राज्य घोषकांचा वृत्तान्त
सुवार्तेची घोषणा करण्यात मागे हटू नका
युरोपीय शोधकर्त्यांनी व्हेनेझुएला आखातावर आणि माराकाइबो सरोवरावर पहिल्यांदा पाऊल ठेवले, तेव्हा समुद्र किनाऱ्यावर नजर जाईल तेथे, हिंदळणाऱ्या पाण्यात बांबूंवर असलेल्या गवताच्या लहान-लहान झोपड्याच झोपड्या त्यांना दिसत होत्या. हे दृश्य पाहिल्यानंतर इटलीच्या व्हेनिस शहराची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही, तेथील लोकसुद्धा समुद्रकिनाऱ्यावर आपली टुमदार घरे बांधतात. अशाप्रकारे स्पॅनिश भाषिक असलेल्या या शोधकर्त्यांनी या जागेचे नाव व्हेनेझुएला असे ठेवले ज्याचा अर्थ आहे “छोटासा व्हेनिस.”
आज, हा नयनरम्य देश एका दुसऱ्याच प्रकारच्या कामात—आध्यात्मिक कामात—गुंतलेला आहे. तेथील यहोवाचे साक्षीदार प्रत्येक उचित प्रसंगी राज्याचे बीज पेरण्यात अगदी व्यस्त आहेत. यामुळे तयार होणाऱ्या आध्यात्मिक पिकामुळे ‘पिकाच्या धन्याची’ अर्थात यहोवा देवाची स्तुती होत आहे.—मत्तय ९:३७, ३८.
जेव्हा एक प्रवासी पर्यवेक्षक व्हेनेझुएलाच्या वायव्येला असणाऱ्या सुला राज्यात गेले तेव्हा तेथील स्थानिक साक्षीदारांनी त्यांना जवळच्या टोआस नामक लहानशा बेटावर नेण्याची व्यवस्था केली होती. त्या बेटावर बोटीने जावे लागते. भल्या पहाटे अनेक लोक त्या बेटावर जाण्यासाठी बोटीची वाट पाहत रांगेत उभे होते. तेव्हा पर्यवेक्षकांची पत्नी, मेरी हिने त्यांच्यासोबत असलेल्या पूर्ण-वेळेच्या एका पायनियर बहिणीसोबत बोटीवर असलेल्या लोकांना प्रचार करण्याचे ठरवले. आणि यास ती बहीणही तयार झाली.
बोटीवर एका मेकॅनिकसोबत बोलून झाल्यानंतर मेरीने त्याला सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान पुस्तक दिले. तिने त्या मेकॅनिकला त्या पुस्तकातील “देवाला सन्मान देणारे कुटुंब उभारणे” हा अध्याय दाखवला तेव्हा त्याने त्या पुस्तकाचे मोल जाणले. या प्रकाशनाद्वारे तुमच्या घरी बायबल अभ्यास सुरू करता येईल, असे मेरीने त्याला सांगितले. त्याने पुस्तक घेतले आणि त्याच्या घरी भेट घेण्याकरता कोणा बांधवाची व्यवस्था करण्यात आली.
काही काळानंतर, त्या प्रदेशात खास एक दिवसाचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. सिनार नावा या मेकॅनिकला त्याची पत्नी आणि त्याच्या दोन तरुण मुलींसह संमेलनाला आलेले पाहिल्यानंतर मेरीला सुखद धक्काच बसला. कौटुंबिक बायबल अभ्यासाविषयी आपल्याला काय वाटते, असे मेरीने त्याच्या पत्नीला विचारले. तिचे उत्तर ऐकल्यानंतर मेरीला आश्चर्य वाटले.
तिने म्हटले: “आम्हाला सत्य शिकायला मिळालं म्हणून मी यहोवाचे खूप आभार मानते.” ती पुढे सविस्तरपणे सांगते: “तुम्ही जेव्हा माझ्या पतीशी बोलला तेव्हा ते बाहेरच्या एका बाईमुळे मला सोडायलाच निघाले होते. ते बेसुमार पित असत. काहीवेळा तर पिऊन धिंगाणा घालायचे. आमच्या या लहानशा वसाहतीत त्यांच्या या वागण्यानं सर्वांच्या नाकी नऊ आलं होतं. त्यांच्या डोक्यात भूतविद्येचंही खूळ शिरलं होतं. पण बायबल अभ्यासामुळे मिळालेल्या ज्ञानाने त्यांना त्यांच्या जीवनात मोठमोठे बदल करता आले. त्यांनी त्यांच्या सर्व वाईट सवयी सोडून दिल्या. त्यांच्या कॅथलिक आईवडिलांनी त्यांच्यात होणारा बदल पाहिला तेव्हा त्यांना आश्चर्य झाल्याशिवाय राहिलं नाही. त्यांना आता एक जबाबदार पती आणि पिता झाल्याचं पाहून माझे सासुसासरे आनंदी आहेत.”
सिनार नावाने १९९६ मध्ये बाप्तिस्मा घेतला आणि आता पूर्ण-वेळेचा सेवक म्हणून काम करत आहे. त्याची पत्नी, जेनी हिचाही १९९७ मध्ये बाप्तिस्मा झाला. बोटीवरील या मेकॅनिकमधील बदल त्या शहराच्या नगराध्यक्षालाही जाणवला आणि त्यानेही बायबल अभ्यासाची मागणी केली. बोटीची सकाळी सकाळी वाट पाहत असताना रांगेत उभ्या असलेल्या बहिणी सुवार्ता सांगण्यात मागे न हटल्यामुळे किती आनंदित झाल्या असतील!
[७ पानांवरील चित्रं]
बोटीवरील मेकॅनिकला सुवार्ता सांगितल्यामुळे आनंदविणारे परिणाम मिळाले