सभांना नियमित उपस्थित राहण्याला —प्राधान्य देणे
१ ख्रिस्ती कुटुंबे मंडळीच्या सभांना नियमित उपस्थित राहण्याला प्राधान्य देतात. परंतु आज जीवनावश्यक गरजा पूर्ण करताना हे कठीण होऊ शकते. घरातील कामे, नोकरी, शाळा या गोष्टी, यहोवाच्या उपासनेसाठी जो वेळ बाजूला ठेवला पाहिजे त्या वेळेवर अतिक्रमण करू लागले आहेत का? यहोवाचा दृष्टिकोन बाळगल्याने आपल्याला जीवनात कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे ते समजायला मदत होऊ शकेल.—१ शमु. २४:६; २६:११.
२ शब्बाथ दिवशी लाकूड गोळा करण्याद्वारे एखाद्या इस्राएली मनुष्याने मुद्दामहून यहोवाचा दृष्टिकोन बाळगण्यास टाळले. त्याने कदाचित असा तर्क केला असावा की तो तर आपल्या कुटुंबाची काळजी घेत होता किंवा ही एक क्षुल्लक गोष्ट होती. परंतु त्याला जी शिक्षा मिळाली त्यावरून यहोवाने हे दाखवून दिले, की उपासनेसाठी ठरवलेल्या वेळेदरम्यान संसारिक गोष्टींच्या मागे लागणे ही एक गंभीर बाब आहे.—गण. १५:३२-३६.
३ समस्येचा सामना करणे: पुष्कळ लोकांना नोकरी करून सभांना नियमित उपस्थित राहण्याकरता बरेच परिश्रम घ्यावे लागतात. काहींनी आपल्या मालकांबरोबर याविषयी बोलून, सहकर्मचाऱ्यांबरोबर पाळ्या बदलून, दुसरी एखादी उचित नोकरी शोधून किंवा आपले राहणीमान साधे करून या समस्येवर मात केली आहे. खऱ्या उपासनेसाठी केलेले हे त्याग पाहून यहोवा खरोखरच आनंदित होतो यात काही शंका नाही.—इब्री १३:१६.
४ शाळेतील गृहपाठसुद्धा एक समस्या बनू शकतो. एका तरुणीने म्हटले: “मी सभांना जाण्यापूर्वी माझा गृहपाठ करते आणि उरलेला घरी आल्यावर करते.” सभा असलेल्या रात्री सर्व गृहपाठ पूर्ण करता येत नाही तेव्हा काही पालकांनी शिक्षकांना समजावून सांगितले आहे, की ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे हे त्यांच्या कुटुंबात एक प्राधान्य आहे.
५ सहकार्य आणि चांगली तयारी, कुटुंब या नात्याने सभांना वेळेवर उपस्थित राहण्याची गुरूकिल्ली आहे. (नीति. २०:१८) लहान मुलांनाही स्वतःची तयारी करायला आणि एका ठरलेल्या वेळी सभांसाठी घरातून बाहेर निघायला शिकवता येऊ शकते. पालक आपल्या उदाहरणाद्वारे मुलांवर सभांचे महत्त्व बिंबवू शकतात.—नीति. २०:७.
६ सध्याच्या युगाचे दबाव जसजसे वाढत जातात तसतसे आपण सभांना नियमित उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे. आपणही यहोवाप्रमाणे दृष्टिकोन बाळगत राहिला पाहिजे आणि सभांना नियमित उपस्थित राहण्याला प्राधान्य दिले पाहिजे.—इब्री १०:२४, २५.