त्यांनी यहोवाच्या इच्छेप्रमाणे केले
प्रतिष्ठितांपुढे पौल निर्भीडपणे साक्ष देतो
या दोन मनुष्यांमधील फरक कधीच दिसला नसता. एकाच्या डोक्यावर मुकुट होता आणि दुसऱ्याच्या पायात साखळदंड. एक राजा होता तर दुसरा कैदी. दोन वर्षे कारावासात राहिल्यानंतर, पौल आता यहुद्यांचा शासक, हेरोद अग्रिप्पा दुसरा, याच्या समोर उभा होता. राजा आणि त्याची सोबतीण बर्णीका “मोठ्या थाटामाटाने . . . सरदार व नगरातील मुख्य लोक ह्यांच्यासह दरबारात” आले होते. (प्रेषितांची कृत्ये २५:२३) एक संदर्भ ग्रंथ म्हणतो: “तेथे कदाचित शेकडो लोक उपस्थित असावेत.”
नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या शासकाने अर्थात फेस्ताने ह्या सभेचे आयोजन केले होते. त्याच्या आधीचा शासक फेलिक्स याला, पौलाने तुरुंगातच खितपत पडावे असे वाटत होते. पण फेस्ताने पौलाविरुद्धचे आरोप किती सबळ आहेत यावर आक्षेप घेतला. कारण पौलाला काहीही करून आपली निर्दोषता पटवून द्यायची होती आणि म्हणूनच तर त्याने आपले प्रकरण कैसरापुढे सादर केले होते! पौलाच्या प्रकरणामुळे अग्रिप्पा राजाची जिज्ञासा वाढली. “त्या माणसाचे म्हणणे ऐकावे असे माझ्याहि मनात आहे,” असे त्याने म्हटले. फेस्ताने लागलीच व्यवस्था केली; या असामान्य कैद्याविषयी राजा काय विचार करील असे कदाचित त्याला वाटले असेल.—प्रेषितांची कृत्ये २४:२७–२५:२२.
दुसऱ्या दिवशी, पौल प्रतिष्ठितांच्या एका मोठ्या समूहासमोर उभा होता. “यहूद्यांच्या चालीरीती व त्यांच्या वादविषयक बाबी ह्यांत आपण विशेष जाणते आहा, . . . आणि मला आज आपणापुढे प्रत्युत्तर करावयाचे आहे, ह्यावरून मी स्वतःला धन्य समजतो; आणि मी आपल्याला विनंती करितो की, शांतपणे माझे भाषण ऐकून घ्या,” असे तो अग्रिप्पाला म्हणाला.—प्रेषितांची कृत्ये २६:२, ३.
पौल धाडसाने आपली बाजू मांडतो
पूर्वी आपण ख्रिश्चनांचा छळ करीत होतो असे पौलाने पहिल्यांदा अग्रिप्पाला सांगितले. तो म्हणाला: “त्यांना दुर्भाषण करण्यास लावण्याचा प्रयत्न मी करीत असे; त्यांच्यावर अतिशय पिसाळून जाऊन बाहेरच्या नगरापर्यंत देखील मी त्यांचा पाठलाग करीत असे.” पुढे त्याने घडलेल्या एका विलक्षण दृष्टान्ताबद्दल त्याला सांगितले; पुनरुत्थित येशूने त्याला असे विचारले, की “माझा छळ का करितोस? पराणीवर लाथ मारणे तुला कठीण” आहे.a—प्रेषितांची कृत्ये २६:४-१४.
येशूने मग शौलाला सांगितले, की सर्व राष्ट्रांतील लोकांस “जे माझ्याविषयी पाहिले आहे व ज्याबाबत मी तुला दर्शन देणार आहे,” त्याविषयी तू साक्ष द्यावी. आपल्याला मिळालेली ही नेमणूक पूर्ण करण्याकरता आपण मेहनत घेतली असे पौल म्हणाला. तरीसुद्धा “ह्या कारणामुळे यहूदी मला मंदिरात धरून ठार मारावयास पाहत होते,” असे त्याने अग्रिप्पास सांगितले. यहुदी धर्मावरील अग्रिप्पाचे प्रेम ओळखून पौलाने या गोष्टीवर जोर दिला, की मशीहाच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाविषयी ‘संदेष्ट्यांनी व मोशेने जे सांगितले त्याखेरीज दुसरे काही न सांगणे’ हे त्याचे साक्षकार्य होते.—प्रेषितांची कृत्ये २६:१५-२३.
फेस्ताने त्याचे बोलणे मध्येच तोडत असे म्हटले: “विद्येचे अध्ययन फार झाल्यामुळे तुझे डोके फिरले आहे.” पौलाने त्याला उत्तर दिले: “फेस्त महाराज, मी वेडा नाही, तर मी खरेपणाच्या व सुज्ञपणाच्या गोष्टी बोलतो.” आणि मग अग्रिप्पाला संबोधून पौल म्हणाला: “ह्या गोष्टी राजे अग्रिप्पा ह्यांना ठाऊक आहेत; त्यांच्यासमोर मी मनमोकळेपणे बोलतो. ह्यातले त्यांच्यापासून काही गुप्त नाही अशी माझी खातरी आहे; कारण हे कोनाकोपऱ्यात घडलेले नाही.”—प्रेषितांची कृत्ये २६:२४-२६.
मग पौल थेट अग्रिप्पाला संबोधून बोलू लागला: “हे राजा अग्रिप्पा, संदेष्ट्यांवर आपला विश्वास आहे ना?” या प्रश्नाने अग्रिप्पा बुचकळ्यात पडला. कारण त्याला आपली प्रतिष्ठा जपायची होती आणि पौलाबरोबर सहमत होणे म्हणजे फेस्ताने ज्याला ‘वेडेपण’ म्हटले त्याजशी सहमत झाल्यासारखे होते. अग्रिप्पा उत्तर देण्यास कुचराई करीत आहे हे आपसूक जाणून पौलानेच उत्तर दिले. तो म्हणाला: “विश्वास आहे, हे मला ठाऊक आहे.” (तिरपे वळण आमचे.) आता अग्रिप्पाने तोंड उघडले पण आपले मत स्पष्ट आणि ठामपणे न मांडता तो त्याला म्हणाला: “मी ख्रिस्ती व्हावे म्हणून तू थोडक्यानेच माझे मन वळवितोस!”—प्रेषितांची कृत्ये २६:२७, २८.
एक जबरदस्त मुद्दा ठामपणे मांडण्याकरता पौल अग्रिप्पाच्या उडवाउडवीच्या वाक्याचा कुशलतेने उपयोग करतो. तो म्हणतो: “थोडके किंवा फार, कसेहि असो; पण केवळ आपणच नव्हे, तर आज हे जे सर्व माझे भाषण ऐकत आहेत त्यांनी ह्या बंधनांशिवाय माझ्यासारखे व्हावे अशी देवाजवळ माझी प्रार्थना आहे.”—प्रेषितांची कृत्ये २६:२९.
पौल मृत्यूची किंवा कारावासाची शिक्षा भोगावयास पात्र आहे असा एकही मुद्दा अग्रिप्पा आणि फेस्ता यांना दिसला नाही. तरीपण, कैसराला प्रकरण सादर करण्याविषयी त्याने केलेल्या विनंतीला झुगारता येत नव्हते. म्हणूनच अग्रिप्पा फेस्ताला म्हणाला: “ह्या माणसाने कैसराजवळ न्याय मागितला नसता तर त्याला मोकळे करिता आले असते.”—प्रेषितांची कृत्ये २६:३०-३२.
आपल्यासाठी बोध
प्रतिष्ठितांपुढे साक्ष देण्याची पौलाची पद्धत आपल्यासाठी उल्लेखनीय उदाहरण आहे. राजा अग्रिप्पाबरोबर बोलताना पौलाने बुद्धीचा वापर केला. अग्रिप्पा आणि बर्णीका यांचे प्रकरण त्याला चांगलेच ज्ञात होते. त्यांचा गोत्रगमनी संबंध होता, कारण बर्णीका खरे तर अग्रिप्पाची बहीण होती. परंतु या प्रसंगी पौलाने नैतिकतेवर भाषण द्यायचा विचार केला नाही. उलट त्याने अशा मुद्द्यांवर जोर दिला ज्यांवर त्याचे आणि अग्रिप्पाचे एकमत होते. शिवाय, पौलाने विद्यासंपन्न गमालिएलकडून प्रशिक्षण घेतलेले असले तरी, अग्रिप्पा यहुदी रीतीरिवाजांचा गाढा अभ्यासक होता हे त्याने कबूल केले. (प्रेषितांची कृत्ये २२:३) अग्रिप्पाची व्यक्तिगत नीतितत्त्वे काहीही असली तरी पौल त्याच्याशी आदराने बोलला कारण अग्रिप्पा अधिकार पदावर होता.—रोमकर १३:७.
आपण आपल्या विश्वासांची निर्भीडपणे साक्ष देतो तेव्हा, आपल्या श्रोत्यांच्या अशुद्ध प्रथा उघड करणे किंवा त्यांचा धिक्कार करणे हा आपला हेतू नसतो. उलट, त्यांना सहजासहजी सत्य स्वीकारता यावे म्हणून आपण सुवार्तेच्या सकारात्मक पैलूंवर भर दिला पाहिजे, आपल्या आशांवर जोर दिला पाहिजे. वृद्ध किंवा अधिकारपदावर असलेल्यांशी बोलताना आपण त्यांचा दर्जा कबूल केला पाहिजे. (लेवीय १९:३२) अशाप्रकारे आपण पौलाचे अनुकरण करू शकतो; तो म्हणाला: “मी सर्वांना सर्व काही झालो आहे, अशा हेतूने की, मी सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे.”—१ करिंथकर ९:२२.
[तळटीपा]
a “पराणीवर लाथ मारणे” ही अभिव्यक्ती, बैल हाकण्यासाठी व त्यांना दिशा दाखवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अणकुचीदार अरीला जर बैलाने लाथ मारली तर त्यालाच इजा होईल असे वर्णन करते. तसेच, ख्रिश्चनांचा छळ करण्याद्वारे शौल आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत होता कारण देवाचे पाठबळ असलेल्या लोकांविरुद्ध तो लढत होता.