‘डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे नव्हे तर विश्वासाने चालणे’
“आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही.”—२ करिंथकर ५:७.
१. ‘विश्वासाने चालणे,’ म्हणजे काय?
देव वचनातील मार्गदर्शनांच्या एकमतात आपण जेव्हा जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा तेव्हा आपल्याठायी काही प्रमाणात विश्वास असल्याचे आपण दर्शवत असतो. आपण इतरांना देवाच्या राज्याची साक्ष देण्यास सुरवात करतो त्यावरूनही आपला विश्वास प्रकट होतो. आणि यहोवाला आपण आपले जीवन समर्पित करतो तेव्हा, ‘विश्वासाने चालण्याची’ अर्थात, विश्वासाचे नियंत्रण असलेले जीवन जगण्याची आपली इच्छा आहे याचा आपण पुरावा देत असतो.—२ करिंथकर ५:७; कलस्सैकर १:९, १०.
२. एखादा मंडळीच्या कार्यांत भाग घेत असेल तर त्याचा विश्वास आहे असे नेहमीच का म्हणता येणार नाही?
२ आपण खरोखरच असे जीवन व्यतीत करू इच्छित आहोत तर आपला विश्वास भक्कम असणे आवश्यक आहे. (इब्री लोकांस ११:१, ६) पुष्कळ लोक, यहोवाच्या साक्षीदारांच्या उच्च नैतिक दर्जांमुळे आणि साक्षीदारांमधील प्रीती पाहून त्यांच्याकडे आकर्षित होतात. ही एक चांगली सुरवात आहे, परंतु अशा लोकांचा विश्वास आहे असे म्हणता येणार नाही. काहीजण विश्वासात मजबूत असलेल्या आपल्या प्रिय पालकाचे किंवा वैवाहिक सोबत्याचे उदाहरण पाहून काही आध्यात्मिक कार्यांत भाग घेतील. एखाद्याच्या घरात अशी प्रभाव टाकणारी व्यक्ती असणे म्हणजे एक आशीर्वादच आहे, पण हा प्रभाव देखील देवाबद्दल व्यक्तिगत प्रीती व त्याच्यावरील विश्वासाची जागा घेऊ शकत नाही.—लूक १०:२७, २८.
३. (अ) आपला विश्वास भक्कम असावयास हवा तर, बायबलविषयी आपली स्वतःची कोणती खात्री पटणे आवश्यक आहे? (ब) बायबलच्या प्रेरणेविषयीची खात्री काहींना इतर लोकांपेक्षा लवकर का पटते?
३ बायबल देवाचे वचन आहे याची विश्वासाने चालणाऱ्या प्रामाणिक जनांची पूर्ण खात्री पटलेली असते. पवित्र शास्त्रवचने खरोखरच “परमेश्वरप्रेरित”a आहेत याचा भरपूर पुरावा आहे. (२ तीमथ्य ३:१६) खात्री पटण्यासाठी एखाद्याने या पुराव्यांपैकी कितींचे परीक्षण करावे बरे? हे त्याच्या पार्श्वभूमीवर अवलंबून असू शकते. एखादी गोष्ट एखाद्याची पूर्ण खात्री पटवू शकते पण तीच गोष्ट दुसऱ्याची खात्री पटवू शकत नाही. कधीकधी, एखाद्याला खूप अखंडनीय पुरावा दाखवला असताही तो तर्कशुद्ध समारोपाचा स्वीकार करणार नाही. का बरे? त्याच्या अंतःकरणात खोलवर रुजलेल्या इच्छांमुळे. (यिर्मया १७:९) यास्तव, एखादा देवाच्या उद्देशांवर विश्वास असल्याचा दावा करत असला तरी, त्याला जगाची मान्यता मिळवण्याची ओढ असेल. बायबल दर्जांशी खटकणारी जीवनपद्धत सोडण्याची त्याची इच्छा नसेल. पण, एखादा जर सत्यासाठी खरोखर भुकेला असला, स्वतःशी प्रामाणिक असला, नम्र असला तर कालांतराने तो बायबल हे देवाचे वचन असल्याचे जाणेल.
४. विश्वास प्राप्त करण्याकरता एखाद्याने काय करणे आवश्यक आहे?
४ बायबलचा अभ्यास करण्यास मदत केलेल्या लोकांना, बहुधा केवळ काही महिन्यांतच हे कळून चुकते, की बायबल हे देवाचे वचन असल्याचा भरपूर पुरावा त्यांना मिळाला आहे. यामुळे जर का यहोवाकडून प्रशिक्षण मिळण्याकरता आपल्या हृदयाची कवाडे खुली करण्यास ते प्रवृत्त झाले तर त्यांचे आंतरिक विचार, त्यांच्या आकांक्षा आणि त्यांच्या प्रेरणा, ते जे काही शिकत आहेत त्यानुसार हळूहळू आकार घेऊ लागतील. (स्तोत्र १४३:१०) रोमकर १०:१० म्हणते की, एखादी व्यक्ती “अंतःकरणाने” विश्वास ठेवते. आणि हा विश्वास, त्या व्यक्तीला खरोखर कसे वाटत आहे ते व्यक्त करतो व ते तिच्या जीवनातून प्रकट होते.
नोहाने भक्कम विश्वासानुसार कार्य केले
५, ६. नोहाचा विश्वास कशावर आधारित होता?
५ नोहा, भक्कम विश्वास असलेल्यांपैकी एक होता. (इब्री लोकांस ११:७) कोणत्या धर्तीवर तो असा विश्वास बाळगत होता? नोहाकडे देवाचे वचन होते, लिखित रूपात नव्हे तर ते त्याला ऐकवण्यात आले होते. उत्पत्ति ६:१३ म्हणते: “देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाचजुलूम माजला आहे.” (तिरपे वळण आमचे.) यहोवाने नोहास एक तारू बांधावयास सांगितले आणि त्याच्या बांधकामाची सविस्तर माहिती दिली. मग देव पुढे म्हणाला: “ज्यांच्या ठायी प्राण आहे असे सर्व देहधारी आकाशाखालून नाहीसे करावे म्हणून मी पृथ्वीवर प्रलयाचे पाणी आणितो; पृथ्वीवर जे काही आहे ते नष्ट होईल.”—उत्पत्ति ६:१४-१७.
६ यापूर्वी कधी पर्जन्यवृष्टी झाली होती का? बायबल तसे काही सांगत नाही. उत्पत्ति २:५ म्हणते: “परमेश्वर देवाने अजून पृथ्वीवर पाऊस पाडिला नव्हता.” परंतु हा उल्लेख तर, अनेक शतकानंतर हयात असलेल्या मोशेने केलेल्या नोहाच्या दिवसाचा नव्हे तर त्या आधी फार पूर्वीच्या एका समयाचा उल्लेख आहे. उत्पत्ति ७:४ मध्ये दाखवल्याप्रमाणे, नोहाबरोबर बोलताना यहोवाने पावसाचा उल्लेख केला, आणि यहोवाला काय म्हणायचे होते ते नोहाला समजले हे स्पष्ट आहे. तरीसुद्धा, नोहाचा विश्वास तो जे पाहू शकत होता केवळ त्यावरच नव्हता. प्रेषित पौलाने लिहिले की, “तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली.” देवाने नोहास म्हटले, की तो पृथ्वीवर “प्रलयाचे पाणी,” किंवा नवे जग भाषांतर या इंग्रजी बायबलच्या तळटीपेत उत्पत्ति ६:१७ मध्ये म्हटल्याप्रमाणे “आकाशातील महासागर” आणणार आहे. त्या वेळेपर्यंतच्या काळात अशी घटना कधीच घडली नव्हती. परंतु नोहाला दिसत असलेली सर्व सृष्टी, देव निश्चितच एक विनाशकारक प्रलय आणील याचा स्पष्ट पुरावा होती. विश्वासाने प्रवृत्त होऊन नोहाने एक तारू बांधले.
७. (अ) देवाने नोहाला जे करावयास सांगितले होते त्यासाठी त्याला कशाची गरज भासली नाही? (ब) नोहाच्या विश्वासाचा विचार केल्याने आपल्याला कसा फायदा होतो व आपला विश्वास इतरांना आशीर्वाद कसा ठरू शकतो?
७ प्रलयाची सुरवात केव्हा होईल त्याची तारीख देवाने नोहाला सांगितली नव्हती. परंतु नोहाने याचा, शंकास्पद मनोवृत्ती आत्मसात करण्यास, तारू बांधावयाच्या व प्रचार करण्याच्या कामाला जीवनात दुय्यम स्थान देण्यासाठी सबब बनवली नाही. पुरेसा वेळ दिल्यानंतर, देवाने नोहाला तारूत केव्हा प्रवेश करायचा ते सांगितले. तोपर्यंत, “नोहाने तसे केले. देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले.” (उत्पत्ति ६:२२) नोहा डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे नव्हे तर विश्वासाने चालला. याबद्दल आपण त्याचे किती आभार मानतो! त्याच्या विश्वासामुळेच तर आज आपण जिवंत आहोत. आपल्या बाबतीतही, आपण जो विश्वास बाळगतो त्याचा खोल प्रभाव, भवितव्यात केवळ आपल्यासाठीच नव्हे तर आपल्या मुलांसाठी तसेच आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी जे काही राखून ठेवले आहे त्यावर होऊ शकतो.
अब्राहामाचा विश्वास
८, ९. (अ) अब्राहामाचा विश्वास कशावर आधारित होता? (ब) यहोवाने अब्राहामाला कोणाद्वारे “दर्शन” दिले?
८ दुसरे एक उदाहरण घ्या—अब्राहामाचे. (इब्री लोकांस ११:८-१०) अब्राहामाचा विश्वास कशावर आधारित होता? ऊर देशातील खास्दी लोकांच्या मूर्तीपूजक व भौतिकवादी वातावरणात तो लहानाचा मोठा झाला होता. परंतु, इतर प्रभावांनी अब्राहामाच्या दृष्टिकोनाला आकार दिला होता. त्यातील एक प्रभाव नोहाचा पुत्र शेमसोबतची त्याची संगत होती; अब्राहाम १५० वर्षांपर्यंत शेमचा समकालीन होता. यहोवाच “परात्पर देव, आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी” असल्याची अब्राहामाला खात्री पटली होती.—उत्पत्ति १४:२२.
९ अब्राहामावर आणखी एका गोष्टीचा खोल प्रभाव पडला होता. ‘अब्राहाम हारान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपटेम्या देशात असता यहोवाने त्याला दर्शन देऊन म्हटले, तू आपला देश व आपले नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशात चल.’ (प्रेषितांची कृत्ये ७:२, ३) यहोवाने कोणाद्वारे अब्राहामाला दर्शन दिले? अब्राहामाने देवाला प्रत्यक्षात पाहिले नाही. (निर्गम ३३:२०) परंतु, यहोवाने त्याला स्वप्नाद्वारे, वैभवाच्या अलौकिक दर्शनाद्वारे किंवा कदाचित एखाद्या देवदूतीय संदेशवाहकाला आपले प्रतिनिधीत्व करण्याकरता पाठवले असावे. (पडताळा उत्पत्ति १८:१-३; २८:१०-१५; लेवीय ९:४, ६, २३, २४.) यहोवाने अब्राहामाला कोणाद्वारेही दर्शन दिलेले असले तरी, देव आपल्याला एक अमूल्य विशेषाधिकार देत असल्याचा भरवसा या विश्वासू मनुष्याला होता. अब्राहामाने विश्वासाने प्रतिसाद दिला.
१०. यहोवाने अब्राहामाचा विश्वास बळकट कसा केला?
१० अब्राहामाचा विश्वास, देव त्याला ज्या देशात जाण्यास सांगत होता त्या देशाची सविस्तर माहिती असण्यावर अवलंबून नव्हता. तो देश त्याला केव्हा दिला जाईल हे त्याला माहीत असण्यावर तो अवलंबून राहिला नाही. यहोवा सर्वसमर्थ देव आहे यावर त्याचा विश्वास होता. (निर्गम ६:३) यहोवाने अब्राहामाला सांगितले, की त्याला मूल होईल, पण हे कसे शक्य आहे असे कधीकधी अब्राहामाला वाटायचे. तो वृद्ध होत चालला होता. (उत्पत्ति १५:३, ४) आकाशातील ताऱ्यांकडे बघ आणि त्यांची मोजणी करता येईल का असे विचारून यहोवाने अब्राहामाचा विश्वास वाढवला. “तुझी संतति अशीच होईल,” असे देव त्याला म्हणाला. याचा अब्राहामावर खोल परिणाम झाला. या भयजनक खज्योतींचा निर्माता, त्याने दिलेले अभिवचन पूर्ण करू शकतो हे स्पष्ट होते. अब्राहामाने “परमेश्वरावर विश्वास ठेविला.” (उत्पत्ति १५:५, ६) अब्राहामाने, तो जे काही ऐकत होता ते आवडत असल्यामुळे विश्वास ठेवला नाही; तर त्याचा विश्वास भक्कम होता.
११. (अ) अब्राहाम जेव्हा शंभरी गाठणार होता तेव्हा, वृद्ध सारा एका पुत्राला जन्म देईल याविषयी देवाने दिलेल्या अभिवचनाला त्याने कशी प्रतिक्रिया दाखवली? (ब) मोरिया डोंगरावर जाऊन आपल्या पुत्राचे होमार्पण करण्याची परीक्षा अब्राहामासमोर आली तेव्हा कोणत्या प्रकारच्या विश्वासाने त्याने या परीक्षेला तोंड दिले?
११ अब्राहाम शंभरी गाठणार होता आणि त्याची पत्नी सारा ९० च्या सुमारास होती तेव्हा यहोवाने पुन्हा एकदा अब्राहामाला वचन दिले, की त्याला एक पुत्र होईल व सारा माता होईल. अब्राहामाने परिस्थितीचा विचार केला. “परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले; आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयासहि समर्थ आहे अशी त्याची पक्की खातरी होती.” (रोमकर ४:१९-२१) देवाचे अभिवचन फोल ठरणार नाही हे अब्राहामाला माहीत होते. नंतर, देवाने अब्राहामाला त्याचा पुत्र इसहाक याला मोरिया देशात नेऊन त्याचे होमार्पण करण्यास सांगितले तेव्हा विश्वासामुळेच त्याने देवाची आज्ञा मानली. (उत्पत्ति २२:१-१२) चमत्कारिकरीत्या पुत्राला जन्म घालणारा देव, पुत्रासंबंधाने त्याने दिलेली पुढील अभिवचने पूर्ण करण्याकरता त्याला पुन्हा उठवू देखील शकतो यावर अब्राहामाचा पूर्ण भरवसा होता.—इब्री लोकांस ११:१७-१९.
१२. अब्राहाम कोठवर विश्वासाने चालत राहिला व त्याने आणि त्याच्या कुटुंबाने दृढ विश्वास दाखवल्याबद्दल कोणते प्रतिफळ त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आले आहे?
१२ जीवनाच्या ठराविक समयीच नव्हे तर संपूर्ण जीवनभर विश्वासाचे त्याच्यावर नियंत्रण होते हे अब्राहामाने दाखवले. अब्राहामाला त्याच्या आयुष्यात, वाग्दत्त देशाचा एकही हिस्सा वतन म्हणून देवाकडून मिळाला नाही. (प्रेषितांची कृत्ये ७:५) पण, अब्राहाम दुःखी होऊन खास्दी लोकांच्या ऊर देशी परतला नाही. शंभर वर्षे, म्हणजे त्याच्या मृत्यूपर्यंत तो देवाने त्याला सांगितलेल्या देशात तंबूतच राहिला. (उत्पत्ति २५:७) अब्राहाम, त्याची पत्नी सारा, त्यांचा पुत्र इसहाक आणि त्यांचा नातू याकोब यांच्याविषयी इब्री लोकांस ११:१६ म्हणते: “आपणाला त्यांचा देव म्हणवून घ्यावयास देवाला त्यांची लाज वाटत नाही; कारण त्याने त्यांच्यासाठी नगर तयार केले आहे.” होय, यहोवाने पृथ्वीवरील आपल्या मशिही राज्यात त्यांच्यासाठी जागा राखून ठेवली आहे.
१३. यहोवाच्या सेवकांमध्ये आज, अब्राहामासारखा विश्वास असल्याचा पुरावा कोण देतात?
१३ यहोवाच्या सेवकांपैकी आज अब्राहामासारखे आहेत. अनेक वर्षांपासून ते विश्वासाने चालत आले आहेत. देव देत असलेल्या शक्तीद्वारे त्यांनी डोंगरासारख्या अडथळ्यांवर मात केली आहे. (मत्तय १७:२०) देवाने त्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे तो वारसा केव्हा देणार आहे हे त्यांना माहीत नसल्यामुळे त्यांचा विश्वास डगमगत नाही. यहोवाचे वचन फोल ठरू शकत नाही हे त्यांना पक्के माहीत आहे, व त्याच्या साक्षीदारांपैकी एक गणले जाणे हा त्यांचा अमूल्य विशेषाधिकार आहे असे ते समजतात. तुम्हालाही असेच वाटते का?
मोशेला प्रवृत्त करणारा विश्वास
१४. मोशेच्या विश्वासाचा पाया कसा घालण्यात आला होता?
१४ विश्वासाचे आणखी एक उदाहरण मोशेचे आहे. त्याच्या विश्वासाचा पाया काय होता? बालपणीच तो पाया घालण्यात आला होता. फारोच्या मुलीला नाईल नदीत लव्हाळ्यांच्या पेटीत मोशे सापडला होता आणि तिने त्याला आपला पुत्र म्हणून वाढवले असले तरी, मोशेच्या हिब्रू आईनेच अर्थात, योखबेदनेच त्याचे पालनपोषण केले व त्याच्या कोवळ्या वयात त्याला आपल्या देखरेखीत ठेवले. योखबेदने त्याला उत्तमरीत्या शिकवले, त्याच्या मनात यहोवाबद्दलची प्रीती आणि अब्राहामाला त्याने दिलेल्या वचनांबद्दल कदर बिंबवली हे स्पष्ट आहे. नंतर, फारोच्या घराण्याचा सदस्य या नात्याने मोशेला “मिसरी लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले.” (प्रेषितांची कृत्ये ७:२०-२२; निर्गम २:१-१०; ६:२०; इब्री लोकांस ११:२३) मोशे मोठ्या हुद्यावर असला तरी, त्याचे मन मात्र दास असलेल्या देवाच्या लोकांकडेच होते.
१५. यहोवाच्या लोकांबरोबर आपली ओळख देण्याद्वारे मोशेने काय केले होते असे आपल्याला वाटते?
१५ मोशे ४० वर्षांचा झाला तेव्हा त्याने, एका इस्राएली व्यक्तीला अन्यायीपणे वागणूक देणाऱ्या एका इजिप्शियनची हत्या करून त्याची सुटका केली. देवाच्या लोकांकडे पाहण्याचा मोशेचा कोणता दृष्टिकोन होता हे या घटनेवरून दिसून येते. खरेच, “मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविण्याचे विश्वासाने नाकारले.” इजिप्शियन राजपरिवाराचा एक सदस्य राहून “पापाचे क्षणिक सुख” भोगत राहण्याऐवजी, गैरवागणूक होत असलेल्या देवाच्या लोकांबरोबर स्वतःची ओळख देण्यास विश्वासाने त्याला प्रवृत्त केले.—इब्री लोकांस ११:२४, २५; प्रेषितांची कृत्ये ७:२३-२५.
१६. (अ) यहोवाने मोशेवर कोणती कामगिरी सोपवली व देवाने त्याला कसे साहाय्य केले? (ब) ही कामगिरी पूर्ण करताना मोशेने त्याचा विश्वास कसा प्रकट केला?
१६ आपल्या लोकांना सुटका मिळवून देण्यास कार्य करण्याची मोशेची उत्कट इच्छा होती पण त्यांची सुटका करण्याचा देवाचा समय अद्याप आला नव्हता. मोशेला इजिप्त सोडून पळून जावे लागले. ४० वर्षांनंतरच, यहोवाने मोशेवर, इजिप्तला पुन्हा जाऊन इस्राएल लोकांना त्या देशाबाहेर काढण्याची कामगिरी सोपवली. (निर्गम ३:२-१०) मोशेची प्रतिक्रिया काय होती? यहोवाकडे इस्राएलला सोडवण्याचे सामर्थ्य होते की नव्हते याविषयी त्याने शंका बाळगली नाही, पण देवाने त्याला जी भूमिका निभावण्यास सांगितली होती तिच्यासाठी तो अयोग्य होता असे त्याला वाटले. प्रेमळपणे, यहोवाने मोशेला हवे असलेले प्रोत्साहन दिले. (निर्गम ३:११–४:१७) मोशेचा विश्वास बळकट झाला. तो इजिप्तला परतला व फारोने जर का इस्राएल लोकांना यहोवाची उपासना करण्यास पाठवले नाही तर इजिप्तवर ओढवणाऱ्या पिडांचा इशारा त्याने फारोच्या समक्ष जाऊन अनेकवेळा दिला. त्या पिडा आणण्याची मोशेकडे ताकत नव्हती. तो डोळ्याने दिसते त्याप्रमाणे नव्हे तर विश्वासाने चालला. यहोवा आणि त्याचे वचन यांवर त्याचा विश्वास होता. फारोने मोशेला धमकावले. पण मोशे टिकून राहिला. “याने राजाच्या क्रोधाला न भिता विश्वासाने मिसर देश सोडला; कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.” (इब्री लोकांस ११:२७) मोशे परिपूर्ण नव्हता. त्याने चुका केल्या. (गणना २०:७-१२) परंतु, देवाने त्याला आज्ञा दिल्यापासून त्याच्या एकूण जीवनावर विश्वासाचे नियंत्रण होते.
१७. नोहा, अब्राहाम आणि मोशे देवाचे नवे जग पाहण्याकरता जिवंत राहिले नाहीत तरी, विश्वासाने चालल्यामुळे त्यांना काय प्राप्त झाले?
१७ तुमचाही विश्वास नोहा, अब्राहाम आणि मोशे यांसारखा ठरो. त्यांच्या दिवसांत त्यांनी देवाचे नवे जग पाहिले नाही हे खरे आहे. (इब्री लोकांस ११:३९) देवाचा नियुक्त समय अद्याप आला नव्हता; त्याच्या उद्देशांतील इतर पैलू अद्याप साध्य व्हावयाचे होते. तरीपण, देवाच्या वचनावरील त्यांचा विश्वास डगमगला नाही आणि त्यांची नावे देवाच्या जीवनाच्या पुस्तकात आहेत.
१८. स्वर्गीय जीवनाकरता बोलावल्यांकरता विश्वासाने चालणे आवश्यक का आहे?
१८ “देवाने जे अधिक चांगले ते आपल्यासाठी पूर्वीच नेमिले होते,” असे प्रेषित पौलाने लिहिले. म्हणजे, ख्रिस्ताबरोबर स्वर्गीय जीवनासाठी बोलावलेल्या पौलासारख्यांसाठी देवाने जे अधिक चांगले ते नेमले. (इब्री लोकांस ११:४०) खासकरून अशांनाच मनात ठेवून पौलाने २ करिंथकर ५:७ मध्ये, “आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही,” असे लिहिले. हे लिहिले तेव्हा कोणालाही अद्याप त्यांचे स्वर्गीय प्रतिफळ मिळालेले नव्हते. ते प्रतिफळ ते आपल्या शारीरिक डोळ्यांनी पाहू शकत नव्हते, पण त्याच्यावरील त्यांचा विश्वास भक्कम होता. स्वर्गीय जीवनाचा आशीर्वाद मिळणाऱ्या प्रथम फळांपैकी असलेल्या ख्रिस्ताचे मृतातून पुनरुत्थान करण्यात आले होते. तसेच, त्याचे स्वर्गारोहण होण्याआधी ५०० पेक्षा अधिक साक्षीदारांनी त्याला पाहिले होते. (१ करिंथकर १५:३-८) त्या विश्वासाला आपल्या संपूर्ण जीवनावर नियंत्रण करण्यास त्यांच्याकडे भरपूर कारण होते. विश्वासाने चालण्यासाठी आपल्याकडेही उचित कारणे आहेत.
१९. इब्री लोकांस १:१, २ मध्ये दाखवल्याप्रमाणे देव आपल्याबरोबर कोणाद्वारे बोलला?
१९ यहोवा जसे मोशेबरोबर एका जळणाऱ्या झुडपातून देवदूताद्वारे बोलला तसे आज तो आपल्या लोकांबरोबर बोलत नाही. देव त्याच्या पुत्राद्वारे बोलला आहे. (इब्री लोकांस १:१, २) त्याच्याद्वारे देव जे काही बोलला ते सर्व काही देवाने बायबलमध्ये लिहून घेतले आणि आज संपूर्ण जगातील लोकांसाठी त्यांच्या त्यांच्या भाषेनुसार ते अनुवादित करण्यात आले आहे.
२०. नोहा, अब्राहाम आणि मोशे यांच्यापेक्षा आपली परिस्थिती अधिक अनुकूल कशी आहे बरे?
२० नोहा, अब्राहाम आणि मोशे या सर्वांपेक्षा आज आपल्याकडे जास्त आहे. आपल्याकडे देवाचे संपूर्ण वचन आहे—ज्यांतील अनेक गोष्टींची पूर्णता झाली आहे. सर्व प्रकारच्या परीक्षेत स्वतःला यहोवाचे विश्वासू साक्षीदार शाबीत करणाऱ्या स्त्रीपुरुषांबद्दल बायबल जे म्हणते त्या दृष्टिकोनातून इब्री लोकांस १२:१ आपल्याला आर्जवते: “आपणहि सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.” आपला विश्वास क्षुल्लक समजण्याजोगा नाही. आपल्याला “सहज गुंतविणारे पाप” म्हणजेच विश्वासाची उणीव होय. ‘विश्वासाने चालत’ राहावयाचे असल्यास आपल्याला जोराने लढत देण्याची गरज आहे.
[तळटीप]
a वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेले, बायबल—देवाचे वचन की मानवाचे? हे इंग्रजी पुस्तक पाहा.
तुमचे काय उत्तर आहे?
◻ ‘विश्वासाने चालण्यात’ कशाचा समावेश होतो?
◻ नोहाने जो विश्वास दाखवला त्यामुळे आपल्याला कसा लाभ होऊ शकतो?
◻ अब्राहामाने दाखवलेल्या विश्वासातून आपल्याला कशी मदत होते?
◻ विश्वासाचा कित्ता म्हणून बायबल मोशेकडे अंगुली का दर्शवते?
[१० पानांवरील चित्र]
अब्राहाम विश्वासाने चालला
[१० पानांवरील चित्र]
मोशे आणि अहरोन यांनी फारोदेखतही आपला विश्वास प्रकट केला