चाळीस वर्षांपेक्षाही जास्त काळ कम्युनिस्ट पक्षाच्या बंदीत
मिखाएल वासीलवीच सावीटस्की यांच्याद्वारे कथित
एप्रिल १, १९५६ च्या टेहळणी बुरूज (इंग्रजी) या अंकाने असा अहवाल दिला होता, की १९५१ मध्ये, एप्रिल १, ७ आणि ८ या तारखांना यहोवाच्या साक्षीदारांना “मोठ्या प्रमाणात देशातून हद्दपार करण्यात आले.” याच टेहळणी बुरूजने म्हटले होते: “रशियामध्ये राहणारे यहोवाचे साक्षीदार ह्या तारखा कधीही विसरू शकणार नाहीत. या तीन दिवसांत पश्चिम युक्रेन, व्हाईट रशिया [बेलॉरॉस], बस्सारेबिया, मॉलदेविया, लतव्हिया, लिथुएनिया आणि ऐस्टोनिया यांतील जितके यहोवाचे साक्षीदार मिळू शकतील त्या सर्वांना, सुमारे सात हजारांपेक्षा अधिक स्त्री-पुरुषांना . . . गाड्यांत घालून रेल्वे स्टेशनवर आणण्यात आले आणि तेथे त्या लोकांना मालगाडीमध्ये कोंबून दूर पाठवण्यात आले.”
एप्रिल १, १९५१ मध्ये माझी पत्नी, माझा आठ वर्षांचा मुलगा, माझे आईवडील आणि माझा धाकटा भाऊ आणि अनेक यहोवाच्या साक्षीदारांना युक्रेन, टारनोपलच्या जवळपास राहणाऱ्यांना देखील त्यांच्या घरांतून हाकालण्यात आले. त्यांना मालगाडीत टाकून दोन आठवड्यांचा प्रवास केल्यानंतर लेक बाईकलच्या पश्चिमेस, सैबेरियन टाइगा (सबआर्टिक जंगलात) सोडण्यात आले.
देशातून बाहेर काढून टाकण्यात आलेल्यांमध्ये मी का नव्हतो? तेव्हा मी कोठे होतो आणि त्यानंतर आमच्या सर्वांचे काय झाले हे सर्व सांगण्यापूर्वी, मी यहोवाचा साक्षीदार कसा झालो हे प्रथम सांगू इच्छितो.
बायबलचे सत्य आमच्यापर्यंत पोहंचते
आम्ही टारनोपलपासून सुमारे ५० किलोमीटर दूर असलेल्या एका छोट्याशा स्लावीयातीन या गावात राहत होतो. सप्टेंबर १९४७ मध्ये मी केवळ १५ वर्षांचा होतो तेव्हा यहोवाच्या साक्षीदार असलेल्या दोन बहिणी आमच्या घरी आल्या. त्यांपैकी एकीचे नाव मारिया होते. मी आणि माझ्या आईने या तरुणींचे ऐकले तेव्हा हा केवळ दुसरा धर्म नाही असे मला वाटले. त्यांनी त्यांच्या विश्वासाविषयी आम्हाला सांगितले आणि बायबलमधील प्रश्नांची उत्तरेही त्यांनी अगदी चांगल्याप्रकारे दिली.
मी बायबलला देवाचे वचन मानत होतो, पण चर्चमुळे निराश झालो होतो. माझे आजोबा म्हणायचे: “हे पाळक लोकांना असे म्हणून घाबरवतात, की नरकाग्नीत लोकांना यातना दिल्या जातात, पण त्यांना मात्र नरकाग्नीची भीती वाटत नाही. ते गरिबांना लुटतात त्यांना फसवतात.” दुसऱ्या जागतिक युद्धाच्या सुरवातीला आमच्या गावातील पोलीश लोकांवर केलेला अत्याचार आणि त्यांच्या मालमत्तेची केलेली जाळपोळ मला अद्यापही आठवते. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे या कारस्थानांमागे कॅथलिक पाळकाचा हात होता. त्यानंतर कित्येक लोकांची कत्तल मी पाहिली आणि या क्रूरतेचे कारण जाणून घेण्याची मला उत्सुकता लागली.
साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करताना मला पुष्कळशा गोष्टींची समज मिळू लागली. मी बायबलचे मूलभूत शिक्षण घेतले, ज्यामध्ये हे सुद्धा शिकवण्यात आले होते, की नरकाग्नीसारखी कोणतीही जागा नाही आणि दियाबल सैतान खोट्या धर्माद्वारे युद्ध आणि रक्तपात घडवून आणतो. जेव्हा मी एकटा बसून बायबलचा अभ्यास करत असे तेव्हा मी शिकत असलेल्या गोष्टींकरता अभ्यासाच्या वेळी नेहमी थांबून देवाचे आभार मानत असे. बायबलमधील सत्य मी माझ्या धाकट्या भावाला, स्टाकला सांगू लागलो. त्याला मी सांगितलेल्या गोष्टी पटल्या तेव्हा मला खूप आनंद झाला.
शिकलेल्या गोष्टींनुरूप चालणे
माझ्यात परिवर्तन करण्याची गरज आहे असे मला वाटू लागले आणि मी लगेच सिगारेट ओढण्याचे सोडले. मला हे सुद्धा समजले, की सुव्यवस्थितपणे बायबलचा अभ्यास करण्याकरता मला नियमितरीत्या सभांना जाण्याची गरज आहे. त्यामुळे गुप्तरीत्या भरवण्यात येणाऱ्या सभांना मी जाऊ लागलो. तेथे जाण्याकरता मला जंगलातून १० किलोमीटर पायी जावे लागत असे. काहीवेळा सभांना केवळ काही स्त्रियाच येत होत्या. अशावेळी माझा बाप्तिस्मा झाला नव्हता तरी मला सभा चालवण्याकरता सांगण्यात येत असे.
बायबल साहित्य स्वतःजवळ बाळगणे धोक्याचे होते कारण त्यामुळे २५ वर्षांच्या कैदेची शिक्षा होत असे. तरीसुद्धा माझे स्वतःचे पुस्तकालय असावे असे मला वाटत होते. आमच्या एका शेजाऱ्याने यहोवाच्या साक्षादारांसोबत बायबलचा अभ्यास केला होता, पण भयामुळे त्याने अभ्यास करण्याचे थांबवले आणि त्याच्याकडील पुस्तके त्यांनी बागेत पुरून ठेवली होती. ज्यावेळी त्याने ती पुस्तके बाहेर काढून मला देण्याचे कबूल केले तेव्हा मी यहोवाचे आभार मानले! ती पुस्तके मी बाबांच्या मधमाशा पाळण्याच्या पेटीत लपून ठेवली कारण तेथे पुस्तके असतील असा विचार कोणाच्या मनात देखील आला नसता.
यहोवाला माझ्या समर्पणाचे प्रतीक म्हणून मी जुलै १९४९ मध्ये बाप्तिस्मा घेतला. तो माझ्या जीवनांतील सर्वात आनंदाचा दिवस होता. ज्या साक्षीदाराने आम्हाला गुप्तरीत्या बाप्तिस्मा दिला होता त्याने आम्हाला स्पष्टरीत्या सांगितले होते, की खरा ख्रिस्ती होणे इतके सोपे नाही आणि यापुढे तुमच्यावर अनेक परीक्षाही येतील. या शब्दांची मला लवकरच सत्यता पटली! पण, बाप्तिस्मा प्राप्त साक्षीदार या नात्याने माझ्या जीवनाची सुरवात तर चांगली झाली. बाप्तिस्म्याच्या दोन महिन्यानंतर मी मारियाशी लग्न केले; मला आणि माझ्या आईला ज्या दोन साक्षीदारांनी सत्य दिले होते त्यांपैकी ती एक होती.
माझ्यावर पहिली परीक्षा अचानक आली
एप्रिल १६, १९५० रोजी मी पॉडगीटसे या छोट्याशा शहरातून घराकडे येत होतो, तेव्हा काही सैनिकांनी मला अचानक धरले तेव्हा त्यांना माझ्याकडे बायबलवर आधारित असलेले काही पुस्तके मिळाली, ही पुस्तके मी अभ्यासाच्या गटाला घेऊन चाललो होतो. मला अटक करण्यात आली. कैद केल्यानंतर त्यांनी मला पहिल्याच दिवशी काठीने बेदम मारले, उपाशी ठेवले आणि झोपू देखील दिले नाही. डोक्यावर हात ठेवून मला १०० उठाबशा करायला लावल्या, पण अगदी थकून गेल्यामुळे मला इतक्या उठबशा काढता आल्या नाहीत. त्यानंतर मला थंडगार अंधारकोठडीत २४ तास ठेवण्यात आले.
मला क्षीण करून माझ्याकडून माहिती वदवून घेण्याकरता त्यांनी माझे इतके हाल केले होते. त्यांनी विचारले: “तुला ही पुस्तकं कोठून मिळाली आणि ती तू कुठं घेऊन चालला होतास?” मी काही उत्तर दिले नाही. त्यानंतर कायद्याचा एक भाग माझ्यासमोर वाचून दाखवण्यात आला. त्याची अंमलबजावणी माझ्यावर करण्यात येणार होती. या कायद्यात असे लिहिण्यात आले होते, रशियाविरोधी पुस्तके वाटण्याची आणि बाळगण्याची शिक्षा मृत्युदंड किंवा २५ वर्षांचा तुरुंगवास आहे.
“तुला कोणती शिक्षा पाहिजे?” त्यांनी विचारले.
मी म्हटले: “यांपैकी कोणतीच नको. पण यहोवावर माझा पूर्ण भरवसा आहे, तो ज्या गोष्टीस अनुमती देईल ते सर्व सहन करायला मी तयार आहे.”
आश्चर्याची गोष्ट म्हणजे सात दिवसांनी मला सोडून देण्यात आले. या अनुभवामुळे मला यहोवाच्या पुढील अभिवचनातील सत्यतेची प्रचिती मिळाली: “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.”—इब्री लोकांस १३:५.
मी घरी येईपर्यंत आजारी पडलो होतो, पण माझ्या वडिलांनी मला डॉक्टरांकडे नेले आणि लवकरच बराही झालो. कुटुंबातील बाकीच्या सदस्यांच्या धार्मिक विश्वासांशी माझे वडील सहमत नसले, तरी त्यांनी आमच्या उपासनेला कधी विरोध केला नाही.
तुरुंगवास आणि हद्दपारी
काही महिन्यांनंतर सोव्हिएत सैन्यात भरती होण्याकरता मला निवडण्यात आले. मला धार्मिक कारणामुळे सैन्यात भरती होता येणार नाही, असे मी त्यांना स्पष्ट सांगितले. (यशया २:४) त्यामुळे फेब्रुवारी १९५१ मध्ये मला चार वर्षांची कैद झाली आणि टर्नोपोल येथील तुरुंगात माझी रवानगी करण्यात आली. त्यानंतर १२० किलोमीटर दूर असलेल्या लवीफ या बऱ्यापैकी मोठ्या शहरात मला हलवण्यात आले. तेथे तुरुंगात असताना मला कळले, की सैबेरियामधून अनेक साक्षीदारांना हद्दपार करण्यात आले आहे.
१९५१ च्या उन्हाळ्यात आमच्या गटाला सैबेरियाच्याही पुढे, दूरच्या पौर्वात्य देशात पाठवण्यात आले. आम्ही एक महिना प्रवास केला—सुमारे ११,०००—११ कालपट्ट पार करणे! रेल्वेने दोन आठवड्यापेक्षाही जास्त दिवस प्रवास केल्यानंतर केवळ एका ठिकाणी आम्हाला आंघोळीकरता थांबवण्यात आले. सैबेरियामध्ये नावोसवीर्स्क येथील मोठ्या सार्वजनिक स्नानगृहात आम्ही स्नान केले.
तेथे असलेल्या अनेक कैद्यांपैकी एकाला असे मोठ्याने म्हणताना मी ऐकले: “यहोनादाबच्या कुटुंबापैकी येथे कोण आहे?” “यहोनादाब” ही संज्ञा त्यावेळी, पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची आशा असणाऱ्या लोकांची ओळख दाखवण्याकरता वापरली जात असे. (२ राजे १०:१५-१७; स्तोत्र ३७:११, २९) तेव्हा अनेक कैद्यांनी स्वतःची ओळख यहोवाचे साक्षीदार म्हणून करून दिली. तेव्हा आम्हाला एकमेकांना भेटून किती आनंद झाला होता!
तुरुंगातील आध्यात्मिक कार्यक्रम
आमच्या ठरलेल्या ठिकाणी पोहंचल्यानंतर एकमेकांना ओळखण्याकरता कोड शब्द वापरण्याचे आम्ही नावोसवीर्स्क येथे ठरवले. ल्वाडीवॉस्टक पासून जवळच असलेल्या सी ऑफ जपानच्या एकाच तुरुंग छावणीत आम्हाला टाकण्यात आले. तेथे आम्ही बायबल अभ्यासाकरता नियमित सभा घेत होतो. तुरुंगात कित्येक वर्षांपासून असलेल्या परिपक्व, अनुभवी बांधवांसोबत राहिल्यामुळे मी आध्यात्मिकरीत्या खूपच मजबूत झालो. हे अनुभवी बांधव आळीपाळीने बायबल वचनाच्या आणि टेहळणी बुरूज मधील त्यांना आठवत असलेल्या मुद्द्यांच्या आधारावर आमच्या सभा घेत.
प्रश्ने विचारली जायची आणि बांधव त्या प्रश्नांची उत्तरे द्यायचे. आमच्यातील अनेक बांधव सिमेंटच्या रिकाम्या पोत्यातील कागदाच्या चिटोऱ्या काढून त्यांवर टिपण लिहित. पुढे मागे हे टिपण आम्हाला वापरता यावे म्हणून आम्ही ते जपून ठेवत असू. दोन-एक महिन्यांनी दीर्घ काळाची शिक्षा असलेल्या लोकांना सैबेरियाच्या उत्तरेकडील दूरवरच्या छावण्यांमध्ये पाठवण्यात आले. आमच्यापैकी तीन तरुण बांधवांना नकोट्का येथे हलवण्यात आले. हे ठिकाण जपानपासून सुमारे ६५० किलोमीटर अंतरावर आहे. तेथील तुरुंगात मी दोन वर्षे होतो.
काहीवेळा आम्हाला टेहळणी बुरूज अंकाची प्रत मिळत असे. कित्येक महिने ही मिळालेली एक प्रत आमच्याकरता आध्यात्मिक मेजवानी ठरत असे. काही काळानंतर, आम्हाला पत्रे देखील मिळू लागली. मला पहिले पत्र (सध्या हद्दपार असलेल्या) माझ्या कुटुंबाकडून मिळाले. ते मिळाल्यानंतर मला अश्रू आवरता आले नाही. सुरवातीला ज्या टेहळणी बुरूजचा उल्लेख केला आहे त्यातील माहिती मला या पत्राद्वारे मिळाली; साक्षीदारांच्या घरांवर हल्ले करण्यात आले होते आणि सर्वकाही सोडून निघून जाण्याकरता त्यांना केवळ दोन तासांचा अवधी देण्यात आला होता.
पुन्हा माझ्या कुटुंबासोबत
मला खरे तर चार वर्षांची शिक्षा फर्मावण्यात आली होती, पण मला दोन वर्षांनंतर म्हणजे १९५२ मध्ये सोडण्यात आले. सैबेरियातील, टुलून जवळील गाडालीच्या एका लहानशा खेड्यातील माझ्या कुटुंबीयांना मी पुन्हा भेटू शकलो. त्यांना हद्दपार केल्यानंतर ते या खेड्यात स्थायिक झाले होते. त्यांच्यासोबत पुन्हा एकदा राहयला मिळणे खरोखरच आनंदविणारे होते—आइवन हा माझा मुलगा तीन वर्षांचा होता आणि ऐन्न ही माझी मुलगी जवळजवळ दोन वर्षांची होती. मी घरी गेलो तरी मला अद्यापही मनमोकळेपणे फिरता येत नव्हते. माझा पासपोर्ट स्थानिक अधिकाऱ्यांनी जप्त केला होता आणि माझ्यावर त्यांची कडक नजर होती. माझ्या घरापासून तीन किलोमीटरपेक्षा मला जास्त प्रवास करता येत नव्हता. काही काळानंतर मला टुलूनच्या बाजारातून घोड्यावरून रपेट मारण्याची परवानगी मिळाली. सावधगिरी बाळगून मी तेथील यहोवाच्या साक्षीदारांना भेटलो.
तोपर्यंत आम्हाला दोन मुली, ॲना आणि नादिया तसेच दोन मुले आइवन आणि कोल्या झाली होती. सन १९५८ मध्ये आणखी एक मुलगा, वॉलोडी झाला. सन १९६१ मध्ये एक मुलगी, गालिया झाली.
केजीबी (भूतपूर्व राज्य सुरक्षा एजेन्सी) मला नेहमी अटक करून माझी कसून चौकशी करत असे. माझ्याकडून माहिती काढावी हा इतकाच हेतू त्यामागे नव्हता, तर मी त्यांना सहकार्य करत आहे असे इतरांना भासवणे हा देखील उद्देश त्यामागे होता. मी त्यांना मदत करतो आहे हे दाखवण्यासाठी ते मला चांगल्यातल्या चांगल्या हॉटेलात घेऊन जात. मी त्यांच्यासोबत हसत-खेळत असल्याचे, मौजमजा करत असल्याचे माझे फोटो काढण्याचा त्यांचा प्रयत्न मी ओळखला आणि त्यामुळे त्यांच्याविषयी वाटणारा राग मी मी माझ्या हावभावाद्वारे दाखवून देत असे. मला ज्या-ज्यावेळी पकडण्यात येई त्या-त्यावेळी झालेल्या प्रत्येक गोष्टीविषयी मी बांधवांना सर्वकाही स्पष्टपणे सांगत असे. त्यामुळे त्यांनी माझ्या निष्ठेवर कधी शंका घेतली नाही.
छावण्यांशी संबंध
अनेक वर्षांदरम्यान शेकडो साक्षीदारांना तुरुंगाच्या छावणीत टाकण्यात आले. तुरुंगात असलेल्या या बांधवांना बायबल आधारित साहित्य पुरवण्याद्वारे आम्ही त्यांच्याशी नियमित संबंध ठेवला. आम्ही हे कसे केले? एखाद्या छावणीतून बांधवांची किंवा बहिणीची सुटका झाल्यानंतर आम्ही त्यांना त्या छावणीमध्ये कडक पहारा असतानाही साहित्य आत कसे नेता येईल याविषयी विचारायचो. पोलंड आणि इतर देशांतून मिळणाऱ्या नियतकालिकांच्या आणि पुस्तकांच्या प्रती या छावण्यांतील भाऊबहिणींना आम्ही सुमारे दहा वर्षे पुरवली.
आमच्या अनेक बहिणी काडीपेटीमध्ये संपूर्ण नियतकालिक मावेल इतक्या लहान लहान अक्षरात लिहून काढायच्या! कित्येक तास हे काम करून बहिणी अगदी थकून जायच्या. सन १९९१ मध्ये आमच्या कार्यावरील बंदी उठवण्यात आली आणि आम्हाला सुंदर रंगीत मासिके मिळू लागली, तेव्हा एका बहिणीने म्हटले: “आता आमचं काम कोणी लक्षात ठेवणार नाही.” पण तिचा विचार चुकीचा होता. लोक कदाचित विसरतील, पण यहोवा एकनिष्ठ सेवकाचे काम कधीही विसरत नाही!—इब्री लोकांस ६:१०.
पुनःस्थापणा आणि दुःखद घटना
सन १९६७ मध्ये इरकुट्स येथील माझ्या भावाच्या घराची झडती घेण्यात आली. बायबल साहित्याच्या फिल्म आणि काही प्रती तेथे सापडल्या. त्याला गुन्हेगार ठरवून तीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. पण, आमच्याही घराची झडती घेण्यात आली तेव्हा मात्र काही सापडले नाही. तरी पण आमचाही त्या प्रकरणाशी काहीतरी संबंध आहे, अशी अधिकाऱ्यांना खात्री पटल्यामुळे आम्हाला त्या क्षेत्रातून जावे लागले. कोकसस मधील नवीनमीस्क या शहरात आम्ही गेलो; हे शहर पश्चिमेस सुमारे ५,००० किलोमीटर अंतरावर आहे. त्याठिकाणी आम्ही अनौपचारिक कार्यात व्यग्र राहिलो.
जून १९६९ मध्ये, शाळेला सुट्ट्या लागल्या तेव्हा सुटीच्या पहिल्याच दिवशी दुःखद घटना घडली. उच्च दाब असलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या जवळ गेलेला चेंडू काढण्याच्या प्रयत्नात आमचा १२ वर्षांचा मुलगा कोल्याला विजेचा झटका बसला. तो ७० टक्क्याहून जास्त भाजला होता. दवाखान्यात त्याने माझ्याकडे पाहून म्हटले: “बाबा, त्या बेटावर आपल्याला परत कधी जाता येईल का?” (एका बेटावर जाऊन आम्ही खूप मजा करायचो त्याविषयी तो बोलत होता.) मी म्हटले: “होय, कोल्या आपण त्या बेटावर पुन्हा जाऊ. येशू ख्रिस्त तुला पुन्हा जीवन देईल तेव्हा आपण त्या बेटावर नक्की जाऊ.” अर्धवट बेशुद्धावस्थेत, तो त्याचे आवडते राज्यगीत म्हणत होता. मंडळीच्या ऑर्केस्ट्रामध्ये ट्रम्पेटवर ते राज्यगीत वाजवायला त्याला खूप आवडायचे. तीन दिवसानंतर तो आम्हाला सोडून गेला, पुनरुत्थानाच्या आशेने.
त्यानंतरच्या वर्षी आमचा २० वर्षांचा मुलगा आइवनला लष्करी सेवेकरता निवडण्यात आले. त्याने भरती होण्यास नकार दिल्यानंतर त्याला अटक करून तीन वर्षे तुरुंगात डांबण्यात आले. सन १९७० मध्ये, मला पुन्हा लष्करात भरती होण्यास सांगण्यात आले आणि भरती न झाल्यास तुरुंगात डांबण्याची धमकी मला देण्यात आले. माझावरील खटला कित्येक महिने चालला. तोपर्यंत माझी पत्नी कर्करोगामुळे आजारी पडली होती आणि तिच्याकडे खास लक्ष देण्याची गरज होती. त्या कारणास्तव त्यांनी माझ्यावरील खटला रद्द केला. मारिया १९७२ मध्ये मरण पावली. ती माझी विश्वासू पत्नी होती आणि मरेपर्यंत तिने यहोवाची एकनिष्ठेने सेवा केली.
आमचे कुटुंब परदेशात पसरते
सन १९७३ मध्ये मी नीनाशी लग्न केले. यहोवाची साक्षीदार झाल्यामुळे तिच्या वडिलांनी तिला १९६० मध्येच घरातून हाकलले होते. छावण्यांतील बांधवांकरता नियतकालिकांची नक्कल करणाऱ्यांपैकी ती एक आवेशी सेविका होती. माझ्या मुलांनाही ती आवडू लागली.
नवीनमीस्क मधील आमच्या कार्यामुळे तेथील अधिकारी अस्वस्थ झाले आणि तेथून जाण्याकरता ते आमच्यावर दबाव आणू लागले. म्हणून १९७५ मध्ये माझी पत्नी, माझ्या मुली आणि मी जॉर्जियामधील दक्षिणीय कोकससच्या प्रदेशात राहण्यास गेलो. त्याचवेळी आइवन आणि वोलड्या ही माझी मुले कझाकस्तानच्या दक्षिणेकडील हद्दीवरील झामबुल येथे स्थलांतरित झाली.
जॉर्जियामध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याची ती नुकतीच सुरवात होती. काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या गॉग्रा आणि सुकुम क्षेत्रात आम्ही अनौपचारिक साक्ष दिली आणि एका वर्षानंतर दहा नवीन साक्षीदारांचा माऊन्टन रिव्हरमध्ये बाप्तिस्मा झाला. काही काळानंतरच अधिकाऱ्यांनी ते क्षेत्र सोडण्याकरता आमच्यावर दबाव आणण्यास सुरवात केली आणि त्यामुळे आम्ही पूर्वीय जॉर्जियाकडे स्थलांतर केले. मेंढरासमान लोकांचा शोध घेण्याकरता आम्ही खूप प्रयत्न केला आणि यहोवाने आम्हाला आशीर्वादित केले.
आम्ही छोट्याछोट्या गटांत एकत्र भेटत होतो. भाषा, ही आमची समस्या होती कारण जॉर्जियन भाषा आम्हाला येत नव्हती आणि जॉर्जियन लोकांना रशियन भाषा येत नव्हती. सुरवातीला आम्ही रशियन लोकांसोबत फक्त अभ्यास केला. लवकरच जॉर्जियन भाषेत प्रचार करण्याच्या आणि शिकवण्याच्या कार्यात प्रगती झाली आणि आता जॉर्जियामध्ये हजारो राज्य प्रचारक आहेत.
सन १९७९ मध्ये कजीबी च्या दबावाखाली येऊन मी पुन्हा त्या देशात येऊ नये असे माझ्या मालकाने मला बजावले. आणि नेमक्या त्याच वेळी माझी मुलगी, नादियाच्या गाडीचा अपघात झाला, त्यात ती आणि तिची लहान मुलगी मरण पावली. त्या वर्षाआधी माझी आई नवीनमीस्क येथे मरण पावली, ती मरेपर्यंत यहोवाला विश्वासू राहिली. तिच्यामागे माझे वडील आणि माझा धाकटा भाऊ असल्यामुळे आम्ही घरी परत जाण्याचे ठरवले.
सहनशीलतेकरता आशीर्वाद
नवीनोमीस्क मध्ये आम्ही लपून बायबल साहित्य निर्माण करण्याचे काम चालू ठेवले. सन १९८० च्या दशकाच्या मध्यात स्थानिक अधिकाऱ्यांसमोर मी उभा होतो तेव्हा मी आमची प्रकाशने लपवत आहे असे स्वप्न मला पडले होते असे मी त्यांना सांगितले. हे ऐकून ते हसले. मी तेथून निघणारच होतो तेव्हा त्यांच्यापैकी एकाने म्हटले: “तुम्ही तुमचे साहित्य कशाप्रकारे लपवता असे स्वप्न तुम्हाला या पुढे न पडो.” त्याने म्हटले: “लवकरच हे साहित्य तुमच्या ग्रंथालयाच्या कपाटात तुम्हाला दिसेल आणि तुम्ही नवरा-बायको बायबल साहित्य बिनधास्तपणे हातांत घेऊन सभांना जाल.”
सन १९८९ मध्ये मेंदूमध्ये झालेल्या रक्तस्रावामुळे माझी मुलगी ॲना मरण पावली तेव्हा आम्ही खूप दुःखी झालो. ती ३८ वर्षांची होती. त्याच वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात पोलंडमधील वॉरसो येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाकरता नवीनोमीस्क मध्ये उपस्थित राहता यावे म्हणून साक्षीदारांनी एक ट्रेन भाड्याने घेतली. या अधिवेशनाला ६०,३६६ लोक आले होते, सोव्हिएत युनियन मधील हजारो लोक या अधिवेशनाकरता आले होते. ते पाहून आम्हाला आमच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता! त्यानंतर दोन वर्षांच्या आतच, सोव्हिएत युनियनमध्ये मार्च २७, १९९१ रोजी, मंडळीत पुष्कळ काळापासून वडील म्हणून काम पाहणाऱ्या पाच वडिलांपैकी मीही होतो ज्यांनी मॉस्कोमधील ऐतिहासिक दस्ताऐवजावर स्वाक्षरी केली होती; त्यामुळे यहोवाच्या साक्षीदारांच्या संघटनेला कायदेशीर मान्यता मिळाली. हा माझ्याकरता खरोखरच एक विशेषाधिकार होता!
सध्या माझी हयात असलेली सर्व मुले यहोवाची सेवा करत असल्याचे पाहून माझे मन आनंदाने भरून जाते. मला जेव्हा ॲना, नादिया आणि तिची मुलगी, तसेच कोल्या. यांना पुन्हा पाहता येईल त्या देवाच्या नवीन राज्याची मी मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. कोल्याचे पुनरुत्थान होईल तेव्हा त्याला त्याच्या आवडत्या बेटावर घेऊन जाण्याचे वचन मी पाळणार आहे. त्या बेटावर आम्ही एकत्र मिळून खूप मजा करायचो.
तोपर्यंत, या विस्तृत क्षेत्रात बायबल सत्याची होणारी प्रचंड वाढ पाहणे किती आनंदाचे आहे! माझ्या जीवनाविषयी मी पूर्ण समाधानी आहे आणि यहोवाचे मी खूप आभार मानतो कारण त्याने मला त्याचा एक साक्षीदार होऊ दिले आहे. स्तोत्र ३४:८ येथील वचनाची मला पूर्ण खात्री पटली आहे: “परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा; जो त्याच्यावर भाव ठेवितो तो पुरुष धन्य.”
[२५ पानांवरील चित्र]
टुलून येथे मी माझ्या कुटुंबाला भेटलो त्यावर्षी
[२६ पानांवरील चित्रं]
वर: सैबेरियातील टुलून येथील आमच्या घराच्या बाहेर माझे वडील आणि माझी मुले
वर उजवीकडे: माझी मुलगी नादिया आणि तिची मुलगी; वाहन दुर्घटनेत दोघींचा मृत्यू झाला
उजवीकडे: सन १९६८ मधील आमच्या कुटुंबाचे छायाचित्र