वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 १२/१ पृ. ८-१३
  • त्यांच्या विश्‍वासामुळे द्वेषित

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • त्यांच्या विश्‍वासामुळे द्वेषित
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • शिष्यत्वाची ‘किंमत’
  • द्वेष्य आणि द्वेषित
  • प्रारंभिक ख्रिश्‍चनांचा कोणाकडून द्वेष झाला?
  • आरंभीच्या ख्रिश्‍चनांचा रोमी जगात द्वेष का?
  • ख्रिस्तीजन आणि आजचा मानवी समाज
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • आपल्या विश्‍वासाचे समर्थन करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • सुरवातीचे ख्रिस्ती आणि मोशेचे नियमशास्त्र
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • प्रारंभिक ख्रिस्ती विश्‍वास व सरकार
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 १२/१ पृ. ८-१३

त्यांच्या विश्‍वासामुळे द्वेषित

“माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करितील.”—मत्तय १०:२२.

१, २. आपले धार्मिक विश्‍वास आचरल्याबद्दल यहोवाच्या साक्षीदारांना सहन करावे लागलेले काही सत्य अनुभव तुम्ही कथन करू शकाल का?

क्रीट द्वीपावरील एका प्रामाणिक दुकानदाराला अनेक वेळा अटक करण्यात आली व अनेक वेळा ग्रीक कोर्टासमोर हजर राहावे लागले. आपली पत्नी आणि पाच मुलांपासून दूर त्याला एकूण सहा वर्षांहून जास्त तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. जपानमध्ये, सुवर्तनी व ४२ विद्यार्थी असलेल्या वर्गात नेहमी पहिला येणाऱ्‍या १७ वर्षीय विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. फ्रान्समध्ये, कष्टाळू व प्रामाणिक म्हणून नावाजलेले असतानाही अनेकांना त्यांच्या नोकरीवरून ताडकन काढण्यात आले. या सर्व वास्तविक घडलेल्या घटनांत कोणती समानता आहे?

२ या घटनांतील सर्वजण यहोवाचे साक्षीदार आहेत. त्यांचा गुन्हा? खरे कारण म्हणजे ते आपले धार्मिक विश्‍वास आचरतात. येशू ख्रिस्ताने दिलेल्या शिकवणीचे पालन करणारा तो दुकानदार इतरांना आपला बायबल विश्‍वास सांगत होता. (मत्तय २८:१९, २०) धर्मांतराला अपराध समजणाऱ्‍या गतकालीन ग्रीक कायद्याखाली त्याला दोषी ठरवण्यात आले होते. त्या विद्यार्थ्याचा बायबल प्रशिक्षित विवेक त्याला सक्‍तीच्या केन्डो कवाईतींमध्ये (जपानी तलवारबाजी) भाग घेण्यास अनुमती देत नव्हता म्हणून त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. (यशया २:४) आणि फ्रान्समधील त्या लोकांना सांगण्यात आले, की त्यांनी स्वतःची ओळख यहोवाचे साक्षीदार अशी करून दिली असल्यामुळे त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते.

३. यहोवाच्या बहुतेक साक्षीदारांचा क्वचितच सहमानवांकडून छळ होतो असे का?

३ अशाप्रकारचे कटू अनुभव काही देशातील यहोवाच्या साक्षीदारांना अलीकडेच आलेल्या विशिष्ट अनुभवांपैकी आहेत. परंतु, यहोवाच्या बहुतेक साक्षीदारांनी सहमानवांकडून त्यामानाने खूप कमी सहन केले आहे. यहोवाचे लोक त्यांच्या उत्तम आचरणासाठी संपूर्ण जगभरात नावाजलेले आहेत—या नावलौकिकामुळे त्यांना इजा पोहंचवण्याकरता कोणालाही सबळ कारण मिळत नाही. (१ पेत्र २:११, १२) ते कारस्थाने रचत नाहीत किंवा हानीकारक कार्यात भाग घेत नाहीत. (१ पेत्र ४:१५) उलट, प्रथम देवाच्या आणि मग लौकिक सरकारांच्या आज्ञेत राहा, या बायबलच्या सल्ल्यानुसार ते आपले जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. कायद्यानुसार ते कर भरतात आणि ‘सर्वांबरोबर शांतीने राहण्याचा’ प्रयत्न करतात. (रोमकर १२:१८; १३:६, ७; १ पेत्र २:१३-१७) बायबलच्या शैक्षणिक कार्यात, कायदा, कौटुंबिक मूल्ये आणि नैतिकता यांचा आदर करण्याचे ते उत्तेजन देतात. विधिचारी नागरिक असल्यामुळे पुष्कळ सरकारांनी त्यांची प्रशंसा केली आहे. (रोमकर १३:३) तरीसुद्धा, सुरवातीच्या परिच्छेदात सांगितल्याप्रमाणे, वेळोवेळी ते छळाला बळी पडले आहेत—आणि काही देशात तर त्यांच्यावर सरकारी बंदी देखील आहे. यामुळे आपल्याला आश्‍चर्य वाटावे का?

शिष्यत्वाची ‘किंमत’

४. येशूनुसार, त्याचा शिष्य झाल्यावर एखाद्याने कशाची अपेक्षा केली पाहिजे?

४ येशू ख्रिस्ताचा शिष्य होण्यात कशाचा समावेश होतो हे त्याने चांगल्याप्रकारे स्पष्ट केले. त्याने आपल्या अनुयायांना सांगितले, दास धन्यापेक्षा मोठा नाही. . . . ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याहि पाठीस लागतील. येशूचा विनाकारण द्वेष करण्यात आला होता. (योहान १५:१८-२०, २५; स्तोत्र ६९:४; लूक २३:२२) त्याच्या शिष्यांनाही याचीच अपेक्षा होती—वाजवी आधाराविना विरोध. अनेक वेळा त्याने त्यांना ताकीद दिली: तुमचा द्वेष केला जाईल.—मत्तय १०:२२; २४:९.

५, ६. (अ) कोणत्या कारणास्तव येशूने भावी अनुयायांना ‘किंमत मोजण्यास’ आर्जवले? (ब) मग, आपला विरोध होतो तेव्हा आपण गोंधळून जाण्याची काही गरज का नाही?

५ म्हणूनच येशूने आपल्या भावी अनुयायांना शिष्यत्वाची ‘किंमत मोजण्यास’ आर्जवले. (लूक १४:२८) का बरे? त्याचे अनुयायी व्हायचे की नाही हे ठरवण्यासाठी नव्हे, तर अनुयायी होण्यात ज्याचा समावेश होतो ते पूर्ण करण्याचा निश्‍चय करण्याकरता. या विशेषाधिकाराबरोबर येणाऱ्‍या कोणत्याही प्रकारच्या परीक्षा किंवा हालअपेष्टा सहन करण्याची आपली तयारी असली पाहिजे. (लूक १४:२७) ख्रिस्ताचा अनुयायी या नात्याने यहोवाची सेवा करण्यास आपल्याला कोणी बळजबरी करीत नाही. हा स्वैच्छिक निर्णय आहे; हा माहितीपूर्वक निर्णय देखील आहे. आपल्याला हे आधीपासूनच माहीत आहे, की देवाबरोबरच्या समर्पित नातेसंबंधात प्रवेश केल्यानंतर मिळणाऱ्‍या आशीर्वादांबरोबर आपला द्वेष देखील केला जाईल. यास्तव, आपला विरोध होतो तेव्हा आपण गोंधळून जात नाही. आपण ‘किंमत मोजली’ आहे व ती भरण्यास आपण पूर्णपणे तयार आहोत.—१ पेत्र ४:१२-१४.

६ सरकारी अधिकारी आणि काही लोक खऱ्‍या ख्रिश्‍चनांचा विरोध का करतात बरे? सा.यु. पहिल्या शतकातील दोन धार्मिक गटांचे परीक्षण केल्यावर आपल्याला याचे उत्तर मिळेल. दोन्ही गटांचा द्वेष करण्यात आला—परंतु अगदी वेगवेगळ्या कारणांसाठी.

द्वेष्य आणि द्वेषित

७, ८. कोणत्या शिकवणींवरून विदेशी लोकांबद्दलचा द्वेष दिसून आला व यामुळे यहुद्यांमध्ये कोणती मनोवृत्ती निर्माण झाली?

७ सा.यु. पहिल्या शतकापर्यंत, इस्राएल रोमी शासनाखाली होते व यहुदीवाद अर्थात यहुदी धार्मिक व्यवस्था एकंदरीतच परुशी व शास्त्री यांसारख्या जुलमी नेत्यांच्या मुठीत होती. (मत्तय २३:२-४) या धर्मवेड्या नेत्यांनी, राष्ट्रांपासून वेगळे राहण्यासंबंधी असलेल्या मोशेच्या नियमशास्त्रातील नियमांना अशाप्रकारे वळवले जेणेकरून ते गैर-यहुद्यांना तुच्छ मानू शकतील. अशातच त्यांनी एक असा धर्म निर्माण केला ज्याने विदेशांचा द्वेष केला; परिणामतः, विदेशी लोकही त्यांचा द्वेष करू लागले.

८ लोकांमध्ये विदेशांबद्दल तिटकारा उत्पन्‍न करायला यहुदी नेत्यांना अवघड गेले नाही कारण त्या काळचे यहुदी लोक विदेशी लोकांना अधम समजत असत. धार्मिक नेत्यांनी अशा शिकवणी दिल्या, की एखाद्या यहुदी स्त्रीने केव्हाही विदेशांबरोबर एकटे राहू नये कारण ते संशयित कामुक लोक आहेत. एखाद्या यहुदी मनुष्याने विदेशी लोकांबरोबर एकटं राहू नये कारण ते रक्‍तपात करतात असा त्यांच्यावर संशय आहे. एखाद्या विदेशी माणसाने यहुदी माणसासमोर धार काढलेलेच दूध वापरता येऊ शकत होते. त्यांच्या नेत्यांच्या प्रभावामुळे यहुदी इतरांपासून अलिप्त राहू लागले आणि अगदीच मर्यादित झाले.—पडताळा योहान ४:९.

९. गैर-यहुदी लोकांविषयी यहुदी नेते देत असलेल्या शिकवणीचा परिणाम काय झाला?

९ गैर यहुदी लोकांबद्दलच्या अशा शिकवणींमुळे यहुदी लोक आणि विदेशी लोक यांच्यातील संबंध काही चांगले राहिले नाहीत. यहुदी लोक माणूसघाणी आहेत असे विदेशी लोकांचे मत झाले. रोमी इतिहासकार टॅसिटस (सा.यु. ५६ च्या सुमारास जन्म झालेला) यहुद्यांविषयी म्हणाला: ते इतर सर्व लोकांचा शत्रूंसारखाच द्वेष करतात. टॅसिटसने असाही दावा केला, की यहुदी मतानुसारी झालेल्या विदेशी लोकांना शिकवण्यात येई, की त्यांनी त्यांच्या देशाचा त्याग करावा आणि आपले कुटुंब व मित्र यांच्याबद्दल काहीच आदर बाळगू नये. सामान्यपणे, रोमनांनी यहुद्यांना खपून घेतले कारण रोमनांपेक्षा त्यांची संख्या जास्त होती. पण सा.यु. ६६ मध्ये उसळलेल्या एका यहुदी बंडाने कठोर रोमनांना बदला घेण्यास चेतवले ज्यामुळे सा.यु. ७० मध्ये जेरुसलेमचा नाश करण्यात आला.

१०, ११. (अ) मोशेच्या नियमशास्त्रानुसार विदेशी लोकांबरोबर कशाप्रकारे वागण्याची आवश्‍यकता होती? (ब) यहुदीवादाबाबतीत जे झाले त्यातून आपण कोणता धडा शिकू शकतो?

१० विदेशी लोकांबद्दलचा तो दृष्टिकोन आणि मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलेला उपासनेचा प्रकार यांची तुलना केल्यावर आपल्याला काय दिसून येते? राष्ट्रांपासून अलिप्त राहण्याविषयी नियमशास्त्रात प्रोत्साहन दिले होते हे खरे; पण ते इस्राएल लोकांच्या संरक्षणाकरता, खासकरून त्यांच्या शुद्ध उपासनेचे संरक्षण करण्याकरता होते. (यहोशवा २३:६-८) तरीपण, विदेशी लोकांशी न्यायाने व रास्त वागावे; जोपर्यंत ते इस्राएलच्या नियमांची बेधडक अवज्ञा करीत नाहीत तोपर्यंत तरी त्यांचा पाहुणचार करावा असे नियमशास्त्रात सांगितले होते. (लेवीय २४:२२) नियमशास्त्रात स्पष्ट दिलेल्या विदेशी लोकांसंबंधीच्या वाजवी अर्थापासून दूर जाऊन येशूच्या दिवसातील यहुदी धार्मिक नेत्यांनी उपासनेचा असा एक नवीन प्रकार चालू केला ज्याने विदेशी लोकांबद्दल द्वेष निर्माण केला आणि त्यांच्याकडून द्वेष ओढवून घेतला. परिणामतः, पहिल्या शतकातील यहुदी राष्ट्र यहोवाच्या मर्जीतूनच उतरले.—मत्तय २३:३८.

११ यात आपल्यासाठी धडा आहे का? होय आहे! आपले धार्मिक विश्‍वास न पाळणाऱ्‍या लोकांकडे तुच्छतेने पाहण्याची अतिधार्मिक व श्रेष्ठपणाची मनोवृत्ती यहोवाच्या शुद्ध उपासनेचे योग्य प्रतिनिधीत्व करत नाही आणि त्याला संतुष्टही करीत नाही. पहिल्या शतकातील विश्‍वासू ख्रिश्‍चनांचा विचार करा. त्यांनी गैर-ख्रिश्‍चनांचा द्वेष केला नाही किंवा रोमविरुद्ध बंड पुकारले नाही. तरीसुद्धा त्यांचा द्वेष करण्यात आला. का बरे? आणि कोणी केला?

प्रारंभिक ख्रिश्‍चनांचा कोणाकडून द्वेष झाला?

१२. आपल्या अनुयायांनी गैर-ख्रिश्‍चनांबद्दल संतुलित दृष्टिकोन बाळगला पाहिजे ही येशूची इच्छा शास्त्रवचनांतून कशी स्पष्ट होते?

१२ येशूच्या शिकवणींवरून हे स्पष्ट होते, की आपल्या शिष्यांनी गैर-ख्रिश्‍चनांबद्दल संतुलित दृष्टिकोन बाळगावा असे त्याला वाटत होते. एकीकडे तो म्हणत होता, की आपले अनुयायी जगापासून वेगळे राहतील, म्हणजे यहोवाच्या धार्मिक मार्गांच्या विरोधात असलेली मनोवृत्ती आणि आचरण यांचा ते धिक्कार करतील. युद्ध आणि राजकारण याबाबतीतही ते तटस्थ राहतील. (योहान १७:१४, १६) आणि दुसरीकडे, गैर-ख्रिश्‍चनांचा तिटकारा करण्याला समर्थन देण्याऐवजी येशूने आपल्या अनुयायांना आपल्या वैऱ्‍यांवर प्रीति करा असे सांगितले. (मत्तय ५:४४) प्रेषित पौलाने ख्रिश्‍चनांना आर्जवले: तुझा शत्रु भुकेला असल्यास त्याला खावयाला दे; तान्हेला असल्यास त्याला प्यावयाला दे. (रोमकर १२:२०) त्याने ख्रिश्‍चनांना ‘सर्वांचे बरे करण्यासही’ सांगितले.—गलतीकर ६:१०.

१३. यहुदी धार्मिक नेते ख्रिस्ताच्या शिष्यांचा इतका विरोध का करीत होते?

१३ तरीपण, काही काळातच ख्रिस्ताच्या शिष्यांचा तीन स्रोतांकडून द्वेष होऊ लागला. पहिला स्रोत, यहुदी धार्मिक नेते. ख्रिश्‍चन लोक चटकन त्यांच्या नजरेस पडले. नैतिकता आणि सचोटी यांसंबंधी ख्रिश्‍चनांची तत्त्वे उच्च होती; शिवाय, मोठ्या आवेशाने त्यांनी आशा-प्रेरक संदेश दिला. हजारोंनी यहुदी धर्म सोडला आणि ख्रिस्ती धर्म कवटाळला. (प्रेषितांची कृत्ये २:४१; ४:४; ६:७) यहुदी धार्मिक नेत्यांना येशूचे यहुदी शिष्य धर्मत्यागीच वाटत होते! (पडताळा प्रेषितांची कृत्ये १३:४५.) या क्रोधित नेत्यांना वाटले, की ख्रिस्ती धर्माने त्यांच्या परंपरा नाहीशा केल्या. इतकेच नव्हे तर ख्रिस्ती धर्माने विदेशी लोकांबद्दल त्यांचा दृष्टिकोनच नाकारला! सा.यु. ३६ पासून विदेशी लोक ख्रिस्ती होऊ शकत होते; यहुदी ख्रिश्‍चनांप्रमाणे त्यांचा विश्‍वास आचरू शकत होते व ख्रिस्ती विशेषाधिकारांचा उपभोग घेऊ शकत होते.—प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५.

१४, १५. (अ) ख्रिश्‍चनांनी मूर्तीपूजक उपासकांचा रोष का ओढवून घेतला? एक उदाहरण द्या. (ब) कोणता तीसरा गट आरंभीच्या ख्रिश्‍चनांचा द्वेष करीत होता?

१४ दुसरा स्रोत, मूर्तीपूजक उपासक; यांचाही द्वेष ख्रिश्‍चनांनी स्वतःवर ओढवून घेतला. उदाहरणार्थ, प्राचीन इफिसमध्ये, आर्टिमीस देवीचे चांदीचे देव्हारे बनवण्याचा किफायतीशीर व्यापार चालला होता. परंतु पौलाने तेथे प्रचार केल्यानंतर बऱ्‍याच इफिसकरांनी पौलाला प्रतिसाद दिला आणि आर्टिमीसची उपासना सोडून दिली. आपला धंदा बुडणार असे सोनारांना वाटल्यावर त्यांनी दंगा माजवला. (प्रेषितांची कृत्ये १९:२४-४१) बिथनिया (आता वायव्य टर्की) येथे ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाल्यावर असेच काहीसे तेथे घडले. ख्रिस्ती ग्रीक शास्रवचनांचे लिखाण होऊन जास्त दिवस झाले नव्हते, तेव्हा बिथनियाचा शासक धाकटा प्लिनी याने अहवाल दिला, की मूर्तीपूजक मंदिरे ओस पडत चालली होती आणि बली-पशूंसाठी असलेल्या चाऱ्‍याची विक्री देखील मोठ्या प्रमाणावर घटली होती. सर्व दोष ख्रिश्‍चनांच्या माथी मारून त्यांचा छळ करण्यात आला, कारण त्यांच्या उपासनापद्धतीत पशूंचे बलिदान व मूर्ती नव्हत्या. (इब्री लोकांस १०:१-९; १ योहान ५:२१) स्पष्टपणे, ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराचा मूर्तीपूजक उपासनेशी संबंधित असलेल्या विशिष्ट फायद्यावर परिणाम झाला आणि ज्यांचा व्यापार आणि पैसा दोन्ही बुडाला ते खवळले.

१५ तीसरा स्रोत म्हणजे राष्ट्रीयवादी रोमी; यांनीही ख्रिश्‍चनांचा द्वेष केला. सुरवातीला रोमनांना वाटत होते, की ख्रिश्‍चनांचा हा एक लहान व धर्मवेडा गट आहे. परंतु कालांतराने, फक्‍त ख्रिश्‍चन होण्याचा दावा करणे गुन्हा झाला ज्याला मृत्यूची शिक्षा मिळू शकत होती. ख्रिस्ती जीवनशैली आचरणारे प्रामाणिक नागरिक छळ आणि मृत्यूच्या लायक आहेत अशा दृष्टिकोनातून त्यांच्याकडे का पाहिले जायचे?

आरंभीच्या ख्रिश्‍चनांचा रोमी जगात द्वेष का?

१६. कोणत्या मार्गांनी ख्रिश्‍चन जगापासून वेगळे राहिले व यामुळे रोमी जगाचे ते नावडते का झाले?

१६ ख्रिस्ती लोक आपले धार्मिक विश्‍वास आचरत असल्यामुळे त्यांचा रोमी जगात द्वेष केला जात होता हे प्रमुख कारण होते. जसे की, ते जगापासून वेगळे राहिले. (योहान १५:१९) यामुळे राजकारणात त्यांना कोणतेही पद नव्हते आणि लष्करात भाग घेण्यास त्यांनी नाकारले. परिणामतः, त्यांना जगात कसलाही रस न बाळगणारे व जीवनाच्या प्रत्येक गोष्टीसाठी निरुपयोगी असे समजण्यात आले, असे इतिहासकार ऑगस्टस निॲन्डर म्हणतात. जगाचा भाग न होण्याचा अर्थ, भ्रष्ट रोमी जगाचे दुष्ट मार्ग टाळणे हा देखील होता. इतिहासकार विल ड्युरंट म्हणतात, लहान लहान समूहांत असलेल्या ख्रिश्‍चनांच्या धार्मिकतेमुळे व सभ्यतेमुळे विषयानंदी मूर्तीपूजक जगाला त्यांचा त्रास होऊ लागला. (१ पेत्र ४:३, ४) ख्रिश्‍चनांचा छळ व वध करून रोमनांनी हा त्रास दूर करण्याचा प्रयत्न केला असावा.

१७. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांच्या प्रचाराचे कार्य प्रभावशाली होते हे कशावरून दिसते?

१७ पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार कोणत्याही परिस्थितीत न डगमगणाऱ्‍या आवेशाने केला. (मत्तय २४:१४) सा.यु. ६० च्या सुमारास, पौल म्हणू शकला, की आकाशाखालच्या सर्व सृष्टीत, सुवार्तेची घोषणा झाली आहे. (कलस्सैकर १:२३) पहिल्या शतकाच्या अंतापर्यंत, येशूच्या अनुयायांनी संपूर्ण रोमी साम्राज्यात—आशिया, युरोप आणि आफ्रिका येथे शिष्य बनवले होते! कैसराच्या घरचे काही सदस्य देखील ख्रिस्ती झाले होते.a (फिलिप्पैकर ४:२२) या आवेशपूर्ण प्रचारामुळे चीड निर्माण झाली. निॲन्डर म्हणतात: प्रत्येक स्तरातल्या लोकांमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाल्यामुळे राज्याचा धर्म आणि सामाजिक जीवन यांना धोका होता.

१८. केवळ यहोवाची भक्‍ती केल्याने ख्रिश्‍चन आणि रोमी सरकारांमध्ये मतभेद कसे निर्माण झाले?

१८ येशूच्या अनुयायांनी यहोवाची अनन्य भक्‍ती केली. (मत्तय ४:८-१०) इतर कारणांपेक्षा त्यांच्या उपासनेच्या या पैलूमुळे कदाचित त्यांच्यामध्ये आणि रोमनांमध्ये मतभेद उत्पन्‍न झाले असावेत. जोपर्यंत परधर्मीय रोमनांबरोबर सम्राटाच्या उपासेनत भाग घेत तोपर्यंत रोमन त्यांना खपवून घेत. आरंभीचे ख्रिस्ती कोणत्याही परिस्थितीत अशा उपासनेत भाग घेऊ शकत नव्हते. रोमन राज्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या अधिकाराला अर्थात यहोवा देवाला आपल्याला जाब द्यायचा आहे हे त्यांना माहीत होते. (प्रेषितांची कृत्ये ५:२९) परिणामतः, एखादा ख्रिस्ती इतर सर्व बाबतीत कितीही चांगला नागरिक असला तरी त्याला राज्याचा शत्रूच समजले जाई.

१९, २०. (अ) विश्‍वासू ख्रिश्‍चनांविषयी पसरलेल्या दुष्ट निंदेसाठी कोण मोठ्या प्रमाणावर जबाबदार होते? (ब) ख्रिश्‍चनांवर कोणते खोटे आरोप करण्यात आले होते?

१९ रोमी जगात विश्‍वासू ख्रिश्‍चनांचा द्वेष का केला जात होता याचे आणखी एक कारण होते: त्यांच्यावर लावल्या जाणाऱ्‍या दुष्ट आरोपांवर लोकांनी लागलीच विश्‍वास ठेवला; ख्रिश्‍चनांवरील या चिखलफेकीसाठी यहुदी धार्मिक नेतेच जास्त जबाबदार होते. (प्रेषितांची कृत्ये १७:५-८) सा.यु. ६० किंवा ६१ च्या सुमारास, सम्राट निरोकडून न्याय मिळण्याकरता पौल थांबला होता तेव्हा प्रमुख यहुदी ख्रिश्‍चनांविषयी म्हणाले: ह्‍या पंथाविषयी म्हटले तर लोक त्याविरुद्ध सर्वत्र बोलतात, हे आम्हाला ठाऊक आहे. (प्रेषितांची कृत्ये २८:२२) निरोने त्यांच्याविषयीच्या निंदात्मक गोष्टी नक्कीच ऐकल्या असाव्यात. सा.यु. ६४ मध्ये रोमचा सत्यानाश करणाऱ्‍या आगीबद्दल जेव्हा त्याला जबाबदार धरण्यात आले तेव्हा निरोने आधीच निंदानालस्ती होत असलेल्या ख्रिश्‍चनांना बळीचा बकरा बनवले. यामुळे असा भयंकर छळ सुरू झाला, की ख्रिश्‍चनांचा समूळ नाश करणे हा त्या छळामागचा उद्देश होता.

२० ख्रिश्‍चनांविरुद्ध केले जाणारे आरोप पुष्कळदा, पूर्णपणे खोटे आणि त्यांच्या विश्‍वासांचा विपर्यास असे संमिश्र आरोप होते. ते एकेश्‍वरवादी होते व त्यांनी सम्राटाची उपासना केली नाही म्हणून त्यांना नास्तिक असे नाव देण्यात आले. ख्रिश्‍चन नसलेले काही कौटुंबिक सदस्य, त्यांच्या ख्रिश्‍चन नातेवाईकांचा विरोध करीत असल्यामुळे, ख्रिश्‍चन कुटुंबात फूटी पाडतात असा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला. (मत्तय १०:२१) त्यांना नरमांसभक्षक असे नाव देण्यात आले; हा आरोप येशूने प्रभूच्या सांज भोजनाच्यावेळी काढलेल्या उद्‌गारांच्या विपर्यासावर आधारित होता, असे काही स्रोत म्हणतात.—मत्तय २६:२६-२८.

२१. कोणत्या दोन कारणांसाठी ख्रिश्‍चनांचा द्वेष करण्यात आला?

२१ यास्तव, दोन प्रमुख कारणांसाठी रोमी लोक विश्‍वासू ख्रिश्‍चनांचा द्वेष करीत: (१) त्यांचे बायबल आधारित विश्‍वास व प्रथा आणि (२) त्यांच्याविरुद्धचे खोटे आरोप. कारण काहीही असो, विरोधकांचा मात्र एकच हेतू होता—ख्रिस्ती धर्म दाबून टाकणे. अर्थातच, ख्रिश्‍चनांविरुद्धच्या छळाचे खरे चिथावणीखोर मानवापेक्षा वरचढ अर्थात अदृश्‍य दुरात्मिक समूह होते.—इफिसकर ६:१२.

२२. (अ) यहोवाचे साक्षीदार ‘सर्वांचे बरे करण्याचा’ प्रयत्न करतात हे कोणत्या उदाहरणातून दिसते? (पृष्ठ ११ वरील चौकोन पाहा.) (ब) पुढील लेखात कशाची चर्चा केली जाईल?

२२ आरंभीच्या ख्रिश्‍चनांप्रमाणे, आधुनिक काळांतील यहोवाच्या साक्षीदारांचा देखील विविध देशांत द्वेष करण्यात आला आहे. तरीसुद्धा, ते साक्षीदार नसलेल्या लोकांचा द्वेष करीत नाहीत; किंवा ते सरकारांविरुद्ध बंडाचे उगम देखील कधी ठरले नाहीत. उलट, सामाजिक, वांशिक आणि जातीय अडथळ्यांना पार करणारी अस्सल प्रीती आचरणारे म्हणून त्यांना संपूर्ण जगभरात ओळखले जाते. मग तरीही त्यांचा छळ का करण्यात येतो बरे? विरोध होतो तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया आहे? पुढील लेखात या प्रश्‍नांची चर्चा केली जाईल.

[तळटीपा]

a कैसराच्या घरचे हा शब्दप्रयोग, तेव्हा राज्य करणाऱ्‍या निरोच्या जवळच्या कौटुंबिक सदस्यांनाच सूचित करतो असे नाही. तर, तो कदाचित घरातील नोकरांना व गौण अधिकाऱ्‍यांना सूचित करत असावा जे राजाच्या कुटुंबासाठी आणि कर्मचारीवर्गासाठी स्वयंपाक आणि साफसफाईचे काम करीत होते.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ येशूने भावी अनुयायांना शिष्यत्वाची किंमत मोजण्यास का आर्जवले?

◻ गैर-यहुदी लोकांविषयी चालू असलेल्या दृष्टिकोनाचा यहुदीवादावर कोणता परिणाम झाला व यातून आपण काय शिकू शकतो?

◻ आरंभीच्या विश्‍वासू ख्रिश्‍चनांनी कोणत्या तीन स्रोतांकडून विरोधाचा सामना केला?

◻ कोणत्या दोन कारणांसाठी आरंभीच्या ख्रिश्‍चनांचा रोमनांनी द्वेष केला?

[११ पानांवरील चौकट]

‘सर्वांचे बरे करणे’

यहोवाचे साक्षीदार ‘सर्वांचे बरे करावे,’ हा बायबल सल्ला मानण्याचा प्रयत्न करतात. (गलतीकर ६:१०) गरजेच्या वेळी, शेजाऱ्‍यांबद्दलची प्रीती त्यांना, त्यांचे धार्मिक विश्‍वास न आचरणाऱ्‍या लोकांना मदत करण्यास प्रवृत्त करते. जसे की, सन १९९४ मध्ये रुवांडा येथील संकटमय काळात युरोपच्या साक्षीदारांनी आफ्रिकेला मदत साम्रगी घेऊन जाण्याची स्वेच्छा दाखवली. साहाय्य पुरवण्याकरता लागलीच सुसंघटित छावण्या आणि शुश्रूषा पथक [फिल्ड हॉस्पिटल्स] उभारण्यात आले. मोठ्या प्रमाणात अन्‍न, कपडालत्ता आणि ब्लँकेट्‌स विमानाने पाठवण्यात आले. या मदत कार्याचा लाभ प्राप्त झालेल्या निर्वासितांची संख्या, त्या क्षेत्रातील साक्षीदारांच्या संख्येच्या तीनपटीने अधिक होती.

[९ पानांवरील चित्र]

पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी सुवार्तेचा प्रचार कोणत्याही परिस्थितीत न डगमगणाऱ्‍या आवेशाने केला

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा