परादीसच्या शोधात
पास्कल स्टीझी यांनी सांगितल्याप्रमाणे
त्या दिवशी खूपच रात्र झाली होती आणि फ्रान्सच्या दक्षिणेकडे वसलेल्या बेझ्ये शहराच्या रस्त्यांवर अगदी शुकशुकाट होता. धार्मिक पुस्तकांची विक्री करणाऱ्या एका दुकानाला नुकताच रंग दिलेला पाहिल्यानंतर, मी आणि माझ्या मित्रानं नीत्झे या जर्मन तत्त्वज्ञानाचे शब्द त्या भिंतीवर मोठमोठ्या काळ्या अक्षरात लिहिले: ‘सर्व देव मुर्दाबाद. सुपरमॅन जिंदाबाद!’ असले प्रकार मी का करू लागलो?
फ्रान्समध्ये, एका इटालियन कुळातील कॅथलिक धार्मिक कुटुंबात १९५१ साली माझा जन्म झाला. लहानपणी, आम्ही इटलीच्या दक्षिण भागात सुटीला जायचो. तेथे प्रत्येक गावात कुमारी मरियाची मूर्ती असायची. कधीकधी डोंगरांतून मरियाच्या प्रचंड सजवलेल्या मूर्तींच्या खूप मोठ्या मिरवणुका निघायच्या. माझे आजोबा त्या मिरवणुकीला मलाही घेऊन जायचे; मी त्यांच्या मागेमागे जायचो खरा, पण या सर्व गोष्टींवर माझा मुळीच विश्वास नव्हता. जेसूट लोकांतर्फे चालवण्यात येणाऱ्या शाळेतून मी माझे मूलभूत शिक्षण पूर्ण केले. पण देवावर माझा विश्वास बसेल असे काही तेथे ऐकल्याचं मला आठवत नाही.
मॉन्टपेलियरच्या वैद्यकीय विद्यापीठात दाखल झाल्यानंतरच मी जीवनाच्या उद्देशाविषयी विचार करू लागलो. माझ्या वडिलांना युद्धात दुखापत झाली होती आणि त्यांना वारंवार डॉक्टरांची गरज पडायची. युद्धात जखमी झालेल्या लोकांवर उपचार करण्याकरता इतका वेळ आणि श्रम वाया घालवण्यापेक्षा युद्धेच थांबवलीत तर बरं होणार नाही का? पण नेमकं त्याच दरम्यान व्हिएतनामचं युद्ध जोरात सुरू होतं. उदाहरणार्थ, माझ्या मते फुफ्फुसाच्या कर्कावर एकच तार्किक उपाय म्हणजे कर्करोगाला कारणीभूत ठरणारं कारणच—तंबाखू दूर करणं. विकसनशील देशांतील कुपोषणामुळे आणि श्रीमंत देशांतील अतिसेवनामुळे होणाऱ्या आजारांविषयी काय? दुःखद परिणाम दूर करण्याकरता उपचार करण्याऐवजी त्यांस कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टीच काढून टाकल्या तर ते अधिक चांगले होणार नाही का? पृथ्वीवर एवढे दुःख का आहे? या विध्वंसक समाजात काहीतरी भयंकर दोष आहे आणि त्याकरता शासन जबाबदार आहे असं मला वाटू लागलं.
माझं आवडतं पुस्तक एका राजद्रोह्यानं लिहिलं होतं आणि त्याच्या पुस्तकातील विधानं मी भिंतीवर उतरवायचो. कालांतराने मी सुद्धा एक असा राजसत्ताविरोधी झालो, ज्याच्याकडे कोणताही विश्वास किंवा नैतिक नियम नव्हते, ज्याला कोणत्याही देवाची किंवा अधिकाराची गरज नव्हती. माझ्या नजरेत, देव किंवा धर्म या आम्हा बाकीच्या लोकांवर वर्चस्व गाजवण्यासाठी किंवा आमचा फायदा घेण्यासाठी श्रीमंत आणि सामर्थ्यशाली लोकांनी शोधून काढलेल्या गोष्टी होत्या. जणू ते असे म्हणत होते की, ‘आमच्याकरता या पृथ्वीवर राबा म्हणजे स्वर्गातील परादीसमध्ये त्याचं फार मोठं प्रतिफळ तुम्हाला मिळेल.’ पण देवाचे राज्य आता संपले होते. हे लोकांना सांगण्याची गरज होती. हे त्यांना सांगण्याचा एक मार्ग म्हणजे, भिंतीवर लिहिणं.
त्याचा परिणाम असा झाला, की माझं अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागलं. त्या काळादरम्यान, भूगर्भशास्त्र आणि परिस्थितिकीशास्त्र यांचा अभ्यास करण्याकरता बंडखोर लोकांकडून चालवण्यात येणाऱ्या मॉन्टेपेलियरच्या दुसऱ्या विद्यापीठात मी दाखल झालो. मी परिस्थितिकीशास्त्राचा जितका अधिक अभ्यास करत गेलो तितकाच मी आपल्या सुंदर ग्रहावरचे प्रदूषण पाहून निराश होत गेलो.
दर वर्षी उन्हाळ्याच्या सुटीत मी भटकंती करायचो. या भटकंतीमध्ये मी संपूर्ण युरोपचा हजारो किलोमीटरचा भूप्रदेश पायाखाली घालायचो. प्रवास करताना आणि शेकडो वाहन चालकांशी बोलताना, मानवी समाजाचा कसा ऱ्हास आणि नाश होत आहे हे मी स्वतः अनुभवलं. परादीसच्या शोधात एकदा मी क्रीटच्या बेटावरील सुंदर समुद्रकिनाऱ्यांवर येऊन पोहंचलो; त्या समुद्रकिनाऱ्यांवर तेलाचा तवंग आलेला मी पाहिला. खूप वाईट वाटलं. या धरतीवर परादीसचा एखादा कोपराही शिल्लक राहिलेला नाही का?
शेतीवाडीकडे परतणे
समाजावर ओढावलेल्या अरिष्टांवर उपाय म्हणजे लोकांनी शेतीवाडीकडे परतावं, असा प्रचार फ्रान्समधील परिस्थिती-विज्ञानाचे पुरस्कर्ते करत होते. मेहनत करण्याची माझी इच्छा होतीच. म्हणून मी खेडेगावी जाऊन तेथे एक दगडी बांधकाम केलेलं घर विकत घेतलं. फ्रान्सच्या दक्षिणेकडील पर्वतरांगाच्या खाली असलेल्या छोट्याछोट्या टेकड्यांमध्ये हे घर वसलेलं होतं. माझ्या घराच्या दरवाजावर मी “परादीस येथे” हे अमेरिकी हिप्पी लोकांचं घोषवाक्य लिहिलं. एकदा एक जर्मन युवती आमच्या गावात आली. माझी तिच्याशी मैत्री झाली आणि आम्ही दोघं लग्न न करता एकत्र राहू लागलो. मेयरच्या हातून म्हणजे सरकारच्या एका प्रतिनिधीच्या हातून लग्न लावून घेणे तर मला मुळीच मंजूर नव्हते. आणि चर्चमध्ये लग्न केलं तर? ते तर त्याहून नकोसे होते!
बहुतेक वेळा आम्ही अनवाणी चालत असू आणि त्यावेळी माझे केस आणि दाढी वाढलेली होती. फळे आणि भाज्या यांची शेती करणं मला आवडू लागलं. उन्हाळ्यात आकाश निळंभोर असायचं आणि किड्यांची किरकिर कानावर पडायची. रानातील फुलांच्या सुगंधाने आसमंत अगदी भरून जायचा आणि भूमध्यतीराच्या क्षेत्रातील फळं—द्राक्षं आणि अंजिरं—किती रसाळ होती! परादीसातला आमचा लहानसा कोपरा जणू आम्हाला गवसला होता.
देवावरील विश्वास जागृत
विद्यापीठात असताना मी कोशिकेय जीवशास्त्र, गर्भवृद्धिशास्त्र तसेच शरीरशास्त्र यांचा अभ्यास केला होता आणि या संरचनांतील क्लिष्टता आणि सुसंगतता पाहून मी खूपच प्रभावित झालो होतो. आता मात्र दररोज सृष्टीच्या सान्निध्यात राहून त्यावर चिंतन आणि त्याचे जवळून निरीक्षण करता येत असल्यामुळे सृष्टीचे सौंदर्य आणि शक्ती पाहून मला आणखीनच नवल वाटू लागलं. दररोज सृष्टीचं एक एक पान माझ्यासमोर उलगडत गेलं, निसर्ग माझ्याशी बोलू लागला. एके दिवशी मी टेकड्यांवर लांबपर्यंत फिरायला गेलो आणि त्यादिवशी जीवनाविषयी खूप गहन विचार केल्यावर मी या निष्कर्षाप्रत पोहंचलो, की निर्माणकर्ता हा असलाच पाहिजे. देवावर विश्वास ठेवण्याचं मी मनातल्या मनातच ठरवलं. यापूर्वी मला एकप्रकारचा रिक्तपणा जाणवायचा, एकाकीपणाची भावना मनाला टोचत राहायची. पण ज्या दिवशी मी देवावर विश्वास करू लागलो, त्या दिवशी मी मनात म्हटले, ‘पास्कल, आता तू कधीच एकटा राहणार नाहीस.’ यापूर्वी मला कधीच असं वाटलं नव्हतं.
काही काळानंतर मला आणि माझ्यासोबत राहणाऱ्या माझ्या मैत्रिणीला एक मुलगी झाली—आम्ही तिचं नाव ॲमन्डीन ठेवलं. ती मला जीव की प्राण होती. आता मी देवावर विश्वास ठेवायला लागलो होतो त्यामुळे मला माहीत असलेल्या काही नैतिक नियमांप्रमाणे मी चालू लागलो. चोरी करण्याचं तसेच खोटं बोलण्याचं मी थांबवलं आणि मला लवकरच कळून आलं, की माझ्या या वागण्यामुळे माझ्या आसपासच्या लोकांसोबत होणाऱ्या बऱ्याच समस्या मला टाळता आल्या. हे खरं आहे, की आमच्या काही समस्या होत्या आणि मला ज्या परादीसची अपेक्षा होती त्यामानाने माझे हे परादीस काहीच नव्हतं. द्राक्षाचं पीक घेणारे काही स्थानिक लोक किटकनाशके आणि वनस्पतीऔषधे वापरायचे; यामुळे माझ्या पिकांनाही नुकसान व्हायचे. शिवाय, दुष्टतेस कोणती गोष्ट कारणीभूत आहे, या माझ्या प्रश्नाचं उत्तर मला अद्यापही मिळालेलं नव्हतं. तसेच, कौटुंबिक जीवनावर मी पुष्कळ वाचलं असलं, तरी माझ्यासोबत राहणाऱ्या मैत्रिणीशी माझे वारंवार खटके उडायचे. आम्हाला मोजकेच मित्र होते आणि तेही सर्वच्या सर्व विश्वासघातकी होते; त्यांपैकी काही जणांनी तर माझ्या मैत्रिणीला मला धोका द्यायला भाग पाडण्याचा प्रयत्न केला. माझ्या परादीसपेक्षा एक चांगलं परादीस निश्चित असलं पाहिजे.
माझ्या प्रार्थनांना उत्तर
माझ्या स्वतःच्या पद्धतीनं मी बऱ्याचदा देवाला प्रार्थना करत असे, की त्यानं मला जीवनात मार्गदर्शन करावं. एका रविवारी सकाळी ईरेन लोपेस नामक एक मनमिळावू स्त्री तिच्या लहान मुलासह आमच्या घरी आली. ती यहोवाची साक्षीदार होती. तिला काय म्हणायचं ते मी ऐकून घेतलं आणि या विषयावर आणखी चर्चा करण्याकरता तिनं विचारलं, त्यालाही मी तयार झालो. त्यानंतर दोन माणसं मला भेटायला आली. आमच्या चर्चेतून दोन गोष्टी माझ्या आठवणीत राहिल्या—परादीस आणि देवाचं राज्य. ते विचार मी माझ्या मनात तसेच ठेवले आणि काही महिन्यांनंतर मला याची जाणीव झाली, की विवेक शुद्ध ठेवायचा असल्यास आणि खरा आनंद हवा असल्यास मला देवाच्या दर्जांनुरूप आपल्या जीवनात फेरबदल करावे लागतील.
देवाच्या वचनानुसार आम्हा दोघांचं जीवन असावं म्हणून माझी मैत्रीण माझ्याशी लग्न करायला सुरवातीला तयार झाली. पण नंतर ती देवाची आणि त्याच्या नियमांची थट्टा करणाऱ्या वाईट लोकांच्या कचाट्यात सापडली. वसंत ऋतूच्या एका संध्याकाळी घरी परतल्यानंतर मला धक्काच बसला. घर अगदी रिकामं पडलं होतं. माझी मैत्रीण मला सोडून गेली होती आणि सोबत आमच्या तीन वर्षांच्या मुलीलाही ती घेऊन गेली होती. कित्येक दिवस मी तिच्या परतण्याची वाट पाहिली, पण ती काही आली नाही. या गोष्टीचं खापर देवावर फोडण्याऐवजी मी मदतीकरता त्याच्याकडे प्रार्थना केली.
या घटनेच्या काही काळानंतर, मी बायबल घेतलं आणि माझ्या अंजिराच्या झाडाखाली बसून ते वाचू लागलो. खरं तर देवाचं वचन माझ्या अंतःकरणांत मी उतरवत होतो. मी यापूर्वी मनोविश्लेषकांची आणि मानसशास्त्रज्ञांची कित्येक पुस्तकं वाचली होती, पण अशाप्रकारचं सुज्ञान कधीच माझ्या वाचण्यात आलं नव्हतं. हे पुस्तक निश्चितच ईश्वरी प्रेरणेनं लिहिण्यात आलं असावं. येशूची शिकवण आणि मानवी स्वभावाविषयी त्याला असणारी जाण यांमुळे मी स्तंभित झालो. स्तोत्रसंहितेचं पुस्तक वाचून मला खूप सांत्वन मिळालं आणि नीतिसूत्रातील व्यवहारी बुद्धीने मी आश्चर्यचकित झालो. मला लगेच ही गोष्ट समजली, की देवाजवळ येण्याकरता सृष्टीचा अभ्यास करणं उत्तम असलं तरीही, त्यातून ‘देवाच्या कार्यक्षेत्राच्या केवळ सीमाच’ कळू शकतात.—ईयोब २६:१४.
सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते आणि तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे ही पुस्तकंही साक्षीदारांनी मला दिली होती.a ती वाचल्यानंतर माझे डोळे उघडले. मनुष्य आज सगळीकडे प्रदुषण, युद्धं, वाढता हिंसाचार आणि आण्विक विध्वंसाचा धोका यांसारख्या गोष्टींना का तोंड देत आहे हे मला सत्य हे पुस्तक वाचल्यानंतर कळलं. माझ्या बागेत बसून मला आकाशात लालसर रंगाची छटा दिसल्यास दुसऱ्या दिवशी हवामान चांगलं असेल याची कल्पना मला यायची त्याप्रमाणे या घटनांमुळे देवाचे राज्य अगदी जवळ आले आहे याची मला खात्री पटली. कौटुंबिक जीवन हे पुस्तक वाचले तेव्हा मला वाटले, की हे पुस्तक मला माझ्या मैत्रिणीला देता आले असते आणि बायबलच्या सल्ल्याप्रमाणे वागल्यास आपण आनंदी होऊ हे तिला जर सांगता आले असते तर किती बरे झाले असते. पण आता ते शक्य नव्हते.
आध्यात्मिक प्रगती
मला आणखी माहिती हवी होती त्यामुळे मला परत भेटावं असं मी रॉबर्ट या साक्षीदाराला सांगितलं. मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे असं मी त्याला सरळ सांगितलं तेव्हा त्याला जरा धक्काच बसला आणि अशाप्रकारे माझा बायबल अभ्यास सुरू झाला. मी जे शिकत होतो त्याविषयी मी दुसऱ्यांना लगेच सांगू लागलो आणि राज्य सभागृहात मिळणारी प्रकाशनंही मी इतरांना देऊ लागलो.
चरितार्थ चालवण्याकरता मी गवंडीकामाचे प्रशिक्षण घेण्यासाठी नाव दाखल केले. देवाच्या वचनामुळे एखाद्या व्यक्तीवर किती चांगला परिणाम होऊ शकतो याची जाणीव असल्यामुळे मी माझ्यासोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि माझ्या शिक्षकांना अनौपचारिकरीत्या प्रचार करण्याची एकही संधी सोडत नव्हतो. एके सायंकाळी माझी सर्ज सोबत गॅलरीमध्ये गाठ पडली. त्याच्या हातांत काही मासिकं पाहून मी त्याला म्हटलं: “वाचण्याची खूप आवड दिसते तुला?” “हो, पण हे वाचून मला अगदी कंटाळा आलांय,” तो म्हणाला. “तुला वाचण्याकरता खरोखरच काही चांगलं हवंय का?,” मी त्याला विचारलं. मग देवाच्या राज्याच्या विषयावर आमची छान चर्चा झाली, आणि त्यानं माझ्याकडून काही बायबल साहित्यही घेतलं. त्यानंतरच्याच आठवड्यात तो माझ्यासोबत राज्य सभागृहात आला आणि त्याने बायबल अभ्यासाला सुरवात केली.
मला घरोघरच्या प्रचारकार्यात भाग घेता येईल का, असं मी एके दिवशी रॉबर्टला विचारलं. त्यानं आपलं कपाट उघडलं आणि मला त्यातून एक सूट काढून दिला. पुढच्याच रविवारी मी त्याच्यासोबत पहिल्यांदाच सेवाकार्याला गेलो. अखेरीस, मार्च ७, १९८१ रोजी मी यहोवाला माझ्या समर्पणाचं प्रतिक म्हणून बाप्तिस्मा घेतला.
निराशेच्या काळात मदत
ॲमन्डीन आणि तिची आई परदेशात कोठे राहते हे त्या काळादरम्यान मी शोधून काढलं होतं. पण तिच्या आईनं—कायदेशीररीत्या, राहत असलेल्या देशाच्या नियमांनुसार—ॲमन्डीनला भेटण्याकरता मला नकार दिला. मी अगदी खचून गेलो. ॲमन्डीनच्या आईनं दुसरं लग्न केलं. आणि तिच्या नवऱ्याने माझी परवानगीही न मागता माझ्या मुलीला दत्तक घेतले; याची अधिकृत सूचना मिळाली तेव्हा मला असह्य दुःख झाले. आता मला माझ्या मुलीवर कोणताही अधिकार राहिला नव्हता. कायदेशीर कारवाई करूनही मला तिला भेटण्याची परवानगी मिळाली नाही. मानसिक दडपणामुळे माझी अशी दशा झाली की पाठीवर जणू मी पाचपन्नास किलोचं वजन वागवतोय असं मला वाटायचं.
पण यहोवाच्या वचनातून मला तग धरण्यास विविध प्रकारे मदत मिळाली. एकदा मी अतिशय खिन्न होतो तेव्हा मी नीतिसूत्रे २४:१० येथील शब्द वारंवार म्हटले: “संकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्ति अल्प होय.” या वचनाने मला अक्षरशः सावरले. दुसऱ्या एका प्रसंगी, माझ्या मुलीला भेटण्यात पुन्हा एकदा अपयश आल्यानंतर, मी सेवाकार्याकरता बाहेर पडलो; तेव्हा स्वतःला सावरण्याकरता पुस्तकांच्या बॅगचा बंद मला हातांत अगदी घट्ट धरून ठेवावा लागला. अशाप्रकारच्या कठीण प्रसंगी, स्तोत्र १२६:६ यातील सत्य मला अनुभवता आलं, “जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो, तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन येईल.” एक महत्त्वाचा धडा मी शिकलो तो म्हणजे, तुमच्यासमोर गंभीर समस्या असतात तेव्हा त्यांतून पार होण्याकरता तुम्ही तुमच्या परीने केल्यानंतर तुम्ही त्यांचा वारंवार विचार करता कामा नये, तर यहोवाच्या सेवेत आणखी करण्याचा निर्धार करावा. आपला आनंद टिकवून ठेवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.
एक सरस ध्येय
माझ्यातील बदल पाहून माझे आईवडील, विद्यापीठातील माझं शिक्षण पूर्ण करण्याकरता मला मदत करायला तयार झाले. मी त्यांचे मनापासून आभार मानले, पण आता माझ्यासमोर दुसरंच ध्येय होतं. मानवी तत्त्वज्ञान, गूढवाद आणि ज्योतिषशास्त्र यांपासून सत्यानं मला मुक्त केलं होतं. युद्धामध्ये एकदुसऱ्याला केव्हाही न मारणारे खरे मित्र मला आता मिळाले होते. पृथ्वीवर इतके दुःख का आहे या प्रश्नाचंही उत्तर अखेरीस मला मिळालं होतं. कृतज्ञतेनं, पूर्ण सामर्थ्यानिशी देवाची सेवा करण्याची आता माझी इच्छा होती. येशूने सेवाकार्याकरता स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलं होतं आणि त्याच्या उदाहरणाचं अनुकरण करण्याचं माझं ध्येय होतं.
सन १९८३ मध्ये, मी गवंडीकामाचा व्यवसाय करण्याचं सोडून पूर्णवेळेचा सेवक बनलो. स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरता एका पार्कमध्ये अर्धवेळेची नोकरी लागल्यामुळे मला माझ्या प्रार्थनेचं उत्तर अनायासे मिळालं होतं. गवंडीकाम शिकत असताना मी सर्ज नावाच्या ज्या तरुणाला साक्ष दिली होती, त्याच्यासोबतच पायनियर प्रशालेला उपस्थित राहणं किती आनंदाचं होतं! तीन वर्षं नियमित पायनियर म्हणून काम केल्यानंतर यहोवाच्या सेवेत आणखी करावं असं मला वाटू लागलं. आणि १९८६ मध्ये पॅरिसपासून जवळच असलेल्या प्रोवां नावाच्या एका सुंदर गावात खास पायनियर म्हणून मला नियुक्त करण्यात आलं. कित्येकदा, संध्याकाळी घरी आल्यानंतर मी गुढगे टेकून यहोवाचे आभार मानत असे, की त्याच्याविषयी लोकांसोबत बोलण्याकरता त्याने मला एक आनंददायक दिवस दिला. खरं तर, मला जीवनात सर्वाधिक आनंद देणाऱ्या दोन गोष्टी आहेत त्या म्हणजे, देवासोबत बोलणं आणि देवाविषयी बोलणं.
फ्रान्सच्या दक्षिण भागातील सेबासें या खेडेगावात राहणाऱ्या माझ्या ६८ वर्षांच्या आईचा बाप्तिस्मा झाला, तेव्हा सुद्धा मला खूप खूप आनंद झाला. आईने बायबल वाचायला सुरवात केली तेव्हाच मी तिच्याकरता टेहळणी बुरूज आणि सावध राहा! या नियतकालिकांची वर्गणी केली. ती विचारक्षम व्यक्तिमत्त्वाची होती आणि आपण जे वाचत आहोत ते सत्य आहे हे तिला कळलं होतं.
बेथेल—एक विलक्षण आध्यात्मिक परादीस
वॉच टावर संस्थेने खास पायनियर कमी करायचे ठरवले तेव्हा मी सेवा प्रशिक्षण प्रशाला आणि फ्रान्समधील यहोवाच्या साक्षीदारांचे शाखा दफ्तर, बेथेल या दोन्हीकरता अर्ज केला. यहोवाची सेवा करण्याकरता कोणता मार्ग माझ्याकरता सर्वोत्तम आहे हे ठरवण्याचे मी त्याच्यावरच सोडून दिले. काही महिन्यानंतर, डिसेंबर १९८९ मध्ये फ्रान्सच्या वायव्य दिशेस वसलेल्या लुवियर येथील बेथेलमध्ये येण्याचे मला आमंत्रण मिळाले. बेथेलला गेल्यामुळे चांगलेच झाले कारण माझे आईवडील खूपच आजारी पडले तेव्हा बेथेलमध्ये राहूनच माझ्या भावाला आणि वहिनीला त्यांची काळजी घेण्याकरता मला मदत करता आली. त्यांच्यापासून हजारो मैल दूर मिशनरी कार्यात मी असतो, तर मला असं करता आलं नसतं.
आई, मला कित्येक वेळा बेथेलमध्ये भेटायला यायची. मी तिच्यापासून दूर राहणं यात तिचा त्याग असतानाही, ती मला म्हणत असे: “बाळा, तू बेथेलमध्येच राहा. तू इथे राहून यहोवाची सेवा करतो आहेस यातच मला आनंद आहे.” आता मात्र माझे आईवडील हयात नाहीत. या पृथ्वीचे खरोखरच्या परादीसमध्ये रूपांतर होईल तेव्हा त्यांना भेटण्याची मी अत्यंत आतूरतेने वाट पाहतोय!
मला खरोखरच असं वाटतं, की “परादीस येथे” हे नाव कोणा घराला योग्य असेल तर ते आहे बेथेल—“देवाचं घर” कारण खरे परादीस म्हणजे सर्वात आधी आध्यात्मिक अर्थाने, आणि बेथेलमध्ये जणू आध्यात्मिकतेचेच साम्राज्य असते. इथं आम्हाला आत्म्याची फळे आपल्या जीवनात विकसित करण्याची संधी आहे. (गलतीकर ५:२२, २३) दैनंदिन वचनाच्या चर्चेद्वारे आणि टेहळणी बुरूजाच्या कौटुंबिक अभ्यासाद्वारे पौष्टिक आध्यात्मिक अन्न आम्हाला मिळतं; त्यामुळे बेथेल सेवेत टिकून राहण्याकरता मला मदत मिळते. याशिवाय, यहोवाची कित्येक दशकांपासून विश्वासूपणे सेवा करत असणाऱ्या आध्यात्मिक मनोवृत्तीच्या लोकांचा सहवास मिळणं यामुळे आध्यात्मिक विकास होण्याकरता बेथेलसारखे दुसरे चांगले ठिकाण नाही. माझ्या मुलीपासून माझी ताटातूट होऊन आता १७ वर्षं लोटली आहेत; पण बेथेलमध्ये अनेक आवेशी तरुण आहेत आणि त्यांनाच मी माझी मुलं समजतो, त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये आनंद मानतो. मागील आठ वर्षांमध्ये मला सात वेगवेगळ्या नेमणुका मिळाल्या. हे बदल स्वीकारणे प्रत्येक वेळी इतकं सोपं नव्हतं, पण यातून मला जे शिकायला मिळाले, ते पुढच्या जीवनासाठी नक्कीच फायदेकारक आहे.
मी शेती करायचो, तेव्हा मी अशाप्रकारचे एक कडधान्य पेरायचो ज्याचे शंभरपटीने पीक यायचे. मलाही जीवनात काहीसा असाच अनुभव आला आहे; आपण जेव्हा वाईटाची पेरणी करतो, तेव्हा आपल्याला शंभरपट अधिक वाईटाची कापणी करावी लागते—आणि तेही वारंवार. अनुभवाच्या शाळेत शिकण्याकरता फार मोठी किंमत मोजावी लागते. या शाळेत मी नावच घातले नसते, आणि त्याऐवजी लहानपणापासून मला यहोवाच्याच मार्गांचे संस्कार मिळाले असते तर किती बरे झाले असते. ख्रिस्ती पालकांकडून संगोपन झालेले तरुण किती धन्य आहेत! यहोवाच्या सेवेत चांगले ते पेरून त्याच्या शंभरपट शांती आणि समाधान प्राप्त करणं निश्चितच सर्वोत्तम आहे.—गलतीकर ६:७, ८.
पायनियर असताना, मी काही वेळा त्याच धार्मिक पुस्तकांची विक्री करणाऱ्या दुकानावरून जात असे ज्याच्या भिंतीवर मी एका राजद्रोह्याचे घोषवाक्य लिहिले होते. त्याच दुकानात जाऊन मी दुकानाच्या मालकाशी जिवंत देव आणि त्याच्या उद्देशांविषयी बोललो. खरंच, देव जिवंत आहे! आणि एवढेच नाही, तर एकमेव खरा देव, यहोवा हा एक विश्वासू पिता देखील आहे, जो आपल्या मुलांचा कधीही त्याग करत नाही. (प्रकटीकरण १५:४) सर्व राष्ट्रांतील अनेक लोकांना जिवंत देव, यहोवा याची सेवा करण्याद्वारे आणि त्याची स्तुती करण्याद्वारे आताचे आध्यात्मिक आणि येणारे पुनःस्थापित परादीस मिळो!
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.
[२६ पानांवरील चित्र]
अद्भुत निसर्गाच्या प्रेरणेने, मी मनातच देवावर विश्वास करण्याचं ठरवलं. (उजवीकडे) आज बेथेल सेवेत