नाताळ ख्रिस्ताला विसरला आहे का?
“नाताळाच्या मौसमात केली जाणारी मौजमजा मला केव्हाही पटली नाही. येशूचे जीवन आणि त्याची शिकवण यांच्याशी ती मुळीच जुळत नाही.”—मोहनदास क. गांधी.
पुष्कळ जणांना गांधीजींचे हे म्हणणे बिलकुल पटणार नाही. ते म्हणतील, ‘एका हिंदू नेत्याला ख्रिस्ती सुटी म्हणजे काय हे माहीत आहे का?’ एक गोष्ट कबूल केली पाहिजे की नाताळ संपूर्ण जगभरात साजरा केला जातो, सर्व प्रकारच्या संस्कृतींवर त्याचा प्रभाव दिसून येतो. आपल्याला असे वाटेल, की जगाच्या कानाकोपऱ्यात दर वर्षी डिसेंबर महिन्यात साजरा केला जाणारा हा सण सगळ्यात मोठा सण असावा.
उदाहरणार्थ, आशियातील सुमारे १४ कोटी ५० लाख लोक नाताळ साजरा करतात आणि चार कोटी पेक्षा अधिकांनी तो एक दशकाआधीच साजरा करण्यास सुरवात केली. आणि गांधीजींना “मौजमजा” म्हणजे, धार्मिकतेचा अंश नसलेला आधुनिक दिवसाचा नाताळ, आपण पाहत असलेली बेछूट खरेदी हेच म्हणायचे असेल तर, नाताळात त्याच गोष्टींना जास्त महत्त्व दिले जाते हे आपल्याला नाकारता येणार नाही. एशियावीक नामक एक इंग्रजी मासिक म्हणते: “आशियातील नाताळ—हाँगकाँगच्या रोषणाईपासून ते बिजिंगमधील गगनचुंबी हॉटेल्सच्या लॉबीतील मोठमोठाल्या ख्रिसमस वृक्षांपर्यंत, सिंगापूरच्या गावातील क्रेशपर्यंत [बालयेशूच्या संगोपनगृहाचे दृश्य]—धार्मिकतेचा जराही अंश नसलेला (प्रामुख्याने व्यापारी) प्रसंग आहे.”
आधुनिक दिवसातील नाताळ ख्रिस्ताला पूर्णपणे विसरला आहे का? अधिकृतरीत्या, सा.यु. चौथ्या शतकापासून चर्चेस डिसेंबर २५ पाळत आले आहेत; या दिवशी येशूचा जन्म धार्मिकरीत्या पाळण्यात यावा असे रोमन कॅथलिक चर्चने ठरवले होते. परंतु, संयुक्त संस्थानात अलीकडेच घेतलेल्या एका सर्वेत दिसून आले, की केवळ ३३ टक्के लोकांना, ख्रिस्ताचा जन्म नाताळाचा सर्वात महत्त्वपूर्ण पैलू वाटला.
तुम्हाला काय वाटते? भुरळ पाडणारी जाहिरातबाजी, खूळ लागल्याप्रमाणे बक्षीसांची खरेदी, झाडे सजवणे, पार्ट्यांची योजना करून त्यांना जाणे, शुभेच्छा कार्ड पाठवणे—या सर्व गोष्टी करताना येशूचा जराही विचार केला जात नसल्याचे तुम्हाला वाटते का?
काहींना वाटते, की नेटिव्हिटी दृश्य [ख्रिस्ताच्या जन्माचे दृश्य] किंवा क्रेश तयार करून आपण येशूची आठवण करू शकतो. कदाचित तुम्ही अशाप्रकारचे दृश्य किंवा देखावे पाहिलेच असतील ज्यात, एका गव्हाणीत बाळ येशूजवळ मरिया, योसेफ, काही मेंढपाळ, “तीन सुज्ञ लोक,” किंवा “तीन राजे,” काही गुरेढोरे आणि काही बघे दाखवले जातात. अशा प्रकारचे क्रेश लोकांना नाताळाच्या खऱ्या अर्थाची आठवण करून देतात असा सर्वसामान्यपणे विचार केला जातो. यु.एस. कॅथलिक नुसार, “कोणत्याही एका शुभवर्तमानापेक्षा क्रेशच, मग या देखाव्यात कथेतील अऐतिहासिक पात्रांवरच जोर देण्यात आलेला असला तरी, आपल्यासमोर एक अधिक प्रगल्भ चित्र उभे करते.”
परंतु, बायबलच्या शुभवर्तमानातील अहवाल अऐतिहासिक आहेत हे एखाद्या नेटिव्हिटी देखाव्यातून कसे काय सूचित होऊ शकते बरे? एक गोष्ट आपण कबूल केली पाहिजे, की या देखाव्यातील मूर्ती पाहिल्यावर, आपल्याला ही एक दंतकथा किंवा काल्पनिक कथा असल्यासारखे वाटते. १३ व्या शतकात एका साधूने पहिल्यांदा नेटिव्हिटी देखावा तयार केला जो एकेकाळी साधासुधा वाटत होता. आणि आज, या सुटीच्या दिवसाशी संबंधित असलेल्या इतर गोष्टींप्रमाणेच या देखाव्यांचा चांगलाच व्यापार झाला आहे. इटलीच्या नेपल्स येथे, ओळीने अशी कितीतरी दुकाने आहेत जी नेटिव्हिटी देखाव्यांसाठी किंवा प्रेझपी [क्रेशसाठी असलेली इटालियन शब्द] यासाठी लागणाऱ्या मूर्ती विकतात; ही दुकाने वर्षभर खुली असतात. या देखाव्यांतील काही प्रसिद्ध मूर्ती, शुभवर्तमान अहवालातील पात्रांच्या नव्हेत तर आधुनिक दिवसातील नामांकित व्यक्तींच्या आहेत, जसे की सम्राज्ञी डायना, मदर तरेसा आणि वेशभूषाकार जियानी वेरसॉचॉ. आणि प्रेझपी तर चॉकलेट, पास्ता आणि समुद्रशिंपल्यांनी बनवलेले असतात. आता तुम्हाला समजेल, की असे देखावे अऐतिहासिक का वाटतात.
परंतु मग, हे नेटिव्हिटी देखावे आपल्यासमोर “कोणतेही शुभवर्तमान देऊ शकेल त्यापेक्षा अधिक प्रगल्भ चित्र” कसे काय उभे करू शकतात? शुभवर्तमान अहवाल खरोखरच अऐतिहासिक आहेत का? कट्टरातल्या कट्टर टीकाकारांनी हे कबूल केले पाहिजे, की येशू एक खरोखर आणि ऐतिहासिक मनुष्य होता. म्हणजे एकेकाळी तो खरोखर बाळ होता व एका खऱ्याखुऱ्या ठिकाणी त्याचा जन्म झाला होता. त्याच्या जन्माच्या वेळी घडलेल्या घटनांचे प्रगल्भ चित्र मिळवण्यासाठी, एखाद्या नेटिव्हिटी देखाव्याकडे पाहत बसण्यापेक्षा दुसरा एखादा उत्तम मार्ग नक्कीच असला पाहिजे!
होय, असा एक मार्ग आहे. दोन इतिहासकारांनी येशूच्या जन्माचे वेगवेगळे अहवाल लिहिले. नाताळाच्या मौसमात ख्रिस्ताकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते असे तुम्हाला वाटत असेल तर, तुम्ही स्वतःच या अहवालांचे परीक्षण का करीत नाही? या सर्व अहवालांत तुम्हाला दंतकथा किंवा काल्पनिक कथा नव्हे तर चित्तवेधक कथा—ख्रिस्ताच्या जन्माची खरी कथा वाचायला मिळेल.
[Picture Credit Line on page 3]
पृष्ठे ३-६, ८ आणि ९ वरील किनार: Fifty Years of Soviet Art