वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 १२/१ पृ. १९-२२
  • सुवार्तेचा कायदेशीररीत्या बचाव करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सुवार्तेचा कायदेशीररीत्या बचाव करणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सुरक्षिततेची कायदेशीर भिंत बांधणे
  • भिंत मजबूत करणे
  • भिंतीचे संरक्षण करणे
  • यहोवाच्या साक्षीदारांना ग्रीसमध्ये समर्थन
    सावध राहा!—१९९७
  • मानवी हक्कांच्या युरोपियन न्यायालयात विजय
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • “हे युद्ध यहोवाचं आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 १२/१ पृ. १९-२२

सुवार्तेचा कायदेशीररीत्या बचाव करणे

मनुष्य जेव्हा पासून शहरे बांधू लागला तेव्हापासून भिंतीही बांधण्यास त्याने सुरवात केली. विशेषकरून, गतकालात, या तटबंदी संरक्षणासाठी होत्या. या भिंतीवजा अडथळ्यांवरून संरक्षक, हल्ला करणाऱ्‍यांकडून भिंतींत भगदाड किंवा सुरुंग लावण्यापासून भिंतींचे संरक्षण करू शकत होते. शहराच्या आत राहणाऱ्‍या रहिवासींना तर संरक्षण मिळतच होते शिवाय आजूबाजूच्या शहरात राहणाऱ्‍यांनाही तटबंदीत येऊन आश्रय घेता येत होता.—२ शमुवेल ११:२०-२४; यशया २५:१२.

तसेच, यहोवाच्या साक्षीदारांनी संरक्षणाची भिंत अर्थात एक कायदेशीर भिंत उभी केली आहे. ही भिंत साक्षीदारांना समाजापासून वेगळे ठेवण्याकरता बांधण्यात आलेली नाही; कारण, यहोवाचे साक्षीदार हवेहवेसे, मनमिळाऊ लोक म्हणून ओळखले जातात. उलट, या भिंतीने सर्व लोकांसाठी असलेल्या मूलभूत स्वातंत्र्याची कायदेशीर गॅरंटी आणखी पक्की केली आहे. त्यासोबतच, ही भिंत त्यांच्या कायदेशीर हक्कांचे संरक्षण करते जेणेकरून ते आपली उपासना मुक्‍तपणे करू शकतात. (पडताळा मत्तय ५:१४-१६.) ही भिंत त्यांच्या उपासनापद्धतीचे आणि देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याच्या त्यांच्या हक्काचे संरक्षण करते. ही भिंत काय आहे व ती कशी बांधण्यात आली?

सुरक्षिततेची कायदेशीर भिंत बांधणे

बहुतेक देशांत यहोवाच्या साक्षीदारांना धार्मिक स्वातंत्र्य असले तरी, काही राष्ट्रांत ते अन्यायीपणे केल्या जाणाऱ्‍या हल्ल्याचे शिकार झाले आहेत. एकत्र येऊन किंवा घरोघरी जाऊन प्रचार करून उपासना करण्याच्या त्यांच्या स्वातंत्र्यावर हल्ला केला जातो तेव्हा त्यांनी कायदेशीररीत्या गोष्टी हाताळल्या आहेत. साक्षीदारांबाबतची कायदेशीर प्रकरणे संपूर्ण जगभरात हजारांच्या घरात जातात.a सर्वच प्रकरणांत विजय मिळाला आहे असे नाही. परंतु जेव्हा कनिष्ठ न्यायालयांनी त्यांच्याविरुद्ध न्याय दिला तेव्हा त्यांनी बहुतेकदा उच्च न्यायालयात अपील केले आहे. याचा परिणाम?

विसाव्या शतकातील दशकांपासून, अनेक देशांतील कायदेशीर विजयांनी, यहोवाच्या साक्षीदारांनी एका पाठोपाठ अपील केलेल्या प्रकरणांची विश्‍वसनीय पूर्वोदाहरणे स्थापन केली आहेत. भिंत ज्यांची बनते त्या विटा किंवा दगड यांच्याप्रमाणे या अनुकूल निकालांनी सुरक्षिततेची एक कायदेशीर भिंत तयार होते. पूर्वोदाहरणाच्या या भिंतीवरून साक्षीदार उपासना करीत राहण्याकरता धार्मिक स्वातंत्र्यासाठी लढत आहेत.

मरडॉक विरुद्ध कॉमनवेल्थ ऑफ पेनस्लिव्हानिया या प्रकरणाचा विचार करा; संयुक्‍त संस्थानाच्या सर्वोच्च न्यायालयाने मे ३, १९४३ रोजी याचा निकाल दिला होता. या प्रकरणात उठलेला वाद होता: यहोवाच्या साक्षीदारांनी त्यांच्या धार्मिक साहित्यांचे वाटप करण्याकरता अधिकृत फेरीवाला परवाना घेतला पाहिजे का? त्याची काही गरज नाही असे यहोवाच्या साक्षीदारांचे मत होते. त्यांचे प्रचाराचे कार्य व्यापारविषयक नाही किंवा ते केव्हाही नव्हते. त्यांचा हेतू पैसा कमावण्याचा नसून सुवार्तेचा प्रचार करण्याचा आहे. (मत्तय १०:८; २ करिंथकर २:१७) मरडॉक निकालात कोर्ट साक्षीदारांशी सहमत झाले; धार्मिक साहित्याचे वाटप करण्याकरता पूर्वअपेक्षा म्हणून परवाना कराची रक्कम भरण्याची अपेक्षा बेकायदेशीर असल्याचे कोर्टाने कबूल केले.b या निकालाने एक महत्त्वपूर्ण पूर्वोदाहरण घालून दिले आणि तेव्हापासून साक्षीदारांनी अनेक प्रकरणात त्याला प्रमाण म्हणून यशस्वीरीत्या अपील केले आहे. मरडॉक निकाल सुरक्षिततेच्या कायदेशीर भिंतीतील एक भक्कम वीट शाबीत झाला आहे.

अशा प्रकरणांनी सर्व लोकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याकरता बराच हातभार लावला आहे. संयुक्‍त संस्थानात नागरी हक्काच्या बचावाकरता साक्षीदारांनी लावलेल्या हातभाराविषयी युनिव्हर्सिटी ऑफ सिनसिन्‍नाटी लॉ रिव्हिव्यू म्हणते: भाषण आणि धर्म यांच्या संरक्षणाच्या मर्यादा विस्तारीत करण्याद्वारे संविधानात्मक नियमांचा जो विकास झाला आहे त्यावर यहोवाच्या साक्षीदारांचा मोठा प्रभाव पडला आहे.

भिंत मजबूत करणे

प्रत्येक कायदेशीर विजयात भिंत मजबूत होत जाते. १९९० च्या दशकातील काही निकालांचा विचार करा ज्यांचा लाभ यहोवाच्या साक्षीदारांना तसेच संपूर्ण जगभरात स्वातंत्र्याच्या इतर चाहत्यांनाही झाला आहे.

ग्रीस. मे २५, १९९३ रोजी, मानवी हक्कांच्या युरोपियन कोर्टाने, आपले धार्मिक विश्‍वास इतरांना शिकवण्याकरता एका ग्रीक नागरिकाचा हक्क मान्य केला. हे प्रकरण, तेव्हा ८४ वर्षांचे असलेल्या मिनोस कोकीनाकीस यांचे होते. यहोवाचा एक साक्षीदार या नात्याने, कोकीनाकीस यांना १९३८ पासून ६० पेक्षा अधिक वेळा अटक करण्यात आली होती, १८ वेळा ग्रीक कोर्टापुढे हजर करण्यात आले होते आणि त्यांनी सहा पेक्षा अधिक वर्षे तुरुंगात घालवली होती. धर्मांतराला प्रतिबंध करणाऱ्‍या १९३० च्या एका ग्रीक कायद्याखाली त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. याच नियमामुळे १९३८ ते १९९२ पर्यंत जवळजवळ २०,००० यहोवाच्या साक्षीदारांना अटक करण्यात आली होती. युरोपियन कोर्टाने निकाल दिला, की ग्रीक सरकारने कोकीनाकीस यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर आक्रमण केले होते; व त्यांना नुकसान भरपाई म्हणून १४,४०० डॉलर देण्यात आले. या निकालात कोर्टाने निकाल दिला, की यहोवाचे साक्षीदार खरोखरच एक ज्ञात धर्म आहे.—टेहळणी बुरुज (इंग्रजी) सप्टेंबर १, १९९३, पृष्ठे २७-३१ पाहा.

मेक्सिको. जुलै १६, १९९२ रोजी, मेक्सिको येथे धार्मिक स्वातंत्र्याच्या बचावात एक मोठे पाऊल उचलण्यात आले. त्या तारखेला धार्मिक संगती आणि सार्वजनिक उपासना यांचा कायदा करण्यात आला. या कायद्याद्वारे, एखाद्या धार्मिक गटाला, आवश्‍यक नोंदणी प्राप्त करण्याद्वारे धार्मिक संस्था म्हणून कायदेशीर स्थान प्राप्त करता येते. पूर्वी खरे तर, राष्ट्रांतील इतर धर्मांप्रमाणेच यहोवाचे साक्षीदारही होते परंतु त्यांना कसलेही कायदेशीर स्थान नव्हते. एप्रिल १३, १९९३ रोजी साक्षीदारांनी नोंदणीसाठी अर्ज केला. आणि आनंदाची गोष्ट, की मे ७, १९९३ रोजी, ला टोरे डेल विकियॉ, ए. आर. आणि लोस टेस्टीगोस डी हेओवॉ एन मेहिको, ए, आर. या दोन्ही नावांनी धार्मिक संस्था म्हणून त्यांची कायदेशीररीत्या नोंद झाली.—सावध राहा! (इंग्रजी) जुलै २२, १९९४, पृष्ठे १२-१४, पाहा.

ब्राझील. नोव्हेंबर १९९० मध्ये, ब्राझीलच्या सामाजिक सुरक्षिततेच्या राष्ट्रीय संस्थेने (आयएनएसएस) वॉच टावर संस्थेच्या शाखा कार्यालयाला सूचना दिली, की बेथेल (यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा इमारतींचे नाव) येथील स्वयंसेवकांना इथून पुढे धार्मिक सेवक म्हणून ओळखले जाणार नाही व त्यामुळे ते ब्राझीलच्या कामगार कायद्याखाली येतील. साक्षीदारांनी निर्णयासाठी अपील केले. जून ७, १९९६ रोजी, ब्रासिलिया येथील महान्यायप्रतिनिधीच्या कार्यालयाच्या न्यायिक सल्लागाराने, बेथेल येथील सेवकांना, लौकिक कामगार म्हणून नव्हे तर कायदेशीर धार्मिक संस्थेचे सदस्य म्हणून ओळखावे असा निर्णय दिला.

जपान. मार्च ८, १९९६ रोजी, जपानच्या सर्वोच्च न्यायालयाने जपानमधील सर्वांच्या लाभास्तव शिक्षण आणि धर्माचे स्वातंत्र्य या वादावर एक निर्णय दिला. कोर्टाने एकमताने निर्णय दिला की कोबे म्युनिसिपल इंडस्ट्रीयल टेक्नीकल कॉलेजने, जुडोकराटे सारख्या खेळांच्या प्रशिक्षणात भाग घेण्यास नकार दिल्याबद्दल कुनिहितो कोबायाशी याला कॉलेजमधून काढून टाकण्याद्वारे कायद्याचे उल्लंघन केले होते. जपानच्या संविधानाने गॅरेंटी दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय पहिल्यांदांच दिला आहे. आपल्या बायबल प्रशिक्षित विवेकानुसार या तरुण साक्षीदाराला वाटले, की या तालिमी यशया २:४ मधील बायबल तत्त्वांच्या एकवाक्यतेत नव्हत्या जेथे लिहिले आहे, की ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करितील, आपल्या भाल्याच्या कोयत्या करितील; यापुढे एक राष्ट्र दुसऱ्‍या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत. कोर्टाच्या निकालाने भवितव्यातील प्रकरणांसाठी एक पूर्वोदाहरण स्थापित केले.—टेहळणी बुरुज नोव्हेंबर १, १९९६, पृष्ठे १९-२१ पाहा.

फेब्रुवारी ९, १९९८ रोजी, टोकियो उच्च न्यायालयाने, वैद्यकिय उपचार निवडण्याचा रुग्णाच्या हक्काचा आदर केला जावा असा आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या निर्णयात, उच्च कोर्टाने मिसॉए टॉकेडॉ नामक एक साक्षीदार बहिणीचा हक्क मान्य केला; तिने रक्‍त वर्ज्य करावे, या बायबल आज्ञेच्या सुसंगतेत नसलेला वैद्यकिय उपचार घेण्यास नकार दिला होता. (प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९) या प्रकरणाचे सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले आहे व उच्च न्यायालयाचा निकाल मान्य केला जातो की नाही हे पाहण्यासाठी थांबावे लागणार आहे.

फिलिपीन्स. मार्च १, १९९३ रोजी दिलेल्या निर्णयात, फिलिपाईन सर्वोच्च कोर्टाने एकमताने यहोवाच्या साक्षीदारांच्या बाजूने एका प्रकरणाचा निर्णय दिला; हे प्रकरण साक्षीदारांच्या मुलांचे होते ज्यात त्यांनी झेंड्याला वंदन करण्यास आदरपूर्वकपणे नकार दिल्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते.

प्रत्येक अनुकूल कोर्ट निकाल, कायदेशीर भिंत मजबूत करणाऱ्‍या ज्यादा दगडाप्रमाणे किंवा वीटाप्रमाणे आहे; ही भिंत फक्‍त यहोवाच्या साक्षीदारांच्या हक्कांचे नव्हे तर सर्व लोकांच्या हक्कांचे संरक्षण करते.

भिंतीचे संरक्षण करणे

यहोवाच्या साक्षीदारांची १५३ राष्ट्रांत कायदेशीर नोंद आहे; इतर मान्यताप्राप्त धर्मांप्रमाणे तेही अनेक स्वातंत्र्यांच्या हक्कांचा उपभोग घेत आहेत. पूर्व युरोप आणि भूतपूर्व सोव्हियत युनियन येथे दशकांपर्यंत असलेल्या छळ आणि बंदी नंतर, यहोवाच्या साक्षीदारांना, अल्बेनिया, बेलारस, चेक प्रजासत्ताक, जॉर्जिया, हंगेरी, कझाकस्थान, किर्गीस्थान, रोमानिया आणि स्लोव्हाकिया यांसारख्या राष्ट्रांत कायदेशीर मान्यता मिळाली आहे. परंतु, आजही काही विशिष्ट देशांत, ज्यात पश्‍चिम युरोपीय राष्ट्रांचा देखील समावेश होतो, फार पूर्वीपासून न्यायिक व्यवस्था स्थापन झालेली असली तरी यहोवाच्या साक्षीदारांच्या हक्कांना अजूनही विरोध केला जातो किंवा नाकारला जातो. विरोधक साक्षीदारांविरुद्ध उपद्रव योजून अन्याय करण्याचा सक्रियपणे प्रयत्न करीत आहेत. (स्तोत्र ९४:२०) साक्षीदार याला कशी प्रतिक्रिया आहे?c

यहोवाचे साक्षीदार सर्व सरकारांना सहकार्य देऊ इच्छितात, परंतु त्यांना त्यांची उपासना करण्याकरता कायदेशीर स्वातंत्र्य देखील हवे आहे. त्यांची पक्की खात्री आहे, की देवाच्या आज्ञांचे पालन करताना तसेच सुवार्तेचा प्रचार करण्याबद्दलच्या आज्ञेचे पालन करताना त्यांना मज्जाव करणारे कोणतेही कायदे किंवा कोर्ट निकाल अग्राह्‍य आहेत. (मार्क १३:१०) सलोख्याचे एकमत झाले नाही तर यहोवाचे साक्षीदार आक्रमण करणाऱ्‍याला कायद्याच्या दरबारी नेतील आणि त्यांची उपासना जारी ठेवण्याकरता त्यांच्या देव-प्रदत्त हक्काबद्दल कायदेशीर संरक्षण मिळवण्यासाठी आवश्‍यक त्या सर्व अपीलांचा उपयोग करतील. तुझ्यावर चालविण्याकरिता घडिलेले कोणतेहि हत्यार तुजवर चालणार नाही, या देवाच्या अभिवचनावर यहोवाच्या साक्षीदारांचा पूर्ण भरवसा आहे.—यशया ५४:१७.

[तळटीपा]

a यहोवाच्या साक्षीदारांच्या कायदेशीर रेकॉर्डची सविस्तर माहिती हवी असल्यास वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेले यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्‌घोषक (इंग्रजी) नामक पुस्तकातील अध्याय ३० पाहा.

b मरडॉक निकालात, सर्वोच्च न्यायालयाने जोन्स विरुद्ध सिटी ऑफ ओपलिका च्या प्रकरणात स्वतःची बाजू बदलली. १९४२ मध्ये जोन्स प्रकरणात, सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल मान्य केला होता; त्या निकालात रॉस्को जोन्स या यहोवाच्या साक्षीदाराला, अलाबामा येथील ओपलिकाच्या रस्त्यावर परवाना कराची रक्कम न भरता साहित्यांचे वाटप केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते.

c पृष्ठे ८-१८ वरील त्यांच्या विश्‍वासामुळे द्वेषित आणि आपल्या विश्‍वासाचे समर्थन करणे हे लेख पाहा.

[२१ पानांवरील चौकट]

यहोवाच्या साक्षीदारांच्या हक्कांचे समर्थन करणे

यहोवाच्या साक्षीदारांवर आणलेल्या छळामुळे त्यांना संपूर्ण जगभरात न्यायाधीशांपुढे आणि सरकारी अधिकाऱ्‍यांपुढे नेण्यात येत आहे. (लूक २१:१२, १३) यहोवाच्या साक्षीदारांनी कायदेशीररीत्या आपल्या हक्कांचे समर्थन करण्यात कसलीही कसर मागे सोडली नाही. अनेक देशांत मिळालेल्या कोर्ट विजयांमुळे यहोवाच्या साक्षीदारांच्या कायदेशीर स्वातंत्र्याचे तसेच पुढे नमूद केलेल्या त्यांच्या हक्कांचे संरक्षण झाले आहे:

◻ व्यावसायिक व्यापाऱ्‍यांवर लादण्यात आलेल्या बंधनांविना घरोघरी जाऊन प्रचार करणे—मरडॉक विरुद्ध कॉमनवेल्थ ऑफ पेनस्लिव्हानिया, यु.एस. सर्वोच्च न्यायालय (१९४३); कोकीनाकीस विरुद्ध ग्रीस, मानवी हक्कांचे युरोपीयन कोर्ट (ईसीएचआर) (१९९३).

◻ उपासनेसाठी मुक्‍तपणे एकत्र जमणे—मानाऊसाकीस आणि इतर विरुद्ध ग्रीस, ईसीएचआर (१९९६).

◻ राष्ट्रध्वज किंवा राष्ट्रचिन्ह याला विचारपूर्वक आदर कसा दाखवू शकतात याचा निर्णय घेणे—वेस्ट व्हर्जिनिया स्टेट बोर्ड ऑफ एजुकेशन विरुद्ध बारनेट, यु.एस. सर्वोच्च न्यायालय (१९४३); फिलिपाईन्सचे सर्वोच्च न्यायालय (१९९३); भारताचे सर्वोच्च न्यायालय (१९८६).

◻ त्यांच्या ख्रिस्ती विवेकाचे उल्लंघन करणाऱ्‍या लष्करी सेवेला नकार देणे—जिओर्जीअडीस विरुद्ध ग्रीस, ईसीएचआर (१९९७).

◻ त्यांच्या विवेकाचा भंग करणार नाहीत असे उपचार व औषधे निवडणे—मॉलेट विरुद्ध शुलमन ऑन्टारियो, कॅनडा, अपील कोर्ट (१९९०); वॉच टावर विरुद्ध इ.एल.ए., वरिष्ठ न्यायालय, सॅन जुआन, प्वेर्त रिको (१९९५); फॉसमायर विरुद्ध निकोलिआऊ, न्यूयॉर्क, यु.एस.ए., कोर्ट ऑफ अपील्स (१९९०).

◻ त्यांच्या मुलांना त्यांच्या बायबल आधारित विश्‍वासानुसार वाढवणे, मग या विश्‍वासांवर शिशुताबा वादांत आक्षेप घेतला जातो तेव्हाही—सेंट लॅरन विरुद्ध सूसी, कॅनडाचे सर्वोच्च न्यायालय (१९९७); हॉफमन विरुद्ध ऑस्ट्रिया, ईसीएचआर (१९९३).

◻ इतर मान्यताप्राप्त धर्म ज्या एजन्सींचा उपयोग करतात त्या एजन्सींबद्दल त्यांना द्यावा लागणारा कर जसा त्यांना माफ केला जातो तशीच माफी मिळणाऱ्‍या कायदेशीर एजन्सी बाळगण्यास व चालवण्यास मिळणे—जनता विरुद्ध हरिंग, न्यूयॉर्क, यु.एस.ए., कोर्ट ऑफ अपील्स (१९६०).

◻ इतर धर्माच्या पूर्णवेळेच्या धार्मिक कार्यकर्त्यांकडून जसा अनुकूल कर आकारला जातो तसाच कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या पूर्ण वेळेच्या सेवेसाठी नियुक्‍त केलेल्यांकडून आकारणे—ब्राझीलच्या सामाजिक सुरक्षिततेची राष्ट्रीय संस्था, ब्रासिलिया, (१९९६).

[२० पानांवरील चित्र]

मिनोस कोकीनाकीस आपल्या पत्नीसमवेत

[२० पानांवरील चित्र]

कुनिहितो कोबायाशी

[१९ पानांवरील चित्राचे श्रेय]

The Complete Encyclopedia of Illustration/J. G. Heck

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा