वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 १०/१ पृ. ८-१३
  • “यहोवा, दयाळू व कृपाळू देव”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “यहोवा, दयाळू व कृपाळू देव”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बंडखोर मुलगा घर सोडतो
  • दूरच्या देशात नाहीसा
  • उधळा पुत्र शुद्धीवर येतो
  • आनंदमय स्वागत
  • यहोवाच्या दयेचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • हरवलेल्या मुलाची गोष्ट
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • “उधळ्या” पुत्राला तुम्ही कशी मदत कराल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • तुम्हाला खरोखरच अर्थ समजला आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 १०/१ पृ. ८-१३

“यहोवा, दयाळू व कृपाळू देव”

“परमेश्‍वर, परमेश्‍वर [“यहोवा,” NW] दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर.”—निर्गम ३४:६.

१. (अ) ज्यांचे प्रियजन शुद्ध उपासनेपासून भटकले आहेत, अशांना बायबल कोणते सांत्वन देते? (ब) चुका करणाऱ्‍यांना यहोवा कशाप्रकारे पाहतो?

“आपल्याला ख्रिस्ती मंडळीशी काही घेणंदेणं नाही, असं माझ्या मुलीनं मला स्पष्ट सांगितलं. हे ऐकल्यानंतर कित्येक दिवस, आठवडे आणि महिने माझं कोणत्या गोष्टीत मन लागत नव्हतं. मला मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं,” ह्‍या मुलीच्या ख्रिस्ती वडिलांचे हे शब्द. आपली एखादी प्रिय व्यक्‍ती शुद्ध उपासनेच्या मार्गापासून भटकत असल्याचे आपण पाहतो तेव्हा आपल्या मनाला खूप लागते. तुम्हाला अशाप्रकारचा अनुभव आला आहे का? असल्यास हे जाणून तुम्हाला सांत्वन मिळेल, की यहोवाही तुमच्या अनुभवातून गेला आहे. (निर्गम ३:७; यशया ६३:९) परंतु चुका करणाऱ्‍या लोकांना तो कशाप्रकारे पाहतो? बायबल दाखवते, की आपली कृपापसंती पुन्हा प्राप्त करावी, असे यहोवा त्यांना दयाळूपणे आवाहन देतो. मलाखीच्या दिवसांतील बंडखोर यहुद्यांना त्याने अशी विनंती केली: “मजकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळेन.”—मलाखी ३:७.

२. दया हा यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वाचा एक अंगभूत भाग आहे हे बायबल कसे दाखवून देते?

२ देवाची दया म्हणजे नक्की काय हे मोशेला सियोन पर्वतावर स्पष्ट करण्यात आले. तेथे यहोवाने स्वतःविषयी असे म्हटले, की “दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर.” (निर्गम ३४:६) या घोषणेतून स्पष्ट होते, की दया हा यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वाचा एक अंगभूत भाग आहे. “सर्वांनी पश्‍चात्ताप करावा,” अशी त्याची इच्छा आहे, असे ख्रिस्ती प्रेषित पेत्राने लिहिले. (२ पेत्र ३:९) अर्थात, देवाच्या दयेला मर्यादा आहे. मोशेला सांगण्यात आले होते, की देव ‘अपराधी जनांची मुळीच गय करणार नाही.’ (निर्गम ३४:७; २ पेत्र २:९) असे असले तरी, “देव प्रीति आहे,” आणि दया हा त्या गुणाचा एक महत्त्वपूर्ण पैलू आहे. (१ योहान ४:८; याकोब ३:१७) यहोवा “आपला राग सर्वकाळ” ठेवणार नाही आणि त्याला “दया करण्यात आनंद वाटतो.”—मीखा ७:१८, १९.

३. शास्त्री आणि परुशी यांच्याप्रमाणे न वागता येशूने दयेकडे कोणत्या दृष्टीने पाहिले?

३ येशू म्हणजे त्याच्या स्वर्गीय पित्याचे जणू परिपूर्ण प्रतिबिंबच. (योहान ५:१९) पाप करणाऱ्‍यांना त्याने दयेने वागवले. याचा अर्थ त्याने त्यांच्या पातकांकडे कानाडोळा केला, असे नाही. तर दुर्बल, आजारी, अपंग लोकांना पाहून जसा त्याचा जीव कळवळायचा, तसाच या पापी लोकांबद्दलही त्याला कळवळा वाटे. (पडताळा मार्क १:४०, ४१.) होय, येशूने दयेचा उल्लेख देवाच्या नियमशास्त्रातील ‘प्रमुख गोष्टींमध्ये’ केला. (मत्तय २३:२३) उलटपक्षी, शास्त्री आणि परुशी यांनी केलेल्या न्यायामध्ये दयेचा कोणत्याही प्रकारचा लवलेश नसे. पातक्यांबरोबर येशूचे उठणेबसणे पाहून त्यांनी अशी तक्रार केली: “हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो.” (लूक १५:१, २) येशूने त्याच्यावर आरोप लावणाऱ्‍यांना तीन उदाहरणे दिली, प्रत्येक उदाहरणाने देवाच्या दयेवर जोर दिला.

४. येशूने कोणती दोन उदाहरणे दिली आणि त्यांमागचा त्याचा उद्देश काय होता?

४ पहिल्या उदाहरणात येशूने अशा मनुष्याविषयी सांगितले, जो हरवलेल्या एका मेंढराला शोधण्यासाठी बाकीच्या ९९ मेंढरांना सोडून देतो. यामागचा त्याचा मुद्दा? “ज्यांना पश्‍चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणाऱ्‍या आनंदापेक्षा पश्‍चात्ताप करणाऱ्‍या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल.” हरवलेल्या रुप्याचे नाणे शोधणाऱ्‍या आणि ते सापडल्यानंतर आनंद करणाऱ्‍या एका स्त्रीविषयी येशूने त्याच्या दुसऱ्‍या उदाहरणात सांगितले. त्याने हा दाखला कसा लागू केला? “पश्‍चात्ताप करणाऱ्‍या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो.” येशूने तिसरे उदाहरण दाखल्याच्या स्वरूपात सांगितले.a येशूने सांगितलेल्या या दाखल्याला काही लोक उत्तम लघुकथा मानतात. या दाखल्याचा विचार केल्याने देवाची दया समजण्यास आणि तिचे अनुकरण करण्यास आपल्याला मदत होईल.—लूक १५:३-१०.

बंडखोर मुलगा घर सोडतो

५, ६. यत्किंचितही कदर नसल्याचे येशूच्या तिसऱ्‍या उदाहरणातील तरुणाने कसे दाखवले?

५ “कोणाएका मनुष्याला दोन मुलगे होते; त्यांपैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाहीत तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला; आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली.”—लूक १५:११-१३.b

६ या धाकट्या मुलाने यत्किंचितही कदर दाखवली नाही. त्याने पहिल्यांदा आपल्या वारशाने मिळणाऱ्‍या संपत्तीची मागणी केली आणि मग त्याने ती सर्व संपत्ती ‘चैनबाजीच्या जीवनात’ उधळून टाकली. ‘चैनबाजीचे जीवन’ या भाषांतरित ग्रीक शब्दाचा अर्थ “बेबंदशाहीची जीवनशैली” असा होतो. एक विद्वान असे म्हणतात, की हा वाक्यांश “नैतिकतेचा पूर्ण अधःपात दर्शवतो.” याच कारणास्तव, येशूच्या दाखल्यातील या तरुणाला बहुतेक वेळा उधळा असे म्हणण्यात आले आहे, या शब्दातून अशी व्यक्‍ती समोर येते, जी निष्काळजीपणे खर्च किंवा अपव्यय करते.

७. उधळ्या पुत्राप्रमाणे आज कोण आहेत आणि हे लोक “दूर देशी” स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न का करतात?

७ आज या उधळ्या पुत्राप्रमाणे लोक आहेत का? होय. खेदाची गोष्ट म्हणजे काही लोकांनी आपल्या स्वर्गीय पित्याचे, यहोवाचे ‘घर’ त्यागले आहे. (१ तीमथ्य ३:१५) यांपैकी काही लोकांना असे वाटते, की देवाच्या घरातील वातावरण हे इतके मर्यादा घालणारे आहे, की त्यांच्यावर सदोदित असणारी यहोवाची दृष्टी संरक्षक वाटण्याऐवजी विघ्नकारीच जास्त वाटते. (पडताळा स्तोत्र ३२:८.) एका ख्रिस्ती स्त्रीचा विचार करा. बालपणापासून तिला बायबलची तत्त्वे माहीत होती, पण नंतर ती मद्यार्क आणि अंमली पदार्थांच्या आहारी गेली. तिच्या जीवनातील या वाईट काळाकडे पाहताना ती म्हणते: “कोणाच्याही मदतीविना मला जीवन जगता येतं, हे मला दाखवून द्यायचं होतं. मला जे वाटेल तेच मला करायचं होतं. दुसऱ्‍यांचं ऐकून घेण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती.” उधळ्या पुत्राप्रमाणे या तरुणीनेही स्वातंत्र्य मिळवले. खेदाची गोष्ट म्हणजे, अशास्त्रवचनीय गोष्टींत गोवल्यामुळे तिला ख्रिस्ती मंडळीतून बाहेर काढावे लागले.—१ करिंथकर ५:११-१३.

८. (अ) देवाच्या दर्जांच्या विरुद्ध जीवन जगण्याची इच्छा असलेल्यांकरता कोणती मदत पुरवली जाऊ शकते? (ब) उपासना करण्याच्या एखाद्या व्यक्‍तीच्या निर्णयाविषयी एखाद्याने गांभीर्याने का विचार केला पाहिजे?

८ जेव्हा एखादी समविश्‍वासू व्यक्‍ती देवाच्या दर्जांच्या विरुद्ध जगण्याची इच्छा व्यक्‍त करते तेव्हा ती गोष्ट खरोखरच अंतःकरणाला पीळ पाडणारी असते. (फिलिप्पैकर ३:१८) असे होते तेव्हा वडील आणि आध्यात्मिक योग्यता प्राप्त केलेले इतर जण चूक केलेल्या व्यक्‍तीला सुधारण्याचा खूप प्रयत्न करतात. (गलतीकर ६:१) तथापि, ख्रिस्ती शिष्यत्वाचे जू स्वीकारण्याची कोणावर जबरदस्ती केली जात नाही. (मत्तय ११:२८-३०; १६:२४) मुले समजदार होतात तेव्हा उपासना करण्यातील त्यांचा निर्णय हा व्यक्‍तिगत असतो. अखेरीस, आपल्यांपैकी प्रत्येक व्यक्‍ती स्वतंत्र नैतिक प्राणी असून सर्वांना आपआपला हिशेब देवाला द्यावा लागेल. (रोमकर १४:१२) अर्थातच, आपण ‘जे पेरतो त्याचेच आपल्याला पीक मिळेल.’ येशूच्या दृष्टान्तातील उधळ्या पुत्राला याचा प्रत्यय यायला जास्त वेळ लागला नाही.—गलतीकर ६:७, ८.

दूरच्या देशात नाहीसा

९, १०. (अ) उधळ्या पुत्राच्या परिस्थितीत कोणता बदल झाला आणि त्याने कशाप्रकारे प्रतिक्रिया व्यक्‍त केली? (ब) आज शुद्ध उपासनेचा त्याग करणाऱ्‍यांची दैन्यावस्था उधळ्या पुत्राप्रमाणे कशी आहे ते सांगा.

९ “त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला; तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाश्‍याजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठविले. तेव्हा डुकरे खात असत त्यांतल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई; त्याला कोणी काही देत नसे.”—लूक १५:१४-१६.

१० हा उधळा पुत्र कंगाल झाला होता, तरी घरी परतण्याचा विचार त्याने केला नाही. तर तो तेथील एका रहिवाश्‍याकडे जाऊन त्याने डुकरे चारावयाची नोकरी केली. मोशेच्या नियमशास्त्रानुसार डुक्कर अशुद्ध प्राणी असल्यामुळे अशाप्रकारची नोकरी करणे यहुद्यांना मान्य नसावे. (लेवीय ११:७, ८) कदाचित उधळ्या पुत्राचाही विवेक अस्वस्थ झाला असेल, पण त्याला आपल्या या भावना दडपून टाकणे भाग होते. नाहीतरी, एका लाचार परदेशी माणसाला हा स्थानिक मालक सहानुभूती दाखवेल अशी अपेक्षा तो थोडीच करू शकत होता? शुद्ध उपासनेचा सरळ मार्ग त्यागणाऱ्‍या आजच्या अनेक लोकांची परिस्थिती उधळ्या पुत्राच्या दैन्यावस्थेप्रमाणेच आहे. बहुतेक वेळा, हे लोक अशा कार्यांत गोवले जातात ज्यांना त्यांनी पूर्वी वाईट काम समजलेले असते. उदाहरणार्थ, वयाच्या १७ व्या वर्षी एका मुलाने ख्रिस्ती संगोपनाच्या विरुद्ध बंड पुकारले. तो मान्य करतो, की “इतक्या वर्षांची बायबल आधारित शिकवण अनैतिकतेमुळे आणि अंमली पदार्थांच्या दुरुपयोगामुळे मोडीत निघाली.” लुटमार आणि खून यांमुळे त्याला काही काळातच तुरुंगवास भोगावा लागला. तो नंतर आध्यात्मिकरीत्या बरा झाला, तरी ‘पापाचे क्षणिक सुख भोगल्यामुळे’ त्याला किती मोठी किंमत मोजावी लागली!—पडताळा इब्री लोकांस ११:२४-२६.

११. उधळ्या पुत्राची हालाकीची परिस्थिती कशी होती आणि आज काही लोकांना जगाच्या मोहक गोष्टी ‘पोकळ भुलथापेसारख्या’ कशा दिसून आल्या आहेत?

११ या उधळ्या पुत्राची परिस्थिती इतकी हालाकीची झाली होती, की “त्याला कोणी काही देत नसे.” त्याचे नवे मित्र आता कोठे होते? तो आता अगदी कंगाल झाला होता, त्याचे सर्व मित्र जणू त्याचा “द्वेष” करत होते. (नीतिसूत्रे १४:२०) त्याचप्रमाणे, विश्‍वासापासून बहकलेल्या अनेक लोकांना हे दिसून येते, की या जगातील मोहक गोष्टी आणि त्याचे दृष्टिकोन ‘पोकळ भुलथापेसारखे’ आहेत. (कलस्सैकर २:८) एका तरुणीने काही काळ देवाच्या संघटनेकडे पाठ फिरवली होती. ती म्हणते: “यहोवाच्या मार्गदर्शनाशिवाय मी मोठे दुःख आणि मानसिक अस्वस्थता अनुभवत होते. मी जगाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, पण मी खरं तर त्यांच्यासारखी नसल्यामुळे मी त्यांच्यातून बाहेर फेकले गेले. रस्ता चुकलेल्या लेकराप्रमाणे माझी अवस्था झाली होती, मार्गदर्शनासाठी मला वडील हवे होते. मला यहोवाची गरज आहे हे मला तेव्हा कळले. तेथून पुढे त्याच्यापासून विलग होऊन स्वतंत्रपणे जगण्याची माझी कधीच इच्छा झाली नाही.” येशूच्या उदाहरणातील उधळ्या पुत्राचेही असेच झाले.

उधळा पुत्र शुद्धीवर येतो

१२, १३. शुद्धीवर येण्यास काही लोकांना आज कोणत्या गोष्टींनी मदत केली आहे? (पेटी पाहा.)

१२ “नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या किती तरी मोलकऱ्‍यांस भाकरीची रेलचेल आहे! आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे; आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही; आपल्या एका मोलकऱ्‍याप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला.”—लूक १५:१७-२०.

१३ हा उधळा पुत्र ‘शुद्धीवर आला.’ काही काळ तो स्वप्नाच्या दुनियेत असल्याप्रमाणे ऐषआरामात जगत होता. परंतु आता त्याला खऱ्‍या आध्यात्मिक परिस्थितीची जाण आली. तो मार्गभ्रष्ट झाला होता, तरी या तरुणाला अद्यापही आशा होती. त्याच्यामध्ये काही चांगले गुण सापडण्यासारखे होते. (नीतिसूत्रे २४:१६; पडताळा २ इतिहास १९:२, ३.) आज देवाचा कळप सोडून जाणाऱ्‍यांविषयी काय? त्यांना कोणतीही आशा नाही, त्यांनी देवाच्या पवित्र आत्म्याच्या विरुद्ध पाप केले आहे हे त्यांच्या बंडखोरीच्या प्रत्येक कृतीतून शाबीत होते, अशाप्रकारचे अनुमान काढणे खरोखरच योग्य असेल का? (मत्तय १२:३१, ३२) असे म्हणणे योग्य होणार नाही. स्वतःच्या स्वच्छंदी जीवनशैलीमुळे यांपैकी काहीजण गांजलेले आहेत आणि कालांतराने त्यांपैकी बहुतेक जन शुद्धीवर आले आहेत. एक बहीण देवाच्या संघटनेपासून दूर गेली होती. त्या काळाविषयी ही बहीण म्हणते: “मी कधीही म्हणजे एक दिवसही यहोवाला विसरले नाही. मी त्याला नेहमी अशी प्रार्थना करायचे, की त्याने मला कसेतरी, एखाद्या दिवशी सत्यात पुन्हा घ्यावं.”—स्तोत्र ११९:१७६.

१४. उधळ्या पुत्राने काय करायचे ठरवले आणि असे करण्याद्वारे त्याने नम्रता कशी दाखवली?

१४ पण मार्गभ्रष्ट झालेल्या लोकांना स्वतःच्या परिस्थितीविषयी काय करणे शक्य आहे? येशूच्या दाखल्यातील उधळ्या पुत्राने घरी परतण्याचे आणि आपल्या वडिलांच्या क्षमेची भीक मागण्याचे ठरवले. “आपल्या एका मोलकऱ्‍याप्रमाणे मला ठेवा,” असे आपल्या वडिलांना म्हणण्याचे त्याने ठरवले. मोलकऱ्‍याला दररोज पगार दिला जाई आणि कोणत्याही दिवशी त्याला कामावरून कमी करता येत असे. त्याचे स्थान दासापेक्षा खालचे होते. दास हा कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे होता. म्हणूनच पुत्राचे स्थान आपल्याला परत मिळावे, असा विचार उधळ्या पुत्राच्या मनात आला नाही. आपल्या वडिलांप्रती पुनःस्थापित निष्ठा प्रत्येक दिवशी प्रदर्शित करता यावी म्हणून तो कोणतेही खालचे स्थान स्वीकारण्यास तयार होता. परंतु, उधळ्या पुत्राने अपेक्षा केली नव्हती असे काहीतरी होणार होते.

आनंदमय स्वागत

१५-१७. (अ) आपल्या मुलाला पाहिल्यानंतर त्याच्या वडिलांनी काय केले? (ब) उधळ्या पुत्राला त्याच्या वडिलांनी झगा, अंगठी आणि जोडे दिले यावरून काय दिसून येते? (क) मुलाच्या वडिलांनी मेजवानीची योजना केली यावरून काय दिसून येते?

१५ “तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे; आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही; पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणून ह्‍याला घाला, ह्‍याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला, आणि पुष्ट वासरू आणून कापा; आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू; कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे. मग ते आनंदोत्सव करू लागले.”—लूक १५:२०-२४.

१६ आपल्या मुलाने आध्यात्मिकरीत्या बरे व्हावे, असे कोणत्याही प्रेमळ पालकाला वाटेल. यास्तव, आपण या उधळ्या पुत्राच्या वडिलांची कल्पना करू शकतो, ते आपल्या घराच्या समोरील वाटेवर आपल्या मुलाच्या येण्याची टक लावून वाट पाहात असतील; या आशेने, की आपला मुलगा कधीतरी घरी परतेल. आणि काय आश्‍चर्य, आस लावलेल्या वाटेवरून आपला मुलगा येत असल्याचे त्यांना दिसते! या मुलाचा पार अवतार झालेला असतो. तरी देखील त्याचे वडील “तो दूर आहे तोच” त्याला ओळखतात. चिंध्या झालेले त्याचे कपडे, त्याचा खिन्‍न चेहरा याच्या पलीकडे ते पाहतात, ते त्यांच्या मुलाला पाहतात आणि धावत जाऊन त्याला कवटाळतात!

१७ मुलाचे वडील त्याच्याजवळ येऊन पोहंचताच त्याच्या गळ्यात पडतात आणि त्याचे प्रेमाने मुके घेऊ लागतात. त्यानंतर आपल्या या मुलासाठी झगा, अंगठी आणि जोडे आणण्याकरता दासांना फर्मावतात. हा झगा काही साधासुधा नव्हता, तर तो “उत्तम” झगा होता—या उंची झग्यावर कदाचित नाजूक कलाकुसरीचे काम करण्यात आलेले असावे. असे कपडे मान्यवर पाहुण्यांना भेट म्हणून दिले जात. अंगठी आणि पायातील जोडे दास घालत नसल्यामुळे या मुलाचे वडील हे स्पष्टपणे दाखवून देत होते, की ते त्यांच्या या मुलाचा कुटुंबाचा अविभाज्य सदस्य म्हणून पुन्हा स्वीकार करत होते. परंतु या मुलाच्या वडिलांनी एवढेच केले नाही. आपला मुलगा परत आल्यामुळे त्यांनी मेजवानीची योजना करण्याची आज्ञा दिली. हे स्पष्ट आहे, की मुलाला क्षमा करायची म्हणून किंवा मुलगा परत आल्यामुळे त्याला क्षमा करणे भाग आहे म्हणून त्यांनी क्षमा केली नाही; त्याला क्षमा करावी हे त्यांना मनापासून वाटत होते. त्यामुळे वडिलांना आनंद झाला.

१८, १९. (अ) उधळ्या पुत्राच्या दाखल्यातून तुम्ही यहोवाविषयी काय शिकता? (ब) यहुदा आणि जेरुसलेम यांसोबत यहोवाने केलेल्या व्यवहारातून दिसल्याप्रमाणे, तो पापी लोकांनी परत येण्याची “वाट” कशी पाहतो?

१८ यास्तव, उधळ्या पुत्राचा दाखला आपण उपासना करत असलेल्या देवाविषयी आपल्याला काय शिकवतो? पहिली गोष्ट म्हणजे, यहोवा “दयाळू व कृपाळू . . . मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर” आहे. (निर्गम ३४:६) खरोखरच, दया हा देवाचा एक प्रमुख गुण आहे. गरजू लोकांसोबत तो सामान्यपणे दयेने वागतो. त्यानंतर, येशूचा दाखला आपल्याला हे शिकवतो, की यहोवा “क्षमाशील” आहे. (स्तोत्र ८६:५) पापी लोकांना दया दाखवली जावी म्हणून तो त्यांचे हृदयपरिवर्तन होण्याची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असतो.—२ इतिहास १२:१२; १६:९.

१९ उदाहरण म्हणून देवाने इस्राएलसोबत केलेल्या व्यवहाराचा विचार करा. यहोवाच्या प्रेरणेने यशया संदेष्ट्याने यहुदा आणि जेरुसलेमला ‘पायाच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत जखमांनी भरलेले’ संबोधले. तरीही, त्याने असे म्हटले: “तुम्हावर कृपा करावी म्हणून यहोवा वाट पाहील, आणि तुम्हावर दया करावी म्हणून उंचावला जाईल.” (तिरपे वळण आमचे.) (यशया १:५, ६; ३०:१८, पं.र.भा.; ५५:७; यहेज्केल ३३:११) येशूच्या दाखल्यातील वडिलांप्रमाणे यहोवा जणू ‘वाट पाहतो.’ आपले घर त्यागलेल्या लोकांनी परतावे म्हणून तो त्यांची मोठ्या आतुरतेने वाट पाहतो. प्रेममय वडिलांकडून आपण याच गोष्टीची अपेक्षा करत नाही का?—स्तोत्र १०३:१३.

२०, २१. (अ) आज कित्येक लोक कशाप्रकारे देवाच्या दयेमुळे आकर्षित होतात? (ब) पुढील लेखात कशाची चर्चा करण्यात येईल?

२० प्रत्येक वर्षी कित्येक लोक यहोवाच्या दयेमुळे आकर्षित होऊन शुद्धीवर येतात आणि खऱ्‍या उपासनेकडे परततात. तेव्हा त्यांच्या प्रियजनांना किती आनंद होत असेल! उदाहरण म्हणून सुरवातीला उल्लेख केलेल्या ख्रिस्ती पित्याचा विचार करा. आनंदाची गोष्ट ही, की त्यांची मुलगी आध्यात्मिकरीत्या बरी झाली आणि आज पूर्ण-वेळेची सेविका आहे. या मुलीचे वडील म्हणतात: “या जुन्या व्यवस्थीकरणामध्ये माझ्याकरता यापेक्षा कोणता मोठा आनंद असू शकतो? दुःखाश्रूंचे केव्हाच आनंदाश्रूंमध्ये परिवर्तन झाले आहे.” अर्थातच, यहोवाही यामुळे आनंदी आहे.—नीतिसूत्रे २७:११.

२१ परंतु या उधळ्या पुत्राच्या दाखल्यातून आणखी काही शिकायचे आहे. शास्त्री व परुश्‍यांची निर्दयी तसेच दोष लावण्याची मनोवृत्ती आणि यहोवाची दया यांतील फरक स्पष्ट करण्यासाठी येशू हा दाखला येथेच संपवत नाही. त्याने हा फरक कसा स्पष्ट केला—याचा आपल्याकरता काय अर्थ होतो—याची चर्चा पुढील लेखात करण्यात येईल.

[तळटीपा]

a बायबलमध्ये सांगितलेले दाखले आणि इतर उदाहरणे प्रत्यक्षात घडलेच असतील असे नाही. याशिवाय, नैतिक धडे शिकवणे हा या गोष्टींमागचा उद्देश असल्यामुळे प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टीचा लाक्षणिक अर्थ शोधण्याची काहीही आवश्‍यकता नाही.

b This footnote is missing in vernacular

[उजळणी]

◻ दयेविषयी येशूची मनोवृत्ती परुश्‍यांच्या मनोवृत्तीपेक्षा वेगळी कशी होती?

◻ उधळ्या पुत्राप्रमाणे आज कोण आहेत आणि कसे?

◻ कोणत्या परिस्थितींमुळे उधळा पुत्र शुद्धीवर आला?

◻ पश्‍चात्ताप करणाऱ्‍या आपल्या मुलाला वडिलांनी कशी दया दाखवली?

[११ पानांवरील चौकट]

ते शुद्धीवर आले

एके काळी ख्रिस्ती मंडळीतून काढून टाकलेल्या लोकांना शुद्धीवर येण्यास कोणत्या गोष्टीने मदत केली आहे? खालील काही विवेचनांतून या प्रश्‍नाचे उत्तर मिळते.

“सत्य कुठं आहे, हे माझं मन मला अद्यापही सांगत होतं. इतकी वर्षं बायबलचा अभ्यास केल्याचा आणि ख्रिस्ती सभांना जाण्याचा माझ्यावर चांगलाच प्रभाव झाला होता. यहोवाला पाठ दाखवणं मला कुठपर्यंत शक्य होतं? त्यानं मला सोडलं नव्हतं, तर मी त्याला सोडलं होतं. अखेरीस मी हे मान्य केलं, की मी किती चुकीची आणि अडेल होते आणि यहोवाचं वचन नेहमी खरं ठरलं—‘तुम्ही जे पेराल त्याचीच तुम्ही कापणी कराल.’”—सी.डब्लू.

“माझी चिमुकली बोलायला लागली तेव्हा मला किती आनंद झाला होता. कारण यहोवा कोण आहे, त्याला प्रार्थना कशी करावी, हे तिला शिकवण्यासाठी मी किती अधीर झाले होते. मला झोपच येत नसे आणि एके रात्री मी गाडी घेऊन एका बगीच्यात गेले आणि तेथे रड रड रडले. मी खूप रडले आणि पुष्कळ काळानंतर पहिल्यांदा यहोवाला प्रार्थना केली. मला फक्‍त हे माहीत होतं, की माझ्या जीवनात यहोवा मला परत हवा होता आणि तो मला क्षमा करील, अशी माझी आशा होती.”—जी.एच.

“जेव्हा जेव्हा धर्माचा विषय निघायचा तेव्हा तेव्हा मी लोकांना म्हणायची, की सत्य शिकवणाऱ्‍या धर्माची मला निवड करावी लागल्यास मला यहोवाची साक्षीदार व्हायला आवडेल. परंतु मी त्यानंतर असे म्हणायचे, की मी पूर्वी यहोवाची साक्षीदार होते पण त्यानुसार मला जगता न आल्यामुळे मी तो धर्म सोडून दिला. याची जाण झाल्यानंतर मला अपराध्यासारखं वाटायचं आणि मी दुःखी व्हायची. मी अखेरीस हे मान्य केलं, की ‘माझी किती दयनीय अवस्था आहे. माझ्या जीवनात मला काही विशेष बदल करण्याची गरज आहे.’”—सी.एन.

पस्तीस वर्षांपूर्वी मला आणि माझ्या पतीला मंडळीतून बहिष्कृत करण्यात आलं होतं. त्यानंतर १९९१ मध्ये आम्हाला आश्‍चर्याचा एक सुखद धक्का बसला. आमच्या घरी दोघे वडील आले आणि यहोवाकडे आम्हाला कसं परत येता येईल हे त्यांनी आम्हाला सांगितलं. सहा महिन्यानंतर आम्हाला परत एकदा मंडळीत घेतलं गेलं. त्यावेळी आमच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. माझ्या पतीचं वय ७९ वर्षे आहे तर मी ६३ वर्षांची आहे.”—सी.ए.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा