“अत्यंत उत्कंठेने” प्रतीक्षा करणे
“सृष्टी देवाच्या पुत्रांच्या प्रगट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करीत आहे.”—रोमकर ८:१९.
१. आजच्या आणि पहिल्या शतकातील ख्रिश्चनांची स्थिती कशाप्रकारे मिळतीजुळती आहे?
खऱ्या ख्रिश्चनांची आजची स्थिती पहिल्या शतकातील ख्रिश्चनांशी मिळतीजुळती आहे. त्याकाळी यहोवाचे सेवक एका भविष्यवाणीच्या आधारावर मशीहा येण्याचा काळ ओळखू शकले. (दानीएल ९:२४-२६) याच भविष्यवाणीत जेरुसलेमचा नाश देखील भाकीत करण्यात आला होता; परंतु ख्रिश्चनांना त्या शहराचा नाश केव्हा होणार हे आधीच ठरवता येईल असे कोणतेही सुगावे त्या भविष्यवाणीत नव्हते. (दानीएल ९:२६ब, २७) त्याचप्रकारे देवाच्या मदतीने, १९ व्या शतकातील बायबल विद्यार्थी देखील एका भविष्यवाणीच्या आधारावर काहीतरी घडण्याची प्रतीक्षा करू लागले. दानीएल ४:२५ येथील ‘सात काळांचा’ ‘परराष्ट्रीयांच्या सद्दीशी’ सबंध जोडून ते १९१४ साली ख्रिस्ताला राज्याधिकार मिळण्याची वाट पाहू लागले. (लूक २१:२४, किंग जेम्स व्हर्शन; यहेज्केल २१:२५-२७) दानीएलच्या पुस्तकात कितीतरी भविष्यवाण्या आहेत, पण यांपैकी कोणत्याही भविष्यवाणीच्या आधारावर सध्याचे बायबल विद्यार्थी सैतानाच्या सबंध व्यवस्थीकरणाचा नाश नेमका केव्हा होईल हे ठरवू शकत नाहीत. (दानीएल २:३१-४४; ८:२३-२५; ११:३६, ४४, ४५) पण हे लवकरच होणार आहे कारण आपण ‘अंतसमयात’ जगत आहोत.—दानीएल १२:४.a
ख्रिस्ताच्या उपस्थितीदरम्यान जागृत राहणे
२, ३. (अ) राज्याधिकार हाती घेतलेल्या ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या काळात आपण आज जगत आहोत हे कशावरून अगदी स्पष्टपणे दिसून येते? (ब) ख्रिस्ताच्या उपस्थितीदरम्यान ख्रिश्चनांना जागृत राहायचे होते हे कशावरून दिसून येते?
२ ख्रिस्ताला १९१४ साली राज्याधिकार मिळाला त्याआधी काही ख्रिश्चन एका भविष्यवाणीच्या आधारावर याची प्रतीक्षा करू लागले होते. पण ख्रिस्ताने आपल्या उपस्थितीचे आणि व्यवस्थीकरणाच्या अंताचे जे “चिन्ह” दिले होते, त्यात घटना समाविष्ट होत्या. आणि यांपैकी अधिकांश घटना त्याची उपस्थिती सुरू झाल्यानंतर दिसणार होत्या. लढाया, अन्नाचा तुटवडा, भूकंप, मऱ्या, वाढती अराजकता, ख्रिश्चनांचा होणारा छळ आणि राज्याच्या सुवार्तेचा जगव्याप्त प्रचार—यांसारख्या घटना अगदी स्पष्टपणे दाखवतात, की राज्याधिकार हाती घेतलेल्या ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या काळात आपण जगत आहोत.—मत्तय २४:३-१४; लूक २१:१०, ११.
३ येशूने मृत्यूपूर्वी आपल्या शिष्यांना जो बोध केला, त्याचा मुख्य आशय हाच होता, “सावध असा, जागृत राहा.” (मार्क १३:३३, ३७; लूक २१:३६) जागृत राहण्याच्या या आदेशांचा संदर्भ लक्षपूर्वक वाचताना दिसते, की ख्रिस्त आपल्या उपस्थितीची केवळ सुरवात होण्याच्या चिन्हाकडे लक्ष देण्याकरता जागृत राहा असे म्हणत नव्हता. तर त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, तो आपल्या उपस्थितीच्या दरम्यान जागृत राहा असा आदेश आपल्या खऱ्या अनुयायांना देत होता. खऱ्या ख्रिश्चनांना कशासाठी जागृत राहायचे होते?
४. येशूने दिलेल्या चिन्हाचा उद्देश काय होता?
४ येशूने ज्या प्रश्नाचे उत्तर म्हणून आपली महान भविष्यवाणी केली, तो प्रश्न असा होता: “ह्या गोष्टी [यहुदी व्यवस्थीकरणाच्या अंतापर्यंत घडणार असलेल्या घटना] केव्हा होतील, आणि आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या [“उपस्थितीचे व या व्यवस्थीकरणाच्या,” NW] समाप्तीचे चिन्ह काय?” (मत्तय २४:३) भाकीत केलेले चिन्ह केवळ ख्रिस्ताची उपस्थितीच नव्हे, तर सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या अंतापर्यंत ज्या ज्या घटना घडणार त्याही ओळखण्यासाठी सहायक ठरणार होते.
५. आत्मिकरित्या उपस्थित असताना आपले ‘येणे’ होईल हे येशूने कसे स्पष्ट केले?
५ येशूने स्पष्ट केले की त्याची ‘उपस्थिती’ (ग्रीक, पराऊसिया) सुरू असताना तो पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येईल. या ‘येण्याविषयी’ (ज्यासाठी अरखोमाई या ग्रीक शब्दाची रूपे वापरली जातात) त्याने असे घोषित केले: “तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रगट होईल; मग पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक शोक करितील, आणि ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील. . . . अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या; त्याची डहाळी कोमल असता तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला असे तुम्ही समजता; तसेच तुम्हीहि ह्या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो [ख्रिस्त] जवळ, दाराशीच, आहे असे समजा. . . . म्हणून जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभु येईल हे तुम्हास ठाऊक नाही. . . . म्हणून तुम्हीहि सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.” (तिरपे वळण आमचे.)—मत्तय २४:३०, ३२, ३३, ४२, ४४.
येशू ख्रिस्त कशासाठी येणार?
६. ‘मोठ्या बाबेलचा’ नाश कशाप्रकारे होईल?
६ राजा या भूमिकेत येशू ख्रिस्त १९१४ सालापासून उपस्थित आहे; तथापि, जे त्याला दुष्ट असल्याचे आढळतात अशांचा नाश करण्याआधी संस्थांचा आणि व्यक्तिगतरीत्या लोकांचा देखील त्याने न्याय करणे अगत्याचे आहे. (पडताळा २ करिंथकर ५:१०.) लवकरच, “मोठी बाबेल,” अर्थात खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याचा सर्वनाश करावा असे यहोवा राजकीय अधिकाऱ्यांच्या मनात घालेल. (प्रकटीकरण १७:४, ५, १६, १७) प्रेषित पौलाने खास उल्लेख केला की ‘अनीतिमान पुरुषाचा’ येशू ख्रिस्त नाश करील; हा अनीतिमान पुरुष म्हणजे ख्रिस्ती धर्मजगतातील धर्मत्यागी पाळकवर्ग, ज्यांचा ‘मोठ्या बाबेलमध्ये’ एक प्रमुख हिस्सा आहे. पौलाने लिहिले: “तो अनीतिमान पुरुष प्रगट होईल, त्याला प्रभु येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकील, आणि तो येताच आपल्या दर्शनाने [“आपल्या उपस्थितीच्या दर्शनाने,” NW] त्याला नष्ट करील.”—२ थेस्सलनीकाकर २:३, ८.
७. मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवात येईल तेव्हा तो कशाप्रकारे न्याय करील?
७ येणाऱ्या निकट भविष्यात, राष्ट्रांतील लोकांचा ख्रिस्त न्याय करील; पृथ्वीवर असणाऱ्या आपल्या बांधवांशी त्यांनी कसा व्यवहार केला यावर हा न्याय आधारलेला असेल. बायबल आपल्याला सांगते: “जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल; त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमविली जातील; आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करितो तसे तो त्यांस एकमेकांपासून वेगळे करील, आणि मेंढरांस तो आपल्या उजवीकडे व शेरडांस डावीकडे ठेवील. . . . तेव्हा राजा [मेंढरांस] उत्तर देईल, मी तुम्हास खचित सांगतो की, ज्याअर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, त्याअर्थी ते मला केले आहे. . . . [शेरडे] तर सार्वकालिक शिक्षा भोगावयास जातील; आणि नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगावयास जातील.”—मत्तय २५:३१-४६.
८. अभक्त लोकांवर न्यायदंड बजावण्याकरता ख्रिस्ताच्या येण्याचे पौलाने कसे वर्णन केले आहे?
८ शेरड्यांचा आणि मेंढरांचा दृष्टान्त दाखवतो की येशू सर्व अभक्त लोकांवर आपला अखेरचा न्यायदंड बजावेल. छळ सोसणाऱ्या सह विश्वासू बांधवांना पौलाने हमी दिली की, “तुम्हास आम्हाबरोबर विश्रांति देणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे, म्हणून प्रभु येशू प्रगट होण्याच्या समयी ते होईल: तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रगट होईल. तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील. आपल्या पवित्र जनांच्या ठायी गौरव मिळावे म्हणून . . . तो येईल.” (२ थेस्सलनीकाकर १:६ब-१०) या सर्व चित्तवेधक घटना आपल्यापुढे असताना, आपण विश्वास धरून ख्रिस्ताच्या येण्याची अत्यंत उत्कंठेने वाट पाहत जागृत राहू नये का?
ख्रिस्ताच्या प्रगट होण्याची उत्कंठेने प्रतीक्षा करणे
९, १०. अद्यापही पृथ्वीवर असणारे अभिषिक्त जन येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याची उत्कंठेने प्रतीक्षा का करतात?
९ ‘स्वर्गातून प्रभू येशूचे प्रगट होणे’ हे केवळ दुष्टांचा नाश करण्यासाठीच नव्हे, तर धार्मिकांना प्रतिफळ देण्यासाठीही असेल. ख्रिस्ताच्या प्रगट होण्याआधी, पृथ्वीवर असणाऱ्या त्याच्या अभिषिक्त बांधवांना कदाचित आणखी छळ सोसावा लागेल, पण त्यांना मिळालेल्या स्वर्गीय जीवनाच्या वैभवी आशेमुळे ते आनंदी आहेत. अभिषिक्त ख्रिश्चनांना प्रेषित पेत्राने लिहिले: “ज्याअर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहां त्याअर्थी आनंद करा; म्हणजे त्याचे गौरव प्रगट होण्याच्या वेळेसहि तुम्ही उल्लास व आनंद कराल.”—१ पेत्र ४:१३.
१० ख्रिस्त ‘आपल्याला त्याच्याजवळ एकत्र करील’ तोपर्यंत विश्वासू राहण्याचा अभिषिक्त ख्रिश्चनांचा दृढ संकल्प आहे, अशासाठी की “[त्यांचे] विश्वासाच्या परीक्षेत उतरणे . . . येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यांस कारणीभूत व्हावे.” (२ थेस्सलनीकाकर २:१; १ पेत्र १:७) आत्म्याने अभिषेक झालेल्या या विश्वासू ख्रिश्चनांच्या संदर्भात पुढील विधान खरे ठरते: “ख्रिस्ताविषयीची साक्ष तुम्हामध्ये दृढमूल झाली. . . . असे की, आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्याच्या प्रगट होण्याची वाट पाहणारे जे तुम्ही ते कोणत्याहि कृपादानात उणे पडला नाही.”—१ करिंथकर १:६, ७.
११. येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याची प्रतीक्षा करताना, अभिषिक्त ख्रिश्चन काय करत राहतात?
११ अभिषिक्त शेषवर्गातील लोकांच्या भावना पौलासारख्याच आहेत; पौल लिहितो: “आपल्यासाठी जे गौरव प्रगट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो.” (रोमकर ८:१८) अढळ विश्वास कायम ठेवण्यासाठी त्यांना कोणत्याही आकडेमोडीची आवश्यकता वाटत नाही. ते अविरतपणे यहोवाची सेवा करत राहतात आणि अशारितीने त्यांचे सहकारी, अर्थात “दुसरी मेंढरे” यांच्यापुढेही ते एक उत्तम आदर्श ठेवतात. (योहान १०:१६) हे दुष्ट युग लवकरच नाश होणार आहे याची अभिषिक्त जनांना जाणीव आहे; ते पेत्राचा आग्रहपूर्वक सल्ला अनुसरतात: “तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळी तुम्हांस प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा.”—१ पेत्र १:१३.
‘सृष्टी अत्यंत उत्कंठेने प्रतीक्षा करत आहे’
१२, १३. मानवी सृष्टी कशाप्रकारे “व्यर्थतेच्या स्वाधीन” झाली आणि दुसरी मेंढरे कशासाठी अधीर झाली आहेत?
१२ दुसऱ्या मेंढरांकडे अत्यंत उत्कंठेने प्रतीक्षा करण्यासारखे काही आहे का? निश्चितच आहे. आत्म्याने अभिषेक झालेले “पुत्र” म्हणून यहोवाने ज्यांना दत्तक घेतले आहे आणि स्वर्गीय राज्यात जे “ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस” असतील, अशांच्या वैभवी आशेविषयी सांगितल्यावर पौल म्हणतो: “सृष्टि देवाच्या पुत्रांच्या प्रगट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करीत आहे. कारण सृष्टि व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली ती आपखुशीने नव्हे, तर ती स्वाधीन करणाऱ्यामुळे. सृष्टीहि स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी ह्या आशेने वाट पाहते.”—रोमकर ८:१४-२१; २ तीमथ्य २:१०-१२.
१३ आदामाच्या पापामुळे त्याचे सर्व वंशज “व्यर्थतेच्या स्वाधीन” झाले होते, म्हणजेच ते जन्मतःच पाप आणि मृत्यूच्या गुलामीत होते. या गुलामीतून स्वतःची सुटका करणे त्यांना शक्य झालेले नाही. (स्तोत्र ४९:७; रोमकर ५:१२, २१) “नश्वरतेच्या दास्यातून मुक्त” होण्यासाठी दुसरी मेंढरे किती अधीर झाली आहेत! पण हे घडण्याआधी, यहोवाचे काळ आणि समय यांच्यानुसार काही विशिष्ट गोष्टी घडायच्या शिल्लक आहेत.
१४. ‘देवाच्या पुत्रांच्या प्रगट होण्यात’ काय काय समाविष्ट आहे आणि यामुळे मानवजात ‘नश्वरतेच्या दास्यातून कशाप्रकारे मुक्त होईल’?
१४ ‘देवाच्या अभिषिक्त पुत्रांतील’ शेष आधी “प्रगट” झाले पाहिजेत. हे कसे घडेल? देवाने ठरवलेल्या वेळी, दुसऱ्या मेंढरांना हे कळून येईल की अभिषिक्त जनांवर ‘शिक्का मारण्याचे’ काम पूर्ण झाले आहे आणि त्यांना ख्रिस्तासोबत राज्य करण्यासाठी गौरविण्यात आले आहे. (प्रकटीकरण ७:२-४) तसेच, पुनरुत्थान झालेले ‘देवाचे पुत्र’ ख्रिस्तासोबत सैतानाच्या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश करण्यात सहभाग घेतील, तेव्हा देखील हे देवाचे पुनरुत्थित पुत्र “प्रगट” होतील. (प्रकटीकरण २:२६, २७; १९:१४, १५) त्यानंतर, ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यात याजक म्हणून कार्य करताना त्यांच्या माध्यमाने येशूच्या खंडणी बलिदानाचे मानवी ‘सृष्टीला’ फायदे करून दिले जातील तेव्हा देखील ते “प्रगट” होतील. परिणामस्वरूप, मानवजात “नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन,” शेवटी ‘देवाच्या मुलांच्या गौरवयुक्त मुक्ततेत’ प्रवेश करील. (रोमकर ८:२१; प्रकटीकरण २०:५; २२:१, २) एवढ्या विलक्षण गोष्टी भविष्यात होणार असल्यामुळे, दुसरी मेंढरे ‘देवाच्या पुत्रांच्या प्रगट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करीत आहेत’ हे साहजिकच नाही का?—रोमकर ८:१९.
यहोवाच्या सहनशीलतेमुळे होणारे तारण
१५. यहोवाने विशिष्ट घटनांसाठी ठरवलेल्या वेळेसंबंधी आपण कधीही काय विसरू नये?
१५ यहोवा सर्वात महान कालनियंत्रक आहे. विशिष्ट घटनांकरता त्याने ठरवलेली वेळ कदापि चुकणार नाही. प्रत्येक वेळी कदाचित आपल्या अपेक्षेप्रमाणे घटना घडणारही नाहीत. पण तरीसुद्धा देवाने जी काही अभिवचने दिली आहेत ती सर्वच्या सर्व सिद्धीस जातील याविषयी आपण पूर्ण विश्वास बाळगू शकतो. (यहोशवा २३:१४) कदाचित तो विशिष्ट परिस्थिती पुष्कळांच्या अपेक्षेपेक्षा जास्त काळ चालू देत असेल. पण आपण सदैव त्याचे मार्ग समजून घेण्याचा प्रयत्न करीत सदोदित त्याच्या बुद्धीची प्रशंसा करत राहूया. पौलाने लिहिले: “अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ति किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत! प्रभूचे मन कोणी ओळखिले आणि त्याचा मंत्री कोण होता?”—रोमकर ११:३३, ३४.
१६. यहोवाच्या सहनशीलतेचा कोणाकोणाला फायदा होतो?
१६ पेत्र लिहितो: “प्रियजनहो, ह्या गोष्टींची [जुने “आकाश” व “पृथ्वी” यांचा नाश आणि त्यानंतर अभिवचन दिलेले नवे “आकाश” व “पृथ्वी” यांची स्थापना] वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने [“शेवटपर्यंत,” NW] निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा, आणि आपल्या प्रभूची सहनशीलता तारणच आहे असे समजा.” ‘यहोवाचा दिवस चोर येतो तसा येईल,’ पण यहोवाच्या सहनशीलतेमुळे आणखी कोट्यवधी लोकांना त्या दिवसातून बचावण्याची आज संधी दिली जात आहे. (२ पेत्र ३:९-१५) तसेच यहोवाच्या सहनशीलतेमुळे आपल्यापैकी प्रत्येकाला ‘भीत व कापत आपले तारण साधून घेण्याची’ संधी आज आहे. (फिलिप्पैकर २:१२) आपल्याला देवाची स्वीकृती मिळावी आणि मनुष्याचा पुत्र न्याय करण्यासाठी येईल तेव्हा ‘त्याच्यासमोर उभे राहण्यास’ आपण समर्थ व्हावे म्हणून येशूने सांगितल्याप्रमाणे आपण ‘सांभाळावे’ आणि ‘जागृत राहावे.’—लूक २१:३४-३६; मत्तय २५:३१-३३.
धीराने प्रतीक्षा करणे
१७. प्रेषित पौलाचे कोणते शब्द आपण मनावर घेतले पाहिजेत?
१७ पौलाने आपल्या आध्यात्मिक बांधवांना “दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे” लक्ष लावण्याचे उत्तेजन दिले. (२ करिंथकर ४:१६-१८) त्यांच्यापुढे ठेवलेल्या स्वर्गीय प्रतिफळावर त्यांनी सतत दृष्टी लावावी आणि कशानेही त्यांचे लक्ष विचलित होऊ नये असे तो सुचवत होता. आपणही आपल्यापुढे ठेवलेली अद्भुत आशा नेहमी मनात बाळगून काहीही झाले तरी माघार न घेण्याचा निर्धार करावा, मग आपण अभिषिक्त ख्रिश्चनांपैकी असो की दुसऱ्या मेंढरांपैकी. आपण ‘धीराने प्रतीक्षा करीत राहून’ हे सिद्ध करू की “ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही; तर जिवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहो.”—रोमकर ८:२५; इब्री लोकांस १०:३९.
१८. काळ आणि समय आत्मविश्वासाने यहोवाच्या हातात सोपवून आपण निश्चिंत का होऊ शकतो?
१८ काळ आणि समय हे आपण आत्मविश्वासाने यहोवाच्या हातात सोपवून निश्चिंत होऊ शकतो. त्याने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार त्याच्या अभिवचनांच्या पूर्णतेला “विलंब लागावयाचा नाही.” (हबक्कूक २:३) पण तोपर्यंत, पौलाने तीमथ्याला दिलेला आग्रहपूर्वक आदेश आपल्याबाबतीत आणखीनच समर्पक ठरतो. त्याने म्हटले: “देवासमक्ष आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्यासमक्ष त्याच्या प्रगट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की, वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा . . . सुवर्तिकाचे काम कर, तुला सोपविलेली सेवा पूर्ण कर.”—२ तीमथ्य ४:१-५.
१९. यहोवाच्या लोकांसाठी अद्यापही काय करण्याचा समय आहे आणि असे का?
१९ शेवटी हा जीवनमरणाचा प्रश्न आहे—आपलाही आणि आपल्या शेजाऱ्यांचाही. पौल लिहितो: “आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव; त्यातच टिकून राहा; कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्यांचेहि तारण साधिशील.” (१ तीमथ्य ४:१६) हे दुष्ट व्यवस्थीकरण आता फार काळ टिकणार नाही. भविष्यात होणार असलेल्या चित्तवेधक घटनांची अत्यंत उत्कंठेने प्रतीक्षा करताना आपण हे सदोदीत आठवणीत ठेवले पाहिजे, की आपल्या लोकांनी राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करावा म्हणून यहोवाने ठरवलेला काळ आणि समय अद्यापही सुरू आहे. हे कार्य करत राहायचे आहे, तो पुरे झाले असे म्हणत नाही तोपर्यंत. येशूने म्हटल्याप्रमाणे, “तेव्हा शेवट होईल.”—मत्तय २४:१४.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी यांच्याद्वारे प्रकाशित सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकातले अध्याय १० आणि ११ पाहा.
[उजळणी]
◻ वेळेच्या आकडेमोडीच्या बाबतीत, आपली स्थिती पहिल्या शतकातील ख्रिश्चनांप्रमाणेच कशी आहे?
◻ ख्रिस्ताच्या उपस्थितीदरम्यानही ख्रिश्चनांनी “जागृत” का राहिले पाहिजे?
◻ मानवी सृष्टी “देवाच्या पुत्रांच्या प्रगट होण्याची” अत्यंत उत्कंठेने प्रतीक्षा का करत आहे?
◻ आपण काळ आणि समय आत्मविश्वासाने यहोवाच्या हातात सोपवून निश्चिंत का होऊ शकतो?
[१७ पानांवरील चित्र]
ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहात ख्रिश्चनांनी जागृत राहिले पाहिजे
[१८ पानांवरील चित्र]
अभिषिक्त शेषांना आपला अढळ विश्वास कायम ठेवण्यासाठी कोणत्याही आकडेमोडीची आवश्यकता वाटत नाही, ते अविरतपणे यहोवाची सेवा करत राहतात