विस्तृत क्षेत्राच्या उंबरठ्यावर
“आमच्यात कोणतीच स्पर्धा नव्हती. रिचर्ड आणि लुसिया वॉचटावर बायबल गिलियड स्कूलच्या १०५ व्या वर्गातील त्यांच्यासोबतच्या विद्यार्थ्यांविषयी असे म्हणतात: “आम्ही सर्वजण वेगवेगळे होतो, पण आमच्याकरता प्रत्येक विद्यार्थी मोलवान होता.” त्यांच्याच वर्गातील लोएल याजशी सहमत होत असे म्हणतात: “आमच्या वेगळेपणानेच आम्हाला एकत्र आणलं आहे.”
सप्टेंबर १२, १९९८ रोजी गिलियड स्कूलमधून बाहेर पडलेले विद्यार्थी वेगवेगळ्या पार्श्वभूमींतून आलेले होते. राज्य प्रचारकांची जेथे अधिक गरज आहे तेथे या वर्गातील काही विद्यार्थी पायनियर कार्य करत होते, तर त्यांपैकी काहीजण त्यांच्या घराच्या आसपासच विश्वासूपणे सेवाकार्य करत होते. या वर्गातील काही जणांना, जसे मॅट्स आणि रोझ मारी यांना या प्रशालेत दाखल होण्यापूर्वी इंग्रजी शिकण्याकरता पुष्कळ वेळ द्यावा लागला आणि खास प्रयत्न करावे लागले. अनेक विद्यार्थी त्यांच्या लहानपणापासूनच मिशनरी सेवा करण्याचा विचार करत होते. एका जोडप्याने तर १२ वेळा या प्रशालेकरता अर्ज केला होता; १०५ व्या वर्गाकरता त्यांना बोलवण्यात आले तेव्हा त्यांना किती आनंद झाला असावा!
या सखोल प्रशिक्षणाचे २० आठवडे केव्हा संपले हे कोणालाच कळले नाही. पाहता पाहता शेवटची लेखी परीक्षा कधी झाली, अखेरचा तोंडी अहवाल केव्हा देऊन झाला आणि पदवीदानाचा दिवस केव्हा आला हे त्यांच्या लक्षातही आले नाही.
यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य असलेले अल्बर्ट श्रोडर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्यांनी या वर्गाला याचे स्मरण करून दिले, की गिलियड प्रशालेतून यापूर्वी प्रशिक्षण घेतलेल्या ७,००० विद्यार्थ्यांप्रमाणेच हे विद्यार्थी देखील “बायबल शिक्षणातील विस्तृत क्षेत्राच्या उंबरठ्यावर आहेत.” त्यांनी या गोष्टीचा विशेष उल्लेख केला, की उन्हाळाच्या दरम्यान अधिवेशनाच्या निमित्ताने आलेले पुष्कळ वर्षांपासूनचे मिशनरी जागतिक मुख्यालयाला भेट द्यायला आले तेव्हा या वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांचा सहवास मिळण्याची सुवर्णसंधी मिळाली होती.
त्यानंतर ब्रदर श्रोडर यांनी बेथेल ऑप्रेशन कमिटीचे सदस्य मॅक्स लार्सन यांना पुढचे भाषण देण्याकरता आमंत्रित केले. “सार्वकालिक जीवनाकडे नेणारे शिक्षण,” या विषयावर ते बोलले. ब्रदर लार्सन यांनी नीतिसूत्रे १:५ हे वचन वाचायला सांगितले, त्यात म्हटले आहे: “ज्ञानी पुरुषाने ऐकावे, त्याचे ज्ञान वाढावे; बुद्धिमानाने सुविचार [“कौशल्य,” NW] प्राप्त करून घ्यावा.” प्रभावी मिशनरी होण्याकरता कौशल्याची गरज आहे. कौशल्य असलेला माणूस राजासमोरही उभा राहतो. (नीतिसूत्रे २२:२९) पाच महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर या वर्गातील विद्यार्थी यहोवा आणि येशू ख्रिस्त या महान राजांचे प्रतिनिधित्व करायला चांगल्याप्रकारे तयार झाले.
सर्व्हिस डिपार्टमेंटचे डेव्हिड ओल्सन हे “यहोवाचे मन आनंदित करा,” या विषयावर बोलले. त्यांनी विचारले: “देवाचे मन आनंदित करण्याकरता अपरिपूर्ण मानव काय करू शकतात?” या प्रश्नाचे उत्तर? ते त्याची विश्वासाने, एकनिष्ठेने आणि आनंदाने सेवा करू शकतात. लोकांनी आपली सेवा आनंदी मनाने करावी असे यहोवाला वाटते. आपण देवाच्या इच्छेप्रमाणे आनंदाने वागतो तेव्हा आपण त्याचे मन हर्षित करत असतो. (नीतिसूत्रे २७:११) ब्रदर ओल्सन यांनी १०४ व्या गिलियड वर्गातील एका मिशनरी जोडप्याने पाठवलेले पत्र सर्वांना वाचून दाखवले. हे जोडपे त्यांच्या नवीन कामात आनंदी आहे का? त्यांनी त्यांच्या मंडळीबद्दल असे लिहिले: “आमच्या मंडळीत १४० प्रकाशक आहेत आणि मंडळीची सरासरी उपस्थिती ही २५० ते ३०० इतकी असते. सर्वात छान म्हणजे प्रचारकार्य. आमच्यातील प्रत्येकाकडे चार अभ्यास आहेत आणि त्यांपैकी काही जण तर सभेलाही येतात.”
“अंमळ थांबा आणि तुम्हाला मिळालेले आशीर्वाद पाहा,” या विषयावर नियमन मंडळाचे सदस्य लायमन स्विंगल बोलले. गिलियडच्या प्रशिक्षणामुळे पुष्कळ आशीर्वाद मिळाले आहेत. ज्ञानात भर घालण्यास, यहोवाच्या संघटनेची आणखी कदर करण्यास आणि नम्रतेसारखे महत्त्वाचे गुण विकसित करण्यास या गिलियड प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना मदत मिळाली. ब्रदर स्विंगल पुढे असे म्हणाले: “येथे येऊन देण्यात आलेल्या सूचना ऐकण्याकरता नम्रता असावी लागते. तुम्ही येथून जाता तेव्हा यहोवाचे गौरव करण्याकरता चांगल्याप्रकारे तयार झालेले असता.”
नियमन मंडळाचे आणखी एक सदस्य डॅनियल सिडलिक यांनी “तुमचा आनंद किती मोठा आहे—मग काळजी का करता?” या विषयावर भाषण दिले. त्यांनी आर्जवले, की समस्या आल्यास मार्गदर्शनाकरता शास्त्रवचनाकडे वळा. हे कसे करता येईल हे मत्तय याच्या ६ व्या अध्यायातील निवडक वचने घेऊन ब्रदर सिडलिक यांनी दाखवून दिले. विश्वासाची कमी असल्यास काय खावे, काय पांघरावे यांसारख्या जगीक गोष्टींची उगाच चिंता असते. पण आपल्याला काय हवे आहे हे यहोवाला चांगल्याप्रकारे माहीत आहे. (मत्तय ६:२५, ३०) चिंता करत बसल्यामुळे दररोजच्या कष्टात भरच पडते. (मत्तय ६:३४) तरीसुद्धा काही पूर्वयोजना करण्याची आवश्यकता असतेच. (पडताळा लूक १४:२८.) ब्रदर सिडलिक यांनी हे स्पष्ट केले, की भविष्याचा योग्य तो विचार करू नये असे येशू म्हणत नाही, तर भविष्याविषयी अनावश्यक चिंता करू नये असे तो म्हणतो. “आपल्याला चिंता भेडसावत असल्यास काहीतरी करणे केव्हाही उत्तम. आपल्याला चिंता लागते तेव्हा सत्याविषयी दुसऱ्यांना सांगणे चांगले.”
मार्गदर्शकांच्या निरोप्याच्या सूचना
त्यानंतर गिलियडच्या तीन प्रशिक्षकांची भाषणे झाली. कार्ल ॲडम्स हे “तुम्ही यहोवाला काय परत देणार?” या विषयावर प्रथम बोलले. त्यांचे भाषण स्तोत्र ११६ व्या अध्यायावर आधारित होते, कदाचित हे गीत येशूने त्याच्या मृत्यूच्या आदल्या रात्री गायिले असावे. (मत्तय २६:३०, तळटीप, NW) “परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याचा कसा उतराई होऊ?” असे येशूने गायिले तेव्हा त्याच्या मनात कोणते विचार असावेत? (स्तोत्र ११६:१२) यहोवाने त्याच्याकरता तयार केलेल्या परिपूर्ण शरीराविषयी तो कदाचित विचार करत असावा. (इब्री लोकांस १०:५) त्यानंतरच्या दिवशी त्याने यहोवावरील आपले अतूट प्रेम स्वतःचे शरीर अर्पण करून तो दाखवून देणार होता. १०५ व्या वर्गातील विद्यार्थ्यांनी मागील पाच महिन्यात यहोवाच्या चांगुलपणाचा अनुभव घेतला होता. आता ते यहोवावरील त्यांचे प्रेम मिशनरी नेमणुका मनःपूर्वक पार पाडून दाखवणार होते.
दुसरे भाषण देणारे गिलियड प्रशिक्षक मार्क नुमार यांनी “चांगले ते करत राहा,” असा विद्यार्थ्यांना सल्ला दिला. योसेफाला इजिप्तमध्ये गुलाम म्हणून विकले तेव्हा त्याला १३ वर्षे अन्याय सहन करावा लागला. दुसऱ्यांनी चुका केल्या म्हणून त्याने देवाची सेवा करण्याचे सोडून दिले का? नाही, तर चांगले ते तो करत राहिला. पुढे, देवाच्या नियुक्त वेळी योसेफाची त्याच्या परीक्षांतून सुटका झाली. आणि अचानकपणे, तो तुरुंगातून महालात राहायला गेला. (उत्पत्ति, अध्याय ३७-५०) या प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना विचारले: “तुमच्या मिशनरी नेमणुकीत तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी झाल्या नाहीत, तर तुम्ही ते कार्य करण्याचे थांबवणार का? निराश होऊन तुम्ही माघार घेणार का? किंवा तुम्ही योसेफाप्रमाणे टिकून राहणार?”
अखेरीस, गिलियड प्रशालेचे रजिस्ट्रार असलेले वॉलस लिव्हरन्स यांनी वर्गातील विद्यार्थ्यांसोबत “राजा आणि त्याच्या राज्याची घोषणा करा,” या विषयावर उत्साहपूर्ण चर्चा केली. घरोघरी, दुकानांत आणि रस्त्यावर प्रचार करत असताना आलेले अनुभव काही विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले. दुसऱ्या भाषेच्या लोकांना साक्ष देण्याकरता आपल्याला काय काय करावे लागले हे काहींनी सांगितले. विविध धर्मांच्या लोकांना प्रचार कसा करावा, हे काही विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. सर्व विद्यार्थी त्यांच्या मिशनरी क्षेत्रात स्वतःला वाहून घेण्यास उत्सुक झाले होते.
जुने पण आनंदी मिशनरी
“मिशनरी सेवेमुळे मिळणारे आनंदी परिणाम,” हा त्यानंतरचा विषय रॉबर्ट वॉलन यांनी सादर केला आणि यामध्ये मुख्यालयातील अशा चार बांधवांची मुलाखत घेण्यात आली ज्यांना अलीकडेच अनुभवी मिशनऱ्यांचा प्रोत्साहक सहवास लाभला होता. त्या मिशनऱ्यांनी हे लगेच मान्य केले होते, की नवीन भाषा शिकणे, दुसऱ्या संस्कृतीशी आणि हवामानाशी जुळवून घेणे त्यांच्याकरता इतके सोपे नव्हते. शिवाय अधूनमधून घरच्या लोकांची आठवण यायची. काहीवेळा आजारपणालाही तोंड द्यावे लागले. पण हे सर्व असूनही या मिशनऱ्यांनी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आणि त्यांच्या या धीरामुळे त्यांना आशीर्वाद मिळाला. काही मिशनऱ्यांनी अनेक लोकांना यहोवाचे ज्ञान दिले. इतर मिशनऱ्यांनी त्यांच्या देशातील राज्य कार्यात झालेल्या एकंदर वाढीला विविध प्रकारे हातभार लावला होता.
अखेरीस, नियमन मंडळाचे सदस्य कॅरी बार्बर यांचे भाषण झाले. “ईश्वरी जीवनाचा मार्ग” या प्रांतीय अधिवेशनाच्या काही प्रमुख गोष्टींची त्यांनी उजळणी केली. त्यांनी श्रोत्यांना विचारले: “या अधिवेशनाचा यहोवासोबतच्या तुमच्या नातेसंबंधावर कसा परिणाम झाला?” ईश्वरी मार्गानुसार चालल्यामुळे मिळणारे आशीर्वाद आणि जगीक मार्गानुसार चालल्यामुळे ओढवणारे संकट यांतील स्पष्ट फरक या वक्त्यांनी दाखवून दिला. मरीबा या ठिकाणी मोशेने केलेल्या पातकाचा उल्लेख करत या प्रशिक्षकांनी असा इशारा दिला: “एखादी व्यक्ती पुष्कळ वर्षांपासून देवाची सेवा करत असली आणि त्याच्या धार्मिक नियमांचे त्या व्यक्तीकडून उल्लंघन झाल्यास यहोवा त्या गोष्टीला हलके समजत नाही.” (गणना २०:२-१३) देवाच्या सेवकांनी त्याची सेवा करण्याच्या मोलवान विशेषाधिकारांना जडून राहावे मग ते पृथ्वीच्या पाठीवर कोठेही सेवा करत असोत!
आता विद्यार्थ्यांना त्यांची पदवी देण्याची वेळ आली होती. त्यानंतर या वर्गाच्या प्रतिनिधीने विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्रशिक्षणाची कदर व्यक्त करणारे पत्र वाचून दाखवले. समाप्तीचे गीत आणि मनःपूर्वक प्रार्थनेनंतर पदवीदानाच्या कार्यक्रमाची समाप्ती झाली. पण १०५ व्या गिलियड वर्गाची ही नुकतीच सुरवात होती कारण हे नवीन मिशनरी आता “विस्तृत क्षेत्राच्या उंबरठ्यावर उभे” होते.
[२३ पानांवरील चौकट]
वर्ग आकडेवारी
विद्यार्थ्यांनी प्रतिनिधीत्व केलेले एकूण देश: ९
नेमलेले देश: १७
एकूण विद्यार्थी: ४८
विवाहित जोडपी: २४
सरासरी वय: ३३
सत्यात सरासरी वर्षे: १६
पूर्ण वेळेच्या सेवेत सरासरी वर्षे: १२
[२४ पानांवरील चौकट]
त्यांनी पूर्णवेळेचे सेवाकार्य निवडले
गिलियडच्या १०५ व्या वर्गातून पदवी मिळालेले बेन म्हणतात: “मी लहान होतो तेव्हा पायनियरींग करण्याचं मी काही ठरवलं नव्हतं. मला वाटायचं, की ज्यांच्याकडे खास कौशल्य आहे, ज्यांची उत्तम परिस्थिती आहे अशांनाच पायनियरींग करता येतं. पण क्षेत्र सेवा मला पुढे आवडू लागली. त्यानंतर एके दिवशी मला समजलं, की पायनिअरींग करणं म्हणजे सेवाकार्यात जास्त भाग घेणं इतकंच. मी पायनियरींग करू शकतो याची तेव्हा मला जाणीव झाली.”
लुसिया म्हणतात: “आमच्या घरात पूर्णवेळेच्या सेवकांना मोठ्या आदरानं वागवलं जायचं.” मिशनरी भेट द्यायचे तेव्हा त्यांच्या मंडळीतले सगळे वातावरण आनंदमय होऊन जायचे. “मी मोठी होऊ लागले तेव्हा मी पूर्ण वेळेच्या सेवेत जाणार हे ठरलेलं होतं.”
आई वारली तेव्हा थीएडीस १५ वर्षांचे होते. ते म्हणतात: “त्यावेळी सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली. तेव्हा मी स्वतःला विचारलं, ‘मला या सर्व गोष्टींची कदर दाखवण्याकरता काय करता येण्यासारखं आहे?’” यामुळे ते पूर्णवेळेच्या क्षेत्रात आले आणि आता मिशनरी कार्यात.
[२५ पानांवरील चित्र]
वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेचा १०५ वा पदवीधर वर्ग
खालील यादीत पुढून मागे याप्रकारे ओळींची संख्या देण्यात आली आहे आणि प्रत्येक ओळीत नावे डावीकडून उजवीकडे या क्रमाने देण्यात आली आहेत
(१) सॅम्पसन, एम.; ब्राऊन, आय.; हेग्ली, जी.; अबुयन, ई.; डेबवा, एम.; पुरती, पी. (२) कासाम, जी.; लिन्बर्ग, आर.; डापुझो, ए.; टेलर, सी.; लफेवर, के.; वॉकर, एस. (३) बेकर, एल.; पेलस, एम.; वोगन, ई.; बोएन, सी.; आस्पलंड, जे.; हायले, जे. (४) पुरती, टी.; वीटटेकर, जे.; पामर, एल.; नॉर्टन, एस.; गेरींग, एम.; हायले, डब्ल्यू. (५) वॉकर, जे.; बोएन, ए.; ग्रुनवेल्ड, सी.; वॉशिंग्टन, एम.; वीटटेकर, डी.; अबुयन, जे. (६) गेरींग, डब्ल्यू.; वॉशिंग्टन, के.; पेलस, एम.; डेबवा, आर.; हेग्ली, टी.; आस्पलंड, ए. (७) वोगन, बी.; लफेवर, आर.; टेलर, एल.; ब्राऊन, टी.; ग्रुनवेलड, आर.; पामर, आर. (८) नॉर्टन, पी.; सॅम्पसन, टी.; बेकर, सी.; लिन्बर्ग, एम.; कासाम, एम.; डापुझो, एम.