तुमचा विश्वास अब्राहामासारखा आहे का?
“मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?”—लूक १८:८.
१. आज विश्वास दृढ ठेवणे इतके सोपे का नाही?
आजच्या जगात विश्वास दृढ ठेवणे इतके सोपे नाही. आध्यात्मिक गोष्टींपासून ख्रिश्चनांचे लक्ष विचलित करण्याकरता आजचे जग त्यांच्यावर पुष्कळ दबाव आणते. (लूक २१:३४; १ योहान २:१५, १६) युद्धे, दुर्घटना, रोगराई किंवा भूक यांसारख्या परिस्थितीत टिकून राहण्याकरता अनेकांना झटावे लागते. (लूक २१:१०, ११) अनेक देशांत, धर्मनिरपेक्ष संस्कृती आहे व जे त्यांच्या विश्वासानुसार जगतात त्यांना अवास्तव, धर्मवेडे समजले जाते. याशिवाय, अनेक ख्रिश्चनांचा त्यांच्या विश्वासासाठी छळ करण्यात येतो. (मत्तय २४:९) “मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?” सुमारे २,००० वर्षांपूर्वी येशूने विचारलेला हा प्रश्न निश्चितच उचित होता.—लूक १८:८.
२. (अ) एखाद्या ख्रिश्चनाठायी दृढ विश्वास असणे महत्त्वाचे का आहे? (ब) कोणाच्या विश्वासाच्या उदाहरणाचा विचार केल्याने आपला लाभ होऊ शकेल?
२ परंतु, वस्तुस्थिती अशी आहे की जर आता आपण आपल्या जीवनाचे सार्थक करू इच्छितो व भवितव्यातील वचनयुक्त सार्वकालिक जीवन प्राप्त करू इच्छितो तर त्यासाठी दृढ विश्वासाची गरज आहे. हबक्कूकला उद्देशून यहोवाने उद्गारलेल्या शब्दांचा उल्लेख करीत पौलाने लिहिले: “‘माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल; तो जर माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही.’ . . . विश्वासावाचून त्याला [देवाला] संतोषविणे अशक्य आहे.” (इब्री लोकांस १०:३८-११:६; हबक्कूक २:४) पौलाने तीमथ्याला सांगितले: “विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर, युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धर; त्यासाठीच तुला पाचारण झाले आहे.” (१ तीमथ्य ६:१२) तर मग, अतूट विश्वास बाळगणे कसे शक्य आहे? या प्रश्नाचा विचार करताना, आपण एका मनुष्याचे उदाहरण पाहू ज्याचा आपल्याला लाभ होईल; तो सुमारे ४,००० वर्षांपूर्वी हयात होता तरीसुद्धा इस्लाम धर्म, यहुदी धर्म आणि ख्रिस्ती धर्म या तीन प्रमुख धर्मांमध्ये आजही त्याच्या विश्वासासाठी त्याला मानले जाते. तो मनुष्य आहे अब्राहाम. त्याचा विश्वास इतका उल्लेखनीय का होता? आज आपण त्याचे अनुकरण करू शकतो का?
देवाच्या निर्देशनाला आज्ञाधारकता
३, ४. तेरहने आपला परिवार ऊरहून हारानास का हालवला?
३ बायबलच्या सुरवातीलाच अब्राहामाचा (पूर्वी अब्राम) उल्लेख आढळतो. उत्पत्ति ११:२६ मध्ये आपण वाचतो: ‘तेरहला अब्राम, नाहोर व हारान हे झाले.’ तेरह आणि त्याचे कुटुंब खास्दी लोकांच्या ऊर येथे राहत होते; दक्षिण मेसोपोटिमियातील हे समृद्ध शहर होते. परंतु ते तेथे राहिले नाहीत. “मग तेरह आपला मुलगा अब्राम, आपला नातू म्हणजे हारानाचा मुलगा लोट आणि आपली सून म्हणजे आपला मुलगा अब्राम याची बायको साराय [सारा], यांस बरोबर घेऊन खास्द्यांचे ऊर येथून कनान देशास जाण्यास निघाला; आणि ती हारान येथे जाऊन राहिली.” (उत्पत्ति ११:३१) अब्राहामाचा भाऊ नाहोर यानेही आपले बिऱ्हाड हारान येथे हलवले. (उत्पत्ति २४:१०, १५; २८:१, २; २९:४) परंतु, तेरह ऊर सारखा समृद्ध देश सोडून हारानला कशाला राहायला आला?
४ अब्राहामाच्या काळानंतर सुमारे २,००० वर्षांनंतर, विश्वासू स्तेफनाने यहुदी महासभेपुढे बोलत असताना, तेरहाच्या कुटुंबाने केलेल्या या असामान्य स्थलांतराचे वर्णन दिले. तो म्हणाला: “आपला पूर्वज अब्राहाम हारान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपटेम्या देशात असता गौरवशाली देवाने त्याला दर्शन देऊन म्हटले, ‘तू आपला देश व आपले नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशात चल.’ तेव्हा तो खास्द्यांच्या देशातून निघून हारानात जाऊन राहिला.” (प्रेषितांची कृत्ये ७:२-४) तेरहने आपल्या घराण्याला हारानास राहायला आणण्याद्वारे तो, अब्राहामाच्या बाबतीत यहोवाची जी इच्छा होती तिच्या अधीन राहिला.
५. अब्राहाम आपल्या पित्याच्या मृत्यूपश्चात कोठे गेला? का?
५ तेरहचे कुटुंब या नवीन शहरात स्थिरावले. अनेक वर्षांनंतर जेव्हा अब्राहामाने ‘माझा देश’ असे म्हटले तेव्हा तो ऊरविषयी नव्हे तर हारानविषयी बोलत होता. (उत्पत्ति २४:४) पण, अब्राहामाला कायमसाठीच हारान येथे वास्तव्य करायचे नव्हते. स्तेफननुसार, “[अब्राहामाचा] बाप मेल्यावर देवाने त्याला तेथून काढून सध्या तुम्ही राहता त्या देशात आणले.” (प्रेषितांची कृत्ये ७:४) यहोवाच्या निर्देशनांच्या आज्ञेत राहून अब्राहामाने लोटासह एफ्राता पार करून कनान देशात प्रवेश केला.a
६. यहोवाने अब्राहामाला कोणते अभिवचन दिले?
६ यहोवाने अब्राहामला कनानला का स्थलांतर करावयास लावले? त्या विश्वासू मनुष्याबद्दल देवाचा एक उद्देश होता. यहोवा अब्राहामला म्हणाला होता: “तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा; मी तुजपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील; तुझे जे अभीष्ट चिंतितील त्यांचे मी अभीष्ट करीन; तुझे जे अनिष्ट चिंतितील त्याचे मी अनिष्ट करीन; तुझ्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.” (उत्पत्ति १२:१-३) अब्राहाम अशा एका राष्ट्राचा पिता होणार होता ज्या राष्ट्राला यहोवाचे संरक्षण होते व ज्याला कनान देशाचा मालकी हक्क मिळणार होता. किती उत्तम अभिवचन! परंतु त्या राष्ट्राचा हक्क मिळण्याकरता अब्राहामाला आपल्या जीवनात आमूलाग्र बदल करावे लागणार होते.
७. यहोवाचे अभिवचन प्राप्त करण्याकरता अब्राहामाने कोणते बदल करण्यास तयार राहायला हवे होते?
७ अब्राहामाने ऊर देश सोडला तेव्हा त्याला एक समृद्ध शहर सोडावे लागले आणि कदाचित त्या पितृसत्ताक काळात महत्त्वपूर्ण सुरक्षितता देणाऱ्या आपल्या पित्याचा मोठा परिवारही सोडावा लागला. त्याने हारान सोडले तेव्हा तो आपल्या पित्याच्या घराण्यापासून आणि आपला भाऊ नाहोर याच्या कुटुंबापासून विभक्त झाला व एका अनोळख्या देशी गेला. कनानमध्ये त्याने शहराच्या भिंतींआड सुरक्षा मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. का बरे? देशात गेल्याच्या काही काळानंतर यहोवा अब्राहामला म्हणाला: “ऊठ, या देशाची लांबीरुंदी फिरुन पाहा, कारण तो मी तुला देणार” आहे. (उत्पत्ति १३:१७) ७५ वर्षीय अब्राहाम आणि ६५ वर्षीय त्याची पत्नी सारा, यांनी या सूचना पाळल्या. “परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने जाऊन राहिला; . . . डेऱ्यात त्याची वस्ती होती.”—इब्री लोकांस ११:९; उत्पत्ति १२:४.
आज अब्राहामासारखा विश्वास
८. अब्राहाम आणि इतर प्राचीन साक्षीदारांच्या उदाहरणाकडे पाहता, आपण काय विकसित केले पाहिजे?
८ अब्राहाम आणि त्याच्या परिवाराचा उल्लेख, इब्री लोकांस अध्याय ११ मधील ‘[ख्रिस्तपूर्व] साक्षीरूपी मेघ’ यांच्यात आहे. देवाच्या या प्रारंभिक सेवकांचा विश्वास पाहता, पौल ख्रिश्चनांना “सर्व भार व सहज गुंतविणारे पाप [विश्वासाची उणीव] टाकून” द्यावे असे उत्तेजन देतो. (इब्री लोकांस १२:१) होय, विश्वासाची उणीव आपल्याला ‘सहज गुंतवू’ शकते. परंतु पौलाच्या दिवसांत आणि आपल्या दिवसांत प्रामाणिक ख्रिश्चन, अब्राहाम आणि ख्रिस्तपूर्व काळातील इतरांप्रमाणे मजबूत विश्वास विकसित करू शकले आहेत. स्वतःबद्दल आणि सहख्रिश्चनांबद्दल बोलताना पौल म्हणतो: “परंतु ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही; तर जिवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहो.”—इब्री लोकांस १०:३९.
९, १०. अनेकांचा आज अब्राहामासारखा विश्वास आहे याचा काय पुरावा आहे?
९ होय, अब्राहामाच्या काळापासून आजपर्यंत जग खरोखरच बदलले आहे. पण आपण त्याच ‘अब्राहामाच्या देवाची’ सेवा करत आहोत व तो बदललेला नाही. (प्रेषितांची कृत्ये ३:१३; मलाखी ३:६) अब्राहामाच्या काळाप्रमाणे आजही यहोवा उपासनेच्या योग्य आहे. (प्रकटीकरण ४:११) पुष्कळजण स्वतःला यहोवाला पूर्ण मनाने समर्पण करतात आणि अब्राहामाप्रमाणे देवाची इच्छा पूर्ण करण्याकरता आपल्या जीवनात त्यांना करावे लागणारे आवश्यक ते बदल करतात. गेल्या वर्षी, ३,१६,०९२ लोकांनी “पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा” घेऊन आपल्या समर्पणाचा जाहीर पुरावा दिला.—मत्तय २८:१९.
१० यांतील बहुतेक नवोदित ख्रिश्चनांना आपल्या समर्पणानुसार जगण्याकरता लांबचा प्रवास करून परक्या देशात जावे लागले नाही. परंतु एका आध्यात्मिक अर्थाने, अनेकांनी बराच लांबचा प्रवास केला आहे. जसे की, मॉरिशसमधील एलसी, एकेकाळी एक चेटकीण होती. सगळे तिला भीत असत. एका खास पायनियरने तिच्या मुलीबरोबर बायबल अभ्यासाची योजना केली; यामुळे एलसीपुढे “अंधारातून उजेडाकडे” येण्याचा मार्ग खुला झाला. (प्रेषितांची कृत्ये २६:१८) आपल्या मुलीची आस्था पाहून एलसी पण बायबल कथांचं माझं पुस्तक यातून अभ्यास करायला तयार झाली. तिला सतत उत्तेजनाची आवश्यकता असल्यामुळे आठवड्यातून तीनदा तिचा अभ्यास घेतला जाई. तिच्या जादूटोणामुळे तिला आनंद मिळत नव्हता आणि तिच्या स्वतःच्याही पुष्कळ समस्या होत्या. परंतु कालांतराने ती भुताटकीपासून खऱ्या भक्तीपर्यंतचा लांबचा प्रवास पूर्ण करू शकली. लोक तिच्याकडे जादूटोणासाठी येत तेव्हा ती त्यांना सांगत असे की फक्त यहोवा त्यांना दुरात्म्यांपासून वाचवू शकतो. एलसी आता एक बाप्तिस्माप्राप्त साक्षीदार आहे आणि तिच्या कुटुंबातील तसेच ओळखीच्या अशा एकूण १४ लोकांनी सत्य स्वीकारले आहे.
११. यहोवाला आपले जीवन समर्पण करणारे लोक कोणते बदल करण्यास तयार आहेत?
११ गेल्या वर्षी ज्यांनी देवाची सेवा करण्याकरता स्वतःचे समर्पण केले त्यांना आपल्या जीवनात अशाप्रकारचे आमूलाग्र बदल करावे लागले नाहीत. पण एकेकाळी आध्यात्मिकरीत्या मृत असलेले सर्वच जण आता आध्यात्मिकरीत्या जिवंत झाले आहेत. (इफिसकर २:१) ते जगात राहत असले तरी ते जगाचा भाग नाहीत. (योहान १७:१५, १६) तसेच, ‘स्वर्गात नागरिकत्व’ असलेल्या अभिषिक्त ख्रिश्चनांसारखे ते “प्रवासी व परदेशवासी” आहेत. (फिलिप्पैकर ३:२०; १ पेत्र २:११) देव आणि शेजाऱ्यांबद्दलच्या प्रीतीने प्रवृत्त होऊन ते देवाच्या दर्जांच्या सुसंगतेत जीवन व्यतीत करू लागले. (मत्तय २२:३७-३९) ते स्वार्थी, भौतिक ध्येय ठेवत नाहीत किंवा या जगात स्वतःच्या इच्छा पूर्ण करीत राहण्याची त्यांना गरज वाटत नाही. त्याऐवजी ते, “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी” या अभिवचनाकडे आपले लक्ष लावून आहेत.—२ पेत्र ३:१३; २ करिंथकर ४:१८.
१२. गेल्या वर्षाच्या अहवालातील कोणते कार्य, येशूला त्याच्या उपस्थितीदरम्यान ‘पृथ्वीवर विश्वास आढळल्याचा’ पुरावा देतो?
१२ अब्राहाम कनानास राहायला गेला तेव्हा, त्यांना आधार व संरक्षण देण्याकरता यहोवाव्यतिरिक्त इतर कोणीही त्याच्याबरोबर आणि त्याच्या कुटुंबाबरोबर नव्हते. पण, नव्याने बाप्तिस्मा घेणारे हे ३,१६,०९२ ख्रिस्ती निश्चितच एकटे नाहीत. अब्राहामाप्रमाणे यांना यहोवा आपल्या आत्म्याद्वारे आधार व संरक्षण देतो हे खरे आहे. (नीतिसूत्रे १८:१०) परंतु याबरोबरच तो त्यांना एका सजीव, आंतरराष्ट्रीय ‘राष्ट्राद्वारे’ आधार देतो; हे राष्ट्र आजच्या काही भौतिक राष्ट्रापेक्षा अधिक गजबजलेले आहे. (यशया ६६:८) गेल्यावर्षी, या राष्ट्राच्या ५८,८८,६५० नागरिकांनी, शेजाऱ्यांना देवाची अभिवचने सांगण्याद्वारे आपल्या सक्रिय विश्वासाचा पुरावा दिला. (मार्क १३:१०) त्यांनी या कार्यात आस्थेवाईक लोकांना शोधण्यात १,१८,६६,६६,७०८ तास खर्च केले. परिणामतः, विश्वास विकसित करू इच्छिणाऱ्यांबरोबर ४३,०२,८५२ बायबल अभ्यास संचालित करण्यात आले. त्यांच्या आवेशाचे आणखी एक उदाहरण म्हणजे, या ‘राष्ट्रातील’ ६,९८,७८१ जणांनी, पूर्ण वेळ असो अथवा एक किंवा एकापेक्षा अधिक महिन्यांसाठी असो, पायनियर सेवेत भाग घेतला. (यहोवाच्या साक्षीदारांच्या गेल्या वर्षाच्या कार्याचा तपशील पृष्ठे १२-१५ वर आहेत.) हा उल्लेखनीय अहवाल, “मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?” या येशूच्या प्रश्नाचे स्पष्ट आणि सजीव उत्तर आहे.
परिक्षांतही विश्वासू
१३, १४. अब्राहाम आणि त्याच्या कुटुंबाला कनानमध्ये सामोरे जावे लागलेल्या काही समस्यांचे वर्णन करा.
१३ अब्राहाम आणि त्याच्या घराण्याला कनानमध्ये राहणे इतके सोपे नव्हते. एकदा कडक दुष्काळ पडल्यामुळे त्याला कनानहून इजिप्तला जावे लागले. शिवाय, इजिप्तचा शासक आणि गेरारचा (गाझाच्या जवळ) शासक या दोघांनी अब्राहामाची पत्नी सारा हिला घेण्याचा प्रयत्न केला. (उत्पत्ति १२:१०-२०; २०:१-१८) अब्राहामाच्या गुराख्यांत आणि लोटाच्या गुराख्यांत वारंवार खटके उडू लागले तेव्हा दोन्ही घरे वेगवेगळी झाली. निस्वार्थीपणे, अब्राहामाने लोटाला जमीन निवडण्याची पहिली संधी दिली; लोटाने यार्देनेचे खोरे निवडले; एदेनसारखे ते सुपीक आणि सुंदर होते.—उत्पत्ति १३:५-१३.
१४ पुढे, दूरदेशाचा एलाम राजा आणि त्याचे मित्रराष्ट्र तसेच पाच शहरांचे राजे यांच्याशी लोटाचे सिद्दीम खोऱ्यात युद्ध झाले. या परकीय राजांनी स्थानीय राजांवर जय मिळवून त्यांची मालमत्ता लुटून नेली; लोटाला धरून नेले आणि त्याची मालमत्ता देखील त्यांनी लुटून नेली. अब्राहामाला हे समजल्यावर त्याने निडरपणे या परकीय राजांचा पाठलाग करून लोट आणि त्याच्या घराण्याला तसेच स्थानीय राजांची मालमत्ता सोडवून आणली. (उत्पत्ति १४:१-१६) परंतु कनानमधील लोटाचा हा इतका काही वाईट अनुभव नव्हता. काही कारणास्तव तो सदोम येथे राहायला गेला; हे शहर अनैतिकतेसाठी नावाजलेले होते तरी.b (२ पेत्र २:६-८) जेव्हा दोन देवदूतांनी त्याला शहराच्या नाशाविषयी इशारा दिला तेव्हा तो आपल्या पत्नीला आणि मुलींना घेऊन तेथून पळाला. परंतु, लोटाच्या पत्नीने देवदूतांनी दिलेल्या विशिष्ट सूचनांकडे दुर्लक्ष केले आणि याचा परिणाम असा झाला की मिठाचा खांब तिची कबर बनली. लोटाला काही दिवस सोअर येथील एका गुहेत आपल्या मुलींबरोबर राहावे लागले. (उत्पत्ति १९:१-३०) हे सर्व ऐकून अब्राहाम निश्चितच अस्वस्थ झाला असेल; कारण लोट अब्राहामाच्या घराण्याचा एक भाग म्हणून त्याच्याबरोबर कनान येथे राहायला आला होता.
१५. एका अनोळख्या देशात तंबूत राहताना अब्राहामाला अनेक समस्या सहन कराव्या लागल्या तरीसुद्धा कोणते नकारात्मक विचार करण्याचे त्याने स्पष्टपणे टाळले?
१५ आपल्याला आणि लोटाला खरे तर ऊरमध्ये आपल्या पित्याच्या मोठ्या कुटुंबाबरोबर किंवा हारानमध्ये आपला भाऊ नाहोर याच्या बरोबर राहायला हवे होते, असा अब्राहामाने कधी विचार केला का? तंबूंमध्ये राहण्याऐवजी तटबंदी असलेल्या शहराच्या आत आपल्याला राहाता आले असते असा त्याने कधी विचार केला का? किंवा कदाचित, त्याने अशी शंका केली का, की एका अनोळखी देशात भटकंती म्हणून जगण्याकरता त्याला जे त्याग करावे लागले त्यात त्याने सुज्ञता दाखवली होती? अब्राहाम आणि त्याचे कुटुंब यांच्याविषयी बोलताना प्रेषित पौलाने नोंद केली: “ज्या देशातून ते निघाले होते त्या देशाला उद्देशून हे म्हणणे असते तर त्यांना परत जाण्याची संधी होती.” (इब्री लोकांस ११:१५) पण ते परतले नाहीत. परिक्षांचा सामना करण्याचा दृढनिश्चय बाळगून, यहोवा त्यांना जेथे ठेवू इच्छित होता तेथे ते राहिले.
सहनशीलता आज
१६, १७. (अ) आज अनेक ख्रिश्चन कोणत्या समस्यांचा सामना करीत आहेत? (ब) ख्रिश्चन कोणती सकारात्मक मनोवृत्ती बाळगतात? का?
१६ आज ख्रिश्चनांमध्ये अशाचप्रकारची सहनशीलता दिसून येते. देवाची सेवा करण्यामुळे त्यांना बहुत आनंद मिळत असला तरी, या शेवटल्या दिवसांत खऱ्या ख्रिश्चनांसाठी जीवन इतके सोपे नाही. ते आध्यात्मिक परादीसमध्ये राहत असले तरी, त्यांच्या शेजाऱ्यांप्रमाणे त्यांनाही आर्थिक दबावांचा सामना करावा लागतो. (यशया ११:६-९) राष्ट्रांत चाललेल्या युद्धांचे अनेक जण निष्पाप बळी ठरले आहेत आणि काहींची तर काहीही चूक नसताना इतकी दुर्दशा करण्यात आली की ते अक्षरशः कंगाल झाले आहेत. शिवाय, बहुतेक लोकांना ते आवडत नसल्यामुळे येणाऱ्या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. अनेक देशांत लोक कमालीचे निरुत्साहित असताना देखील ते सुवार्तेचा प्रचार करतात. इतर देशांत काहींना, “उपद्रव योजून अन्याय” करणाऱ्यांच्या तसेच “निर्दोष्यांस देहान्त शिक्षा” देणाऱ्यांच्या फसव्या हल्ल्यांना तोंड द्यावे लागते. (स्तोत्र ९४:२०, २१) आणि ज्या देशांत त्यांच्यावर हल्ला केला जात नाही व काहीजण त्यांच्या उच्च दर्जांबद्दल त्यांची प्रशंसा करतात तेथेही ते त्यांच्या शाळासोबत्यांपासून व सहकर्मचाऱ्यांपासून वेगळे राहतात—हे, ज्याप्रमाणे अब्राहामाच्या जवळपासचे लोक शहरात राहिले परंतु तो मात्र तंबूत राहिला त्याप्रमाणेच आहे. होय, या जगात राहून ‘जगाचे न होणे’ इतके सोपे नाही.—योहान १७:१४.
१७ मग, देवाला आपण केलेल्या समर्पणाचा आपल्याला पस्तावा होतो का? आपण इतरांप्रमाणेच जगाचे भाग म्हणून राहिलो असतो तर किती बरे झाले असते असे आपल्याला वाटते का? यहोवाच्या सेवेत आपण केलेल्या त्यागांचे आपल्याला वाईट वाटते का? मुळीच नाही! उलट, आपण मागील गोष्टींचा विचार करतो तेव्हा आपल्याला ही जाणीव होते, की आपण जे काही त्याग केले असतील ते, आपण आता उपभोगत असलेले आशीर्वाद आणि भवितव्यात ज्या आशीर्वादांचा उपभोग घेणार आहोत त्यांच्या तुलनेत काहीच नाहीत. (लूक ९:६२; फिलिप्पैकर ३:८) शिवाय, जगातील लोक आनंदी आहेत का? खरे तर, आज अनेक जण अशा उत्तरांच्या शोधात आहेत जी आपल्याकडे आधीपासूनच आहेत. त्यांचे हाल होत आहेत कारण आपल्याप्रमाणे ते बायबलमधून देवाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करीत नाहीत. (स्तोत्र ११९:१०५) आपण आपल्या सहविश्वासूंबरोबर जो ख्रिस्ती सहवास आणि आल्हाददायक संगती यांचा आनंद लुटत आहोत तो अनेकांना हवाहवासा वाटतो.—स्तोत्र १३३:१; कलस्सैकर ३:१४.
१८. ख्रिश्चन अब्राहामासारखे धैर्य दाखवतात तेव्हा त्याचा परिणाम काय होतो?
१८ लोटाला कैद करून नेणाऱ्यांचा पाठलाग करून अब्राहामाने जसे धैर्य दाखवले तसे धैर्य आपणही कधीकधी दाखवले पाहिजे. आणि आपण असे करतो तेव्हा यहोवा आशीर्वाद देतो. जसे की, उत्तर आर्यलंडमध्ये धर्मपंथांतील हिंसेमुळे लोकांच्या मनात द्वेषभाव पक्का झाला आहे व तटस्थ राहण्याकरता बरेच धैर्य लागते. तरीसुद्धा, विश्वासू ख्रिश्चनांनी, “खंबीर हो, हिंमत धर, घाबरु नको, कचरू नको; कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल” या यहोवाने यहोशवाला दिलेल्या सूचनांचे पालन केले आहे. (यहोशवा १:९; स्तोत्र २७:१४) इतक्या वर्षांपासूनच्या त्यांच्या निडर भूमिकेमुळे अनेक त्यांचा आदर करू लागले आहेत आणि आज ते त्या देशातील सर्व समाजांमध्ये मुक्तपणे प्रचार करू शकतात.
१९. ख्रिश्चनांना कोठे राहण्यास आनंद वाटतो व यहोवाच्या निर्देशनांचे पालन करताना कोणत्या परिणामाची ते पूर्ण आत्मविश्वासाने अपेक्षा करतात?
१९ आपण कोणत्याही परिस्थितीचा सामना करीत असलो तरी, यहोवाच्या निर्देशनांचे पालन केल्यास त्यातून त्याचे गौरव होईल आणि आपला फायदा होईल याबाबतीत आपण कोणतीही शंका बाळगू नये. आपल्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आणि त्याग करावे लागले तरी, यहोवाच्या सेवेत राहण्यासारखी जागा इतर कोठेही नाही; तेथे आपण आपल्या ख्रिस्ती बंधूभगिनींबरोबरच्या सहवासाचा आनंद लुटू शकतो व देवाने अभिवचन दिलेल्या चिरकालिक भवितव्याची पूर्ण भरवशाने वाट पाहू शकतो.
[तळटीपा]
a अब्राहामाने कदाचित आपला भाऊ मरण पावल्यावर त्याच्या मुलाला अर्थात लोटाला दत्तक घेतले असावे.—उत्पत्ति ११:२७, २८; १२:५.
b काहींचे असे म्हणणे आहे, की चार राजांमुळे त्याला आलेल्या कटु अनुभवामुळे सुरक्षिततेसाठी लोट या शहरात राहायला आला असावा.
तुम्हाला आठवते का?
◻ दृढ विश्वास महत्त्वपूर्ण का आहे?
◻ अब्राहामाचा विश्वास दृढ होता हे त्याने कसे दाखवले?
◻ समर्पणासोबत एखाद्याच्या जीवनात बदल करणे देखील आलेच हे कसे?
◻ आपल्याला समस्यांचा सामना करावा लागला तरी देवाची सेवा करायला आनंद का वाटतो?
[७ पानांवरील चित्रं]
अभिवचन प्राप्त करण्याकरता अब्राहाम आपल्या जीवनात आमूलाग्र बदल करण्यास तयार होता
[९ पानांवरील चित्रं]
येशूला त्याच्या उपस्थितीदरम्यान ‘पृथ्वीवर विश्वास आढळला’ हे पुरावा दाखवून देतो