यशस्वी विवाहासाठी कशाची गरज आहे?
पोहायला येत नसता तुम्ही नदीत सुरकांडी माराल का? असा मुर्खपणा करणे घातक काय—जीवघेणाही असू शकतो. पण, आज कितीतरी लोक वैवाहिक जीवनातील जबाबदाऱ्यांची पुरेशी जाणीव न राखता विवाहाची घाई करतात याचा कधी तुम्ही विचार केलात का?
येशूने म्हटले: “तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही?” (लूक १४:२८) होय, बुरूज बांधण्याच्या बाबतीत जी गोष्ट लागू होते तिच गोष्ट विवाहाच्या बाबतीतही लागू होते. विवाहाला जोडून येणाऱ्या मागण्या पूर्ण करण्यास आपण समर्थ आहोत की नाही याची खात्री करण्यासाठी विवाह करण्याचा विचार करणाऱ्या सगळ्यांनीच आधी विवाह करण्याची किंमत काळजीपूर्वक मोजावी.
विवाहाबद्दल काही गोष्टी
जीवनातील सुखदुःख वाटण्यासाठी एखादा जोडीदार असणे खरोखरच एक वरदान आहे. एकाकीपणा किंवा निराशा यांमुळे निर्माण झालेली पोकळी देखील विवाह भरून काढू शकतो. त्याशिवाय प्रेम, सहवास आणि जवळीक यांची स्वाभाविक भूकही विवाहामुळे तृप्त होऊ शकते. म्हणूनच, आदामाची निर्मिती केल्यानंतर देवाने म्हटले: “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरुप साहाय्यक मी करीन.”—उत्पत्ति २:१८; २४:६७; १ करिंथकर ७:९.
होय, विवाह केल्यामुळे आपल्या काही समस्या सुटतील हे मान्य. पण त्याचवेळी नवीन समस्यांही उद्भवतात. का? कारण विवाह म्हणजे दोन विभिन्न व्यक्तिमत्त्वांचा संयोग असतो; ही दोन व्यक्तिमत्त्वे कदाचित अनुरूप असतील पण ती एकसारखी मुळीच नसतात. त्यामुळेच, तोलास तोल असलेल्या जोडप्यांमध्ये देखील कधीकधी खटके उडतील. ख्रिस्ती असलेल्या प्रेषित पौलाने लिहिले, की जे विवाह करतात “अशांना संसारात हालअपेष्टा भोगाव्या लागतील” किंवा द न्यू इंग्लिश बायबल अनुवादानुसार त्यांना, “शारीरिक पीडा” होतील.—१ करिंथकर ७:२८.
याचा अर्थ विवाहाच्या बाबतीत पौलाचा दृष्टिकोन नकारात्मक होता का? मुळीच नाही! विवाहाचा विचार करणाऱ्यांना तो केवळ असे आर्जवत होता, की त्यांनी वास्तवाचे भान राखावे. कुणाकडे तरी आकर्षित होणे ही एक अत्यानंदाची भावना असू शकते; पण लग्नानंतरचे जीवनही इतकेच अत्यानंदाचे असेल असे नाही. प्रत्येक विवाहात विशिष्ट आव्हाने आणि समस्या असतात. म्हणूनच, आपल्या वैवाहिक जीवनात आव्हाने किंवा समस्या उद्भवतील की नाही हा प्रश्न नाही; तर त्या उद्भवल्यास त्यांचा सामना कसा करावा हा प्रश्न आहे.
समस्यांमुळे पतीपत्नींना एकमेकांवरील त्यांचे प्रेम किती खरे आहे हे सिद्ध करण्याची संधी मिळते. उदाहरणार्थ: चालू अवस्थेत नसलेले किंवा दुसऱ्या शब्दांत, धक्क्याला नांगरलेले समुद्रावरील एखादे जहाज अतिशय भव्यदिव्य दिसते. पण, त्याची खरी प्रवास-योग्यता सिद्ध होते ती समुद्रावर—कदाचित वादळाच्या भयंकर लाटांमध्ये देखील. त्याचप्रमाणे, वैवाहिक बंधन किती मजबूत आहे हे केवळ प्रणयाच्या शांतीमय, समाधानी काळातच सिद्ध होत नसते. कधीकधी तर अतिशय संकटमय परिस्थितींत, एखादे दांपत्य संकटाच्या वादळांतून निभावून जातात तेव्हा ते सिद्ध होते.
असे करण्यासाठी शिवाय पुरुष “आपल्या स्त्रीशी जडून राहील” आणि ती दोघे “एकदेह होतील” असा देवाचा उद्देश असल्यामुळे कोणत्याही वैवाहिक दांपत्याला एकमेकांना कायमचे वचनबद्ध होण्याची गरज आहे. (उत्पत्ति २:२४) आज अनेकांना अशा कायमस्वरूपी वचनबद्धतेच्या कल्पनेची भीती वाटते. पण, एकमेकांवर मनस्वी प्रेम करणाऱ्या दोन व्यक्तींनी आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन एकमेकांना दिलेच पाहिजे. वचनबद्धतेमुळे विवाह आदरणीय होतो. तसेच, कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी पती-पत्नी एकमेकांना आधार देतीलच हा भरवसाही वचनबद्धतेमुळे मिळतो.a अशा कायमस्वरूपी वचनबद्धतेसाठी तुमची तयारी नाही त्याचा अर्थ विवाहासाठी तुम्ही तयार नाही. (पडताळा उपदेशक ५:४, ५.) ज्यांचा विवाह झाला आहे अशांना देखील, टिकाऊ विवाहासाठी कायमची वचनबद्धता किती आवश्यक आहे याबद्दल आणखीन जाणीव होण्याची कदाचित गरज असेल.
आत्मपरीक्षण
आपल्या इच्छित जोडीदारामध्ये कोण-कोणते गुण असावेत याची तुम्ही एक यादीच तयार कराल यात शंका नाही. पण, विवाहासाठी तुम्ही स्वतः कसे योगदान करू शकता याकरता तुमचे स्वतःचे परीक्षण करणे मात्र फार कठीण असते. विवाहाच्या शपथा घेण्याआधी तसेच घेतल्यानंतरही आत्मपरीक्षण करणे अत्यावश्यक आहे. उदाहरणार्थ, स्वतःला पुढील प्रश्न विचारा.
• मी माझ्या जोडीदाराला कायमचे वचनबद्ध होण्यास तयार आहे का?—मत्तय १९:६.
बायबलमधील मलाखी संदेष्ट्याच्या काळात अनेक पुरुषांनी कदाचित तरुण स्त्रियांशी विवाह करण्याकरता आपल्या पत्नींना सोडून दिले होते. त्यावेळी यहोवाने म्हटले, की त्याची वेदी सोडून दिलेल्या या पत्नींच्या आसवांनी झाकून गेली आहे आणि आपल्या विवाहसोबत्यांशी असे ‘विश्वासघाताने वर्तणाऱ्या’ पुरुषांना त्याने दोषी ठरवले.—मलाखी २:१३-१६.
• मी जर विवाह करण्याचा विचार करत आहे तर मग भरज्वानीचा तो काळ मी पार केला आहे का जेव्हा लैंगिक वासना अतिशय तीव्र असतात आणि योग्य निर्णय घेण्याच्या आड येऊ शकतात?—१ करिंथकर ७:३६.
बावीसाव्या वर्षी लग्न केलेली निकी म्हणते: “अगदी तरुण असताना लग्न करणं अतिशय धोकेदायक असू शकतं.” ती असा सावधगिरीचा सल्ला देते: “वयाच्या अठरा-एकोणीस वर्षांपासून पुढे पंचवीस-सत्तावीस वर्षांपर्यंतच्या काळादरम्यान तुमच्या भावना, तुमची ध्येये आणि तुमच्या आवडीनिवडी सतत बदलत राहतील.” अर्थात, तुम्ही विवाहाकरता तयार आहात की नाही हे केवळ वयावरून ठरवता येत नाही. पण, भरज्वानीचा काळ ओसरण्यापूर्वीच म्हणजे लैंगिक वासना जेव्हा नव्यानेच सुरू झालेल्या असतात आणि विशेष म्हणजे त्या अगदी तीव्र असतात त्या काळात विवाह केल्यास तुम्ही योग्य दिशेने विचार करू शकणार नाही आणि पुढे येणाऱ्या समस्यांकडे डोळेझाक होण्याची शक्यता असू शकते.
• माझ्यामध्ये अशी कोणती गुणलक्षणे आहेत ज्यामुळे मला एका यशस्वी विवाहास योगदान करता येईल?—गलतीकर ५:२२, २३.
प्रेषित पौलाने कलस्सैकरांना लिहिले: “करूणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा.” (कलस्सैकर ३:१२) हा सल्ला, विवाह करण्याचा विचार करणाऱ्यांना तसेच विवाहितांना देखील लागू होऊ शकतो.
• संकटप्रसंगी जोडीदाराला आधार देण्याइतकी प्रौढता माझ्यात आहे का?—गलतीकर ६:२.
एक डॉक्टर असे म्हणतात: “जेव्हा समस्या उद्भवतात तेव्हा सहसा विवाहसोबत्यावर दोष लावण्याची आपली प्रवृत्ती असते. अशा वेळी कोण दोषास्पद आहे हा प्रश्न महत्त्वाचा नसतो. तर, आपला वैवाहिक नातेसंबंध सुधारण्यासाठी पतिपत्नी दोघेही कसे सहकार्य करू शकतात हा प्रश्न महत्त्वाचा असतो.” शलमोन नावाच्या एका सुज्ञ राजाचे शब्द सर्व विवाहितांना लागू होण्यासारखे आहेत. “एकट्यापेक्षा दोघे बरे;” असे त्याने लिहिले, “कारण त्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल; पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते; त्याची दुर्दशा होते.”—उपदेशक ४:९, १०.
• मी सहसा आनंदी आणि आशावादी असतो का, की नेहमीच निराश किंवा नकारात्मक वृत्ती प्रदर्शित करतो?—नीतिसूत्रे १५:१५.
नकारात्मक वृत्तीच्या व्यक्तीसाठी प्रत्येक दिवस वाईटच असतो. आणि विवाहामुळे त्याच्या या प्रवृत्तीत रातोरात बदल होत नाही! एखादी व्यक्ती, मग ती स्त्री असो पुरुष असो, ती जर टीकात्मक किंवा निराशावादी असली तर विवाहानंतरही ती तितकीच टीकात्मक किंवा निराशावादी राहील. अशा नकारात्मक दृष्टिकोनामुळे वैवाहिक जीवन कमालीचे तणावग्रस्त होऊ शकते.—पडताळा नीतिसूत्रे २१:९.
• दबावाखाली किंवा तणावाखाली असताना मी शांत राहतो का, की आपला राग व्यक्त करतो?—गलतीकर ५:१९, २०.
‘रागास मंद असावे’ अशी ख्रिश्चनांना आज्ञा देण्यात आली आहे. (याकोब १:१९) विवाहापूर्वी आणि विवाहानंतरही एखाद्या स्त्रीने किंवा पुरुषाने पुढील सल्ल्याच्या अनुषंगाने जीवन व्यतीत करण्याची क्षमता विकसित करावी: “तुम्ही रागावा, परंतु पाप करु नका, तुम्ही रागात असताना सुर्य मावळू नये.”—इफिसकर ४:२६.
इच्छित जोडीदारामध्ये काय पाहणार
एक बायबल नीतिसूत्र म्हणते: “शहाणा नीट पाहून पाऊल टाकितो.” (नीतिसूत्रे १४:१५) विवाहसोबती निवडताना ही गोष्ट निश्चित लागू होणारी आहे. विवाहसोबत्याची निवड करणे हा प्रत्येक स्त्री किंवा पुरुषाच्या जीवनातला एक महत्त्वपूर्ण निर्णय असतो. तरीही असे दिसून आले आहे, की कोणती कार विकत घ्यावी किंवा कोणता शिक्षणक्रम निवडावा हे ठरवण्यासाठी लोक जितका वेळ देतात तितकासुद्धा वेळ ते विवाहसोबत्याची निवड करण्यासाठी देत नाहीत.
ख्रिस्ती मंडळीत ज्यांच्यावर जबाबदारी सोपवून दिलेली आहे ‘त्यांची अगोदर पारख’ केलेली असते. (१ तीमथ्य ३:१०) तुम्ही विवाहाचा विचार करत असल्यास तुम्हालाही तुमच्या इच्छित जोडीदाराची निश्चित “पारख” करण्याची इच्छा असेल. उदाहरणार्थ, पुढील प्रश्नांचा विचार करा. हे प्रश्न स्त्रियांच्या दृष्टिकोनातून मांडलेले असले तरीही त्यांतले अनेक सिद्धान्त पुरुषांनाही लागू होणारे आहेत. शिवाय, जे विवाहित आहेत ते देखील हे मुद्दे विचारात घेऊन फायदा मिळवू शकतात.
• त्याचा नावलौकिक कसा आहे?—फिलिप्पैकर २:१९-२२.
नीतिसूत्रे ३१:२३ अशा पतीचे वर्णन करते जो “वेशीत देशाच्या वडील मंडळीत बसला असता तेव्हाच ओळखिता येतो.” पूर्वी, शहरातील वडीलधारी माणसे न्यायदान करण्यासाठी शहराच्या वेशीत बसायचे. स्पष्टच आहे, की अशा व्यक्तीवर लोकांचा भरवसा होता. एखाद्या व्यक्तीकडे लोक कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात त्यावरून त्या व्यक्तीच्या नावलौकिकाबद्दल आपल्याला थोडीफार माहिती मिळते. आणि योग्य असल्यास त्याच्या अधिकाराखाली असणाऱ्या लोकांचा त्याच्याबद्दल काय दृष्टिकोन आहे याचा देखील विचार करा. यावरून, जोडीदार या नात्याने पुढे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहाल हे सूचित होऊ शकते.—पडताळा १ शमुवेल २५:३, २३-२५.
• त्याची नैतिकता कशी आहे?
ईश्वरी ज्ञान “हे मुळात शुद्ध असते.” (याकोब ३:१७) तुमच्या इच्छित जोडीदाराला देवासमोरील त्याच्या आणि तुमच्या नैतिक स्थितीपेक्षा आपल्या स्वतःच्या लैंगिक इच्छापूर्तीचेच जास्त पडलेले आहे का? आताच, जर देवाच्या नैतिक दर्जांनुरूप जीवन व्यतीत करण्यासाठी तो प्रयास करत नसेल तर विवाहानंतर तो करेल याची काय शाश्वती?—उत्पत्ति ३९:७-१२.
• तो मला कशी वागणूक देतो?—इफिसकर ५:२८, २९.
बायबलमधील नीतिसूत्रे हे पुस्तक, आपल्या पत्नीवर ‘भरवसा ठेवणाऱ्या’ पतीविषयी बोलते. शिवाय, तो ‘तिची प्रशंसाही करतो.’ (नीतिसूत्रे ३१:११, २८) तिच्यावर अवाजवी हक्क सांगून त्याला तिचा हेवा वाटत नाही किंवा तो तिच्याकडून अवाजवी अपेक्षाही करत नाही. याकोबाने लिहिले, की वरून येणारे ज्ञान “शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फले ह्यांनी पूर्ण, . . . असे आहे.”—याकोब ३:१७.
• तो त्याच्या स्वतःच्या घरच्या लोकांना कशी वागणूक देतो?—निर्गम २०:१२.
मुलांनी आपल्या आईवडिलांचा आदरसन्मान करावा ही केवळ एक अपेक्षाच नव्हे. बायबल म्हणते: “तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक, आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नको.” (नीतिसूत्रे २३:२२) डॉ. डब्ल्यू ह्यू मिसलडीन यांनी लिहिलेली एक मनोरंजक गोष्ट अशी की, “भावी पतीपत्नींनी सहजासहजी एकमेकांच्या घरी भेटी देऊन आपल्या ‘इच्छित जोडीदाराचे’ त्याच्या आईवडिलांशी कसे संबंध आहेत याचे निरीक्षण केल्यास अनेकानेक वैवाहिक समस्या किंवा विसंगती टाळता येऊ शकतात किंवा कमीतकमी त्यांची अगाऊ सूचना तरी मिळते. तो त्याच्या स्वतःच्या पालकांना जशी वागणूक देतो तशीच वागणूक तो त्याच्या जोडीदारालाही देईल. म्हणूनच पुढील प्रश्न विचारणे जरूरीचे आहे: ‘तो त्याच्या स्वतःच्या पालकांना जशी वागणूक देतो तशीच वागणूक त्यानं आपल्यालाही द्यावी असं आपल्याला वाटतं का?’ शिवाय, त्याचे पालक त्याला जशी वागणूक देतात त्यावरून मधुचंद्रानंतर तो स्वतः कसा वागेल आणि तुमच्याकडूनही तो कशा प्रकारच्या वागणुकीची अपेक्षा करील हे सूचित होईल.”
• त्याला पटकन राग येतो का किंवा तो अपमानास्पद शब्द वापरतो का?
बायबल असा सल्ला देते: “सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा [“अपमानास्पद शब्द,” NW] ही, . . . तुम्हापासून दूर करण्यात येवोत.” (इफिसकर ४:३१) पौलाने तीमथ्याला अशा काही ख्रिश्चनांसंबंधी इशारा दिला होता जे ‘वादविवाद व शब्दयुद्ध यांमुळे वेडे’ बनतील आणि ‘हेवा, कलह, अपशब्द दुसऱ्यांविषयीचे दुष्ट संशय, एकसारखी भांडणे’ उत्पन्न करतील.—१ तीमथ्य ६:४, ५.
याशिवाय, पौलाने असे लिहिले, की मंडळीत विशेषाधिकार प्राप्त करण्यास पात्र असणारा “मारका नसावा” किंवा मूळ ग्रीक भाषेत म्हटल्यानुसार तो “ठोसे मारणारा नसावा.” (१ तीमथ्य ३:३, तळटीप NW) तो लोकांना मारणारा किंवा धाकदपटशा करणारा असू शकत नाही. रागाच्या भरात हिंसक कृती करणारी व्यक्ती विवाहास योग्य असू शकत नाही.
• त्याची ध्येये काय आहेत?
काहीजण धनसंपत्तीच्या मागे लागतात आणि नंतर त्याचे अटळ परिणामही भोगतात. (१ तीमथ्य ६:९, १०) इतर काही असे आहेत ज्यांच्यापुढे कोणतीच ध्येये नसतात. (नीतिसूत्रे ६:६-११) पण ईश्वरी पुरुष मात्र यहोशवासारखा निर्धार राखील; यहोशवाने म्हटले होते: “मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची [“यहोवाची,” NW] सेवा करणार.”—यहोशवा २४:१५.
आशीर्वाद आणि जबाबदाऱ्या
विवाह ही एक ईश्वरी संस्था आहे. तिची सुरवात, तिची स्थापना यहोवा देवानेच केली होती. (उत्पत्ति २:२२-२४) त्याने वैवाहिक व्यवस्थेची रचना केली ती अशासाठी, की स्त्रीपुरुषांचे बंधन हे आयुष्यभराचे अतूट बंधन असावे जेणेकरून ते एकमेकांना मदत करू शकतील. पतीपत्नी आपल्या जीवनात बायबलचे सिद्धान्त लागू करतात तेव्हा त्यांचे जीवन आनंदमय होऊ शकते.—उपदेशक ९:७-९.
पण, आपण ‘शेवटल्या काळातील कठीण दिवसांत’ जगत आहोत हे आपण विसरता कामा नये. बायबलने पूर्वभाकीत केले होते, की या काळात माणसे “स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, . . . अपवित्र [“बेईमानी,” NW], ममताहीन, शांतताद्वेषी, . . . विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली,” असतील. (२ तीमथ्य ३:१-४) या गुणलक्षणांचा एखाद्याच्या विवाहावर जबरदस्त प्रभाव पडण्याची शक्यता आहे. म्हणूनच, विवाह करण्याचा विचार करणाऱ्यांनी विचारपूर्वक त्याची किंमतही मोजावी. आणि जे सध्या विवाहित आहेत त्यांनी बायबलमध्ये दिलेले ईश्वरी मार्गदर्शन शिकून तसेच ते लागू करून आपले वैवाहिक बंधन अधिक मजबूत करत राहण्याचा प्रयत्न करावा.
होय, विवाहाचा विचार करणाऱ्यांनी फक्त लग्नाच्या दिवसाचा विचार करू नये, तर त्या नंतरच्या दिवसांचाही विचार करावा. शिवाय, सर्वांनी केवळ विवाह करण्याचा नव्हे तर वैवाहिक जीवनाचाही विचार करण्यास हवा. आणि केवळ प्रणयवेढ्या दृष्टिकोनातून विचार करण्याऐवजी वास्तविक दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी मार्गदर्शनाकरता यहोवाकडे वळावे. असे केल्यास तुमचा विवाह यशस्वी होण्याची अधिक शक्यता आहे.
[तळटीपा]
a घटस्फोट घेऊन पुन्हा विवाह करण्यासाठी बायबलमध्ये केवळ एकच कारण दिलेले आहे आणि ते म्हणजे ‘जारकर्म’—विवाहबाह्य लैंगिक संबंध.—मत्तय १९:९.
[५ पानांवरील चौकट]
‘मी वाचलेले प्रेमाचे सर्वोत्कृष्ट वर्णन’
“आपण खरोखरच प्रेमात पडलो आहोत हे कसे ओळखावे?” असा प्रश्न डॉ. केवेन लीमन विचारतात. “एका पुरातन ग्रंथात प्रेमाचे वर्णन दिलेले आहे. हा ग्रंथ जवळजवळ दोन हजार वर्षांपूर्वी लिहिलेला असला तरी मी वाचलेले प्रेमाचे हे सर्वोत्कृष्ट वर्णन आहे.”
डॉ. लीमन, बायबलमधील (कॅथलिक कॉमन लँग्वेज बायबल) पहिले करिंथकर नामक पुस्तकाच्या १३ व्या अध्यायातील ४ ते ८ वचनांचा उल्लेख करत होते जिथे म्हटले आहे:
“प्रेम सहनशील आहे, परोपकारी आहे; प्रेम हेव्यादेव्याने वागत नाही, फुशारकी मारत नाही, गर्वाने फुगत नाही, अयोग्य वर्तन करत नाही, स्वतःचाच स्वार्थ पहात नाही, चिडखोरपणाने वागत नाही, मनात अपकाराचा हिशोब ठेवत नाही, वाईट झाल्याचा आसुरी आनंद मानत नाही, तर सत्याचा जय झाल्याचा आनंद मानते. प्रेम क्षमाशील असते. प्रेम सर्वांसंबंधाने विश्वास बाळगते. सर्वांविषयी आशावादी असते. प्रेमाच्या धीराला अंत नाही! प्रेम सनातन आहे.”
[८ पानांवरील चौकट]
भावना फसव्या असू शकतात
प्रणयभावना किती फसव्या असू शकतात याची बायबलच्या काळातील शुलेमकरीण तरुणीला पूर्ण कल्पना होती यात शंका नाही. शलमोन राजासारख्या शक्तिशाली राजाने तिच्यावर आपले मोहजाल टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती आपल्या मैत्रिणींना म्हणाली: “माझ्यामध्ये प्रेमभावना आत्मस्फुर्तीने जागृत होत नाही तोपर्यंत त्यास उठवू नका किवा जागृतही करू नका.” (गीतरत्न २:७; NW) होय, मैत्रिणींच्या दबावाखाली येऊन या सुज्ञ तरुणीला आपल्या भावनांच्या आहारी जायचे नव्हते. आज विवाहाचा विचार करणाऱ्यांना यातून काही व्यावहारिक शिकायला मिळते. ते म्हणजे, आपल्या भावनांवर पूर्ण ताबा ठेवावा. आणि विवाह केला तर तो संसार करण्याची हौस पुरी करण्यासाठी नव्हे तर त्या व्यक्तीवर तुमचे प्रेम आहे म्हणून करावा.
[६ पानांवरील चित्र]
अनेक वर्षांपासून विवाहित असणारे देखील आपले वैवाहिक बंधन मजबूत करू शकतात
[७ पानांवरील चित्र]
तो त्याच्या पालकांना कशी वागणूक देतो?