देव तुम्हाला खरी व्यक्ती वाटते का?
त्रासदायक समस्यांच्या वेळी तुम्ही लागलीच प्रार्थनेद्वारे देवाकडे धाव घेता का? असल्यास, तुम्ही एका खऱ्याखुऱ्या व्यक्तीबरोबर बोलत आहात असे तुम्हाला वाटते का?
आपल्या स्वर्गीय पित्याचा उल्लेख करताना येशू ख्रिस्त म्हणाला: “ज्याने मला पाठविले तो खरा आहे.” (योहान ७:२८) होय, यहोवा देव खराखुरा आहे आणि त्याला प्रार्थना करणे म्हणजे मदतीसाठी किंवा सल्लामसलतीसाठी एखाद्या अगदी जवळच्या मित्राकडे वळण्यासारखे होय. परंतु, देवाने आपल्या प्रार्थना ऐकाव्यात असे आपल्याला वाटत असेल तर, आपल्या प्रार्थना स्वीकारयोग्य प्रार्थनेकरता असलेल्या शास्त्रवचनीय अटींच्या अनुरुप असणे महत्त्वाचे आहे. जसे की, आपण विनम्रतेने ‘जो प्रार्थना ऐकतो’ त्याला त्याच्या पुत्राच्या म्हणजे येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना केली पाहिजे.—स्तोत्र ६५:२; १३८:६; योहान १४:६.
काहींना वाटू शकेल, की देव अदृश्य असल्यामुळे तो व्यक्ती नाही. देव त्यांना काल्पनिक वाटू शकतो. देवाच्या विस्मयकारक गुणांविषयी शिकलेल्या काही ख्रिश्चनांनासुद्धा काही वेळा, देव किती खराखुरा आहे याचे आकलन होण्यास कठीण वाटू शकते. तुम्हालाही असेच वाटले आहे का? तर मग, कशामुळे तुम्हाला यहोवा देव एक खरीखुरी व्यक्ती वाटू शकते बरे?
शास्त्रवचनांचा अभ्यास करा
तुम्ही पवित्र शास्त्रवचनांचा नित्यनियमाने अभ्यास करता का? तुम्ही बायबल अभ्यास जितका नियमित आणि अधिक कराल तितकाच यहोवा देव तुम्हाला खराखुरा वाटेल. अशाप्रकारे तुमचा विश्वास बळकट होईल; खरे तर, ‘जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखे’ तुम्हाला वाटेल. (इब्री लोकांस ११:६, २७) दुसऱ्या बाजूला पाहता, बायबलचा अनियमित किंवा अधूनमधून केलेला अभ्यास कदाचित तुमच्या विश्वासावर उल्लेखनीय प्रभाव पाडू शकणार नाही.
याचे उदाहरण द्यायचे झाले तर: समजा, तुमच्या त्वचेवर सतत उठणाऱ्या पुरळासाठी तुमच्या डॉक्टरने तुम्हाला एक विशिष्ट मलम दिवसातून दोनदा लावण्यास सांगितले आहे. तुम्ही महिन्यातून एकदाच किंवा दोनदाच तो मलम लावला तर त्वचेवरील पुरळ नाहीसे होतील का? शक्यच नाही. तसेच, स्तोत्रकर्ता आपल्याला आध्यात्मिक आरोग्यासाठी एक “इलाज” सुचवतो. देवाच्या वचनाचे “रात्रंदिवस मनन” करा. (स्तोत्र १:१, २) याचा एकूण लाभ उपभोगण्याकरता आपण, ख्रिस्ती प्रकाशनांच्या साहाय्याने देवाच्या वचनावर दररोज विचार करण्याची म्हणजेच सुचवलेल्या ‘इलाजानुसार’ कार्य करण्याची गरज आहे.—यहोशवा १:८.
विश्वास बळकट करील असा अभ्यास करण्यास तुम्हाला आवडेल का? मग येथे एक सूचना आहे: पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर यातून किंवा प्रतिसंदर्भ असलेल्या इतर कोणत्याही बायबलमधून एक अध्याय वाचून झाल्यावर, एखादे रंजक वचन निवडा आणि उल्लेखलेली संदर्भ शास्त्रवचने वाचून पाहा. यामुळे तुमच्या अभ्यासाची गुणवत्ता तर वाढेलच शिवाय बायबलची आंतरिक सुसंगतता पाहून तुम्ही नक्कीच प्रभावित व्हाल. परिणामतः, बायबलचा लेखक यहोवा देव तुम्हाला आणखी खराखुरा वाटेल.
प्रतिसंदर्भांचा उपयोग केल्याने तुमचा बायबल भविष्यवाण्यांशी आणि त्यांच्या पूर्णतेशी परिचय होईल. कदाचित तुम्हाला, बायबलच्या मुख्य भविष्यवाण्या माहीत असतील, जसे की बॅबिलोनद्वारे झालेल्या जेरुसलेमच्या नाशासंदर्भात असलेल्या भविष्यवाण्या, वगैरे. तरीपण बायबलमध्ये अनेक परस्परसंबंधित भविष्यवाण्या आणि त्यांची पूर्णता यांचे जाळे आहे. यांतील काही भविष्यवाण्या इतक्या प्रचलित नाहीत.
उदाहरणार्थ, यरिहोचे पुनःबांधकाम केल्याने मिळणाऱ्या शिक्षेसंबंधाने असलेली भविष्यवाणी वाचा आणि मग तिची पूर्णता कधी झाली त्यावर विचार करा. यहोशवा ६:२६ म्हणते: “त्या समयी यहोशवाने असा शाप दिला की, जो कोणी यरीहो नगर उभारण्यास प्रवृत्त होईल त्याला परमेश्वराचा शाप लागेल. त्याचा पाया घालताच त्याचा ज्येष्ठ पुत्र मरेल आणि त्याच्या वेशी उभारताच त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल.” या भविष्यवाणीची पूर्णता सुमारे ५०० वर्षांनंतर झाली; कारण आपण १ राजे १६:३४ येथे असे वाचतो: “[राजा अहाबाच्या] कारकीर्दीत बेथेलकर हिएल याने यरीहो नगर पुनः वसविले. त्याने त्याचा पाया घातला तेव्हा त्याचा ज्येष्ठ पुत्र अबीराम मरण पावला; आणि त्याने त्याच्या वेशी उभारिल्या तेव्हा त्याचा कनिष्ट पुत्र सगूब मरण पावला, परमेश्वराने नूनाचा पुत्र यहोशवा याच्या द्वारे सांगितले होते त्याप्रमाणे हे झाले.”a खरा देवच अशा प्रकारची भविष्यवाणी करण्यास प्रेरणा देऊन तिच्या पूर्णतेची खात्री करू शकत होता.
बायबल वाचताना एखाद्या विशिष्ट मुद्याविषयी कदाचित तुमची जिज्ञासा वाढेल. जसे की, तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल, की एखादी भविष्यवाणी आणि तिची पूर्णता यामध्ये किती वर्षे लोटली असावीत? कोणाला तरी विचारत बसण्यापेक्षा, जरा प्रयत्न करून स्वतःच त्याचे उत्तर शोधून काढण्यास काय हरकत आहे? मौल्यवान धन कोठे आहे ते दाखवणारा नकाशा तुम्ही जसा बारकाईने पाहता तसेच तक्ते आणि बायबल अभ्यासाचे साहित्य यांचा उपयोग करून तुम्हीच उत्तरे शोधून काढा. (नीतिसूत्रे २:४, ५) उत्तरे शोधल्याने तुमच्या विश्वासावर खोल प्रभाव पडेल आणि यहोवा देव तुम्हाला आणखीन खरा वाटेल.
नियमितपणे व कळकळीने प्रार्थना करा
प्रार्थना आणि विश्वास यांच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करू नका. येशूच्या शिष्यांनी तर सरळ सरळ अशी विनंती केली: “आमचा विश्वास वाढवा.” (लूक १७:५) यहोवा तुम्हाला खरा वाटत नाही तर, तुम्हाला आणखी विश्वासाची गरज आहे अशी त्याच्याजवळ प्रार्थना करायला काय हरकत आहे? तो तुम्हाला खराखुरा वाटावा म्हणून तुमच्या स्वर्गीय पित्याकडे पूर्ण भरवशाने मदत मागा.
तुम्हाला कदाचित एखादी समस्या सतावत असेल तर, तुमच्या स्वर्गीय मित्रासमोर प्रामाणिकपणे आपले मन मोकळे करण्यासाठी हवा तेवढा वेळ घ्या. येशूचा मृत्यू समय जवळ आला तेव्हा त्याने कळकळीने प्रार्थना केली. लोकांना दाखवण्याकरता लांबलचक प्रार्थना करण्याच्या धार्मिक पद्धतींचा त्याने धिक्कार केला असला तरी, आपल्या १२ प्रेषितांची निवड करण्याआधी त्याने खाजगीत प्रार्थना करण्याकरता संपूर्ण रात्र घालवली होती. (मार्क १२:३८-४०; लूक ६:१२-१६) आपण हन्नाकडूनही काही शिकू शकतो; ती संदेष्टा शमुवेलाची आई होती. पुत्रप्राप्तीसाठी ‘तिने यहोवापुढे बराच वेळ प्रार्थना केली.’—१ शमुवेल १:१२.
या सर्वांचा मथितार्थ काय आहे? तुम्हाला तुमच्या प्रार्थनांचे उत्तर हवे आहे तर तुम्ही आग्रहाने, उत्साहाने, निरंतर आणि अर्थातच, देवाच्या इच्छेच्या सुसंगतेत प्रार्थना केली पाहिजे. (लूक २२:४४; रोमकर १२:१२; १ थेस्सलनीकाकर ५:१७; १ योहान ५:१३-१५) यामुळे देव तुम्हाला खराखुरा वाटू लागेल.
सृष्टी निरखून पाहणे
एखाद्या कलाकाराचे व्यक्तिमत्त्व त्याच्या पेंटिंग्सवरून ओळखता येऊ शकते. तसेच, विश्वाचा रचनाकार आणि निर्माणकर्ता यहोवा याचे ‘अदृश्य गुण’ सृष्टीत स्पष्ट दिसतात. (रोमकर १:२०) आपण यहोवाची हस्तकला जवळून निरखून पाहतो तेव्हा आपल्याला त्याचे व्यक्तिमत्त्व अधिक चांगल्याप्रकारे समजते व अशाप्रकारे आपल्याला तो आणखी खराखुरा वाटू लागतो.
देवाने निर्माण केलेल्या गोष्टी केवळ वरवरून न पाहता त्यांचे जवळून निरीक्षण केल्यास तुम्ही त्याच्या गुणांची वास्तविकता पाहून प्रभावित व्हाल. जसे की, पक्ष्यांची जलप्रवासाची क्षमता याबद्दलच्या माहितीने देखील यहोवाच्या बुद्धीविषयी तुम्हाला असलेली कदर वाढू शकते. विश्वाबद्दल वाचताना तुम्हाला समजेल, की सुमारे १,००,००० प्रकाशवर्ष दूर असलेली आकाशगंगा, अख्ख्या अवकाशातील अगणित मंदाकिनीतील केवळ एक आकाशगंगा आहे. हे ऐकल्यावर तुम्हाला निर्माणकर्त्याच्या बुद्धीच्या वास्तविकतेचे विशेष वाटत नाही का?
यहोवाची बुद्धी निश्चितच वास्तविक आहे! पण याचा तुमच्याकरता काय अर्थ होतो? आपल्यातील कोणीही त्याच्याकडे प्रार्थनेद्वारे स्वतःच्या समस्या घेऊन जातो तेव्हा तो निश्चितच गोंधळून जाऊ शकत नाही. होय, सृष्टीविषयी तुम्हाला तुटपुंजे ज्ञान असले तरी देखील यहोवा तुम्हाला खराखुरा वाटू शकतो.
यहोवाबरोबर चाला
यहोवा किती खराखुरा आहे याचा तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकता का? तुम्ही विश्वासू कुलपिता नोहाप्रमाणे असल्यास, होय. त्याने नेहमी यहोवाची आज्ञा पाळली; तो इतका आज्ञाधारक होता की त्याच्याविषयी असे म्हटले आहे: “नोहा [खऱ्या] देवाबरोबर चालला.” (उत्पत्ति ६:९) यहोवा जणू आपल्याबरोबरीने चालत आहे अशाप्रकारे नोहाने आपले जीवन व्यतीत केले. इतका तुम्हाला देव खराखुरा वाटू शकतो.
तुम्ही देवाबरोबर चालत असल्यास, तुम्ही शास्त्रवचनीय अभिवचनांवर भरवसा ठेवता व त्याच्या अनुषंगाने कार्य करता. जसे की, “तुम्ही पहिल्याने [देवाचे] राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याहि सर्व गोष्टी [भौतिक गरजा] तुम्हाला मिळतील,” या येशूच्या शब्दांवर तुमचा विश्वास आहे. (मत्तय ६:२५-३३) हे खरे आहे, की यहोवा नेहमीच तुम्हाला, तुम्ही अपेक्षा करता त्या मार्गाने तुमच्या गरजा पूर्ण करणार नाही. तरीपण, तुम्ही प्रार्थना करता आणि देवाचे साहाय्य अनुभवता तेव्हा तुम्हाला तो, तुमच्याजवळ कोणीतरी असल्याप्रमाणे खराखुरा वाटेल.
यहोवाबरोबर नेटाने चालत राहिल्यानेच अशाप्रकारचे घनिष्ठ नाते विकसित होऊ शकते. मॅन्वाला नामक एका स्पॅनिश भाषिक साक्षीदार भगिनीचे उदाहरण घ्या; तिने चिक्कार परीक्षा सहन केल्या आहेत. ती म्हणते: “मी जेव्हाही त्रस्त किंवा अडचणीत असते तेव्हा मी नीतिसूत्रे १८:१० मधील तत्त्व लागू केलं आहे. मदतीसाठी मी यहोवाकडे धाव घेते. तो नेहमी माझ्यासाठी ‘बळकट दुर्ग’ बनला आहे.” यहोवावर ३६ वर्षांपासून विसंबून राहिल्यावर आणि त्याच्या आधाराचा अनुभव घेतल्यावर मॅन्वाला असे म्हणू शकते.
तुम्ही आता आताच यहोवावर आपला भरवसा ठेवू लागला आहात का? तुमच्या इच्छेनुसार अजूनपर्यंत तरी तुम्ही त्याच्याबरोबर नातेसंबंध प्रस्थापित केलेला नसला तर निराश होऊ नका. प्रत्येक दिवशी देवाबरोबर चालत राहणाऱ्या मनुष्याप्रमाणे जगा. विश्वासूपणाची जीवनशैली बनवल्यावर तुम्ही यहोवाबरोबर नजीकचा नातेसंबंध उपभोगू शकाल.—स्तोत्र २५:१४; नीतिसूत्रे ३:२६, ३२, NW.
देवाबरोबर चालण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे त्याच्या सेवेत गर्क राहणे. राज्य-प्रचार कार्यात तुम्ही भाग घेता तेव्हा तुम्ही यहोवाचे सहकारी होता. (१ करिंथकर ३:९) या गोष्टीच्या जाणीवेने तुम्हाला देव खराखुरा वाटू शकेल.
स्तोत्रकर्त्याने आर्जवले: “आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे; त्याच्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धि करील.” (स्तोत्र ३७:५) तुमच्या मनावर असलेले ओझे किंवा मनाला जाळणारी चिंता देवावर सोपवण्यास कदापि विसरू नका. मदत आणि मार्गदर्शन यांसाठी नेहमी त्याच्याकडे वळा. यहोवा देवावर प्रार्थनापूर्वक विसंबून राहिल्यास व पूर्णपणे त्याच्यावर भरवसा ठेवल्यास तुम्हाला सुरक्षित वाटेल, कारण तुमच्यासाठी कार्य करण्यास तो विसरणार नाही हे तुम्हाला माहीत आहे. यहोवाला तुमच्या व्यक्तिगत चिंता सांगताना तुम्ही निःशंक आहात का? देव तुम्हाला खराखुरा वाटत असेल तर तुम्ही निश्चितच असाल!
[तळटीपा]
a दुसरे एक उदाहरण म्हणून, १ राजे १३:१-३ येथील यराबामाच्या वेदीला दूषित केले जाईल ही भविष्यवाणी वाचा. मग, २ राजे २३:१६-१८ मध्ये सांगितल्याप्रमाणे तिची पूर्णता झालेली पाहा.
[२१ पानांवरील चित्र]
विश्वास बळकट करणारा अभ्यास करा
[२२ पानांवरील चित्र]
नियमितरीत्या व कळकळीने प्रार्थना करण्यासाठी वेळ घ्या
[२३ पानांवरील चित्र]
सृष्टीमध्ये देवाचे गुण कसे दिसतात त्यांचे परीक्षण करा
[चित्राचे श्रेय]
हमिंगबर्ड: U.S. Fish and Wildlife Service, Washington, D.C./Dean Biggins; तारे: फोटो: Copyright IAC/RGO 1991, Dr. D. Malin et al, Isaac Newton Telescope, Roque de los Muchachos Observatory, La Palma, Canary Islands