वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 १२/१ पृ. १३-१८
  • आपल्या विश्‍वासाचे समर्थन करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्या विश्‍वासाचे समर्थन करणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो”
  • केव्हा शांत राहायचे आणि केव्हा बोलायचे
  • निंदनीय वार्ता दिली जाते तेव्हा काय?
  • कायदेशीररीत्या सुवार्तेचे समर्थन करणे
  • ख्रिस्ती जाहीर निंदेला कशी प्रतिक्रिया दाखवतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • त्यांच्या विश्‍वासामुळे द्वेषित
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • धार्मिकतेसाठी झालेला छळ
    यहोवाचे साक्षीदार जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत
  • ख्रिस्तीजन आणि आजचा मानवी समाज
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 १२/१ पृ. १३-१८

आपल्या विश्‍वासाचे समर्थन करणे

“ख्रिस्ताला प्रभु म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना; आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्‍या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा.”—१ पेत्र ३:१५.

१, २. यहोवाच्या साक्षीदारांना विरोधाचे आश्‍चर्य का वाटत नाही, पण त्यांची काय इच्छा आहे?

यहोवाच्या साक्षीदारांना बहुतेक राष्ट्रांत प्रामाणिक, शुद्धाचरणी लोक म्हणून ओळखले जाते. पुष्कळजण त्यांना, कसलाही त्रास नसलेले, चांगले शेजारी मानतात. तरीसुद्धा, उपरोधिकपणे या शांतीप्रिय ख्रिश्‍चनांनी अन्यायीपणे छळ सहन केला आहे—युद्ध चालू असताना आणि नसतानाही. हा विरोध पाहून त्यांना आश्‍चर्य वाटत नाही. खरे तर ते याची अपेक्षा करतात. कारण, त्यांना माहीत आहे की पहिल्या शतकातील विश्‍वासू ख्रिश्‍चनांचा “द्वेष” करण्यात आला होता; तेव्हा, आज ख्रिस्ताचे खरे अनुयायी होण्याचा प्रयत्न करणाऱ्‍यांनी वेगळ्या वागणूकीची अपेक्षा का करावी? (मत्तय १०:२२) शिवाय, बायबल म्हणते: “ख्रिस्त येशूमध्ये सुभक्‍तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल.”—२ तीमथ्य ३:१२.

२ यहोवाच्या साक्षीदारांना छळ हवा आहे असे नाही किंवा त्यामुळे येणाऱ्‍या हालअपेष्टांचा—दंड, तुरुंगवास, किंवा कठोर वागणूक यांचा—आनंद त्यांना वाटत नाही. त्यांना ‘शांतीने व स्वस्थपणे’ जीवन व्यतीत करावेसे वाटते जेणेकरून ते देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार अडथळ्याविना करू शकतात. (१ तीमथ्य २:१, २) बहुतेक देशांत आपली उपासना करण्याकरता त्यांना असलेल्या धार्मिक स्वातंत्र्याची ते कदर बाळगतात व मानवी सरकारांमधील शासकांसह ‘सर्व माणसांबरोबर शांतीने’ राहण्याकरता त्यांना शक्य असलेले सर्वकाही करण्याचा ते विचारपूर्वक प्रयत्न करतात. (रोमकर १२:१८; १३:१-७) तरीसुद्धा, त्यांचा “द्वेष” का केला जातो?

३. एक कारण कोणते आहे ज्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांचा अन्यायीपणे द्वेष केला जातो?

३ प्रामुख्याने, पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांचा ज्या कारणांसाठी छळ करण्यात आला त्याच कारणांसाठी यहोवाच्या साक्षीदारांचा अन्यायीपणे द्वेष केला जात आहे. पहिले कारण, यहोवाच्या साक्षीदारांच्या काही धार्मिक विश्‍वासांमुळे काही लोकांना ते आवडत नाहीत. जसे की ते जेव्हा देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार आवेशाने करतात तेव्हा त्यांचा हा आवेश पाहून काही लोकांचा गैरसमज होतो की त्यांचे हे प्रचार कार्य म्हणजे “जबरदस्तीने धर्मांतर करणे” आहे. (पडताळा प्रेषितांची कृत्ये ४:१९, २०.) ते राजकारणात आणि युद्धांतही तटस्थता राखतात आणि काहीवेळा याचा अपसमज असा होतो, की साक्षीदार बेइमान नागरिक आहेत म्हणून.—मीखा ४:३, ४.

४, ५. (अ) यहोवाचे साक्षीदार खोट्या आरोपांचे लक्ष्य कसे बनले आहेत? (ब) यहोवाच्या सेवकांच्या छळाचे प्रमुख चिथावणीखोर कोण राहिले आहेत?

४ दुसरे कारण, यहोवाच्या साक्षीदारांवर खोटे आरोप करण्यात आले आहेत—धडधडीत खोटे आरोप आणि त्यांच्या विश्‍वासांचा विपर्यास केला जातो. यामुळे, काही देशांत त्यांच्यावर घातक पंथ असा ठप्पाच लावण्यात आला आहे. शिवाय, ‘रक्‍त वर्ज्य करावे,’ या बायबलच्या आज्ञेचे पालन करण्याची त्यांची इच्छा असल्यामुळे ते रक्‍ताविना वैद्यकीय उपचार मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात पण अपसमजेमुळे “मुलांची हत्या करणारे,” व “आत्महत्या करणारा पंथ” अशी त्यांना नावे दिली जातात. (प्रेषितांची कृत्ये १५:२९) परंतु वास्तविकतेत यहोवाचे साक्षीदार जीवनाला अतिशय मौल्यवान समजतात व स्वतःसाठी आणि आपल्या मुलांसाठी सर्वात उत्तम वैद्यकीय उपचार प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. रक्‍तसंक्रमण न घेतल्यामुळे दर वर्षी यहोवाच्या साक्षीदारांच्या अनेक मुलांचा मृत्यू होतो हा आरोप पूर्णपणे बिनबुडाचा आहे. हे सिद्ध करण्याकरता याची आकडेवारीच देता येत नाही. बायबल सत्याचा सर्व कौटुंबिक सदस्यांवर सारखाच प्रभाव होत नसल्यामुळे, साक्षीदार कुटुंब तोडत आहेत असाही त्यांच्यावर आरोप केला जातो. तरीसुद्धा, यहोवाच्या साक्षीदारांशी परिचित असलेल्यांना माहीत आहे, की ते कौटुंबिक जीवनाचा अतिशय आदर करतात व पतीपत्नींनी एकमेकांना प्रेम व आदर दाखवला पाहिजे तसेच मुलांनी, आपले आईवडील सत्यात असोत किंवा नसोत, त्यांच्या आज्ञेत असले पाहिजे या बायबल आज्ञांचे पालन करण्याचा ते प्रयत्न करतात.—इफिसकर ५:२१–६:३.

५ पुष्कळ वेळा, यहोवाच्या सेवकांचा छळ करणारे प्रमुख चिथावणीखोर धार्मिक विरोधक निघाले आहेत; साक्षीदारांचे कार्य दाबून टाकण्याकरता त्यांनी राजकीय अधिकाऱ्‍यांना आणि प्रसारमाध्यमाला हाताशी घेतले आहे. आपण यहोवाच्या साक्षीदारांनी, विरोधाला, मग तो आपल्या विश्‍वासांमुळे, आपल्या प्रथांमुळे अथवा खोट्या आरोपांमुळे असो, कशी प्रतिक्रिया असली पाहिजे?

“तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो”

६. ख्रिस्ती मंडळीच्या बाहेर असलेल्यांबद्दल संतुलित दृष्टिकोन बाळगणे महत्त्वपूर्ण का आहे?

६ पहिल्यांदा आपण, आपल्या धार्मिक मतांशी एकमत नसलेल्यांबद्दल योग्य दृष्टिकोन अर्थात यहोवाचा दृष्टिकोन बाळगला पाहिजे. नाहीतर आपण विनाकारण इतरांचा शत्रुभाव किंवा निंदा ओढवून घेऊ. प्रेषित पौलाने लिहिले: “तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो.” (फिलिप्पैकर ४:५) यास्तव, बायबल आपल्याला ख्रिस्ती मंडळीच्या बाहेर असलेल्यांबद्दल संतुलित दृष्टिकोन बाळगण्याचे उत्तेजन देते.

७. “स्वतःला जगापासून निष्कलंक” ठेवण्यात कशाचा समावेश होतो?

७ एका बाजूला शास्त्रवचने अगदी स्पष्टपणे “स्वतःला जगापासून निष्कलंक” ठेवण्याचा सल्ला आपल्याला देतात. (याकोब १:२७; ४:४) बायबलमध्ये येथे आणि इतर अनेक ठिकाणी वापरण्यात आलेली ‘जग’ ही संज्ञा, खऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या व्यतिरिक्‍त असलेल्या मानवसमूहाला चित्रित करते. अशा मानवी समाजात आपण राहतो; नोकरीच्या ठिकाणी, शाळेत, शेजारी आपला त्यांच्याशी संपर्क येतो. (योहान १७:११, १५; १ करिंथकर ५:९, १०) तरीसुद्धा, देवाच्या धार्मिक मार्गांच्या विरोधात असलेली मनोवृत्ती, बोलणे आणि आचरण टाळण्याद्वारे आपण स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवत असतो. या जगाबरोबर खासकरून, यहोवाच्या दर्जांचा पूर्ण निरादर करणाऱ्‍यांबरोबर जवळीक ठेवण्यात कोणता धोका आहे हेही आपण ओळखणे महत्त्वाचे आहे.—नीतिसूत्रे १३:२०.

८. जगापासून स्वतःला निष्कलंक ठेवण्याबाबतचा सल्ला आपल्याला इतरांकडे तुच्छतेने पाहण्यासाठी कसलाही आधार का पुरवत नाही?

८ परंतु, जगापासून निष्कलंक राहण्याविषयीचा सल्ला आपल्याला, यहोवाचे साक्षीदार नसलेल्यांना ठामपणे तुच्छ लेखण्याकरता कोणताही आधार देत नाही. (नीतिसूत्रे ८:१३) मागील लेखात चर्चा केलेल्या यहुदी धार्मिक नेत्यांच्या उदाहरणाची आठवण करा. त्यांनी निर्माण केलेल्या धर्माने यहोवा संतुष्ट झाला नाही किंवा यामुळे गैर-यहुदी लोकांबरोबरचे त्यांचे संबंधही चांगले बनले नाहीत. (मत्तय २१:४३, ४५) आपण फार श्रेष्ठ आहोत असे स्वतःबद्दल समजल्यामुळे या धर्मवेड्यांनी विदेशी लोकांना तुच्छ लेखले. आपण अशाप्रकारचा संकुचित दृष्टिकोन बाळगत नाही; गैर-साक्षीदारांना तुच्छ लेखत नाही. बायबलमधील सत्याचा संदेश ऐकणाऱ्‍या सर्वांना देवाची मर्जी प्राप्त व्हावी अशी प्रेषित पौलाप्रमाणे आपली मनीषा आहे.—प्रेषितांची कृत्ये २६:२९; १ तीमथ्य २:३, ४.

९. संतुलित, शास्त्रवचनीय दृष्टिकोनाचा परिणाम, आपल्या विश्‍वासाशी सहमत नसलेल्यांबरोबर आपण ज्याप्रकारे बोलतो त्यावर कसा झाला पाहिजे?

९ संतुलित, शास्त्रवचनीय दृष्टिकोनाचा परिणाम, गैर-साक्षीदारांबरोबर आपण ज्याप्रकारे बोलतो त्यावर झाला पाहिजे. पौलाने क्रीट बेटावरील ख्रिश्‍चनांना, “कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता सौम्य, व सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे,” अशी आठवण करून देण्यास तीतास सांगितले. (तीत ३:२) येथे लक्ष द्या, की ख्रिश्‍चनांनी ‘कोणाचीही’—क्रीटवरील गैर-ख्रिश्‍चनांचीसुद्धा निंदा करायची नव्हती; त्यांच्यात काहीजण लबाड, खादाड आणि आळशी होते. (तीत १:१२) तेव्हा, आपल्या विश्‍वासाशी सहमत नसलेल्यांचा उल्लेख करताना त्यांच्याबद्दल उपहासपूर्ण शब्द वापरणे अशास्त्रवचनीय ठरेल. श्रेष्ठत्वाची मनोवृत्ती इतरांना यहोवाच्या उपासनेकडे आकर्षित करणार नाही. उलट, यहोवाच्या वचनातील रास्त तत्त्वांनुसार आपण इतरांना लेखतो आणि वागतो तेव्हा आपण “देव ह्‍याच्या शिक्षणास शोभा” आणतो.—तीत २:१०.

केव्हा शांत राहायचे आणि केव्हा बोलायचे

१०, ११. येशूने “मौन धरण्याचा समय” कोणता आणि (ब) “बोलण्याचा समय” कोणता हे माहीत असल्याचे कसे प्रदर्शित  केले?

१० उपदेशक ३:७ म्हणते: “मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो.” आता येथे एक समस्या येते: विरोधकांकडे केव्हा दुर्लक्ष करायचे आणि आपल्या विश्‍वासाचे समर्थन केव्हा करायचे हे ठरवणे. विचार करण्यात नेहमी परिपूर्ण असलेल्या व्यक्‍तीच्या अर्थात येशूच्या उदाहरणातून आपण पुष्कळ काही शिकू शकतो. (१ पेत्र २:२१) “मौन धरण्याचा समय” कोणता हे त्याला माहीत होते. उदाहरणार्थ, प्रमुख याजकांनी आणि इतर वडिलांनी पिलातापुढे त्याच्यावर खोटा आरोप केला तेव्हा येशूने “काहीच उत्तर दिले नाही.” (मत्तय २७:११-१४) त्याच्याबाबतीत देवाची जी इच्छा पूर्ण व्हायची होती त्यात अडथळा येईल असे काहीही तो बोलू इच्छित नव्हता. उलट आपल्या कार्याद्वारे त्याने त्यांना उत्तर दिले. त्याला माहीत होते की सत्यामुळेसुद्धा त्यांच्या गर्विष्ठ मनाचे आणि अंतःकरणाचे परिवर्तन होऊ शकणार नव्हते. यास्तव त्याने त्यांच्या आरोपाकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या हेतुपूर्ण मौनतेचा भंग केला नाही.—यशया ५३:७.

११ परंतु, येशूला “बोलण्याचा समय” कोणता हेही माहीत होते. एके प्रसंगी, त्याने आपल्या टिकाकारांशी सडेतोड आणि उघडपणे युक्‍तीवाद केला; त्यांच्या खोट्या आरोपांचे खंडन केले. जसे की, येशू बालजबूलच्या साहाय्याने भूते काढतो असा त्याच्यावर आरोप लावून शास्त्री आणि परुशांनी लोकसमूहासमोर त्याच्यावर कलंक लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने हे खोटे आरोप निमूटपणे ऐकून घेतले नाहीत. जबरदस्त तर्काद्वारे आणि शक्‍तिशाली उदाहरणाद्वारे त्याने त्यांची लबाडी त्यांच्यावरच उलटवली. (मार्क ३:२०-३०; तसेच मत्तय १५:१-११; २२:१७-२१; योहान १८:३७ देखील पाहा.) तसेच, येशूचा विश्‍वासघात करून त्याला अटक करून न्यायसभेपुढे हजर करण्यात आले तेव्हा महायाजक कैफा याने धूर्तपणे अशी मागणी केली: “मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो, तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हास सांग.” हासुद्धा “बोलण्याचा समय” होता कारण आता जर त्याने मौन धरले असते तर त्यावरून तो ख्रिस्त असल्याचे नाकारत आहे असे वाटले असते. म्हणून येशूने उत्तर दिले: “मी आहे.”—मत्तय २६:६३, ६४; मार्क १४:६१, ६२.

१२. कोणत्या परिस्थितीमुळे पौल आणि बर्णबा इकुन्यात धैर्याने बोलण्यास प्रवृत्त झाले?

१२ पौल आणि बर्णबाच्या उदाहरणाचा देखील विचार करा. प्रेषितांची कृत्ये १४:१, २ म्हणते: “इकुन्यात यहूदी लोकांच्या सभास्थानात ते दोघे मिळून गेले आणि अशा रीतीने बोलले, की यहूदी व हेल्लेणी ह्‍यांच्या मोठ्या लोकसमुदायाने विश्‍वास ठेवला; परंतु विरोधी यहूद्यांनी परराष्ट्रीयांचे मन बंधुजनांविरुद्ध चेतवून कलुषित केले.” पंडिता रमाबाई भाषांतरात असे म्हटले आहे: “परंतु जे यहुदी अविश्‍वासी होते त्यांनी राष्ट्रांच्या लोकांची मने भावांविरुद्ध चेतवून बिघडविली.” स्वतः संदेश नाकारून ते शांत बसले नाहीत तर, ख्रिश्‍चनांवर काळीमा फासण्याची मोहीमच त्यांनी हाती घेतली; विदेशी लोकांची मने ख्रिश्‍चनांविरुद्ध कलुषित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.a म्हणजे त्यांना ख्रिस्ती धर्माविषयी किती द्वेष होता! (पडताळा प्रेषितांची कृत्ये १०:२८.) हा समय, पौल आणि बर्णबा यांना, या जाहीर निंदेमुळे नवीन शिष्यगण निराश होऊ नये म्हणून “बोलण्याचा समय” आहे असे वाटले. यास्तव, अद्‌भुत कृत्ये दाखवण्याकरता त्यांना साहाय्य करण्याद्वारे आपली स्वीकृती दाखवणाऱ्‍या ‘प्रभूविषयी निर्भीडपणे बोलत [पौल आणि बर्णबा] बरेच दिवस तेथे राहिले.’ याचा परिणाम असा झाला की काहींनी “यहूद्यांची बाजू धरली तर कित्येकांनी प्रेषितांची बाजू धरली.”—प्रेषितांची कृत्ये १४:३, ४.

१३. निंदा होते तेव्हा, “मौन धरण्याचा समय” कोणता असू शकतो?

१३ आपली निंदा होते तेव्हा मग आपण कशी प्रतिक्रिया दाखवली पाहिजे? हे सर्व परिस्थितीवर अवलंबून आहे. काही परिस्थितीत आपल्याला “मौन धरण्याचा समय” हे तत्त्व लागू करावे लागेल. खासकरून तेव्हा, जेव्हा निग्रही विरोधक निरर्थक वादविवादात आपल्याला गोवण्याचा प्रयत्न करीत असतात. काही लोकांना सत्य जाणून घ्यायची इच्छा नसते हे आपण विसरता कामा नये. (२ थेस्सलनीकाकर २:९-१२) अविश्‍वास दाखवण्यावर अडून राहिलेल्यांशी तर्क करण्याचा प्रयत्न करणे निष्फळ आहे. एवढेच नव्हे तर, आपल्यावर हल्ला करणाऱ्‍या प्रत्येक खोट्या आरोपकाशी आपण वाद घालण्यात वेळ घालवला तर आपण सर्वात महत्त्वपूर्ण आणि प्रतिफळदायी कार्यापासून अर्थात बायबल सत्य शिकून घेण्याची मनापासून इच्छा असलेल्या प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना मदत करण्याच्या कार्यापासून कुठे दुसरीकडेच भरकटत जाऊ शकतो. तेव्हा, आपल्याविषयीच्या खोट्या बातम्या पसरवण्याचा चंग बांधलेल्या विरोधकांना तोंड देण्याचा प्रसंग येतो तेव्हा ईश्‍वरप्रेरित सल्ला आहे: “त्यांच्यापासून दूर व्हा.”—रोमकर १६:१७, १८; मत्तय ७:६.

१४. कोणत्या मार्गांनी आपण इतरांसमोर आपल्या विश्‍वासाचे समर्थन करू शकतो?

१४ अर्थातच याचा असा अर्थ होत नाही की आपण आपल्या विश्‍वासाचे समर्थन करायचे नाही. कारण, “बोलण्याचा समय” देखील आहे. आपल्याला त्या प्रांजळ लोकांची उचित चिंता आहे ज्यांच्यापुढे आपली बदनामी करण्यात आली आहे. इतरांना आपल्या प्रामाणिक विश्‍वासाचे स्पष्टीकरण देण्याकरता आपण तयार आहोत आणि संधी मिळाल्यास आपल्याला आनंद वाटतो. पेत्राने लिहिले: “ख्रिस्ताला प्रभु म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना; आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्‍या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा; तरी ते सौम्यतेने व भीडस्तपणाने द्या.” (१ पेत्र ३:१५) प्रांजळ आस्थेवाईक लोक जेव्हा, आपल्याला आवडणाऱ्‍या विश्‍वासांचा पुरावा विचारतात तसेच विरोधकांनी आपल्यावर लावलेल्या खोट्या आरोपांविषयी विचारतात तेव्हा आपल्या विश्‍वासाचे समर्थन करण्याची, बायबलमधून रास्त उत्तरे देण्याची आपली जबाबदारी आहे. याशिवाय, आपले उत्तम आचरण एक जबरदस्त साक्ष ठरू शकते. खुल्या मनाचे लोक जेव्हा पाहतात की आपण देवाच्या धार्मिक दर्जांनुसार जगण्याचा प्रयत्न करीत आहोत तेव्हा त्यांना लागलीच दिसेल की आपल्याविरुद्ध केलेले आरोप खोटे आहेत.—१ पेत्र २:१२-१५.

निंदनीय वार्ता दिली जाते तेव्हा काय?

१५. यहोवाचे साक्षीदार प्रसारमाध्यमातील विपर्यस्त माहितीचे शिकार बनले आहेत याचे एक कोणते उदाहरण आहे?

१५ काही वेळा, यहोवाचे साक्षीदार प्रसारमाध्यमात विपर्यस्त माहितीचे लक्ष्य बनले आहेत. जसे की, ऑगस्ट १, १९९७ रोजी, एका रशियन पेपरने एक निंदात्मक लेख छापला; इतर गोष्टींपैकी त्यात असा दावा केला होता, की साक्षीदार अशी ठामपणे अपेक्षा करतात, की ज्या कौटुंबिक सदस्यांना साक्षीदारांचा ‘विश्‍वास समजत नाही व त्याजशी एकमत होत नाहीत अशा पत्नींशी, पतींशी आणि पालकांशी त्यांनी सरळ नाते तोडून टाकावे.’ यहोवाच्या साक्षीदारांशी चांगल्याप्रकारे परिचित असलेल्यांना माहीत आहे की हा आरोप खोटा आहे. ख्रिश्‍चनांनी सत्यात नसलेल्या त्यांच्या कौटुंबिक सदस्यांना प्रेमाने व आदराने वागवले पाहिजे असे बायबल सूचवते आणि साक्षीदार या मार्गदर्शनानुसार चालण्याचा प्रयत्न करतात. (१ करिंथकर ७:१२-१६; १ पेत्र ३:१-४) पण तो लेख छापण्यात आला आणि पुष्कळ वाचकांना चुकीची माहिती मिळाली. आपली निंदा होते तेव्हा आपण आपल्या विश्‍वासाचे समर्थन कसे करू शकतो?

१६, १७, आणि पृष्ठ १६ वरील चौकोन. (अ) प्रसारमाध्यमातील खोट्या माहितीला प्रतिक्रिया करण्याविषयी एकदा टेहळणी बुरुज नियतकालिकात काय म्हटले होते? (ब) कोणत्या परिस्थितींत यहोवाचे साक्षीदार प्रसारमाध्यमातील नकारात्मक रिपोट्‌र्सना प्रतिक्रिया दाखवू शकतात?

१६ येथेही “मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय” आहे. टेहळणी बुरुज नियतकालिकात एकदा असे म्हटले होते: “प्रसारमाध्यमाच्या चुकीच्या माहितीकडे आपण दुर्लक्ष करावे किंवा योग्य मार्गाने सत्याचे समर्थन करावे, हे पूर्णपणे परिस्थितींवर, टीका करणाऱ्‍या टीकाकारावर आणि त्याच्या उद्देशावर अवलंबून असते.” काही बाबतीत, नकारात्मक रिपोर्टकडे दुर्लक्ष केलेलेच बरे, म्हणजे लबाड्यांना जास्त प्रसिद्धी मिळणार नाही.

१७ इतर बाबतीत, तो “बोलण्याचा समय” असू शकतो. एखाद्या विश्‍वसनीय पत्रकाराला किंवा वार्ताहाराला यहोवाच्या साक्षीदारांची चुकीची माहिती मिळाली असावी व आपल्याविषयीची खरी माहिती जाणून घ्यायला त्याला आवडेल. (“खोटे वृत्त दुरुस्त करणे” चौकोन पाहा.) प्रसार माध्यमात आपल्याविषयीच्या नकारात्मक रिपोर्टमुळे लोकांची मने कलुषित झाली असतील ज्यामुळे आपल्या प्रचाराच्या कार्यात अडथळा येत असेल तर वॉच टावर संस्थेच्या शाखा कार्यालयाचे प्रतिनिधी सोयीस्कर माध्यमाद्वारे सत्याचे समर्थन करण्याकरता पुढाकार घेऊ शकतात.b जसे की, योग्यताप्राप्त वडिलांना एखाद्या टीव्ही कार्यक्रमाद्वारे वस्तुस्थिती सादर करण्याकरता नेमले जाऊ शकते; असे न केल्यास कदाचित हे सूचित होऊ शकते, की यहोवाच्या साक्षीदारांकडे उत्तर नाही. अशाबाबतीत प्रत्येक साक्षीदार वॉच टावर संस्थेच्या मार्गदर्शनाला आणि संस्थेच्या प्रतिनिधींना सुज्ञपणे सहकार्य करतो.—इब्री लोकांस १३:१७.

कायदेशीररीत्या सुवार्तेचे समर्थन करणे

१८. (अ) प्रचार करण्याकरता आपल्याला मानवी सरकारांच्या परवानगीची आवश्‍यकता का नाही? (ब) आपल्याला प्रचाराची परवानगी मिळत नाही तेव्हा आपण काय करतो?

१८ आपल्याला देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याची अधिकृत परवानगी स्वर्गातून येते. ज्याने आपल्याला ही कामगिरी करण्याची आज्ञा दिली आहे त्या येशूला “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार” देण्यात आला आहे. (मत्तय २८:१८-२०; फिलिप्पैकर २:९-११) यास्तव प्रचार करण्याकरता आपल्याला मानवी सरकारांच्या परवानगीची गरज नाही. तरीपण, आपण हे जाणतो की राज्य संदेशाच्या प्रचाराला धार्मिक स्वातंत्र्य उपयुक्‍त आहे. ज्या देशात आपल्याला उपासना करण्याचे स्वातंत्र्य आहे तेथे तिचे संरक्षण करण्याकरता आपण कायदेशीर व्यवस्थेचा उपयोग करू. ज्या देशात स्वातंत्र्य देण्यास नकार मिळाला आहे तेथे कायद्याच्या चौकटीत राहून आपण ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करू. आपला हेतू, सामाजिक सुधारणा करणे नव्हे तर ‘सुवार्तेचे प्रत्त्युत्तर व समर्थन’ करणे हा आहे.c—फिलिप्पैकर १:७.

१९. (अ) “देवाचे ते देवाला” देण्याचा परिणाम काय होऊ शकतो? (ब) आपला काय करण्याचा दृढ निश्‍चय आहे?

१९ यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपण यहोवा विश्‍वाचा सार्वभौम राजा आहे हे कबूल करतो. त्याचे नियम श्रेष्ठ आहेत. आपण विचारपूर्वक मानव सरकारांच्या आज्ञेत राहतो व अशाप्रकारे “कैसराचे ते कैसराला” देतो. परंतु, सर्वात महत्त्वपूर्ण असलेली जबाबदारी अर्थात “देवाचे ते देवाला” देण्याची जबाबदारी पूर्ण करताना मात्र आपण इतर कोणतीही गोष्ट आड येऊ देत नाही. (मत्तय २२:२१) असे केल्याने राष्ट्रे आपला “द्वेष” करतील हे आपल्याला चांगल्याप्रकारे माहीत आहे तरीही, हा शिष्यत्वाच्या किंमतीचा एक भाग म्हणून आपण त्याचा स्वीकार करतो. २० व्या शतकातील यहोवाच्या साक्षीदारांचे कायदेशीर रेकॉर्ड, आपल्या विश्‍वासाचे समर्थन करण्याच्या आपल्या दृढनिश्‍चयाची साक्ष आहे. यहोवाचे साहाय्य व पाठींबा यांच्याद्वारे आपण ‘अविरतपणे सुवार्तेचे शिक्षण व घोषणा’ करीत राहू.—प्रेषितांची कृत्ये ५:४२.

[तळटीपा]

a मॅथ्यू हेन्रीज कॉमेंट्री ऑन द होल बायबल स्पष्टीकरण देते, की यहुदी विरोधक, “थोडीफार ओळख असलेल्या अशांकडे [विदेशी लोकांकडे] मुद्दामहून गेले व त्यांना जितक्या दुष्ट चहाड्या सुचत गेल्या त्या सर्व त्यांना सांगत राहिले आणि ख्रिस्ती धर्माविषयी त्यांच्या मनात विष कालवले.”

b रशिनय वर्तमानपत्रात छापलेल्या त्या निंदात्मक लेखानंतर (परिच्छेद १५ मध्ये ज्याचा उल्लेख आहे), लेखामध्ये छापण्यात आलेल्या खोट्या आरोपांची उजळणी करावी म्हणून यहोवाच्या साक्षीदारांनी रशियन फेडरेशनच्या प्रेसिडेन्शियल ज्युडिशियल चेंबर फॉर इन्फर्मेशनल डिसप्युट्‌सला विनंतीवजा अपील केले. अलीकडेच कोर्टाने बदनामीकारक लेख छापल्याबद्दल बातमीपत्राची चांगलीच खरडपट्टी काढली.—सावध राहा! (इंग्रजी) नोव्हेंबर २२, १९९८, पृष्ठे २६-७ पाहा.

c पृष्ठ १९-२२ वरील “सुवार्तेचा कायदेशीररीत्या बचाव करणे” लेख पाहा.

तुम्हाला आठवते का

◻ यहोवाच्या साक्षीदारांचा “द्वेष” का केला जातो?

◻ आपल्या धार्मिक विश्‍वासांशी सहमत नसलेल्यांबद्दल आपण कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे?

◻ विरोधकांशी व्यवहार करताना येशूने कोणते संतुलित उदाहरण घालून दिले?

◻ आपली निंदा होते तेव्हा, “मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय” असतो हे तत्त्व आपण कसे लागू करू शकतो?

[१६ पानांवरील चौकट]

“खोटे वृत्त दुरुस्त करणे”

“बोलिव्हियाच्या याक्वीब शहरात, स्थानिक सुवार्तिकांच्या एका गटाने, धर्मत्यागींनी निर्माण केलेला एक चित्रपट दाखवण्याकरता एका टीव्ही स्टेशनची व्यवस्था केली. त्या कार्यक्रमाच्या वाईट परिणामांना पाहता वडिलांनी, दोन टीव्ही स्टेशन्सना भेट दिली व पैसे देऊन जेहोवाज विटनेसस—द ऑर्गनायझेशन बिहाईन्ड द नेम आणि द बायबल—अ बुक ऑफ फॅक्ट ॲण्ड प्रॉफसी हे इंग्रजीतील दोन व्हिडिओ दाखवावेत अशी त्यांना विनंती केली. संस्थेचे व्हिडिओ पाहिल्यावर रेडिओ स्टेशनच्या एका मालकाला, धर्मत्यागींच्या कार्यक्रमांत केलेल्या बदनामीचा खूप राग आला आणि त्याने यहोवाच्या साक्षीदारांच्यावतीने त्यांच्या येणाऱ्‍या प्रांतीय अधिवेशनाची घोषणा मोफत प्रसारित केली. अधिवेशनाची उपस्थिती असामान्यपणे जास्त होती आणि पुष्कळ प्रामाणिक अंतःकरणाचे लोक, साक्षीदार जेव्हा सेवेत त्यांच्या घरी जात होते तेव्हा प्रांजळ प्रश्‍ने विचारू लागले.”—१९९७ इयरबुक ऑफ जेहोवाज विटनेसस, पृष्ठे ६१-२.

[१७ पानांवरील चित्र]

एके प्रसंगी, येशूने त्याची टीका करणाऱ्‍यांच्या खोट्या आरोपांचे उघडपणे खंडन केले

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा