पवित्र सेवेच्या विशेषाधिकारांची नितान्त कदर करणे
पवित्र सेवेच्या विशेषाधिकारांना कदापि क्षुल्लक लेखले जाऊ नये. प्राचीन यहुदाच्या याजकांनी, यहोवाच्या मंदिरासंबंधी असलेल्या आपल्या विशेषाधिकारांप्रती विपरीत मनोवृत्ती दाखवली तेव्हा यहोवाने त्यांचा समाचार घेतला. (मलाखी १:६-१४) तसेच काही इस्राएल लोकांनी नाजीरांना, पवित्र सेवेसंबंधी असलेल्या आपल्या जबाबदाऱ्यांना क्षुल्लक लेखण्याची गळ घातली तेव्हा या पापी इस्राएलांची यहोवाने हजेरी घेतली. (आमोस २:११-१६) खरे ख्रिस्ती देखील पवित्र सेवेत सहभाग घेतात व त्याकडे गांभीर्याने पाहतात. (रोमकर १२:१) या पवित्र सेवेचे अनेकानेक पैलू असून ते सर्व महत्त्वपूर्ण आहेत.
आपल्या अनुयायांसह पृथ्वीवर असताना येशूने त्यांना देवाच्या राज्याचे उद्घोषक बनण्याची तालीम दिली. कालांतराने, त्यांचा संदेश पृथ्वीच्या टोकांपर्यंत पोहंचणार होता. (मत्तय २८:१९, २०; प्रेषितांची कृत्ये १:८) सद्य व्यवस्थीकरणाच्या अंतिम दिवसांत हे प्रचार कार्य पूर्वीपेक्षा अधिकच निकडीचे बनले आहे.
यहोवाचे सर्व साक्षीदार या कार्यात सहभाग घेतात. पायनियर या नात्याने कार्य करू शकणाऱ्या लक्षावधी लोकांना असे करण्यात आनंद होतो. जगव्याप्त कार्यातील महत्त्वपूर्ण गरजा पूर्ण करण्याच्या हेतूने हजारोंनी बेथेलमध्ये, विभागीय व प्रांतीय पर्यवेक्षक या नात्याने प्रवासी कार्यामध्ये किंवा मग मिशनरी सेवेमध्ये खास स्वरूपाच्या पूर्ण-वेळ सेवेसाठी स्वतःला देऊ केले आहे. अशा खास सेवेत टिकून राहण्याची इच्छा असणारे लोक आपल्या परीने काय करू शकतील?
तातडीच्या कौटुंबिक गरजा उद्भवतात तेव्हा
खास स्वरूपाची पूर्ण-वेळ सेवा सुरू करण्याआधी एखाद्या व्यक्तीने आपल्या परिस्थितींत काही फेरबदल करण्यास हवे. सर्वांनाच हे जमते असे नाही. आधीपासूनच शास्त्रवचनीय कर्तव्ये असलेल्यांना कदाचित हे शक्य नसेल. तथापि, खास सेवेत असणाऱ्यांना तातडीच्या कौटुंबिक गरजांना—कदाचित वृद्ध पालकांची काळजी घेण्यासंबंधीच्या गरजांना सामोरे जावे लागते तेव्हा काय? पुढे दिलेली बायबल तत्त्वे व सल्ला आवश्यक मार्गदर्शन देतात.
आपले सबंध आयुष्य यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधाभोवती गुंफलेले असावे. (उपदेशक १२:१३; मार्क १२:२८-३०) आपल्या स्वाधीन केलेल्या पवित्र गोष्टींची नितान्त कदर केली जावी. (लूक १:७४, ७५; इब्री लोकांस १२:१६) एके प्रसंगी, आपल्या प्राथमिकतांमध्ये बदल करण्याची आवश्यकता असणाऱ्या एका मनुष्याला येशूने सांगितले, की देवाच्या राज्याची घोषणा करण्यासाठी त्याने स्वतःला पूर्णपणे व्यस्त ठेवले पाहिजे. स्पष्टतः, हा मनुष्य आपल्या पित्याचा मृत्यू होईस्तोवर हे कार्य पुढे ढकलू इच्छित होता. (लूक ९:५९, ६०) दुसऱ्या बाजूला पाहता, आपले सर्वस्व देवाला समर्पित केल्याचा दावा करणाऱ्या आणि मग ‘आपल्या बापासाठी किंवा आईसाठी काहीएक न करणाऱ्या’ व्यक्तीची चुकीची विचारसरणी येशूने उघड केली. (मार्क ७:९-१३) ‘आपल्या घरच्यांसोबतच’ पालकांची व आजी-आजोबांचीही तरतूद करण्याची गंभीर जबाबदारी प्रेषित पौलाने दाखवून दिली.—१ तीमथ्य ५:३-८.
याचा अर्थ, तातडीच्या गरजा निर्माण होतात तेव्हा खास सेवेत असणाऱ्यांनी काळजीवाहू बनण्याकरता आपल्या नेमणुका सोडून द्याव्यात असा होतो का? याचे उत्तर अनेक कारणांवर अवलंबून आहे. हा एक वैयक्तिक निर्णय आहे. (गलतीकर ६:५) आपल्या नेमणुका बहुमोल वाटत असल्या तरीही पालकांची मदत करण्यासाठी त्यांच्यासोबत जाऊन राहणे शहाणपणाचे असेल असे अनेकांना वाटले आहे. का बरे? कदाचित, निर्माण झालेली गरज आणीबाणीची असेल, मदत करू शकणारा दुसरा कोणताही कौटुंबिक सदस्य नसेल किंवा मग आवश्यक ती मदत देणे स्थानिक मंडळीला शक्य नसेल. अशा प्रकारची मदत देता देताच काहीजण पायनियर सेवा करू शकले आहेत. कुटुंबाची विशिष्ट गरज पूर्ण केल्यानंतर काहीजण पुन्हा एकदा खास स्वरूपाची पूर्ण-वेळ सेवा सुरू करू शकले आहेत. तथापि, अनेक प्रकरणांत इतर काही मार्गांनी परिस्थिती हाताळणे शक्य झाले आहे.
आपली जबाबदारी पेलणे
तातडीच्या गरजा निर्माण झाल्या तेव्हा खास पूर्ण-वेळेच्या सेवेत असणाऱ्यांना आपल्या नेमणुका सोडून न देता या गरजांवर लक्ष देणे शक्य झाले आहे. याची केवळ काही उदाहरणे विचारात घ्या.
सध्या यहोवाच्या साक्षीदारांच्या विश्व मुख्यालयांत सेवा करणाऱ्या एका दांपत्याने विभागीय व प्रांतीय कार्यात सहभाग घेतल्यानंतर १९७८ साली बेथेल सेवेत पदार्पण केले. ईश्वरशासित संघटनेत या बांधवावर मोठ्या जबाबदारीचे काम आहे. पण, त्याच वेळी त्याच्या पालकांनाही मदतीची गरज होती. बेथेलमध्ये राहणाऱ्या या दांपत्याने पालकांची काळजी घेण्यासाठी दर वर्षी तीनचार वेळा, जाऊन-येऊन सुमारे ३,५०० किलोमीटर प्रवास केला. पालकांच्या गरजा भागवण्यासाठी त्यांनी स्वतः एक घर बांधले आहे. पालक अचानक आजारी पडले तेव्हा त्यांची शुश्रूषा करण्यासाठी देखील ते कितीतरी वेळा गेले. सुमारे २० वर्षे त्यांनी जवळजवळ आपली सगळी सुट्टी ही जबाबदारी सांभाळण्याकरता खर्च केली. आपल्या पालकांवर त्यांचे प्रेम असून ते त्यांचा आदर करतात पण त्याच वेळी पवित्र सेवेच्या विशेषाधिकारांनाही ते जिवापाड जपतात.
तब्बल ३६ वर्षे प्रवासी कार्य केलेल्या एका बांधवासमोर, त्याच्या शब्दांत सांगायचे झाल्यास, आयुष्यातील सगळ्यात आव्हानात्मक परिस्थिती उभ्या ठाकल्या. यहोवाची विश्वासू सेवक असलेल्या ८५ वर्षांच्या त्याच्या सासूला तिची मदत करू शकेल अशा कोणा व्यक्तीसोबत राहण्याची गरज होती. त्यावेळी तिच्या बहुतेक सर्वच मुलांना असे वाटले, की तिने त्यांच्यासोबत राहणे सोयीचे ठरणार नाही. एका नातेवाईकाने त्या प्रवासी पर्यवेक्षकांना सांगितले, की त्याने आणि त्याच्या पत्नीने आपली पूर्ण-वेळेची सेवा सोडून कुटुंबाच्या वतीने आईची काळजी घेणे याशिवाय दुसरा कोणताच उपाय नाही. पण, या दांपत्याने आपली मौल्यवान सेवा सोडून दिली नाही की आपल्या आईच्या गरजांची हेळसांड देखील केली नाही. पुढच्या नऊ वर्षांपर्यंत ती बहुतेक वेळ त्यांच्यासोबतच राहत होती. सुरवातीला ते एका चालत्याफिरत्या घरात आणि त्यानंतर विभागाने पुरवलेल्या विविध घरांत राहत होते. प्रदीर्घ समयांपर्यंत, त्यावेळी प्रांतीय पर्यवेक्षक असलेला हा बांधव आपल्या नेमणुका पार पाडण्यासाठी प्रवास करत असे आणि त्यांची पत्नी घरी राहून आपल्या आईची पूर्ण-वेळ प्रेमळ काळजी वाहत असे. दर आठवडी रविवारच्या सभा संपल्यानंतर यांची मदत करण्यासाठी पती लांबचा प्रवास करून घरी येत. या परिस्थितीची माहिती असलेल्या अनेकांनी, हे दांपत्य जे काही करत होते त्याचे फार कौतुक केले. कालांतराने, कुटुंबाचे इतर सदस्य देखील काही मदत करण्यासाठी पुढे आले. खास स्वरूपाच्या पूर्ण-वेळ सेवेचा विशेषाधिकार जपल्यामुळे या आत्मत्यागी दांपत्याच्या सेवेपासून आजही यहोवाच्या हजारो लोकांना लाभ होत आहे.
कुटुंबाच्या सहकार्याने
कुटुंबाचे विविध सदस्य खास स्वरूपाच्या पूर्ण-वेळ सेवेचे मोल जाणतात तेव्हा ते कदाचित सहकार्य करतील जेणेकरून त्यांच्यापैकी निदान काहीजण तरी त्यात सहभाग घेऊ शकतील.
कौटुंबिक सहकार्याचा हा आत्मा पश्चिम आफ्रिकेत मिशनरी म्हणून सेवा करणाऱ्या एका कॅनडियन दांपत्याला उपयुक्त ठरला आहे. काहीही होणार नाही अशी खोटी आशा बाळगून एखादी निकडीची परिस्थिती उद्भवेपर्यंत ते हातावर हात ठेवून बसले नाही. विदेशी सेवेची तयारी करण्याकरता गिलियडच्या वॉच टावर बायबल प्रशालेस जाण्यापूर्वी, आपली आई आजारी पडल्यास किंवा तिला काही कमीजास्त झाल्यास तिची शुश्रूषा कोण करणार या बाबीची पतीने आपल्या धाकट्या भावाबरोबर बसून चर्चा केली. त्यांचे त्यांच्या आईवर प्रेम असल्यामुळे व त्याचवेळी मिशनरी कार्याच्या मोलाची जाण असल्यामुळे धाकट्या भावाने म्हटले: “माझं लग्न झालंय; मला आता मुलंबाळं आहेत. त्यामुळे मी दूर जाऊन तुमच्याइतकं कार्य करू शकत नाही. आईला काही झालंच, तर मी आहे की तिची काळजी घेण्यासाठी.”
दक्षिण अमेरिकेत सेवा करणाऱ्या एका दांपत्यास, पत्नीच्या वयस्कर आईची काळजी घेण्यासाठी माहेरच्या लोकांकडून बरेच सहकार्य मिळाले. पत्नीच्या एका बहिणीने आणि मेहुण्याने आईची खूप सेवा केली पण नंतर याच बहिणीला एक दुर्धर व्याधी झाली. मग त्यानंतर काय झाले? चिंता दूर करण्यासाठी तिच्या मेहुण्याने लिहिले: “मी आणि मुलं जिवंत आहोत तोपर्यंत तुला कधीच मिशनरी सेवा सोडावी लागणार नाही.” पत्नीच्या दुसऱ्या एका बहिणीने व मेहुण्याने आईची काळजी घेण्यासाठी आपले घर विकले व ते तिच्यासोबत जाऊन राहू लागले; आईचा मृत्यू होईपर्यंत त्यांनी तिची काळजी घेतली. सहकार्याचा किती हा उत्तम आत्मा! मिशनरी सेवेस पाठबळ देण्यासाठी ते सर्व हातभार लावत होते.
औदार्याने यहोवाला देणारे पालक
पवित्र सेवेसंबंधी पालक अनेकदा एक उल्लेखनीय कदर प्रदर्शित करतात. यहोवाचा सन्मान करण्यात मुले, त्यांची सगळ्यात मौल्यवान संपत्ती होय. (नीतिसूत्रे ३:९) अनेक ख्रिस्ती पालक आपल्या मुलांना पूर्ण-वेळेची सेवा हाती घेण्याचे प्रोत्साहन देतात. त्यांच्यापैकी काहींची भावना हन्नासारखी आहे जिने आपला मुलगा शमुवेल यांस यहोवाची सेवा करण्यासाठी त्याला ‘निरंतरसाठी’ अर्थात “आमरण” यहोवाच्या स्वाधीन केले.—१ शमुवेल १:२२, २८.
अशाच एका पालकाने आफ्रिकेतील आपल्या मुलीस लिहिले: “तुला लाभलेल्या या उत्कृष्ट विशेषाधिकारासाठी आम्ही यहोवाचे आभार मानतो. यापेक्षा अधिक उत्तम आणखीन काय असू शकते?” आणि दुसऱ्या एका प्रसंगी आईने म्हटले: “हे खरं, की एकमेकांपासून दूर राहण्याचा त्याग आपल्याला करावा लागतो, पण यहोवा कशाप्रकारे तुझी काळजी घेतो हे पाहणं किती आनंददायी आहे!”
आपल्या वयोवृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी उद्भवलेल्या विविध परिस्थितींचा फेरविचार केल्यानंतर इक्वादोरमधील एका मिशनऱ्याने लिहिले: “मला असं वाटतं, की मला आणि माझ्या पत्नीला मिळालेलं सगळ्यात मोठं साह्य म्हणजे माझ्या वडिलांच्या प्रार्थना. त्यांच्या मृत्यूनंतर आईनं आम्हाला सांगितलं: ‘तुम्ही दोघांनी तुमच्या नेमणुकीत टिकून राहावं म्हणून तुमच्यासाठी यहोवाकडे प्रार्थना करण्याचं एक दिवसही तुझ्या वडिलांनी चुकवलं नाही.’”
आपला एक मुलगा पूर्ण-वेळेच्या सेवेत असल्यामुळे कॅलिफोर्निया, अमेरिका येथील एक वयोवृद्ध दांपत्य प्रसन्न होते. आईचा मृत्यू झाला तेव्हा तो मुलगा व त्याची पत्नी स्पेनमध्ये होते. आता वडिलांची काळजी घेण्यासाठी काही व्यवस्था करण्याची गरज कुटुंबातील इतर सदस्यांना भासली. प्रापंचिक नोकरी व मुलांचे संगोपन करण्यात व्यस्त असल्यामुळे आपण ही जबाबदारी घेऊ शकणार नाही असं त्यांना वाटलं. इतकंच नाही तर, खास स्वरूपाच्या पूर्ण-वेळेच्या सेवेत असलेल्या दांपत्याने घरी परतून वडिलांची काळजी घ्यावी अशी त्यांनी या दांपत्याला गळ घातली. तथापि, वडील ७९ वर्षांचे असले तरी चांगले ठणठणीत होते शिवाय त्यांची आध्यात्मिक दृष्टी देखील स्पष्ट होती. कुटुंबाच्या एका चर्चेत प्रत्येकाने आपापली मते अभिव्यक्त केल्यानंतर वडील उभे राहिले आणि ठामपणे म्हणाले: “यांनी पुन्हा स्पेनला जाऊन आपलं कार्य जारी ठेवावं अशी माझी इच्छा आहे.” त्यांनी तसेच केले पण त्याचवेळी भौतिकरित्या वडिलांना साहाय्यही केले. सध्या ते स्पेनमध्ये विभागीय कार्याच्या नेमणुकीत आहेत. त्या कौटुंबिक चर्चेनंतर, हे दांपत्य एका विदेशी क्षेत्रात जे काही करत होते त्याचे मोल कुटुंबातील इतर सदस्यांनी जाणले आहे. अनेक वर्षांनंतर, त्या कुटुंबातील एका मुलाने वडिलांना आपल्या घरी नेले व त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांची सेवा केली.
सुमारे ४० वर्षे पायनियरींग केलेल्या पेन्सिल्व्हेनिया, अमेरिका येथील ९० हून अधिक वर्षांच्या एका अभिषिक्त बांधवाची पत्नी गंभीररीत्या आजारी पडून शेवटी वारली. त्यावेळी त्यांना एक मुलगा व तीन मुली होत्या; यांशिवाय अनेकानेक आध्यात्मिक मुले देखील होती. त्यांची एक मुलगी ४० हून अधिक वर्षे पूर्ण-वेळेच्या सेवेत होती; मिशनरी या नात्याने तिने प्रवासी कार्यामध्ये व बेथेलमध्ये आपल्या पतीसोबत सेवा केली होती. वडिलांची योग्य ती काळजी घेता यावी म्हणून काही व्यवस्था करण्यात तिने हातभार लावला. त्यांना राज्य सभागृहातील सभांना घेऊन जाण्यातही स्थानिक बांधवांनी त्यांची मदत केली. नंतर मग तिच्या पतीचा मृत्यू झाला तेव्हा वडिलांची काळजी घेण्यासाठी तिने बेथेल सोडून यावे अशी त्यांची इच्छा आहे का असे तिने वडिलांना विचारले. पवित्र गोष्टींची नितान्त कदर असल्यामुळे त्यांच्या गरजा इतर मार्गांनी पूर्ण केल्या जाऊ शकतील असे त्यांना वाटले. म्हणून मग त्यांनी उत्तर दिले: “ही सगळ्यात मोठी चूक तू करून बसशील, आणि मी तसं करण्यास तुला भाग पाडलं तर ती आणखीनच मोठी चूक होईल.”
साह्य करणाऱ्या मंडळ्या
खास स्वरूपाच्या पूर्ण-वेळ सेवेत असलेल्यांच्या वयोवृद्ध पालकांची काळजी घेण्यात काही मंडळ्यांनी खूप मदत केली आहे. खासकरून अशा सेवेत अनेकानेक वर्षे घालवलेल्यांचे कौतुक त्या करतात. त्यांच्या शास्त्रवचनीय जबाबदाऱ्यांपासून ते त्यांना मुक्त करू शकत नसले तरीही त्यांचा भार कमी करण्यासाठी या मंडळ्या पुष्कळ हातभार लावतात, जेणेकरून त्यांच्या मुलांना आपल्या खास नेमणुका सोडून द्याव्या लागणार नाही.
जर्मनीच्या एका दांपत्याने सुमारे १७ वर्षे आपल्या विदेशी नेमणुकीत घालवले असून यापैकी अधिकतर काळ ते प्रवासी कार्यात होते; अशावेळी पतीच्या वयस्कर आईची काळजी घेण्याची गरज वाढली. दर वर्षी, तिला साह्य करण्यासाठी ते आपल्या सुटीचा उपयोग करत असत. शेजारी राहणाऱ्या साक्षीदारांनी देखील प्रेमळ साह्य पुरवले. आईची स्थिती अतिशय नाजूक झाली आणि पूर्ण-वेळेच्या सेवेत असलेले हे दांपत्य तिच्यासोबत होते तेव्हा स्थानिक मंडळीतील वडिलांनी त्यांची भेटी घेण्याच्या योजना आखल्या. हे दांपत्य नियमितपणे आईसाठी जे काही करत होते याची त्यांना पूर्ण जाणीव होती. दांपत्य ज्या खास स्वरूपाच्या पूर्ण-वेळ सेवेत सहभाग घेत होते त्याच्या मोलाची जाणही त्यांना होती. यास्तव, आईची काळजी घेण्यासाठी वडिलांनी एक कार्यक्रम आखला आणि म्हटले: “तिची काळजी घेण्यासाठी तुम्ही जे काही करता त्यापेक्षा अधिक तुम्ही करू शकणार नाही; तुम्हाला स्पेनमधील तुमच्या नेमणुकीत टिकून राहाणं शक्य व्हावं म्हणून आम्ही तुमची मदत करू.” गेल्या सात वर्षांपासून वडील हे करत आहे.
त्याचप्रमाणे, १९६७ पासून सेनेगलमध्ये सेवा करत असलेल्या एका बांधवाला आपल्या वडिलांच्या मंडळीकडून बराच प्रेमळ आधार मिळाला. आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तेव्हा आपल्या प्रेमळ पत्नीच्या सहकार्यानिशी, पालकांची मदत करण्यासाठी पती एकटा संयुक्त संस्थानेला रवाना झाला. कित्येक महिने तेथेच राहणे त्याला भाग होते. परिस्थिती कठीण होती पण त्याला करता येत होते ते सर्व त्याने केले तेव्हा मंडळीने पुढे येऊन साह्य केले, जेणेकरून त्याला आपल्या मिशनरी सेवेत टिकून राहता आले. सुमारे १८ वर्षांच्या कालावधीत, मंडळीने असंख्य मार्गांनी प्रेमळ मदत दिली; प्रथम पित्याला (जे कित्येकांना ओखळूही शकत नाहीत) आणि मग आईला. यामुळे मुलगा जबाबदारीतून मुक्त झाला का? नाही; तो अनेकदा सेनेगलवरून घरी येत असे व होता होईल ती मदत देण्यासाठी आपल्या सुटीचा उपयोग करत असे. पण, एका कामसू दांपत्याला सेनेगलमधील आपल्या पूर्ण-वेळेच्या सेवेत टिकवून ठेवण्यात आपण हातभार लावत आहोत या जाणिवेमुळे मंडळीतील अनेकजण मनोमन सुखावत होते.
येशूने म्हटले, की ज्यांनी सुवार्तेकरता सर्वकाही त्यागले त्यांना पुढे शंभरपटीने बहीणभाऊ, आईबाप किंवा मुलेबाळे मिळतील. (मार्क १०:२९, ३०) याची सत्यता यहोवाच्या सेवकांमध्ये निश्चितपणे दिसून येते. सध्या बेनिन, पश्चिम आफ्रिकेत सेवा करणाऱ्या एका दांपत्याला एका खास अर्थाने याचा अनुभव आला जेव्हा त्यांच्या पालकांच्या मंडळीतील दोन साक्षीदारांनी सांगितले, की तुम्ही तुमच्या पालकांची मुळीच चिंता करू नका. त्यांनी असेही म्हटले: “ते तुमचे आईवडील आहेत, तर आमचे नाहीत का?”
होय, आपण आपल्या पवित्र सेवेच्या विशेषाधिकारांची नितान्त कदर करतो हे दाखवण्याचे एक ना अनेक मार्ग आहेत. आणखीनही काही मार्गांनी तुम्ही अधिक पूर्णार्थाने आपली नितान्त कदर प्रकट करू शकता?
[२६ पानांवरील चित्रं]
खास स्वरूपाच्या पूर्ण-वेळ सेवेसाठी त्यांनी स्वतःला देऊ केले आहे