वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 १२/१५ पृ. ५-९
  • येशूचा जन्म—सत्य कथा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशूचा जन्म—सत्य कथा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • लिहिण्याचा उद्देश
  • बेथलेहेममध्ये येशूचा जन्म
  • यहोवा नम्र सत्यशोधकांना पसंत करतो
  • बाळाचा जीव धोक्यात
  • ख्रिस्ताचा जन्म —तुमच्यासाठी त्याचा काय अर्थ होतो
  • येशूच्या जन्माच्या अहवालातून धडे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • येशूचा जन्म—कोठे आणि केव्हा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • बाळ येशूला खरोखरच तीन मागी भेटायला आले होते का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • येशू पृथ्वीवर कोठून आला?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 १२/१५ पृ. ५-९

येशूचा जन्म—सत्य कथा

तुमच्या राष्ट्राच्या इतिहासातील एखाद्या प्रसिद्ध घटनेचा विचार करा. ती घटना अगदी तपशीलवार आहे आणि एकापेक्षा अधिक इतिहासकारांनी तिच्याबद्दल लिहिले आहे. पण समजा तुम्हाला कोणी म्हणते, की ही घटना कधी घडलीच नाही, ती एक दंतकथा आहे, तर? किंवा जरा एक जवळचेच उदाहरण घेऊ या; समजा, कोणी जर असा दावा केला, की तुमच्या कुटुंबाने तुम्हाला तुमच्या आजोबांच्या जन्माविषयी आणि तारुण्याविषयी जे काही सांगितले त्यातले बहुतेक खोटे आहे, तर काय? दोन्ही प्रसंगी, हा दावा नुसता ऐकूनच तुम्ही क्रोधित व्हाल. निव्वळ बाह्‍यस्वरूपावरून तुम्ही हे दावे स्वीकारणार नाही!

पण, आज टीकाकार मात्र मत्तयने आणि लूकने येशूच्या जन्माविषयी दिलेले अहवाल अगदी सर्रासपणे नाकारतात. ते म्हणतात, की हे दोन्ही अहवाल अगदीच परस्परविरोधी आहेत, ते एकमेकांशी जुळत नाहीत, दोन्हीत उघडउघड लबाडी व ऐतिहासिक चुका आहेत. हे खरे असू शकते का? हे दोषारोप मान्य करण्याऐवजी आपण स्वतःच शुभवर्तमान अहवालांचे परीक्षण करून पाहू या. या दरम्यान, या अहवालांना आज आपल्याला काय शिकवायचे आहे तेही पाहू या.

लिहिण्याचा उद्देश

प्रथमतः, ते आपल्याला या बायबल अहवालांचा उद्देश काय त्याची आठवण करण्यास मदत करतात. या जीवनकथा नाहीत; ते शुभवर्तमान आहेत. हा फरक महत्त्वपूर्ण आहे. जीवनकथेत लेखक आपल्या पुस्तकातील नायक इतका प्रसिद्ध कसा होतो त्याचे वर्णन करण्याच्या प्रयत्नात शेकडो पाने लिहून काढेल. म्हणूनच काही जीवनकथेत त्यांच्या नायकाची वंशावळ, त्याचा जन्म, त्याचे बालपण यांच्या अगदी सविस्तर वर्णनांचीच शेकडो पाने असतात. परंतु शुभवर्तमानांच्या बाबतीत असे नाही. चार शुभवर्तमान अहवालांपैकी केवळ मत्तय आणि लूक या दोघांचेच अहवाल आपल्याला येशूच्या जन्माची आणि बालपणाची माहिती देतात. येशू लहानाचा मोठा कसा झाला त्याची माहिती देण्याचा त्यांचा हेतू नव्हता. येशू पृथ्वीवर येण्याआधी स्वर्गामध्ये आत्मिक व्यक्‍ती म्हणून अस्तित्वात होता हे येशूच्या अनुयायांनी ओळखले होते याची आठवण करा. (योहान ८:२३, ५८) यास्तव, मत्तय आणि लूकने, येशू लहानपणी कसा होता आणि पुढे तो कशाप्रकारचा मनुष्य झाला ते दाखवण्याकरता त्यांनी त्याच्या बालपणाबद्दल सांगितले नाही. तर, त्यांनी अशा अहवालांचे कथन केले जे त्यांच्या शुभवर्तमानांच्या उद्देशांशी जुळत होते.

आणि या लिखाणांमागचा त्यांचा हेतू काय होता? “शुभवर्तमान” या शब्दाचा अर्थ “सुवार्ता” असा होतो. दोघांकडे हा एकच संदेश होता—की येशू वचनयुक्‍त मशीहा, किंवा ख्रिस्त आहे; तो मानवजातीच्या पापांसाठी मरण पावला; व त्याचे पुनरुत्थान होऊन तो स्वर्गात गेला. परंतु, या दोन्ही लेखकांची पार्श्‍वभूमी स्पष्टपणे भिन्‍न होती; दोघांचे श्रोते वेगवेगळे होते. कर गोळा करणाऱ्‍या मत्तयाने, मोठ्या प्रमाणावर असलेल्या यहुदी श्रोत्यांना लक्षात ठेवून लिहिले होते. डॉक्टर असलेल्या लूकने, उच्च पदावर असलेल्या “थियफील महाराज” यांना आणि यहुदी तसेच विदेशी लोकांच्या विस्तृत श्रोत्यांना लिहिले. (लूक १:१-३) प्रत्येक लेखकाने, आपल्या विशिष्ट श्रोत्यांना अगदी समर्पक असलेल्या व त्यांची पूर्ण खात्री पटेल अशा घटनांच निवडल्या. म्हणूनच, मत्तयाचा अहवाल येशूसंबंधित पूर्ण झालेल्या इब्री शास्त्रवचनांतील भविष्यवाणींवर जोर देतो. पण, लूक अशा सर्वसामान्य भाषेत बोलला जी त्याच्या गैरयहुदी श्रोत्यांना कदाचित समजली असावी.

त्यांचे अहवाल वेगवेगळे आहेत यात काही आश्‍चर्य नाही. परंतु टीकाकार दावा करतात त्याप्रमाणे दोन्ही अहवालांत मुळीच विसंगतता नाही. ते एकमेकांना पूरक आहेत, एकमेकांशी इतक्या चांगल्याप्रकारे जुळतात की त्यांचे एक पूर्ण चित्र तयार होते.

बेथलेहेममध्ये येशूचा जन्म

मत्तय आणि लूक हे दोघेही, येशूच्या जन्माविषयीच्या एका उल्लेखनीय चमत्काराबद्दल लिहितात—तो एका कुमारिकेच्या पोटी जन्मला. या चमत्काराने, यशयाने अनेक शतकांपूर्वी केलेली एक भविष्यवाणी पूर्ण केल्याचे मत्तय दाखवतो. (यशया ७:१४; मत्तय १:२२, २३) कैसराने नोंदणीचा हुकूम काढल्यामुळे योसेफ आणि मरियेला बेथलेहेमला जावेच लागले आणि तेथेच येशूचा जन्म झाल्याचे लूक सांगतो. (पृष्ठ ७ वरील चौकोन पाहा.) येशूचा बेथलेहेममध्ये जन्म होणे अर्थसूचक होते. अनेक शतकांआधी, संदेष्टा मीखाने भाकीत केले होते की मशीहा जेरुसलेमजवळच्या या अल्प गणल्या जाणाऱ्‍या गावातून येईल.—मीखा ५:२.

नेटिव्हिटी देखाव्यांमुळे येशूच्या जन्माची रात्र प्रसिद्ध झाली आहे. परंतु खरी कथा, नेहमी दाखवले जाते त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळी आहे. योसेफ आणि मरिया खानेसुमारीसाठी बेथलेहेममध्ये आले होते हे सांगणारा इतिहासकार लूक आपल्याला हेही सांगतो, की त्या महत्त्वाच्या रात्री मेंढपाळ बाहेर आपल्या कळपाला चारीत होते. या दोन प्रसंगांमुळे अनेक बायबल संशोधकांनी असा समारोप केला, की येशूचा जन्म डिसेंबर महिन्यात झाला नसेल. ते या गोष्टीकडे लक्ष वेधतात, की कैसराने, भडकणाऱ्‍या यहुद्यांना थंड आणि पावसाळी मौसमात जाण्याचा हुकूम देणे अशक्य आहे; नाहीतर, संतापाची लाटच उसळली असती. विद्वान याही गोष्टीकडे लक्ष वेधतात, की मेंढपाळांनी आपल्या कळपाबरोबर इतक्या वादळी मौसमात बाहेर राहणे देखील अशक्य आहे.—लूक २:८-१४.

यहोवाने आपल्या पुत्राच्या जन्माची खबर त्या दिवसांतील शिक्षित व प्रभावशाली धार्मिक लोकांना नव्हे तर उघड्यावर राहणाऱ्‍या मजुरांना देण्याचे ठरवले. शास्त्री आणि परूशी लोकांचा मेंढपाळांशी क्वचितच संपर्क यायचा; मेंढपाळांना आपल्या कामामुळे मौखिक नियमशास्त्राच्या काही बारीकसारीक नियमांचे पालन करणे जमत नव्हते. परंतु देवाने या नम्र, विश्‍वासू लोकांना मोठा सन्मान दिला—देवदूतांनी त्यांना कळवले, की हजारो वर्षांपासून देवाचे लोक ज्याची वाट पाहत होते त्या मशीहाचा बेथलेहेममध्ये जन्म झाला आहे. नेटिव्हिटी देखाव्यांमध्ये सहसा दाखवले जाते त्याप्रमाणे त्या ‘तीन राजांनी’ नव्हे तर या लोकांनी मरिया आणि योसेफाला भेट देऊन गव्हाणीतील या निरागस बाळाला पाहिले.—लूक २:१५-२०.

यहोवा नम्र सत्यशोधकांना पसंत करतो

देवावर प्रेम करणारे व त्याच्या उद्देशांची पूर्ती केव्हा होणार यात मनापासून रस घेणारे नम्र लोक देव पसंत करतो. येशूच्या जन्माच्या वेळी घडलेल्या घटनांत हीच गोष्ट पुन्हापुन्हा प्रत्ययास येते. बाळाचा जन्म होऊन एक महिना होतो तेव्हा योसेफ आणि मरिया मोशेच्या नियमशास्त्रानुसार त्याला मंदिरात आणतात व “होल्यांचा जोडा किंवा पारव्यांची दोन पिले” ह्‍यांचा यज्ञ करतात. (लूक २:२२-२४) नियमशास्त्रानुसार खरे तर त्यांना मेंढा अर्पायचा होता; परंतु कोणी गरीब असल्यास त्याला कमी किंमतीचे अर्पण करण्याची सूट होती. (लेवीय १२:१-८) विचार करा. विश्‍वाच्या सार्वभौम यहोवा देवाने आपल्या एकुलत्या एका प्रिय पुत्राला एका श्रीमंत कुटुंबात नव्हे तर एका गरीब कुटुंबात वाढवण्याचे निवडले. तुम्ही पालक आहात तर तुमच्यासाठी एक स्पष्ट स्मरणिका येथे आहे; तुमच्या पाल्याला तुम्ही देऊ शकाल अशी सर्वोत्तम भेट म्हणजे, आध्यात्मिक मूल्यांना प्रथम स्थान देणारे घरातील वातावरण; ही भेट आर्थिक मालमत्ता किंवा प्रतिष्ठित शिक्षण यांपेक्षा कितीतरी पटीने उत्तम आहे.

मंदिरात, आणखी दोन विश्‍वासू व नम्र उपासकांना यहोवा पसंत करतो. एक आहे, ८४ वर्षांची विधवा हन्‍ना; ती केव्हाही ‘मंदिर सोडून गेली नाही.’ (लूक २:३६, ३७) दुसरा आहे, विश्‍वासू व वृद्ध शिमोन. देवाने त्यांना दिलेल्या विशेषाधिकारामुळे दोघांचाही आनंद गगनात मावेनासा होता; त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांना वचनयुक्‍त मशीहा होणाऱ्‍याला पाहण्याची संधी मिळाली होती. बाळाला बघून शिमोन एक भविष्यवाणी करतो. ही भविष्यवाणी आशेने ओतप्रोत भरली आहे खरी, पण तिला दुःखाचे किंचित्‌ गालबोट लागले आहे. तो भाकीत करतो, की एक दिवस असा येईल जेव्हा या तरुण माता मरियेच्या जिवातून आपल्या प्रिय पुत्राबद्दलच्या दुःखाची तरवार भोसकून जाईल.—लूक २:२५-३५.

बाळाचा जीव धोक्यात

शिमोनाची भविष्यवाणी, हे निष्पाप बाळ द्वेषाचे लक्ष्य बनेल याची दुःखद स्मरणिका आहे. तो बाळ असल्यापासून त्याच्याबद्दलचा द्वेष आपण पाहू शकतो. मत्तयाचा अहवाल त्याचे सविस्तर वर्णन देतो. अनेक महिने उलटून गेले आणि आता योसेफ, मरिया आणि येशू बेथलेहेम येथील एका घरात राहतात. पुष्कळ विदेशी लोक त्यांना अचानक भेट देतात. अनेक नेटिव्हिटी देखाव्यांत हे दाखवले जात असले तरी, किती लोक आले होते हे मत्तय सांगत नाही किंवा तो त्यांना “सुज्ञ लोक,” म्हणत नाही आणि “तीन राजे” तर नाहीच नाही. उलट, मागी हा ग्रीक शब्द वापरतो ज्याचा अर्थ “फलज्योतिष” असा होतो. यावरूनच वाचकाला समजले पाहिजे की कुठे तरी डाळ शिजत होती, कारण फलज्योतिष ही अशी कला आहे जिचा देवाचे वचन धिक्कार करते व विश्‍वासू यहुद्यांनी ती कटाक्षाने टाळली.—अनुवाद १८:१०-१२; यशया ४७:१३, १४.

हे फलज्योतिषी पूर्वेकडील तारा पाहून आले होते व त्यांनी जन्मास आलेल्या “यहूद्यांचा राजा” याच्यासाठी भेटवस्तू आणल्या होत्या. (मत्तय २:२) परंतु तो तारा त्यांना बेथलेहेमला नेत नाही. तर तो त्यांना जेरुसलेमला आणि मग हेरोद राजाकडे नेतो. या मनुष्याकडे बाळ येशूचा घात करण्याची पूर्ण ताकदही होती आणि त्याचा उद्देशही तोच होता. या महत्त्वाकांक्षी, खुनी मनुष्याने, त्याच्या मार्गात काटा समजून आपल्याच कुटुंबांतील अनेक जवळच्या सदस्यांची हत्या केली होती.a भविष्यात “यहूद्यांचा राजा” होणाऱ्‍याच्या जन्माची बातमी ऐकून तो अस्वस्थ होतो आणि त्याचा शोध लावण्याकरता तो फलज्योतिषांना बेथलेहेमला पाठवतो. ते जात असताना वाटेत एक विलक्षण गोष्ट घडते. त्यांना जेरुसलेमकडे आणणारा तो “तारा” चक्क पुढे सरकू लागतो!—मत्तय २:१-९.

तो तारा आकाशात खरोखरचा प्रकाश होता की नुसता एक दृष्टान्त होता हे आपल्याला माहीत नाही. पण तो देवाकडून नव्हता हे मात्र आपल्याला माहीत आहे. तो सैतानी तारा त्यांना ठीक त्याच ठिकाणी घेऊन गेला जेथे येशू होता—येशू लहान आणि लाचार होता; त्याचे संरक्षण करण्यासाठी फक्‍त एक गरीब सुतार आणि त्याची बायकोच तेथे होती. नकळत हेरोदाच्या जाळ्यात अडकलेले हे फलज्योतिषी, त्या खुनशी सम्राटाकडे परत गेले असते तर या बाळाचा घात झाला असता. परंतु देव एका स्वप्नाद्वारे त्यांना दर्शन देऊन दुसऱ्‍या मार्गाने त्यांना आपल्या घरी पाठवतो. म्हणजेच, तो तारा देवाचा शत्रू सैतान याच्याकडून असावा; मशीहाचा घात करण्याकरता तो कोणत्याही थरापर्यंत पोहंचू शकतो. आणि आज नेटिव्हिटी देखाव्यांमध्ये तो “तारा” आणि फळज्योतिषी देवाचे प्रतिनिधी म्हणून दाखवले जातात; किती उपहासाची गोष्ट ही!—मत्तय २:९-१२.

तरी, सैतान हार मानत नाही. त्याचा हस्तक राजा हेरोद, बेथलेहेममधील दोन वर्षांखालील सर्व बाळांना ठार मारण्याचा हुकूम देतो. परंतु सैतानाचे यहोवापुढे काही चालत नाही. निष्पाप बाळांची ही क्रूर हत्या होईल हे देवाला आधीच माहीत असल्याचे मत्तय सांगतो. यहोवा पुन्हा एकदा सैतानाच्या आड येतो आणि एका देवदूताद्वारे योसेफाला इजिप्तला पळून जायला सांगतो. मत्तय सांगतो, की काही काळानंतर योसेफ पुन्हा एकदा आपल्या लहानशा परिवाराला घेऊन नासरेथ येथे कायमचे बस्तान मांडतो; तेथेच येशू आपल्या इतर भावंडांबरोबर लहानाचा मोठा होतो.—मत्तय २:१३-२३; १३:५५, ५६.

ख्रिस्ताचा जन्म —तुमच्यासाठी त्याचा काय अर्थ होतो

येशूचा जन्म आणि त्याचे बालपण या वेळी घडलेल्या घटनांचा सारांश वाचून तुम्हाला आश्‍चर्य वाटते का? पुष्कळांना वाटते. हे अहवाल वास्तविकतेत किती सुसंगत व अचूक आहेत हे वाचून त्यांना आश्‍चर्य वाटते; काही लोक बेधडक विपरीत प्रतिपादन करत असले तरी. काही घटना शेकडो वर्षांपूर्वी भाकीत केल्या होत्या हे त्यांना समजते तेव्हा त्यांना आश्‍चर्य वाटते. शिवाय, शुभवर्तमानातील काही मुख्य घटक आणि पारंपरिक नेटिव्हिटी गोष्टीत व क्रेशमध्ये दाखवले जाणारे पात्र यांच्यात स्पष्ट फरक आहे.

परंतु, पारंपरिकपणे साजरा केल्या जाणाऱ्‍या नाताळात शुभवर्तमान अहवालांतील मुख्य मुद्दे वगळले जातात, हीच कदाचित जास्त आश्‍चर्याची गोष्ट असू शकते. उदाहरणार्थ, येशूचा पिता—योसेफ नव्हे तर यहोवा देव याचा विचारच केला जात नाही. आपल्या प्रिय पुत्राला वाढवण्यासाठी, त्याचे संगोपन करण्यासाठी योसेफ आणि मरियेकडे त्याला सोपवताना त्याला कसे वाटले असावे याची कल्पना करा. येशू अजूनही बाळ होता तेव्हा त्याचा वध करण्याचा कट रचणारा एक द्वेषपूर्ण राजा असलेल्या जगात आपल्या पुत्राला पाठवताना त्या स्वर्गीय पित्याला किती दुःख झाले असेल याची कल्पना करा! मानवजातीबद्दलच्या गाढ प्रीतीने यहोवाला हा त्याग करण्यास प्रवृत्त केले.—योहान ३:१६.

नाताळ साजरा करताना खऱ्‍या येशूकडे दुर्लक्षच केले जाते. त्याने आपल्या शिष्यांना त्याची जन्म तारीख सांगितल्याचा अहवाल कोठेच नाही; शिवाय त्याच्या अनुयायांनी त्याचा जन्मदिवस साजरा केल्याचाही उल्लेख कोठे नाही.

त्याने आपल्या अनुयायांना त्याचा जन्मदिन नव्हे, तर आपला मृत्यूदिन साजरा करण्याची आज्ञा दिली; ही एक महत्त्वपूर्ण घटना होती ज्याचा जगाच्या इतिहासावर प्रभाव पडला आहे. (लूक २२:१९, २०) गव्हाणीतले असहाय्य बाळ म्हणून त्याची आठवण करावी अशी येशूची इच्छा नव्हती; कारण आज तो एक असहाय्य बाळ नसून राजा आहे. त्याच्या मृत्यूनंतर ६० पेक्षा अधिक वर्षांनंतर येशूने प्रेषित योहानाला दर्शन दिले; त्यात तो लढाईस निघालेला एक शक्‍तिशाली राजा म्हणून योहानाने त्याला पाहिला. (प्रकटीकरण १९:११-१६) याच भूमिकेत, देवाच्या स्वर्गीय राज्याचा शासक या नात्याने आज आपण येशूला ओळखले पाहिजे कारण तो असा राजा आहे जो जगाचे रूप बदलवणार आहे.

[तळटीपा]

a खरे तर, कैसर अगुस्तसने निरिक्षिले, की हेरोदाचा पुत्र म्हणून जिवंत राहण्यापेक्षा त्याचे डुक्कर म्हणून जिवंत राहणे जास्त सुरक्षिततेचे होते.

[८ पानांवरील चित्र]

यहोवाच्या देवदूतांनी ख्रिस्ताच्या जन्माची गोड बातमी नम्र मेंढपाळांना देण्याचे पसंत केले

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा