जीवनाच्या मार्गावरील दिशाफलक
तुम्ही एखाद्या अनोळख्या रस्त्यावरून किंवा मार्गावरून जात असताना दिशाफलक पाहता तेव्हा तुम्हाला ते अडथळा वाटतात का? कदाचित नाही! उलट, भलत्याच ठिकाणी जाण्यापेक्षा योग्य त्या ठिकाणी जाता यावे म्हणून तुम्ही त्यांचा विचार कराल.
मग जीवनाच्या मार्गावरून जाताना काय? दिशाफलकांशिवाय आपण यशस्वीरीत्या प्रवास करू शकू का? देवाच्या एका प्राचीन संदेष्ट्याने याबाबतीत मानवाच्या मर्यादा ओळखल्या. तो म्हणाला: “हे देवा, आपल्या जीवनाचा आराखडा आखणे आणि आपल्या आयुष्याची वाटचाल ठरविणे हे माणसाच्या आवाक्याबाहेरचे आहे हे मला माहीत आहे.”—यिर्मया १०:२३, सुबोध भाषांतर.
मग, आवश्यक ते मार्गदर्शन कोठे मिळू शकेल? अशा मार्गदर्शनाचा विश्वसनीय स्रोत मानवाचा निर्माणकर्ता आहे व लाक्षणिक दिशाफलक बायबलमध्ये आढळतात. यहोवा आपल्या वचनाकरवी असे म्हणतो: “हाच मार्ग आहे; याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल; मग तुम्हाला उजवीकडे जावयाचे असो किंवा डावीकडे जावयाचे असो.”—यशया ३०:२१.
होय, देवाचे वचन जीवनाच्या प्रत्येक पैलूत विश्वसनीय मार्गदर्शन पुरवते. (यशया ४८:१७; २ तीमथ्य ३:१६, १७) परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे, बहुसंख्य मानव जीवनाच्या मार्गावर ईश्वरी मार्गदर्शनाविना स्वतंत्रपणे प्रवास करत आहेत. (मत्तय ७:१३) तरीसुद्धा, दिशाफलक जागचे हलणार नाहीत! मग जीवनाच्या रस्त्यावरून चालत असताना तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्याल का?