वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 २/१५ पृ. १३-१८
  • ख्रिस्ताची खंडणी तारण साधण्याचा देवाचा मार्ग

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ख्रिस्ताची खंडणी तारण साधण्याचा देवाचा मार्ग
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पाप आणि मृत्यूचा नायनाट
  • पापाची किंमत अदा करणे
  • “[जुळणारी] खंडणी”
  • परिपूर्ण मानवी जीवनाचे मूल्य
  • ख्रिस्ताच्या खंडणीचा फायदा
  • खंडणी—प्रीतीची अभिव्यक्‍ती
  • खंडणी—देवाची सर्वात मौल्यवान भेट
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • खंडणी—देवाची सर्वात अमूल्य भेट
    बायबल नेमके काय शिकवते?
  • येशूच्या बलिदानामुळे ‘बऱ्‍याच जणांसाठी’ खंडणी कशी देण्यात आली?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
  • येशू तारण करतो—कसे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 २/१५ पृ. १३-१८

ख्रिस्ताची खंडणी तारण साधण्याचा देवाचा मार्ग

“देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”—योहान ३:१६.

१, २. मानवजात कोणत्या स्थितीत आहे याचे वर्णन करा.

कल्पना करा की, शस्त्रक्रिया केल्यावाचून तुम्ही जगू शकणार नाही असा रोग तुम्हाला झाला आहे. पण ती शस्त्रक्रिया फार खर्चीक असून तुम्हाला परवडण्यासारखी नसली तर तुम्हाला कसे वाटेल? तुमच्या सबंध कुटुंबाने आणि मित्रपरिवारानेही मिळून खर्च भागवायचा ठरवला तरी ते परवडण्यासारखे नसले तर? जिवाला धोका असलेल्या अशा पेचप्रसंगात सापडणे म्हणजे केवढा हिरमोड!

२ वरील अनुभव, मानवजातीच्या बाबतीतही अशीच स्थिती निर्माण झाल्याचे वर्णन करतो. आपले पहिले पालक, आदाम आणि हव्वा यांना परिपूर्ण असे निर्माण करण्यात आले होते. (अनुवाद ३२:४) त्यांना अनंतकाळ जगण्याची आणि देवाचा उद्देश पूर्ण करण्याची प्रत्याशा होती: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा.” (उत्पत्ति १:२८) तथापि, आदाम आणि हव्वा यांनी आपल्या निर्माणकर्त्याविरुद्ध बंड केले. (उत्पत्ति ३:१-६) आदाम आणि हव्वेच्या अवज्ञेमुळे केवळ त्यांच्यावरच पाप ओढवले नाही तर त्यांच्या भावी संततीवरही ओढवले. विश्‍वासू पुरुष ईयोब नंतर म्हणाला: “अमंगळातून काही मंगळ निघते काय? अगदी नाही.”—ईयोब १४:४.

३. मृत्यू सर्व लोकांमध्ये कसा पसरला?

३ म्हणून पाप जणू आपल्यातील प्रत्येकाला झालेल्या रोगासारखेच आहे कारण “सर्वांनी पाप केले आहे” असे बायबल म्हणते. (तिरपे वळण आमचे.) या स्थितीचे जीवघेणे परिणाम आहेत. अर्थात, “पापाचे वेतन मरण आहे.” (रोमकर ३:२३; ६:२३) आपल्यातील कोणीच ही स्थिती टाळू शकत नाही. सर्व मानव पाप करतात म्हणून मरतात. आदामाचे वंशज या नात्याने जन्मतःच ही स्थिती आपल्यावर ओढवली. (स्तोत्र ५१:५) पौलाने लिहिले, “एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.” (रोमकर ५:१२) पण आपल्या बचावण्याची कोणतीच आशा नाही असा याचा अर्थ होत नाही.

पाप आणि मृत्यूचा नायनाट

४. मानव स्वतः आजारपण आणि मृत्यू का काढून टाकू शकत नाहीत?

४ पाप आणि त्यामुळे ओढवणारा मृत्यू काढून टाकणे कसे शक्य आहे? मानवांकडून शक्य नाही हे स्पष्टच आहे. स्तोत्रकर्ता खेद व्यक्‍त करत म्हणाला: “मनुष्याच्या जिवाचे मोल फार मोठे आहे; स्वतःला कबरेपासून दूर ठेवण्यासाठी, आणि सदासर्वकाळ जिवंत राहण्यासाठी त्याला जे मोल देता येईल ते कधीही पुरे पडणार नाही.” (स्तोत्र ४९:८, ९, सुबोध भाषांतर) कदाचित योग्य आहार आणि वैद्यकीय काळजी घेऊन आपण आपले आयुष्य आणखी काही वर्षे वाढवू शकतो, पण वारशाने प्राप्त झालेल्या आपल्या पापमय स्थितीवर कोणालाही इलाज करता येत नाही. आपल्यातील कोणीही म्हातारपणाच्या वाईट परिणामांना काढून देवाने सुरवातीला उद्देशिलेली शारीरिक परिपूर्णता मिळवू शकत नाही. आदामाच्या पापामुळेच मानवी सृष्टी “व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली”—किंवा द जेरूसलेम बायबल म्हणते त्याप्रमाणे तिला “आपला उद्देश साध्य करू दिला नाही”—असे पौलाने लिहिले तेव्हा तो अतिशयोक्‍ती करत नव्हता. (रोमकर ८:२०) आनंदाची गोष्ट म्हणजे, निर्माणकर्त्याने आपल्याला त्यागलेले नाही. पाप आणि मृत्यूचा पूर्णतः नायनाट करण्याची व्यवस्था त्याने केली आहे. ती कशी?

५. इस्राएलला दिलेले नियमशास्त्र न्यायाची कदर कसे करत होते?

५ यहोवाला “नीति व न्याय ही प्रिय आहेत.” (स्तोत्र ३३:५) इस्राएलला त्याने दिलेल्या नियमशास्त्रात समतोलपणा आणि अपक्षपाती न्याय यांना महत्त्व दिल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ, याच नियमावलीत आपल्याला असे वाचायला मिळते की, ‘जिवाबद्दल जीव दिला जावा.’ दुसऱ्‍या शब्दांत सांगायचे झाल्यास, कोणा इस्राएलाने खून केला, तर त्याने घेतलेल्या प्राणाच्या बदल्यात त्याला स्वतःचा प्राण द्यावा लागायचा. (निर्गम २१:२३; गणना ३५:२१) अशातऱ्‍हेने ईश्‍वरी न्यायाची पूर्ती केली जात असे.—पडताळा निर्गम २१:३०.

६. (अ) आदामाला कोणत्या अर्थाने खूनी म्हणता येईल? (ब) आदामाने कोणते जीवन गमावले, आणि न्यायाचे पारडे समांतरतेत आणण्याकरता कोणत्या प्रकारच्या बलिदानाची गरज होती?

६ आदामाने पाप केले तेव्हा तो खूनी बनला. कोणत्या अर्थाने? तो आपली पापमय अवस्था—आणि परिणामी मृत्यू—त्याच्या सर्व वंशजांनाही देणार होता त्याअर्थी. आदामाच्या अवज्ञेमुळेच आता या क्षणी आपली शारीरिक प्रकृती खालावत चालली आहे आणि आपण हळूहळू कबरेकडे वाटचाल करत आहोत. (स्तोत्र ९०:१०) आदामाच्या पापाचे याहूनही गंभीर परिणाम आहेत. लक्षात घ्या की, आदामाने स्वतःबाबतीत आणि आपल्या संततीबाबतीत फक्‍त ७० किंवा ८० वर्षांचे सर्वसाधारण जीवन गमावले नाही. त्याने परिपूर्ण जीवन गमावले—चक्क सार्वकालिक जीवन. तर मग, ‘जिवाबद्दल जीव द्यावयाचा’ झाल्यास, या बाबतीत न्यायाची पूर्ती करण्यासाठी कोणत्या प्रकारचा जीव द्यावा लागणार होता? तसे पाहिले, तर परिपूर्ण मानवी जीवनाची—आदामासारखे परिपूर्ण मानवी संतती देऊ शकणाऱ्‍या जीवनाची आवश्‍यकता होती. असे परिपूर्ण मानवी जीवन बलिदानाच्या रूपात अर्पण केल्यास न्यायाचे पारडे समान झालेच असते, शिवाय पाप आणि पापाचा परिणाम मृत्यू यांचाही नायनाट शक्य झाला असता.

पापाची किंमत अदा करणे

७. “खंडणी” या शब्दाचा काय अर्थ होतो ते सांगा.

७ आपल्याला पापाच्या तावडीतून मुक्‍त करण्यासाठी जी किंमत आवश्‍यक आहे तिला बायबलमध्ये “खंडणी” असे म्हटले आहे. (स्तोत्र ४९:७) मराठीत, अपहरण केलेल्या व्यक्‍तीच्या बदल्यात मागितलेल्या किंमतीला तो शब्द सूचित होऊ शकतो. अर्थात, यहोवाने जी खंडणी पुरवली आहे त्यात अपहरण वगैरे झालेले नाही. पण किंमत देण्याची कल्पना मात्र तीच आहे. “खंडणी” असे अनुवादित केलेल्या इब्री शब्दाच्या क्रियापदाचा अक्षरशः अर्थ “भरपाई करणे” असा होतो. पापाचे प्रायश्‍चित करण्यासाठी, खंडणी, भरपाईइतकीच—आदामाच्या परिपूर्ण मानवी जीवनाइतकीच असायला हवी.

८. (अ) सोडवणुकीच्या तत्त्वाचे वर्णन करा. (ब) पापी या नात्याने सोडवणुकीचे हे तत्त्व आपल्याला कसे लागू होते?

८ मोशेच्या नियमशास्त्रात आढळणाऱ्‍या एका तत्त्वाच्या—सोडवून घेण्याच्या तत्त्वाच्या हे एकवाक्यतेत आहे. एखादा इस्राएली कंगाल झाला आणि त्याने स्वतःला एखाद्या गैर-इस्राएलाला दास म्हणून विकून टाकले तर त्याचा कोणी नातेवाईक दासाच्या समान मूल्याची किंमत देऊन त्याला सोडवू (किंवा, खंडणी देऊ) शकत होता. (लेवीय २५:४७-४९) बायबल म्हणते की, अपरिपूर्ण मानव असल्यामुळे आपण ‘पापाचे दास’ आहोत. (रोमकर ६:६; ७:१४, २५) आपली सोडवणूक करायला काय आवश्‍यक होते? आपण पाहिल्याप्रमाणे, गमावलेले परिपूर्ण मानवी जीवन मिळवण्यासाठी परिपूर्ण मानवी जीवनाचीच आवश्‍यकता होती—त्याहून काही कमी नाही किंवा जास्त नाही.

९. यहोवाने पाप काढून टाकण्यास कोणता प्रबंध केला आहे?

९ अर्थात, आपण मानव जन्मतःच अपरिपूर्ण आहोत. आपल्यातील एकही जण आदामाच्या बरोबरीचा नाही; न्याय ज्या खंडणी मूल्याची मागणी करतो ते आपल्यातील कोणीही देऊ शकत नाही. सुरवातीला म्हटल्याप्रमाणे, आपल्याला जणू जीवघेणा रोग झाला आहे आणि तो रोग ज्याने बरा होईल ती शस्त्रक्रिया करणे मात्र आपल्या आवाक्याबाहेर आहे. अशा परिस्थितीत, कोणी आपल्यासाठी ही किंमत द्यायला तयार झाले तर आपण त्याला कृतज्ञ असणार नाही का? यहोवाने अगदी असेच केले आहे! त्याने आपल्याला पापातून कायमचे मुक्‍त करण्याची तरतूद केली आहे. होय, आपल्याला जे परवडण्यासारखे नाही ते आपल्याला द्यायला तो तयार आहे. कसे? पौलाने लिहिले, “देवाचे कृपादान आपल्या प्रभु येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.” (रोमकर ६:२३) येशू हा “जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोंकरा” आहे असे योहानाने त्याचे वर्णन केले. (योहान १:२९) यहोवाने स्वतःच्या पुत्राकरवी आपली खंडणी किंमत कशी चुकवली ते आपण पाहू या.

“[जुळणारी] खंडणी”

१०. ‘संततीविषयीच्या’ भविष्यवाण्या योसेफ आणि मरीयेवर कशा केंद्रीत झाल्या?

१० एदेनमधील बंडाळीनंतर लागलीच, मानवजातीला पापापासून मुक्‍त करणारी एक “संतति” देण्याविषयी यहोवाने आपला उद्देश जाहीर केला. (उत्पत्ति ३:१५) काही ईश्‍वरी प्रकटीकरणांद्वारे ही संतती कोणत्या कुळातून येईल याची ओळख यहोवाने करून दिली. कालांतराने, पॅलेस्टाईनमध्ये राहणाऱ्‍या व मागणी झालेल्या योसेफ आणि मरीया या जोडप्याला ही प्रकटीकरणे देण्यात येऊ लागली. एका स्वप्नात, मरीयेला पवित्र आत्म्याकरवी गर्भ राहिला आहे हे योसेफाला सांगण्यात आले. देवदूताने म्हटले: “तिला पुत्र होईल, आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील.”—मत्तय १:२०, २१.

११. (अ) आपला पुत्र, परिपूर्ण मानव रूपात जन्मण्यासाठी यहोवाने कशी व्यवस्था केली? (ब) येशू “[जुळणारी] खंडणी” कशी देऊ शकला?

११ सर्वसाधारण गर्भधारणेसारखी ही गर्भधारणा नव्हती, कारण येशूचे स्वर्गात मानवपूर्व अस्तित्व होते. (नीतिसूत्रे ८:२२-३१; कलस्सैकर १:१५) यहोवाच्या चमत्कारिक शक्‍तीने त्याचे जीवन मरीयेच्या गर्भात स्थलांतरित करण्यात आले; यामुळे देवाच्या या प्रिय पुत्राला मानव जन्म घेणे शक्य झाले. (योहान १:१-३, १४; फिलिप्पैकर २:६, ७) आदामाच्या पापाने येशू कलंकित होऊ नये म्हणून यहोवाने हे सगळे स्वतः घडवून आणले. येशूचा जन्म परिपूर्णतेत झाला. म्हणून, आदामाने गमावलेले परिपूर्ण मानवी जीवन येशूला प्राप्त झाले. सरतेशेवटी, पापाची किंमत देऊ शकणारा मानव जन्मला! आणि निसान १४, सा.यु. ३३ साली येशूने अगदी तेच केले. त्या ऐतिहासिक दिवशी, येशूने त्याच्या विरोधकांना त्याचा वध करू दिला आणि अशातऱ्‍हेने त्याने “[जुळणारी] खंडणी” पुरवली.—१ तीमथ्य २:६, सुबोध भाषांतर.

परिपूर्ण मानवी जीवनाचे मूल्य

१२. (अ) येशू आणि आदाम याच्या मृत्यूमधला महत्त्वपूर्ण फरक काय याचे वर्णन करा. (ब) आज्ञाधारक मानवजातीकरता येशू “सनातन पिता” कसा बनला?

१२ येशूचा मृत्यू आणि आदामाचा मृत्यू यांच्यात फरक आहे—हा फरक खंडणीचे मूल्य स्पष्ट करतो. आदाम मृत्यूलाच पात्र होता कारण त्याने स्वेच्छेने निर्माणकर्त्याची अवज्ञा केली. (उत्पत्ति २:१६, १७) त्याच्या अगदी उलट, येशू मृत्यूला पात्र नव्हता कारण “त्याने पाप केले नाही.” (१ पेत्र २:२२) म्हणून, येशू मरण पावला तेव्हा आदामाकडे मरतेवेळी नव्हती अशी अत्यंत मौल्यवान गोष्ट येशूकडे होती, ती म्हणजे परिपूर्ण मानवी जीवनाचा हक्क. अशातऱ्‍हेने, येशूच्या मृत्यूला बलिदानाचे मूल्य होते. आत्मिक व्यक्‍ती बनून तो स्वर्गात गेला तेव्हा त्याने आपल्या बलिदानाचे मूल्य यहोवाला सादर केले. (इब्री लोकांस ९:२४) असे करून येशूने पापी मानवजातीला विकत घेतले आणि आदामाच्या बदल्यात तो त्यांचा नवीन पिता बनला. (१ करिंथकर १५:४५) त्यामुळे येशूला “सनातन पिता” म्हणणे उचित आहे. (यशया ९:६) याचा काय अर्थ होतो ते लक्षात घ्या! आदाम या पापी पित्याने आपल्या सर्व वंशजांमध्ये मृत्यू पसरवला. येशू या परिपूर्ण पित्याने, आपल्या बलिदानाच्या किंमतीने आज्ञाधारक मानवांना अनंतकाळचे जीवन बहाल केले.

१३. (अ) आदामाने डोक्यावर करून ठेवलेले कर्ज येशूने कसे फेडले त्याचे उदाहरणानिशी स्पष्टीकरण द्या. (ब) येशूच्या बलिदानाकरवी आपल्या पहिल्या पालकांचे पाप नाहीसे का होत नाही?

१३ परंतु, एकाच मनुष्याचा मृत्यू सर्वांचे पाप कसे काय काढून टाकू शकतो? (मत्तय २०:२८) काही वर्षांआधी एका लेखात, आम्ही खंडणीचे स्पष्टीकरण अशातऱ्‍हेने दिले होते: “एक मोठी कंपनी आहे आणि त्यात शेकडो कामगार आहेत असा विचार करा. एका भ्रष्ट मॅनेजरमुळे कंपनीचे दिवाळे निघते आणि कंपनी बंद पडते. यामुळे शेकडो लोक बेकार होतात आणि ते स्वतःचे कर्ज फेडू शकत नाहीत. त्या एका माणसाच्या अप्रामाणिकतेपायी या कामगारांच्या बायकामुलांना आणि त्यांना कर्ज देणाऱ्‍या सावकारांनाही आता सोसावे लागत आहे! मग एक परोपकारी धनवान व्यक्‍ती येते आणि कंपनीवरचे कर्ज फेडून कंपनी पुन्हा सुरू करते. ते एक कर्ज फेडल्याने कंपनीचे असंख्य कामगार, त्यांची कुटुंबे आणि कर्जदार या सर्वांची सुटका होते. पण आधीच्या मॅनेजरला नव्याने सुरू केलेल्या कंपनीत जागा मिळेल का? नाही, त्याला तुरुंगात टाकले जाते आणि त्याची नोकरी जाते! त्याचप्रमाणे, आदामाचे एक कर्ज फेडल्याने त्याच्या लाखोलाख वंशजांना फायदा होतो—परंतु आदामाला होत नाही.”

१४, १५. आदाम आणि हव्वा यांनी स्वेच्छेने पाप केले असे का म्हणता येईल आणि आपली स्थिती त्यांच्यापेक्षा वेगळी कशी आहे?

१४ हे अगदी योग्य आहे. लक्षात ठेवा, आदाम आणि हव्वा यांनी स्वतःहून पाप केले होते. त्यांनी देवाची अवज्ञा करण्याचे ठरवले. त्याच्या उलट, आपण पापात जन्मलो आहोत. आपल्याला पर्याय नाही. आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या हातून पाप घडणार नाही असे होऊच शकत नाही. (१ योहान १:८) कधी कधी आपल्याला पौलासारखे वाटेल, त्याने लिहिले: “तर मग जो मी सत्कर्म करू इच्छितो त्या माझ्याजवळ वाईट आहेच. . . . माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करितो; तरी माझ्या अवयवात मला निराळाच नियम दिसतो; तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवातील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करितो. किती मी कष्टी माणूस!”—रोमकर ७:२१-२४.

१५ तरीही, खंडणीमुळे आपल्याला आशा मिळते! येशू ती संतती आहे ज्याच्याद्वारे देवाने वचन दिल्याप्रमाणे “पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे . . . आशीर्वादित होतील.” (उत्पत्ति २२:१८; रोमकर ८:२०) येशूचे बलिदान त्याच्यावर विश्‍वास करणाऱ्‍यांसाठी अद्‌भुत संधींचा दरवाजा खुला करते. यातील काहींचा आपण विचार करू या.

ख्रिस्ताच्या खंडणीचा फायदा

१६. आपल्या पापमय स्थितीखेरीज येशूच्या खंडणीमुळे आपण आता कोणते फायदे अनुभवू शकतो?

१६ बायबलचा लेखक याकोब कबूल करतो की, “आपण सगळेच पुष्कळ चुका करितो.” (याकोब ३:२) परंतु, ख्रिस्ताच्या खंडणीमुळे आपल्या चुका माफ होऊ शकतात. योहान लिहितो: “जर कोणी पाप केले, तर नीतिसंपन्‍न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्‍चित आहे.” (१ योहान २:१, २) अर्थात, आपण पापाला क्षुल्लक नजरेने पाहू नये. (यहूदा ४; पडताळा १ करिंथकर ९:२७.) तथापि, आपण चूक केली तर, आपण यहोवाकडे आपले मन मोकळे करू शकतो आणि तो ‘क्षमा करायला तयार’ आहे अशी खात्री बाळगू शकतो. (स्तोत्र ८६:५; १३०:३, ४; यशया १:१८; ५५:७; प्रेषितांची कृत्ये ३:१९) अशाप्रकारे, खंडणीमुळे आपल्याला शुद्ध विवेकाने देवाची सेवा करायला आणि येशू ख्रिस्ताच्या नावाने त्याला प्रार्थना करणे शक्य होते.—योहान १४:१३, १४; इब्री लोकांस ९:१४.

१७. खंडणीमुळे कोणते भावी आशीर्वाद मिळणे शक्य झाले आहेत?

१७ ख्रिस्ताची खंडणी, देवाच्या उद्देशपूर्तीचा मार्ग मोकळा करते; आज्ञाधारक मानवांनी परादीसमय पृथ्वीवर सर्वकाळ जगावे हा देवाचा उद्देश आहे. (स्तोत्र ३७:२९) पौलाने लिहिले: “देवाची वचने कितीहि असोत, [येशूच्या] ठायी होय हे आहे.” (२ करिंथकर १:२०) खरेच, “मरणाचे राज्य” चालत राहिले आहे. (रोमकर ५:१७) देवाने हा “शेवटला शत्रु” काढून टाकावा म्हणून खंडणी आधार पुरवते. (१ करिंथकर १५:२६; प्रकटीकरण २१:४) जे मरण पावले आहेत त्यांनाही येशूच्या खंडणीचा फायदा होऊ शकतो. येशू म्हणाला, “कबरेतील सर्व माणसे त्याची [येशूची] वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.”—योहान ५:२८, २९; १ करिंथकर १५:२०-२२.

१८. पापाचा मानवांवर कोणता दुःखद परिणाम झाला आहे आणि देवाच्या नवीन जगात ही स्थिती कशी बदलेल?

१८ जीवन जसे असायला हवे होते—आपल्याला आज भारावून टाकणाऱ्‍या चिंतांनी मुक्‍त—त्या जीवनाचा आनंद लुटणे केवढे आल्हाददायक असेल याचा विचार करा! पापामुळे केवळ देवासोबतचीच नव्हे, तर आपले मन, अंतःकरण आणि शरीर यांच्यातली एकवाक्यता देखील बिघडली. परंतु, बायबल असे अभिवचन देते की, देवाच्या नवीन जगात “‘मी रोगी आहे,’ असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.” होय, मानवजात पुन्हा कधी शारीरिक आणि भावनिक आजारपणाने पीडित होणार नाही. का? यशया उत्तरतो: “तेथे राहणारे पातकाची क्षमा पावतात.”—यशया ३३:२४.

खंडणी—प्रीतीची अभिव्यक्‍ती

१९. ख्रिस्ताच्या खंडणीला आपण प्रत्येकाने व्यक्‍तिगतरित्या कसा प्रतिसाद दाखवला पाहिजे?

१९ प्रीतीने प्रेरित होऊन यहोवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला पाठवले. (रोमकर ५:८; १ योहान ४:९) त्या बदली, “प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव” घेण्यासाठी येशू प्रीतीमुळे प्रेरित झाला. (इब्री लोकांस २:९; योहान १५:१३) उचितपणे पौलाने लिहिले: “ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते . . . आणि तो सर्वांसाठी याकरिता मेला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्यांच्याकरिता जगावे.” (२ करिंथकर ५:१४, १५) येशूने आपल्यासाठी जे केले त्याची आपल्याला कदर असल्यास आपण प्रतिसाद देऊ. शेवटी, हीच खंडणी आपल्याला मरणापासून बचाव मिळवणे शक्य करते! निश्‍चितच, येशूचे बलिदान कवडी मोलाचे आहे असे आपल्या कार्यांवरून आपण दाखवू इच्छिणार नाही.—इब्री लोकांस १०:२९.

२०. येशूच्या ‘वचनाचे’ पालन आपण कोणत्या काही मार्गांनी करतो?

२० खंडणीसाठी आपण अंतःकरणापासून कृतज्ञता कशी प्रदर्शित करू शकतो? अटक करण्याच्या काही वेळाआधीच येशूने म्हटले: “ज्याची माझ्यावर प्रीति असेल तो माझे वचन पाळील.” (योहान १४:२३) येशूच्या या ‘वचनात’, “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा; त्यांस . . . बाप्तिस्मा द्या,” ही कामगिरी पूर्ण करण्यात आवेशाने सहभाग घेण्याच्या त्याच्या आज्ञेचाही समावेश होतो. (मत्तय २८:१९) येशूच्या अधीन राहण्यासाठी आपल्या आध्यात्मिक बांधवांप्रती प्रेम प्रदर्शित करणे देखील आवश्‍यक आहे.—योहान १३:३४, ३५.

२१. एप्रिल १ तारखेला स्मारकविधीच्या प्रसंगी आपण उपस्थित का असावे?

२१ खंडणीबद्दल कदर व्यक्‍त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीप्रसंगी उपस्थित असणे; यावर्षी तो एप्रिल १ तारखेला पाळण्यात येईल.a हे देखील येशूच्या ‘वचनाचा’ एक भाग आहे कारण हा विधी स्थापन करताना येशूने आपल्या शिष्यांना आज्ञा दिली: “माझ्या स्मरणार्थ हे करा.” (लूक २२:१९) या सर्वात महत्त्वाच्या प्रसंगी उपस्थित राहून आणि ख्रिस्ताच्या आज्ञापिलेल्या सर्व गोष्टींचे पालन करून आपण आपले ठाम मत प्रदर्शित करू शकतो की, येशूची खंडणी हाच देवाकडील तारणाचा मार्ग आहे. खरेच, “तारण दुसऱ्‍या कोणाकडून नाही.”—प्रेषितांची कृत्ये ४:१२.

[तळटीपा]

a यावर्षी, एप्रिल १ ही तारीख निसान १४, ३३ सा.यु. या तारखेशी जुळते; याच तारखेला येशूचा मृत्यू झाला होता. स्मारकविधीची अचूक वेळ आणि ठिकाण यासाठी स्थानिक यहोवाच्या साक्षीदारांकडे विचारपूस करा.

तुम्हाला आठवते का?

◻ मानव आपल्या पापी स्थितीसाठी प्रायश्‍चित का करू शकत नाहीत?

◻ येशू कोणत्या अर्थाने “[जुळणारी] खंडणी” आहे?

◻ येशूने त्याच्या परिपूर्ण मानवी जीवनाच्या अधिकाराचा आपल्या फायद्यास्तव उपयोग कसा केला?

◻ ख्रिस्ताच्या खंडणीमुळे मानवजातीला कोणते आशीर्वाद प्राप्त होतात?

[१५ पानांवरील चित्र]

केवळ एक परिपूर्ण मानव—आदामासमान असलेली व्यक्‍तीच —न्यायाचे पारडे समांतरतेत आणू शकत होती

[१६ पानांवरील चित्र]

येशू परिपूर्ण मानवी जीवन मिळण्याच्या लायकीचा असल्यामुळे त्याच्या मृत्यूला बलिदानाचे मूल्य होते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा