वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 १०/१ पृ. २४-२७
  • मला सोन्यापेक्षा उत्तम असे काही मिळाले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मला सोन्यापेक्षा उत्तम असे काही मिळाले
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अमेरिकेत मी गोंधळून जातो
  • भावंडांबरोबर भेट
  • कुटुंब आणि दफन
  • सत्य शिकणे
  • माझ्या जन्मस्थळाचा ठावठिकाणा लागणे
  • सत्याला प्रथम स्थान देणे
  • लहानपणापासून निर्माणकर्त्याचे स्मरण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • मला ऑस्ट्रेलियात खरे धन प्राप्त झाले
    सावध राहा!—१९९४
  • मी यहोवाची कशी उतराई होऊ?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • दृष्टी आणि अंतःकरण प्रतिफळावर लावणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 १०/१ पृ. २४-२७

मला सोन्यापेक्षा उत्तम असे काही मिळाले

चार्ल्स मिल्टन यांच्याद्वारे कथित

एके दिवशी पप्पा म्हणाले: “आपण चार्लीला अमेरिकेला पाठवू या. तिकडे झाडाला पैसा लागतो. तो तिकडे जाऊन कमवेल आणि आपल्याला पाठवेल!”

लोकांना वाटायचं, अमेरिकेतील रस्ते सोन्याचे आहेत. कारण त्या काळात पूर्व युरोपमधील जीवन त्यांच्यासाठी खूप हलाखीचं होतं. माझ्या आईवडिलांची थोडीशीच शेतजमीन होती आणि काही गाई आणि कोंबड्या होत्या. आमच्या घरात तेव्हा वीज, नळ काहीही नव्हतं. तसं कुणाकडेच नव्हतं म्हणा.

माझा जन्म जानेवारी १, १८९३ रोजी, म्हणजे जवळजवळ १०६ वर्षांपूर्वी होसोचेक येथे झाला. आमचं गाव ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्याचा भाग असलेल्या प्रांतातील गलिशियात होतं. आता होसोचेक पूर्व पोलंडमध्ये येते; स्लोव्हाकिया आणि युक्रेन येथून जवळच आहेत. तेथील थंडी गारठून टाकणारी होती आणि बर्फ तर विचारूच नका. मी सात वर्षांचा होतो तेव्हा, घरापासून अर्धा किलोमीटर चालून एका खाडीजवळ जाऊन कुऱ्‍हाडीनं बर्फ तोडून खड्डा करायचो आणि पाणी काढायचो. मग ते घरी आणायचो, आणि आई ते पाणी स्वयंपाकासाठी व धुण्यासाठी वापरायची. ती कपडे खाडीजवळच धुवायची; बर्फाच्या मोठमोठ्या लाद्यांवर कपडे रगडायची.

होसोचेकमध्ये शाळा नव्हत्या. पण मी पॉलीश, रशियन, स्लोवाक आणि युक्रेनियन बोलायला शिकलो. आम्ही ग्रीक ऑर्थोडॉक्समध्ये लहानाचे मोठे झालो व मी ऑल्टर बॉय म्हणून काम करायचो. परंतु लहान वयापासूनच मला पाळकांचा राग यायचा कारण ते म्हणायचे, की आपण शुक्रवारच्या दिवशी मांसाहार करायचा नाही, पण स्वतः मात्र खायचे.

संयुक्‍त संस्थानाला कामासाठी गेलेल्या आमच्या मित्रांपैकी काहीजण, आपल्या घराची दुरूस्ती करण्याकरता व शेतातील साधने विकत घेण्याकरता पैसा कमवून घरी आले होते. हेच पाहून माझेही पप्पा, अमेरिकेला दुसरी फेरी मारण्याचा विचार करणाऱ्‍या आमच्या शेजाऱ्‍यांबरोबर मला पाठवण्याचा विचार करू लागले. ही १९०७ ची गोष्ट आहे; तेव्हा मी १४ वर्षांचा होतो.

अमेरिकेत मी गोंधळून जातो

मग काय, आम्ही एका जहाजाने निघालो आणि दोन आठवड्यात अटलांटिकसुद्धा पार केला. त्यावेळी एखाद्याजवळ २० डॉलर असायला हवेत नाहीतर त्याला पुन्हा आपल्या मायदेशी पाठवले जायचे. माझ्याकडे २० डॉलरचा एक चांदीचा तुकडा होता, अशाप्रकारे मीही, अमेरिकेचा प्रवेशमार्ग, न्यूयॉर्क येथील एलीस द्वीप पार करणाऱ्‍या कोट्यवधी लोकांपैकी एक होतो. तिथं पोहंचल्यावर मला दिसलं की तिथं पैसे झाडावर लागलेले नव्हते की रस्ते सोन्याचे नव्हते. खरं तर पुष्कळ रस्ते कच्चेच होते!

आम्ही पेन्सिल्व्हेनिया, जॉन्सटाऊनला जाणारी ट्रेन धरली. माझ्याबरोबरचे लोक आधी तेथे जाऊन आले होते आणि मी राहू शकेन असे एक बोर्डिंग हाऊस देखील त्यांना माहीत होते. माझ्या थोरल्या बहिणीला शोधून काढण्याचा माझा विचार होता; ती पेन्सिल्व्हेनियात जेरोम येथे राहत होती; ते केवळ २५ किलोमीटर दूर होते हे मला नंतर कळले. पण मी, जेरोम ऐवजी येरोम म्हणायचो, कारण माझ्या मातृभाषेत “ज” ला “य” म्हणतात. येरोम हे नाव कुणालाच माहीत नव्हतं; आणि मी असा या परक्या देशात आलो होतो, मला धड इंग्रजीसुद्धा बोलता येत नव्हतं आणि माझ्याकडे जास्त पैसे देखील नव्हते.

माझी रोजची सकाळ नोकरी शोधण्यातच जायची. एम्प्लॉयमेंट ऑफिसबाहेर नोकरीसाठी रांगेने उभे असलेल्यांपैकी केवळ दोघातिघांनाच नोकरी मिळायची. म्हणून मग मी रोज बोर्डिंग हाऊसला काही पुस्तकांच्या साहाय्याने इंग्रजी शिकण्यासाठी परत यायचो. कधीकधी बारीकसारीक कामं मिळायची; असेच कित्येक महिने गेले आणि माझ्याकडचा पैसा संपून गेला.

भावंडांबरोबर भेट

एकदा मी रेल्वेस्टेशनच्या शेजारीच बार असलेल्या एका हॉटेलसमोरून चाललो होतो. जेवणाचा काय सुगंध येत होता! पाच सेंटचा एक मोठा बियरचा ग्लास जो घेईल त्याला सँडविच, हॉटडॉग आणि इतर पदार्थ फुकट मिळतील. लहान मुलांना मद्य विकत घेण्याची परवानगी नव्हती तरी हॉटेलच्या मालकाला माझी दया आली आणि त्याने मला बियर विकत दिली.

मी खात बसलो होतो तेव्हा काही लोक असं म्हणत आत आले, “अरे लवकर पिऊन घ्या रे, जेरोमची ट्रेन येतेय.”

मी त्यांना विचारलं: “येरोम का?”

ती माणसं मला म्हणाली, “नाही, जेरोम.” माझी बहीण तिथंच राहत असल्याचं मला तेव्हा समजलं. खरं तर, बारमध्ये मी एका माणसाला भेटलो जो माझ्या बहिणीच्या घराजवळच राहत होता! मग मीसुद्धा एक ट्रेन तिकीट घेतलं आणि शेवटी माझ्या बहिणीला भेटलो.

माझी बहीण आणि तिचा नवरा, कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्‍यांसाठी एक बोर्डिंग हाऊस चालवत होते; मी पण त्यांच्याबरोबर राहू लागलो. मला त्यांनी एक नोकरी मिळवून दिली; खाणीत पाणी शिरू नये म्हणून लावलेल्या पंपावर लक्ष ठेवायचं ते काम होतं. पंप बंद पडला की मेकॅनीकला बोलवायचं माझं काम होतं. यासाठी मला दिवसाला १५ सेंट मिळायचे. मग मी, रेलरोडचं काम केलं, विटभट्टीत काम केलं, एवढच काय तर, इन्शूरन्स एजंट म्हणूनही काम केलं. तेथून मी, पिट्‌सबर्ग येथे गेलो; तेथे माझा भाऊ स्टीव राहायचा. तेथे आम्ही पोलादाच्या कारखान्यात काम केलं. पण घरी पाठवण्याइतका पैसा मी कधीच कमवू शकलो नाही.

कुटुंब आणि दफन

एकदा कामाला जाताना, एका घरासमोर मी एका तरुणीला काम करताना पाहीलं; ती तिथं काम करायची. मी स्वतःला म्हणालो, ‘वा, काय देखणी आहे ही.’ तीन आठवड्यांनंतर, म्हणजे १९१७ मध्ये तिचा अर्थात हेलनचा आणि माझा विवाह झाला. पुढील दहा वर्षांत, आमच्या संसारवेलीवर सहा कळ्या उमलल्या, त्यातील एक कळी उमलायच्या आतच कोमेजून गेली.

सन १९१८ मध्ये, पिट्‌सबर्ग रेल्वेने मला ट्रॅम ड्रायव्हर म्हणून काम दिलं. ट्रॅम जिथं ठेवल्या जायच्या त्या इमारतीजवळच एक कॅफे होते; तेथे कॉफी मिळायची. ते कॅफे चालवणाऱ्‍या दोन ग्रीक माणसांना, तुम्ही काय ऑर्डर दिली आहे याची पर्वा नसायची, ते मात्र तुम्हाला बायबलमधून प्रचार करण्यात दंग असायचे. मी त्यांना म्हणायचो: “तुम्ही मला हे सांगताय का, की सगळं जग चूक आणि फक्‍त तुम्ही दोघंच बरोबर?”

“बायबलमधून पाहा!” असं ते मला म्हणायचे. पण त्यावेळी काय ते माझं समाधान करू शकले नाहीत.

सन १९२८ मध्ये माझी प्रिय हेलन आजारी पडली. माझ्या मुलांना योग्य लक्ष मिळावे म्हणून मी त्यांना जेरोमला माझ्या बहिणीकडे सोडून आलो. आतापर्यंत त्यांनी शेती विकत घेतली होती. मी वरच्यावर मुलांना भेटायला जायचो, आणि त्यांच्या जेवणासाठी लागणारा पैसा दर महिन्याला द्यायचो. त्यांना कपडेही पाठवायचो. पण मग, हेलनची तब्येत बिघडतच चालली आणि ऑगस्ट २७, १९३० रोजी ती आम्हाला सोडून गेली.

मला एकटं एकटं आणि मी उद्‌ध्वस्त झालो असं वाटायला लागलं. दफनविधीची व्यवस्था करायला मी पाळकांकडे गेलो तर ते मला म्हणाले: “तुम्ही या चर्चचे नाहीत. तुम्ही जवळजवळ वर्ष झालं वर्गणी दिलेली नाही.”

मी त्यांना सांगितलं, की माझी बायको खूप दिवसांपासून आजारी होती, मी माझ्या मुलांना पैसे देत होतो जेणेकरून ते जेरोम येथील चर्चला देणगी देऊ शकतील. तरीपण, दफनविधी करायला पाळकाने तयार व्हायच्या आधी मला माझी मागची वर्गणी भरण्याकरता ५० डॉलर उधार घ्यावे लागले. माझ्या मेव्हणीकडे हेलनला श्रद्धांजली वाहण्याकरता एकत्र जमलेल्या मित्रांच्या आणि परिवाराच्या वतीने मास म्हणण्यासाठी पाळकाने आणखी १५ डॉलर मागितले. मला काय ते १५ डॉलर लागलीच मिळाले नाहीत; पण पाळकाने एका अटीवर मास म्हणायला तयारी दाखवली, मी ते पैसे पगाराच्या दिवशी त्याला द्यायचे.

पगाराचा दिवस आला तेव्हा मला माझ्या मुलांना शाळेचे शूज आणि कपडे घ्यावे लागले. दोन आठवड्यांनंतर तो पाळक माझ्या ट्रॅममध्ये बसला. तो मला म्हणाला: “तू मला १५ डॉलर द्यायचे आहेस हे विसरू नकोस.” आणि मग खाली उतरल्यावर त्याने मला धमकी दिली: “मी तुझ्या मालकाकडे जातो आणि तुझ्या पगारातून माझे पैसे कापून घेतो.”

संध्याकाळी काम संपवून मी माझ्या मालकाकडे गेलो आणि सर्व हकीकत त्याला सांगितली. माझा मालक कॅथलिक होता, पण तरी तो मला म्हणाला: “तो पाळक इथं आलाच तर मी त्याला बरोबर करतो!” त्यानंतर मी विचार करू लागलो, ‘पाळकाला फक्‍त आपल्याकडून पैसा हवा, पण आपल्याला मात्र ते बायबलमधून काहीच शिकवत नाहीत.’

सत्य शिकणे

दुसऱ्‍या एका वेळी मी पुन्हा त्या ग्रीक माणसांच्या कॅफेत गेलो आणि पाळकाबरोबर माझं काय झालं होतं त्याची चर्चा केली. यामुळे मी बायबल विद्यार्थ्यांबरोबर अभ्यास करू लागलो; यहोवाच्या साक्षीदारांना या नावानं लोक ओळखायचे. मी रात्ररात्र बायबल आणि बायबल प्रकाशने वाचून काढले. पाळकानं आम्हाला सांगितलं तसं हेलन परगेटरी मध्ये यातना भोगत नाही तर ती मृत्यूमध्ये निद्रा घेत आहे हे मला समजले. (ईयोब १४:१३, १४; योहान ११:११-१४) खरंच, मला सोन्यापेक्षा उत्तम काही तरी मिळालं होतं—सत्य!

काही आठवड्यांनंतर, पिट्‌सबर्ग येथील गार्डन थिएटरमधील बायबल विद्यार्थ्यांबरोबरच्या माझ्या पहिल्या सभेत मी हात वर करून म्हणालो: “मी इतकी वर्ष चर्चला जात होतो, पण त्यापेक्षा आता एका रात्रीत मी बायबलविषयी किती काय काय शिकलो.” नंतर जेव्हा त्यांनी विचारलं की दुसऱ्‍या दिवशी प्रचार कार्यात कोणाला भाग घ्यायचा आहे तेव्हा मी माझा हात वर केला.

ऑक्टोबर ४, १९३१ रोजी मी पाण्याने बाप्तिस्मा घेण्याद्वारे यहोवाला माझे जीवन समर्पित केले. तोपर्यंत मी एक घर भाड्याने घेतले, माझ्या मुलांना घरी आणले आणि त्यांचा सांभाळ करण्याकरता एक बाई ठेवली. माझ्यावर कुटुंबाच्या जबाबदाऱ्‍या होत्या तरी, जानेवारी १९३२ ते जून १९३३ पर्यंत मी ऑग्झीलरी असे संबोधल्या जाणाऱ्‍या एका खास प्रकारच्या सेवेत भाग घेतला; त्यादरम्यान मी प्रत्येक महिन्याला ५० ते ६० तास लोकांबरोबर बायबलची चर्चा करण्यात खर्च केले.

यादरम्यान, एक देखणी बाई नेहमी कामाला जाता येता माझ्या ट्रॅममध्ये यायची; माझं तिच्याकडे लक्ष जायचं. रेअर-व्ह्यूव मिररमध्ये आमच्या दोघांची नजरानजर व्हायची. अशाप्रकारे मेरी आणि मी भेटलो. आमच्या भेटी सुरू झाल्या आणि ऑगस्ट १९३६ मध्ये आम्ही विवाहबद्ध झालो.

मी कामाच्या ठिकाणी सिनियर असल्यामुळे सन १९४९ मध्ये मला शिफ्ट निवडता येत होती; यामुळे मी पूर्ण वेळेची सेवा म्हणजेच पायनियरींग करू शकलो. माझ्या धाकट्या मुलीनं, जीननं, १९४५ मध्ये पायनियरींगला सुरूवात केली; आम्ही एकत्र मिळून पायनियरींग केली. कालांतराने, जीनची ओळख न्यूयॉर्क, ब्रुकलिन येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयात अर्थात बेथेलमध्ये सेवा करणाऱ्‍या सॅम फ्रेन्डबरोबर झाली.a १९५२ मध्ये त्यांचा विवाह संपन्‍न झाला. मी पिट्‌सबर्ग येथे माझी पायनियरींग चालू ठेवली; पुष्कळ बायबल अभ्यास चालवले, एकदा तर दर आठवडी १४ कुटुंबांबरोबर! सन १९५८ मध्ये मी ट्रॅम चालवण्याच्या कामातून निवृत्त झालो. त्यानंतर तर पायनियरींग करणं सोपं होतं कारण आता मला आठ तास काम करायची गरज नव्हती.

सन १९८३ मध्ये मेरी आजारी पडली. मी तिची चांगल्याप्रकारे काळजी घेण्याचा प्रयत्न केला कारण जवळजवळ ५० वर्षे तिने माझी काळजी घेतली होती. आणि सप्टेंबर १४, १९८६ मध्ये ती आम्हाला सोडून गेली.

माझ्या जन्मस्थळाचा ठावठिकाणा लागणे

सन १९८९ मध्ये जीन आणि सॅम यांनी मला त्यांच्याबरोबर पोलंडमधील अधिवेशनांना नेले. मी ज्या ठिकाणी लहानाचा मोठा झालो होतो तेथेही आम्ही गेलो. रशियनांनी जेव्हा त्या भागावर कब्जा मिळवला होता तेव्हा त्यांनी सर्व गावांची नावं बदलवून टाकली होती आणि लोकांना इतर गावी पिटाळून लावलं होतं. असंच माझा एक भाऊ इस्तांबूल आणि एक बहीण रशियात आले होते. आणि मी जेव्हा माझ्या गावाचं नाव सांगितलं तेव्हा तेथील लोकांना ते माहीत नव्हतं.

दुरून मला काही डोंगर दिसले जे मला माझ्या परिचयाचे वाटले. आम्ही जसजसं जवळ गेलो तसतसं काही खूणा ओळखीच्या वाटल्या—एक टेकडी, रस्त्यावरील एक फाटा, एक चर्च, नदीवरील पूल. आणि काय आश्‍चर्य, अचानक आम्हाला एक पाटी दिसली, त्यावर लिहिलं होतं, “होसोचेक!” अलीकडेच, कम्युनिस्ट लोकांचा प्रभाव कमी झाला होता आणि गावांची जुनी नावं पूर्ववत करण्यात आली होती.

आमचं घर काही राहिलं नव्हतं; पण अंगणात एक चूल मात्र दिसली, ती अर्धवट पुरली होती. मी एका मोठ्या झाडाकडे बोट दाखवून म्हणालो: “ते पाहा ते झाड. अमेरिकेला जाण्यापूर्वी मी ते लावलं होतं. किती विशाल झालं आहे आता!” मग, आम्ही कब्रस्थानाकडे गेलो, आमच्या कुटुंबातील सदस्यांची नावं शोधत होतो पण आम्हाला कुणाचीच आढळली नाहीत.

सत्याला प्रथम स्थान देणे

सन १९९३ मध्ये जीनच्या पतीचं निधन झालं तेव्हा, तुमची काळजी घेण्याकरता मी बेथेल सोडून येऊ का असं जीननं मला विचारलं. तर मी तिला म्हणालो, की तिनं तसं केल्यास ती घोडचूक असेल आणि माझे विचार अजूनही तसेच आहेत. मी १०२ वर्षांचा होईपर्यंत एकटाच होतो; पण मग मला एका नर्सिंग होममध्ये हलवावं लागलं. मी अजूनही पिट्‌सबर्ग येथील बेलेव्यू मंडळीत वडील या नात्याने कार्य करत आहे; रविवारच्या दिवशी बांधव मला राज्य सभागृहातील सभांना ने-आण करतात. माझं प्रचार कार्य आता मर्यादित असले तरी दुर्बळ पायनियर यादीत माझं नाव आहेच.

या सर्व वर्षांत मला, पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षणासाठी वॉच टावर संस्थेने योजलेल्या खास शाळांत भाग मिळाल्याचा आनंद होतो. गेल्या डिसेंबर महिन्यात मला, मंडळीच्या वडिलांसाठी असलेल्या राज्य सेवा प्रशालेतील काही सत्रांना उपस्थित राहण्याचा सुयोग प्राप्त झाला. आणि गेल्या एप्रिल ११ तारखेला जीनने मला ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारक विधी साजरा करण्यासाठी नेले; हा असा एक सण आहे ज्यात सहभाग घेण्याचे मला १९३१ पासून आवडत आले आहे.

मी ज्यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास केला त्यातील काहीजण आता वडील या नात्याने कार्य करीत आहेत, काही दक्षिण अमेरिकेत मिशनरी म्हणून आहेत तर काहीजण आपल्या मुलांबरोबर देवाची सेवा करणारे आजीआजोबा आहेत. माझ्या मुलांपैकी तिघेजण—मेरी जेन, जॉन आणि जीन—तसेच त्यांची अनेक मुले व नातवंडे यहोवा देवाची विश्‍वासूपणे सेवा करीत आहेत. माझी एकच प्रार्थना आहे, की माझ्या दुसऱ्‍या मुलीनं आणि बाकीच्या नातवंडांनी व पतवंडांनीसुद्धा यहोवाची सेवा करण्यास सुरवात करावी.

मी १०५ वर्षांचा झालो आहे आणि अजूनही सर्वांना बायबलचा अभ्यास करण्यास व त्यांनी शिकलेल्या गोष्टी इतरांना सांगण्यास उत्तेजन देत आहे. होय, मला याची पूर्ण खात्री पटली आहे की तुम्ही यहोवाच्या नजीक राहिला तर तुम्ही केव्हाही निराश होणार नाही. मग तुम्हीही सोन्यापेक्षा उत्तम अर्थात सत्याचा उपभोग घेऊ शकाल; हेच सत्य आपल्याला आपला जीवन-दाता यहोवा देव याच्याबरोबर अमूल्य नातेसंबंध राखणे शक्य करते.

[तळटीपा]

a सॅम फ्रेन्ड यांची जीवन कथा ऑगस्ट १, १९८६ च्या टेहळणी बुरूज (इंग्रजी) नियतकालिकात पृष्ठ २२-६ वर आहे.

[२५ पानांवरील चित्र]

मी ट्रॅम चालवत असताना

[२६ पानांवरील चित्र]

मी सध्या राहतो ते नर्सिंग होम

[२७ पानांवरील चित्र]

सन १९८९ मध्ये आम्हाला दिसलेली पाटी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा