तींविषयी वाटणारे कुतूहल यामुळे त्यांनी भूतविद्या आचरण्यास सुरवात केली, आणि परिणामी अतिशय नीतिभ्रष्ट रितीरिवाजांमध्ये ते गुंतले. कनानी लोक मृतात्म्याला त्यांच्या पूर्वजांच्या उपासनेचा भाग म्हणून कशाप्रकारे आदर देत याविषयी दि इंटरनॅशनल स्टॅण्डर्ड बायबल एन्सायक्लोपीडिया वर्णन अशाप्रकारे करते: “कौटुंबिक कब्रस्थानात किंवा थडग्याजवळ सहसा मेजवानी दिली जात असे. त्यावेळी मद्य पिण्याचा आणि लैंगिक विधी (कदाचित यात कौटुंबिक सदस्यांतील संभोगाचाही समावेश असावा) पार पाडण्याचा रिवाज होता. आणि अशावेळी मृत व्यक्तीही त्यात भाग घेते असे समजले जात असे.” अशाप्रकारच्या घृणास्पद पैशाच्चिक चालिरीतींमध्ये भाग घेतल्यामुळे इस्राएल लोक आपला देव यहोवा यापासून अधिकाधिक दुरावत गेले.—अनुवाद १८:९-१२.
मूर्ती—आणि संबंधित विधी—यांमुळेही काही इस्राएल लोक बआल उपासनेकडे आकर्षित झाले; हे असे लोक होते जे विश्वासाने नव्हे, तर डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत होते. (२ करिंथकर ५:७) यहोवाच्या अदृश्य शक्तीचे इतके महान चमत्कार पाहून देखील इजिप्तमधून बाहेर पडलेल्या अनेक इस्राएल लोकांना अद्यापही देवाकडून दृश्य स्वरूपातील काही प्रकटन मिळण्याची गरज वाटत होती. (निर्गम ३२:१-४) त्यांच्या संतानांपैकीही काहींना बआलाच्या मूर्तीप्रमाणे काही दृश्य वस्तूची उपासना करणे अधिक पसंत पडले.—१ राजे १२:२५-३०.
कोण विजयी होतो?
इस्राएल लोकांचे मन जिंकण्यासाठीची लढाई शतकानुशतके चालली; म्हणजे, इस्राएल लोक वाग्दत्त देशात येण्यापूर्वी ते मोआबच्या खोऱ्यांत आले, त्या काळापासून त्यांना हद्दपार करण्यात आले होते त्या काळापर्यंत त्यांची मने जिंकण्यासाठीची लढाई शतकानुशतके चालूच होती. यादरम्यान, लढाईत कोण विजयी होईल हे स्पष्ट नव्हते. काही वेळा, इस्राएल लोकांपैकी बहुतेक जण यहोवाला एकनिष्ठ राहिले, पण बऱ्याचदा ते बआलाकडे वळाले. त्यांच्या सभोवताली असणाऱ्या मूर्तिपूजक लोकांचा सहवास हे त्यामागचे प्रमुख कारण होते.
युद्धात इस्राएलांकडून पराभव झाल्यानंतर कनानी लोकांनी अधिक धूर्त नीती पत्करली. इस्राएल लोकांमध्येच राहून आपल्यावर विजय मिळवलेल्या या लोकांना त्यांनी आपल्या देशातील दैवतांची उपासना करण्यास उत्तेजन दिले. गिदोन आणि शमुवेल यांसारख्या धैर्यशाली शास्त्यांनी कनानी लोकांच्या या उद्देशाला हाणून पाडले. शमुवेलाने लोकांना बजावले: ‘अन्य देवांस दूर करा . . . परमेश्वराकडे [यहोवाकडे] आपले चित्त लावून केवळ त्याचीच उपासना करा.’ काही काळापर्यंत इस्राएल लोकांनी शमुवेलाचा सल्ला ऐकला आणि ते “बआलदेव व अष्टारोथ यांस दूर करून केवळ परमेश्वराची [“यहोवाची,” NW] उपासना करू लागले.”—१ शमुवेल ७:३, ४; शास्ते ६:२५-२७.
शौल आणि दावीदाच्या राज्यानंतर शलमोन त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धात विदेशी दैवतांना अर्पणे वाहू लागला. (१ राजे ११:४-८) इस्राएल आणि यहुदाच्या अनेक राजांनी तसेच केले आणि स्वतःला बआल दैवताच्या हवाली सोपविले. पण एलीया, अलीशा आणि योशीया यांसारखे विश्वासू संदेष्टे आणि राजे बआल उपासनेविरुद्धच्या लढ्यात पुढे होते. (२ इतिहास ३४:१-५) याशिवाय, इस्राएलच्या संपूर्ण इतिहासात असे लोक होते जे यहोवाला विश्वासू राहिले. अहाब आणि ईजबेलच्या काळादरम्यानही जेव्हा बआल उपासनेचा उत्कर्ष झाला होता तेव्हाही असे सात हजार लोक होते ज्यांनी “बआलमूर्तीपुढे गुडघे टेकिले नाहीत.”—१ राजे १९:१८.
अखेरीस, यहुदी बॅबिलोनमधून परत आल्यानंतर त्यापुढे बआल उपासनेचा कोणताही उल्लेख आढळत नाही. एज्रा ६:२१ येथे सांगितल्याप्रमाणे सर्व इस्राएल लोक ‘देशाच्या मूर्तिपूजक लोकांच्या अशुद्धतेपासून दूर झाले आणि त्यांनी इस्राएलचा देव, यहोवा याचा शोध घेण्याचा निश्चय केला.’
बआल उपासनेपासून इशारा
बआल उपासना नाहीशी होऊन खूप काळ गेला असला तरी, कनानी धर्म आणि आजचा समाज यांत एक गोष्ट मात्र समान आहे—लैंगिकतेचा गौरव. अनैतिकता करायला भाग पाडणारे मोह सर्वत्र आहेत, जणू आपण श्वास घेतो त्या हवेतच ते भिनलेले आहेत. (इफिसकर २:२, NW) “आजच्या जगावर नियंत्रण ठेवणाऱ्या अदृश्य शक्तीच्या विरोधात आणि दुष्टाईच्या अगदी मुख्यालयातील आत्मिक प्रतिनिधीच्या विरोधात आपण आहोत,” असा पौलाने इशारा दिला.—इफिसकर ६:१२, फिलिप्स भाषांतर.
सैतानाची ही “अदृश्य शक्ती” लोकांना आध्यात्मिकरीत्या दास करण्याकरता लैंगिक अनैतिकतेला उत्तेजन देत आहे. (योहान ८:३४) आजच्या नीतिभ्रष्ट समाजात लैंगिक स्वैराचार सुफलेच्या विधीसंस्कारांच्या रूपात नव्हे, तर आत्मसंतुष्टी मिळवण्यासाठी किंवा स्वतःला पटेल, आवडेल ते करण्यासाठी आचरला जातो. फलत्वाच्या विधीप्रमाणे आचरली जात नाही, तर स्वतःला हवे असलेली गोष्ट पूर्ण करण्यासाठी किंवा “आपल्या मर्जीप्रमाणे” वागण्याकरता लैंगिकतेकडे पाहिले जाते. तसेच लैंगिकतेविषयी चालणारा प्रसारही काही कमी मोहक नाही. मनोरंजन, संगीत आणि जाहिरातबाजी यांद्वारे लैंगिकतेला बढावा देणाऱ्या गोष्टींचा लोकांच्या मनांवर सतत भडिमार केला जातो. हा हल्ला देवाच्या सेवकांवरही होतो. खरे तर, ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत केलेल्यांपैकी बहुतेक लोक अशाप्रकारच्या अनैतिक कामांमुळेच बहिष्कृत करण्यात आले होते. अशाप्रकारच्या अनैतिक सूचनांचा सतत धिक्कार करत राहिल्यानेच ख्रिस्ती व्यक्ती शुद्ध राहू शकते.—रोमकर १२:९.
विशेषतः तरुण साक्षीदारांना हा धोका आहे कारण त्यांना आकर्षक वाटणाऱ्या बहुतेक गोष्टी लैंगिकतेच्या आवरणात सादर केलेल्या असतात. शिवाय, अनैतिक कामे करण्याकरता त्यांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इतर तरुणांच्या प्रभावालाही त्यांना तोंड द्यावे लागते, आणि हे सोपे नसते. (पडताळा नीतिसूत्रे १:१०-१५.) अनेक तरुण, विशेषतः मोठ्या सामाजिक मेळाव्यांत सहभागी झाले असताना अनैतिकतेच्या मोहाला बळी पडतात. प्राचीन काळातील बआल उपासनेत होते त्याप्रमाणे संगीत, नाच आणि लैंगिक मोह यांच्या एकसाथ होणाऱ्या कुप्रभावाला ते बळी पडतात.—२ तीमथ्य २:२२.
“तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील?” स्तोत्रकर्त्याने विचारले. तो स्वतःच उत्तर देतो: “तुझ्या [यहोवाच्या] वचनानुसार तो राखण्याने.” (स्तोत्र ११९:९) कनानी लोकांशी जास्त जवळीक ठेवू नये अशी देवाच्या नियमशास्त्राने जशी इस्राएलांना आज्ञा दिली होती तसेच बायबल आपल्यालाही अनुचित संगतीच्या धोक्यांविषयी जागरूक करते. (१ करिंथकर १५:३२, ३३) एखादी गोष्ट कितीही मोहक किंवा आकर्षक वाटत असली तरीसुद्धा ती नैतिक दृष्टीने धोकेदायक आहे हे माहीत असते तेव्हा अशा गोष्टीला स्पष्ट नकार देऊन ख्रिस्ती तरुण आपली परिपक्वता दाखवू शकतात. एलीयाप्रमाणे आपण समाजात प्रचलित असलेल्या विचारसरणीच्या आधारावर आपले निर्णय घेऊ शकत नाही.—१ राजे १८:२१; पडताळा मत्तय ७:१३, १४.
दुसरा इशारा हा विश्वास गमावण्यासंबंधी आहे, जे ‘सहज गुंतविणारे पाप आहे.’ (इब्री लोकांस १२:१) असे दिसून येते, की यहोवावर अनेक इस्राएल लोकांचा विश्वास होता, पण आपल्या पिकपाण्याचे संरक्षण करणारा आणि दररोजच्या गरजा पुरवणारा म्हणून त्यांनी बआलाकडे डोळे लावले. त्यांना कदाचित असे वाटले असावे, की जेरुसलेममधील यहोवाचे मंदिर खूप दूर आहे आणि त्याच्या नियमांचे पालन करणेही सोयीचे नाही. बआलाची उपासना त्याच्या तुलनेत सोईस्कर आणि सोपी होती—आपापल्या घरांच्या धाब्यांवर बआलाकरता धूप जाळले तरी चालण्यासारखे होते. (यिर्मया ३२:२९) केवळ काही मूर्तिपूजक विधींचे पालन करण्यापासून सुरवात होऊन किंवा सुरवातीला यहोवाच्या नावाने बआल दैवताला अर्पणे वाहता वाहता ते हळूहळू बआल उपासनेत गुंतले गेले असावेत.
आपण कशाप्रकारे विश्वास गमावून जिवंत देवापासून हळूहळू दूर जाऊ शकतो? (इब्री लोकांस ३:१२) सुरवातीला आपल्याला सभांचे आणि संमेलनांचे जे महत्त्व वाटायचे, ते हळूहळू कमी होऊ शकते. अशाप्रकारच्या मनोवृत्तीमुळे ‘यथाकाळी आध्यात्मिक अन्न’ पुरवण्याकरता यहोवाने केलेल्या तरतुदीवर आपल्याला विश्वास नाही हे दिसून येते. (मत्तय २४:४५-४७) अशाप्रकारे कमजोर झाल्यावर, भौतिक गोष्टींच्या मागे लागण्याद्वारे किंवा अनैतिकतेत गुंतल्यामुळे कदाचित ‘जीवनाच्या वचनावरील आपली पकड’ सैल होण्याची किंवा दोन्ही डगरींवर पाय ठेवण्याची प्रवृत्ती आपल्यात निर्माण होण्याची शक्यता आहे.—फिलिप्पैकर २:१५, NW; पडताळा स्तोत्र ११९:११३.
आपल्या सचोटीला जडून राहणे
यात कोणतीही शंका नाही, की आजही लोकांची मने जिंकण्यासाठी एक युद्ध चालू आहे. आपण यहोवाला एकनिष्ठ राहू का, की या जगाच्या स्वैराचारी वर्तनाला अनुसरून देवाच्या मार्गापासून दूर होऊ? खेदाची गोष्ट म्हणजे, कनानी लोकांच्या किळसवाण्या रितीरिवाजांचे इस्राएल लोकांनी जसे अनुकरण केले त्याप्रमाणेच काही ख्रिस्ती स्त्री-पुरुषांनीही मोहाला बळी पडून लज्जास्पद कामे केली आहेत.—पडताळा नीतिसूत्रे ७:७, २१-२३.
मोशेप्रमाणे ‘अदृश्य देवाला पाहत धीर धरल्यास’ अशाप्रकारचा आध्यात्मिक पराजय आपण टाळू शकतो. (इब्री लोकांस ११:२७) होय, आपल्याला “विश्वासाकरता कठीण लढा” द्यावा लागेल. (यहूदा ३, NW) पण, आपल्या देवाशी आणि त्याच्या तत्त्वांशी एकनिष्ठ राहिल्याने खोटी उपासना कायमची नष्ट झालेल्या भवितव्याची आपण आस धरू शकतो. यहोवाच्या उपासनेने बआलाच्या उपासनेवर विजय मिळवला त्याचप्रमाणे आपण या गोष्टीचीही पूर्ण खात्री बाळगू शकतो, की ‘सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या [यहोवाच्या] ज्ञानाने पृथ्वी [“निश्चितच,” NW] परिपूर्ण होईल.”—यशया ११:९.
[३१ पानांवरील चित्र]
बआल उपासनेत वापरण्यात आलेले पवित्र स्तंभाचे गेजेरमधील अवशेष
[२८ पानांवरील चित्राचे श्रेय]
Musée du Louvre, Paris