सरकारी अधिकाऱ्यांकडून साक्षीदारांची स्तुती
यहोवाच्या साक्षीदारांना स्पेनमध्ये, मॅड्रीडच्या नैर्ऋत्येस सुमारे ५०० किलोमीटर अंतरावर वसलेल्या कॅथीथ नावाच्या बंदरी गावाच्या नगराध्यक्षा, डॉना टेओफीला मार्टीनेस यांनी एक प्रशंसापत्र (वरील) बहाल केले. त्यावर असा मजकूर आहे: “यहोवाच्या साक्षीदारांनी शहरप्रशासनाला सहकार्य आणि योगदान दिल्याबद्दल त्यांची प्रशंसा करण्याकरता कॅथीथ नगरपालिकेतर्फे.” साक्षीदारांना हा सन्मान का देण्यात आला?
नगरपालिका स्टेडियमच्या काही भागाच्या यहोवाच्या साक्षीदारांनी केलेल्या नविनीकरणाची ही एक पावती होती. करान्झा फुटबॉल स्टेडियमच्या तळमजल्यावर असलेल्या प्रसाधनगृहांच्या पुनर्बांधणीसाठी मागील बऱ्याच दिवसांपासून, शेकडो साक्षीदारांनी सप्ताहांतांना येऊन स्वेच्छेने श्रमदान केले. साक्षीदारांनी बसवलेले पाईप, नळ, आणि फ्लोअरिंगमुळे आता या स्टेडियमचा उपयोग करणाऱ्या सर्वांना या सुविधांचा फायदा होत आहे.
बऱ्याच काळापासून यहोवाच्या साक्षीदारांचे कॅथीथ नगर प्रशासनाशी सलोख्याचे संबंध राहिले आहेत. दरवर्षी यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रांतीय अधिवेशनाकरता कॅथीथ नगरपालिका करान्झा स्टेडियम खुले करते. यामुळे त्यांच्यासाठी हे स्टेडियम सुस्थितीत ठेवण्यासाठी आपल्याकडून होईल तितके करण्यास साक्षीदारांना आनंदच वाटतो.
अधूनमधून असे श्रमदान करण्याव्यतिरिक्त, यहोवाचे साक्षीदार नियमितपणे या शहराच्या वेगवेगळ्या परिसरांत जाऊन एका वेगळ्या प्रकारची समाजसेवा करतात. ते देवराज्याच्या ‘सुवार्तेची’ घोषणा करतात. अर्थात, लोकांकडून आपली वाहवा व्हावी म्हणून ते काही जाहीर सेवाकार्यात सहभागी होत नाहीत. तर, ‘राज्याची सुवार्ता गाजवण्याची’ आणि ‘सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य बनविण्याची’ येशूने जी आज्ञा दिली आहे तिचे पालन करण्याकरता ते प्रचार करतात. (मत्तय २४:१४; २८:१९) अशाप्रकारे, यहोवाचे साक्षीदार लोकांना ‘न्याय्यत्वाच्या मार्गाचे’ शिक्षण देऊन त्यांची सेवा करतात.—नीतिसूत्रे १२:२८.