यहोवाच्या दयेचे अनुकरण करा
“जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीहि दयाळू व्हा.” —लूक ६:३६.
१. परुश्यांनी स्वतःचा निर्दयीपणा कसा दाखवला?
मानवांना देवाच्या प्रतिरूपात निर्माण केले असले, तरी बहुतेक वेळा देवाच्या दयेचे अनुकरण करण्यात ते उणे पडतात. (उत्पत्ति १:२७) उदाहरणार्थ, परुश्यांचाच विचार करा. वाळलेला हात असलेल्या एका मनुष्याला येशूने शब्बाथ दिवशी दयेने बरे केले तेव्हा या परुश्यांच्या गटाला आनंद असा झालाच नाही. उलटपक्षी “त्याचा घात कसा करावा,” अशी ते येशूच्या विरुद्ध आपसांत मसलत करू लागले. (मत्तय १२:९-१४) दुसऱ्या एका प्रसंगी येशूने एका जन्मांध मनुष्याला बरे केले. पुन्हा एकदा “परुश्यांतील कित्येक” जण येशूने दाखवलेल्या करुणेमुळे आनंदित झाले नाहीत. त्याऐवजी त्यांनी अशी तक्रार केली: “हा मनुष्य देवापासून नाही, कारण तो शब्बाथ पाळीत नाही.”—योहान ९:१-७, १६.
२, ३. ‘परुश्यांच्या खमिराविषयी जपून राहा’ असे येशूने म्हटले तेव्हा त्याचा काय अर्थ होता?
२ परुश्यांच्या पाषाणहृदयी मनोवृत्तीने मानवतेच्या विरुद्ध गुन्हा केला आणि देवाच्या विरुद्ध पाप केले. (योहान ९:३९-४१) याच कारणास्तव आपल्या शिष्यांना येशूने असा इशारा दिला, पांढरपेशी लोकांच्या आणि सदूकींसारख्या इतर धार्मिक लोकांच्या “खमिराविषयी जपून राहा.” (मत्तय १६:६) पातकाला किंवा भ्रष्टाचाराला सूचित करण्यासाठी बायबलमध्ये खमिराचा उपयोग करण्यात आला आहे. म्हणून येशू असे म्हणत होता, की ‘शास्त्री आणि परुश्यांची’ शिकवण शुद्ध उपासनेला भ्रष्ट करू शकते. कसे? त्यांच्या शिकवणींद्वारे लोकांना असा संदेश देण्यात येतो, की शास्त्री आणि परुश्यांचे तोंडी लहरी नियम आणि विधी म्हणजेच देवाचे नियमशास्त्र. असे करण्याद्वारे शास्त्री आणि परुशी दयेसारख्या ‘मुख्य गोष्टींकडे’ दुर्लक्ष करत होते. (मत्तय २३:२३) अनेक प्रकारचे विधी असलेल्या या धर्मामुळे देवाची उपासना करणे हे एक असह्य ओझे होऊन बसले.
३ उधळ्या पुत्राच्या आपल्या दाखल्याच्या दुसऱ्या भागात येशूने यहुदी धार्मिक नेत्यांची भ्रष्ट विचारसरणी उघड केली. येशूच्या दाखल्यातील वडील यहोवाला चित्रित करतात जे आपल्या पश्चात्तापी मुलाला क्षमा करण्यासाठी उत्सुक होते. परंतु या मुलाचा थोरला भाऊ ‘परुशी आणि शास्त्र्यांना’ सूचित करतो. थोरल्या मुलाच्या भावना आणि वडिलांच्या भावना यांत जमीनआस्मानाचा फरक होता.—लूक १५:२.
भावाचा राग
४, ५. उधळ्या पुत्राचा भाऊ कोणत्या अर्थाने ‘हरवला’ होता?
४ “त्याचा वडील मुलगा शेतात होता; तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायनवादन व नृत्य ह्यांचा आवाज ऐकला. तेव्हा त्याने एका चाकरास बोलावून विचारले, हे काय चालले आहे? त्याने त्याला सांगितले, तुमचा भाऊ आला आहे; आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट वासरू कापले आहे. तेव्हा तो रागावला आणि आत जाईना.”—लूक १५:२५-२८.
५ यावरून हे स्पष्ट होते, की येशूच्या दाखल्यातील केवळ उधळ्या पुत्राचेच चुकत होते असे नाही. एक पुस्तक असे म्हणते: “खरे तर दोन्ही मुलगे हरवले होते. धाकटा मुलगा हरवला होता तो अधार्मिकतेमुळे. आणि दुसरा मुलगा अंध झाला होता तो फाजिल धार्मिकतेमुळे.” ही गोष्ट लक्षात घ्या, की आपला भाऊ परत आला म्हणून हा थोरला भाऊ आनंदित झाला नाही, तर तो चक्क “रागावला.” “राग” याकरता असलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ रागाचा उद्रेक नसून मनात धुमसणारा राग आहे. हे उघड आहे, की उधळ्या पुत्राच्या थोरल्या भावाने स्वतःच्या मनात क्रोधाला घर करू दिले होते. त्याला असे वाटत होते, की अशा मनुष्यासाठी आनंदोत्सव करण्याची कोणतीही गरज नाही ज्याने खरे तर घर सोडायलाच नको होते.
६. उधळ्या पुत्राचा भाऊ कोणाला सूचित करतो आणि का?
६ उधळ्या पुत्राचा भाऊ अशा लोकांना सूचित करतो जे पातकी लोकांप्रती येशूने दाखवलेली करुणा आणि चिंता यांमुळे कुढत होते. स्वतःच्या फाजिल धार्मिकतेमुळे त्यांना येशूच्या दयेचे काहीच वाटले नाही. पातक्याला क्षमा केल्यानंतर जो आनंद स्वर्गात केला जातो तो आनंदही त्यांनी व्यक्त केला नाही. उलटपक्षी, येशूच्या दयेला पाहून त्यांचा तीळपापड झाला आणि ते आपल्या मनांत “वाईट कल्पना” करू लागले. (मत्तय ९:२-४) एके प्रसंगी या परुश्यांना इतका राग आला, की येशूने बरे केलेल्या मनुष्याला त्यांनी बोलावले आणि त्याला सभास्थानातून “बाहेर घालविले”—त्याला बहिष्कृत केले. (योहान ९:२२, ३४) ‘घरात जाण्यास तयार नसलेल्या’ उधळ्या पुत्राच्या भावाप्रमाणे यहुदी धार्मिक नेत्यांनी “आनंद करणाऱ्यांसोबत आनंद” केला नाही. (रोमकर १२:१५) आपल्या दाखल्यात येशूने या धार्मिक नेत्यांची धूर्त कारणमीमांसा उघड केली.
चुकीची कारणमीमांसा
७, ८. (अ) उधळ्या पुत्राच्या भावाला कशाप्रकारे पुत्रत्त्वाचा खरा अर्थ कळला नव्हता? (ब) थोरला मुलगा त्याच्या पित्याप्रमाणे कसा नव्हता?
७ “म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला. परंतु त्याने बापाला उत्तर दिले, पाहा, मी इतकी वर्षे तुमची सेवाचाकरी करीत आहे, आणि तुमची एकहि आज्ञा मी कधीच मोडिली नाही; तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूहि दिले नाही; पण ज्याने तुमची संपत्ति कसबिणीबरोबर खाऊन टाकली तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले.”—लूक १५:२८-३०.
८ उधळ्या पुत्राच्या भावाच्या वरील शब्दांवरून त्याला पुत्रत्त्वाचा खरा अर्थ कळला नव्हता हे स्पष्ट होते. नोकर जसा आपल्या मालकाची सेवा करतो तसाच तो आपल्या वडिलांची सेवा करत होता. ‘मी तुमची सेवाचाकरी केली आहे,’ असे त्याने आपल्या वडिलांना म्हटले. हे खरे आहे, की हा थोरला मुलगा आपल्या वडिलांचे घर सोडून गेला नाही किंवा त्याने आपल्या वडिलांची आज्ञाही कधी मोडली नाही. पण, त्याच्या वडिलांवर त्याचे प्रेम होते म्हणून तो त्यांच्या आज्ञेत राहिला का? आपल्या वडिलांची सेवा करण्यात त्याला खरोखरच आनंद मिळायचा का? की आपण जे करतो तेच पुरेसे आहे, चांगले आहे असे मानून तो समाधान मानू लागला होता; दुसऱ्या शब्दांत ‘शेतातील’ कामे आपण चोख बजावतो, याचाच अर्थ आपण चांगले पुत्र आहोत असे तो मानू लागला होता का? तो जर एकनिष्ठ मुलगा होता, तर मग त्याच्या वागण्यात त्याच्या वडिलांच्या मनोवृत्तीची छटा का झळकली नाही? आपल्या भावाला दया दाखवण्याची त्याला संधी मिळाली असताना त्याच्या हृदयाला दयेचा पाझर का फुटला नाही?—पडताळा स्तोत्र ५०:२०-२२.
९. यहुदी धार्मिक नेते थोरल्या मुलाप्रमाणे कसे होते ते सांगा.
९ हा थोरला मुलगा यहुदी धार्मिक नेत्यांना सूचित करतो. नियमांचे काटेकोरपणे पालन करत असल्यामुळे आपण देवाला एकनिष्ठ आहोत, असे त्यांना वाटत होते. आज्ञाधारकता महत्त्वाची आहे, हे मान्य. (१ शमुवेल १५:२२) परंतु धार्मिक विधींवर नको तितका जोर देऊन त्यांनी देवाच्या उपासनेला यांत्रिक स्वरूप दिले. ही एक निव्वळ पोकळ भक्ती होती जिच्यामध्ये खऱ्या आध्यात्मिकतेचा लवलेशही नव्हता. ते स्वतःच्या परंपरांनाच कवटाळून बसले होते. त्यांच्या हृदयात प्रेम असे नव्हतेच. याखेरीज, सामान्य माणसाला ते आपल्या पायाची धूळ समजत आणि “शापित” लोक असे संबोधून त्यांना हिणवतही. (योहान ७:४९) ज्यांचे मन देवापासून इतके दूर गेले आहे अशा धार्मिक नेत्यांचे काम पाहून देव खरोखरच प्रभावित कसा होऊ शकतो बरे?—मत्तय १५:७, ८.
१०. (अ) “मला दया पाहिजे, यज्ञ नको” हा सल्ला उचित का होता? (ब) दयेमध्ये उणीव असणे ही किती गंभीर बाब आहे?
१० येशूने परुश्यांना म्हटले: “मला दया पाहिजे, यज्ञ नको ह्याचा अर्थ काय, हे जाऊन शिका.” (मत्तय ९:१३; होशेय ६:६) वास्तविक महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या हे त्यांना उमगलेले नव्हते कारण दयेविना त्यांचा यज्ञ व्यर्थ ठरणार होता. ही खरोखरच एक गंभीर बाब होती कारण बायबल म्हणते, की ‘निर्दयी’ लोकांचा अशा लोकांमध्ये समावेश होतो ज्यांस देव “मरणास पात्र” समजतो. (रोमकर १:३१, ३२) यास्तव, या धार्मिक नेत्यांच्या वर्गाचा कायमचाच नाश होईल, असे येशूने जे म्हटले त्याचे आपल्याला आश्चर्य वाटत नाही. हे उघड आहे, की ही शिक्षा त्यांना त्यांच्या निर्दयीपणामुळे मिळाली होती. (मत्तय २३:३३) परंतु या वर्गातील काही लोकांना मदत करणे शक्य होते. आपल्या दाखल्याच्या शेवटी वडिलांनी त्यांच्या थोरल्या मुलाला जे सांगितले त्यावरून येशूने यहुदी विचारसरणीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. कसे ते पाहू या.
वडिलांची दया
११, १२. येशूच्या दाखल्यातील वडिलांनी त्यांच्या थोरल्या मुलाला समजावण्याचा कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या ‘तुझा भाऊ’ असे म्हणण्यात विशेष असे काय होते?
११ “त्याने त्याला म्हटले बाळा, तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस, आणि माझे जे काही आहे, ते सर्व तुझेच आहे; तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे; कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे.”—लूक १५:३१, ३२.
१२ या दाखल्यातील वडिलांनी “तुझा भाऊ” हा शब्दप्रयोग वापरला हे लक्षात घ्या. का? आपल्या वडिलांशी बोलताना या थोरल्या मुलाने उधळ्या पुत्राला “माझा भाऊ” असे न म्हणता, “तुमचा मुलगा” असे सुरवातीला म्हटल्याचे तुम्हाला आठवत असेल. तो कदाचित हे सांगण्याचा प्रयत्न करत होता, की त्याला आता त्याच्या भावाशी कोणतेही देणे घेणे नाही. यामुळे आपल्या थोरल्या मुलाला हे वडील सांगत होते: ‘हा केवळ माझा मुलगा नाही. तर तुझा भाऊ आहे. त्याच्या परत येण्याने तुला आनंद वाटण्यास हवा!’ येशूचे बोलणे यहुदी धार्मिक नेत्यांना खरे तर स्पष्ट समजण्यास हवे होते. ज्या पातकी लोकांना त्यांनी पाण्यात पाहिले, ते खरे तर त्यांचे “भाऊ” होते. हे खरे आहे, की “सदाचाराने वागणारा व पाप न करणारा असा धार्मिक पुरुष पृथ्वीवर आढळणार नाही.” (उपदेशक ७:२०) म्हणून या पांढरपेशी यहुदी लोकांना पापी लोकांच्या पश्चात्तापामुळे आनंद वाटण्यास हवा होता.
१३. येशूच्या दाखल्याचा अचानकपणे शेवट झाल्यामुळे आपल्यासमोर कोणता महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो?
१३ वडिलांच्या या विनंतीनंतर हा दाखला अचानकपणे संपतो. जणू काही येशू त्याचे ऐकणाऱ्यांना दाखल्याचा शेवट स्वतः लिहिण्याचे आवाहन देत आहे. थोरल्या मुलाने कशीही प्रतिक्रिया दाखवली असली, तरी ऐकणाऱ्या प्रत्येकाला असा प्रश्न विचारण्यात आला होता, ‘पापी व्यक्तीच्या पश्चात्तापामुळे स्वर्गात ज्याप्रकारे आनंद केला जातो त्याचप्रकारचा आनंद तुम्ही सुद्धा व्यक्त करणार का?’ आज ख्रिश्चनांकडेही या प्रश्नाचे उत्तर देण्याची संधी आहे. ते कसे?
देवाच्या दयेचे आज अनुकरण करणे
१४. (अ) दया दाखवण्याची बाब येते, तेव्हा इफिसकर ५:१ येथील पौलाचा सल्ला आपण कसा लागू करू शकतो? (ब) देवाच्या दयेविषयी कोणत्या गैरसमजुतीपासून आपल्याला सावध राहण्याची गरज आहे?
१४ पौलाने इफिसकरांना असा बोध केला: “देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा.” (इफिसकर ५:१) यास्तव, ख्रिस्ती या नात्याने आपण देवाच्या दयेची कदर करण्यास हवी, आपल्या हृदयांत ही दया खोलवर रुजण्यास हवी आणि मग इतरांसोबत वागताना हा गुण आपण प्रदर्शित करण्यास हवा. परंतु, एका गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे. देवाच्या दयेचा हा अर्थ होत नाही, की तो पातकाचे गांभीर्य कमी करतो. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती कदाचित अगदी थंडपणे असे म्हणेल, ‘मी पाप केले, तरी वाटेल तेव्हा मी देवाकडे क्षमा मागू शकतो आणि तो मला नक्कीच क्षमा करील.’ अशाप्रकारची मनोवृत्ती बाळगणे म्हणजे बायबल लेखक यहूदा याने म्हटल्याप्रमाणे ‘देवाच्या कृपेचा विपर्यास करणे होय.’ (यहूदा ४) यहोवा दयाळू असला, तरी अपश्चात्तापी पातक्यांशी व्यवहार करताना तो ‘त्यांची मुळीच गय करत नाही.’—निर्गम ३४:७; पडताळा यहोशवा २४:१९; १ योहान ५:१६.
१५. (अ) विशेषतः वडिलांना दयेमध्ये समतोल दृष्टिकोन ठेवण्याची का आवश्यकता आहे? (ब) हेतूपुरस्सर पाप करणाऱ्यास वडील खपवून घेत नाहीत, तेव्हा त्यांनी काय करण्याचा खास प्रयत्न केला पाहिजे आणि का?
१५ दुसरीकडे पाहता, आपल्याला दुसऱ्या टोकाची भूमिका घेण्यापासून दक्ष असण्याची गरज आहे—ज्या लोकांनी खरा पश्चात्ताप आणि स्वतःच्या पातकांबद्दल खरे दुःख व्यक्त केले आहे अशांसोबत कठोरतेने वागण्याच्या बाबतीत आणि त्यांचा न्याय करण्याच्या बाबतीत आपण दक्ष असले पाहिजे. (२ करिंथकर ७:११) यहोवाच्या मेंढरांची काळजी घेण्याचे काम वडिलांवर सोपवले असल्यामुळे त्यांनी समतोल दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे, विशेषतः न्यायाधिन प्रकरणांच्यावेळी. ख्रिस्ती मंडळीला शुद्ध ठेवणे अगत्याचे आहे आणि बहिष्कृत करण्याद्वारे ‘दुष्टाला घालवून देणे’ शास्त्रवचनीयरीत्या योग्य आहे. (१ करिंथकर ५:११-१३) त्याच वेळी, दया दाखवण्यास योग्य आधार असल्यास दया दाखवणे केव्हाही उत्तम. म्हणून वडील हेतूपुरस्सर पाप करणाऱ्याचे खपवून घेत नाहीत, त्यावेळी ते न्यायाच्या मर्यादेत प्रेमाने आणि दयेने कार्य करण्याचा खास प्रयत्न करतात. बायबलच्या या तत्त्वाची त्यांना नेहमी जाण असते: “ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल; दया न्यायावर विजय मिळविते.”—याकोब २:१३; नीतिसूत्रे १९:१७; मत्तय ५:७.
१६. (अ) पातक करणाऱ्यांनी आपल्याकडे परतावे अशी यहोवाची खरोखर इच्छा आहे, हे बायबलचा उपयोग करून दाखवून द्या. (ब) पाप करणारे पश्चात्ताप करून परत येतात तेव्हा आपल्यालाही आनंद होतो हे आपण कसे दाखवू शकतो?
१६ पातक करणाऱ्यांनी आपल्याकडे परतावे अशी यहोवाची इच्छा आहे, हे उधळ्या पुत्राच्या दाखल्यातून दिसून येते. खरोखरच, जोपर्यंत त्यांच्या परतण्याची थोडीशीही शक्यता असते तोपर्यंत तो त्यांना आमंत्रण देत राहतो. (यहेज्केल ३३:११; मलाखी ३:७; रोमकर २:४, ५; २ पेत्र ३:९) उधळ्या पुत्राच्या वडिलांप्रमाणे यहोवा त्याच्याकडे परत येणाऱ्यांना आदराने वागवतो, त्यांना तो आपल्या कुटुंबाचा पूर्ण सदस्य मानतो. या बाबतीत तुम्ही यहोवाचे अनुकरण करत आहात का? काही काळ बहिष्कृत असलेल्या व्यक्तीचा पुनःस्वीकार करण्यात येतो तेव्हा तुम्ही कशाप्रकारची प्रतिक्रिया दाखवता? त्या व्यक्तीच्या परत येण्यामुळे ‘स्वर्गात आनंद’ करण्यात येतो, हे आपल्याला आधीच कळले आहे. (लूक १५:७) परंतु, पृथ्वीवर, तुमच्या मंडळीत, इतकेच नव्हे तर तुमच्या हृदयात तुम्ही आनंद मानता का? देवाच्या कळपाचा ज्याने आधीच त्याग करायला नको होता असा मनुष्य परततो तेव्हा, तो स्वागताच्या पात्रतेचा नाही असे समजून अद्यापही, उधळ्या पुत्राच्या दाखल्यातील थोरल्या मुलाप्रमाणे मनात राग बाळगून आहात का?
१७. (अ) पहिल्या शतकातील करिंथमध्ये कोणती समस्या निर्माण झाली होती आणि ती बाब हाताळण्यासाठी पौलाने त्या मंडळीतील लोकांना कोणता सल्ला दिला? (ब) पौलाचा सल्ला कसा व्यवहार्य होता आणि आपण तो आज कशाप्रकारे लागू करू शकतो? (उजवीकडे असणारी पेटी सुद्धा पाहा.)
१७ याबाबतीत स्वतःचे परीक्षण करण्यासाठी सुमारे सा.यु. ५५ मध्ये करिंथमध्ये झालेल्या घटनेचा विचार करा. तेथे, एका मनुष्याला मंडळीतून बहिष्कृत करण्यात आले होते. अखेरीस या मनुष्याने आपला वाममार्ग सोडला. तेथील बांधवांना काय करायचे होते? त्यांनी या मनुष्याच्या पश्चात्तापाकडे संशयाने पाहण्यास किंवा त्याला टाळण्यास हवे होते का? उलटपक्षी पौलाने करिंथकरांना असे आर्जवले: “तुम्ही त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे. नाही तर तो दुःखसागरात बुडून जावयाचा. म्हणून मी तुम्हाला विनंती करितो की, त्याच्यावर तुमची प्रीती आहे अशी त्याची खातरी करून द्या.” (२ करिंथकर २:७, ८) पश्चात्ताप व्यक्त करणाऱ्यांना बहुतेक वेळा स्वतःची लाज वाटते किंवा ते अगदी निराश होऊन जातात. यास्तव, त्यांना या गोष्टीची खात्री करून देण्याची आवश्यकता आहे, की त्यांचे सहविश्वासू आणि यहोवा यांचे त्यांच्यावर प्रेम आहे. (यिर्मया ३१:३; रोमकर १:१२) हे फार महत्त्वाचे आहे. का?
१८, १९. (अ) सुरवातीला आपण अगदी सौम्य असल्याचे करिंथमधील बांधवांनी कसे दाखवले? (ब) करिंथमधील निर्दयी मनोवृत्तीच्या लोकांवर ‘सैतान कशाप्रकारे वर्चस्व गाजवू’ शकत होता?
१८ करिंथमधील बांधवांना क्षमा करण्याचे प्रोत्साहन देताना असे करण्याचे कारण पौलाने स्पष्ट केले, की “आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये; त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही.” (२ करिंथकर २:११) याचा काय अर्थ होता? सुरवातीला पौलाला करिंथ मंडळीला सल्ला द्यावा लागला कारण ते वाईट गोष्टींच्या बाबतीत अगदी सौम्य झाले होते. हा मनुष्य पाप करीत राहिला तरी त्यांनी त्याला कोणतीही शिक्षा केली नाही. असे करण्याद्वारे मंडळी—विशेषतः मंडळीचे वडील सैतानाच्या हातातले खेळणे बनत होते. कारण मंडळीचे नाव खराब झाले असते तर त्यालाच सर्वात जास्त आनंद झाला असता.—१ करिंथकर ५:१-५.
१९ वडिलांनी आता दुसऱ्या टोकाची भूमिका घेतल्यास आणि पश्चात्ताप करणाऱ्या व्यक्तीला क्षमा न केल्यास सैतान वेगळ्या दिशेने अशा लोकांवर वर्चस्व गाजवू शकतो. कसे? त्यांच्या कठोर आणि निर्दयी होण्याचा सैतान फायदा घेऊ शकतो. पश्चात्ताप व्यक्त करणारा मनुष्य “दुःखसागरात बुडून” गेल्यास—किंवा सुबोध भाषांतर म्हणते त्याप्रमाणे असा मनुष्य “खिन्न व निराश होईल की त्यातून तो कधीच सावरणार नाही”—तेव्हा यहोवाला जाब देण्याची वडिलांसमोर किती मोठी जबाबदारी येते! (पडताळा यहेज्केल ३४:६; याकोब ३:१.) यास्तव, “लहानांतील एकाला” अडखळण करू नये असा इशारा येशूने त्याच्या शिष्यांना दिल्यानंतर त्याने म्हटले: “तुम्ही स्वतःला संभाळा. तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव आणि त्याने पश्चात्ताप केला तर त्याला क्षमा कर.”a (तिरपे वळण आमचे.)—लूक १७:१-४.
२०. पापी व्यक्ती पश्चात्ताप करते तेव्हा स्वर्गात आणि पृथ्वीवर कशाप्रकारे आनंद केला जातो?
२० दर वर्षी हजारो लोक खऱ्या उपासनेकडे परत येतात. यहोवाने त्यांच्यावर केलेल्या दयेमुळे हे लोक त्याचे आभारी आहेत. एका ख्रिस्ती बहिणीला मंडळीत पुन्हा घेण्यात आले तेव्हा तिने म्हटले: “मला इतका आनंद माझ्या संपूर्ण आयुष्यात कधी झाला नव्हता.” अर्थात, तिच्या आनंदात देवदूतांनीही आनंद मानला होता. पापी व्यक्ती पश्चात्ताप व्यक्त करते तेव्हा ‘स्वर्गात होणाऱ्या आनंदात’ आपणही सहभागी व्हावे. (लूक १५:७) असे केल्याने आपण यहोवाच्या दयेचे अनुकरण करत असू.
[तळटीपा]
a असे दिसून येते, की करिंथमधील या अपराधी व्यक्तीला मंडळीत तुलनात्मकदृष्ट्या लवकर घेण्यात आले, बहिष्कृत करण्यातील दर्जा म्हणून याचा उपयोग करण्यात येऊ नये. प्रत्येक बाब ही वेगळी असते. मंडळीतून बाहेर काढल्यानंतर काही अपराधी व्यक्ती लगेचच खरा पश्चात्ताप दाखवण्यास सुरवात करतात. इतर काही जनांच्या बाबतीत अशाप्रकारची मनोवृत्ती दिसून येण्यास वेळ लागतो. परंतु सर्व बाबतींत, मंडळीत पुन्हा एकदा घेतले जाणाऱ्यांनी दैवी दुःख व्यक्त करण्याची गरज आहे आणि पश्चात्तापास शोभणाऱ्या त्यांच्या कामांवरून हे दिसून आले पाहिजे.—प्रेषितांची कृत्ये २६:२०; २ करिंथकर ७:११.
उजळणी
◻ उधळ्या पुत्राच्या भावाने कशाप्रकारे यहुदी धार्मिक नेत्यांना चित्रित केले?
◻ उधळ्या पुत्राच्या भावाला खऱ्या पुत्रत्वाचा अर्थ कसा कळला नाही?
◻ देवाच्या दयेला लक्षात घेता कोणत्या प्रकारच्या दोन टोकाच्या भूमिका आपण टाळल्या पाहिजेत?
◻ आपण आज देवाच्या दयेचे अनुकरण कसे करू शकतो?
[१७ पानांवरील चौकट]
“त्याच्यावर तुमची प्रीति आहे अशी त्याची खातरी करून द्या”
पश्चात्ताप व्यक्त केलेल्या बहिष्कृत अपराध्याविषयी पौलाने करिंथ मंडळीला असे म्हटले: “मी तुम्हाला विनंती करितो की, त्याच्यावर तुमची प्रीति आहे अशी त्याची खातरी करून द्या.” (२ करिंथकर २:८) ज्या ग्रीक शब्दाचे भाषांतर “खातरी करून द्या” असे करण्यात आले आहे तो शब्द कायद्याच्या बाबतीत वापरण्यात येतो ज्याचा अर्थ “प्रमाण देणे” असा होतो. होय, पश्चात्तापी लोकांना मंडळीत पुन्हा घेतले जाते तेव्हा त्यांना असे वाटण्यास हवे, की त्यांच्यावर प्रेम केले जाते आणि मंडळीचे सदस्य या नात्याने त्यांचे पुन्हा एकदा स्वागत केले जाते.
तथापि, आपण हे लक्षात ठेवण्यास हवे, की एखाद्या व्यक्तीला मंडळीतून काढले जाते किंवा तिला पुन्हा मंडळीत घेतले जाते त्याची विशिष्ट कारणे मंडळीतील पुष्कळांना माहीत नसतात. याशिवाय मंडळीत असेही लोक असतील ज्यांच्याविरुद्ध पश्चात्तापी व्यक्तीने अपराध केला असेल किंवा पुष्कळ काळापर्यंत मनात अढी राहील असे दुःख त्यांना दिले असेल. यास्तव, अशा प्रकरणांत दुसऱ्यांच्या भावनांची कदर करत असताना हे उचित आहे, की एखाद्याला मंडळीत पुन्हा घेतल्याची घोषणा केली जाते तेव्हा सर्वांच्यासमोर त्याचे स्वागत करण्याऐवजी आपण व्यक्तिगतरीत्या त्याला भेटू शकतो.
ख्रिस्ती मंडळीचे सदस्य या नात्याने आपले पुन्हा एकदा मंडळीत स्वागत करण्यात आले आहे, हे समजल्यानंतर त्यांचा विश्वास किती मजबूत होईल! अशा पश्चात्तापी लोकांसोबत बोलण्याद्वारे आणि राज्य सभागृहात, सेवाकार्यात आणि उचित प्रसंगी त्यांच्याशी सहवास राखण्याद्वारे आपण अशा लोकांना उत्तेजन देऊ शकतो. अशा प्रियजनांप्रती आपल्या प्रेमाची खातरी देण्याद्वारे किंवा प्रेमाचे प्रमाण पटवण्याद्वारे त्यांनी केलेल्या पातकांचे गांभीर्य आपण कोणत्याही प्रकारे कमी करत नाही. उलटपक्षी, या लोकांनी आपले पापमय आचरण सोडल्यामुळे आणि यहोवाकडे परत आल्यामुळे स्वर्गीय देवदूतांसोबत आपणही आनंदित होतो.—लूक १५:७.
[१५ पानांवरील चित्र]
आपला भाऊ परत आल्यामुळे थोरल्या भावाला आनंद झाला नाही