यहोवाला आनंदी करणं माझ्याकरता जास्त महत्त्वाचं होतं
थीऑडॉरॉस नीरॉस यांच्याद्वारे कथित
“नीरॉस कोण आहे?” कोठडीचा दरवाजा उघडल्यानंतर जेलर ओरडला. मी नीरॉस असल्याचं सांगितलं, तेव्हा त्यानं मला कडव्या शब्दांत सुनावलं: “चल उठ. तुझा आजचा हा शेवटचा दिवस.” ही घटना ग्रीसच्या कोरिंथमधील लष्करी कॅम्पमध्ये १९५२ साली घडली. मला केव्हा जिवानिशी मारलं जाईल हे माझं मलाच माहीत नव्हतं. माझी ही दशा का झाली होती, हे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला त्याआधी झालेल्या घटनांविषयी सांगतो.
माझ्या वडिलांचा १९२५ साली बायबल विद्यार्थ्यांशी (त्याकाळी यहोवाच्या साक्षीदारांना या नावानं ओळखलं जायचं) संबंध आला. ते लवकरच यहोवाचे साक्षीदार झाले, तसंच समजलेल्या गोष्टी त्यांच्या आठ भावंडांना त्यांनी सांगितल्या आणि त्या सर्वांनी बायबलमधील सत्य स्वीकारलं. त्यांचे आईवडीलही सत्यात आले. काही काळानंतर त्यांनी लग्न केलं आणि ग्रीसमधील आग्रीन्योमध्ये माझा १९२९ मध्ये जन्म झाला.
त्या काळात ग्रीसची किती भयंकर परिस्थिती होती! एक असह्य गोष्ट म्हणजे जनरल मेटॅक्सस याचं जुलमी राज्य. १९३९ साली दुसऱ्या जागतिक युद्धाला तोंड फुटलं आणि त्यानंतर काही काळातच संपूर्ण देश नात्सी राजवटीखाली आला. रोगराई आणि भूक जिकडेतिकडे पाहायला मिळत होती. छोट्याशा हातगाडीवर लोकांचे मुडदे वाहून नेले जात होते. जगात दुष्टाईचं जितक्या प्रकर्षानं दर्शन घडत होतं तितक्याच प्रकर्षानं देवाच्या राज्याची गरज भासत होती.
जीवनाचे समर्पण
ऑगस्ट २०, १९४२ मध्ये थेस्सलोनायका शहराच्या बाहेर आमचा एक छोटासा गट सभेकरता जमा झाला होता. तेव्हा शहरावर बॉम्बवर्षा करणाऱ्या ब्रिटिश लढाऊ विमानांकडे बोट दाखवून प्रिसायडींग ओव्हरसियरांनी यावर जोर दिला, की ‘एकत्र मिळण्याचं सोडू नये’ ही आज्ञा पाळल्यामुळेच आपण वाचलो. (इब्री लोकांस १०:२५) त्यावेळी आम्ही सर्वजण समुद्राच्या किनाऱ्याजवळ जमा झालो होतो, त्याचवेळी अनेक लोकांनी बाप्तिस्मा घेतला आणि त्यांपैकी मी एक होतो. आम्ही बाप्तिस्म्यानंतर पाण्यातून बाहेर आल्यावर एका रांगेत उभे राहिलो. त्यानंतर आमच्या ख्रिस्ती भाऊबहिणींनी आम्ही घेतलेल्या निर्णयाबद्दल स्तुतिरूपी गीत गायलं. खरोखरच एक अविस्मरणीय दिवस!
काही काळ उलटल्यानंतर, जेव्हा मी एका मुलासोबत घरोघरी जाऊन लोकांना सत्याविषयी सांगत होतो तेव्हा पोलिसांनी आम्हाला अटक करून ठाण्यात नेलं. आम्ही कम्युनिस्ट आहोत आणि आमच्या प्रचारकार्यावर बंदी आहे, असं त्यांनी आम्हाला सांगितलं, पण त्यासाठी आम्हाला चांगलाच मार खावा लागला, पुढे ते म्हणाले: “स्टॅलिन आणि यहोवा एकच आहेत हे तुम्हा मुर्खांना कसं कळत नाही?”
ग्रीसमधील मुलकी युद्धाने संपूर्ण देशात धुमाकूळ घातला होता आणि कम्युनिस्ट विरोधी चळवळींनाही अगदी ऊत आला होता. दुसऱ्या दिवशी हातात बेड्या घालून गुन्हेगारांप्रमाणे आमची घरासमोरून धींड काढण्यात आली. त्यानंतरही काही परीक्षांना मला सामोरं जायचं होतं.
शाळेतील विश्वासाच्या परीक्षा
एकोणीसशे चव्वेचाळीस साली मी अद्यापही शाळेतच होतो आणि थेस्सलोनायका शहरावर अजूनही नात्सी राजवट होती. शाळेत एके दिवशी ग्रीक ऑर्थोडॉक्सचे पाळक अर्थात धर्माचा विषय शिकवणारे आमचे प्राध्यापक त्यादिवशी शिकवलेल्या गोष्टींवर मला काही प्रश्न विचारणार असं म्हणताच, “तो ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन नाहीय,” बाकीच्या मुलांनी पटकन् म्हटलं.
“मग कोण आहे?” प्राध्यापकानं विचारलं.
“मी यहोवाचा साक्षीदार आहे,” मी म्हटलं.
“मेंढरांमध्ये लांडगा,” असं माझ्यावर ओरडून त्यानं मला खेचलं आणि माझ्या कानशिलात दोन लगावल्या.
मी मनाशी विचार केला, ‘लांडग्याला मेंढरू मारतं, हे कसं शक्य आहे?’
काही दिवसांनंतर, आम्ही ३५० मुले दुपारच्या जेवणाकरता टेबलावर बसलो होतो. तेव्हा सुपरवायजरने म्हटलं: “नीरॉस आपल्याकरता प्रार्थना करेल.” तेव्हा मत्तय ६:९-१३ इथं येशूने त्याच्या अनुयायांना शिकवलेली “आमच्या स्वर्गातील पित्या” ही प्रार्थना मी म्हटली. माझी ही प्रार्थना सुपरवायजरला आवडली नाही आणि तो त्याच्या बसल्या जागेवरूनच माझ्यावर खेकसला: “ही प्रार्थना तू का म्हटली?”
“कारण मी यहोवाचा साक्षीदार आहे,” मी म्हटलं. तेव्हा त्यानं सुद्धा माझी गचांडी धरून गालावर एक ठेवून दिली. काही वेळानंतर दुसऱ्या एका शिक्षकांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं आणि म्हटलं: “शाब्बास, नीरॉस. तू हार मानू नकोस. तुझ्या धार्मिक विश्वासाला जडून राहा.” त्या रात्री माझ्या वडिलांनी मला प्रेषित पौलाचे पुढील शब्द दाखवून धीर दिला: “ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल.”—२ तीमथ्य ३:१२.
माझं माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, पुढं काय करायचं हे मी ठरवलेलं नव्हतं. ग्रीसमध्ये मुलकी संघर्ष चालू असल्यामुळे ख्रिस्ती तटस्थता कशी राखावी हा प्रश्नही माझ्यासमोर होता. (यशया २:४; मत्तय २६:५२) ग्रीक इतिहासातील त्या सर्वात बिकट काळामध्ये युद्धात भाग घ्यायला नकार दिल्यानं १९५२ मध्ये मला २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली.
माझ्या ख्रिस्ती तटस्थतेची परीक्षा
मेसलाँजीऑन आणि कोरिंथ येथील लष्करी कॅम्पमध्ये मी शिक्षा भोगत होतो. तेव्हा तेथील लष्करी अधिकाऱ्यांना मला हे समजावून सांगण्याची संधी मिळाली, की बायबलच्या धार्मिक स्तरांनुसार माझा विवेक राजकीय कारणांसाठी सैनिक होण्याची मला कधीच परवानगी देणार नाही. २ तीमथ्य २:३ या वचनातून मी त्यांना हे दाखवून दिलं, की ‘मी केव्हाच येशूचा शिपाई झालो होतो.’ पुन्हा एकदा विचार करून पाहा असं सांगितल्यावर मी म्हटलं, की हा निर्णय मी तडकाफडकीनं घेतलेला नाही, तर मोठ्या गांभीर्यानं विचार केल्यावर आणि देवाला केलेल्या समर्पणामुळे घेतलाय.
त्यामुळे माझ्याकडून काबाडकष्ट करून घेण्यात येऊ लागलं. दोन दिवसांतून मला एकदाच जेवण द्यायचे, असं २० दिवस चाललं. सुमारे तीन बाय सहा फुटाच्या छोट्याशा कोठडीत मला सिमेंटच्या कोब्यावर झोपावं लागायचं. आणि या इतक्या छोट्याशा जागेत माझ्यासोबत आणखी दोन साक्षीदार होते! कोरिंथच्या याच कॅम्पमध्ये असताना मला मृत्युदंडाच्या शिक्षेकरता बोलावणं आलं.
ज्या ठिकाणी मला मारण्यात येणार होतं, त्या ठिकाणी जात असताना अधिकाऱ्यानं मला विचारलं, “तुझी शेवटची इच्छा काय आहे?”
“काही नाही,” मी म्हटलं.
“तुझ्या घरच्यांना तुला काही लिहायचं आहे का?”
“नाही, मी मरणार आहे हे माझ्या घरच्या लोकांना माहीतच आहे,” मी म्हटलं.
त्यानंतर आवारात आल्यानंतर एका भिंतीपाशी मला उभं करण्यात आलं. पण सैनिकांना माझ्यावर गोळ्या झाडण्याचं फर्मावण्याऐवजी, “त्याला आत घेऊन जा,” अशी त्या अधिकाऱ्यानं आज्ञा दिली. माझी परीक्षा घेण्यासाठी हे नाटक रचण्यात आलं होतं.
त्यानंतर, माक्रॉनीसॉस बेटावर माझी रवानगी झाली. या ठिकाणी बायबलखेरीज इतर कोणतंही पुस्तक मला स्वतःजवळ ठेवायची परवानगी नव्हती. इथं सुमारे ५०० गुन्हेगारांना ठेवण्यात आलं होतं, पण आम्हा तेरा साक्षीदारांना त्यांच्यापासून वेगळं, एका छोट्या घरात ठेवण्यात आलं होतं. तरीही सर्वांच्या नकळत पुस्तकं आमच्यापर्यंत पोहंचतच होती. उदाहरणार्थ, एके दिवशी एका बॉक्समध्ये लुकुम्यॉ (सर्वांना आवडणारी एक प्रकारची कॅण्डी) माझ्याकरता पाठवण्यात आली. लुकुम्यॉची चव घेण्यात इन्स्पेक्टर्स इतके मश्गुल होते, की त्या बॉक्सच्या खाली टेहळणी बुरूज आहे हे त्यांना कळलं सुद्धा नाही. एका साक्षीदाराने म्हटलं: “सैनिकांनी लुकुम्यॉचा, तर आम्ही टेहळणी बुरूजाचा ‘आस्वाद’ घेतला.”
त्यानंतर नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक मानवजातीकरता धर्माने काय केले आहे? (इंग्रजी) आमच्यापर्यंत येऊन पोहंचलं आणि इंग्रजी येत असलेल्या एका बांधवाने त्या पुस्तकाचं भाषांतर केलं. आम्ही टेहळणी बुरूजाचा अभ्यासही करत असू, आमच्या सभांविषयी गुप्तता पाळली जात असे. तुरुंग जणू आमची शाळाच होती कारण तिथं आम्हाला आमची आध्यात्मिकता मजबूत करण्याची संधी मिळायची. आमच्या एकनिष्ठेमुळे यहोवा आनंदित आहे, याचंच आम्हाला समाधान वाटायचं.
पूर्वेकडील पेलपनीससमधील टीरींथा इथं मी माझा शेवटचा तुरुंगवास भोगला. तिथल्या एका कैद्यासोबत अभ्यास घेत असताना एक गार्ड आमचं बोलणं अगदी लक्ष देऊन ऐकत असे. थेस्सलोनायकामध्ये त्याच गार्डला भेटून मला किती आनंद झाला! तो आता साक्षीदार झाला होता. काही काळानंतर त्याच्या एका मुलाला तुरुंगात जावं लागलं; गार्ड म्हणून नव्हे, तर एक कैदी म्हणून. मला ज्यामुळे तुरुंगवास झाला होता त्याच कारणामुळे त्यालाही तुरुंगात टाकण्यात आलं होतं.
सुटकेनंतर कामाला नव्याने सुरवात
मला जरी २० वर्षांची शिक्षा झाली होती, तरी खरं तर मी फक्त तीन वर्षंच तुरुंगात होतो. तुरुंगातून सुटल्यानंतर अथेन्समध्ये राहण्याचं मी ठरवलं. पण फुप्फुसाच्या आजारामुळे थेस्सलोनायकाला जाण्याशिवाय माझ्यापुढे दुसरा पर्याय राहिला नाही. दोन महिने मी अंथरुणाला खिळून होतो. त्यानंतर कुलॉ या सुंदर मुलीशी माझी भेट झाली आणि आम्ही डिसेंबर १९५९ मध्ये लग्न केलं. कुलॉने १९६२ मध्ये पायनियरींग करायला सुरवात केली; यहोवाच्या साक्षीदारांमध्ये पूर्ण-वेळच्या सेवकांना पायनियर म्हटलं जातं. तीन वर्षांनी मीही तिच्यासोबत पायनियरींग करू लागलो.
जानेवारी १९६५ मध्ये आम्हावर सर्किट वर्क सोपवण्यात आलं; मंडळ्यांना आध्यात्मिकरीत्या मजबूत करण्याकरता आम्ही त्यांना भेटी देऊ लागलो. त्याच वर्षी उन्हाळ्यात ऑस्ट्रियामध्ये व्हिएन्ना इथं झालेल्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला पहिल्यांदा उपस्थित राहण्याची संधीही आम्हाला मिळाली. ग्रीसमध्ये अशी परिस्थिती नव्हती; तिथं आमच्या कामावर बंदी असल्यामुळे आम्हाला रानावनातच एकत्र येणं शक्य होतं. १९६५ सालाच्या अखेरीस आम्हाला अथेन्समधील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरामध्ये कामासाठी बोलावण्यात आलं. माझ्या काही नातेवाईकांच्या आजारपणामुळे १९६७ मध्ये आम्हाला थेस्सलोनायकाला परत जावं लागलं.
घरची जबाबदारी पार पाडत असताना आम्ही सुवार्तेच्या कामातही व्यस्त होतो. एकदा मी कॉस्टास या माझ्या चुलतभावाला देवाच्या संघटनेतील सुंदरता आणि प्रेम, ऐक्य व देवाच्या संघटनेतील आज्ञाधारकता वगैरे गोष्टींविषयी सांगत होतो. तेव्हा त्याने म्हटलं, “देव अस्तित्वात असेल, तरच या सर्व गोष्टींना काही अर्थ आहे.” देव अस्तित्वात आहे किंवा नाही, हे त्याने स्वतः पाहावं असं मी त्याला म्हटलं आणि ते त्याने मान्य केलं. मी त्याला सांगितलं, की जर्मनीमध्ये न्यूरेम्बुर्ग इथं १९६९ या वर्षी ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला आम्ही जाणार आहोत. त्याला आणि त्याचा मित्र आलेकॉस याला आमच्यासोबत येता येईल का, असं त्याने आम्हाला विचारलं. हा आलेकॉसही आमच्यासोबत बायबल अभ्यास करत असे.
न्यूरेम्बुर्गचे अधिवेशन हे खरोखरच एक विलक्षण दृश्य होतं! युद्धांत मिळालेल्या विजयांमुळे झालेला आनंद हिटलर ज्या प्रचंड स्टेडियममध्ये साजरा करायचा त्याच स्टेडियममध्ये हे अधिवेशन भरवण्यात आलं होतं. या अधिवेशनाला १,५०,००० पेक्षाही अधिक लोक उपस्थित होते आणि संपूर्ण कार्यक्रमावर यहोवाचा आत्मा होता हे स्पष्टपणे दिसून येत होतं. काही काळातच कॉस्टास आणि आलेकॉस या दोघांनी बाप्तिस्मा घेतला. हे दोघेही आज मंडळीत वडील आहेत आणि त्यांची बायकामुलंही साक्षीदार आहेत.
आस्था दाखवलेल्या एका स्त्रीसोबत बायबल अभ्यास घ्यायला मी सुरवात केली. तिच्या पतीने म्हटलं, की त्याला आमचे काही धार्मिक विश्वास जाणून घ्यायचे आहेत. त्यानंतर काही दिवस गेल्यानंतर त्याने मला असं सांगितलं, की चर्चा करण्यासाठी त्याने एका ग्रीक ऑर्थोडॉक्सच्या विद्वानाला बोलावलं आहे; त्याचं नाव साकॉस होतं. या स्त्रीच्या पतीला आमच्या दोघांकडून काही प्रश्नांची उत्तरं हवी होती. साकॉसने त्याच्यासोबत एका पाळकालाही आणलं होतं. त्यानंतर या मनुष्याने चर्चेला सुरवात केली व म्हणाला, “पहिल्यांदा, साकॉस तुम्ही माझ्या तीन प्रश्नांची उत्तरं द्या.”
चर्चा करत असताना आम्ही जे बायबलचे भाषांतर वापरत होतो ते बायबल हातात घेऊन त्या मनुष्यानं विचारलं, “पहिला प्रश्न: हे खरोखरचं बायबल आहे का की फक्त यहोवाच्या साक्षीदारांचं बायबल आहे?” साकॉसने उत्तर दिलं, की हे अधिकृत भाषांतर आहे आणि त्याने यहोवाच्या साक्षीदारांना “बायबल प्रेमी” असं म्हटलं.
त्यानंतर या मनुष्याने असं विचारलं, “दुसरा प्रश्न: यहोवाच्या साक्षीदारांचं चालचलन चांगलं आहे का?” खरं तर, त्याला हे जाणून घ्यायचं होतं, की त्याची पत्नी ज्या लोकांसोबत उठतेबसते ते लोक कसे आहेत. साकॉसने उत्तर दिलं, की ते नक्कीच चांगल्या चालीचे लोक आहेत.
त्या मनुष्याने म्हटलं, “तिसरा प्रश्न: यहोवाच्या साक्षीदारांना पगार दिला जातो का?” “नाही,” साकॉसने म्हटलं.
या मनुष्याने शेवटी असं म्हटलं: “मला माझ्या प्रश्नांची उत्तरं आता मिळालीत आणि मला जे ठरवायचं होतं ते मी ठरवलं.” त्यानंतर त्याने बायबलचा अभ्यास चालू ठेवला आणि लवकरच बाप्तिस्मा घेऊन तो एक यहोवाचा साक्षीदार झाला.
प्रतिफलदायक जीवन
जानेवारी १९७६ मध्ये मी पुन्हा एकदा सर्किट ओव्हरसियर म्हणून काम करू लागलो. ग्रीसमध्ये सुमारे सहा महिन्यांनंतर स्ट्रीट व्हिटनेसींगमध्ये पुढाकार घेण्याचा मान मला मिळाला; हे प्रचार कार्याचं नवीन क्षेत्र होतं. त्यानंतर ऑक्टोबर १९९१ मध्ये मी व माझी पत्नी खास पायनियर म्हणून काम करू लागलो. काही महिन्यांनी माझ्या हृदयावर क्वॉड्रपल बायपास सर्जरी करण्यात आली आणि ही शस्त्रक्रिया सुदैवाने यशस्वी झाली. आता माझी प्रकृती ठणठणीत असल्यामुळे पूर्णवेळेचे सेवाकार्य करायला मला जड जात नाही. थेस्सलोनायकामध्ये एका मंडळीत मी वडील या नात्यानं आता काम पाहत आहे तसंच वैद्यकीय बाबतीत मदत हवी असलेल्यांकरता तयार करण्यात आलेल्या हॉस्पिटल लायाझॉन कमिटीसोबतही काम करत आहे.
माझ्या जीवनाकडे मी मागे वळून पाहतो तेव्हा आपल्या स्वर्गीय पित्याला आनंदी करणं किती समाधान देणारं आहे हे मला कळतं. मी फार पूर्वीच त्याच्या या हाकेला साद दिल्यामुळे आता मला फार आनंद होतो: “माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्यांस मी प्रत्युत्तर देईन.” (नीतिसूत्रे २७:११) यहोवाच्या संघटनेत येणाऱ्या प्रामाणिक लोकांच्या संख्येत जगव्याप्त प्रमाणावर होणारी वाढ पाहून मला खरोखरच फार आनंद होतो. बायबलमधील सत्याद्वारे लोकांना बंधमुक्त करणं आणि अशाप्रकारे नवीन धार्मिक जगात सार्वकालिक जीवन जगण्याच्या भवितव्याविषयी त्यांना सांगणं किती मोठा विशेषाधिकार!—योहान ८:३२; २ पेत्र ३:१३.
यहोवाच्या तरुण सेवकांना आम्ही नेहमी हेच उत्तेजन देण्याचा प्रयत्न करतो, त्यांनी त्यांच्यासमोर पूर्णवेळेच्या सेवेचं लक्ष्य ठेवावं जेणेकरून त्यांना त्यांचा जास्तीत-जास्त वेळ आणि शक्ती देवाच्या कामात खर्च करता येईल. खरोखर, यहोवावर भरवसा ठेवणं आणि त्याचं मन आनंदित करण्यात उदंड समाधान मानणं म्हणजेच अर्थपूर्ण जीवन!—नीतिसूत्रे ३:५; उपदेशक १२:१.
[२१ पानांवरील चित्रं]
(डावीकडून उजवीकडे)
१९६५ मध्ये बेथेलच्या किचनमध्ये काम करताना
प्रचार कार्यावर बंदी असताना १९७० मध्ये भाषण देताना
१९५९ मध्ये माझ्या पत्नीसोबत
[२३ पानांवरील चित्र]
कुलॉ या माझ्या पत्नीसोबत