वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w08 १/१ पृ. १८-२१
  • तो खऱ्‍या उपासनेच्या बाजूने उभा राहिला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तो खऱ्‍या उपासनेच्या बाजूने उभा राहिला
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • दीर्घकाळापासून चाललेला संघर्ष संपुष्टात येतो
  • ‘लटपटणे’—कसे?
  • महत्त्वाची परीक्षा
  • परीक्षेतून उत्तर मिळते
  • त्यानं शुद्ध उपासनेसाठी ठाम भूमिका घेतली
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • एलीया खऱ्‍या देवाला उंचावतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • कर्मेल डोंगरावर घडलेली परीक्षा
    बायबलमधून शिकू या!
  • तुम्ही एलीयाप्रमाणे विश्‍वासू राहाल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
w08 १/१ पृ. १८-२१

त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करा

तो खऱ्‍या उपासनेच्या बाजूने उभा राहिला

एलीया कर्मेल डोंगरावर उभा राहून, जड पावलांनी डोंगराचा चढ चढत असलेल्या एका मोठ्या लोकसमुदायाला पाहत आहे. पहाटेची वेळ आहे. तरीपण लोक दारिद्र्‌याने व भुकेने किती व्याकुळ झाले होते ते स्पष्ट दिसत आहे. साडेतीन वर्षांच्या दुष्काळामुळे लोकांच्या अंगाच्या काड्या झाल्या होत्या.

यांच्यामध्ये बआल दैवताचे ४५० संदेष्टे होते जे अगदी ताठ मानेने व घमेंडीने चालले होते. यहोवाचा संदेष्टा एलीया याच्याबद्दल त्यांच्या मनात खूप द्वेष होता. राणी ईजबेलीने यहोवाच्या अनेक सेवकांची कत्तल केली होती. तरीपण, एलीया अजूनही बआल उपासनेचा कडाडून विरोध करत होता. हो, पण किती दिवस? बआल दैवताच्या संदेष्ट्यांना वाटत होते, की यहोवाचा हा एकटा संदेष्टा आपल्यापुढे टिकूच शकणार नाही. (१ राजे १८:३, १९, २०) राजा अहाबसुद्धा आपल्या राजसी रथात बसून कर्मेल पर्वतावर आला होता. त्यालाही एलीयाबद्दल तीळमात्र प्रेम नव्हते.

यहोवाच्या बाजूने एकटाच उभा असलेला हा संदेष्टा अद्‌भुत घटना पाहणार होता. चांगले आणि वाईट यांच्यात होणारा सर्वात नाट्यमय सामना जो जगानेसुद्धा अद्याप पाहिला नव्हता त्याची चाललेली तयारी एलीया पाहत उभा होता. तो दिवस उजडला तेव्हा एलीयाला कसे वाटत असावे? त्याच्या मनातही भीती उत्पन्‍न झाली असावी कारण तो “आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता.” (याकोब ५:१७) एक गोष्ट मात्र नक्की: एलीयाच्या आजूबाजूला यहोवाची उपासना न करणारे लोक होते, या लोकांचा धर्मत्यागी राजा होता आणि खुनी संदेष्टे होते. त्यामुळे त्याला, आपण एकटे आहोत असे प्रकर्षाने जाणवले असेल.—१ राजे १८:२२.

पण इस्राएली लोक या संकटात कसे सापडले? आणि या अहवालाचा आज आपल्याशी काय संबंध आहे? बायबल आपल्याला देवाच्या भक्‍तीमान सेवकांचे जवळून परीक्षण करण्यास व “त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण” करण्यास आर्जवते. (इब्री लोकांस १३:७) आज आपण या सेवकांपैकी एकाचे अर्थात एलीयाचे उदाहरण पाहू या.

दीर्घकाळापासून चाललेला संघर्ष संपुष्टात येतो

आपल्या मायदेशाच्या व लोकांच्या भल्यासाठी असलेल्या यहोवाच्या उपासनेला बाजूला सारून पायदळी तुडवले जात आहे हे एलीया दीर्घकाळापासून केवळ पाहत होता. इस्राएल देशाचा दीर्घकाळापासून संघर्ष चालला होता. खरा धर्म आणि खोटा धर्म, यहोवा देवाची उपासना आणि आजूबाजूच्या राष्ट्रांत चालणारी मूर्तीपूजा या संघर्षात हा देश अडकला होता. एलीयाच्या दिवसांत हा संघर्ष अधिकच तीव्र झाला होता.

राजा अहाबाने सिदोनच्या राजाच्या मुलीशी अर्थात ईजबेलीशी विवाह केला होता. ईजबेलीने इस्राएल देशात बआल उपासना पसरवण्याचा आणि यहोवाच्या उपासनेचे उच्चाटन करण्याचा जणू चंगच बांधला होता. अहाबानेही तिला साथ दिली. त्याने बआल दैवतेसाठी एक मंदिर आणि वेदी बांधली आणि या खोट्या दैवतेपुढे माथा टेकवण्यात त्याने पुढाकार घेतला. त्याने यहोवाचा खूप अपमान केला.—१ राजे १६:३०-३३.a

पण बआल उपासना इतकी घृणास्पद का होती? या उपासनेमुळे अनेक इस्राएली लोक बहकले होते. ते खऱ्‍या देवापासून दूर गेले होते. शिवाय बआल उपासना अतिशय हिणकस व निर्दयी होती. यांत, मंदिरात चालणारा पुरुष व स्त्री वेश्‍याव्यवसाय, लैंगिक सोहळे आणि लहान मुलांचा बळी यासारखी घाणेरडी कामे चालत असत. यहोवाने एलीयाला अहाबाकडे असे सांगण्यास पाठवले, की जोपर्यंत देवाचा संदेष्टा थांबवत नाही तोपर्यंत पाण्याची टंचाई असेल. (१ राजे १७:१) एलीया अनेक वर्षांनंतर अहाबास भेटायला आला आणि त्याने लोकांना तसेच बआल संदेष्ट्यांना कर्मेल पर्वतावर जमा होण्यास सांगितले.

या संघर्षाचा आज आपल्यासाठी काय अर्थ होतो? काहीजण असा दावा करतील, की बआल उपासनेच्या कथेचा आज आपल्या दिवसांसाठी काही अर्थ नाही कारण आपण आपल्या सभोवती बआल दैवतेची मंदिरे आणि वेद्या पाहत नाही. परंतु हा अहवाल केवळ ऐतिहासिक माहिती देणारा नाही. (रोमकर १५:४) “बआल” या शब्दाचा अर्थ “मालक” अथवा “धनी” असा होतो. यहोवाने आपल्या लोकांना असे सांगितले, की त्यांनी त्याला आपला ‘बआल’ किंवा पती म्हणून स्वीकारावे. (यशया ५४:५) तरीपण लोक, सर्वसमर्थ देवाला सोडून विविध प्रकारच्या धन्यांची सेवा करत आहेत, नाही का? लोक आपले जीवन, पैसा, करिअर, मनोरंजन, लैंगिक सुख किंवा यहोवा देवाव्यतिरिक्‍त इतर कोणत्याही अगणित दैवतांपैकी एकाची सेवा करण्यात आपले जीवन वेचत असले तरीसुद्धा ते एक धनी निवडतात. (मत्तय ६:२४; रोमकर ६:१६) यास्तव, आजही बआल उपासना अनेक जबरदस्त प्रकारे चालू आहे. प्राचीन काळात, यहोवा आणि बआल यांच्यामध्ये झालेला सामना आपल्याला, आपण कोणाची सेवा करणार याबाबतीत सुज्ञ निर्णय घेण्यास मदत करेल.

‘लटपटणे’—कसे?

कर्मेल पर्वतावर गार वारा सुटला आहे. तेथून इस्राएलचे दृश्‍य दिसते. किशोनच्या ओहोळापासून महासमुद्रापर्यंत (भूमध्य समुद्र) आणि जवळच्या लबानोनच्या डोंगरांपासून दूर उत्तरेकडील क्षितिजापर्यंतचे दृश्‍य दिसते.b पण सूर्य जसजसा डोके वर काढू लागतो तसतसे देशाची काय दुर्दशा झाली होती ते दिसू लागते. यहोवाने अब्राहामाच्या संतानाला देऊ केलेली ही एकेकाळची सुपीक जमीन विटलेल्या शालूसारखी निस्तेज झाली आहे. भुई विस्तवासारखी भाजत आहे. देवाचे स्वतःचे लोकच या दुर्दशेला कारणीभूत होते. लोक जमल्यावर एलीया त्यांच्याजवळ जातो आणि त्यांना म्हणतो: “तुम्ही कोठपर्यंत दोन्ही मतांमध्ये लटपटाल? यहोवा जर देव असेल तर त्याच्यामागे चाला; अथवा जर बाल असेल तर त्याच्यामागे चाला.”—१ राजे १८:२१, पं.र.भा.

एलीयाने जेव्हा लोक ‘दोन्ही मतांमध्ये लटपटत’ आहेत असे म्हटले तेव्हा त्याचा काय अर्थ होता? आपल्याला यहोवाची उपासना आणि बआलाची उपासना यापैकी कोणती तरी एक उपासनापद्धत निवडली पाहिजे, याची लोकांना जाणीव नव्हती. त्यांना वाटत होते, की ते दोन्ही प्रकारे उपासना करू शकत होते. बआलच्या घृणास्पद प्रथांचे आचरण करता करता आपण बआलला खूष करू शकतो आणि सोबतच यहोवा देवालाही विनंती करू शकतो, असे त्यांना वाटत होते. बआल आपल्या धान्यावर व कळपांवर आशीर्वाद देईल आणि ‘सेनाधीश परमेश्‍वर’ यहोवा युद्धात आपले संरक्षण करेल, अशी कदाचित त्यांची चुकीची समजूत असावी. (१ शमुवेल १७:४५) एक महत्त्वाची सत्य गोष्ट ते विसरत होते. आपल्यासोबत इतर दैवतांची उपासना यहोवा खपवून घेत नाही. हीच गोष्ट आजही बहुतेक लोक विसरतात. तो अनन्य उपासनेची अपेक्षा करतो आणि तशी अपेक्षा करण्याचा त्याचा हक्क देखील आहे. त्याच्या उपासनेत इतर कोणत्याही प्रकारची भेसळ त्याला स्वीकारयोग्य नाही, तो ती खपवूनही घेत नाही.—निर्गम २०:५.

इस्राएली लोक, एकाच वेळी दोन मार्गांवर चालणाऱ्‍या मनुष्यासारखे दोन मतांवर ‘लटपटत’ होते. आजही बहुतेक लोक अशीच चूक करतात. ते इतर ‘बआलांना’ आपल्या जीवनात हळूहळू शिरू देतात आणि यहोवा देवाच्या उपासनेला बाजूला सारतात! दोन मतांवर लटपटण्याचे थांबवण्यास एलीयाचा तातडीचा व स्पष्ट पुकार आपल्याला, आपण जीवनात कोणत्या गोष्टींना प्राधान्य देतो आणि उपासनेच्या बाबतीत कोणती निवड करतो याबद्दल आत्मपरीक्षण करण्यास मदत करू शकेल.

महत्त्वाची परीक्षा

एलीया मग एका परीक्षेचा प्रस्ताव मांडतो. ही परीक्षा अगदी सोपी परीक्षा असते. बआलच्या संदेष्ट्यांनी एक वेदी बांधायची आणि त्यावर बली ठेवायचा; आणि मग या वेदीवर अग्नी यावा म्हणून आपापल्या देवाचे नाम घ्यायचे. एलीया देखील असेच करणार होता. तो म्हणतो: “जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच देव ठरावा.” खरा देव कोण आहे हे एलीयाला चांगल्याप्रकारे माहीत होते. त्याचा विश्‍वास इतका भक्कम होता, की तो बआल उपासकांना आधी त्यांच्या दैवताचे नाव घेऊ देण्यास कचरत नाही. तो त्याच्या विरोधकांना प्रत्येक गोष्टीचा फायदा घेऊ देतो, बलीसाठी गोऱ्‍हा निवडू देतो, बआलकडे पहिल्यांदा जाण्याची त्यांना संधी देतो.c—१ राजे १८:२४, २५.

आज आपल्या दिवसांत चमत्कार होत नाहीत. पण यहोवा बदललेला नाही. एलीयाप्रमाणे आपणही त्याच्यावर पूर्ण विश्‍वास ठेवू शकतो. उदाहरणार्थ, बायबल जे शिकवते त्याबाबतीत जेव्हा इतर लोक असहमत होतात व पुढे होऊन आपले मत व्यक्‍त करतात तेव्हा आपल्याला घाबरण्याची गरज नाही. एलीयाप्रमाणे आपण खऱ्‍या देवाकडे ती बाब सोडवण्यासाठी पाहू शकतो. स्वतःच्या बुद्धीवर नव्हे तर देवाच्या ईश्‍वरप्रेरित वचनावर अर्थात बायबलमधून मार्गदर्शन मिळवून आपण देवाकडे पाहतो. कारण बायबल हे “सुधारणूक” करण्यासाठी बनवण्यात आले आहे.—२ तीमथ्य ३:१६.

बआल उपासक त्यांची वेदी तयार करतात आणि त्यांच्या दैवतेचे नाव घेतात. “हे बआला, आमचे ऐक,” असे ते सतत ओरडत राहतात. एकेक मिनिट आणि एकेक तास सरत राहतो. पण “काही वाणी झाली नाही की कोणी उत्तर दिले नाही,” असे बायबल म्हणते. दुपारी मग एलीया त्यांची थट्टा करू लागतो. तो कुचेष्टेने त्यांना म्हणतो, की कदाचित त्यांच्या बआलाकडे त्यांना उत्तर देण्याची सवड नसावी; तो कदाचित एकांतात गेला असेल, डुलकी काढत असेल, कोणाला तरी त्याला उठवावे लागेल. एलीया या ढोंग्यांना म्हणतो: “मोठ्याने पुकारा.” ही बआल उपासना किती थोतांड आहे हे त्याला दिसत होते आणि देवाच्या लोकांनाही दिसावे अशी त्याची इच्छा होती.—१ राजे १८:२६, २७.

यावर बआल उपासकांना आणखी चेव येतो. “ते मोठमोठ्याने हाका मारू लागले आणि आपल्या रिवाजाप्रमाणे सुऱ्‍यांनी व भाल्यांनी आपणांस घाव करून घेऊ लागले, एवढे की ते रक्‍तबंबाळ झाले.” तरीपण काहीही उपयोग होत नाही. “काही वाणी झाली नाही, कोणी उत्तर दिले नाही किंवा लक्ष पुरविले नाही.” (१ राजे १८:२८, २९) कसं कोण उत्तर देईल? बआल नव्हताच मुळी! यहोवापासून लोकांना दूर बहकवण्यासाठी ती सैतानाची केवळ एक कल्पनाकृती होती. तेव्हासारखे आजही यहोवाला सोडून इतर कोणताही धनी निवडल्याने पदरी लज्जा आणि निराशाच पडते.—स्तोत्र २५:३; ११५:४-८.

परीक्षेतून उत्तर मिळते

दुपार टळून गेल्यावर एलीयाची पाळी येते. यहोवासाठी बनवलेली वेदी तो दुरुस्त करतो. शुद्ध उपासनेच्या विरोधकांनी ती पाडून टाकली होती. तो १२ धोंडे घेतो. इस्राएलाच्या दहा-गोत्र राज्यातील अनेकांना कदाचित ही आठवण देण्याकरता की इस्राएलाच्या बाराही वंशांना देण्यात आलेल्या नियमशास्त्राचे पालन करणे त्यांचे अजूनही कर्तव्यकर्म आहे. मग तो वेदीवर बली ठेवतो आणि वेदीसकट सर्वकाही पाण्याने चिंब भिजवतो. जवळच्या भूमध्य समुद्रातून त्याने कदाचित पाणी आणले असावे. एवढेच नव्हे तर तो वेदीच्या भोवती एक खळगा खणतो आणि तो खळगाही पाण्याने भरतो. बआल उपासकांना जसे तो सर्व काही सुलभ करू देतो तितकेच कठीण तो सर्व काही यहोवासाठी करतो—इतका त्याला आपल्या देवावर भरवसा असतो.—१ राजे १८:३०-३५.

सर्वकाही तयार केल्यावर एलीया प्रार्थना करतो. साध्या शब्दांत त्याने केलेल्या अर्थभरीत प्रार्थनेतून एलीयाच्या मनात कोणत्या गोष्टींना प्राधान्य होते हे स्पष्ट दिसते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बआल नव्हे तर यहोवा हा ‘इस्राएलांमध्ये देव’ आहे हे सर्वांना कळून यावे अशी एलीयाची इच्छा होती. दुसरी गोष्ट म्हणजे, तो यहोवाचा सेवक होता हे सर्वांना माहीत झाले पाहिजे व सर्व गौरव व श्रेय देवाला गेले पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, त्याला आपल्या लोकांची काळजी होती. यहोवापासून ‘पराङमुख’ झालेली त्यांची हृदये पुन्हा त्याच्याकडे वळावीत अशी त्याची आतूर इच्छा होती. (१ राजे १८:३६, ३७) अविश्‍वासू झाल्यामुळे त्यांच्यावर कितीतरी दुःख ओढवले होते, एलीयालासुद्धा याचा त्रास झाला होता तरीपण एलीयाचे त्यांच्यावर प्रेम होते. आपण जेव्हा देवाला प्रार्थना करतो तेव्हा आपणही देवाच्या नावाबद्दल अशीच काळजी व नम्रता दाखवतो का? तसेच, ज्यांना आपली गरज आहे अशांबद्दल कनवाळुपणा दाखवतो का?

एलीयाने प्रार्थना करण्याआधी लोकसमुदायाला कदाचित, बआलचे पितळ कसे उघडे पडले तसे यहोवा देखील थोतांड असेल असे वाटले असावे. पण प्रार्थनेनंतर त्यांना असा विचार करण्यासाठी वेळच राहिला नाही. अहवाल आपल्याला असे सांगतो: “तेव्हा परमेश्‍वरापासून अग्नि उतरला आणि त्याने होमबलि, इंधने, धोंडे आणि माती ही भस्म करून टाकिली आणि त्या खळगीतले पाणी चाटिले.” (१ राजे १८:३८) काय जबरदस्त उत्तर या लोकांना मिळाले! लोकांची प्रतिक्रिया काय होती?

“यहोवा हाच देव आहे! यहोवा हाच देव आहे!” असे ते सर्व ओरडून म्हणू लागले. (१ राजे १८:३९, पं.र.भा.) खऱ्‍या-खोट्याचा प्रत्यय त्यांना आला होता. तरीपण त्यांनी त्यांचा विश्‍वास दाखवला नाही. एलीयाने प्रार्थना केल्यानंतर स्वर्गातून अग्नी येतो तेव्हा यहोवाच खरा देव आहे एवढे फक्‍त कबूल करणे म्हणजे विश्‍वास दाखवणे होत नाही. त्यामुळे एलीया त्यांना दुसऱ्‍या एका मार्गाने आपला विश्‍वास दाखवण्यास सांगतो. तो त्यांना, त्यांनी अनेक वर्षांपूर्वी जे करायला हवे होते ते करण्यास अर्थात यहोवाच्या नियमशास्त्राचे पालन करण्यास सांगतो. देवाच्या नियमशास्त्रात असे म्हणण्यात आले होते, की खोट्या संदेष्ट्यांना व मूर्तीपूजकांना ठार मारण्यात यावे. (अनुवाद १३:५-९) हे बआल संदेष्टे यहोवा देवाचे कट्टर विरोध करणारे होते जे मुद्दामहून त्याच्या उद्देशांच्या विरुद्ध कार्य करीत होते. ते दयेस पात्र होते का? ज्या निष्पाप मुलांना बली म्हणून जिवंत जाळले जात होते तेव्हा त्यांच्या किंकाळ्या ऐकून कुणाला त्यांची दया यायची का? (नीतिसूत्रे २१:१३; यिर्मया १९:५) हे याजक दया मिळवण्यास बिलकूल पात्र नव्हते. त्यामुळे एलीया त्यांची कत्तल करण्याची आज्ञा देतो. आणि त्या सर्वांची कत्तल केली जाते.—१ राजे १८:४०.

काही आधुनिक टीकाकार, कर्मेल पर्वतावर शेवटी जी घटना घडली त्याची टीका करतात. काहींना अशी भीती वाटते, की काही धार्मिक कट्टरपंथी लोक, इतर धर्माच्या लोकांविरुद्ध केल्या जाणाऱ्‍या हिंसक कृत्यांचे समर्थन करण्यासाठी या घटनेचा उपयोग करतील. आणि दुःखाची गोष्ट म्हणजे आज काही धार्मिक कट्टरपंथी लोक धर्माच्या नावाखाली हिंसक कृत्ये करतात. परंतु एलीया हा कट्टरपंथीय नव्हता. तो एका धार्मिक न्यायदंडाच्या अंमलबजावणीत यहोवाच्या वतीने कार्य करीत होता. शिवाय, दुष्टांची कत्तल करण्यासाठी आपण एलीयाप्रमाणे तलवार उचलू शकत नाही, हे खऱ्‍या ख्रिश्‍चनांना माहीत आहे. मशीहाच्या आगमनानंतर, त्याच्या सर्व शिष्यांसाठी एकच दर्जा आहे जो त्याने पेत्राला सांगितला होता: “तुझी तरवार परत जागच्या जागी घाल, कारण तरवार धरणारे सर्व जण तरवारीने नाश पावतील.” (मत्तय २६:५२) भविष्यात यहोवा आपल्या न्यायदंडाची अंमलबजावणी करण्याकरता आपल्या पुत्राचा उपयोग करणार आहे.

विश्‍वासू जीवन जगणे ही खऱ्‍या ख्रिश्‍चनांची जबाबदारी आहे. (योहान ३:१६) असे करण्याचा एक मार्ग आहे, एलीयासारख्या विश्‍वासू पुरुषांचे अनुकरण करणे. त्याने यहोवाव्यतिरिक्‍त इतर कोणाची उपासना केली नाही आणि इतरांनाही असेच करण्यास आर्जवले. यहोवापासून लोकांना दूर बहकवण्याकरता सैतान उपयोगात आणत असलेल्या धर्माचे थोतांड त्याने धैर्याने उघड केले. समस्या सोडवताना, स्वतःच्या सामर्थ्यावर व इच्छेवर अवलंबून राहण्याऐवजी त्याने यहोवावर भरवसा ठेवला. होय, एलीया शुद्ध उपासनेच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिला. आपण प्रत्येकजण त्याच्या विश्‍वासाचे अनुकरण करू या! (w०८ १/१)

[तळटीपा]

a एलीयाचा अहाबाबरोबर कसा व्यवहार होता त्याबद्दल अधिक माहितीकरता टेहळणी बुरूज एप्रिल १, १९९२ (इंग्रजी) मधील “तुमचा एलीयासारखा विश्‍वास आहे का?” हा लेख पाहा.

b कर्मेल पर्वतावर सहसा दाट व हिरवीगार झाडी असते. समुद्रावरून वाहणाऱ्‍या आर्द्रयुक्‍त वाऱ्‍यामुळे कर्मेल पर्वताच्या चढांवर बहुतेकदा पाऊस व भरपूर दव असतो. वर्षावृष्टी आणल्याचे श्रेय बआलला दिले जात असल्यामुळे, हा पर्वत बआल उपासनेसाठी महत्त्वाचे ठिकाण होते. पण आता कर्मेल पर्वत उघडा व शुष्क बनला आहे; बआलाचे बिंग लवकरच फुटणार आहे.

c नोंद घेण्याजोगी एक गोष्ट अशी, की एलीयाने त्यांना वेदीवर चढवलेल्या बलीला “अग्नी लावू नये” असे सांगितले. काही विद्वानांचे असे म्हणणे आहे, की अशाप्रकारचे उपासक कधीकधी वेदी बनवताना खाली एक लहानशी पोकळी ठेवायचे जेणेकरून वेदीला अलौकिक शक्‍तीने अग्नी लागला असे भासवता येईल.

[२० पानांवरील संक्षिप्त आशय]

यहोवाव्यतिरिक्‍त इतर कोणालाही धनी अथवा मालक निवडल्याने पदरी निराशाच पडते

[२१ पानांवरील चित्र]

“यहोवा हाच देव आहे!”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा