दीर्घ प्रयत्न प्रगतीकडे निरवतात
ज्युज मॅग्लॉव्हस्की यांच्याद्वारे निवेदित
पोलिसाने माझा हात पकडला तेव्हा माझ्या वडिलांचा मी शोध घेत होतो. माझ्या अज्ञानतेत त्याने बाबांना पोलीस ठाण्यात नेले सुद्धा. पोलीस ठाण्यात पोहंचल्यानंतर पोलिसाने बायबलसहित आमची सर्व पुस्तके जप्त करून त्यांचा जमिनीवर ढीग घातला. हे सर्व पाहून माझ्या वडिलांनी विचारले: “तुम्ही बायबल सुद्धा खाली टाकलीत?” पोलीस अधिकाऱ्याने त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून बायबल उचलून टेबलावर आणून ठेवली.
आम्ही पोलीस ठाण्यात कसे पोहंचलो? आम्ही काय करत होतो? आम्ही नास्तिक पोलीस राज्यात होतो का, ज्यामुळे आमचे बायबल सुद्धा आमच्यापासून हिसकावून घेण्यात आले? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपल्याला १९२५ च्या काळात जावे लागेल आणि तेव्हा माझा जन्म देखील झाला नव्हता.
त्यावेळी माझी आई ज्युलियाना आणि बाबा, इस्टिफॅनो मॅग्लॉव्हस्की यांनी त्या काळचे युगोस्लाव्हिया सोडून ब्राझीलमधील साओ पावलो येथे वास्तव्य करण्यासाठी स्थानांतर केले. माझी आई कॅथलिक आणि बाबा प्रॉटेस्टंट होते तरीदेखील धर्मामुळे त्यांच्यात कोणतेही मतभेद होत नव्हते. खरे पाहता, सुमारे दहा वर्षानंतर असे काही घडले ज्यामुळे ते धार्मिकरित्या एकत्रित आले. बाबांच्या साडूंनी हंगेरियन भाषेतील मृतांच्या संदर्भात असणारी एक रंगीत पुस्तिका त्यांच्यासाठी आणली. त्यांना ही पुस्तिका भेट म्हणून मिळाली होती आणि ही पुस्तिका वाचून तिच्यातील विशेषतः “नरक” विषयांवर त्यांनी मत द्यावे, असे त्यांनी बाबांना सांगितले. बाबा ती पुस्तिका रात्रभर पुनःपुन्हा वाचत होते; दुसऱ्या दिवशी ते या पत्रिकेबाबत त्यांचे मत विचारण्यास आले तेव्हा बाबांनी अगदी स्पष्टपणे म्हटले: “येथे सत्य आहे!”
लहान आरंभ
हे प्रकाशन यहोवाच्या साक्षीदारांचे असल्यामुळे त्यांचे विश्वास आणि शिकवणी याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी त्या दोघांनी त्यांचा शोध घेतला. अखेरीस त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर आमच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी साक्षीदारांसोबत बायबल आधारित चर्चा करण्यास आरंभ केला. त्याच वर्षी म्हणजे १९३५ मध्ये हंगेरियन भाषेत नियमित अभ्यासाची सुरवात करण्यात आली; या बायबल अभ्यासाला सरासरी आठ जण उपस्थित राहत होते आणि तेव्हापासून आमच्या घरामध्ये नियमित बायबल अभ्यासांची सुरवात झाली.
बायबलचा दोन वर्षे अभ्यास केल्यानंतर बाबांनी १९३७ मध्ये बाप्तिस्मा घेतला आणि ते घरोघरच्या प्रचार कार्यामध्ये सहभागिता करण्यात तसेच नियुक्त सेवक व अभ्यास संचालक या नात्याने सेवा करण्यात यहोवाचे आवेशी साक्षीदार झाले. साओ पावलोमधील व्हिला मारियाना या उप-नगरात पहिल्या मंडळीची स्थापना करण्यात त्यांनी मदत केली. पुढे या मंडळीचे शहराच्या केंद्रस्थानी स्थानांतर करण्यात आले आणि सेंट्रल मंडळी, या नावाने तिला ओळखण्यात येऊ लागले. दहा वर्षानंतर इपिरँगा या उप-नगरामध्ये दुसरी मंडळी स्थापण्यात आली आणि मंडळी सेवक या नात्याने बाबांची या मंडळीत नियुक्ती करण्यात आली. सन १९५४ मध्ये मॉइन्यो व्हेल्यो या उप-नगरात तिसरी मंडळी स्थापन करण्यात आली आणि या मंडळीतही बाबांनी मंडळी सेवक या नात्याने काम पाहिले.
हा गट चांगल्याप्रकारे दृढ होताच त्यांनी साओ बरनॉरडो डो कॅम्पो या शेजारील गटाला मदत करण्यास सुरवात केली. या वर्षांच्या काळातील साक्षीदारांच्या या लहान गटांच्या प्रयत्नांना यहोवाने आशीर्वादित केल्यामुळे अद्भुत वृद्धी घडून आली आहे, परिणामी १९९४ मध्ये महा साओ पावलोमध्ये ७६० मंडळ्यात ७०,००० पेक्षा अधिक प्रचारक होते. खेदाची गोष्ट म्हणजे, ही वृद्धी पाहण्यास बाबा आता जिवंत नव्हते. वयाच्या ५७ व्या वर्षी, १९५८ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
बाबांच्या उदाहरणाच्या अनुकरणासाठी सर्वकष प्रयत्न करणे
इतर प्रौढ ख्रिश्चनांप्रमाणे पाहुणचार हा माझ्या वडिलांचा उल्लेखनीय गुण होता. (३ योहान १, ५-८, पाहा.) त्यामुळे ॲन्टोनिओ अन्ड्राडे आणि त्यांची पत्नी व मुलगा, जे बंधू आणि भगिणी युल यांच्यासोबत १९३६ मध्ये अमेरिकेतून ब्राझीलमध्ये आले होते त्या सर्वांचे आदारातिथ्य करण्याचा सुहक्क आम्हाला प्राप्त झाला. गिलियड प्रशालेचे दोघे पदवीधर हॅरी ब्लॅक आणि डिलर्ड लिथको हे देखील आमच्या घरी पाहुणचारासाठी होते आणि ते ब्राझीलमध्ये १९४५ साली नियुक्ती करण्यात आलेले पहिले मिशनरी होते. त्यानंतर पुष्कळजण आमच्या घरी आले. आमच्या कुटुंबातील प्रत्येकासाठी हे बांधव आणि भगिणी उत्तेजनाचा निरंतर स्त्रोत होता. या वास्तविकतेची गुणग्राहकता बाळगून आणि माझ्या कुटुबांच्या लाभासाठी, पाहुणचाराच्या या ख्रिस्ती गुणाच्या संदर्भातील माझ्या वडिलांच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याचा मी सर्वकष प्रयत्न केला आहे.
बाबांनी १९३५ मध्ये सत्य शिकले तेव्हा मी केवळ नऊ वर्षांचा होतो, तरीदेखील थोरला मुलगा या नात्याने त्यांच्या ईश्वरशासित कार्यांमध्ये त्यांना साथ देण्यास मी सुरवात केली. साओ पावलोमध्ये इसॉ डे कॅरोझ मार्ग, क्रमांक १४१ येथील साक्षीदारांच्या मुख्यालयातील राज्य सभागृहामध्ये होणाऱ्या सभांसाठी आम्ही सर्व बाबांसह उपस्थित राहत होतो. बाबांनी दिलेल्या शिकवणीचा आणि प्रशिक्षणामुळे यहोवाची सेवा करण्याची उत्कट इच्छा माझ्यामध्ये विकसित झाली, परिणामी १९४० मध्ये यहोवाला माझ्या समर्पणाचे प्रतीक म्हणून मी पाण्यात बुडून बाप्तिस्मा घेतला. मी ज्या नदीमध्ये बाप्तिस्मा घेतला ती ट्यटॅ नदी साओ पावलोच्या मध्यातून वाहते आणि आता प्रदूषित झाली आहे.
सुवार्तेचा नियमित प्रचारक बनण्याचा अर्थ म्हणजे इतरांमध्ये सत्याच्या संदेशाचे रोपण करणे आणि त्यांच्याबरोबर गृह बायबल अभ्यास संचालित करणे, हा होतो हे मी लवकरच शिकलो. ब्राझीलमधील यहोवाच्या हजारो समर्पित साक्षीदारांना पाहिल्यानंतर मला फार आनंद होतो याचे कारण म्हणजे, मला हे ठाऊक आहे की, यापैकी अनेकांना सत्याचे ज्ञान देण्यासाठी किंवा सत्याबद्दलची त्यांची गुणग्राहकता वाढविण्यासाठी मदत करण्यास यहोवाने माझा वापर केला आहे.
मी ज्यांना मदत केली त्यापैकी जॉक्वेन मेलो हा एक आहे आणि त्याच्याबरोबर माझी भेट दारोदारची सेवा करताना झाली. त्यावेळी मी तीन लोकांबरोबर बोलत होतो; ते ऐकत होते परंतु त्यांना विशेष आस्था नव्हती. आमचे संभाषण ऐकण्यासाठी आलेल्या एका तरुण मुलाकडे माझे लक्ष गेले; तो अगदी लक्ष देऊन ऐकत होता. त्याची आस्था पाहिल्यानंतर मी माझे लक्ष त्याच्यावर केंद्रित केले आणि उत्तमप्रकारे साक्ष दिल्यानंतर त्याला मंडळीच्या पुस्तक अभ्यासाकरता निमंत्रण दिले. तो अभ्यासाला उपस्थित राहिला नाही; परंतु ईश्वरशासित प्रशालेला तो उपस्थित होता आणि तेथून पुढे सभांना तो नियमितपणे उपस्थित राहू लागला. त्याने उत्तम प्रगती करून बाप्तिस्मा घेतला आणि कित्येक वर्षे प्रवासी सेवक या नात्याने सेवा केली, या कार्यात त्याच्या पत्नीने त्याला सोबत दिली.
दुसरा मनुष्य ऑरनॉल्डो ओरसी आहे आणि त्याच्याबरोबर माझी भेट माझ्या कामाच्या ठिकाणी झाली होती. माझ्या सह-कर्मचाऱ्याला मी नियमितपणे साक्ष देत होतो; परंतु एक दाढीवाला युवक चर्चेमध्ये भाग न घेता शांतपणे ऐकत असे त्यामुळे त्याच्याशी थेटपणे बोलण्यास मी सुरवात केली. कट्टर कॅथलिक कुटुंबाचा तो एक सदस्य होता, तरी देखील धुम्रपान करणे, अश्लिल चित्रपट पाहणे, आत्म-रक्षणासाठी ज्युडोचा सराव करणे, वगैरे प्रश्न त्याने मला विचारले. बायबल काय सांगते हे मी त्याला दाखवले आणि त्याने मला दुसऱ्याच दिवशी त्याच्या घरी बोलावून माझ्यासमोर धुम्रपानाचा पाईप, लायटर व क्रॉस मोडून टाकला, अश्लिल फिल्म्सचा नाश केला, त्याचप्रमाणे त्याने स्वच्छ दाढी केली हे सर्व पाहून मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. काही मिनीटांमध्ये परिवर्तन झालेला मनुष्य! त्याने ज्युडोचा सराव करणे देखील थांबवले आणि त्याच्याबरोबर दररोज बायबल अभ्यास घेण्यासाठी मला सांगितले. त्याच्या पत्नीचा आणि वडिलांचा विरोध असतानाही त्याने त्याच्या शेजारी राहणाऱ्या बांधवांच्या साहाय्याने आध्यात्मिकरित्या चांगली प्रगती केली. थोडक्याच अवधीत त्याने बाप्तिस्मा घेतला आणि आज मंडळीचे वडील या नात्याने सेवा करत आहे. त्याच्या पत्नीने आणि मुलांनी सुद्धा सत्याचा स्वीकार केला आहे.
राज्य सेवेमध्ये सहभागिता करणे
सुमारे वयाच्या १४ व्या वर्षी मी जाहिरात कंपनीमध्ये काम करण्यास सुरवात केली आणि त्याठिकाणी जाहिरात फलक रंगवण्यास मी शिकलो. याचा मला फारच फायदा झाला कारण घोषणा फलक आणि जाहीर भाषणे व यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनांचे जाहिरात बॅनर रंगवणारा साओ पावलोमध्ये मी एकटाच बांधव होतो. सुमारे तीस वर्षे अधिवेशनामध्ये जाहिरात विभागाचा पर्यवेक्षक या नात्याने सेवा करण्याचा विशेषाधिकार मला मिळाला. अधिवेशनांमध्ये काम करता यावे म्हणून माझ्या रजा मी नेहमी शिल्लक ठेवत असे; रंगरंगोटीचे काम वेळेवर पूर्ण होण्यासाठी काही वेळेस तर मी अधिवेशन गृहामध्येच झोपत असे.
संस्थेच्या सांऊड कारबरोबर काम करण्याची संधी देखील मला मिळाली आणि त्याकाळी अशाप्रकारे काम करणे विलक्षणच होते. आम्ही पुस्तक ठेवण्याच्या स्टँडवर आमच्या बायबल आधारित प्रकाशनांना ठेवत होतो आणि साऊंड कार वरील ध्वनिमुद्रित संदेशाचे प्रक्षेपण केल्यानंतर, काय चालले आहे हे पाहण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या लोकांबरोबर आम्ही बोलत होतो. पोर्टेबल ग्रामोफोन, राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याचे आणखी एक साधन होते आणि संस्थेच्या प्रकाशनांना सादर करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्रामोफोनच्या तबकड्या अजूनही माझ्याकडे आहेत. परिणामी पुष्कळ बायबल आधारित साहित्याचे वाटप करण्यात आले.
त्या दिवसांमध्ये साओ पावलोच्या रस्त्यावरून कॅथलिक चर्चच्या मोठ्या मिरवणूकी काढल्या जात; अनेकदा मिरवणूकीच्या पुढे चालणारे लोक मिरवणूकीसाठी जागा करून देत. एके रविवारी, बाबा आणि मी टेहळणी बुरूज आणि सावध राहा! रस्त्यावर सादर करत असताना एक मोठी मिरवणूक आली तेव्हा बाबांनी नेहमीप्रमाणे आजही डोक्यात टोपी घातली होती. या मिरवणूकीच्या पुढे चालणाऱ्यापैकी एकजण ओरडला: “तुझ्या डोक्यावरची टोपी काढ! मिरवणूक येत आहे हे तुला दिसत नाही काय?” बाबा टोपी काढण्यास तयार नाहीत हे पाहिल्यानंतर आणखी लोक आले आणि त्यांनी आम्हाला दुकानाच्या खिडकीवर रेटण्यास तसेच गोंधळ करण्यास सुरवात केली. यामुळे एका पोलिसाचे लक्ष वेधले गेले आणि तो आमच्याकडे काय चालले आहे हे पाहण्यासाठी आला. पोलिसाबरोबर बोलण्यासाठी त्यापैकी एकाने त्याच्या हाताला धरले. त्याच्या हाताला जोराने झटकावत पोलिसाने फर्मावले: “माझ्या गणवेशावरून तुझा हात बाजूला घे!” काय चालले होते याविषयची नंतर पोलिसाने विचारणा केली. बाबा मिरवणूकीच्या समोर स्वतःची डोक्यावरील टोपी काढण्यास तयार नव्हते, असे या मनुष्याने या पोलिसाला सांगितले आणि पुढे तो म्हणाला: “मी प्रेषितांच्या रोमन कॅथलिक धर्माचा आहे.” त्याला अकल्पित उत्तर मिळाले: “तू म्हणतोस तू रोमी आहेस? तर मग, रोमला परत जा! हे ब्राझील आहे.” मग त्या पोलिसाने आमच्याकडे वळून विचारले: “या ठिकाणी पहिल्यापासून कोण होते?” आम्ही या ठिकाणी सुरवातीपासून असल्याचे बाबांनी पोलिसाला सांगितल्यावर त्याने त्या लोकांना घालवून दिले आणि आमचे काम पुढे कायम ठेवण्यासाठी आम्हाला सांगितले. ती संपूर्ण मिरवणूक जाईपर्यंत तो आमच्या शेजारी उभा होता—आणि बाबांनी टोपी काढली नाही!
अशाप्रकारच्या घटना फारच कमी होत्या. परंतु या घटना घडल्या तेव्हा अल्पसंख्यांकाबद्दलच्या न्यायावर विश्वास ठेवणारे तसेच कॅथलिक चर्चच्या पुढे-पुढे न करणारे लोक त्याठिकाणी उपस्थित होते हे जाणणे उत्तेजन देणारे होते.
दुसरी एक घटना आहे. माझी भेट एका किशोरवयीन मुलाबरोबर झाली; त्याने आस्था दाखवली आणि पुढील आठवड्यात मला पुन्हा बोलावले. मी त्याच्याकडे परत गेल्यानंतर त्याने माझे उत्तमप्रकारे स्वागत करून मला आत बोलावले. मला चिडवणाऱ्या आणि माझा उपहास करणाऱ्या तरुणांच्या टोळीने घेरलेले पाहून मी किती चकरावून गेलो होतो! परिस्थिती आवाक्याबाहेर होती आणि लवकरच ते माझ्यावर हल्ला करतील, असे मला वाटले. मला आत आमंत्रित करणाऱ्यास मी स्पष्ट सांगितले की, माझे काही बरे वाईट झाल्यास त्या गोष्टीस तो पूर्णपणे जबाबदार असेल कारण मी कोठे गेलो आहे हे माझ्या कुटुंबाला ठाऊक होते. मला सोडण्यास मी त्यांना सांगितले आणि तसे करण्यास ते तयार झाले. तथापि, तेथून निघताना मी त्यांना सांगितले की, माझ्याबरोबर एकांतात बोलण्याची त्यांच्यापैकी कोणाची इच्छा असल्यास माझी त्यास काहीएक हरकत नाही. ही टोळी धर्म वेड्यांचा संघ होता आणि ते सर्व स्थानिक पाळकाचे मित्र असून या कारस्थानामागे या पाळकाचा हात असल्याचे नंतर मला कळाले. त्यांच्या तावडीतून सुटल्याबद्दल मला आनंद झाला होता.
अर्थातच, आरंभीच्या काळात ब्राझीलमधील प्रगती हळू किंबहूना फारच मंद गतीने होत होती. आम्ही “वृक्षारोपण” करण्याच्या प्राथमिक स्थितीमध्ये होतो, “मशागत” करण्यासाठी आणि आमच्या श्रमाच्या प्रतिफळांची “कापणी” करण्यासाठी आमच्याकडे फारच कमी वेळ होता. प्रेषित पौलाने जे म्हटले त्याची आम्ही नेहमी आठवण केली: “मी लावले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देव वाढवीत गेला. म्हणून लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराहि काही नाही; तर वाढविणारा देव हाच काय तो आहे.” (१ करिंथकर ३:६, ७) सन १९४५ मध्ये दोन गिलियड पदवीधरांचे ब्राझीलमध्ये आगमन झाले आणि पुष्कळ काळापासून वाट पाहत असलेली वृद्धी होण्याचा काळ आता आला आहे असे त्यावेळी आम्हाला वाटले.
विरोधाला तोंड देताना धिटाई
तथापि, विरोधाशिवाय वृद्धी घडून येणार नव्हती, विशेषतः युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या आरंभानंतर. आमच्या तटस्थ स्थानाचे कारण सामान्य लोकांना आणि अधिकाऱ्यांना न समजल्यामुळे उघडपणे छळ करण्यात येत होता. एकदा १९४१ मध्ये साओ पावलोच्या मध्यभागी घोषणा फलकाच्या साहाय्याने मार्ग साक्षकार्य करताना एक पोलीस अधिकारी मागील दिशेने माझ्याकडे आला; त्याने माझा घोषणा फलक फाडला आणि मला दंडाला धरून पोलीस ठाण्यात नेऊ लागला. त्याठिकाणी मी माझ्या वडिलांचा शोध घेत होतो; परंतु मला ते कोठेही दिसले नाहीत. ब्राझीलचे कार्य परीक्षण करणारे बंधू युल यांच्यासहित माझ्या बाबांना आणि अनेक बंधू व भगिणींना माझ्या आगोदरच पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे, या गोष्टीची कल्पना मला नव्हती. आरंभीच्या परिच्छेदात वर्णन केल्याप्रमाणे या ठिकाणी वडिलांबरोबर माझी पुन्हा एकदा भेट झाली.
मी लहान असल्यामुळे मला पोलीस ठाण्यात डांबून ठेवणे शक्य नसल्यामुळे एका पोलिसाने मला घरी नेऊन आईच्या हाती मला सोपवून दिले. त्याच संध्याकाळी सर्व बहिणींना सुद्धा सोडण्यात आले. त्यानंतर बंधू युल यांच्या शिवाय सर्व दहा बांधवांची मुक्तता करण्याचे पोलिसांनी ठरवले. तथापि, बांधवांनी आग्रहाने सांगितले: “आम्ही गेलो तर सर्वच जाऊ, नाहीतर आम्हापैकी कोणीएक जाणार नाही.” पोलिसांनी त्यांच्या विनंतीला दाद न दिल्याने त्या सर्वांनी सिमेंटचा कोबा असलेल्या एका थंड खोलीत एकत्रितरित्या ती रात्र काढली. दुसऱ्या दिवशी विनाअट सर्वांची सुटका करण्यात आली. घोषणा फलकांच्या साहाय्याने साक्षकार्य केल्यामुळे बांधवांना कित्येकवेळा अटक करण्यात आली. या फलकांवर जाहीर भाषणांची आणि त्याचप्रमाणे फॅसिझम की स्वतंत्रता, हे शीर्षक असलेल्या पुस्तिकेची घोषणा करण्यात आली होती त्यामुळे काही अधिकाऱ्यांना वाटले की, आम्ही फॅसिझम पक्षाची बाजू घेत आहोत, अर्थातच यामुळे गैरसमज निर्माण झाले.
सक्तीच्या लष्करी सेवेमुळे देखील तरुण बांधवांना समस्या निर्माण झाल्या. सन १९४८ मध्ये या संदर्भात तुरुंगवास भोगावा लागणारा पहिला मनुष्य मीच होतो. माझ्यावर काय कार्यवाही करावी हे अधिकाऱ्यांना कळत नव्हते. त्यामुळे कॉसपॉव्हॉ येथील सैन्याच्या बराकीमध्ये मला पाठविण्यात आले आणि तेथे बागेत भाजी लावण्यासाठी आणि निगा राखण्यासाठी त्याचप्रमाणे तलवारबाजीच्या खेळासाठी असणाऱ्या खोलीची स्वच्छता राखण्याचे काम मला देण्यात आले. साक्ष देण्यास आणि लोकांमध्ये प्रकाशनांचे वितरण करण्याच्या अनेक संधी येथे मला मिळाल्या. संस्थेच्या मुले (इंग्रजी) पुस्तकाची प्रत स्वीकारणारा पहिला मनुष्य स्वतः देखरेखाच होता. व्यायाम करण्यास असमर्थ असल्यामुळे खोलीतच असणाऱ्या सुमारे ३० ते ४० सैनिकांना धर्माबद्दलचे शिक्षण देण्याचे काम मला देण्यात आले. अखेरीस, सुमारे दहा महिन्याच्या तुरुंगवासानंतर माझी चौकशी करून मला सोडण्यात आले. मी यहोवाचा आभारी आहे कारण काही लोकांच्या धमक्या, त्यांनी केलेला अपमान आणि उपहास यास तोंड देण्यास त्याने मला सामर्थ्य पुरवले.
विश्वासू आणि एकनिष्ठ मदतनीस
माझा जून २, १९५१ मध्ये बॉरबराशी विवाह झाला आणि तेव्हापासून तिने आमच्या मुलांना प्रशिक्षण देण्यात व त्यांना ‘यहोवाच्या शिस्तीत आणि शिक्षणात वाढवण्यात’ एक विश्वासू आणि एकनिष्ठ सोबतीण या नात्याने भूमिका बजावली आहे. (इफिसकर ६:४) आमच्या पाच मुलांपैकी चार जण त्यांच्या स्थानांप्रमाणे आनंदाने यहोवाची सेवा करत आहेत. आमच्यासह ते देखील सत्यामध्ये कायम टिकून राहतील तसेच संघटनेच्या प्रगतीसाठी आणि चालू असणाऱ्या कामासाठी हातभार लावतील अशी आमची आशा आहे. सोबतच्या छायाचित्रातील हातात घेतलेल्या लहान बाळाव्यतिरिक्त सर्व कौटुंबिक सदस्य यहोवाचे बाप्तिस्माप्राप्त सेवक आहेत. चार जण मंडळीचे वडील असून दोघेजण नियमित पायनियर देखील आहेत आणि ते नीतीसूत्रे १७:६ मधील सत्यतेला स्पष्ट करतात: “पुत्रपौत्र वृद्धांचा मुकुट होत; मुलांची शोभा त्यांचे वडील होत.”
आता वयाच्या ६८ व्या वर्षी माझी प्रकृती असमाधानकारक असते. माझ्यावर १९९१ मध्ये ट्रिपल बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यानंतर ॲन्जीॲप्लॅस्टी करण्यात आली. तथापि, साओ बर्नारडो डो कॅम्पो येथील मंडळीत अध्यक्षीय पर्यवेक्षक या नात्याने अखंड सेवा करणे शक्य झाल्यामुळे मी आनंदी आहे आणि असे करण्याद्वारे मी माझ्या वडिलांच्या पदचिन्हावर चालत आहे जे येथे आरंभीचे कार्य करणाऱ्यांपैकी एक होते. आपली पिढी खरोखरच अतुलनीय आहे कारण यहोवाच्या मशीही राज्याची स्थापना झाल्याची घोषणा करण्याच्या एका अनुपम विशेषाधिकारामध्ये सहभागिता करण्याची संधी आपल्याला आहे. यामुळे पौलाने तीमथ्याला दिलेले शब्द आपण विसरता कामा नये: “तू तर . . . सुवार्तिकाचे काम कर, तुला सोपविलेली सेवा पूर्ण कर.”—२ तीमथ्य ४:५.
[२६ पानांवरील चित्रं]
माझे पालक इस्टिफॅनो आणि ज्युलियाना मॅग्लॉव्हस्की
[२६ पानांवरील चित्रं]
यहोवाच्या समर्पित सेवकांच्या आपल्या कौटुंबिक सदस्यांसमवेत ज्युज आणि बॉरबरा