ख्रिस्ती जाहीर निंदेला कशी प्रतिक्रिया दाखवतात
एखाद्या व्यक्तीने तुमची निंदा केल्यानंतर किंवा तुमच्याबद्दल अफवा पसरवल्यानंतर तुम्हाला कसे वाटते? अर्थातच, तुम्ही फार निराश होता. यहोवाचे साक्षीदार जेव्हा प्रसार माध्यमातील चुकीच्या किंवा विपरीत माहितीचा प्रमुख विषय बनतात तेव्हा देखील त्यांना असेच वाटते. परंतु येशूने मत्तय ५:११, १२ मध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांना अजूनही आनंदी होण्याचे कारण आहे.
उदाहरणार्थ, जर्मनीतील एका कॅथलिक प्रकाशनाने अशाप्रकारचा आरोप केला की, “प्रत्येक साक्षीदाराला मिळकतीतून १७ ते २८ टक्के त्याच्या पंथाच्या मुख्यालयाला द्यावे लागतात.” तथापि, यहोवाचे साक्षीदार गटांची स्थापना करीत नाहीत आणि त्यांचे कार्य पूर्णपणे स्वैच्छिक देणग्यांद्वारे चालवले जाते. परंतु प्राप्त झालेल्या या चुकीच्या माहितीमुळे अनेक वाचकांचा गैरसमज झाला आणि यहोवाच्या साक्षीदारांना याबद्दल खरोखरच वाईट वाटते. परंतु खऱ्या ख्रिश्चनांनी प्रसार माध्यमातून होणाऱ्या निंदेला कशाप्रकारे प्रतिक्रिया दाखवली पाहिजे?
ख्रिश्चनांना अनुकरण करण्यासाठी उदाहरण
येशूने त्याच्या धार्मिक विरोधकांना त्यांच्या ढोंगीपणाबद्दल आणि लबाडीपणाबद्दल कसे दोषी ठरवले याचे स्पष्ट वर्णन मत्तयाच्या २३ व्या अध्यायामध्ये केले आहे. आज ख्रिश्चनांनी, टीकाकारांशी कशाप्रकारे व्यवहार करावा यासाठी हा एक कित्ता आहे काय? खरे तर, नाही. देवपुत्राने त्याच्या ठायी असणारा अतुलनीय अधिकार आणि सूक्ष्मदृष्टी यांच्या आधारे धार्मिक विरोधकांना दोषी ठरवले आणि हे त्याने ऐकणाऱ्या समुदायांच्या फायद्यासाठी केले होते.
येशूचे शिष्य यहुदी संप्रदायाचे उल्लंघन करीत आहेत असे म्हणण्याद्वारे येशूची निंदा करण्यात आली असे मत्तय १५:१-११ सांगते. येशूने कशी प्रतिक्रिया दाखवली? तो आपल्या मतावर दृढ राहिला. येशूने स्पष्टपणे टीकाकारांना त्यांच्या चुकीच्या दृष्टिकोनाची जाणीव करून दिली. सामान्यपणे, ख्रिश्चनांनी त्यांचे कार्य किंवा त्यांच्या शिकवणींबद्दल निर्माण झालेले गैरसमज सुधारण्यासाठी आणि वास्तविक त्याचप्रमाणे तर्कशुद्ध पद्धतीने परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे चुकीचे नाही. यहोवाच्या साक्षीदारांवर करण्यात आलेली टीका खोटी आहे आणि ती त्यांच्या बदनामीसाठी करण्यात आली आहे याची जाणीव प्रामाणिक लोकांना करुन देण्यास ते अशाप्रकारचे कार्य करतात.
येशूच्या शिष्यांनी त्याला म्हटले: “हे वचन ऐकून परूशी नाराज [अडखळले, NW] झाले, हे आपल्याला कळले काय?” तेव्हा त्याने कशी प्रतिक्रिया दाखवली याकडे लक्ष द्या. हे परूशी “अडखळले”—ते केवळ नाराजच झाले नाहीत तर येशूने नापसंती दर्शवलेले कोडगे विरोधक झाले. त्यामुळे त्याने उत्तर दिले: “त्यांना असू द्या; ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडी आहेत.” अशाप्रकारचा कडा विरोध करणाऱ्यांशी चर्चा करणे निरर्थक होते, ही चर्चा कोणासही लाभदायक ठरणारी नव्हती आणि या चर्चेने केवळ निष्फळ वादविवाद निर्माण झाला असता. (मत्तय ७:६; १५:१२-१४; पडताळा २७:११-१४.) येशूने दिलेली उत्तरे दाखवून देतात की, “मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो.”—उपदेशक ३:७.
यहोवाचे साक्षीदार त्यांच्या बाबतीत प्रत्येकाने अनुकूल बोलावे अशी अपेक्षा करत नाहीत. ते येशूचे शब्द लक्षात ठेवतात: “जेव्हा सर्व लोक तुम्हास बरे म्हणतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार! त्यांचे पूर्वज खोट्या संदेष्ट्यांस असेच म्हणत असत.” (लूक ६:२६) निंदेपासून त्यांनी स्वतःचा बचाव का केला नाही, असे वॉचटावर संस्थेचे पहिले अध्यक्ष सी. टी. रसेल यांना एकदा विचारण्यात आले. त्यांनी उत्तर दिले: “तुमच्यावर भुंकणाऱ्या रस्त्यावरील प्रत्येक कुत्र्याला लाथ मारण्याचा तुम्ही प्रयत्न केल्यास तुम्हाला फार दूरपर्यंत जाता येणार नाही.”
या कारणास्तव, हेतुपुरस्सर विरोध करणाऱ्यांच्या टीकेमुळे आपण देवाच्या सेवेपासून विचलित होता कामा नये. (स्तोत्र ११९:६९) खऱ्या ख्रिश्चनांच्या कार्यावर म्हणजेच सुवार्तेच्या कार्यावर आपण लक्ष केंद्रित करु या. सामान्यपणे, प्रश्नांना प्रत्युत्तर देण्याच्या आणि आपल्या कार्याचे स्वरुप म्हणजेच एखाद्या व्यक्तीला नैतिकतेकडे वळवणे आणि देवाच्या वचनाकडे मार्गदर्शित करणे, हे स्पष्ट करण्याच्या अनेक संधी आपल्याला उपलब्ध होतील.—मत्तय २४:१४; २८:१९, २०.
निंदेला प्रतिक्रिया?
येशूने त्याच्या शिष्यांना म्हटले: “तुम्ही जगाचे नाही. . . म्हणून जग तुमचा द्वेष करिते.” (योहान १५:१९) अनेक प्रसार माध्यमांचा अहवाल यहोवाच्या साक्षीदारांची मोठ्या प्रमाणात होणारी द्वेषाची एक अभिव्यक्ती आहे आणि अशा अहवालांकडे दुर्लक्ष करण्यास हवे. तथापि, अनेकदा प्रसार माध्यमांद्वारे सादर करण्यात येणाऱ्या माहितीतून हे स्पष्ट होते की, ही माहिती प्रसारित करणाऱ्यांना साक्षीदारांबद्दल अगदी अल्प ज्ञान आहे किंवा ते विशिष्ट वास्तविकतांचा विपरीत किंवा चुकीचा अर्थ लावतात. काही पत्रकार यहोवाच्या साक्षीदारांना कलुषित करणाऱ्या लोकांकडून माहिती मिळवू शकतात. प्रसार माध्यमाच्या चुकीच्या माहितीकडे आपण दुर्लक्ष करावे किंवा योग्य मार्गाने सत्याचे समर्थन करावे, हे पूर्णपणे परिस्थितींवर, टीका करणाऱ्या टीकाकारावर आणि त्याच्या उद्देशावर अवलंबून असते.
संपूर्ण तपशील प्रकाशित केल्यास संपादकाला लिहिलेल्या उचित पत्राद्वारे वास्तविकतेमध्ये काहीवेळेस सुधार घडवून आणता येऊ शकतो. ज्या उद्देशास्तव हे पत्र लिहिण्यात येते त्याच्या अगदी विरुद्ध परिणाम या पत्रामुळे निर्माण होऊ शकतो. कशाप्रकारे? मूळ खोट्या बातमीचा प्रसार मोठ्या प्रमाणात होईल किंवा छपाईच्या माध्यमाद्वारे खोटेपणासाठी आणि कलंक लावण्यासाठी विरोधकांना संधी उपलब्ध होईल. संपादकाला पत्र लिहायचे अगर लिहायचे नाही याचा निर्णय वडिलांवर सोपवून देणे सामान्यपणे बुद्धिमत्तेचे आहे. छापखान्याच्या नकारात्मक अहवालांमुळे कलुषितपणाची भावना निर्माण होत असल्यास वॉचटावर संस्थेचे शाखा दप्तर त्या प्रदेशातील मंडळ्यांना वास्तविकतेबद्दल सांगू शकते, त्यामुळे चौकशी करणाऱ्यांना समाधानकारक स्पष्टीकरण देण्यास सर्व प्रचारक समर्थ होतील.
अशाप्रकारच्या सर्व खोट्या आरोपांमध्ये तुम्हाला वैयक्तिकपणे समाविष्ट होण्याची गरज आहे काय? येशूने सल्ला दिला, “त्यांना असू द्या,” त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि हे वर्णन जाहिरात करणाऱ्या विरोधी पक्षाला उचितपणे लागू होते. धर्मत्यागी लोकांपासून आणि त्यांच्या दृष्टिकोनांपासून दूर राहण्यासाठी एकनिष्ठ ख्रिश्चनांकडे बायबलमधील अनेक कारणे आहेत. (१ करिंथकर ५:११-१३; तीत ३:१०, ११; १ योहान २:१९; २ योहान १०, ११) साक्षीदारांवर केलेली टीका खोटी किंवा खरी आहे हे जाणण्याची एखाद्याची प्रामाणिक इच्छा असल्यास तुमच्याठायी असणारे उत्तम साधार ज्ञान अशा व्यक्तीला उत्तर देण्यास पुरेसे आहे.—टेहळणी बुरुज मार्च १५, १९८६, पृष्ठे १३ आणि १४ पाहा.
तुम्हाला चुकीची छापील माहिती आढळल्यास नीतीसूत्रे १४:१५ मधील सल्ला लक्षात ठेवा, “भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवितो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकितो.” नातेवाईकांनी रक्त संक्रमण देण्यास वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विरोध केल्यामुळे एक साक्षीदार तरुणी मरण पावली, या वर्तमान पत्राच्या भावनात्मक बातमीने स्वित्झर्लंडमधील अनेक लोक संतप्त झाले. खरोखरच तसे घडले होते काय? नाही. तिने धार्मिक पार्श्वभूमीवर रक्त संक्रमणास विरोध केला होता; परंतु रक्ताविना पर्यायी योग्य वैद्यकीय उपचार घेण्यासाठी ती तयार होती. उपचार करण्यास दिरंगाई केली नसती तर तिला वाचविता आले असते. तथापि, उपचार करण्यात दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी विनाकारण दिरंगाई केली आणि उपचारास सुरुवात केली तेव्हा मात्र फार उशीर झाला होता. वर्तमान पत्राच्या अहवालाने मात्र या वास्तविकतेचा उल्लेख केला नाही.
त्यामुळे अशाप्रकारच्या अहवालांमध्ये किती तथ्य आहे यावर काळजीपूर्वक विचार करा. चौकशी करणाऱ्यांना आपण सांगू शकतो की, अशाप्रकारच्या बाबींची हाताळणी करणारे स्थानिक वडील त्यांना याबाबतीत प्रेमळपणे आणि बायबलच्या मार्गदर्शक रेषांनुरुप माहिती देतील. उत्तर देताना तत्त्वांना जडून राहिल्यामुळे घाईघाईने अनुमान काढण्याचे आपण टाळू शकतो.—नीतीसूत्रे १८:१३.
मूळ माहिती महत्त्वपूर्ण
येशू ख्रिस्ताची प्रतिमा डागाळण्यासाठी पहिल्या शतकातील लोकांनी त्याच्याविषयी खोट्या बातम्या पसरवल्या; काहींनी तर त्याला फितूर असल्याचे देखील म्हटले. (लूक ७:३४; २३:२ पडताळा मत्तय २२:२१.) त्यानंतर नुकत्याच अस्तित्वात आलेल्या ख्रिस्ती मंडळीने धार्मिक आणि जगीक अशा दोन्ही बाबतीत कड्या विरोधाचा सामना केला. “देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले,” त्यामुळे अनेकजन देवाच्या सेवकांना पाण्यात पाहतात. (१ करिंथकर १:२२-२९) निंदेचे स्वरुप असणाऱ्या छळाचा खऱ्या ख्रिश्चनांनी विचार केलाच पाहिजे.—योहान १५:२०.
यहोवाचे साक्षीदार त्यांच्याबरोबर निःपक्षपातीपणे चर्चा करणाऱ्या व्यक्तीची कदर करतात आणि पौलाला रोममध्ये भेट देणाऱ्या काहींनी अशाचप्रकारची मनोवृत्ती दाखवली त्यांनी घोषित केले: “तरी आपले विचार काय आहेत ते आपणापासून ऐकून घ्यावे हे आम्हाला योग्य वाटते; कारण ह्या पंथाविषयी म्हटले तर लोक त्याविरुद्ध सर्वत्र बोलतात, हे आम्हाला ठाऊक आहे.”—प्रेषितांची कृत्ये २८:२२.
चुकीची माहिती मिळालेल्यांना सौम्यतेने स्पष्टीकरण द्या. (रोमकर १२:१४; पडताळा २ तीमथ्य २:२५.) यहोवाच्या साक्षीदारांबद्दल मूळ माहिती मिळवण्याकरता त्यांना आमंत्रण द्या ज्यामुळे चुकीच्या दोषारोपाद्वारे ते फसले जाणार नाहीत. वॉचटावर संस्थेने संघटना, तिचा इतिहास आणि तिच्या शिकवणी यांना स्पष्ट केलेल्या प्रकाशनांमधील सविस्तर वर्णनाचा देखील तुम्ही उपयोग करु शकता.a फिलिप्पाने एकदा नथनेलला केवळ असे म्हणून उत्तर दिले, “येऊन पाहा.” (योहान १:४६) आपणही त्याचप्रमाणे करु शकतो. यहोवाचे साक्षीदार कोणत्या प्रकारचे लोक आहेत आणि त्यांचा विश्वास काय आहे हे स्वतः पाहण्याची कोणा व्यक्तीची इच्छा असल्यास तिचे स्थानिक राज्य सभागृहामध्ये उबदार स्वागत आहे.
विरोधकांमुळे भयभीत होऊ नका
निंदा, लोकांना यहोवाचे साक्षीदार होण्यापासून रोखत नाही हे जाणून घेणे किती उत्तेजनदायक आहे! जर्मनीमधील दूरदर्शनवरील मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये धर्मत्यागी लोकांनी यहोवाच्या साक्षीदारांवर अनेक खोटे आरोप लावले. हा कार्यक्रम पाहणाऱ्याने, धर्मत्यागी गोष्टींनी केलेली अतिशयोक्ती काल्पनिक असल्याचे ओळखले आणि त्यामुळे या व्यक्तीने साक्षीदारांबरोबर स्थगित केलेला बायबल अभ्यास पुन्हा एकदा सुरु केला. होय, जाहीर निंदेमुळे काहीवेळा सकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात!—पडताळा फिलिप्पैकर १:१२, १३.
काहीजन सत्यापेक्षा “कल्पित कहाण्यांकडे” जास्त लक्ष देतील हे प्रेषित पौलाला ठाऊक होते. म्हणूनच त्याने लिहिले: “तू तर सर्व गोष्टींविषयी सावध ऐस, दुःखे सोस, सुवार्तिकाचे काम कर, तुला सोपविलेली सेवा पूर्ण कर.” (२ तीमथ्य ४:३-५) “विरोध करणाऱ्या लोकांकडून कशाविषयीहि भयभीत” होऊन स्वतःला विचलित होऊ देऊ नका. (फिलिप्पैकर १:२८) शांत आणि अविचलित राहा आणि सुवार्तेचा प्रचार आनंदाने करा त्यामुळे तुम्हाला जाहीर निंदेला खंबीरपणे तोंड देता येईल. होय, येशूचे अभिवचन लक्षात ठेवा, “माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करितील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.”—मत्तय ५:११, १२.
[तळटीपा]
a यहोवाचे साक्षीदार—जगभरामध्ये देवाची इच्छा एकत्रितपणे करतात, विसाव्या शतकातील यहोवाचे साक्षीदार आणि यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्घोषक ही प्रकाशने पाहा.
[२७ पानांवरील संक्षिप्त आशय]
विरोधकांचा सामना करतेवेळी येशूने त्याच्या शिष्यांना म्हटले: “त्यांना असू द्या.” त्याचा काय अर्थ होता?
[२९ पानांवरील संक्षिप्त आशय]
”माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करितील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य.” —मत्तय ५:११