“उधळ्या” पुत्राला तुम्ही कशी मदत कराल?
“आनंद करणे योग्य आहे कारण . . . हरवला होता तो सापडला आहे.”—लूक १५:३२.
१, २. (अ) काही तरुणांनी ख्रिस्ती सत्याला कशी प्रतिक्रिया दाखवली आहे? (ब) अशा परिस्थितीत असणाऱ्या आईवडिलांच्या व मुलांच्या भावना कशाप्रकारच्या असू शकतात?
“मला यहोवाचा साक्षीदार राहायचे नाही!” अनेक कष्ट झेलून आपल्या मुलांना, ख्रिस्ती मार्गात लहानाचे मोठे केल्यानंतर त्यांच्या तोंडून हे शब्द ऐकावे लागतात तेव्हा देवभीरू पालकांना साहजिकच धक्का बसतो. काही तरुण तर काहीही न सांगता सत्यापासून ‘वाहवत जातात.’ (इब्री लोकांस २:१) यांपैकी बरेच तरुण येशूच्या दृष्टान्तातील त्या उधळ्या पुत्रासारखे असतात, जो आपल्या पित्याचे घर सोडून दूर देशी जातो आणि पित्याकडून मिळालेली मालमत्ता उधळून टाकतो.—लूक १५:११-१६.
२ यहोवाच्या साक्षीदारांपैकी बहुतेकांना या समस्येला तोंड द्यावे लागत नाही; पण ज्यांना द्यावे लागते, त्यांचे दुःख सांत्वनापलीकडे असते. शिवाय सत्याचा मार्ग सोडून गेलेल्या तरुणाला देखील खूप दुःख सोसावे लागू शकते. आतल्या आत कदाचित त्याचा विवेक त्याला सतावत असेल. येशूच्या दृष्टान्तात उधळा पुत्र शेवटी ‘शुद्धीवर आला,’ ज्यामुळे साहजिकच त्याच्या पित्याला अतिशय आनंद झाला असेल. उधळ्या पुत्राप्रमाणे वागणाऱ्या तरुणांनी ‘शुद्धीवर यावे’ म्हणून आईवडील आणि मंडळीतील इतरजण त्यांना कोणत्याप्रकारे मदत करू शकतात?—लूक १५:१७.
काही मुले सत्य का सोडून देतात
३. काही तरुण कोणत्या कारणांमुळे ख्रिस्ती मंडळी सोडून जाण्याचा निर्णय घेतात?
३ ख्रिस्ती मंडळीत आनंदाने यहोवाची सेवा करणाऱ्या तरुणांची संख्या लाखोंच्या घरात आहे. मग काही तरुण ख्रिस्ती मंडळी का सोडून जाऊ इच्छितात? कदाचित जगातल्या आकर्षक गोष्टींपासून आपण वंचित राहतो ही भावना त्यांच्या मनात येत असेल. (२ तीमथ्य ४:१०) किंवा यहोवाच्या मेंढवाड्यातील सुरक्षित वातावरण त्यांना खूपच बंधनकारक वाटत असेल. दोषी विवेक, विरुद्धलिंगी व्यक्तीविषयी आकर्षण, किंवा आपल्या मित्रमैत्रिणींची मर्जी संपादन करण्याची इच्छा यांसारखी कारणे देखील तरुणांना यहोवाच्या कळपापासून दूर जाण्यास प्रवृत्त करू शकतात. एखादा तरुण कदाचित आपल्या आईवडिलांचा किंवा दुसऱ्या ख्रिस्ती व्यक्तीचा ढोंगीपणा पाहून देखील देवाची सेवा करण्याचे सोडून देऊ शकतो.
४. तरुण मुले सत्याचा मार्ग सोडून जाण्यामागचे मुख्य कारण कोणते असते?
४ मूल विद्रोहीपणे विचार करू लागते किंवा वागू लागते ही खरे तर आध्यात्मिक कमजोरीची लक्षणे असतात; यावरून मुलाच्या हृदयात काय आहे हे दिसून येते. (नीतिसूत्रे १५:१३; मत्तय १२:३४) पण सत्यापासून दूर जाण्याचे कारण कोणतेही असले तरीसुद्धा, मुख्य कारण म्हणजे त्या तरुणाने किंवा तरुणीने ‘सत्याचे अचूक ज्ञान’ घेतलेले नसते. (२ तीमथ्य ३:७, NW) यहोवाच्या उपासनेत समाविष्ट असलेली केवळ कर्तव्ये पार पाडण्यापेक्षा, तरुणांनी यहोवासोबत एक घनिष्ठ वैयक्तिक संबंध विकसित करणे महत्त्वाचे आहे. हे त्यांना कसे करता येईल?
देवाच्या जवळ या
५. तरुण व्यक्तीने देवासोबत वैयक्तिक संबंध जोडण्याकरता काय आवश्यक आहे?
५ शिष्य याकोबाने लिहिले, “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.” (याकोब ४:८) देवाजवळ येण्याकरता त्या तरुणाला किंवा तरुणीला देवाच्या वचनाबद्दल गोडी निर्माण करण्यास मदत केली पाहिजे. (स्तोत्र ३४:८) सुरवातीला त्या तरुण व्यक्तीला “दुधाची” म्हणजे देवाच्या वचनातील केवळ मूलभूत शिकवणींची गरज असते. पण ती व्यक्ती देवाच्या वचनात अधिकाधिक रुची घेऊ लागली आणि ‘जड अन्नाची,’ अर्थात गहन आध्यात्मिक माहितीची ओढ तिच्यात निर्माण झाली तर आध्यात्मिक परिपक्वतेपर्यंत पोचण्यास तिला फार काळ लागणार नाही. (इब्री लोकांस ५:११-१४; स्तोत्र १:२) एका तरुणाने कबूल केले की सुरवातीला तो पूर्णपणे जगिक गोष्टींत गुरफटून गेला होता पण नंतर त्याला आध्यात्मिक गोष्टींची किंमत समजू लागली. हा बदल कशाप्रकारे घडून आला? संपूर्ण बायबल वाचण्याचा सल्ला देण्यात आला तेव्हा तो नियमित बायबल वाचनाच्या आराखड्यानुसार नियमाने बायबल वाचन करू लागला. होय, यहोवासोबत जवळचा संबंध जोडायचा असेल तर त्याचे वचन नियमित वाचणे महत्त्वाचे आहे.
६, ७. आईवडील आपल्या मुलांना देवाच्या वचनाची आवड विकसित करण्यास कशी मदत करू शकतात?
६ आईवडिलांनी आपल्या मुलांना देवाच्या वचनाबद्दल आवड निर्माण करण्यास मदत करणे किती महत्त्वाचे आहे! कुटुंबात नियमित कौटुंबिक अभ्यास होत असूनही, एका किशोरवयीन मुलीने गुन्हेगार प्रवृत्तीच्या मुलामुलींसोबत मैत्री केली. कौटुंबिक अभ्यासाविषयी ती सांगते: “माझे वडील प्रश्न विचारायचे तेव्हा मी उत्तरे सरळ वाचून दाखवायचे, त्यांच्याकडे बघायचेसुद्धा नाही.” कौटुंबिक अभ्यासात केवळ ठराविक साहित्यावर प्रश्नोत्तर पद्धतीने चर्चा करण्याऐवजी सुज्ञ आईवडील शिकवण्याची कला उपयोगात आणतात. (२ तीमथ्य ४:२, NW) ही चर्चा आपल्याकरता उपयोगी आहे असे मुलांना जाणवले पाहिजे, तरच त्यांना तो अभ्यास आनंददायक वाटेल. तुम्ही आपल्या मुलांना वैयक्तिक मत व भावना व्यक्त करायला लावणारे प्रश्न विचारता का? चर्चा करत असलेल्या साहित्याचा व्यावहारिक उपयोग कसा करता येईल हे सांगण्यास मुलांना प्रोत्साहन द्या.a
७ शिवाय, शास्त्रवचनांवरील चर्चा उत्साहपूर्ण असली पाहिजे. शक्य असल्यास, बायबलमधील घटना किंवा गोष्टी लहान मुलांकडून नाटकरूपात दाखवण्याचा प्रयोग तुम्ही करू शकता. चर्चेत उल्लेख केलेल्या घटना प्रत्यक्ष जेथे घडल्या त्या ठिकाणांचे व तेथील परिस्थितीचे चित्र डोळ्यापुढे उभे करण्यास मुलांना मदत करा. यासाठी नकाशे किंवा तक्ते उपयोगी ठरू शकतात. होय, कल्पनाशक्तीच्या साहाय्याने कौटुंबिक अभ्यास उत्साहपूर्ण व वैविध्यपूर्ण बनवता येतो. आईवडिलांनी यहोवासोबत आपल्या स्वतःच्या नातेसंबंधाचेही परीक्षण केले पाहिजे. ते स्वतः जसजसे यहोवाच्या समीप येतील तसतसे ते आपल्या मुलांनाही असे करण्यास चांगल्याप्रकारे मदत करू शकतील.—अनुवाद ६:५-७.
८. प्रार्थना, देवाजवळ येण्याकरता कशी मदत करू शकते?
८ प्रार्थना देखील देवाच्या जवळ येण्यास मदत करते. चौदा पंधरा वर्षांच्या एका मुलीला एकीकडे ख्रिस्ती जीवनाचा मार्ग तर दुसरीकडे तिच्या विश्वासांशी सहमत नसलेले तिचे सोबती यांत निवड करणे अतिशय कठीण वाटत होते. (याकोब ४:४) तिने काय केले? ती कबूल करते, “पहिल्यांदा, मी यहोवाला अगदी मनापासून प्रार्थना केली.” आपल्या प्रार्थनेचे उत्तर मिळाले आहे अशा निष्कर्षावर ती आली कारण मंडळीत तिला एक अशी मैत्रीण सापडली जिच्याजवळ ती आपले मन मोकळे करू शकली. यहोवा आपल्याला मार्ग दाखवत आहे याची जाणीव होऊन ती देवासोबत वैयक्तिक नातेसंबंध विकसित करण्याचा प्रयत्न करू लागली. आईवडील स्वतः अधिक मनःपूर्वक व अर्थपूर्ण प्रार्थना करण्याद्वारे आपल्या मुलांना मदत करू शकतात. कौटुंबिक प्रार्थना करताना आईवडिलांनी आपल्या मनातल्या भावना प्रामाणिकपणे व्यक्त केल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या आईवडिलांचा यहोवासोबत वैयक्तिक नातेसंबंध आहे हे मुलांना जाणवेल.
धीर धरा पण खंबीरपणे
९, १०. पथभ्रष्ट झालेल्या इस्राएल लोकांविषयी धीर धरण्याच्या बाबतीत यहोवाने कोणता आदर्श ठेवला?
९ एखादे मूल सत्यापासून दूर जाऊ लागते, तेव्हा तो किंवा ती लोकांना टाळण्याचा प्रयत्न करू लागेल किंवा बायबलमधून चर्चा करण्याच्या आईवडिलांच्या कोणत्याच प्रयत्नांना प्रतिसाद देणार नाही. अशा कठीण परिस्थितीत आईवडिलांनी काय करावे? यहोवाने प्राचीन इस्राएलच्या बाबतीत काय केले हे लक्षात घ्या. ‘ताठ मानेच्या’ इस्राएल लोकांना त्यांच्या स्वैराचारी मार्गाने जाण्यास सोडून देण्याआधी यहोवाने ९०० वर्षे त्यांचे दुर्वर्तन सहन केले. (निर्गम ३४:९; २ इतिहास ३६:१७-२१; रोमकर १०:२१) त्यांनी वारंवार यहोवाची “परीक्षा पाहिली” तरीसुद्धा तो त्यांच्याशी ‘कनवाळूपणे’ वागला. ‘त्याने आपला कोप वारंवार आवरला, आपला सगळा संताप भडकू दिला नाही.’ (स्तोत्र ७८:३८-४२) त्यांच्याशी व्यवहार करण्यात देवाने कोणतीही चूक केली नाही. प्रेमळ आईवडील यहोवाचे अनुकरण करतात, आणि आपल्या मुलांना मदत करण्याच्या प्रयत्नांना मूल लगेच प्रतिसाद देत नाही तेव्हा ते देखील धीर धरतात.
१० धीर धरण्याचा किंवा सहनशील असण्याचा अर्थ “बिघडलेल्या नातेसंबंधात सुधार होण्याची आशा न सोडणे” असाही होतो. धीर धरण्याच्या बाबतीत यहोवाने आपल्याकरता आदर्श ठेवला. त्याने स्वतः पुढाकार घेऊन इस्राएल लोकांकडे “वारंवार” आपल्या दूतांस पाठवले. “ते देवाच्या दूतांची टेर उडवून त्यांची वचने तुच्छ मानीत” तरीसुद्धा यहोवाला “आपल्या प्रजेवर . . . करुणा होती.” (२ इतिहास ३६:१५, १६) त्याने इस्राएल लोकांना आर्जवून म्हटले: “तुम्ही सगळे आपल्या कुमार्गांपासून . . . फिरा.” (यिर्मया २५:४, ५) पण आपल्या धार्मिक तत्त्वांच्या बाबतीत मात्र यहोवाने तडजोड केली नाही. इस्राएल लोकांना देवाकडे व त्याच्या मार्गांकडे परत ‘फिरण्यास’ सांगण्यात आले.
११. वाहवत चाललेल्या मुलाशी व्यवहार करताना आईवडील धीर धरण्यासोबतच खंबीर कसे राहू शकतात?
११ आईवडील देखील वाहवत चाललेल्या आपल्या मुलाविषयी लगेच आशा न सोडून देण्याद्वारे धीर धरण्यासंबंधी यहोवाचे अनुकरण करू शकतात. आशावादी दृष्टिकोन बाळगून ते आपल्या मुलासोबत सुसंवाद साधण्याकरता किंवा संवाद पुन्हा सुरू करण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात. धार्मिक तत्त्वांच्या बाबतीत हातमिळवणी न करता ते “वारंवार” आपल्या मुलाला सत्याच्या मार्गात परत येण्याचा आग्रह करू शकतात.
अल्पवयीन मूल बहिष्कृत झाल्यास
१२. आईवडिलांसोबत राहात असताना मंडळीतून बहिष्कृत झालेल्या मुलाप्रती त्यांची कोणती जबाबदारी आहे?
१२ आईवडिलांसोबत राहत असलेल्या अल्पवयीन मुलाने काही गंभीर पातक केले व त्याच्या अपश्चात्तापी वृत्तीमुळे त्याला मंडळीतून बहिष्कृत करण्यात आल्यास काय करावे? मूल आईवडिलांसोबत राहात असल्यामुळे त्याला देवाच्या वचनानुसार शिक्षण देण्याची व शिस्त लावण्याची जबाबदारी अजूनही त्यांच्यावर आहे. पण हे कसे केले जावे?—नीतिसूत्रे ६:२०-२२; २९:१७.
१३. आईवडील खासगी बायबल अभ्यासादरम्यान, चुकीच्या मार्गाला लागलेल्या आपल्या मुलाच्या हृदयाचा ठाव घेण्याचा कशाप्रकारे प्रयत्न करू शकतात?
१३ हे शिक्षण देणे व शिस्त लावणे खासगी बायबल अभ्यासादरम्यान केले जाऊ शकते, नव्हे, तेव्हाच करणे उत्तम ठरेल. आईवडिलांनी केवळ आपल्या मुलाची कठोर वृत्तीच पाहू नये तर त्याच्या हृदयात काय आहे हे ओळखण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. त्याचा आध्यात्मिक आजार कितपत वाढला आहे? (नीतिसूत्रे २०:५) त्याच्या हृदयातील अद्याप कोमल असलेल्या भागाचा ठाव घेता येईल का? कोणत्या शास्त्रवचनांचा परिणामकारकरित्या उपयोग केला जाऊ शकतो? प्रेषित पौल आपल्याला आश्वासन देतो: “देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याहि दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतु ह्यांचे परीक्षक असे आहे.” (इब्री लोकांस ४:१२) होय, चुकीच्या मार्गाने पुन्हा न जाण्यास मुलांना बजावणे पुरेसे नाही. उलट, आईवडील त्यांना आध्यात्मिकरित्या पुन्हा निरोगी होण्यास मदत करण्यात पुढाकार घेऊन हे ध्येय गाठेपर्यंत सतत त्यांना साहाय्य करू शकतात.
१४. चुकलेल्या मुलाने यहोवासोबत पुन्हा संबंध जोडण्याकरता कोणते पहिले पाऊल उचलले पाहिजे आणि हे पाऊल उचलण्याकरता आईवडील आपल्या मुलास कशी मदत करू शकतात?
१४ चुकलेल्या मुलाने यहोवासोबत आपला संबंध पुन्हा जोडणे गरजेचे आहे. त्याने जे पहिले पाऊल उचलले पाहिजे ते म्हणजे ‘पश्चात्ताप करणे व मागे वळणे.’ (प्रेषितांची कृत्ये ३:१९; यशया ५५:६, ७) घरात राहणाऱ्या मुलाला, तो विरोध करत असेल तरीसुद्धा पश्चात्ताप करण्यास मदत करण्यासाठी आईवडिलांनी स्वतः ‘सहनशील, सौम्यतेने शिक्षण देणारे’ असावे. (२ तीमथ्य २:२४-२६) त्यांनी बायबलमध्ये सांगितल्यानुसार त्याची “कानउघाडणी” करावी. “कानउघाडणी” असे भाषांतर केलेल्या ग्रीक शब्दाचे पर्यायी भाषांतर, ‘खातरी करणे’ असेही केले जाऊ शकते. (प्रकटीकरण ३:१९, NW; योहान १६:८) त्याअर्थी, कानउघाडणी करण्याचा अर्थ मुलाला त्याचे दुर्वर्तन पापपूर्ण आहे याची खातरी करून देणे. अर्थात, हे सोपे नाही. शक्य असल्यास आईवडील त्याच्या हृदयाला भिडेल असा सल्ला देण्यासाठी बायबलच्या अनुरूप असणाऱ्या सर्व मार्गांचा अवलंब करू शकतात. त्यांनी त्याला ‘वाईटाचा द्वेष करणे आणि बऱ्याची आवड धरणे’ का महत्त्वाचे आहे हे समजून घेण्यास मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (आमोस ५:१५) कदाचित तो ‘सैतानाच्या पाशातून सुटून शुद्धीवर येईल.’
१५. चुकलेल्या व्यक्तीचा यहोवासोबत नातेसंबंध पुनर्स्थापित करण्यात प्रार्थनेची कोणती भूमिका आहे?
१५ यहोवासोबत पुन्हा संबंध जोडण्याकरता प्रार्थना करणे अत्यावश्यक आहे. अर्थात, ख्रिस्ती मंडळीसोबत पूर्वी सहवास राखणारी एखादी व्यक्ती जर अपश्चात्तापी वृत्तीने पापी मार्गाने चालत आहे हे स्पष्ट असल्यास, तिच्याविषयी “विनंती करू” नये. (१ योहान ५:१६, १७, NW; यिर्मया ७:१६-२०; इब्री लोकांस १०:२६, २७) पण आईवडील या समस्येला तोंड देण्यासाठी बुद्धी देण्याची यहोवाला अवश्य विनंती करू शकतात. (याकोब १:५) बहिष्कृत झालेला तरुण अथवा तरुणी पश्चात्तापी आहे असे कदाचित स्पष्ट दिसून येत असेल पण त्याला किंवा तिला ‘देवासमोर येण्याचे [“बोलण्याचे,” NW] धैर्य’ नसेल; अशा वेळी आईवडील देवाला अशी प्रार्थना करू शकतात की त्यांच्या मुलाचे पाप क्षमा करणे त्याला योग्य वाटत असल्यास त्याची इच्छा पूर्ण व्हावी. (१ योहान ३:२१) या प्रार्थना ऐकताना त्या तरुण अथवा तरुणीला कदाचित याची जाणीव होईल की यहोवा खरोखर एक क्षमाशील देव आहे.b—निर्गम ३४:६, ७; याकोब ५:१६.
१६. बहिष्कृत झालेल्या तरुणांच्या कुटुंबियांना आपण कशाप्रकारे मदत करू शकतो?
१६ बाप्तिस्मा झालेला तरुण बहिष्कृत झाल्यास मंडळीतील सदस्यांकडून अशी अपेक्षा केली जाते की त्यांनी त्याची “संगत धरू नये.” (१ करिंथकर ५:११; २ योहान १०, ११) यामुळे त्याला कालांतराने “शुद्धीवर येऊन” यहोवाच्या मेंढवाड्यातील सुरक्षिततेत परतण्यास मदत मिळेल. (लूक १५:१७) तो देवाच्या संस्थेत परत येवो न येवो, मंडळीतील सदस्य बहिष्कृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना प्रोत्साहन देऊ शकतात. “समसुखदुःखी” होऊन त्यांच्याशी ‘कनवाळूपणे’ वागण्याचाच आपण सर्वांनी नेहमी प्रयत्न करावा.—१ पेत्र ३:८, ९.
इतरांनी कोणत्याप्रकारे मदत करावी
१७. वाहवत जाणाऱ्या मुलाला मदत करताना मंडळीतील सदस्य काय आठवणीत ठेवू शकतात?
१७ एखादा तरुण ख्रिस्ती मंडळीतून कदाचित बहिष्कृत झाला नसेल पण विश्वासात कमजोर झाला असेल, अशा वेळी काय करावे? प्रेषित पौलाने लिहिले, “एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते.” (१ करिंथकर १२:२६) अशा युवकाला मदत करण्याची सर्वांनी उत्सुकता दाखवली पाहिजे. अर्थात आध्यात्मिकरित्या कमजोर असणाऱ्या युवकाच्या संगतीने इतर तरुणांवर कुप्रभाव पडण्याची शक्यता असल्यामुळे सतर्क राहण्याची गरज आहे. (गलतीकर ५:७-९) एका मंडळीत आध्यात्मिकरित्या कमजोर झालेल्या काही तरुणांना मदत करण्याच्या उद्देशाने काही प्रौढांनी त्यांना, एकत्र मिळून लोकप्रिय संगीत वाजवण्याच्या मैफिलींत आमंत्रित केले. त्या तरुणांनी लगेच त्यांचे आमंत्रण स्वीकारले आणि त्यांना या मैफिली खूप आवडायच्या देखील. पण एकमेकांच्या प्रभावामुळे शेवटी त्या तरुणांनी मंडळीसोबत संबंध तोडला. (१ करिंथकर १५:३३; यहूदा २२, २३) आध्यात्मिकरित्या कमजोर झालेल्या मुलांना आध्यात्मिक मार्गदर्शन नसलेल्या सामाजिक मेळाव्यांतून नव्हे तर ज्यातून आध्यात्मिक गोष्टींविषयीची त्यांची गोडी वाढेल अशाप्रकारच्या सहवासांतून मदत मिळेल.c
१८. येशूच्या दृष्टान्तातील उधळ्या पुत्राच्या पित्याची मनोवृत्ती आपण कशी दाखवू शकतो?
१८ मंडळी सोडून गेलेला एखादा तरुण राज्य सभागृहात परत येतो, किंवा एखाद्या संमेलनाला येतो तेव्हा त्याला कसे वाटत असेल याची कल्पना करा. आपणही येशूच्या दृष्टान्तातील उधळ्या पुत्राच्या पित्याप्रमाणेच स्वागतशील मनोवृत्ती दाखवू नये का? (लूक १५:१८-२०, २५-३२) ख्रिस्ती मंडळी सोडून गेलेला एक किशोरवयीन मुलगा नंतर एका प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहिला तेव्हा त्याने म्हटले: “मला वाटले की सर्वजण माझ्यासारख्या व्यक्तीला टाळतील, पण भाऊबहिणी स्वतःहून माझ्याजवळ आले आणि त्यांनी माझे स्वागत केले. ही गोष्ट माझ्या मनाला स्पर्शून गेली.” त्याने पुन्हा बायबलचा अभ्यास सुरू केला आणि नंतर त्याचा बाप्तिस्मा झाला.
आशा सोडू नका
१९, २०. भटकलेल्या मुलांबद्दल आपण आशावादी मनोवृत्ती का बाळगावी?
१९ “उधळ्या” पुत्रासारख्या मुलांना ‘शुद्धीवर येण्यास’ मदत करण्यासाठी खूप धीर धरण्याची आवश्यकता आहे व आईवडिलांना आणि इतरांनाही हे कठीण आव्हान ठरू शकते. पण आशा सोडू नका. “कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभु आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करितो; कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.” (२ पेत्र ३:९) आपल्या लोकांनी पश्चात्ताप करावा व जीवन मिळवावे अशी यहोवाची इच्छा आहे असे बायबल आपल्याला आश्वासन देते. म्हणूनच तर त्याने पुढाकार घेऊन मानवांचा आपल्यासोबत समेट करण्यासाठी तरतूदही केली आहे. (२ करिंथकर ५:१८, १९) त्याने धीर धरल्यामुळेच आज लाखो लोकांना शुद्धीवर येणे शक्य झाले आहे.—यशया २:२, ३.
२० मग आईवडिलांनी देखील आपल्या भरकटलेल्या मुलांना शुद्धीवर येण्यास मदत करण्यासाठी बायबलच्या अनुरूप असलेल्या सर्व मार्गांचा अवलंब करू नये का? यहोवाचे अनुकरण करून, धीर धरा आणि त्याच वेळेस आपले मूल यहोवाकडे परत यावे या उद्देशाने काही विधायक पावले उचला. बायबल तत्त्वांना खंबीरपणे जडून राहा आणि मदतीकरता यहोवाला प्रार्थना करण्यासोबत प्रीती, न्याय आणि बुद्धी यांसारखे त्याचे गुण प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करा. निबर विद्रोही वृत्तीच्या अनेक तरुणांनी परत येण्याचे यहोवाचे प्रेमळ आमंत्रण स्वीकारले आहे; त्याचप्रमाणे, कोण जाणे एक दिवस तुमचा भटकलेला मुलगा किंवा मुलगी कदाचित देवाच्या सुरक्षित मेंढवाड्यात परत येईल.—लूक १५:६, ७.
[तळटीपा]
a मुलांना परिणामकारकरित्या शिकवण्याकरता अतिरिक्त सूचनांकरता टेहळणी बुरूज जुलै १, १९९९ अंकातील पृष्ठे १३-१७ पाहा.
b बहिष्कृत झालेल्या मुलांसाठी या प्रार्थना सार्वजनिकरित्या, मंडळीच्या सभेत केल्या जाणार नाहीत कारण या बहिष्कृत व्यक्तीच्या स्थितीविषयी इतरांना माहीत नसण्याची शक्यता आहे.—टेहळणी बुरूज (इंग्रजी), ऑक्टोबर १५, १९७९ पृष्ठ ३१ पाहा.
c विशिष्ट सूचनांकरता सावध राहा! (इंग्रजी) जून २२, १९७२ अंकातील पृष्ठे १३-१६ व सप्टेंबर २२, १९९६ अंकातील पृष्ठे २१-२३ पाहा.
तुम्हाला आठवते का?
• तरुण मुलेमुली मंडळी सोडून जाण्याच्या समस्येचे मूळ कारण काय असू शकते?
• लहान मुलांना यहोवासोबत वैयक्तिक नातेसंबंध जोडण्यासाठी कशाप्रकारे मदत केली जाऊ शकते?
• उधळ्या पुत्रासमान असलेल्या मुलांना मदत करताना आईवडिलांनी धीर धरणे का महत्त्वाचे आहे?
• उधळ्या पुत्राला परत येण्यासाठी मंडळीतले सर्वजण कशाप्रकारे मदत करू शकतात?
[१५ पानांवरील चित्र]
यहोवासोबत जवळचा संबंध विकसित करण्यासाठी त्याचे वचन वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे
[१५ पानांवरील चित्र]
आईवडिलांच्या मनःपूर्वक केलेल्या प्रार्थनांतून त्यांचा यहोवासोबत किती घनिष्ट नातेसंबंध आहे हे मुलांना जाणवेल
[१७ पानांवरील चित्र]
भटकलेले मूल ‘शुद्धीवर येते’ तेव्हा त्याचे स्वागत करा
[१८ पानांवरील चित्र]
तुमचे मूल यहोवाकडे परत यावे म्हणून विधायक पावले उचला