प्रथम गोष्टींना प्रथम स्थान देण्याची खात्री करा!
आज सभेचा दिवस, पण तुम्हाला ओव्हरटाईम आहे. तुम्ही कशाला प्रथम स्थान द्याल?
समजा तुम्ही पती आणि पिता आहात. कामाहून थकून घरी यायची वेळ होत असते; आज संध्याकाळी सभा आहे हे लक्षात येते. आताच निघाले तर ठीक, म्हणजे निदान पटकन अंगावर पाणी घेऊन, कपडे बदलून, थोडेफार खाऊन तरी निघता येईल. इतक्यात, मालक येतात आणि तुम्हाला ओव्हरटाईम करायला सांगतात. बदल्यात, चांगला पैसा मिळेल असेही सांगतात. तुम्हाला पैशांची आवश्यकता आहे.
किंवा समजा तुम्ही पत्नी आणि आई आहात. संध्याकाळचे जेवण बनवता बनवता सहज तुमचे लक्ष इस्त्रीसाठी पडलेल्या कपड्यांच्या ढीगावर पडते; उद्यासाठीच त्यातली काही कपडे लागणार आहेत. मनात विचार येतो, ‘मी संध्याकाळी सभेला गेले तर इस्त्री केव्हा करणार?’ अलीकडेच, पूर्ण वेळेच्या नोकरीला लागल्यामुळे, घरचे काम सांभाळून नोकरी करायची म्हणजे तारेवरची कसरत.
किंवा समजा तुम्ही विद्यार्थी आहात. टेबलावर, गृहपाठाची थप्पीच्या थप्पी जमलीय. हा गृहपाठ बऱ्याच दिवसांआधी दिला होता, पण तुम्हीच आज नको उद्या करू असा कंटाळा केला आणि आता हे सगळे एकाच वेळी द्यायची पाळी आलीय. आता, गृहपाठ पूर्ण करायचाय तर घरीच राहू असे आईवडिलांना सांगावेसे वाटते.
तुम्ही कोणत्या गोष्टीला प्रथम स्थान देणार: ओव्हरटाईम, इस्त्री, गृहपाठ की मंडळीची सभा? आध्यात्मिक बाबतीत, प्रथम गोष्टींना प्रथम स्थान देणे याचा काय अर्थ होतो? यहोवाचा दृष्टिकोन काय आहे?
प्रथम स्थानी काय असावे?
दहा आज्ञा मिळाल्यानंतर काही दिवसांनीच शब्बाथ दिवशी एक माणूस लाकडे गोळा करताना रंगे हात पकडण्यात आला होता. नियमशास्त्रानुसार तर याला सक्त मनाई होती. (गणना १५:३२-३४; अनुवाद ५:१२-१५) तुम्ही त्या ठिकाणी असता, तर तुमचा निर्णय काय असला असता? तो माणूस, आपले जीवन सुखसोयींनी युक्त असावे म्हणून थोडीच काम करत होता; तो तर आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करत होता म्हणून तुम्ही त्याला सोडून दिले असते का? पूर्ण वर्षात शब्बाथाचा दिवस पुष्कळदा येईल म्हणून फक्त एकदा त्या मनुष्याने पुढची नीट योजना न केल्यामुळे शब्बाथ चुकवला तर काय झाले अशी कारणमीमांसा तुम्ही केली असती का?
यहोवाच्या नजरेत ही गंभीर गोष्ट होती. बायबल म्हणते, “तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, ‘ह्या मनुष्याला अवश्य जिवे मारावे.’” (गणना १५:३५) त्या माणसाने जे केले ते यहोवाने इतक्या गंभीरपणे का घेतले?
लाकडे गोळा करायला त्याचप्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागवण्यासाठी त्या लोकांजवळ सहा दिवस होते. सातवा दिवस त्यांना त्यांच्या आध्यात्मिक गरजांसाठी द्यायचा होता. लाकडे गोळा करण्यात गैर काही नव्हते, पण जी वेळ यहोवाच्या उपासनेसाठी बाजूला राखायची होती त्या वेळेचा उपयोग करणे चुकीचे होते. आज ख्रिस्ती मोशेच्या नियमशास्त्राखाली नसले, तरी आपले अग्रकम ठरवण्यासाठी या घटनेवरून आपल्याला धडा शिकायला मिळत नाही का?—फिलिप्पैकर १:१०.
अरण्यात ४० वर्षे भटकल्यानंतर, इस्राएल लोक वाग्दत्त देशात निघायला तयार झाले. अरण्यात, ईश्वरी तरतुदीने मिळणाऱ्या मान्नाचा काहींना कंटाळा आला होता आणि निश्चितच ते वेगळ्या चवीचे भोजन मिळण्याबाबत उत्सुक होते. “दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत” अशा देशात जाताना त्यांचा दृष्टिकोन योग्य असावा म्हणून यहोवाने त्यांना आठवण करून दिली: “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.”—निर्गम ३:८; अनुवाद ८:३.
‘दुधामधासाठी’ इस्राएलांना कष्ट करावे लागणार होते. सैन्यांचा पराभव करायचा होता, घरे बांधायची होती, शेती करायची होती. इतके काम असतानाही, आध्यात्मिक गोष्टींचे चिंतन करण्यासाठी दररोज वेळ काढावा अशी आज्ञा यहोवाने त्या लोकांना दिली होती. शिवाय, आपल्या मुलांना देवाच्या मार्गांविषयी शिकवण्यासाठीही त्यांना वेळ काढायचा होता. यहोवा म्हणाला: “तुम्ही आपल्या मुलाबाळांना [माझ्या आज्ञा] शिकवा आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्याविषयी बोलत जा.”—अनुवाद ११:१९.
वर्षातून तीनदा, त्या देशातील प्रत्येक इस्राएली पुरुषाला आणि यहुदीय मतानुसारी पुरुषाला यहोवासमोर हजर राहायचे होते. अशा प्रसंगांचा आध्यात्मिक फायदा सबंध कुटुंबाला होतो हे जाणून अनेक कुटुंब प्रमुख आपल्या बायका-मुलांनाही सोबत घेऊन जाण्याची व्यवस्था करायचे. पण, सबंध कुटुंबच्या कुटंब घरी नसताना, शत्रूंपासून घरांची आणि शेतींची राखण कोण करणार? यहोवाने वचन दिले: “वर्षातून तीनदा तू आपला देव परमेश्वर ह्यासमोर हजर व्हावयास जाशील तेव्हा कोणी तुझ्या भूमीचा लोभ धरणार नाही.” (निर्गम ३४:२४) आध्यात्मिक गोष्टींना प्रथम स्थान दिल्यास, त्यांना भौतिक गोष्टींची चणचण भासणार नाही असा भरवसा ठेवायला इस्राएलांच्या ठायी विश्वास असण्याची गरज होती. यहोवाने त्याचे वचन पूर्ण करून दाखवले का? निश्चितच!
पहिल्यांदा राज्य मिळवण्यास झटा
येशूने आपल्या अनुयायांना इतर कशाहीपेक्षा आध्यात्मिक मूल्यांना प्रथम स्थान द्यायला शिकवले. डोंगरावरील प्रवचनात त्याने आपल्या ऐकणाऱ्यांना असा सल्ला दिला: “ह्यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, असे म्हणत चिंता करीत बसू नका. . . . तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याहि सर्व [आवश्यक भौतिक] गोष्टी तुम्हाला मिळतील.” (मत्तय ६:३१, ३३) येशूच्या मृत्यूनंतर लगेचच, नवीन बाप्तिस्माप्राप्त ख्रिश्चनांनी त्या सल्ल्याचे पालन केले. अनेकजण यहुदी किंवा यहुदीय मतानुसारी होते, ज्यांनी सा. यु. ३३ मध्ये पेन्टेकॉस्टचा सण पाळण्यासाठी जेरूसलेमला प्रवास केला होता. तेथे असताना, काही तरी अनपेक्षित असे घडले. त्यांनी येशू ख्रिस्ताविषयीची सुवार्ता ऐकली आणि ती स्वीकारली. आपल्या नवीन विश्वासाबद्दल आणखीन शिकून घेण्याची उत्सुकता असल्याने, ते जेरूसलेममध्येच थांबले. त्यांचे खिसे रिकामे होऊ लागले, अन्नपुरवठा संपू लागला, पण भौतिक सुखसोयींना दुय्यम महत्त्व होते. त्यांना मशीहा मिळाला होता! सर्वांना “प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, . . . व प्रार्थना करण्यात तत्पर” राहता यावे म्हणून त्यांचे ख्रिस्ती बांधव होत्या नव्हत्या त्या भौतिक गोष्टी आपापसांत वाटून आपले भागवत होते.—प्रेषितांची कृत्ये २:४२.
कालांतराने काही ख्रिश्चन, सभांमधील नियमित सहवासाच्या गरजेकडे दुर्लक्ष करू लागले. (इब्री लोकांस १०:२३-२५) ते कदाचित भौतिकवादी बनले असावेत; स्वतःला आणि आपल्या कुटुंबांना सर्व आर्थिक सुखसोयी लाभतात का हेच पाहण्याच्या नादात ते आध्यात्मिक गोष्टींबाबतीत हयगय करू लागले. सभा चुकवू नयेत असे आपल्या बांधवांना उत्तेजन दिल्यानंतर, प्रेषित पौलाने लिहिले: “तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी; जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे; कारण त्याने स्वतः म्हटले आहे, ‘मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.’”—इब्री लोकांस १३:५.
पौलाचा तो सल्ला अगदी समयोचित ठरला. पौलाने इब्री लोकांस पत्र लिहून पाच वर्षेच झाली होती तेवढ्यात सेस्टियस गॅलसच्या रोमन सैन्याने जेरूसलेमला वेढा घातला. विश्वासू ख्रिश्चनांना येशूची सूचना आठवली: “[हे] तुम्ही पाहाल . . . तेव्हा . . . जो धाब्यावर असेल त्याने खाली उतरून अथवा आपल्या घरातून काही घेण्याकरिता आत जाऊ नये; आणि जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र घेण्याकरिता परत येऊ नये.” (मार्क १३:१४-१६) त्यांना ठाऊक होते, की आता पक्की नोकरी किंवा आर्थिक सुस्थिती यांच्यामुळे नव्हे तर येशूच्या सूचना तंतोतंत पाळल्याने ते तारले जाणार होते. ज्यांनी पौलाच्या सल्ल्याचे पालन करून आध्यात्मिक गोष्टींना प्रथम स्थान दिले अशांना घरदार, नोकरी, कपडालत्ता आणि जपून ठेवलेली मालमत्ता हे सगळे मागे टाकून डोंगरावर पळून जाताना निश्चितच इतके काही जड वाटले नसावे; पण अद्यापही पैशांच्या मोहात जखडलेल्यांना मात्र हे अर्थातच कठीण वाटले असणार.
आज काहीजण प्रथम गोष्टींना प्रथम स्थान कसे देतात
आज विश्वासू ख्रिस्ती, आपल्या बांधवांचा सहवास महत्त्वाचा समजतात, आणि अनेकजण सभांना उपस्थित राहण्याकरता अनेक त्यागही करतात. काही भागांमध्ये, फक्त शिफ्ट ड्यूटीचीच नोकरी मिळत असते. सभांच्या दिवशी, आपल्या एका बांधवाची शिफ्ट करायला त्यांचे सहकामगार तयार असले, तर त्यांची शिफ्ट ते शनिवारी रात्री करतात; त्यांच्या समाजातल्या बहुतेक लोकांना करमणुकीसाठी शनिवारी रात्री रिकामे असायला आवडते. इतर बांधवांना शिफ्टमुळे स्वतःच्या सभांना उपस्थित राहता आले नाही, तर ते जवळपासच्या मंडळीत जाऊन तेथे सभांना उपस्थित राहतात. अशा तऱ्हेने, त्यांची सभा सहसा कधीच चुकत नाही. कॅनडा येथील एका नवीन आस्थेवाईक व्यक्तीला ईश्वरशासित सेवा प्रशाला आणि सेवा सभा यांचे काय महत्त्व आहे ते लगेचच कळाले, पण तिच्या कामाची वेळ आणि सभांची वेळ काही जमत नव्हती. म्हणून, स्वतःची शिफ्ट केल्यास आपण त्याचे पैसे देऊ अशी आपल्या एका सहकामगाराशी तिने बोलणी केली, पण या महत्त्वपूर्ण सभा मात्र चुकवल्या नाहीत.
दीर्घकालीन आजार असलेलेही असे अनेकजण आहेत जे सहसा सभा चुकवत नाहीत. त्यांना राज्य सभागृहात जायला जमत नाही तेव्हा, टेलिफोन कनेक्शनद्वारे किंवा टेप रेकॉर्डींगद्वारे ते घरी राहूनच कार्यक्रम ऐकतात. यहोवाने ‘विश्वासू आणि बुद्धिमान दासाकरवी’ केलेल्या आध्यात्मिक तरतुदींसाठी ते दाखवत असलेली कदर कौतुकास्पद आहे! (मत्तय २४:४५) आपल्या वयस्क पालकांची काळजी घेण्यासाठी त्यांच्यासोबत सतत असाव्या लागणाऱ्या ख्रिश्चनांना, मंडळीतल्या सभेला उपस्थित राहता यावे म्हणून जेव्हा कोणी बांधव किंवा बहीण त्या पालकासोबत राहायला तयार होतात तेव्हा ते मनापासून अशांची कदर बाळगतात.
आगाऊ योजना करा!
आपल्या आध्यात्मिक गरजांविषयी दक्ष असणारे पालक, ख्रिस्ती सभांची कदर बाळगण्यास आपल्या मुलांना मदत करतात. सर्वसाधारणपणे, आपल्या मुलांनी त्या दिवसाचा गृहपाठ त्याच दिवशी उरकावा, कंटाळा करू नये अशी त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते. सभा असतात त्या दिवशी, मुले शाळेहून घरी आल्या आल्या आधी गृहपाठ उरकतात. छंद किंवा इतर गोष्टींमुळे मंडळीच्या सभा चुकवायला अनुमती नसते.
तुम्ही पती आणि पिता असाल, तर सभांच्या उपस्थितीला तुम्ही प्राधान्य देता का? पत्नी आणि आई असल्यास, सभांना जायला वेळ मिळेल अशा तऱ्हेने आपल्या सर्व जबाबदारींचा तुम्ही बंदोबस्त करता का? किशोरवयीन असल्यास, सभांना प्रथम स्थान देऊन त्यानुसार गृहपाठ आटोपता की गृहपाठानुसार सभांसाठी वेळ देता?
मंडळीची सभा ही यहोवाची एक प्रेमळ तरतूद आहे. त्या योजनेत भाग घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही प्रथम गोष्टींना प्रथम स्थान दिल्यास यहोवा तुम्हाला समृद्ध आशीर्वाद देईल!