सम्राटाच्या उपासनेपासून खऱ्या उपासनेकडे
इसामु सुगिऊरे यांच्याद्वारे कथित
सन १९४५ साली जपान दुसरे जागतिक युद्ध हरण्याच्या बेतात असल्याचे स्पष्ट चिन्ह दिसत होते, तरी आम्हाला याची पक्की खात्री होती, की कामीकाझी (“ईश्वरी वादळ”) शत्रुसैन्याला वाहून त्यांचा पराजय करील. सन १२७४ आणि १२८१ मध्ये जपानच्या समुद्रकिनाऱ्यावरून देशावर आक्रमण करणाऱ्या माँगोल आरमारातील बहुतेक सैन्याची वादळात दोन वेळा दाणादाण उडाल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती; त्या वादळाला कामीकाझी असे म्हणण्यात येत होते.
म्हणून सम्राट हिरोहितो याने जेव्हा ऑगस्ट १५, १९४५ रोजी असे जाहीर केले, की जपान मित्रराष्ट्रांना शरण गेले आहे तेव्हा त्याच्यावरील लाखो लोकांच्या आशा धुळीस मिळाल्या. त्यावेळी मी शाळकरी मुलगा होतो आणि माझ्याही आशेचा चक्काचूर झाला. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘सम्राट हा जर खरा जिवंत देव नाही, तर मग जिवंत देव कोण आहे? मी कोणावर विश्वास ठेवावा?’
खरे तर दुसऱ्या जागतिक युद्धात जपानचा पराभव झाला असला तरी, त्यामुळे माझ्याकरता आणि इतर हजारो जपानी लोकांकरता खरा देव, यहोवा याच्याविषयी शिकण्याचा मार्ग खुला झाला. मला करावे लागणारे बदल तुम्हाला सांगण्याआधी माझ्या घरी कशाप्रकारचे धार्मिक वातावरण होते त्याविषयी तुम्हाला सांगतो.
सुरवातीचा धार्मिक प्रभाव
जून १६, १९३२ साली नॉगयॉ शहरात माझा जन्म झाला; माझ्या चार भावांत मी सर्वात धाकटा होतो. शहराचा सर्व्हे करण्याचे काम माझे वडील करायचे. आई टेन्रीक्यो या शिंतो पंथाची उपासक होती आणि माझ्या थोरल्या भावाने टेन्रीक्यो शिक्षक होण्याचे धार्मिक प्रशिक्षण घेतले होते. आईसोबत माझा फार जवळचा संबंध होता आणि ज्या ठिकाणी उपासना केली जाते त्याठिकाणी ती मला तिच्यासोबत घेऊन जात असे.
प्रार्थना करताना नतमस्तक होण्याचे मला शिकवण्यात आले होते. टेन्रीक्यो धर्मात टेन्री ओ नो मिकोटो या निर्माणकर्त्यावर तसेच दहा देवी-दैवतांवर विश्वास ठेवण्यात येतो. या धर्मातील लोक प्रार्थना करून लोकांचे आजार बरे करत तसेच इतरांची सेवा करण्यावर आणि त्यांच्या धार्मिक विश्वासांचा प्रसार करण्यावर जोर देत.
लहान असताना मला याविषयी फार जिज्ञासा वाटायची. मी रात्री चंद्राकडे आणि अगणित ताऱ्यांकडे एकटक पाहत राहिल्यानंतर आकाश किती दूरपर्यंत पसरले आहे याचा विचार करत बसायचो. घराच्या परसात लावलेली वांग्याच्या रोपाची आणि काकडीच्या वेलाची वाढ पाहून मला खूप आश्चर्य वाटत असे. निसर्गाचे निरीक्षण केल्याने देवावरील माझा विश्वास मजबूत होत गेला.
युद्धाची वर्षे
सन १९३९ ते १९४५ या काळात मी शाळेत असताना दुसरे जागतिक युद्ध सुरू होते. शिंतो धर्मात सम्राटाची उपासना करण्याला खूप महत्त्व दिले जाते आणि शाळेत त्यावर जोर देण्यात येत असे. शुशीन हा विषय आम्हाला शिकवण्यात येत असे आणि त्यामध्ये नैतिक शिक्षणासोबत सम्राटाची उपासना करण्यावर आणि लष्करी गोष्टींवर विशेष जोर देण्यात येत असे. झेंडा वंदन, राष्ट्रगीत गाणे, सम्राटाच्या उपासनेविषयी अभ्यास करणे, सम्राटाच्या फोटोची पूजा करणे या गोष्टी आमच्या शाळेच्या अभ्यासक्रमात होत्या.
सम्राटाच्या लष्कराला विजय प्राप्त व्हावा म्हणून आम्ही स्थानिक शिंतो मंदिरात देवाला प्रार्थना करण्याकरताही जात असू. माझे दोन सख्खे भाऊ लष्करात होते. लहानपणापासून मिळालेल्या राष्ट्रीय-धार्मिक शिक्षणामुळे जपानी लष्कराच्या यशाची बातमी ऐकून मला खूप आनंद होत असे.
जपानी विमान उद्योगाचे नॉगोयॉ हे केंद्र असल्यामुळे हे शहर यु.एस. च्या शक्तिशाली वायुसेनेचे प्रमुख लक्ष्य होते. दिवसा, बी-२९ सुपरफोरट्रेस या विमानांनी शहराच्या ३०,००० फूट उंचीवरून कित्येक बॉम्ब, विमान कारखान्यांवर टाकले. रात्रीच्या वेळी सर्चलाईटद्वारे पाहिल्यानंतर शत्रुसैन्यांची लढाऊ विमान तर ४,५०० फूट खाली आली होती. या शहरावर वारंवार स्फोटक बॉम्बहल्ला होत असल्यामुळे निवासी प्रदेशातून आगीच्या ज्वाला उठत होत्या. मागील नऊ महिन्यात नॉगोयॉ या शहरावरच ५४ वेळा विमानांनी हल्ला चढवला होता त्यामुळे त्या शहरातील लोकांचे खूप हाल झाले आणि ७,७०० लोकांना आपला जीव गमवावा लागला.
तोपर्यंत युद्धनौकांवरून सुमद्रकिनाऱ्यावरील दहा शहरांवर बॉम्बहल्ला होऊ लागला आणि यु.एस. लष्कर टोकिओ शहराच्या आसपास उतरण्याची शक्यता आहे, असे लोक बोलू लागले. देशाचे संरक्षण करण्याकरता स्त्रियांना आणि लहान मुलांना बांबूचा भाला चालवण्याचे शिकवण्यात आले. “इचिओकू सोग्योकुसाय,” हा आमचा रणघोष होता त्याचा अर्थ “शरणागती पत्करण्यापेक्षा आमचे दहा कोटी लोक मेले तरी चालेल.”
ऑगस्ट ७, १९४५ रोजी वर्तमानपत्रात प्रमुख बातमी झळकली: “हिरोशिमावर नवीन प्रकारचा बॉम्ब टाकण्यात आला.” दोन दिवसांनी नागासाकीवर आणखी एक बॉम्ब टाकण्यात आला. टाकण्यात आलेले बॉम्ब, ॲटम बॉम्ब होते आणि नंतर आम्हाला कळले, की या दोन बॉम्बमुळे एकूण ३,००,००० लोक मरण पावले होते. त्यानंतर ऑगस्ट १५ रोजी लाकडी बंदुकांसोबत मार्च करण्याचे प्रशिक्षण संपण्याच्यावेळी आम्ही सम्राटाचे भाषण ऐकले त्यात जपानने शरणागती पत्करल्याचे त्याने सांगितले. आम्ही जिंकू याची आम्हाला पूर्ण खात्री होती, पण आमच्या सर्व आशा धुळीस मिळाल्या होत्या!
नवीन आशेचा किरण
अमेरिकी लष्कराने जपान काबीज करण्यास सुरवात केली तेव्हा संयुक्त संस्थानांनी युद्ध जिंकल्याचे सत्य आम्ही हळूहळू मान्य करू लागलो. जपानमध्ये लोकसत्ताक राज्यसरकार अस्तित्वात आले तसेच नवीन राज्यपद्धतीमुळे धार्मिक स्वातंत्र्याची हमी मिळाली. अन्नाच्या तुटवड्यामुळे जीवन जगणे फार मुश्किल झाले होते आणि १९४६ मध्ये माझे वडील कुपोषणामुळे मरण पावले.
एव्हाना माझ्या शाळेत इंग्रजी शिकवण्यास सुरवात झाली होती आणि एनएचके या रेडिओ स्टेशनवर इंग्रजी संभाषणाचा कार्यक्रम सादर करण्यात येऊ लागला. हा लोकप्रिय कार्यक्रम मी पाच वर्षे सोबत पाठ्यपुस्तक घेऊन दररोज ऐकला. त्यामुळे एके दिवशी तरी संयुक्त संस्थानांत जाईल असे स्वप्न मी पाहू लागलो. शिंतो आणि बौद्ध धर्मांमुळे माझी तर निराशा झालीच होती त्यामुळे देवाविषयीचे सत्य मला कदाचित पाश्चिमात्य धर्मांमध्ये तरी मिळेल असा मी विचार करू लागलो.
सन १९५१ एप्रिल महिन्याच्या सुरवातीला वॉच टावर सोसायटीची मिशनरी ग्रेस ग्रेगरी हिच्याशी माझी भेट झाली. ती नॉगोयॉ रेल्वे स्टेशनच्या बाहेर इंग्रजी भाषेतील टेहळणी बुरूज आणि बायबलमधील विषयावर आधारित जपानी भाषेतील पुस्तिका लोकांना वाटत होती. असे करण्यातील तिची नम्रता पाहून मी प्रभावित झालो. मी तिच्याकडून ही दोन्ही पुस्तके घेतली आणि तिच्यासोबत बायबल अभ्यास करण्यासही लगेच तयार झालो. बायबल अभ्यासाकरता काही दिवसांनी तिच्या घरी जाण्याचे मी तिला आश्वासन दिले.
ट्रेनमध्ये बसल्यानंतर टेहळणी बुरूज वाचण्यास मी सुरवात केली; सुरवातीच्या लेखातील “यहोवा,” या पहिल्या शब्दानेच माझे लक्ष वेधले. हे नाव मी पूर्वी कधीही पाहिले नव्हते. हे नाव माझ्याकडे असलेल्या इंग्रजी-जपानी डिक्शनरीमध्ये असेल असे मला वाटले नव्हते, पण ते होते! “यहोवा . . . , बायबलचा देव.” आता मी ख्रिस्ती विश्वासाच्या देवाविषयी जाणून घेण्यास सुरवात केली!
त्या मिशनरी गृहाला पहिल्यांदा भेट दिल्यानंतर मला कळले, की काही आठवड्यांनंतर वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीचे तेव्हाचे अध्यक्ष नेथन एच. नॉर बायबलवर आधारित एक भाषण देणार आहेत. मिल्टन हेन्शल या त्यांच्या सेक्रटरीसोबत ते जपानला भेट देणार होते, आणि नॉगोयॉ येथे देखील भेट देणार होते. मला बायबलविषयी इतकी माहिती नव्हती, तरीसुद्धा मला त्यांचे भाषण तसेच मिशनरी लोकांचा आणि तेथे उपस्थित असलेल्या लोकांचा सहवास खूप आवडला.
ग्रेस सोबतच्या सुमारे दोन महिन्यांच्या अभ्यासातून मला यहोवा, येशू ख्रिस्त, खंडणी, दियाबल सैतान, हर्मगिदोन आणि परादीस पृथ्वी यांविषयी मूलभूत माहिती मिळाली. देवाच्या राज्याची सुवार्ता माझ्याकरता असा संदेश होता ज्याच्या शोधात मी होतो. अभ्यास सुरू केला तेव्हाच मी मिटींग्सना जाऊ लागलो. तेथील मैत्रिपूर्ण वातावरण मला खूप आवडायचे, तेथे मिशनरी लोक जपानी लोकांत अगदी मिसळून जायचे आणि आमच्यासोबत चटईवर बसायचे.
ऑक्टोबर १९५१ मध्ये, ओसाका शहरातील नाकानोशिमा पब्लिक हॉलमध्ये जपानचे पहिले विभागीय संमेलन भरले. त्यावेळी संपूर्ण जपानमध्ये ३०० पेक्षाही कमी साक्षीदार होते; तरी सुमारे ३०० लोक संमेलनाला उपस्थित होते, त्यात ५० मिशनरींचाही समावेश होता. त्या कार्यक्रमात माझा एक छोटासा भागही होता. मी जे पाहिले आणि जे ऐकले त्याने मी इतका प्रभावित झालो, की संपूर्ण जीवनभर यहोवाची सेवा करण्याचे मी मनाशी ठरवले. जवळच असलेल्या सार्वजनिक स्नानगृहामध्ये कोमट पाण्यात मी बाप्तिस्मा घेतला.
पायनियर सेवेतील आनंद
मला पायनियर बनायचे होते; यहोवाच्या साक्षीदारांच्या पूर्णवेळेच्या सेवकांना तेव्हा पायनियर म्हटले जात असे, पण त्याचवेळी घरातही मदत करावी असे मला वाटत होते. माझ्या बॉसला मी धैर्य एकवटून माझी इच्छा बोलून दाखवली तेव्हा त्याचे उत्तर ऐकून मी आवाकच राहिलो: “तसे केल्याने तुला आनंद मिळत असेल तर तुला मदत करायला मी तयार आहे.” त्यामुळे मी आठवड्यातून केवळ दोन दिवस काम करत असलो तरी आईला घरखर्चाला द्यायला माझ्याकडे पुरेसे पैसे होते. पिंजऱ्यातून सुटलेल्या पक्षाप्रमाणे मला वाटत होते.
परिस्थितीमध्ये सुधारणा होत गेली तसे मी ऑगस्ट १, १९५४ या दिवशी पायनियरींग करण्यास सुरवात केली; नॉगोयॉ रेल्वे स्टेशनच्या मागील बाजूला असलेल्या ठिकाणी मी प्रचाराला सुरवात केली, हे ठिकाण मला पहिल्यांदा ग्रेस ज्या ठिकाणी भेटली त्या ठिकाणापासून केवळ काही मिनिटांच्या अंतरावर आहे. कित्येक महिन्यांनंतर मला खास पायनियर म्हणून कार्य करण्याकरता किऊशूच्या पश्चिम बेटावरील बेप्पू शहरात नेमण्यात आले. त्सूटोमू मिऊरा हा माझा पायनियर सोबती होता.a त्यावेळी संपूर्ण बेटावर यहोवाच्या साक्षीदारांची एकही मंडळी नव्हती, पण आता तेथे शेकडो मंडळ्या २२ सर्किट्समध्ये विभागलेल्या आहेत!
नव्या जगाची झलक
एप्रिल १९५६ मध्ये, ब्रदर नॉर यांनी जपानला पुन्हा भेट दिली तेव्हा त्यांनी मला इंग्रजी टेहळणी बुरूजमधून काही परिच्छेद मोठ्याने वाचण्यास सांगितले. त्यांनी मला असे का करायला सांगितले हे मला कळले नाही, पण काही महिन्यांनी २९ व्या गिलियड मिशनरी स्कूलकरता उपस्थित राहण्याचे आमंत्रण देणारे पत्र मला मिळाले. म्हणून त्या वर्षाच्या नोव्हेंबरमध्ये संयुक्त संस्थानांचा रोमहर्षक प्रवास मला करायला मिळाला, त्यामुळे माझे पुष्कळ दिवसापासूनचे स्वप्न खरे ठरले. त्या मोठ्या ब्रुकलिन बेथेलच्या कुटुंबात दोनएक महिने राहून काम केल्यानंतर यहोवाच्या दृश्य संस्थेवरील माझा विश्वास आणखी मजबूत झाला.
फेब्रुवारी १९५७ मध्ये ब्रदर नॉर यांनी आम्हा तिघा विद्यार्थ्यांना उत्तर न्यूयॉर्कच्या साऊथ लेन्सिंग येथील गिलियड स्कूलकरता निवडले. गिलियड स्कूलच्या पुढील पाच महिन्यांत यहोवाच्या वचनाद्वारे मिळालेले मार्गदर्शन आणि सोबतच्या विद्यार्थ्यांचा त्या सुंदर वातावरणातील सहवास यांमुळे मला परादीस पृथ्वीची झलक पाहायला मिळाली. १०३ विद्यार्थ्यांपैकी दहा जणांना जपानला पाठवण्यात आले होते आणि त्या दहांपैकी मीही होतो.
नेमणुकींची कदर करणे
मी ऑक्टोबर १९५७ मध्ये जपानला परतलो तेव्हा तेथे सुमारे ८६० साक्षीदार होते. सर्किट ओव्हरसियर म्हणून मला प्रवासी कार्यासाठी नियुक्त करण्यात आले, पण त्यापूर्वी मला नॉगोयॉतील ॲड्रायन थॉम्पसन यांच्याकडून काही दिवस प्रशिक्षण मिळाले. माझा विभाग माऊंट फ्युजी जवळील शिमीझ क्षेत्रापासून शिकोकू द्वीपापर्यंत होता त्यात क्योटो, ओसाका, कोबे आणि हिरोशिमा यांसारख्या मोठ्या शहरांचा समावेश होता.
सन १९६१ मध्ये डिस्ट्रीक्ट ओव्हरसियर म्हणून मला नियुक्ती मिळाली. याकरता मला हॉकायडोच्या बर्फाळ उत्तर द्वीपापासून ओकिनावाच्या उष्णप्रदेशीय द्वीपाचा आणि तायवान जवळच्या इशीगाकी द्वीपांच्या पुढील क्षेत्राचा समावेश होता, हे अंतर सुमारे ३,००० किलोमीटरचे होते.
त्यानंतर १९६३ मध्ये मला ब्रुकलिन बेथेलमध्ये दहा महिन्याच्या गिलियड स्कूलकरता बोलवण्यात आले. त्या कोर्स दरम्यान ब्रदर नॉर यांनी नियुक्तींप्रती योग्य मनोवृत्ती बाळगण्यावर जोर दिला. त्यांनी म्हटले, की टॉयलेट साफ करणे हे काम ऑफिसमध्ये काम करण्याइतकेच महत्त्वाचे आहे. त्यांनी म्हटले, टॉयलेट स्वच्छ नसल्यास त्याचा संपूर्ण बेथेल कुटुंबावर आणि त्यांच्या कामावर परिणाम होईल. पुढे जपान बेथेलमध्ये मला टॉयलेट साफ करण्याचे काम देण्यात आले तेव्हा मला नॉर यांच्या सल्ल्याची आठवण झाली.
जपानला परतल्यानंतर मला प्रवासी कार्याकरता नियुक्त करण्यात आले. पुढे दोनएक वर्षांनी, १९६६ मध्ये मातसुए या शहरात खास पायनियरींग करणाऱ्या जुनको इवासाकी हिच्याशी मी विवाह केला. जपान शाखेचे तेव्हाचे अध्यक्ष लॉईड बॅरी यांनी आमच्या लग्नाचे सुंदर भाषण दिले. त्यानंतर जुनको माझ्यासोबत प्रवासी कार्य करू लागली.
सन १९६८ मध्ये मला नवीन नियुक्ती मिळाली; यावेळी मला टोकिओतील शाखा दफ्तरात भाषांतराच्या कामाकरता बोलवण्यात आले होते. शाखा दफ्तरात राहण्याची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे मला टोकिओतील सुमीदा वॉर्डापासून ये-जा करावी लागत असे, जुनको मात्र स्थानिक मंडळीमध्ये खास पायनियर म्हणून काम करत होती. एव्हाना शाखा दफ्तर वाढवण्याची नितान्त आवश्यकता होती. म्हणून १९७० मध्ये माऊंट फ्युजीपासून जवळच असणाऱ्या नुमाझूमध्ये जागा विकत घेण्यात आली. तेथे तीन मजल्यांची फॅक्टरी इमारत आणि एक निवासी इमारत बांधण्यात आली. बांधकाम सुरू होण्यापूर्वी प्रॉपर्टीमधील अनेक घरांचा उपयोग किंग्डम मिनिस्ट्री स्कूलकरता करण्यात आला; या स्कूलमध्ये मंडळ्यांच्या ओव्हरसियरांना प्रशिक्षण देण्यात येते. ही शाळा चालवण्याचा मला सुहक्क मिळाला होता आणि जुनको स्कूलमधल्या विद्यार्थ्यांकरता जेवण बनवायची. सेवाकार्याकरता शेकडो ख्रिस्ती पुरुषांना खास प्रशिक्षण दिले जाते हे किती आनंदाचे आहे!
एके दुपारी मला एक अर्जंट टेलिग्राम मिळाला. आईला दवाखान्यात दाखल करण्यात आले होते आणि ती शेवटची घटका मोजत होती. मी घाई करून बुलेट ट्रेनने नॉगोयॉच्या दवाखान्यात गेलो. ती बेशुद्धावस्थेत होती, मी संपूर्ण रात्र तिच्यासोबत होतो. पहाटे आई मला सोडून गेली. नुमाझूला परत जाताना आईला केवढा त्रास सहन करावा लागला आणि माझ्यावर तिची किती माया होती हे सगळे आठवल्यावर मला अश्रू आवरता आले नाहीत. यहोवाची इच्छा असल्यास मी तिला पुनरुत्थानानंतर पुन्हा भेटेन.
नुमाझूमधील शाखा दफ्तर अपुरे पडू लागले. म्हणून एबीना सिटीमध्ये १८ एकर जागा विकत घेण्यात आली आणि नवीन शाखा दफ्तरांच्या इमारतींचे काम १९७८ मध्ये सुरू करण्यात आले. आता या संपूर्ण जागेत फॅक्टरी आणि निवासी इमारती आहेत तसेच २,८०० लोक बसू शकतील इतके मोठे संमेलन गृह आहे. याशिवाय, या वर्षाच्या सुरवातीला १३ मजल्यांच्या दोन निवासी इमारती आणि ५-मजल्यांची पार्कींग/सर्व्हिस इमारत बांधून पूर्ण झाली. आमच्या बेथेल कुटुंबात आता ५३० सदस्य आहेत, पण सुमारे ९०० सदस्यांच्या राहण्याची व्यवस्था या शाखा दफ्तरामध्ये केली जाऊ शकते.
आनंदाची अनेक कारणे
“क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल,” या बायबलमधील भविष्यवाणीची पूर्णता झाल्याचे पाहणे रोमहर्षक आहे. (यशया ६०:२२) १९५१ मध्ये एकदा माझ्या भावाने मला विचारल्याचे आठवते, त्याने मला विचारले होते: “जपानमध्ये तुमचे असे किती साक्षीदार आहेत?”
“सुमारे २६०,” मी म्हटले.
“बस इतकेच?” मला हिणवण्याच्या स्वरात त्याने मला म्हटले.
त्यावेळी मी असा विचार केल्याचे आठवते, ‘या शिंतो-बौद्ध राष्ट्रातून यहोवा किती लोकांना त्याच्या उपासनेकरता निवडेल हे काळच दाखवून देईल.’ आणि यहोवाने ते दाखवलेही! आज जपानमध्ये एकही असा प्रदेश नाही जेथे प्रचारकार्य चालू नाही आणि ३,८०० मंडळ्यांमध्ये २,२२,००० पेक्षाही अधिक लोक खऱ्या उपासनेत संघटित आहेत!
माझ्या जीवनातील पूर्णवेळेची ४४ वर्षे खरोखरच खूप आनंदाची होती; त्यांतील ३२ वर्षे मी माझ्या पत्नीसोबत सेवा केली. बेथेलमधील भाषांतर विभागामध्ये मी २५ वर्षे काम केले आहे. सप्टेंबर १९७९ मध्ये मला जपानमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा समितीतील सदस्य म्हणूनही नियुक्त करण्यात आले.
प्रामाणिक, शांतिप्रिय लोकांना यहोवाच्या उपासनेची ओळख करून देण्याची मिळालेली संधी, सुहक्क आणि आशीर्वादच म्हणावा लागेल. अनेकांनी माझ्याप्रमाणे केले आहे—सम्राटाची उपासना करण्याचे सोडून एकच खरा देव, यहोवा याची ते उपासना करू लागले आहेत. यहोवाच्या विजयी पक्षात यावे आणि शांतिमय नवीन जगात अनंत जीवन प्राप्त व्हावे म्हणून आणखी पुष्कळ लोकांना मदत करण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे.—प्रकटीकरण २२:१७.
[तळटीपा]
a सन १९४५ मध्ये हिरोशिमावर बॉम्ब टाकण्यात आला तेव्हा त्याचे वडील जपानी तुरुंगात असताना वाचले. सावध राहा! ऑक्टोबर ८, १९९४, पृष्ठे ११-१५ (इंग्रजी) पाहा.
[२९ पानांवरील चित्र]
शालेय शिक्षणात सम्राटाची उपासना केंद्रस्थानी होती
[Credit Line]
The Mainichi Newspapers
[२९ पानांवरील चित्र]
न्यूयॉर्कमध्ये ब्रदर फ्रँझसोबत
[२९ पानांवरील चित्र]
मी आणि माझी पत्नी, जुनको
[३१ पानांवरील चित्र]
भाषांतर विभागामध्ये काम करताना