वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 १०/१ पृ. २८-३१
  • आध्यात्मिक प्रगती करीत राहा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आध्यात्मिक प्रगती करीत राहा!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • व्यक्‍तिगत अभ्यासाद्वारे प्रगती करणे
  • देवाच्या समीप जाण्याची गरज
  • यहोवाबरोबरच नजीकचा नातेसंबंध विकसित करणे
  • तुमच्या सेवेत आध्यात्मिक प्रगती
  • तरुणांनो​—बाप्तिस्म्यानंतरही प्रगती करत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • देवाची सेवा सदासर्वकाळ करणे हे तुमचे ध्येय बनवा
    सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
  • पुढील प्रगतिसाठी निश्‍चयी हालचाल
    आमची राज्य सेवा—१९९२
  • सुव्यवस्थित नित्यक्रमात प्रगतीशीलपणे चालत राहा
    आमची राज्य सेवा—१९९४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 १०/१ पृ. २८-३१

आध्यात्मिक प्रगती करीत राहा!

आपल्या बाप्तिस्म्याचा दिवस आपण केव्हाही विसरता कामा नये. कारण, त्या दिवशी आपण देवाची सेवा करण्यासाठी मी स्वतःला समर्पित करीत आहे असे जाहिरपणे प्रकट केलेले असते.

पुष्कळ लोकांना या क्षणापर्यंत पोहंचायला प्रयत्नांची शिकस्त करावी लागते. कारण त्यांना दीर्घकाळापासूनचे दुर्व्यसन सोडून द्यावे लागते, वाईट सोबत्यांची संगत सोडावी लागते, आचारविचारांची खोलवर रूजलेली शैली बदलावी लागते.

पण, एखाद्या ख्रिश्‍चनाच्या जीवनात बाप्तिस्म्याचा दिवस आनंदाचा आणि महत्त्वपूर्ण दिवस असला तरी, ही केवळ एक सुरवात आहे. प्रेषित पौलाने यहुदातील बाप्तिस्मा प्राप्त ख्रिश्‍चनांना सांगितले: “आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबीसंबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करू या.” (इब्री लोकांस ६:२) होय, सर्व ख्रिश्‍चनांनी, “देवाच्या पुत्रावरील विश्‍वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत, प्रौढ मनुष्यपणाप्रत, ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत” पोहंचले पाहिजे. (इफिसकर ४:१३) प्रौढतेप्रत पोहंचल्यावरच आपण खरोखर “विश्‍वासात दृढ” होऊ.—कलस्सैकर २:७.

गेल्या काही वर्षांत, नव्याने समर्पण केलेले हजारो उपासक ख्रिस्ती मंडळीत आले आहेत. कदाचित तुम्ही त्यांच्यापैकी एक असाल. तुमच्या पहिल्या शतकातील बांधवांप्रमाणे तुम्हाला आध्यात्मिक बाल्यावस्थेत राहावयास आवडणार नाही. तुम्हाला वाढावेसे, प्रगती करावीशी वाटेल! पण कसे? तुम्ही प्रगती करू शकाल असे काही मार्ग कोणते आहेत?

व्यक्‍तिगत अभ्यासाद्वारे प्रगती करणे

फिलिप्पैमधील ख्रिश्‍चनांना पौलाने म्हटले: “माझी ही प्रार्थना आहे की, तुमची प्रीति [अचूक] ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी.” (फिलिप्पैकर १:९) ‘अचूक ज्ञानात’ वाढणे तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी फार महत्त्वाचे आहे. ‘यहोवा देवाचे आणि येशू ख्रिस्ताचे ज्ञान’ घेणे, बाप्तिस्म्यानंतर थांबत नाही तर चालूच राहते.—योहान १७:३.

ही गोष्ट, वयाच्या सोळाव्या वर्षी बाप्तिस्मा घेतलेल्या एका ख्रिस्ती बहिणीच्या लक्षात दहा वर्षांनंतर आली; तिला आपण अलेक्झॅन्ड्रा म्हणू या. ती सत्यातच लहानाची मोठी झाली होती; ती नियमितरीत्या ख्रिस्ती सभांना उपस्थित राहत असे व प्रचार कार्यात भाग घेत असे. ती लिहिते: “गेल्या काही महिन्यात, मला प्रकर्षानं जाणवू लागलं, की माझं काहीतरी चुकतयं. मी स्वतःचं प्रामाणिक परीक्षण करण्याचं ठरवलं, की सत्याबद्दल मला काय वाटतं, मी सत्यात का राहिले आहे.” तिला काय दिसून आले? ती पुढे म्हणते: “मी सत्यात का राहिले आहे याची कारणं पाहून मी अस्वस्थ झाले. मला आठवतं, की मी जसजशी मोठी होत होते तसे सभांना व प्रचार कार्याला जाण्यावर जास्त जोर दिला जायचा. ओघाओघानं व्यक्‍तिगत अभ्यासाची आणि प्रार्थनेची सवय लागेलच असं वाटलं होतं. पण जेव्हा मी माझ्या परिस्थितीचं परीक्षण केलं तेव्हा मला दिसून आलं की ते तसं नव्हतं.”

प्रेषित पौल आर्जवतो: “आपण जी मजल मारली तिच्याप्रमाणे [परिपाठाप्रमाणे] पुढे चालावे.” (फिलिप्पैकर ३:१६) परिपाठ पुढे वाटचाल करण्याकरता साहाय्य करू शकतो. बाप्तिस्मा घेण्याआधी, दर आठवडी एका प्रशिक्षित शिक्षकाबरोबर बायबल अभ्यासाचा तुमचा परिपाठ नक्कीच होता. तुमची समज जसजशी वाढत गेली तसतसे तुम्ही या परिपाठात, आठवड्याच्या धड्याची पूर्वतयारी करू लागला, त्यात उल्लेखलेली बायबल वचने वाचून ठेवू लागला. आता बाप्तिस्मा झाल्यावरही तुम्ही ‘त्याच परिपाठानुसार पुढे चालत’ आहात का?

नसल्यास, तुम्हाला तुमच्या प्राथमिकतांचे पुनःपरीक्षण करणे आवश्‍यक आहे, “ज्या अधिक महत्त्वपूर्ण गोष्टी त्यांची खातरी” तुम्हाला करावी लागेल. (फिलिप्पैकर १:१०, NW.) आपल्या धावपळीच्या जीवनात व्यक्‍तिगत बायबल वाचन आणि अभ्यास यासाठी वेळ काढण्याकरता आत्मसंयमाची गरज आहे. परंतु, तुम्ही केलेले प्रयत्न वाया जाणार नाहीत. पुन्हा एकदा अलेक्झॅन्ड्राचा विचार करा. ती कबूल करते: “सभांना गेल्यामुळे व क्षेत्र सेवेत भाग घेतल्यामुळे मी सत्यामध्ये गेल्या २० किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांपासून आहे. परंतु, मी या निष्कर्षास पोहंचले आहे, की या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असल्यातरी, केवळ याच गोष्टी मला, माझ्यापुढे समस्या बिकट होऊ लागतात तेव्हा टिकवू शकत नाहीत. हे सर्व महत्त्वाचे आहे कारण एकतर मला व्यक्‍तिगत अभ्यासाची सवय नाही आणि माझ्या प्रार्थना अनियमित आहेत व मनापासून नाहीत. आता मला वाटतं की मी माझ्या विचारात बदल केले पाहिजेत व अर्थपूर्ण अभ्यासाचा कार्यक्रम चालू केला पाहिजे जेणेकरून मी यहोवाला चांगल्याप्रकारे ओळखू लागेन व त्याच्यावर प्रेम करू शकेन आणि त्याच्या पुत्राने आपल्याकरता जे दिले त्याची गुणग्राहकता बाळगेन.”

व्यक्‍तिगत अभ्यासाचा लाभदायक परिपाठ सुरू करण्याकरता तुम्हाला मदत हवी असेल तर तुमच्या मंडळीतील वडीलजन आणि इतर प्रौढ ख्रिस्ती तुम्हाला साहाय्य देण्यास सदोदित तयार आहेत. याशिवाय, टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या मे १, १९९५; ऑगस्ट १, १९९३ आणि जून १, १९८७ अंकांतील लेखांत पुष्कळ फायदेकारक कल्पना सुचवल्या आहेत.

देवाच्या समीप जाण्याची गरज

आणखी एक क्षेत्र ज्यात तुम्ही प्रगती करण्यास झटले पाहिजे ते आहे, देवाबरोबरचा तुमचा नातेसंबंध. काही लोकांच्या बाबतीत या गोष्टीची निन्तात गरज असू शकते. लहान वयातच बाप्तिस्मा झालेल्या ॲन्थनीचीच गोष्ट घ्या. तो म्हणतो: “आमच्या कुटुंबात मुलांमध्ये माझाच पहिला बाप्तिस्मा झाला होता. बाप्तिस्म्यानंतर माझ्या आईनं मला अगदी उराशी धरलं. तिला इतका आनंद झालेला मी पहिल्यांदाच पाहत होतो. सर्वत्र आनंदीआनंद होता; मी किती बळकट आहे असं मला वाटत होतं.” परंतु, चित्राची दुसरी बाजूही पाहा. तो पुढे म्हणतो: “आमच्या मंडळीत पुष्कळ वर्षांपर्यंत कोणा युवकांचा बाप्तिस्मा झाला नव्हता. तेव्हा मला स्वतःचा गर्व वाटायचा. मी अगदी गर्वानं सभांमध्ये उत्तरं, भाषणं द्यायचो. मी यहोवाची स्तुती करण्याऐवजी लोकांनी माझी स्तुती करावी, वाहवा करावी हे मला अधिक महत्त्वाचं वाटू लागलं. माझा खरं तर यहोवाबरोबर नजीकचा नातेसंबंधच नव्हता.”

ॲन्थनीसारख्या अनेकांनी, यहोवाला संतुष्ट करण्याऐवजी इतरांना संतुष्ट करण्याकरता समर्पण केले असावे. तरीसुद्धा अशा लोकांच्या बाबतीतही देव अपेक्षा करतो की त्यांनी त्याची सेवा करण्याविषयी जे वचन दिले आहे ते पूर्ण करावे. (पडताळा उपदेशक ५:४.) परंतु, देवाबरोबर व्यक्‍तिगत सलगी न ठेवता असे करणे त्यांना कठीण जाते. ॲन्थनी म्हणतो: “बाप्तिस्म्यानंतर मला झालेला आनंद क्षणिक होता. माझ्या बाप्तिस्म्याला अजून वर्षही पूर्ण झालं नव्हतं की माझ्या हातून गंभीर पाप घडलं आणि मंडळीच्या वडिलांना मला माझा दोष दाखवावा लागला. वारंवारच्या माझ्या गैरवर्तनामुळे मला मंडळीतून बहिष्कृत करण्यात आलं. यहोवाला समर्पण केल्याच्या सहा वर्षांनंतर खून केल्याबद्दल मला अटक करून तुरुंगात टाकण्यात आलं.”

यहोवाबरोबरच नजीकचा नातेसंबंध विकसित करणे

तुमची परिस्थिती काहीही असो, सर्व ख्रिस्ती जन बायबलच्या या आमंत्रणाला दाद देऊ शकतात: “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हांजवळ येईल.” (याकोब ४:८) तुम्ही बायबलचा अभ्यास करण्यास पहिल्यांदा सुरवात केली तेव्हा काही प्रमाणात तुम्ही देवाबरोबर जवळीक निर्माण केली असेल यात काही शंका नाही. ख्रिस्ती धर्मजगतात ज्याची उपासना केली जाते त्या व्यक्‍तिभावरहित देवता सारखा देव नाही तर तो एक व्यक्‍ती आहे ज्याचे नाव यहोवा आहे हे तुम्ही शिकला. तुम्ही हेही शिकला, की त्याच्यात आकर्षक गुण आहेत, तो “दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा . . . सागर” आहे.—निर्गम ३४:६.

देवाची सेवा करण्यासाठी तुम्ही केलेल्या समर्पणाला जागण्याकरता तुम्हाला त्याच्या आणखी समीप यावे लागेल. ते कसे? स्तोत्रकर्त्याने प्रार्थना केली: “हे परमेश्‍वरा, तुझे मार्ग मला दाखीव; तुझ्या वाटा मला प्रगट कर.” (स्तोत्र २५:४) बायबल आणि संस्थेच्या प्रकाशनांचा व्यक्‍तिगत अभ्यास तुम्हाला देवाशी चांगल्याप्रकारे परिचित व्हायला मदत करू शकेल. नियमितरीत्या मनापासून प्रार्थना करणे देखील महत्त्वाचे आहे. “त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा,” असे स्तोत्रकर्ता आपल्याला आर्जवतो. (स्तोत्र ६२:८) आणि मग तुमच्या प्रार्थनांना उत्तर मिळू लागल्यावर तुम्हाला, देव तुमच्यामध्ये रस घेत असल्याचे जाणवेल. यामुळे तुम्हाला त्याच्या नजीक असल्यासारखे वाटेल.

परीक्षा आणि समस्या येतात तेव्हा देखील तुम्हाला देवाच्या जवळ जाण्याची संधी मिळेल. तुम्हाला वेगवेगळ्या आव्हानांना, विश्‍वासाच्या परिक्षांना तोंड द्यावे लागेल; जसे की आजारपण, शाळेत आणि कामाच्या ठिकाणी दबाव किंवा आर्थिक अडचणी. सेवेत भाग घेणे, सभांना उपस्थित राहणे किंवा तुमच्या मुलांबरोबर बायबलचा अभ्यास करणे यासारखा नित्याचा ईश्‍वरशासित परिपाठसुद्धा तुम्हाला जड वाटू लागेल. एकट्यानेच ह्‍या समस्यांना तोंड देत राहू नका! देवाकडे मदतीसाठी विनंती करा, त्याच्याकडे सल्ला व मार्गदर्शन मागा. (नीतिसूत्रे ३:५, ६) त्याच्या पवित्र आत्म्यासाठी विनंती करा! (लूक ११:१३) देवाचे प्रेमळ साहाय्य तुम्ही जसे अनुभवू लागाल तसतसे तुम्ही त्याच्या जवळ जाल. स्तोत्रकर्ता दावीदाने म्हटले: “परमेश्‍वर किती चांगला आहे ह्‍याचा अनुभव घेऊन पाहा; जो त्याच्यावर भाव ठेवितो तो पुरुष धन्य!”—स्तोत्र ३४:८.

ॲन्थनीचे काय झाले? तो आठवून सांगतो: “मला त्या वेळेची आठवण झाली जेव्हा मी यहोवाची इच्छा पूर्ण करणारे कितीतरी आध्यात्मिक ध्येय ठेवले होते. मला खूप वाईट वाटले. पण या सर्व दुःखात आणि निराशेत मला यहोवाच्या प्रीतीची आठवण झाली. यहोवाला प्रार्थना करायला मला जरा वेळ लागला, पण मी प्रार्थना केली; त्याच्यासमोर माझं संपूर्ण अंतःकरण मोकळं केलं, त्याची क्षमा मागितली. मी बायबलचे वाचन देखील सुरू केले; मी किती तरी गोष्टी विसरून गेलो होतो आणि यहोवाबद्दल मला किती कमी माहिती होती हे मला समजलं.” ॲन्थनीची शिक्षा अजून तरी संपलेली नाही, पण तरी त्याला स्थानीय साक्षीदारांकडून मदत मिळते व तो आध्यात्मिकरीत्या बरा होत चालला आहे. कृतज्ञपूर्वकतेने ॲन्थनी म्हणतो: “यहोवा आणि त्याच्या संस्थेचे शतशः आभार. मी माझे जुने मनुष्यत्व उतरवू शकलो व दररोज नवीन मनुष्यत्व धारण करण्यास झटत असतो. यहोवासोबतचा माझा नातेसंबंध आता मला कमालीचा बहुमोल वाटतो.”

तुमच्या सेवेत आध्यात्मिक प्रगती

येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना ‘राज्याच्या सुवार्तेचे’ प्रचारक होण्याची आज्ञा दिली. (मत्तय २४:१४) सुवार्तेचा अगदी नवीन प्रचारक या नात्याने सेवेत तुम्हाला कमीच अनुभव असेल. तेव्हा, तुमची सेवा ‘पूर्ण’ करण्यासाठी तुम्ही कशी प्रगती करू शकाल?—२ तीमथ्य ४:५.

एक मार्ग आहे, सकारात्मक मनोवृत्ती विकसित करणे. प्रचाराचे कार्य “संपत्ति” आहे, एक विशेषाधिकार आहे असे समजण्याचा प्रयत्न करा. (२ करिंथकर ४:७) यहोवाबद्दलचे आपले प्रेम, एकनिष्ठा आणि सचोटी व्यक्‍त करण्याची ती एक संधी आहे. याद्वारे आपण शेजाऱ्‍यांबद्दलची चिंता देखील प्रकट करू शकतो. याबाबतीत निःस्वार्थीपणे सेवा केल्याने आपल्याला खरा आनंद मिळू शकतो.—प्रेषितांची कृत्ये २०:३५.

स्वतः येशूने प्रचार कार्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगला. इतरांना बायबल सत्य सांगणे त्याच्याकरता ‘अन्‍नासारखे’ होते. (योहान ४:३४) “माझी इच्छा आहे,” या त्याच्या शब्दांतून, इतरांना मदत करण्याच्या त्याच्या प्रेरणेचे संक्षिप्त वर्णन मिळू शकते. (मत्तय ८:३) येशूला लोकांबद्दल जिव्हाळा होता, खासकरून सैतानी जगाकडून ‘गांजलेल्या व पांगलेल्या’ लोकांबद्दल. (मत्तय ९:३५, ३६) तुम्हालाही आध्यात्मिकरीत्या अंधकारात असलेल्यांना व देवाच्या वचनातून प्रबोधनाची आवश्‍यकता असलेल्यांना मदत करण्याची “इच्छा” आहे का? मग तुम्ही, “जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा” या येशूच्या आज्ञेचे पालन करावयास प्रवृत्त व्हाल. (मत्तय २८:१९) होय, तुमची तब्येत आणि परिस्थिती अनुमती देईल त्याप्रमाणे या कार्यात पूर्ण भाग घ्यावयास तुम्ही प्रवृत्त व्हाल.

प्रगती करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे सेवेमध्ये नियमाने—शक्य असल्यास दर आठवडी भाग घेणे होय. असे केल्याने, कधीकधी सेवेत जाणाऱ्‍याच्या मनात असलेली भीती निघून जाऊ शकते. क्षेत्र सेवेत नियमाने भाग घेतल्याने इतर मार्गांनी देखील तुम्हाला फायदा होऊ शकतो. सत्याबद्दलची तुमची समज वाढेल, यहोवा आणि शेजाऱ्‍यांबद्दलची तुमची प्रीती वाढेल आणि राज्य आशेवर आपले लक्ष केंद्रित ठेवण्यात तुम्हाला मदत होईल.

परंतु, तुमच्या सध्याच्या परिस्थितीमुळे तुमचा प्रचार कार्यातील सहभाग खूपच मर्यादित असल्यास काय? तडजोडी शक्यच नसल्यास, जितकी तुम्हाला जमते तितकी, परंतु पूर्ण अंतःकरणाने केलेल्या तुमच्या सेवेवर यहोवा संतुष्ट आहे यामुळे तुम्हाला सांत्वन मिळू शकेल. (मत्तय १३:२३) तुम्ही कदाचित इतर मार्गांनी प्रगती करू शकाल, जसे की प्रचार करण्याच्या कौशल्यात तुम्ही सुधारणा करू शकता. याबाबतीत, मंडळीतील ईश्‍वरशासित सेवा प्रशाला आणि सेवा सभा खूपच चांगले प्रशिक्षण देतात. स्वाभाविकतः, सेवेमध्ये आपण जितके कार्यक्षम राहू तितकाच आपल्याला आनंद होईल आणि प्रतिफळ लाभेल.

तेव्हा बाप्तिस्मा झाल्यानंतर आध्यात्मिक प्रगती थांबू नये हे स्पष्ट आहे. प्रेषित पौलाने स्वर्गामध्ये अमर जीवन प्राप्त करण्याविषयी आपल्या आशेबद्दल असे लिहिले: “बंधूंनो, मी अद्यापि ते आपल्या कह्‍यांत घेतले असे मानीत नाही; तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून [ओढाताण करून], ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षिस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो; हेच एक माझे काम. तर जेवढे आपण पोक्‍त आहोत, तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ति ठेविली, तरी देव तेहि तुम्हाला प्रगट करील.”—फिलिप्पैकर ३:१३-१५.

होय सर्व ख्रिश्‍चनांनी, मग त्यांची स्वर्गामध्ये अमर जीवनाची आशा असो किंवा पृथ्वीवरील परादीसमधील सार्वकालिक जीवनाची आशा असो, जीवनाचे ध्येय प्राप्त करण्याकरता, जणू ‘ओढाताण’ केली पाहिजे, नेटाचा प्रयत्न केला पाहिजे! बाप्तिस्मा घेऊन तुम्ही केलेली सुरवात अतिशय उत्तम होती परंतु ती केवळ एक सुरवात आहे. आध्यात्मिक प्रगती करण्यास सतत झटत राहा. सभा आणि व्यक्‍तिगत बायबल अभ्यास याद्वारे “समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा.” (१ करिंथकर १४:२०) मानसिकरीत्या सत्याची ‘रुंदी, लांबी, उंची व खोली समजून’ घ्या. (इफिसकर ३:१८) तुम्ही केलेल्या प्रगतीमुळे तुम्हाला आता आनंद आणि सौख्य टिकवता तर येईलच शिवाय, देवाच्या नवीन जगात सुरक्षित स्थानही मिळवता येईल; जेथे देवाच्या स्वर्गीय राज्य शासनाखाली तुम्ही चिरकालापर्यंत प्रगती करू शकाल!

[२९ पानांवरील चित्र]

व्यक्‍तिगत अभ्यासासाठी वेळ काढण्याकरता शिस्तीची गरज आहे

[३१ पानांवरील चित्र]

सकारात्मक मनोवृत्ती बाळगल्याने सेवेमध्ये आपल्याला आनंद मिळेल

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा