त्यांनी यहोवाच्या इच्छेप्रमाणे केले
एक सर्वश्रेष्ठ मनुष्य नम्र सेवा पार पाडतो
प्रेषितांसोबचे आपले अखेरचे काही तास मोलवान आहेत, हे येशूला माहीत होते. त्यानंतर काही वेळातच त्याला अटक होणार होती, त्याच्या विश्वासाची पूर्वी कधी झाली नाही अशी परीक्षा होणार होती. त्यानंतर आपल्याला फार मोठा आशीर्वाद मिळणार आहे, हे सुद्धा येशूला माहीत होते. त्याला लवकरच देवाच्या उजव्या हाताशी बसवण्यात येणार होते आणि ‘सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला देण्यात येणार होते; ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडगा येशूच्या नावाने टेकला जावा.’—फिलिप्पैकर २:९, १०.
काही काळातच मृत्यू होणार यामुळे लागलेली चिंता किंवा अभिवचनयुक्त प्रतिफळ प्राप्त करण्याची उत्कंठा यांमुळे येशूला त्याच्या प्रेषितांच्या गरजांचे विस्मरण झाले नाही. आपल्या शुभवर्तमानात योहानाने असे लिहिले की, ‘येशूने त्यांच्यावर शेवटपर्यंत प्रेम केले.’ (योहान १३:१) एक परिपूर्ण मनुष्य म्हणून येशूच्या जीवनातील या अखेरच्या मौल्यवान क्षणी त्याने त्याच्या प्रेषितांना एक महत्त्वाचा बोध दिला.
नम्रतेविषयी बोध
वल्हांडणाचा सण साजरा करण्याकरता जेरुसलेमच्या माडीवरच्या वरील खोलीत येशू आणि त्याचे प्रेषित जमले होते. आपल्यांमध्ये कोण मोठा आहे, असा त्यांच्यामध्ये चालणारा वाद येशूने याआधीही ऐकला होता. (मत्तय १८:१; मार्क ९:३३, ३४) त्याने या गोष्टीची त्यांच्यासोबत चर्चा केली होती आणि त्यांचा दृष्टिकोन सुधारण्याचाही त्याने प्रयत्न केला होता. (लूक ९:४६) पण, येशू यावेळी त्याच गोष्टीवर जोर देण्याकरता एका वेगळ्या पद्धतीचा उपयोग केला. आपल्या शिष्यांशी त्याने नम्रतेविषयी केवळ बोलायचेच ठरवले नाही, तर नम्रतेचे प्रत्यक्ष उदाहरण मांडले.
योहान लिहितो: “येशू भोजनावरून उठला, व त्याने आपली बाह्यवस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कमरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुऊ लागला, आणि कमरेस बांधिलेल्या रुमालाने ते पुसू लागला.”—योहान १३:४, ५.
प्राचीन काळातील मध्य पूर्वेत उष्ण वातावरण असल्यामुळे तेथील लोक फुफाट्याच्या रस्त्यावरून चालण्याकरता खुल्या वाहणा वापरत. एका साधारण व्यक्तीच्या घरात प्रवेश करण्याआधी यजमान घरी आललेल्या पाहुण्यांचे स्वागत करत असे आणि पाहुण्यांना पाय धुण्याकरता भांडे आणि पाणी देत असे. श्रीमंत घरात गेल्यानंतर त्या घरातील दास पाहुण्यांचे पाय धुण्याचे काम करत असत.—शास्ते १९:२१; १ शमुवेल २५:४०-४२.
जेरुसलेममधल्या वरच्या खोलीत येशू आणि त्याचे प्रेषित कोणाचे पाहुणे म्हणून गेले नव्हते. भांडी देण्याकरता कुणी यजमान नव्हता आणि पाय धुण्याकरता दासही नव्हता. येशूने जेव्हा त्याच्या शिष्यांचे पाय धुण्यास सुरवात केली तेव्हा त्यांची विचित्र अवस्था झाली. या ठिकाणी त्यांच्यात सर्वश्रेष्ठ असलेल्या व्यक्तीने सर्वात नम्रतेचे काम केले होते!
पहिल्यांदा पेत्र येशूला त्याचे पाय धुऊ देत नव्हता. पण येशूने त्याला म्हटले: “मी तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही.” सर्व प्रेषितांचे पाय धुऊन झाल्यानंतर येशूने म्हटले: “मी तुम्हाला काय केले आहे हे तुम्हाला समजले काय? तुम्ही मला गुरु व प्रभु असे संबोधिता आणि ते ठीक बोलता; कारण मी तसा आहेच. म्हणून मी प्रभु व गुरु असूनहि जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीहि एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीहि करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे.”—योहान १३:६-१५.
येथे येशू पाय धुण्याच्या कोणत्याही परंपरेची स्थापना करत नव्हता. तर तो शिष्यांना नवीन मनोवृत्ती बाळगण्याकरता मदत करत होता—नम्रता आणि त्यांच्या बांधवांकरता खालच्यातले खालचे काम करण्याची मनापासून तयारी. येशूच्या प्रेषितांना येशूचा मुद्दा कळला हे स्पष्ट आहे. काही वर्षांनंतर सुंतेचा प्रश्न उठला तेव्हा काय झाले याचा विचार करा. तेव्हा “पुष्कळ वादविवाद” झाला होता तरी तेथे उपस्थित असलेल्यांनी चांगल्याप्रकारे आणि आदरपूर्वक एकमेकांचे विचार ऐकून घेतले. याशिवाय, या सभेकरता उपस्थित असलेल्यांपैकी शिष्य याकोब होता—तो प्रेषित नव्हता, तेथे प्रेषित असताना प्रेषित नसलेल्या याकोबाचे तेथे काय काम होते, असा प्रश्न कदाचित आपल्या मनात येईल. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात नमूद असलेल्या अहवालातून हे दिसून येते, की नम्रता दाखवण्यात प्रेषितांनी उल्लेखनीय प्रगती केली होती.—प्रेषितांची कृत्ये १५:६-२९.
आपल्याकरता बोध
आपल्या शिष्यांचे पाय धुण्याद्वारे येशूने नम्रतेचा उत्तम बोध दिला. खरोखरच, ख्रिश्चनांनी कधीही असा विचार करू नये, की ते फार महत्त्वाचे आहेत आणि इतरांनी नेहमी त्यांची सेवा करावी किंवा मग त्यांनी आदराची आणि प्रतिष्ठेची स्थाने मिळवण्याचीही महत्त्वकांक्षा मनात बाळगू नये. उलटपक्षी, त्यांनी येशूच्या नमुन्याचे अनुसरण करावे; कारण येशू “सेवा करून घ्यावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला” होता. (मत्तय २०:२८) होय, येशूच्या अनुयायांनी एकमेकांकरता सर्वात नम्रतेची सेवा करण्यास तयार असले पाहिजे.
पेत्राने किती खरे लिहिले: “एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारुपी कमरबंद बांधा, कारण देव गर्विष्ठांना विरोध करितो, आणि लीनांवर कृपा करितो.” (१ पेत्र ५:५) “कमरबंद” याकरता असलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ “एखाद्या दासाचे कंबरेला बांधण्याचे मलवस्त्र” असा होतो. या मलवस्त्राच्या आत सैल वस्त्र परिधान केले जात असे. येशूने रुमाल घेऊन स्वतःच्या कमरेला बांधला आणि त्याच्या प्रेषितांचे पाय धुतले या गोष्टीचा संदर्भ पेत्राने कमरबंद याकरता केला नसेल का? असे खात्रीने सांगता येणार नाही. पण येशूच्या नम्र सेवेने पेत्राच्या हृदयावर कायमचीच छाप पाडली आणि ख्रिस्ताचे अनुयायी होणाऱ्या सर्वांवर हाच परिणाम होण्यास हवा.—कलस्सैकर ३:१२-१४.