येशूचे जीवन व उपाध्यपण
येशूचा जन्म—कोठे आणि केव्हा?
मरियेच्या प्रसूतीचा काळ नजीक असता, योसेफ इतका दूरचा प्रवास का करीत आहे? प्रत्येकाने आपआपल्या जन्मस्थानी नांवनिशी लिहावयास परत जावे असा कायदा रोमी साम्राज्याचा सम्राट कैसर औगुस्ताने काढला. यामुळेच योसेफ आपल्या जन्मस्थानी, बेथलहेम गावी जात आहे.
बेथलहेम येथे पुष्कळ लोकांची नांवनिशी लिहावयाची असल्याने, योसेफ व मरियेला एका गोठ्यात राहावे लागले. याठिकाणी गाढव व इतर प्राण्यांना ठेवले जाते. येथेच येशूचा जन्म होतो. मरिया त्याला बाळंत्यात गुंडाळून गव्हाणीत ठेवते. ही गव्हाणी म्हणजे गुरांना चारा ठेवला जातो ती जागा होय.
खरोखर हे देवाचे मार्गदर्शन होते की ज्याद्वारा कैसर औगुस्ताने नांवनिशीचा नियम जाहिर केला. त्यामुळे येशूचा जन्म बेथलहेम, शास्त्रलेखातील वचनयुक्त राज्यकर्त्याच्या जन्मस्थानाचे शहर, येथे होणे शक्य झाले.
ही केवढी ही महत्वाची रात्र आहे! शेताच्या परिसरात मेंढपाळांच्या भोवती तेजस्वी प्रकाश पसरतो. ते यहोवाचे तेज आहे! आणि यहोवाचा दूत त्यांस म्हणतो: ‘तुम्हासाठी बेथलहेमात तारणारा जन्मला आहे, तो प्रभु ख्रिस्त आहे. बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हांस आढळेल.’ इतक्यात आणखीन पुष्कळ देवदूत प्रगट होतात. ते हे गीत गातात: “उर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांस शांती.”
देवदूत त्याच्यापासून निघून जातात तेव्हा मेंढपाळ एकमेकांस म्हणतात: ‘चला, आपण बेथलहेमापर्यंत जाऊ व जी गोष्ट आपल्याला यहोवाने कळविली आहे ती पाहू.’ ते घाईघाईने निघतात आणि देवदूताने सांगितल्याप्रमाणे येशूला त्यांना पहावयास मिळते. मेंढपाळांना जे देवदुताने सांगितले होते ते त्यांनी इतरांना कळविले. तेव्हा ऐकणारे सर्वजण आश्चर्यचकित होतात. मरिया ह्या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवते.
पुष्कळ लोक येशू २५ डिसेंबरला जन्मला असा विश्वास धरतात. पण डिसेंबर हा बेथलहेममध्ये पावसाळी व थंडीचा महिना आहे. त्यामुळे वर्षाच्या ह्या ऋतुत मेंढपाळ आपल्या मेंढराबरोबर रात्रीच्या वेळी शेतात असू शकणार नाहीत. तसेच रोमी कैसरविरूद्ध उठाव करण्याचा ज्यांचा निश्चय होऊन चुकला होता त्या लोकांना काकडविणाऱ्या थंडीमध्ये नांवनिशीसाठी इतका प्रवास करण्याची आज्ञा करावी हे तो निश्चितच अपेक्षून नव्हता. त्यामुळे येशूचा जन्म शरद ऋतूच्या आरंभाला झाला हे उघड आहे. लूक २:१–२०; मीखा ५:२.
◆ योसेफ व मरिया यांनी बेथलहेमाचा प्रवास का केला?
◆ येशूच्या जन्माच्या रात्री कोणती आश्चर्यकारक गोष्ट घडली?
◆ येशूचा जन्म २५ डिसेंबर मध्ये झाला नाही हे आम्ही कसे जाणू शकतो?
[९ पानांवरील चित्र]