वाचकांचे प्रश्न
मत्तय १७:२० नुसार, प्रेषित एका पीडित मुलाला ‘आपल्या अल्पविश्वासामुळे’ बरे करू शकले नाही. तथापि, मार्क ९:२९ मध्ये त्यांच्या अक्षमतेचा संबंध प्रार्थनेच्या गरजेशी जोडला गेला आहे. वेगवेगळ्या शुभवर्तमान अहवालांत वेगवेगळी कारणे का दिली आहेत बरे?
खरे तर, हे दोन्ही अहवाल विसंगत नसून एकमेकांस पूरक आहेत. प्रथमतः, मत्तय १७:१४-२० चा अहवाल विचारात घ्या. एका मनुष्याने अशी बातमी दिली, की त्याचा मुलगा एक फेपरेकरी असून येशूचे शिष्य त्या मुलास बरे करू शकले नाहीत. मग मुलाचे हालहाल करणाऱ्या भुताला त्याच्यामधून घालवून देऊन येशूने मुलाला बरे केले. मुलातील भूत घालवून देण्यात शिष्य का अपयशी झाले याबद्दल त्यांनी येशूला विचारणा केली. मत्तयच्या अहवालानुसार, येशूने असे उत्तर दिले: “तुमच्या अल्पविश्वासामुळे; कारण मी तुम्हास खचित सांगतो की, जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल; तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही.” (तिरपे वळण आमचे.)
आता मार्क ९:१४-२९ चा अहवाल विचारात घ्या जेथे सदर विषयावर आपल्याला आणखीन तपशील आढळतात. उदाहरणार्थ, मार्क ९:१७ असा एक तपशील देते, की या घटनेत एका दुष्टात्म्यामुळे फेपरेसदृश्य झटके येत होते. येशूने फेपरेकऱ्यांना व भूतग्रस्तांना बरे केले असल्याचे बायबलमध्ये इतरत्र सांगितले आहे ही लक्षात घेण्याजोगी बाब आहे. (मत्तय ४:२४) या अनोख्या परिस्थितीत हे झटके ‘एका मुक्याबहिऱ्या आत्म्यामुळे’ अर्थात, एका दुष्टात्म्यामुळे येत होते ज्यास वैद्य लूक दुजोरा देतो. (लूक ९:३९; कलस्सैकर ४:१४) मार्क ९:१८ मधील पुढील वाक्यांशाची नोंद घ्या जे म्हणते: “तो [दुष्टात्मा] जेथे जेथे त्याला धरतो.” यावरून समजते, की तो दुष्टात्मा मुलाला सतत नव्हे तर केवळ अधूनमधून छळत असे. पण, तरीही शिष्य त्या दुष्टात्म्यास घालवू शकले नाही व परिणामस्वरूपी मुलालाही ते बरे करू शकले नाही. त्यांनी याचे कारण विचारले असता येशूने उत्तर दिले: “ही जात प्रार्थनेवाचून दुसऱ्या कशानेहि निघणारी नाही.”
तथापि, मार्कच्या अहवालाचे बारकाईने वाचन केल्यास असे निदर्शनास येते, की मत्तयने जे काही नमूद केले त्याच्याशी हे मुळीच विसंगत नाही. मार्क ९:१९ मध्ये आपण वाचतो, की येशूने त्या विश्वासहीन पिढीसंबंधी शोक व्यक्त केला. आणि २३ व्या वचनात, त्याने मुलाच्या पित्यास असे म्हटल्याचे नमूद केले आहे: “विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे.” यावरून, मार्क देखील विश्वासाच्या महत्त्वावर भर देत असल्याचे दिसते. फरक इतकाच, की २९ व्या वचनात मार्क आणखीन एक तपशील देतो. येशूने प्रार्थनेविषयी जे काही म्हटले त्याचा अतिरिक्त तपशील मार्क देतो जो मत्तय व लूकने मात्र वगळला आहे.
तर मग आपण कोणता निष्कर्ष काढू शकतो? इतर प्रसंगी, १२ प्रेषितांनी तसेच ७० शिष्यांनी दृष्टात्मे घालवले होते. (मार्क ३:१५; ६:१३; लूक १०:१७) या प्रसंगी मात्र शिष्य भुतास घालवू शकले नाही. का बरे? विविध अहवालांत उल्लेखिलेले तपशील संकलित केल्यास आपण या निष्कर्षास पोहंचू शकतो, की या विशिष्ट प्रसंगी तसे करण्यास ते अद्याप तयार नव्हते. कदाचित, भूताची जात या समस्येचे एक कारण असू शकते; कारण असे दिसून येते, की भूतांची व्यक्तिमत्त्वे, आवडीनिवडी व क्षमता देखील एकमेकांपेक्षा भिन्नभिन्न असू शकतात. या प्रकारच्या भूतासाठी विशेषतः बळकट विश्वासाची आणि देवाची मदत प्राप्त करण्यासाठी कळकळीच्या प्रार्थनेची गरज होती. शंकाच नाही, की येशूकडे अशाप्रकारचा विश्वास होता. शिवाय, प्रार्थना ऐकणारा त्याचा पिता देखील त्याच्या पाठीशी होता. (स्तोत्र ६५:२) भूताला घालवून देऊन त्या पीडित मुलाला बरे करणे येशूला केवळ शक्यच नव्हते, तर त्याने ते करूनही दाखवले.