एकोप्याने देवाची सेवा करणारी मोठी कुटुंबे
स्तोत्रकर्त्याने लिहिले: “पाहा, संतति ही परमेश्वराने दिलेले धन आहे; पोटचे फळ त्याची देणगी आहे. तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातांतील बाणांप्रमाणे आहेत. ज्या पुरुषाचा भाता अशांनी भरला आहे, तो धन्य!”—स्तोत्र १२७:३-५.
होय, मुले ही देवाकडून मिळालेला आशीर्वाद ठरू शकतात. आपल्या भात्यातील बाण नेमका कोणत्या दिशेने सोडायचा हे धनुर्णधराला माहीत असल्यामुळे त्याला एक प्रकारची आत्मसंतुष्टी मिळते; त्याचप्रमाणे आपल्या मुलांना सार्वकालिक जीवनाकडे नेणाऱ्या मार्गावर मार्गदर्शित करताना पालकांनाही एक प्रकारचा आनंद मिळतो.—मत्तय ७:१४.
ज्या कुटुंबांचे ‘भाते’ अनेक मुलाबाळांनी ‘भरलेले’ होते अशी कुटुंबे पूर्वीच्या काळी देवाच्या लोकांमध्ये अगदी सर्रासपणे आढळायची. उदाहरणार्थ, देवाचे लोक मिसरच्या दास्यत्वात होते त्या काळाचा विचार करा: “इस्राएलवंशज फलद्रूप झाले व अतिशयित वृद्धि पावून बहुगुणित झाले; ते महाप्रबळ होऊन त्यांनी देश भरून गेला.” (निर्गम १:७) मिसर देशात जितके इस्राएल लोक गेले होते आणि नंतर जितके लोक तेथून बाहेर पडले याची तुलना केल्यास प्रत्येक कुटुंबात सरासरी दहा मुले असल्याचे सूचित होते!
पुढे, ज्या कुटुंबात येशूचा जन्म झाला ते कुटुंबही आज अनेकांना फार मोठे वाटेल. येशू ज्येष्ठपुत्र होता पण योसेफ आणि मरिया यांना आणखीन चार मुलगे शिवाय मुली देखील होत्या. (मत्तय १३:५४-५६) कदाचित यामुळेच जेरूसलेमहून परत येताना आपल्यासोबत येशू नाही हे योसेफ आणि मरियेच्या लक्षात आले नसावे.—लूक २:४२-४६.
आजच्या काळातील मोठी कुटुंबे
आज अनेक ख्रिस्ती लोक आध्यात्मिक, आर्थिक, सामाजिक आणि इतर काही कारणांसाठी कुटुंब वाढवण्याच्या फंदात पडत नाहीत. तरीही अनेक समाजांमधून मोठाली कुटुंबे आजही पाहायला मिळतात. द स्टेट ऑफ वर्ल्ड चिल्ड्रन १९९७ नुसार सब-सहारान आफ्रिका हा सर्वाधिक प्रसूतीमानाचा प्रदेश आहे. येथे एक सर्वसाधारण स्त्री सहा मुलांना जन्म देते.
ज्यांना मोठी कुटुंबे आहेत अशा पालकांना आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करण्यास शिकवणे फार सोपे नसले तरीही पुष्कळसे पालक असे करण्यात यशस्वी होत आहेत. आणि हे यश सबंध कुटुंब एकोप्याने शुद्ध उपासना करते तेव्हाच लाभते. प्रेषित पौलाने करिंथ मंडळीला लिहिलेले शब्द तितक्याच जोरदारपणे आज आपल्या काळातील ख्रिस्ती कुटुंबांनाही लागू होतात. त्याने लिहिले: “बंधुजनहो, आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी तुम्हास विनंती करतो की, तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे; म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत; तुम्ही एकचित्ताने व एकमताने जोडलेले व्हावे.” (१ करिंथकर १:१०) मग ही एकता कशी साधता येईल?
पालकांनी आध्यात्मिक वृत्तीचे असावे
एक मुख्य गोष्ट म्हणजे पालकांनी पूर्णपणे स्वतःस देवाला वाहून दिले पाहिजे. मोशेने इस्राएल लोकांना जे सांगितले त्याचा विचार करा: “हे इस्राएला, श्रवण कर, आपला देव परमेश्वर [“यहोवा,” NW] हा अनन्य परमेश्वर आहे; तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीति कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव; आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्यांविषयी बोलत जा.”—अनुवाद ६:४-७.
या ठिकाणी मोशेने काय म्हटले ते लक्षात घ्या; त्याने म्हटले पालकांनी देवाच्या आज्ञा प्रथम त्यांच्या स्वतःच्या “हृदयात” ठसवण्याची गरज होती. तरच पालक आपल्या मुलांना नियमितपणे आध्यात्मिक बोध देण्यास प्रवृत्त होतील. खरे तर, पालक स्वतः आध्यात्मिकरित्या सदृढ असतात तेव्हा आध्यात्मिक गोष्टींच्या बाबतीत मुलांना बोध करण्यास ते उत्सुक असतात.
आध्यात्मिक व्यक्ती बनण्यासाठी आणि पूर्ण मनाने यहोवावर प्रेम करण्यासाठी नियमितपणे देवाचे वचन वाचणे, त्यावर मनन करणे आणि ते आपल्या जीवनात लागू करणे अत्यंत जरूरीचे आहे. स्तोत्रकर्त्याने लिहिले, की जो पुरुष यहोवाच्या नियमशास्त्रात रमतो आणि नियमशास्त्राचे “रात्रंदिवस” मनन करितो तो ‘अशा झाडासारखा होईल जे पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत; आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.’—स्तोत्र १:२, ३.
एखाद्या झाडाला सातत्याने पाणी घातले जाते तेव्हा ते चांगले फळ देते; त्याचप्रमाणे ज्या कुटुंबांचे सतत आध्यात्मिकरित्या भरणपोषण होते अशी कुटुंबे आध्यात्मिक फळे उत्पन्न करून यहोवाची स्तुती करतात. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे पश्चिम आफ्रिकेत राहणारे युवामेग्वू यांचे कुटुंब. युवामेग्वू आणि त्यांच्या पत्नीला आठ मुले आहेत पण तरीही ते दोघेही नियमित पायनियर किंवा यहोवाच्या साक्षीदारांचे पूर्ण-वेळ सेवक म्हणून सेवा करतात. युवामेग्वू म्हणतात: “गेल्या २० वर्षांपासून आमच्या घरात न चुकता बायबल अभ्यास होतो. आमची मुलं अगदी लहान-लहान होती तेव्हापासून आम्ही त्यांना देवाच्या वचनाचं शिक्षण दिलं; आणि हे केवळ कौटुंबिक अभ्यासाच्या वेळीच नव्हे तर सेवेत असताना आणि इतर प्रसंगीही आम्ही त्यांना हे शिक्षण दिलं. आज आमची आठही मुलं राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करताहेत; केवळ सहा वर्षांच्या आमच्या सगळ्यात धाकट्या मुलाचा अद्याप बाप्तिस्मा झालेला नाही.”
संघ या नात्याने कार्य करणे
बायबल म्हणते: “सुज्ञानाच्या योगे घर बांधिता येते.” (नीतिसूत्रे २४:३) अशाप्रकारचे सुज्ञान कुटुंबामध्ये असते तेव्हा सांघिक कार्य साध्य होते. कुटुंबातला पिता हा “संघनायक” असतो; कुटुंबाचा मस्तक या नात्याने देवाकडून त्याची नियुक्ती झालेली आहे. (१ करिंथकर ११:३) मस्तकपणाची जबाबदारी किती गंभीर स्वरूपाची असते यावर जोर देताना प्रेषित पौलाने ईश्वर प्रेरणेने लिहिले: “जर कोणी स्वकीयांची व विशेषेकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे; तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट आहे.”—१ तीमथ्य ५:८.
देवाच्या वचनातील या सल्ल्याच्या एकमतात ख्रिस्ती पतीने आपल्या पत्नीच्या आध्यात्मिकतेकडे लक्ष देण्यास हवे. घरच्या कामामुळे पत्नी अगदी भाराक्रांत होत असेल तर साहजिकच तिच्या आध्यात्मिकतेवर विपरीत परिणाम होईल. आपली पत्नी आध्यात्मिक गोष्टींत काहीएक रस घेत नाही अशी नव्यानेच बाप्तिस्मा घेतलेल्या आफ्रिकन देशातील एका पतीने मंडळीतील वडिलांना तक्रार केली तेव्हा तिला तिच्या कामात मदत करावी असा सल्ला वडिलांनी त्याला दिला. म्हणून मग घरची कामे उरकण्यात पती तिला हातभार लावू लागला. बायबलचे वाचन सुधारण्यासाठी तसेच बायबलविषयीचे तिचे ज्ञान वाढवण्यासाठीही त्याने वेळ काढून तिची मदत केली. परिणाम असा झाला, की पत्नी चांगला प्रतिसाद देऊ लागली आणि आज सबंध कुटुंब एकोप्याने देवाची सेवा करत आहे.
पित्याने आपल्या मुलांच्याही आध्यात्मिकतेकडे लक्ष देण्यास हवे. पौलाने लिहिले: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.” (इफिसकर ६:४) मुलांना चिरडीस न आणण्याच्या या सल्ल्याचे आईवडील पालन करतात तेव्हा आपणही कुटुंब संघाचा एक भाग आहोत असे मुलांना वाटू लागते. त्यामुळे मग आध्यात्मिक ध्येये गाठण्यासाठी ती एकमेकांना साह्य करू लागतील, उत्तेजन देऊ लागतील.
मुले जबाबदारी पेलण्यास समर्थ होतात तेव्हा त्यांना जबाबदाऱ्या देणे हे देखील सांघिक कार्यातच येते. ख्रिस्ती मंडळीत वडील म्हणून सेवा करणाऱ्या एका पित्याला ११ मुले आहेत; पहाटे लवकर उठून त्यांच्यापैकी काहींसोबत ते बायबल अभ्यास करतात आणि नंतर कामाला जातात. यांच्यापैकी जे वयाने मोठे आहेत आणि ज्यांचा बाप्तिस्मा झाला आहे ते धाकट्या भावंडांना आळीपाळीने मदत करतात, त्यांना बायबलचे शिक्षण देतात. यावर मुलांच्या वडिलांची देखरेख असते आणि मुले जे काही प्रयत्न करतात त्यासाठी ते मुलांची स्तुती करतात. यांच्यापैकी सहा मुलांचा बाप्तिस्मा झाला आहे आणि इतरजण बाप्तिस्मा घेण्याचे आपले ध्येय गाठण्याचा प्रयत्न करत आहेत.
सुसंवाद, सामाईक ध्येये
चांगले दळणवळण आणि सामाईक ध्येये ही कुटुंबाच्या एकतेसाठी अत्यावश्यक आहेत. नायजेरियामध्ये राहणाऱ्या गॉर्डन नावाच्या एका ख्रिस्ती वडिलांना सात मुले आहेत; त्यांची ही सात मुले ११ ते २७ वर्षे वयोगटांतली आहेत. यांच्यापैकी सहा मुले आपल्या आईवडिलांप्रमाणेच पायनियर सेवा करतात. सगळ्यात धाकट्याचा अलीकडेच बाप्तिस्मा झाला असून कुटुंबातील इतरांसोबत तो नियमितपणे शिष्य बनविण्याच्या कार्यात सहभाग घेतो. आणि दोन प्रौढ मुले मंडळीत सेवा सेवक म्हणून कार्य करत आहेत.
आपल्या प्रत्येक मुलाचा बायबल अभ्यास गॉर्डन यांनी स्वतः घेतला. या शिवाय, या कुटुंबामध्ये बायबल शिक्षणाचा एक व्यापक कार्यक्रम देखील होतो. दररोज सकाळी बायबलच्या वचनाची चर्चा करण्यासाठी ते एकत्र जमतात आणि मग मंडळीच्या सभांची तयारी करतात.
कुटुंबातील प्रत्येक सदस्यापुढे ठेवलेल्या ध्येयांपैकी एक ध्येय म्हणजे टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांतील सर्व लेख वाचून काढणे. अलीकडेच त्यांनी आपल्या नित्यक्रमात दैनिक बायबल वाचनाचाही समावेश केला आहे. आपल्या वाचनात आलेल्या गोष्टींची एकमेकांसोबत चर्चा केल्यामुळे ही सवय टिकवून ठेवण्याकरता कौटुंबिक सदस्य एकमेकांना उत्तेजन देतात.
या कुटुंबाच्या साप्ताहिक बायबल अभ्यासाची सर्वांना इतकी सवय झाली आहे, की कोणालाही त्याची आठवण करून द्यावी लागत नाही; उलट प्रत्येकजण आतुरतेने त्याची वाट पाहत असतो. अर्थात, मुलांचे वय आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवळी अभ्यासाचा विषय, अभ्यासाची पद्धत आणि वेळ यांत बदल करण्यात आले. शिवाय, देवाच्या इतर विश्वासू सेवकांसोबत या कुटुंबाने जवळीक साधल्यामुळे मुलांवर चांगला प्रभाव पडला आहे.
कुटुंब मिळून ते पुष्कळशा गोष्टी करतात आणि मनोरंजनासाठी वेळ काढतात. आठवड्यातील एक ‘संध्याकाळ’ ते खास कुटुंबासाठी ठेवतात; यात कोडे विचारणे, चांगले जोक्स सांगणे, पियानो वाजवणे, गोष्टी सांगणे आणि इतर करमणुकी असतात. अधूनमधून ते समुद्रकिनाऱ्यावर आणि अशा इतर ठिकाणी देखील जातात.
यहोवावर विसंबून राहणे
पण या सगळ्या गोष्टी करूनही मोठ्या कुटुंबाचे संगोपन करणे कठीणच असते. एका ख्रिश्चनाने म्हटले: “आठ मुलांचा वडील या नात्याने सगळ्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पूर्ण करणं काही साधीसोपी गोष्ट नाही. भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही प्रकारचं अन्न त्यांना मुबलकपणे पुरवावं लागतं; त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कष्ट करून भरमसाट पैसा कमावावा लागतो. माझी मोठी मुलं आता किशोरवयात आली आहेत आणि सगळी शाळेत शिकणारी आहेत. आध्यात्मिक प्रशिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे याची मला जाणीव आहे पण माझी काही मुलं हट्टी आहेत, माझ्या आज्ञा मोडतात. याचं मला दुःख होतं; पण मला माहीत आहे, की मी स्वतः देखील कधीकधी अशा काही गोष्टी करतो ज्यांमुळे यहोवाचं मन दुःखी होतं; तरी तो मला क्षमा करतो. त्यामुळे मुलांना त्यांच्या चुकांची जाणीव होत नाही तोपर्यंत मी देखील त्यांच्या चुका सुधारण्यात धीराने त्यांची मदत केली पाहिजे.”
“मी यहोवाचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो कारण सगळ्यांनी पश्चात्ताप करावा अशी त्याची इच्छा असल्यामुळे तो आपल्याशी धीराने वागतो. मी माझ्या कुटुंबासोबत अभ्यास करतो आणि माझी काही मुलं बाप्तिस्म्याचे ध्येय गाठण्याकरता प्रयत्न करत आहेत. पण, प्रतिफळासाठी मी माझ्या स्वतःच्या बळावर अवलंबून राहत नाही; माझ्या स्वतःच्या ताकदीवर मी काहीच साध्य करू शकत नाही. मी प्रार्थनेमार्फत यहोवाच्या जवळ जाण्याचा आणि पुढील नीतिसूत्र लागू करण्याचा प्रयत्न करतो: ‘तू आपल्या अगदी मनापासून यहोवावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.’ होय, माझ्या मुलांना यशस्वीरित्या प्रशिक्षित करण्यात यहोवा मला साह्य करील.—नीतिसूत्रे ३:५, ६.
कदापि हार मानू नका!
कधी कधी मुलांना प्रशिक्षण देण्याचा काहीच उपयोग नाही असे आपल्याला वाटू शकते; पण तरी कधीही हार मानू नका! चिकाटी राखा! तुम्ही जो काही प्रयत्न करत आहात त्यास तुमची मुले जरी आता चांगला प्रतिसाद देत नसली किंवा त्याची कदर करत नसली तरी पुढे कदाचित त्यांना याची जाणीव होईल. कोणतेही मूल, एका रात्रीत आत्म्याची फळे उत्पन्न करणारा ख्रिश्चन बनत नसते; त्यासाठी वेळ लागतो.—गलतीकर ५:२२, २३.
केनियामध्ये राहणारी मोनिका दहा भावंडे असलेल्या कुटुंबातली आहे. ती म्हणते: “आम्ही अगदी लहान-लहान होतो तेव्हापासूनच आमच्या आईबाबांनी आम्हाला बायबलमधील सत्य शिकवण्यास सुरवात केली. दर आठवडी बाबा आमच्यासोबत ख्रिस्ती प्रकाशनांचा अभ्यास करायचे. अर्थात, त्यांच्या कामामुळे नेहमी त्याच दिवशी आमचा अभ्यास व्हायचा असे नाही. कधीकधी कामावरून घरी येताना आम्हाला बाहेर खेळत असल्याचं ते पाहायचे आणि बायबल अभ्यासासाठी आम्ही सगळ्यांनी पाच मिनिटांत घरात आलं पाहिजे असं ते सांगायचे. बायबल अभ्यासानंतर आम्हाला प्रश्न विचारण्याचे किंवा आमच्या काही समस्या असतील तर त्यांची चर्चा करण्याचे उत्तेजन दिले जायचे.
“आम्ही यहोवाची उपासना करणाऱ्या मुलांची संगती धरतो याची खात्री बाबा करायचे. शाळेत आमचं वर्तन कसं आहे याची आमच्या शिक्षकांकडे विचारपूस करण्यासाठी ते वेळोवेळी शाळेत यायचे. एकदा असंच ते शाळेत आले असताना त्यांनी ऐकलं, की माझ्या तीन मोठ्या भावांनी इतर मुलांशी मारामारी केली होती आणि कधीकधी ते उद्धटही वागायचे. अशा गैरशिस्त वागणुकीबद्दल बाबांनी त्यांना शिक्षा दिली आणि त्यांनी ईश्वरी पद्धतीने का वागले पाहिजे याचे शास्त्रवचनांतून स्पष्टीकरण देण्यासाठी बाबांनी वेळ काढला.
“सभांना उपस्थित राहणे किती फायदेकारक आहे हे सभांची आमच्यासोबत तयारी करून आईबाबांनी आम्हाला दाखवून दिलं. क्षेत्र सेवेत लोकांशी कसं बोलावं याचा घरामध्ये सराव करून आम्हाला सेवक बनण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं. अगदी बालपणापासून आम्ही आईबाबांबरोबर क्षेत्र सेवेत जात असू.
“आज माझे दोन मोठे भाऊ खास पायनियर आहेत, एक बहीण नियमित पायनियर आहे आणि माझ्या आणखीन एका बहिणीचं लग्न झालं आहे, तिला तिची मुलंबाळं आहेत; पण ती देखील एक आवेशी साक्षीदार आहे. अठरा आणि सोळा वर्षांच्या माझ्या दोन धाकट्या बहिणी बाप्तिस्माप्राप्त प्रचारक आहेत. आणि आणखीन दोन लहान भावांना अद्याप प्रशिक्षण दिलं जात आहे. मागच्या तीन वर्षांपासून मी केनियातील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरात सेवा करत आहे. माझे पालक आध्यात्मिक वृत्तीचे असल्यामुळे मी त्यांच्यावर खूप खूप प्रेम करते, त्यांची कदर करते; खरंच, आमच्यासाठी त्यांनी एक उत्तम उदाहरण मांडलं आहे.”
तुमच्या कुटुंबात कितीही मुले असली तरीही सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर चालत राहण्यास त्यांची मदत करण्याचे कधीही सोडून देऊ नका. यहोवा तुमचे प्रयत्न आशीर्वादित करील आणि योहानाने त्याच्या आध्यात्मिक मुलांना लिहिलेले पुढील शब्द तुम्हाला पुन्हा ऐकू येतील: “माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसऱ्या कशानेहि होत नाही.”—३ योहान ४.